सौंदर्यरस/ही नवनिर्मिती नव्हे !






ही नवनिर्मिती नव्हे !



 मराठी ऐतिहासिक कादंबरीचा जन्म बरोबर शंभर वर्षांपूर्वी झाला. १८७१ साली गुंजीकर यांनी 'मोचनगड' ही पहिली ऐतिहासिक कादंबरी लिहिली. त्यानंतर हरिभाऊंचा लवकरच उदय झाला व त्यांनी मराठी ऐतिहासिक कादंबरीला थोर प्रतिष्ठा मिळवून दिली. पुढल्या तीस-चाळीस वर्षात ना. ह. आपटे, नाथमाधव, हडप या लेखकांनी या क्षेत्रात विपुल प्रमाणात लेखन केले. त्यांच्या साहित्याला लोकप्रियताही खूप लाभली. पण तरीही हरिभाऊंचे स्थान अद्वितीयच राहिले. त्या उंचीला अन्य कोणी कादंबरीकार पोचू शकले नाहीत, असाच मराठी टीकाकारांचा अभिप्राय सामान्यतः होता.

 यामुळेच किंवा अन्य काही कारणांनी असेल, पण पुढच्या काळात हा वाङ्मयप्रकार जरा मागे पडला. १९६० च्या आधींच्या वीस-पंचवीस वर्षांत चांगली लोकप्रिय अशी ऐतिहासिक कादंबरी लिहिली गेली नाही. पण थोडयाच दिवसांत रणजित देसाई यांची 'स्वामी' ही कादंबरी प्रसिद्ध झाली, आणि ऐतिहासिक कादंबरीला पुन्हा ऊर्जितावस्था आली. ती इतकी की सध्या ती कादंबरी प्रसिद्धीच्या व लोकप्रियतेच्या अगदी शिखरावर आरूढ झाली आहे असे दिसते. मराठीत २५००० प्रती खपण्याचे भाग्य एखाद्या कादंबरीला पूर्वी कधी मिळाले असेल असे वाटत नाही. 'स्वामी' कादंबरीला ते लाभले आहे. 'श्रीमान योगी' या कादंबरीची किंमत साठ रुपये असूनही तिच्या आतापर्यंत आठ-दहा हजार प्रती खपल्या आहेत. ना. स. इनामदारांच्या 'झेप', 'झुंज' या कादंबऱ्यांच्या अगदी वरील प्रमाणात नसल्या तरी अशाच आवृत्त्या निघत आहेत. कॅप्टन बेलवलकर यांच्या 'घटकेत रोविले शेंडे' व 'शर्तीने राज्य राखिले', देसाई यांची 'चंबळेच्या पलिकडे' मोकाशी यांची 'सूर्यमंडळ भेदिले' यांनाही कमी- जास्त प्रमाणात अशीच प्रसिद्धी लाभली आहे.
 असे असूनही अनेक टीकाकार या नव्या ऐतिहासिक कादंबरीवर असावे तसे प्रसन्न नाहीत. कोणाच्या मते या कादंबऱ्या ऐतिहासिक नाहीतच. लेखकांनी आपल्या कल्पनेनेच आपल्या आवडत्या व्यक्तीची चित्रे रंगविली आहेत. कोणाच्या मते त्यात साहित्यगुण नाहीत. लालित्य, रमणीयता यांचा त्यांत अभाव आहे. 'मंत्रावेगळा' या कादंबरीच्या संदर्भात ना. ग. गोरे यांनी म्हटले आहे की, "या तथाकथित आधुनिक ऐतिहासिक कादंबऱ्यांची श्रेणी पुराणापेक्षा वरची मानता येणार नाही." 'श्रीमान योगी' या कादंबरीचा खप पुष्कळ झाला. पण तिला 'स्वामी'ची प्रतिष्ठा लाभली नाही. आणि तिचा विषय 'स्वामी'पेक्षा मोठा असूनही ती लाभली नाही हे लक्षणीय आहे. वृत्तपत्रांत या कादंबरीची परीक्षणे आली तेव्हा परीक्षकांनी बराच हात राखून तिचा गौरव केला होता. इतर कादंबऱ्यांची वार्ता अशीच आहे.
 अशा स्थितीत या नव्या ऐतिहासिक कादंबरीचे, अभिजात, विदग्ध अक्षर साहित्याचे काही निकष ठरवून त्याअन्वये मूल्यमापन करणे अगत्याचे आहे. या लेखाचा तोच हेतू आहे. मराठी ऐतिहासिक कादंबरीची जन्मशताद्वी त्यातच अनायासे साजरी होईल.
 वैयक्तिक जीवन, व्यक्तीचे खाजगी कौटुंबिक जीवन हा ललित साहित्याचा विषय असतो. आणि तसाच तो असला पाहिजे. कारण बहुजनांना रस त्यांतच असतो; सामाजिक, सार्वजनिक, जीवनात नव्हे. मानवाच्या मनातले रागद्वेष, असूया, मद, मत्सर, लोभ, दंभ, काम, क्रोध हे सर्व विकार, भक्ती, अमर्ष, करुणा इत्यादि भावना यांचे वर्णन, यांचे चित्रण हे साहित्याचे कार्य होय. सौंदर्यतत्त्व हा साहित्याचा आत्मा होय. या सौंदर्यामुळेच साहित्याने मनोरंजन होते. लोकांना त्यात गोडी वाटते. भिन्नरुची जनांचे समाराधन करण्याचे सामर्थ्य साहित्याला या सौंदर्यतत्त्वामुळेच येते, आणि वैयक्तिक जीवन, त्या जीवनातल्या शाश्वत भावना, शाश्वत विकार हा सौंदर्यतत्त्वाचा पहिला घटक आहे.
 याचा अर्थ असा नव्हे की, सामाजिक, सार्वजनिक जीवन हे साहित्याला वर्ज्य आहे. तसे मुळीच नाही. किंबहुना असेही म्हणता येईल की, त्या त्या काळचे सामाजिक, वा राजकीय वा धार्मिक जीवनाचे चित्रण करावे असाच बहुधा थोर साहित्यिकाचा, कवीचा, नाटककाराचा, कादंबरीकारांचा हेतू असतो. ते उद्दिष्ट मनापुढे ठेवूनच तो काव्य- कादंबरी लिहायला बसतो. पण असे जरी असले तरी वैयक्तिक जीवनाच्या माध्यमातूनच म्हणजे व्यक्तीच्या विकारांच्या, भावनांच्या माध्यमांतूनच त्याने सार्वजनिक जीवनाचे दर्शन घडवावयाचे असते. त्याने असे केले तरच त्या वाङ्मयाला साहित्याची पदवी प्राप्त होते.
 वर निर्देशिलेल्या ज्या अनेक ऐतिहासिक कादंबऱ्या त्यांच्या लेखकांना या साहित्याच्या प्रधान लक्षणाचा विसर पडला आहे असे वाटते. एक तर सर्वांनी शिवछत्रपती, थोरले बाजीराव, सदाशिवरावभाऊ, माधवराव पेशवे, नाना फडणीस. त्रिंबकजी डेंगळे, यशवंतराव होळकर, दुसरा बाजीराव, अशा इतिहासकाळातल्या सार्वजनिक क्षेत्रात अग्रभागी असलेल्या व्यक्तींनाच नायकपद दिलेले आहे. हरिभाऊंच्या 'उषःकाल' या कादंबरीत नानासाहेब या काल्पनिक व्यक्तीला नायकपद देऊन सर्व कथा रचलेली आहे. 'उषःकाल' ही नानासाहेब व चंद्राबाई यांची कथा आहे. त्या काळच्या राजकीय परिस्थितीमुळे त्यांच्या कुटुंबावर जे दारुण आघात झाले, त्यामुळे त्या कुटुंबातल्या व्यक्तीच्या सुखदुःखाचे, भावभावनांचे, रागद्वेषाचे जे आविष्कार झाले, त्यांचे चित्रण हा उषःकालचा विषय आहे. आणि या वैयक्तिक भावनांच्या चित्रणातून हरिभाऊंनी त्या काळच्या राजकीय, धार्मिक, सामाजिक जीवनाचे सम्यक् दर्शन घडविले आहे. कादंबरी-कला ती हीच.
 'मूर्तरूप पावलेले तत्त्व, विशेषरूपास आलेले सामान्य, किंवा व्यक्तिरूप पावलेली व्यापकता म्हणजे कला' अशी हेगेल या जर्मन पंडिताने कलेची व्याख्या केली आहे. (काँक्रिट युनिव्हर्सल). जर्मन महाकवी गटे यानेही काव्याचे हे लक्षण प्रधान म्हणून सांगितले आहे. 'व्यष्टीतून समष्टीचे विश्वाचे रूप दाखविणे हे काव्याचे सारतत्त्व होय,' असे तो म्हणतो. तेव्हा कादंबरी सामाजिक असो, राजकीय असो, ऐतिहासिक असो- तिची गुंफण व्यक्तीच्या खाजगी भावनात्मक जीवनाभोवतीच झाली पाहिजे. आधुनिक ऐतिहासिक कादंबरीत साहित्याच्या या प्रधान तत्त्वाकडे दुर्लक्ष झालेले आहे. या कादंबऱ्यांचे नायक इतिहासप्रसिद्ध पुरुष आहेत. त्यांच्या जीवनाचे चित्रण करताना त्यांच्या सार्वजनिक राजकीय जीवनाला प्राधान्य येणे अपरिहार्यच आहे. शिवाजी, बाजीराव, नाना फडणीस, महादजी शिंदे यांच्या कार्याच्या वर्णनात तसे प्राधान्य आले नाही तर त्या पुरुषांचे दर्शनच घडणार नाही. पण तसे प्राधान्य येताच साहित्यकलेची हानी होणे हेही अपरिहार्यच आहे.
 'सूर्यमंडळ भेदिले', 'चंबळेच्या पलिकडे', 'घटकेत रोवले झेंडे' या कादंबऱ्या पहा. पानांमागुन पाने, प्रकरणांमागून प्रकरणे उलटावी तरी सदाशिवरावभाऊ, महादजी शिंदे यांच्या वैयक्तिक, कौटुंबिक जीवनाचे दर्शन घडतच नाही. मराठी फौज व कवायती पलटणी, तोफखान्याचे महत्त्व, गनिमी कावा, उत्तर- हिंदुस्थानातले पठाणांचे राजकारण, दत्ताजीचा वध, पानपतचा व्यूह, रजपुतांची बंडखोरी, महादजीच्या वारशाचा प्रश्न, निजामाची कारस्थाने, याच विषयांच्या वर्णनांनी ही पाने भरलेली आहेत. नानासाहेब मारुतीच्या देवळातील भुयारात उतरला, चंद्राबाई घरातून नाहीशी झाली, यामुळे पुढे काय झाले हे जाणण्याची जी उत्कंठा वाचकांच्या मनांत जागी होते, तशी या कादंबऱ्यांतून केव्हाच होत नाही. कमलकुमारी सती जात असतानाच उदयभानूने तिला पकडले व सिंहगडावर नेऊन तिच्याशी निका लावण्याचे ठरविले, हे वृत्त पहिल्या प्रकरणात वाचताच त्या एका तरुण स्त्रीच्या सुखदुःखाभोवती वाचकाचे लक्ष खेचले जाते व शेवटपर्यंत ते तेथेच खिळून राहते. आणि इतिहासात जरी तानाजी व सिंहगडची लढाई यांना महत्त्व असले तरी कमलकुमारीची विटंबना टळते की नाही याचीच चिंता वाचकांना सारखी वाटत रहाते. अशी काही चिंता, अशी उत्कंठा, ही खेच वरील कादंबऱ्यांत केव्हाही जाणवत नाही. कारण त्यांत वैयक्तिक जीवन आले तरी दर्यामे खसखस या प्रमाणात येते.
 काही कादंबरीकारांनी नायक म्हणून माधवराव, यशवंतराव, दुसरा बाजीराव असे प्रसिद्ध ऐतिहासिक पुरुष निवडले असले तरी त्यांचे वैयक्तिक, कौटुंबिक जीवन रंगविण्याचे धोरण कटाक्षाने संभाळलेले असल्यामुळे त्यांच्या कादंबऱ्यांत रसनिर्मिती झालेली आहे. 'स्वामी' ही कादंबरी अशांमध्ये अग्रस्थानी आहे. रमाबाई आणि माधवराव यांच्यामधले इतके रम्य प्रसंग रणजित देसाई यांनी मधून मधून हिऱ्यासारखे या कादंबरीत बसविले आहेत, की त्यातून नवरस मंदाकिनीच पाझरत असल्याचा भास व्हावा. थेऊरच्या देवळात माधवराव बाहेर दाराशी आले तरी रमाबाई मैत्रिणींशी लपंडाव खेळतच राहिल्या, तो प्रसंग प्रारंभीचा, आणि शेवटचा माधवरावांच्या मृत्यूचा आणि सतीचा. 'स्वामी' या कथेचे साहित्यसुवर्ण झाले आहे ते या व अशा शृंगारवीरकरुणांमुळे. मातुःश्री गोपिकाबाई, काकू पार्वतीबाई यांच्या भेटीगाठीच्या प्रसंगी त्यांचे व माधवरावांचे झालेले अनेक संवाद या पेशव्याच्या अंतरंगाचे चित्रण करतात. आणि ते नाट्यमय प्रसंग वाचकांचे समाराधन करतात.
 ना. स. इनामदार यांच्या 'झुंज' या कादंबरीत यशवंतराव होळकर यांचे व्यक्तिजीवन असेच पहावयास मिळते. तुळसाची व त्यांची पहिली भेट आणि पुढे त्यांचे झालेले लग्न, या घटना जुन्या कादंबरीतल्या कथानक- रचनेचा भास निर्माण करतात. यशवंतराव प्रथम भणंग स्थितीत जेजुरीला आले. त्यांना इंदूरला जाण्यासाठी पैसे हवे होते. गोपाळराव खाडे हे होळकरांचे उपाध्ये. या गरीब ब्राह्मणाने मुलीच्या लग्नासाठी साठवून ठेवलेले चारशे रुपये त्यांना दिले. पुढे पराक्रम करून यशवंतराव परत जेजुरीस आले तेव्हा त्यांना कळले की, गोपाळरावांच्या वेणूचे लग्न झाले. पण हुंड्याचे चारशे रुपये देता न आल्यामुळे सासरच्यांनी मुलीला छळून छळून मारले. आणि त्यामुळे तिची आई वेडी झाली. हे ऐकून यशवंतराव वेडेपिसे झाले. आपल्यामुळे या ब्राह्मणाचा संसार उद्ध्वस्त झाला हे पाहून त्यांना धक्का बसला. याही घटनेला थोडे कथानकाचे रूप आहे. मल्हारराव होळकरांची उपस्त्री मावंशीबाई हिचे यशवंतरावांवर पोटच्या पोरापेक्षा जास्त प्रेम होते. तिनेच त्यांची समजूत घालून तुळसाशी त्यांचे लग्न घडवून आणले. वेळ येताच स्वतःजवळचे लाख रुपये तिनेच त्यांना दिले, व सेना उभारण्यास साहाय्य केले. या प्रसंगी तिचे जे वात्सल्य प्रकट होते, यशवंतरावांची तिच्याविषयीची जी भक्ती दिसून येते, त्यावरून कौटुंबिक जीवन, त्यात आविष्कृत होणारे शाश्वत मनोविकार हाच खरा साहित्याचा विषय होय, या म्हणण्याचा अर्थ स्पष्ट होईल साहित्याचे हे मर्म ज्यांनी जाणले नाही त्यांना कादंबरी- लेखनात, राजकीय घडामोडींतून साहित्य निर्मिण्याच्या कामात यश येणे कठिण आहे.
 वैयक्तिक जीवन, कौटुंबिक जीवन, त्या जीवनातून आविष्कृत होणारे शाश्वत मनोविकार हे ज्या प्रमाणात कमी किंवा जास्त वर्णिलेले असतात, त्या प्रमाणात त्या कादंबरीचे आकर्षण कमी किंवा जास्त होते. 'स्वामी'- नंतर प्रसिद्ध झालेल्या अनेक कादंबऱ्यांचा निर्देश वर केला आहे वाचकांनी या दृष्टीने त्या वाचून वरील सत्याचा स्वतःच पडताळा घ्यावा.
 पण मानवाचे शाश्वत मनोविकार, त्याच्या शृंगार-वीर करुणादी भावना यांचे प्रभावी वर्णन करावयाचे, तर त्यासाठी बांधेसूद, सुरचित अशा कथानकाची आवश्यकता असते, आणि आधुनिक ऐतिहासिक मराठी कादंबरीने कथानकरचना कटाक्षाने टाळली आहे. त्यामुळे साहित्यकलेची मोठी हानी झाली आहे. हे लेखक एकापुढे एक प्रसंग जोडून एक घटनांची मालिका आपल्यापुढे मांडतात. त्यामुळे कापडाचे निरनिराळे धडपे जोडून बनविलेल्या मधूनमधून आडवे उभे दंड घातलेल्या पासोडी- गोधडीसारख्या या कादंबऱ्या दिसतात. आरंभापासून शेवटपर्यंत अखंड टिकणाऱ्या धाग्यांनी, ताण्या-बाण्यांनी विणलेल्या सलग, एकसंध वस्त्राची शोभा त्यांना येत नाही. या कादंबऱ्यांत निरनिराळे जे धडपे जोडलेले आहेत तेही इतिहासप्रसिद्ध पुरुषांच्या जीवनातले. म्हणजे इतिहासांनी आधीच वर्णिलेले. यामुळे या कादंबऱ्या म्हणजे नवनिर्मिती होत नाही. साहित्य ही नवी सृष्टी असते. नवनिर्मिती असते. जमिनीत पेरलेल्या एका कोयीतून वा बीमधून कोंब येतात, त्याला धुमारे फुटतात, व त्यांचेच हळूहळू वृक्षात वा वेलीत रूपांतर होते. निसर्गात ही जी किमया घडते, तीच कविमनात घडत असते. म्हणूनच त्याला आपण शब्दसृष्टीचा ईश्वर म्हणतो. ईश्वर सृष्टी निर्माण करतो. तशीच कवीही अपर सृष्टी निर्माण करतो. आणि ती कथानकाच्या रूपाने दिसून येते. आधुनिक ऐतिहासिक कादंबऱ्यांत ही अपर सृष्टी अभावानेच आढळते.
 कथानक म्हणजे तरी काय ? आरंभापासून अखेरपर्यंत फुलवीत नेलेला, निसर्गक्रमाने विकसत जात असल्याचा भास निर्माण करणारा समरप्रसंग. समरप्रसंगाचा आरंभ म्हणजे कादंबरीचा आरंभ. त्याचा शेवट म्हणजे कादंबरीचा शेवट. 'टेल ऑफ टू सिटीज' ही डिकन्सची कादंबरी पहा. चार्ल्स डार्ने (एव्हरमाँड) व लुसी मॅनेट यांचे परस्परांवर प्रेम जडून त्यांचा विवाह झाला. फ्रेंच राज्यक्रांतीच्या बेबंदशाहीत डार्ने पकडला गेला. येथे समरप्रसंग सुरू झाला. आणि मृत्यूच्या दाढेतून सुटून लुसीबरोबर तो फ्रान्समधून इंग्लंडला परत गेला तेव्हा तो संपला, आणि कादंबरीही तेथेच संपली. या दोन सामान्य व्यक्तींच्या कौटुंबिक, खाजगी जीवनातील प्रसंगांतून सर्व फ्रेंच राज्यक्रांतीच्या वादळाचे उत्तम दर्शन आपल्याला घडते. 'फ्रेंच राज्यक्रांतीसारख्या सार्वजनिक घटनेशी सामान्य, खाजगी व्यक्तींच्या जीवनाची इतकी एकजीव केलेली गुंफण मी दुसऱ्या कोठल्याही कथेत पाहिलेली नाही.' असे ई. एम. फॉर्स्टर या प्रख्यात लेखकाने म्हटले आहे. 'उषःकाल' मध्ये हरिभाऊंची कादंबरीकला अशीच प्रकट झाली आहे. मुस्लिमांचे सुलतानी राज्य, त्यांचे अत्याचार व त्याविरुद्ध मराठयांनी केलेली उठावणी यांची ही कथा आहे. नानासाहेब व चंद्राबाई यांचा वियोग झाला येथे समरप्रसंग सुरू होतो, व पुनर्मीलन झाले तेथे तो संपतो. या कादंबरीत आणखी दोन उपकथानके अशीच आहेत, सूर्याजीच्या कुटुंबावर सुलतानी सत्तेचा असाच आघात झाला. त्याची बायको वेडी झाली. तिला पुन्हा शुद्ध येऊन ती सूर्याजीरावांना लाभली, येथे कथा संपली. रामरावांची पत्नी रंभावती हिला विजापूरच्या सुलतानाने पळवून जनानखान्यात घातले. रामरावांनी हे कृत्य करणाऱ्या सादुल्लाखानाला ठार मारून सूड उगविला व मग त्या दोघांनीही इहलोक सोडला. या तीन घराण्यांच्या हकीकतीतून मुस्लिम सत्ता व शिवकृत क्रांती यांचे दर्शन जसे घडते तसे प्रत्यक्ष इतिहासातूनही घडत नाही. यामुळेच कादंबरीला नवी सृष्टी म्हणतात. इतिहाससृष्टी परमेश्वर निर्माण करतो. साहित्यसृष्टी कधी निर्माण करतो. ती कल्पित असते. पण असत्य नसते. उलट एका टीकाकाराने म्हटल्याप्रमाणे जास्तच सत्य असते. पण ती केव्हा ? सजीव वनस्पतीप्रमाणे एका बीजातून ती विकसत आली तर. हा विकास म्हणजेच कथानक आधुनिक ऐतिहासिक कादंबरी तेच कटाक्षाने करीत नाही. त्यामुळे ती नवनिर्मिती होत नाही. ईश्वराच्या सृष्टीतलेच तुकडे घेऊन हे लेखक त्यांना शिवण घालतात. त्यामुळे ते पहाताना नवनिर्मिती पाहिल्याचा आनंद होत नाही.
 कथा म्हणजे समरप्रसंग. लेखकाने तो फुलविला की त्यातून मानवाचे रागद्वेष, मदमत्सर, हर्षखेद, भक्ती, प्रीती, धैर्य, सूडबुद्धी, स्वार्थलोभ, अर्पणवृत्ती इत्यादी विकार- भावना प्रकट होतात. आणि त्यांनीच कथा आकर्षक होते. 'स्वामी' कादंबरीत सलग एकसंध कथानक नाही. प्रारंभापासून अखेरपर्यंत एकच एक अखंड धागा नाही. पण देसाई यांनी निवेदन करताना समरप्रसंगांनीच मालिका गुंफण्याचे धोरण कटाक्षाने ठेविले आहे. पहिल्याच प्रवेशात दरबारात दिनकर महादेव उभा रहातो व जवहिरखान्यातून दिलेल्या डागांच्या पावत्या मिळत नाहीत अशी तक्रार मांडतो. ती अर्थातच राघो यांच्या विरुद्ध होती. त्यामुळे ते संतापले. तरीही पावत्या दिल्याच पाहिजेत असा माधवरावांनी निर्णय दिला. आणि ठिणगी पडली. गंगोबा तात्या, राघोबा व माधवराव यांच्या संदर्भात 'महादेव आणि नंदी' ही उपमा योजतात. ही बारीकशी पण ठिणगीच आहे. विसाजीपंत लेले, सखारामबापू यांचे प्रवेश- त्यात अशाच ठिणग्या आहेत. आणि कादंबरीकार त्या फुलवून त्यातला दाह, त्यातले रागद्वेष चांगले उभे करतो. त्यामुळे 'स्वामी' हे साहित्य झाले आहे.
 उलट 'श्रीमान् योगी' पहा. त्यात सर्व शिवचित्र ठोकून बसविण्याचा लेखकाने प्रयत्न केला आहे. निवड अशी नाहीच. महाराजांनी रांगणा घेतला. साल्हेर घेतला, सुरत लुटली, सिंहगड घेतला- एकापाठोपाठ दैनंदिनीतील नोंद वाचून दाखवावी तशी देसाई हकीकत सांगत आहेत. प्रतापरावाने नेसतीच्या लढाईत आत्महुती दिली, नेताजी पालकर मुसलमान झाला, शिव-समर्थांची भेट झाली, संभाजीराजांनी गोदावरीला पळवून एका गडावर नेऊन ठेवली... निवेदन चालू आहे. त्यात ठिणग्या नाहीत, रसौघ नाहीत. वास्तविक या प्रत्येक प्रसंगात एका स्वतंत्र कादंबरीला पुरेल असा संघर्ष आहे. असा रसनिर्झर आहे. पण तो फुलविला, आळविला तर साहित्य निर्माण होते. पण देसायांनी एखादी जंत्री करावी तसे ते प्रसंग टाचून जोडून आपल्यापुढे मांडले आहेत. पोत्यात सामान भरावे तसे हे प्रसंग पुस्तकाच्या दोन पुठ्ठ्यात भरले आहेत. त्यामुळे ते निवेदन नीरस, बेचव आणि रटाळ झाले आहे. एकसंध अखंड समरकथा तर त्यात नाहीच; पण 'स्वामी'- सारखा प्रत्येक प्रसंग संघर्षाने वा मधुर शृंगाराने वा कारुण्याने नटलेलाही नाही, शिवचरित्र ही महाराष्ट्राची स्फूर्ती आहे, विद्युत् आहे, संजीवनी आहे. नवरस मंदाकिनी आहे, ती कथा इतकी रूक्ष, रसशून्य व ओसाड कोणी करू शकेल यावर मी कधीच विश्वास ठेवला नसता. आणि 'स्वामी' कर्ते रणजित देसाई असे लिहू शकतील हे तर ती वाचल्यावरही खरे मानण्यास प्रयास पडतात.
 निवेदन- शैलीचा विचार केला तरी असे दिसते की, या लेखकांनी साहित्यनिर्मितीचा प्रयत्नसुद्धा केलेला नाही. रसोत्कट प्रसंग जो असेल तेथून प्रारंभ करावा, तो धागा प्रथम खेचून घेऊन त्याच्याबरोबरच वाचकांची मने खेचून घ्यावी, त्यांचे औत्सुक्य जागृत करावे, त्यांच्या ठायी उत्कंठा निर्माण करावी, ही ऐतिहासिक कादंबरीच्या निवेदन- शैलीतली प्राथमिक गोष्ट आहे. कमलकुमारी सती जात होती, तिला उदयभानूने पकडले, हा प्रसंग हरिभाऊ प्रथम सांगतात. 'उषःकाला'त रंभावतीची कथा त्यांनी कशी सांगितली आहे ? तिला पळवून नेली तेथून त्यांनी आरंभ केला नाही. हा कालक्रम झाला. पण नाट्यमयता आणण्यासाठी रसक्रमाने निवेदन करणेच अवश्य असते. रंभावतीला तिच्या महालात गुप्तपणे येऊन रामराव भेटतात व 'मरायला सिद्ध हो !' असे म्हणतात, त्या प्रसंगापासून हरिभाऊ प्रारंभ करतात. हा रसक्रम होय. यानंतर उत्कंठा जागृतीचे धोरण ठेवून कधी मागले, कधी पुढले प्रसंग हरिभाऊ सांगतात.
 डॉ. मॅनेट यांच्यावर एव्हरमाँड सरदारांनी जे भयानक अत्याचार केले त्याचे वर्णन डिकन्सने प्रारंभी केले नाही. कादंबरीच्या प्रारंभाच्या आधीची किती तरी वर्षांपूर्वीची ती कथा होती. पण ती जाणण्याचे औत्सुक्य आपल्या मनात प्रथम निर्माण करून मगच डिकन्स ती हकीकत सांगतो. परमार्थामध्येसुद्धा प्रथम जिज्ञासाजागृती असते. 'अथा तो ब्रह्मजिज्ञासा' हे पहिले सूत्र. त्यावाचून पुढे पाऊल नाही. मग साहित्यात तरी त्यावाचून केलेले निवेदन रंजन करण्यास कसे समर्थ होईल ? पण आधुनिक कादंबरीत कथानकाप्रमाणेच निवेदनातील रसक्रमही निषिद्ध मानलेला दिसतो. सर्व लेखक पहिलीनंतर दुसरी, दुसरीनंतर तिसरी, मग चौथी, मग पाचवी, मग दहावी, मग शंभराची, असा रूक्ष कालक्रमाचाच आश्रय करतात.
 'घटकेत रोविले झेंडे' ही कादंबरी म्हणजे थोरले बाजीराव पेशवे यांचे विस्तृत असे चरित्रच आहे. मांडवगडची लढाई, बुंदेलखंडची लढाई, दक्षिणेतील छत्रपती शाहू व संभाजीराजे यांच्यातील वैमनस्य, उदाजी चव्हाणाचे पारिपत्य, बाजीरावसाहेबांची दिल्लीवर स्वारी, भोपाळचा वेढा, अशा क्रमाने हे सगळे निवेदन केलेले आहे. त्यात कथानक नाही, वैयक्तिक जीवन नाही, मानवी भावनांतून आळविलेले रस नाहीत, श्वास रोखून वाचावे असे समरप्रसंग नाहीत. लढायाच आहेत. तेव्हा समरप्रसंग आलेच. पण त्यांची ती ऐतिहासिक वर्णने आहेत. थोडा तपशील जास्त भरला आहे इतकेच, पण किल्ले सुलतानगड किंवा सिंहगड या एकेका युद्धाभोवती मानवी मनातल्या रसगंगा जशा हरिभाऊंनी वाहविल्या आहेत तशा येथे नाहीत. त्यामुळे त्या लढाया, ती युद्धे म्हणजे साहित्यातील समरप्रसंग होत नाहीत.
 साहित्य ही नवी आहे. 'घटकेत रोविले झेंडे' या कादंबरीच्या बाराशे पानात नवनिर्मितीचा कुठेच आढळ होत नाही. ऐतिहासिक घडामोडींचे ज्ञान व्हावे म्हणून कोणी कादंबरी वाचीत नाही. या घडामोडींच्या मागचे जे मानवाचे शाश्वत मनोविकार, त्यातून उद्भवणारे भावनाक्षोभ, भिन्न भावनांचा तुमुल संगर, हे पहावे आणि त्यांची अनुभूती घडावी म्हणून वाचक कादंबरी हाती घेतो, पण कालक्रमाने केलेले निवेदन, भाववर्णनांचा अभाव, ज्ञान देणारी ऐतिहासिक घटनांची तपशीलवार वर्णने यांनी त्याचा तो हेतू साध्य होत नाही, नवनिर्मितीवाचून अनुभूती घडत नाही. आणि बहुतेक आधुनिक कादंबऱ्या नवनिर्मिती करण्याचे कटाक्षाने टाळतात. इतिहासातील वर्णनांत बखरीतल्या वर्णनांची भर घालून नवे लेखक ऐतिहासिक घटना एकापुढे एक जोडून देतात, आशि त्यालाच कादंबरी म्हणतात.
 'उत्तम ऐतिहासिक कादंबरी कोणती-- जिच्यात किमान इतिहास आहे ती,' असे अँडर मॅथूज या समीक्षकाने म्हटले आहे. 'सत्य आणि सत्याभास यांचे मिश्रण हे ऐतिहासिक कादंबरीचे हृद्गत होय,' असे हरिभाऊ म्हणतात. वास्तव आणि कल्पित-- फॅक्ट आणि फिक्शन-- यांच्या संयोगातून ऐतिहासिक कादंबरी निर्माण होते, असे अनेक साहित्यशास्त्रज्ञांचे मत आहे. आणि मानवी मनाचे धर्म जोपर्यंत बदललेले नाहीत तोपर्यंत हे, निकष बदलता येणार नाहीत. ही जुनी मते झाली, आता ती शिळी झाली असे म्हणून कोणाला समाधान मानून घ्यावयाचे असले तर त्याने घ्यावे. पण मनुष्याच्या मनाचे घटक जोपर्यंत शिळे होत नाहीत तोपर्यंत त्या समाधानाला अर्थ नाही. त्या मनाला कल्पित सृष्टी हवी आहे; जीवनातल्या घडामोडीमागचे रागद्वेष हवे आहेत; अमूर्त नको असून मूर्त हवे आहे; सार्वजनिक नको असून वैयक्तिक, कौटुंबिक हवे आहे; ज्ञान नको असून भावना हव्या आहेत; इतिहास नको, कल्पित हवे आहे.
 निवेदनशैलीच्या दृष्टीने रसक्रमाला जसे महत्त्व आहे तसेच रहस्य या घटकालाही आहे. मानवी मनाला शृंगार, समर, करुण यांची जशी ओढ आहे, तशीच रहस्य जाणून घेण्याची आहे. गुप्तहेरकथा, गुप्तचरकथा यांचा तर रहस्य हा आत्माच आहे. ऐतिहासिक कादंबरीत रहस्याला इतके जरी नाही तरी खूपच महत्त्व आहे, हे पूर्वीच्या कादंबऱ्यांवरून सहज दिसून येईल. वॉल्टर स्कॉट हा इंग्लंडमधला पहिला ऐतिहासिक कादंबरीकार मानला जातो, त्याने आपल्या निवेदनात रहस्याचा मोठ्या चातुर्याने उपयोग केलेला आहे. 'आयव्हॅनहो' ही त्याची कादंबरी पाहा. आतापर्यंत सांगितलेल्या साहित्याच्या सर्व निकषांअन्वये ती उत्तम ऐतिहासिक कादंबरी ठरते. नॉर्मन व सॅक्सन या मध्ययुगीन इंग्लंडमधल्या दोन जमाती असून त्यांचे हाडवैर होते. हा व्यापक, सार्वजनिक विषय स्कॉटने निवडला आहे. पण तो मांडला आहे आयव्हॅनहो व रोवेना यांच्या वैयक्तिक जीवनाच्य माध्यमातून. आणि एक नवी कल्पित सृष्टी निर्माण करून या दोन जमातींच्या हाडवैराचे भयानक स्वरूप त्याने अतीव कौशल्याने चित्रिले आहे. शिवाय आयव्हॅनहो व स्वतः राजा रिचर्ड या व्यक्तीभोवती फार मोठे रहस्य निर्माण करून ते मोठ्या कौशल्याने शेवटपर्यंत टिकवून स्कॉटने हे निवेदन अत्यंत रम्य व रसाळ करून टाकले आहे. त्याचेच अनुकरण करून हरिभाऊंनी 'रूपनगरची राजकन्या', 'चंद्रगुप्त', 'उषःकाल', 'सूर्यग्रहण' या कादंबऱ्यांना चित्तवेधकता प्राप्त करून दिली आहे. पण आधुनिक कादंबरीकार निवेदनशैलीचा हा महत्त्वाचा घटकही त्याज्य मानतात. त्यांना त्याचे अगदी वावडे आहे असे दिसते. याचे कारण काय ते त्याचे त्यांनाच माहीत ! वास्तविक रहस्यमय घटना- आणि विशेषतः राजकीय क्षेत्रात- या आजही अगदी वास्तव घटना आहेत. प्रत्यक्ष युद्ध व थंडे युद्ध याचे ते एक अविभाज्य अंग आहे. जीवनातले ते अगदी अपरिहार्य सत्य आहे. मागल्या इतिहासात तर रहस्यमय घटना या आजच्या दसपट वास्तव होत्या तरी नवे लेखक त्यांचा मुळीच अवलंब करीत नाहीत याचे आश्चर्य वाटते. ती पद्धती जुनी झाली, शिळी झाली, ती आपण स्वीकारली तर आपल्याला लोक आधुनिक म्हणणार नाहीत, 'जुनेपुराणे' असा शिक्का आपल्यावर मारतील, अशी त्यांना भीती वाटत असावी असे दिसते. किंवा ऐतिहासिक कादंबरी या वाङ्मयप्रकाराविषयीच त्यांच्या काही विकृत कल्पना याच्या बुडाशी असाव्यात. जास्तीत जास्त ऐतिहासिक सत्याच्या जवळ रहावयाचे; कल्पिताचा आश्रय शक्यतो करावयाचा नाही. या विचारामुळेच, साहित्याचे अलंकार शक्यतो वर्ज्य मानावयाचे, अशी त्यांची विचारसरणी असल्याचे त्यांच्या लिखाणावरून दिसते. त्यांच्या कादंबऱ्या बेचव, नीरस, साहित्यशून्य रसाळ झाल्या आहेत, त्याचे हेच प्रधान कारण आहे असे वाटते. कल्पित सृष्टी, नवनिर्मिती हे साहित्याचे मुख्य कार्य होय. आधुनिक कादंबरीला त्याचेच वावडे आहे.
 आधुनिक ऐतिहासिक मराठी कादंबरीच्या भाषाशैलीचा विचार केला तरी, साहित्यसौंदर्याशी मुद्दाम वाकडे धरावयाचे धोरणच नव्या लेखकांनी बुद्धिपुरस्सर आखले आहे की काय, अशी शंका येते. या कादंबऱ्यांत विपुल संवाद आहेत. पण त्यात बोलणारे माणसांची भाषा बहुतेक सर्वत्र आजची प्रौढ, नागरी भाषा आहे. त्रिंबकजी डेंगळे, त्याचे गावकरी, त्रिंबकजीची आई, त्याच्या स्त्रिया चंद्रा व मैना, त्यांच्या मोलकरणी- सर्व सर्व प्रौढ नागर भाषा बोलतात. 'आकाशात चंद्र उगवला की पाठोपाठ रोहिणीनं आलंच पाहिजे !' असं चंद्रा म्हणते. हा अलंकार घेऊनच त्रिंबकजी पुढे बोलतो पुढे तिला काही तत्त्वज्ञान सांगताना त्रिंबकजी म्हणतो : 'ब्राह्मणांनी ब्राह्मण्य सोडलं. धन्यांनी धनीपण सोडलं '...'विशेष नेहमीच झालं म्हणजे त्यात वैशिष्ट्य रहात नाही'...'माझ्या भावना दडपल्या जातात' अशी विसाव्या शतकातली प्रौढ भाषा निमगाव जाळीचा, लहानपणी गुरे वळणारा त्रिंबकजी बोलतो. यशवंतराव होळकराच्या आसपासचे लोक सर्व अशीच भाषा बोलतात. तुळसा, लाडी, मावशी या नागर पुणेरी भाषा बोलतात. होळकर घराण्यातले बहुतेक लोक पिढ्यान् पिढ्या इंदूरला राहिलेले. त्यांचे नोकरचाकर तसेच धर्मा, शामराव, भवानीशंकर हे तिकडचेच लोक. पण त्यांची भाषा पुणेरीच आहे. शहरी भाषा आणि खेड्यातली कुणबाऊ भाषा असा फरक दाखविण्याची दक्षताही लेखकांनी घेतलेली नाही. रणजित देसायांनी प्रौढ ब्राह्मणी भाषा कुळंबाऊ भाषा हा भेद लक्षात ठेवून तशातशा व्यक्तींच्या मूखी ती ती भाषा घातली आहे. पण एवढेच. शहर- खेडेभेद, प्रांतभेद, वर्गभेद इत्यादी भेद संभाळावयाचा त्यांनी कटाक्षाने प्रयत्न केलेला नाही. आणि व्यक्तिविशिष्ट भेदाकडे तर कोणीच लक्ष दिलेले नाही. 'सूर्यमंडळ भेदिले', 'घटकेत रोवले झेंडे', 'चंबळेच्या पलिकडे' या सगळ्या कादंबऱ्यांत भाषाविशेषांची अशीच अक्षम्य उपेक्षा केलेली दिसते. 'त्याला तुम्ही अपमानित केले'... 'यामुळे गुण धोक्यात येतात'... 'तुम्ही जाऊ शकता'... 'हा धोरणीपणा की निष्क्रियता ?'... 'शिद्यांच्या नेमणुकीचा प्रस्ताव दरबारात आला'... 'मला त्यांनी प्रलोभने दाखविली'... 'अन्यायाला विजय मिळाला की उन्मादाला भरतं येतं'... असली वाक्ये मल्हारराव, महादजी, इब्राहीमखान, भाऊसाहेब यांच्या तोंडी आहेत. भाषाविशेषांची दखल घेतली नाही की व्यक्तिदर्शन चांगले होत नाही, आणि वातावरणनिर्मितीही होत नाही.
 भाषाविशेषांची दखल घेतली तर कोणते आगळे सौंदर्य निर्माण होते हे गो. नि. दांडेकर यांनी आपल्या 'दर्याभवानी' या कादंबरीत दाखवून दिले आहे. ही कोकणाची कथा आहे. पण हे सांगावे लागत नाही. 'अवो ती तांब्याची पाटी'... 'पला पला !'...' मिनी आइकलां'... .'मी पघतांव्'... 'रे भटा ! गो आबई'... 'तुम्ही हांव् कुटं'... 'अगे आक्रंदायास काय झालें ?'... 'मेल्या, तूंस झालें तरी काय'... या वाक्यांवरून ते सहज ध्यानात येते.
 कोकणात धनगर आहेत, भंडारी आहेत, मराठे माहेत, ब्राह्मण आहेत, लमाण आहेत, काळे सिद्दी आहेत. वर घाटी येताना शिवथर घळीत या लोकांना समर्थ रामदासस्वामी भेटतात. त्यांचे कल्याण, उद्धव हे शिष्य तेथे आहेत. आणि वर स्वतः शिवाजीराजे, अनाजी दत्तो भेटतात. यांचे संवाद रचताना काळभेद, प्रांतभेद, धर्मभेद, वर्गभेद, जातिभेद, या सगळ्यांकडे लक्ष ठेवून दांडेकरांनी तशी तशी अनुरूप भाषा त्याच्या त्याच्या मुखी घातलेली आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती निराळी दिसते. तिच्या मुलखाचा बोध होतो, व तिची मनोवृत्तीही स्पष्ट होते.
 दांडेकरांनी स्वतः निवेदन करतानाही त्यांच्या मराठीला सतराव्या शतकातल्या कोकणी, घाटी मराठीची डूब देण्याचा प्रयत्न केला आहे. भाषाशैली ती हीच. तिच्यामुळे निवेदनाला सौंदर्य येते. हे सौंदर्य म्हणजे साहित्याचा महत्त्वाचा शृंगार होय. पण नवी ऐतिहासिक कादंबरी या शृंगाराची बूज राखीत नाही. गो. नी. दांडेकर हे अपवाद वाटतात. तसे दांडेकर बऱ्याच बाबतीत अपवाद आहेत. कोकण हा लहान परिसर त्यांनी निवडला आहे, आणि कथा आहे ती दोन वर्षातलीच आहे. त्यामुळे कोकणचे वातावरण निर्माण करण्यात त्यांना यश आले आहे आणि मुख्य म्हणजे, व्यक्तिजीवनातील रस आळविणे व समर फुलविणे याला त्यांना अवसर मिळाला आहे. रोहिडेश्वरापासून राज्याभिषेकापर्यंत सर्व घटना एका पोत्यात भरण्याचा अट्टाहास त्यांनी केलेला नाही. याच्या जोडीला बाबलभट किंवा मायनाक भंडारी यांच्या जीवनात 'उषःकाला'तील नानासाहेब किंवा सूर्याजी यांच्यासारखी उंची निर्मिली असती, तर कादंबरी उंच, थोर झाली असती. आहे या स्थितीत तिचा जीव लहानच राहिला आहे.
 इतिहास व कल्पित कादंबरी यांच्या नात्यासंबंधी जे विचार नव्या लेखकांनी-- विशेषतः ना. स. इनामदार यांनी-- मांडले आहेत त्यांचा परामर्श आता अगदी थोडक्यात घ्यावयाचा आहे. 'झेप', 'झुंज' व 'मंत्रावेगळा' अशा तीन कादंबऱ्या इनामदारांनी लिहिलेल्या आहेत. आजपर्यंतच्या मराठी इतिहासकारांनी त्रिंबकजी डेंगळे, यशवंतराव होळकर व दुसरा बाजीराव यांची जी चित्रे काढली आहेत ती यथार्थ नाहीत, हे पुरुष अगदी निराळे-- म्हणजे पराक्रमी, कर्तबगार, राजकारणकुशल व धीरोदात्त होते, असा त्यांचा दावा आहे. व त्यांनी जी ऐतिहासिक कागदपत्रे पाहिली त्यावरून हे निश्चित सिद्ध होते, असे ते म्हणतात. येथे ऐतिहासिक कागदपत्रात तसा पुरावा आहे की नाही या वादात मी शिरत नाही. त्यांचे म्हणणे क्षणभर गृहीत धरून त्यांच्या मते इतिहासात या पुरुषांचे जे व्यक्तिमत्त्व त्यांना दिसले ते कादंबरीत साकार करण्यात ते कितपत यशस्वी झाले आहेत याच दृष्टीने फक्त परीक्षण करावयाचे आहे.
 'मंत्रावेगळा' ही कादंबरी पाहा. दुसऱ्या बाजीरावाने इतिहासाला कलाटणी दिली. यशवंतरावाचे समर्थ सैनिकी हात व त्रिंबकजी डेंगळ्याची सर्वंकष मुत्सद्देगिरी कुठे तरी थिटी पडली म्हणून मग बाजीराव पुढे सरसावला, असे त्यांचे वर्णन इनामदार प्रस्तावनेत करतात. ठीक आहे. याच्या ऐतिहासिक पुराव्याविषयी वाद आम्ही घालीत नाही. त्याच्या या सरसावण्याचे दर्शन कलाकृतीत होते की नाही, हा खरा प्रश्न आहे. त्या दृष्टीने पाहिले तर काय आढळते ? प्रत्यक्ष लढाईचा प्रसंग आला तेव्हा श्रीमंत पर्वतीवर जाऊन बसले. का ? सरदारांनी आग्रह केला की, 'आम्ही असताना श्रीमंतांनी पुढे कशाला जायचे ?'
 पुढच्या मोहिमेत श्रीमंत रणांगणात उतरले, पण पुढे सरसावले नाहीत. का ? सरदार म्हणाले, 'आम्ही असताना श्रीमंतांनी पुढे कशाला जायचे ? खरे आहे ! शिवाजी, बाजीराव, राणा प्रताप यांना हे शहाणपण सुचले नाही, हे भारताचे नशीबच म्हणावयाचे.
 शेवटी श्रीमंत बाजीरावसाहेब इंग्रजांच्या स्वाधीन झाले ! का ? तर त्या वेळी लढाई मांडली असती, तर विनाकारण हजारो लोकांची हत्या घडली असती. पण त्याआधी रणांगणात मरून जाऊ अशी त्यांची भाषा होती, तिचे काय झाले ? आणि लढाई न करता निसटून जाऊन पुन्हा तयारी करायला काय हरकत होती ? पण श्रीमंतांनी विवेक केला, आणि ते शत्रूच्या स्वाधीन झाले ! श्रीमंत दर वेळी युद्धाचा पोशाख करीत हे मात्र खरे आहे. ते त्यांना उत्तम जमत असे. पण नंतर वेळ आली की ते विवेक करीत. उगीच हत्या होऊ देण्यात अर्थ नाही असे त्यांना वाटे. त्रिंबकजी डेंगळे असाच ऐन वेळी विवेक करीत असे. तो इंग्रजांच्या का स्वाधीन झाला ? 'या वेळी लढाईची तयारी नाही. उगाच संहार होईल. ते योग्य नाही. तेव्हा मराठशाहीसाठी मी आत्मबलिदान करतो !'
 केवढी उदात्त भूमिका ही! गणपतराव पानसे त्या वेळी म्हणत होते की, 'आताच सोक्षमोक्ष होऊ द्या ! दसरा झाल्यावर आमच्या फौजा इंग्रजांना घेरणारच होत्या. त्याऐवजी आताच युद्धाला तोंड लागेल.' पण त्रिंबकजीला यशाची थोडीसुद्धा आशा वाटत नव्हती. म्हणून त्याने विवेक केला.
 वास्तविक त्रिंबकजीच्या कर्तृत्वाचे वर्णन करताना इनामदारांनीच सांगितले आहे की, पेंढाऱ्यांशी त्याने संधान बांधले होते. त्यांचा सरदार रामदीन त्रिंबकजीला भेटला होता. त्याने आश्वासन दिले होते की, आमची सव्वा लाख फौज श्रीमंतांचा इशारा येताच इंग्रजावर तुटून पडेल ! शिवाय पाच सहा हजार भिल्ल होते. तरी त्रिंबकजीला यशाची आशा वाटत नव्हती. त्याला तरीही या वेळी रक्तपात टाळावा असेच वाटले. त्याची सर्वकष मुत्सद्देगिरी ती हीच ! इंग्रजांच्या तुरुंगातून निसटल्यावरही तो पेंढाऱ्यांकडे किंवा रणजितसिंगाकडे गेला नाही. आसपास छापे घालीत राहून, जे संकट टाळण्यासाठी त्याने आत्मबलिदान केले ते पुन्हा तयारी नसताना ओढवून घेतले. हीही मुत्सद्देगिरीच ! वास्तविक तसेच त्याने उत्तरेत जाऊन पेंढाऱ्यांची सव्वा लाख फौज घेऊन यावयाचे. सर्व हिंदुस्थानात त्याच्यापुढे कोणी उभा राहू शकला नसता. असे असूनही त्याने विवेक केला, लढाईचा पोशाख केला व आत्मबलिदान केले.
 इनामदारांनीच 'झुंज' या कादंबरीत यशवंतराव होळकराचे चित्र काढले आहे. त्यात त्यांनी जे प्रस्तावनेत म्हटले आहे त्याची प्रतीती कादंबरीत उत्तम येते. शंभर दोनशे स्वारांनिशी तो बेजरव चालून जातो. रणांत झेप घेतो. तयारी नसेल तेव्हा तोही गम खातो. पण पुन्हा चालून जातो. प्राणांची पर्वा करीत नाही. मराठशाहीच्या रक्षणासाठी विवेक करीत नाही. खरे असे आहे की, तो साहस, शौर्य, पराक्रम दाखवितो म्हणूनच सरदार, पेंढारी, भिल्ल त्याच्याभोवती जमतात, आणि युद्धाची तयारी होते. कायम विवेक करणाऱ्यांची तयारी कधीच होत नाही. तसा विवेक त्रिंबकजी व पेशवे करीत रहातात. म्हणून कागदपत्रात इनामदारांना त्यांचे जे व्यक्तिमत्त्व दिसते त्याची प्रतीती कादंबरीत येत नाही. यशवंतरावाची तशी येते म्हणूनच 'झुंज' ही कादंबरी जिवंत झाली आहे. तिचे इतर गुण वर सांगितलेच आहेत. तेव्हा इतिहासात कोण कसा आहे हे नुसते प्रस्तावनेत सांगण्याला अर्थ नाही. त्याचे कादंबरीत तसे दर्शन घडविणे हे साहित्याच्य, दृष्टीने महत्त्वाचे आहे. त्रिंबकजी व दुसरा बाजीराव यांच्यासंबंधी तशी प्रतीती येत नाही. यशवंतरावांची येते. ती आल्यावर ऐतिहासिक सत्याची फारशी चिकित्सा करण्याचे कारण नाही.
 'स्वामी' मधील श्रीमंत माधवराव व रमाबाई यांच्यातील रमणीय प्रसंगांविषयी काही टीकाकार म्हणतात की, त्यांना ऐतिहासिक आधार नाही. पण या टीकेला माझ्या मते महत्त्व नाही. कारण एक तर ऐतिहासिक घटना फार वादग्रस्त असतात. आणि दुसरे म्हणजे लेखकाला कल्पिताचा आश्रय करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असले पाहिजे. ते घेऊन रणजित देसाई यांनी रमा- माधवांचे जे चित्रण केले आहे ते अगदी अपूर्व आहे. साहित्यसौंदर्य त्यांतून दुथडी भरून ओसंडत आहे. अपूर्ववस्तुनिर्माणक्षमता या गुणालाच प्रतिभा म्हणतात.
 आता साहित्याच्या एका अत्यंत महत्त्वाच्या लक्षणाचा विचार करून आधुनिक ऐतिहासिक मराठी कादंबरीचे हे समीक्षण संपवू. ते लक्षण म्हणजे जीवनभाष्य.
 लेखकाला, कवीला काही अनुभूती येते, ती अनुभूती तो वाचकांना घडवितो. यालाच साहित्य म्हणतात, पण नुसती अनुभूती म्हणजे साहित्य नव्हे, असे ॲबरकोंबी, विंचेस्टरसारखे साहित्य-शास्त्रज्ञ म्हणतात. ती अनुभूती सार्थं असली पाहिजे.'मी सूर्य पाहिला' हे साहित्य नाही. सूर्य पाहून मला काय वाटले ते सांगणे हे साहित्य. शुक्राची चांदणी तांबे पाहातात आणि खिन्न मनाला सांगतात की, निराश होऊ नको. आणि मग सर्व चराचर सृष्टी हेच सांगत आहे असे दाखवून देतात. शुक्राबद्दल व चराचरसृष्टीबद्दल तांबे यांनी स्वतःच्या दृष्टिकोनातून जो अर्थ सांगितला त्यासह येणारी जी अनुभूती, ती सार्थ अनुभूती होय. तेच जीवनभाध्य, व तोच आत्माविष्कार. जागतिक घडामोडी पाहून, संसारातील घटना पाहून त्यांचा काही अर्थ लेखकाच्या मनात येतो व मग त्या सूत्रात सांसारिक घटना किंवा सृष्टिघटना बसवून तो काव्य, नाटक, कादंबरी लिहितो. नव्या ऐतिहासिक कादंबरीकारांकडून आमच्या या अपेक्षा होत्या.
 शिवकालापासून दुसऱ्या बाजीरावापर्यंत सर्व मराठशाहीचा इतिहास या कादंबरीकारांनी आपल्या कादंबऱ्यांत आणला आहे हे विसाव्या शतकांतले कादंबरीकार आहेत. पाश्चात्य विद्याविभूषित आहेत. त्यांनी इतिहासातून लाभलेल्या दृष्टीने या मागल्या इतिहासावर काही भाष्य केले आहे काय ? या लेखकांपैकी अनेकांनी संदर्भग्रंथांच्या याद्याच्या याद्या दिल्या आहेत. कित्येकांनी प्रस्तावनेत आपण कसा कसा इतिहासाभ्यास केला, ते वर्णन सांगितले आहे. पण या अभ्यासातून, त्या काळच्या एकंदर मानवी जीवनाच्या संदर्भात, मराठ्यांच्या कर्तृत्वाचा हा अर्थ मला प्रतीत झाला, असे त्यांनी काही सांगितले आहे काय ?
 श्रीशिवछत्रपतींपासून दुसऱ्या बाजीरावांपर्यंत मराठ्यांच्या कपाळची फितुरी कधी चुकली नाही. सरदार फितूर, किल्लेदार फितूर, सेनापती फितूर, ब्राह्मण फितूर, मराठे फितूर लहान मोठे सर्व फितूर. पुढे पेशवे राघोबा, बाजीराव हे फितूर, आणि शेवटी छत्रपती फितूर ! उलट साहेबाकडे असे कोणी नाही. मराठ्यांनी पदरी ठेवलेले इंग्रज सरदारही मनातून इंग्रजांकडे असत. 'त्यांशी आम्ही लढणार नाही' असा करार बांधून घेत. हे असे का घडावे, सामाजिक, राष्ट्रीय दृष्टी येथे का निर्माण झाली नाही, याचा तलास घेण्याचा, त्या वेळच्या मानवाच्या मनाच्या घडणीचा, संस्कारांचा अंतरंगाचा ठाव घेण्याचा विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील कादंबरीकारांनी प्रयत्नही करू नये !
 मराठ्यांकडचे बव्हंशी सर्व सरदार, सेनापती हिंदू होते, मराठे होते. पण फूट, दुही त्यांच्या पाचवीला पुजली होती. धर्मनिष्ठा त्यांना एकत्र बांधू शकत नव्हती. परधर्मीय मुस्लिम, ख्रिश्चन यांच्या विरुद्धही हिंदुधर्मी एक होत नव्हते. उलट पुष्कळ वेळा मुस्लिम तसे होत असत. तेव्हा हा काय धर्म आहे, याला सामाजिक जीवन सांधण्याचे सामर्थ्य का नाही, असा प्रश्न मराठ्यांचा व भारताचा इतिहास पहाताना या आधुनिक इतिहासाभ्यासकांच्या चित्तात उद्भवलासुद्धा नाही. कादंबरीत या आपल्या समाजाच्या प्रधान संस्थेच्या- धर्माच्या- मुळांचा काही विचार प्रसंगांतून, घटनांतून, संवादातून किंवा स्वतःच्या निवेदनातून मांडावा, असे त्यांच्या मनातही आले नाही.
 पेशवे कायमचे कर्जबाजारी असत. पैसा मिळवावयाचा म्हणजे परप्रांतात जाऊन लूट करावयाची, आणि भागले नाही तर शेवटी स्वतःच्याच प्रजेला लुटावयाचे, असा मराठ्यांचा उत्तरकाळात खाक्या. शेती, व्यापार असे काही निराळे मार्ग असतात. त्यांची जोपासना करावी, असे मराठ्यांना वाटलेच नाही. त्या धामधूमीत ते मंदिर बांधीत, घाट बांधीत शंभर-दोनशे धरणे सहज होतील इतके घाट पेशव्यांनी वा त्यांच्या सरदारांनी बांधलेले आहेत. पण धरणे बांधावी, बंधारे बांधावे, पाठ खोदावे, ही दृष्टी त्यांना का आली नाही ? इंग्रजांना पैसा कमी पडत नाही, व्यापारात तो ते मिळवितात, हे त्यांना दिसत होते. पण लूट हा त्यांचा एकच मार्ग. त्यामुळे रजपूत, बंगाली, कन्नड- सर्व लोक त्यांना दरोडेखोर, लुटारू समजत. उलट मोगल त्यांना बरे वाटत. इंग्रजांचा आधार वाटे. हे पाहून या समाजाच्या अर्थसंस्थांचा काही मागोवा आपण घ्यावा, तत्कालीन आर्थिक जीवनाच्या तळाशी जाऊन जरा न्याहाळून पहावे व ती सार्थ अनुभूती वाचकांना सांगावी, असे नव्या लेखकांना कधी का सुचत नाही ? हे जीवनभाष्य करणे हे आपले काम आहे असे त्यांना वाटतच नाही काय ? इब्सेनने आपल्या नाटकांतून असे भाष्य केले आहे. शॉ, गाल्सवर्दी तेच करतात. अष्टन सिंक्लेअर यासाठीच प्रसिद्ध आहे. त्याची आपण स्तुतिस्तोत्रे गातो ! मग ?
 सायंकेविग्ज या पोलिश कादंबरीकाराची 'को व्हॅडिम' ही कादंबरी पहा. रोमन साम्राज्याचा अधःपात व ख्रिस्तीधर्माचा उदय हा तिचा विषय आहे. व्हिनिशियस व लिजिया यांच्या प्रेमाच्या कथेच्या माध्यमातून त्याने त्याला मूर्त रूप दिले आहे. आणि तसे करताना त्याने त्या काळची प्रत्येक संस्था- धर्म, गुलामगिरी, राजसत्ता, विवाह, प्रेम, लष्कर- न्याहाळून पाहून तिच्यावर भाष्य केले आहे. या संस्था किडल्यावाचून एवढे मोठे रोमन साम्राज्य किडणे व कोसळणे शक्य नाही, हे त्याला निश्चित माहीत आहे आणि हे सर्व भाष्य त्याने साहित्यगुणांच्या आश्रयाने केले आहे. तो प्रसंग घडवितो, त्यातून वाद घडवितो, ख्रिश्चनांचे, स्त्रियांचे, पुरुषांचे, मालकांचे, गुलामांचे अंतरंग तपासतो आणि पदोपदी त्यावरून सुचलेल्या विचारांना; तत्त्वांना मूर्त रूप देतो यामुळे ती ऐतिहासिक कादंबरी अक्षर झाली आहे, विदग्ध झाली आहे, अभिजात झाली आहे.
 समोरच्या शत्रूच्या युद्धशास्त्राचा अभ्यास मराठ्यांनी कधी केला नाही. इंग्रजांचे कवायती कंपू त्यांनी पाहिले व तोफा पाहिल्या आणि तेवढे उचलले. पण यांच्या मागे जी भौतिक विद्या आहे, इतिहास आहे, भूगोल आहे, नकाशा आहे, रसायन-पदार्थविज्ञान आहे, त्याचा त्यांना वाससुद्धा कधी आला नाही ! कारण भौतिक विद्यांची त्यांनी शेकडो वर्षे उपेक्षाच केली होती. त्यामुळे त्यांना भौतिक दृष्टी नव्हती. कार्यकारण कळत नव्हते. त्यांच्या मनात परलोक नेहमी असे. निवृत्ती असे. 'दिसे क्षणिक हे भरंवसा घडीचा नसे' याच तत्त्वज्ञानाचा पगडा त्यांच्या मनावर होता. यामुळे पाश्चात्य संस्कृतीशी झालेल्या संग्रामात त्यांना विजय मिळविणे शक्यच नव्हते. ही मीमांसा राजवाडे, खरे, सरदेसाई, केळकर, शेजवलकर यांनी केलेली आहे. तिला ललित रूप देणे एवढेच नव्या कादंबरीकारांचे काम होते. पण ऐतिहासिक कादंबरी लिहिताना, अधःपाताची, उत्कर्षाची मीमांसा करताना आपल्या सामाजिक, धार्मिक, राजकीय, आर्थिक संस्थांचे अंतरंग ढवळावे लागते, सर्व जीवनाची चिकित्सा करावी लागते, याची जाणीवच नव्या कादंबरीकारांना नाही. कंपू-तोफांच्या मागच्या विज्ञानाचा मराठ्यांना जसा वास आला नाही तसा यांनाही आला नाही ! त्यामुळे त्यांनी आपल्या जीवनाची मुळेसुद्धा पाहिली नाहीत. मग साहेबांच्या जीवनाची ते कोठून पहाणार ? वास्तविक तीही मुळे पाहून सायंकेविग्ज याने दोन संस्कृतींचा संघर्ष कसा झाला ते दाखविले आहे, तसा मराठी कादंबरीकारांनी दाखवावयास हवा होता.
 प्रत्येक लेखकाला स्वतंत्र दृष्टिकोन असतो, असावा. जीवनाविषयीचे काही त्यांचे तत्वज्ञान असते, असावे. त्यातून व्यक्तिनिष्ठ दृष्टीने तो संसार पहातो. आणि त्याला दिसलेले ते त्याचे रूप तो ललितरम्य करून मांडतो. साहित्यात मोल आहे ते या जीवनसृष्टीला आहे. या आत्माविष्काराला आहे. पण अशा समृद्ध दृष्टीने मराठ्यांच्या इतिहासाकडे कोणी पाहिलेच नाही. त्यामुळे कोणाला आमच्या अधःपाताला फक्त दुसऱ्या बाजीरावाचे दुर्देव कारण आहे असे वाटते. कोणाला इंग्रजांची कपटकारस्थाने, त्यांची हीन नीती, हे कारण वाटते. मागले पोवाडेवाले शाहीर यांना असेच वाटत असे. त्यात भरीला ते कलियुगामुळे झाले, आपण पापे करतो म्हणून झाले त्यामुळे इंग्रज या मुंगीने बाजीराव हा मेरू गिळिला, असे ते म्हणत.
 आधुनिक ऐतिहासिक कादंबरीकार या पुराणकथातून बाहेर पडले, आहेत असे दिसत नाही. मातीचा घट होतो तो कुंभकाराच्या संकल्पातून होतो. मूळ मातीला आकार नसतो. सोन्याचा अलंकार असाच सोनाराच्या संकल्पातून होतो, तो मुळात नसतो, असे ज्ञानेश्वर म्हणतात. तसेच जीवनाचे आहे. त्याला मुळात आकार नाही. तो कवीच्या संकल्पातून निर्माण करावा लागतो. त्यामुळेच ती नवनिर्मिती होते. पण संबंध जीवन जाणण्याइतकी प्रतिभा असेल तरच कवीचा संकल्प विशाल होईल. आणि मग त्यातून नवी सृष्टी निर्माण होईल. ती प्रतिभा आधुनिक ऐतिहासिक मराठी कादंबरीकारांजवळ नाही. त्यामुळे त्यांची निर्मिती नवनिर्मिती होत नाही. ती अपूर्ववस्तू ठरत नाही.