सौंदर्यरस/कल्पिताचा महिमा






कल्पिताचा महिमा



 मराठी ऐतिहासिक लघुकथांचे दालन फारसे समृद्ध नाही. तुलनेने पहाता, अलीकडे ऐतिहासिक कादंबरीला पुष्कळच बहर आलेला दिसतो. ऐतिहासिक कादंबरीची निर्मितीही मध्यंतरी वीस-पंचवीस वर्षे खंडित झाली होती, पण अलीकडे पंधरा-वीस वर्षे, मराठी लेखकांचा ओढा या कादंबरीकडे बराच आहे, असे दिसते. पण ऐतिहासिक लघुकथालेखनाकडे मात्र तसा ओढा दिसत नाही. तरी, कादंबरीकडे लेखक पुन्हा वळले तसे कथेकडे वळण्याचा संभव आहे. म्हणून गेल्या आठ-दहा वर्षांत लिहिल्या गेलेल्या ऐतिहासिक लघुकथांचा थोडा परामर्श घ्यावा असा विचार केला आहे.
 ऐतिहासिक कादंबरी आणि ऐतिहासिक लघुकथा यांच्या सौंदर्याच्या घटकांत तसा फारसा फरक नाही. विस्ताराच्या फरकामुळे रचनातंत्रात, आणि त्यामुळे सौंदर्यघटकांत फरक पडेल हे खरे. पण तो मूलगामी फरक नव्हे. तेव्हा सौंदर्याचे निकष दोन्हीकडे जवळजवळ तेच असणार हे उघड आहे.
 साहित्यकलेच्या सौंदर्याचे पहिले तत्त्व हे आहे की, तिच्यात माणसांच्या खाजगी, वैयक्तिक जीवनाचे चित्रण असले पाहिजे, सार्वजनिक जीवनाचे नव्हे. कादंबरी, नाटक, लघुकथा व काव्य हे कल्पित साहित्याचे मुख्य प्रकार होत. व्यक्तीच्या खाजगी संसारातील सुखदुःखाच्या कथा सांगणे, हेच यांचे उद्दिष्ट असले पाहिजे. कारण वाचकांना खरा रस यातच असतो. सार्वजनिक जीवनाचे चित्रण ललित साहित्याला वर्ज्य आहे, असा याचा अर्थ नाही. पण सार्वजनिक जीवनाचे दर्शन व्यक्तिजीवनाच्या माध्यमातून घडविले तर त्या लेखनाला लालित्य येते. आणि व्यक्तीच्या माध्यमातून याचा अर्थ, व्यक्तीच्या विचारातून असा नव्हे, तर व्यक्तीचे रागद्वेष, असूया, मत्सर, प्रेम, माया, वात्सल्य, संताप, स्नेह, लोभ, त्याग, भक्ती, चीड या विकारांच्या माध्यमातून.
 हे जे एकंदर ललित किंवा कल्पित साहित्याविषयी म्हटले तेच ऐतिहासिक साहित्याविषयी म्हणजे कादंबरी व लघुकथा यांविषयी खरे आहे, ऐतिहासिक लघुकथा ही इतिहासकाळातल्या कोठल्या तरी व्यक्तीच्या खाजगी, वैयक्तिक जीवनातील सुखदुःखाची कथा असावी. शिवछत्रपती, श्रीमंत थोरले बाजीराव, माधवराव यांच्या काळची कथा असली तर तीत हे थोर पुरुष कथानायक म्हणून येऊ नयेत. त्यांचे जीवन हा इतिहास आहे. ते सार्वजनिक जीवन आहे. ते लघुकथेत यावे, पण ते पार्श्वभूमी म्हणून यावे. आणि कथा असावी ती त्यांच्या काळच्या कोणा तरी सामान्य व्यक्तीच्या प्रापंचिक सुखदुःखाची असावी. भोवताली घडणाऱ्या ऐतिहासिक घडामोडींचे पडसाद त्या कथेत अवश्य यावे. इतकेच नव्हे तर त्या घडामोडी त्या व्यक्तीच्या सुखदुःखाला कारणीभूत झालेल्या असाव्या. पण त्या घडामोडींचे किंवा त्या घडविणाऱ्या थोर पुरुषांचे वर्णन हा कथेचा मूळ उद्देश नसावा. ते कथासूत्र नसावें, त्या घडामोडींचे, त्या घटनांचे पडसाद आले की, कथा ऐतिहासिक होते आणि प्रापंचिक सुखदुःखे हा वर्ण्यविषय झाला की ती ललितकथा- लघुकथा होते. थोर ऐतिहासिक पुरुषांना कथेत प्राधान्य आले की, कथा चरित्र किंवा इतिहास हे रूप घेऊ लागते. तो विषय सार्वजनिक होतो आणि त्यामुळे लालित्य कमी होऊ लागते. हे थोर पुरुष म्हणजे ऐतिहासिक घटना आहेत, कल्पित घटना नव्हेत. आणि ललित वाङ्मय ही नवनिर्मिती आहे. ती कल्पित असण्यातच तिच्या सौंदर्याचे रहस्य आहे.
 एका चांगल्या लघुकथेचे उदाहरण घेऊन हे स्पष्ट करतो. 'जंजिऱ्याच्या तटावरून' ही महादेवशास्त्री जोशी यांची ऐतिहासिक लघुकथा पाहा. कोकणातील राजापूरजवळचा जंजिरा हा किल्ला म्हणजे सिद्दीचे मुख्य ठाणे. शिवाजीमहाराजांच्या कारकीर्दीच्या प्रारंभकाळी जंजिऱ्याच्या भोवतालच्या परिसरावर सिद्दीचीच सत्ता होती. मोगल, विजापूर यांचा सिद्दी हा दोस्त असून तो स्वतः कडवा मुसलमान आणि अर्थातच कडवा हिंदुधर्मद्वेष्टा होता. भोवतालच्या परिसरात घुसून सर्वत्र लुटालूट, जाळपोळ विध्वंस करणे, हिंदू स्त्रियांवर बलात्कार करण, त्यांना पळवून नेणे, त्यांची विटंबना करणे, त्यांना मस्कत, बसरा यांसारख्या दूरदेशी नेऊन विकणे, हा त्याचा व त्याच्या शिपायांचा नित्याचा उद्योग. पुरुषांना पकडून त्यांना ते गुलाम म्हणून विकीत. त्यांना गोणत्यात घालून समुद्रात बुडवीत, त्यांच्या कत्तली करीत. याच वेळी शिवाजीमहाराजांनी स्वराज्यस्थापनेच्या उद्योगास प्रारंभ केला होता. कोकणात त्यांच्या स्वाऱ्या होत होत्या. जंजिरा घेऊन सिद्दीला उखडून लावणे हा त्यांच्या उद्देश होताच. जंजिऱ्याच्या हद्दीत जाऊन भेद करावा, तेथील माणसे वश करून घ्यावी आणि सिद्दीला शह द्यावा, असा त्यांचा प्रयत्न होता. त्यामुळे त्या मुलखात एक नवी आशा निर्माण झाली होती. सिद्दीचे राज्य हे सैतानाचे राज्य होते. त्या नरकयातनांतून आपल्याला सोडविणारा एक महापुरुष अवतरला आहे, अशी लोकांच्या मनात श्रद्धा निर्माण झाली होती आणि सिद्दीच्या व पोर्तुगीजांच्या अंमलाखालचे काही लोक महाराजांना वशही झाले होते. अनेकांनी तसे अनुसंधान बांधण्याचा प्रयत्न चालविला होता.
 अशा या काळातली व अशा या वातावरणातली 'जंजिऱ्याच्या तटावरून' ही कथा आहे, पण ती कोण्या इतिहासप्रसिद्ध व्यक्तीची कथा नाही. यशोदा नावाच्या एका सामान्य स्त्रीची ती कथा आहे.
 यशोदेचा पती केरोबा टिकले हा सिद्दीच्या राज्यातील घोसाळगड हा जो किल्ला तेथला किल्लेदार होता. यशोदेचे लग्न झाले तेव्हा या किल्ल्यावर दासदासी, नोकर, पालखी अशा मोठ्या वैभवात ती होती. पण ते सिद्दीचे राज्य होते. आज शिखरावर तर उद्या धुळीत. केरोबा शिवाजीला फितूर आहे, अशी सिद्दी फत्तेखान याच्याकडे कोणी चुगली केली. त्याचे कान भरले. लगेच त्याने त्याला पकडण्यासाठी शिपाई पाठविले. पण केरोबाला आधीच बातमी लागून तो एकदम परागंदा झाला. मग यशोदेला गडावर रहाणे शक्य नव्हते. घोसाळगड सोडून ती राजपुरीला आपल्या घरी येऊन राहिली, आणि पती सुखरूप असोत, त्यांची लवकरच भेट होवो, असा देवाचा धावा करीत ती भयग्रस्त मनाने काळ कंठू लागली.
 केरोबा परागंदा झाल्याला सहा महिने झाले. गणेश चतुर्थी आली. दर वर्षीचे गणेशपूजेचे व्रत चुकू नये म्हणून आदल्या दिवशी रात्री लपत- छपत केरोबा घरी आला. तो आल्यामुळे यशोदेला मनातून हर्ष झाला, पण तितकीच भीतीही वाटली. कारण सिद्दीला सुगावा लागता तर त्याने त्याचा कडेलोटच केला असता. पण तसे झाले नाही. पूजा करून केरोबा रात्री निघून गेला. पण या दोन दिवसांच्या भेटीत यशोदेला दिवस गेले. तिला फार आनंद झाला, पण त्यामुळेच तिच्यावर भयानक आपत्ती ओढवली.
 तीन-चार महिने झाल्यावर तिची अवस्था लपून रहाणे शक्य नव्हते. केरोबासाठी सिद्दीने तिच्या घरावर पाळत ठेवलीच होती. ती गरोदर आहे हे समजताच त्याने तिला पकडून नेले आणि जाब विचारला. तो म्हणाला, 'एक तर केरोबा कोठे आहे ते सांग, नाही तर, तू व्यभिचार केला आहेस, हे कबूल कर.' यातले काहीच करणे यशोदेला शक्य नव्हते त्यामुळे तिच्यापुढे कल्पान्त उभा राहिला.
 केरोबा परागंदा झाल्यावर खरोखरच रायगडला जाऊन त्याने शिवाजीमहाराजांची भेट घेतली होती आणि लवकरच जंजिऱ्यावर स्वारी करावी असा महाराजांचा विचार ठरला होता. त्यामुळे गणेश चतुर्थीच्या भेटीत, 'तीन-चार महिन्यांत महाराज जंजिरा घेतील, आणि मग मी पुन्हा घोसाळगडाचा किल्लेदार होऊन येईन, तू धीर घर' असे आश्वासन त्याने यशोदेला दिले होते. त्या आश्वासनावर ती काळ कंठीत होती. पण आता सर्वच संपले होते.
 सिद्दीने तिला सांगितले की, पापाचा अंकुर स्त्रीच्या पोटात वाढतो आहे, असे दिसले तर तिचा आम्ही मुसलमानाशी निका लावून देतो. आणि तू अस्मानातील परीसारखी सुंदर असल्यामुळे मीच तुझ्याशी निका लावणार आहे. दुसऱ्या दिवशी त्याने तिला जंजिऱ्याच्या तटावर नेले आणि एका बुरुजाच्या कमानीत तिला नेऊन तो तिच्याशी लगट करू लागला.
 हा प्रसंग येणार हे यशोदा जाणूनच होती. तिचा निश्चय आधीच झाला होता 'अंधारकोठडीतून मला मोकळ्या हवेत न्या', म्हणून तिनेच त्याला विनवले होते. त्यामुळे हुरळून जाऊन सिद्दी फत्तेखान याने तिला तटावर नेले होते. तेथे त्याने तिच्या कमरेला विळखा घालताच सर्व बळ एकवटून त्याला तिने दूर लोटले व आपण जंजिऱ्याच्या तटावरून समुद्रात उडी घेतली. एरवी ती बुडून मेलीच असती. पण त्याच वेळी किल्ल्याची पहाणी करायला महाराजांच्या दर्यासारंगाचा एक तांडेल होडी घेऊन जंजिऱ्याच्या पायथ्याशी आला होता. खलाशांच्या मदतीने त्याने यशोदेला उचलून होडीत घेतले. यशोदा जास्तच घाबरली. 'अरे तू कोण माझ्या मार्गात आलास ? मी एका आगीतून बचावले. आता कुठल्या फोपाट्यात नेऊन घालतोस मला ?' असे ती आक्रंदू लागली. पण तो तांडेल म्हणाला, माझ्या धर्माच्या भैणी, काळजी करू नको. शिवाजीमहाराजांचा तांडेल हाय मी तुला सुखरूप नेऊन पोचवितो बघ !'
 ही खरी ऐतिहासिक लघुकथा आहे. हा काळ शिवाजीमहाराजांचा आहे. पण महाराज स्वतः प्रत्यक्ष येतच नाहीत. ते पार्श्वभूमीत आहेत. कथा आहे ती यशोदा आणि केरोबा यांची, आणि प्राधान्याने यशोदेची. तिच्या मनातले पतिवियोगाचे दु:ख, त्याच्याविषयी अहोरात्र लागलेली चिंता, तो परागंदा असताना तिला दिवस गेले यामुळे लोकांत झालेली बदमामी आणि त्यामुळेच तिच्यावर कोसळलेले सुलतानी संकट. हे सर्व प्रापंचिक सुखदुःख आहे.
 पण हे सर्व त्या काळच्या ऐतिहासिक घडामोडींमुळे निर्माण झालेले सुखदु:ख आहे. सिद्दीचे व शिवाजी महाराजांचे वैर. त्यामुळे केरोबाला परागंदा व्हावे लागले. घरी यायचे ते लपूनछपून यावे लागले. त्या भेटीतूनच यशोदेला पुत्रलाभ झाला. एरवी हा मोठा आनंद, पण त्या परिस्थितीत त्यातूनच अनर्थ उद्भवला, सिद्दीची पापवासना ही नित्याचीच गोष्ट होती. तीमुळेच यशोदेवर तो भीषण प्रसंग आला. आणि जंजिऱ्यावर स्वारीची पूर्वतयारी चालू होती, तो तांडेल त्यासाठी रात्रीच्या अंधारात किल्ल्याच्या पायथ्याशी आला होता, म्हणूनच त्या प्रसंगातून यशोदेची सुटका झाली. यशोदेची सुखदुःखे सर्व प्रापंचिक आहेत, वैयक्तिक आहेत. पण ती त्या काळच्या इतिहासातून उद्भवलेली आहेत. म्हणून ही ऐतिहासिक ललितकथा आहे.
 याउलट 'अबला नव्हे, सबला' (भालचंद्र देशपांडे, 'वसंत', फेब्रुवारी १९७५) आणि 'वीरमाता कर्मवती' (सौ. ऋता, 'धर्मभास्कर', दिवाळी १९७२) या दोन कथा पहा. अन्हिलवाडचा राजा अजयदेव अकाली मृत्यू पावला. त्याची राणी नाईकीदेवी ही त्याच्या मागून राजप्रतिनिधी म्हणून कारभार पाहू लागली. त्याच वेळी महंमद घोरी याच्या भारतावर स्वाऱ्या सुरू झाल्या होत्या एका स्वारीत घोरीचा मोर्चा अन्हिलवाडकडे वळला. हे फारच मोठे संकट होते. अन्हिलवाडचा प्रधानमंत्री राजचित्त, सेनापती कुमारदेव सगळे घाबरून गेले व शरणागतीचा सल्ला देऊ लागले. पण राणी नाईकीदेवी हिने तो मानला नाही. आणि प्रतिकार करण्याचा निश्चय केला. तिने सैन्यभरतीची आज्ञा दिली आणि त्या नवशिक्या तरुण शिपायांसह पुढे होऊन तिने गदरघाटातील खिंडीत महंमद घोरीच्या सैन्याला गाठले आणि त्याच्यावर शस्त्रास्त्रांचा प्रचंड मारा करून सैन्यासकट घोरीला पळवून लावले.- अशी 'अबला नव्हे, सबला' ही कथा आहे. ही कथा म्हणजे एक हकीकत आहे. केवळ घटनेचे कथन आहे, निवेदन आहे. राणी, सेनापती, प्रधानमंत्री या राष्ट्रीय व्यक्तींची ही कथा आहे आणि ती त्यांच्या सार्वजनिक कार्याची आहे. प्रापंचिक सुखदुःखाची नाही. ऐतिहासिक व्यक्तींच्या कार्याची रूपरेषा इतिहासात येऊन गेलेली असते; त्यामुळे असल्या हकीकती ही नवनिर्मिती होत नाही. कथेला लालित्य यावयाचे तर तिची उभारणी कल्पिताच्या पायावर झाली पाहिजे. तशी येथे झालेली नाही. मूळ घटनेत थोडासा तपशील लेखकाने कल्पनेने भरला, इतकेच.

 'वीरमाता कर्मवती' ही कथा म्हणजे अशीच एक हकीकत आहे. मेवाडवर अकबराने स्वारी केली होती. राणा उदयसिंहाच्या मदतीला अनेक रजपूत सरदार रणात उतरले होते. केळवाडचा प्रशासक, राणी कर्मवतीचा पुत्त नावाचा मुलगा हा केवळ सोळा वर्षांचा असल्यामुळे उदयसिंहाने त्याला पाचारण केले नव्हते. तरीही कर्मवतीने त्याला आग्रहाने, बरोबर सैन्य देऊन पाठविले होते. अकबराच्या सैन्याशी पुत्त लढत होता. याच वेळी त्याच्या पिछाडीवरून हल्ला करण्यासाठी अकबर सैन्य घेऊन एका खिंडीतून येत होता. ही बातमी कर्मवतीला कळताच कन्या कर्णवती व सून कमलावती यांना घेऊन ती आधीच घाटात आली व एका उंच जागी झाडाआड बसून अकबराचे सैन्य खिंडीत येताच, त्या तिघींनी त्याच्यावर गोळीबार सुरू केला अकबर चकित झाला, अवाक झाला. 'बाप रे! फक्त तीन स्त्रिया !'
 एवढ्यात समोरच्या सैन्याचा पराभव करून या पहाडाकडून खिंडीतून येणाऱ्या तुकडीशी मुकाबला करण्यासाठी पुत्त सेना घेऊन आला. दरम्यान गोळ्या लागून त्या तीनही स्त्रिया पडल्या होत्या. त्यांना पाहून पुत्त शोक करू लागला. राणी कर्मवती थोडी जीव धरून होती. 'तू येथे शोक करीस बसू नको' असा पुत्ताला आदेश देऊन तिने प्राण सोडले.
 या कथा म्हणजे इतिहासच आहे. लेखकाने स्वतःच्या कल्पनेने निर्माण केलेले जीवन त्यात नाही. महंमद घोरी किंवा अकबर यांच्या स्वाऱ्यांमुळे एकंदर लोकजीवनावर काय परिणाम झाला, जनतेच्या प्रपंचात त्यामुळे कोणत्या आपत्ती आल्या, त्यांच्या मनात कोणते प्रक्षोभ माजले याचा मागमूसही यात नाही. इतिहासात येऊन गेलेले राष्ट्रीय व्यक्तींचे सार्वजनिक जीवन हाच त्यांचा विषय आहे. कथासूत्र तेच आहे. थोडी संभाषणे, थोडे भाववर्णन एवढेच कल्पित त्यात आहे. लेखकाचे नवे असे एवढेच. आणि तेही प्रापंचिक जीवनातले नव्हे. यामुळे या हकीकती म्हणजे ललितकथा होत नाहीत.
 वैयक्तिक जीवनातील सुखदुःखाइतकेच ऐतिहासिक लघुकथेत तत्कालीन वातावरण निर्माण करण्याला महत्त्व असते. आपला सध्याचा काळ सोडून आपल्याला गत काळात, इतिहासकाळात शिरावयाचे असते. वातावरणनिर्मितीवाचून तसा आभास निर्माण होत नाही. त्या काळच्या लोकांचे आचारविचार, रूढी, भाषा, तत्कालीन सामाजिक परिस्थिती, जड परिस्थिती म्हणजे घरे, अंगणे, रस्ते, वाहतूक, वाहने या सर्वांच्या वर्णनाने ऐतिहासिक वातावरण निर्माण होते. पण कित्येक कथांत तसा प्रयत्नही केला जात नाही. नुसत्या भाषेच्या बाबतीत दक्षता घेतली, तत्कालीन शब्द, वाक्यरचना यांची मधूनमधून पेरणी केली आणि चालू काळातच रूढ झालेले शब्द व वाक्यरचना कटाक्षाने टाळल्या तर आपण इतिहासकाळात गेल्याचा भास निर्मिता येतो. पण अशी दक्षता फारशी कोणी घेत नाही.
 'आम्ही एकमताने निर्णय घेतला', 'आमचे सहकार्य राहील' 'महंमद घोरीचे नेतृत्व', 'केळवाडचा प्रशासक' प्रश्न गंभीर होता, पाशवी आक्रमण, तरुण सैनिक, युवाशक्ती, खिंड पास करणे कठीण आहे, 'मी त्यांच्याबरोबर सानंद परतेन' ही भाषा अर्वाचीन आहे. ती मागील काळच्या वर्णनात येऊ नये. त्या वेळच्या संभाषणात तर ती अगदी वर्ज्य मानली पाहिजे. कारण या भाषेने स्वतःच्या काळाची जाणीव कायम राहते. इतिहासकाळाच्या वातावरणाचा तिच्यामुळे भंग होतो.
 ऐतिहासिक लघुकथेत इतिहासप्रसिद्ध व्यक्ती, ऐतिहासिक व्यक्ती या प्रधान असू नयेत, कथा त्यांच्या जीवनाभोवती गुंफू नये; तर ती त्या काळच्या सामान्य व्यक्तीच्या जीवनाभोवती गुंफावी, तिला प्राधान्य द्यावे आणि तिच्या प्रापंचिक सुखदुःखांतून इतिहासाचे प्रवाह दाखवावे हे ऐतिहासिक लघुकथेचे मुख्य तत्त्व, पण इतिहासातल्या गौण व्यक्ती कथेसाठी निवडल्या, ज्यांचा इतिहासात केवळ निर्देश आहे, पण ज्यांच्या कार्याचे वर्णन इतिहास करीत नाही, कारण इतिहासाच्या दृष्टीने त्याचे काही महत्त्व नसते, अशा व्यक्तींच्या जीवनाच्या कथा रचल्या, आणि त्यांच्या जीवनातून इतिहासाचे धागेदोरे दाखविले, तर अशा कथाही ऐतिहासिक लघुकथा म्हणून यशस्वी होतात. कारण त्यात कल्पिताला पुष्कळच अवसर असतो. मुख्य कटाक्ष यावर आहे. माधवराव- रमाबाई, बाजीराव- मस्तानी यांना प्राधान्य असले की, तेथे कल्पिताला फारसा वाव राहात नाही. इतिहासाने त्यांची चरित्रे वर्णिलेली असतात. गौण व्यक्तींच्या बाबतीत तसे नसते. म्हणून त्यांच्या कथा या नवनिर्मिती होऊ शकतात.
 या दृष्टीने 'समर्पण' (सो. नयनतारा देसाई, सहयाद्री, दिवाळी १९७२) आणि 'प्रीतीची रीत अशी' (सौ. मृणालिनी देसाई, 'लोकसत्ता', दिवाळी १९७५) या दोन कथांचा विचार करू. रामदेवराव यादव देवगिरीवर राज्य करीत असताना अल्लाउद्दिनाने देवगिरीवर स्वारी केली. रामदेवराव अत्यंत नादान राजा होता. त्याची कसलीही तयारी नव्हती. त्यामुळे त्याचा पूर्ण पराभव झाला त्याला शरणागती पतकरावी लागली आणि सोनेमोती, जडजवाहीर या खंडणीबरोबरच आपली कन्या जेठाई हीही अल्लाउद्दिनला द्यावी लागली. रामदेवाचा पराभव ही इतिहासातील प्रसिद्ध घटना आहे पण त्याची कन्या जेठाई ही तशी प्रसिद्ध नाही. इतिहासकार तिचा फारसा निर्देशही करीत नाहीत. 'समर्पण' या कथेची ती नायिका आहे. रामदेवराव नृत्यगायनाच्या मैफलीत नेहमी दंग असे. अशाच एका बैठकीत वार्ता आली की, दिल्लीच्या सुलतानाची स्वारी देवगिरीवर आली आहे. पण रामदेवराव तिकडे लक्षही देईना. अशा वेळी जेठाईने पुढाकार घेऊन राज्यरक्षणाची फार जोराची धडपड केली. घोड्यावर बसून हाती तलवार घेऊन ती सर्व किल्ल्यावर दौडत होती. सेनेला उत्तेजन देत होती. पण तिचे काही चालले नाही. रामदेवरावला, गनिमावर चालून जा, म्हणून तिने विनविले. पण तो अगदीच बुळा झाला होता त्याने हाय खाऊन शरणागती पतकरली. मध्यंतरी राजपुत्र शंकरदेव याने मोठ्या त्वेषाने अल्लाउद्दिनावर हल्ला चढविला होता. त्याच्या मदतीस जावे म्हणून जेठाईने पुन्हा पित्याला विनविले. पण त्याने बळ धरलेच नाही. आणि शेवटी अल्लाउद्दिनापुढे लोटांगण घालून त्याने त्याला राजकन्या देण्याचे मान्य केले. सुलतानाने तशी अटच घातली होती.
 लेखिकेने जेठाईच्या भावनांचे, तिच्या विकारविचारांचे उत्तम वर्णन केले आहे. पित्याबद्दल तिला भक्ती आहे, पण त्याच्या नादानीची चीड आहे. जातीने रणात उतरावे हे धैर्य तिला आहे. आपल्या राजपूतपरंपरेचा तिला अभिमान आहे. पण हे सर्व व्यर्थ आहे हे पाहून तिला पराकाष्ठेचे दुःख झाले. आणि, अल्लाउद्दिनाला मी कन्या देण्याचे वचन दिले आहे, हे पित्याचे शब्द ऐकले तेव्हा तर तिला कल्पान्त आठवला. मग तिने ते का मान्य केले ? ते केले नसते तर किल्ल्यात शिरून मुस्लिमांनी हजारो स्त्रियांची विटंबना केली असती. 'माझ्या माय-बहिणींच्या इज्जतीच्या रक्षणासाठी मी आत्मसमर्पण करायला तयार आहे' असे म्हणून ती त्या नरकयातना भोगण्यास सिद्ध झाली.
 या भाववर्णनाबरोबरच सौ. देसाई यांनी वातावरणनिर्मितीही उत्तम केली आहे. जेठाई, हुस्नबानू गायिका यांचे रूप व वस्त्रालंकार यांचे रेखीव वर्णन या कथेत आहे. एकीची पैठणी, दुसरीचा कमीजा यांचा उल्लेख आपल्याला भूतकाळात नेतो. घृष्णेश्वराचे मंदिर, संगीत मैफलीसाठी उभारलेला शामियाना, अल्लाउद्दिनाची छावणी यांची वर्णनेही गतकालाचा आभास निर्माण करतात. शिवाय तात, देवदर्शन करून भोजनासाठी चलावं, गाओ, खुशीसे गाओ ! आदाब अर्ज, हिरेजडित किमाँष, आपकी शरण मे आए है, खूबसूरत शहाजादी, महाराजांनी याद केली आहे, नाचीज प्राणाचा बचाव करण्यापेक्षा गनिमाशी मुकाबला करा, देवगिरीची हिफाजत निर्भर आहे, आम्ही मजबूर आहो, अजीब प्रसंग, असल्या भाषेने तो काळ जिवंत होतो.
 जेठाईचे आत्मबलिदान हे येथे कथासूत्र आहे. वर सांगितलेच आह की बहुतेक इतिहासकार तिचा उल्लेखही करीत नाहीत. 'हिस्टरी अँड कल्चर ऑफ इंडियन पीपल' या भारतीय विद्याभवनाने प्रसिद्ध केलेल्या इतिहासात, 'दिल्ली सलतनत' या खंडात, अल्लाउद्दिनाने तशी अट तहात घातल्यामुळे रामदेवरावाला कन्या त्याला देणे भाग पडले, एवढा फक्त उल्लेख आहे. अशा या जेठाईच्या त्या प्रसंगीच्या भावभावनांतून लेखिकेने त्या सर्व इतिहासाचे कल्पनेने दर्शन घडविले आहे. यामुळे ही ऐतिहासिक लघुकथा रम्य झाली आहे.
 'प्रीतीची रीत अशी' ही मृणालिनी देसाई यांची कथा अशीच व याच कारणासाठी रम्य झाली आहे. औरंगजेबाची कन्या शाहाजादी रोशन आरा हिचे मन छत्रपती संभाजी यांच्यावर जडले होते. हे प्रेम कधीच सफल झाले नाही, होणे नाही, होणे शक्यच नव्हते. यामुळे तिच्या मनाचा झालेला गुदमरा, तिच्या अंतरातले दुःखाचे कढ, तिच्या मनातली निराशा, वैफल्य, घराण्यात जन्माला येणान्या कन्यांचे दुर्दैव, यांची ही कथा आहे. रोशनआरा मोगल आणि तिची आत्या- औरंगजेबाची बहीण- जहानआरा या ऐतिहासिक व्यक्ती आहेत. पण इतिहास त्यांचा फक्त निर्देश करतो. आणि तो प्रामुख्याने याच कारणासाठी करतो. एकीचे मन- जहानआराचे- शिवछत्रपतींच्यावर जडले होते, दुसरीचे शंभूछत्रपतीच्यावर 'प्रीतीची रीत अशी' ही कथा रोशन आराच्या विफल प्रेमाची आहे. तिच्या मनात उसळणाऱ्या वेदनांच्या सागराची आहे.
 शंभुराजांना मुसक्या बांधून दरबारात आणले तेव्हा पडद्यातील झरोक्यातून ती त्यांच्याकडे एकटक पहात होती, त्याच क्षणी त्यांनी पण वर पाहिले. नजरानजर झाली आणि प्रीतीच्या रीतीप्रमाणे, प्रीती जन्माला आली. आणि पुढे तर शंभुराजांनी शहाजादीला मागणीच घातली. आणि त्यासाठी औरंजेबाने तापलेल्या सांडसाने त्यांचे डोळे काढले, जबान छाटली, पण राजे रेसभरही हालले नाहीत की त्यांनी सुस्कारा टाकला नाही. (हा प्रसंग आग्ऱ्याला यमुनातीरी दिवाण-ए-आममध्ये घडला असा लेखिकेचा चुकीचा समज झालेला दिसतो.) या भीषण, उग्र पौरुषामुळे शहाजादी क्षणभर स्वतःचे भानच विसरली. रात्री बादशहाने तिला आपल्या महालात बोलाविले. त्याला तिच्या अंतरीच्या भावनांची कल्पनाच नव्हती. तिचे डोळे रडून रडून सुजले होते. त्याला वाटले, संभाजीने अपमान केल्यामुळे ती संतापली आहे. आणि तिचे अश्रू हे क्रोधाचे अश्रू आहेत!
 या ठिकाणी लेखिकेने मोगल राजकन्यांच्या अंतरीच्या वेदनांचे उत्कृष्ट वर्णन केले आहे. मोगल घराणे सर्वात श्रेष्ठ, त्यामुळे त्यांच्या कन्यांना त्याहून श्रेष्ठ घराणे मिळणे अशक्य; तेव्हा त्यांनी जन्मभर अविवाहितच राहायचे ! रोशन आराच्या मनात आले, हे अब्बाजान, ते बड़े वालीद (शहाजहान) यांना आमच्या भावनांची काहीच कशी कल्पना येत नाही ? शहाजादी म्हणजे काय पांढरीशुभ्र गारगोटी आहे ? तिला यौवनाचा स्पर्शच होत नाही ? काळदेखील तिच्या डोळ्याला डोळा न देता जातो ? काय, आहे तरी काय ?
 रोशन आराच्या डोळ्यांना ते दोन डोळे (संभाजीचे) भेटले. पण त्याच क्षणी अब्बाजाननी ते फोडून टाकले !
 अब्बाजाननी जवळ बोलावल्यावर तिने धीर करून संभाजी महाराजांच्या हातात ज्या हातकड्या घातल्या होत्या त्या त्यांच्याजवळ मागितल्या. 'जरूर जरूर बेटी !' अब्बाजान म्हणाले. 'त्या मगरूराला कुत्र्याच्या मौतीने मारले त्याची निशाणी असू दे तुझ्याजवळ !' शहाजादी हातकड्या घेऊन महालात गेली आणि त्यांच्यावर ओठ टेकून तिने मनातल्या कल्पान्तीच्या दुःखाला वाट करून दिली.
 याही कथेत शहाजादीच्या महालाचे वर्णन, औरंजेबाच्या दरबाराचे वर्णन, संभाजीच्या उग्र सौंदर्याचे चित्रण आणि नामुमकिन, दास्तान, खुशबू बेरहम, मासूम बच्ची है, दक्खनचा राजा, कमबख्त, जल्लाद लोकिन, ही भाषा यांनी आपण सतराव्या शतकातील मुस्लिम आणि मराठे यांच्या सहवासाचा लाभ घेऊ शकतो.
 आता 'महापुरुष' (श्री. के. देवधर, 'विवेक' दिवाळी १९७१) आणि 'कडेलोट' (श्री. के. देवधर, 'विवेक' दिवाळी १९६९) या दोन कथा पहा. 'महापुरुष' ही बाजीराव-मस्तानी यांच्या जीवनावरची कथा आहे छत्रसालाने बाजीरावाला मस्तानी अर्पण केली, तिच्या मुलाची मुंज करण्याचा बाजीरावाचा विचार होता, पुण्याच्या ब्राह्मणांनी त्याला विरोध केला आणि मस्तानी शनिवारवाडयात रहावयास आली तर रघुनाथरावाची मुंज करण्यास ब्राह्मण मिळणार नाही, अशी धमकी दिली. शेवटी बाजीराव साहेब स्वारीवर गेले असताना चिमाजी अप्पांनी मस्तानीला कैद केले इत्यादी इतिहासात वर्णिलेल्या प्रसंगांचे वर्णन 'महापुरुष' या कथेत आहे. व्यक्ती इतिहासप्रसिद्ध आणि त्यांचे जीवनही सार्वजनिक, कल्पित, नवनिर्मित असे त्यात काही नाही. प्रसिद्ध पुरुषांचे वैयक्तिक, प्रापंचिक जीवन रंगविले तरी त्यातून काही रसनिर्मिती होऊ शकते. या कथेत तेही नाही. त्यामुळे इसिहासात अनेक वेळा सांगितलेली हकीकत, यापलीकडे या रचनेला दुसरे रूप येऊ शकले नाही.
 'कडेलोट' ही दुसरी कथा साधारण याच प्रकारची आहे. शहाजादा अकबर हा बापावर उलटून संभाजीराजांच्याकडे आला त्या वेळची ही कथा आहे. अकबर औरंगजेबाविरुद्ध उठला कसा, त्याला रजपुतांनी साह्य कसे केले, औरंगजेबाने त्या सर्वांना नुसत्या एका पत्राने फसविले कसे, मग दुर्गादासाच्याबरोबर तो दक्षिणेत आला कसा, या इतिहासात घडलेल्या घटनांचेच वर्णन शहाजाद्याच्या आठवणीच्या रूपाने प्रथम बरेच दिले आहे. त्याच्या दिमतीला रामप्यारी नावाची एक दासी संभाजी राजांनी दिली होती, तिच्यावर त्याचे प्रेम जडले होते. त्यांच्यांतील शृंगारप्रसंगांचे काही वर्णन हा यांतील वैयक्तिक जीवनाचा भाग. एक तर तो फार थोडा आणि इतिहासाचे धागेदोरे त्यातून मुळीच दिसत नाहीत. अकबराने रामप्यारीला इस्लामची दीक्षा दिली आणि संभाजीराजांनी त्यांना भेट म्हणून दिलेला कंठा तिच्या गळ्यात घातला. याचा संभाजीराजांना राग आला. राजांच्या आश्रयाला आल्यावरही अकबर स्वतःला शहेनशहाच समजत होता आणि आपले कोण काय करणार, अशी त्याला घमेंड होती. पण राजांकडून कविकलश आले आणि त्यांनी त्याला वरील कृत्याबद्दल खरमरीत समज दिली. प्रथम अकबर जोरातच होता. पण, आपण छत्रपतींचा अपमान केला असल्यामुळे, आपल्या तैनातीला दिलेला सरंजाम जप्त करण्यात आला आहे, असे कविकलश यांनी त्याला सांगितले, तेव्हा त्याची धुंदी उतरली. आणि छत्रपतींनी आपला हा कडेलोटच केला आहे, असे त्याला वाटले.
 यातील रामप्यारीवरचे अकबराचे प्रेम आणि त्याने तिला बाटविल्यामुळे व तिला कंठा दिल्यामुळे त्याच्यावर आलेला प्रसंग या घटना ऐतिहासिक नाहीत. पण एक तर यांतून वैयक्तिक जीवनाची कथा अशी निर्माणच होत नाही आणि दुसरे म्हणजे तिच्यातून तत्कालीन ऐतिहासिक जीवनाचे दर्शन मुळीच घडत नाही. 'जंजिऱ्याच्या तटावरून' या कथेत त्या काळच्या लोकजीवनाचे चित्र आपल्या डोळयांपुढे उभे रहाते तसे तर या कथेतून काहीच दिसत नाही. शहाजादा अकबर हा दक्षिणेत छत्रपती संभाजी यांच्याकडे आला. हा प्रसंग इतिहासात फार महत्त्वाचा आहे. त्यामुळे निर्माण झालेले सर्व प्रक्षोभ हा ऐतिहासिक लघुकथेचा उत्तम विषय झाला असता, पण त्याची काही जाणही या कथेतून निर्माण होत नाही.
 ऐतिहासिक लघुकथांची लक्षणे पहाण्यासाठी येथे आणखी दोन कथांचा विचार करू. 'दिवा जळू दे सारी रात' ('वसंत', दिवाळी, १९७३) आणि 'दान' ('वसंत', दिवाळी १९७२) या दोन कथा श्रीमती सुलोचना लिमये यांच्या आहेत. या कथा इतिहासकाळच्या आहेत. लघुकथा या दृष्टीने त्या वाचनीय आहेत. पण त्यांना ऐतिहासिक लघुकथा म्हणता येत नाही. सिद्धराज जयसिंह हा सोळंकी वंशातला राजा अकराव्या शतकाच्या अखेर गुजराथच्या गादीवर आला. त्याला एक फार मोठा तलाव बांधायचा होता. म्हणून हजारो वडारी कुटुंबे त्याने कामाला लावली. त्या वडाऱ्यांत मिरगा आणि जसमल ही पतिपत्नी पण होती. जसमल अत्यंत सुरेख होती. जयसिंहाच्या मनात तिच्याविषयी अभिलाषा निर्माण झाली. त्याने हर प्रयत्न केले, आमिषे दाखविली; पण जसमल बधली नाही. शेवटी राजाने जबरीने तिला ओढून न्यायचे ठरविले. तेव्हा राजा परत येण्याच्या आधीच मिरगा व जसमल यांनी चिता पेटवून तीत उडघा घेतल्या.
 वर म्हटल्याप्रमाणे ही चांगली लघुकथा आहे. तिच्यात समरप्रसंग आहे. वैयक्तिक भावनाविकार यांचा खेळ आहे. जसमलची व्यक्तिरेखा आहे. तिच्या अचल निष्ठेचे वर्णन आहे. पण या कथेत इतिहासाचे धागेदोरे मुळीच नाहीत. सिद्धराज हा फार पराक्रमी व थोर राजा होता, बर्बक म्लेंच्छांचा त्याने पराभव केला होता. सौराष्ट्राचा अहीर राजा, गिरनागरचा खिंगार राजा, माळव्याचा यशोवर्मा यांचा पराजय करून त्यांचा प्रदेश गुजराथला जोडला होता. या इतिहासाचे कोणतेही पडसाद या कथेत नाहीत. सिद्धराज हा येथे सिद्धराज म्हणून दिसतच नाही. ही कोणाही व्यक्तीची कथा होऊ शकेल. म्हणून ही ऐतिहासिक लघुकथा होत नाही. 'जंजिऱ्याच्या तटावरून' या कथेतील यशोदा आणि केरोबा यांची सुखदुःखे प्रापंचिक आहेत. पण मोठया ऐतिहासिक घटनांशी ती कार्यकारणाने निगडित बाहेत. त्यांच्या भावभावनांतून इतिहासाचे प्रवाह आपल्याला कळतात. म्हणून ती ऐतिहासिक लघुकथा होते. 'दिवा जळू दे सारी रात' या कथेत इतिहास असा काहीच दिसत नाही. त्यातील घटनांचे प्रतिबिंब या कथेत पडत नाही.
 'दानत' ही कथा अशीच आहे. राजस्थानातील धूमली नगरचा राजपुत्र मेह जेठवा हा वादळात सापडला असताना, अमरा या चारण जातीच्या एका शेतकऱ्याने त्याला आश्रय दिला. त्याची कन्या उजळी हिचे जेठवावर प्रेम जडले. तोही तिच्यावर आसक्त झाला. आणि मग धूमली नगरीहून वरचेवर येऊन जेठवा उजळीच्या संगतीत राहात असे. उजळीला वाटे हा केव्हा तरी लग्नाची भाषा काढील. पण तसे होईना. तिचे वडील तिला बजावीत होते की, तो राजा आहे. रजपूत आहे. आपण चारण म्हणजे त्याहून हलक्या जातीचे आहो. तो तुला स्वीकारणार नाही. पण उजळीचा त्याच्यावर विश्वास होता. म्हणून ती त्याच्या धूमली नगरीला गेली. पण त्याने तिच्या हलक्या जातीमुळे तिचा स्वीकार केला नाही. उजळीने त्याची निर्भर्त्सना केली व एका मंदिरात जाऊन ती संन्यासिनीसारखी राहू लागली, मेह जेठवा हाही अपराधाच्या जाणिवेनें खंगत चालला व शेवटी मृत्यू पावला.
 ही कथाही लघुकथा म्हणून चांगली आहे. पण तिच्यात इतिहास शून्य आहे. ऐतिहासिक लघुकथेत पार्श्वभूमी म्हणून इतिहास येणे अवश्य असते. किंबहुना व्यक्तीच्या प्रापंचिक सुखदुःखाच्या माध्यमातून अशा कथांत इतिहासच सांगावयाचा असतो, असेही काही टीकाकार म्हणतात. प्रापंचिक सुखदुःखे नसली तर ती रचना म्हणजे कथा होत नाही. तो इतिहास होतो. आणि इतिहासाचे धागेदोरे नसले तर ती कथा होते, पण ती ऐतिहासिक कथा होत नाही. या दोन्हींची गुंफण झाली की, ऐतिहासिक लघुकथा होते. वरील दोन्ही कथांत इतिहास शून्य असल्यामुळे त्या नुसत्या कथा झाल्या.
 आता शेवटी दोन लघुकथांचे समीक्षण करून ऐतिहासिक लघुकथांचे हे विवेचन संपवावयाचे आहे. 'विराणी' (सौ. स्नेहलता दसनूरकर, 'विवेक' दिवाळी १९७१) आणि 'कस्तुरा' (बाबासाहेब पुरंदरे, 'किर्लोस्कर' दिवाळी १९७३) या त्या दोन कथा होत. माझ्या दृष्टीने या दोन्ही आदर्श, उत्कृष्ट अशा ऐतिहासिक लघुकथा आहेत. 'विराणी' ही समर्थ रामदासस्वामी यांच्या नियोजित वधूची कथा आहे. नारायण लग्न-मंडपातून पळून गेला आणि त्याची ही वाग्दत्त वधू तशीच मागे राहिली. तिचे पुढचे आयुष्य कसे गेले, तिचे पुढे काय झाले, याविषयी इतिहास काही सांगत नाही. कोणाला तिच्याविषयी काहीच माहिती नाही. अशा या, लग्नाच्या वेळी सात-आठ वर्षांच्या असलेल्या मुलीचे चित्र कल्पनेने उभे करून, तिच्या पुढील आयुष्यातील सुखदुःखाचे वर्णन या कथेत लेखिकेने केले आहे. आणि तसे करताना त्या काळचे स्त्रीजीवन, धार्मिक कल्पना, रूढी, समर्थांचा लोकमतावर पडत चाललेला प्रभाव, शिवाजीमहाराजांची या स्त्रीविषयीची भावना, या सर्वांचे सम्यक् दर्शन घडविले आहे.
 सामान्यतः कल्पना अशी होते की, नारायण निघून गेल्यावर त्याची ही नियोजित वधू सर्व जन्मभर रडत, नशिबाला बोल लावीत माहेरी राहिली असेल. आणि माहेरीही तिचे जीवन पोतेऱ्यासारखेच असणार. जुन्या काळी विधवा, परित्यक्ता या फुकट मिळालेल्या मोलकरणी अशीच दृष्टीने त्यांचे नातेवाईक त्यांना वागवीत. या विराणीच्या नशिबी तसलेच जीवन आले असेल असे मनात येते. पण लेखिकेने फार उदात्त असे व्यक्तित्व तिच्याठायी अर्पून तिचे जीवन अतिशय उच्च पातळीवर नेऊन ठेविले आहे. आणि ते त्या काळच्या वातावरणात इतके व्यवस्थित बसविले आहे की, ही खरी नवनिर्मिती होय असा मनाला प्रत्यय येतो.
 काशी ही या विराणीची (ताईची) जिवाभावाची मैत्रीण. तिला मुलगा झाला. तेव्हा बाळंतविडा घेऊन ताई गेली. काशीच्या आग्रहामुळे तिच्या सासूने ताईला बोलावणे धाडले होते. पण ताई ओटी भरायला पुढे झाली तेव्हा सासु कडाडली, 'काय अगोचर आहे ही. अंतरपाटाखालून त्याला हिचे पाय दिसले, अन् तो पळाला, अशी ही पांढऱ्या पायाची मंगलकार्यात आपण पुढे पुढे करू नये हे कळू नये तिला ? आणि विहीणबाई तुम्हालाही ? तुम्ही कशी तिला पुढे होऊ दिली.'
 समारंभ संपल्यावर काशीने ताईची माफी मागितली आणि ती म्हणाली, 'अशा वेळी मला त्याचा फार राग येतो. आपण पळून जाऊन गोसावी झाला, पण मागे तुझं काय होईल याचा विचार केला का त्यानं? अन् म्हणे चिंता करतो विश्वाची! डोंबलाची आली आहे चिंता विश्वाची!'
 ताईला अशी टीका केलेली आवडत नसे. ती म्हणे, 'अग, मनुष्यदेह कुठे वारंवार मिळतो ? आणि तेव्हा त्याचं सार्थक करायला कुठे संधी मिळते ? स्त्री म्हणजे माया, असं साधुसंत नाही का म्हणत? म्हणून ते विवाहापासून दूर राहिले. शिवाय मीही अनायासे मुक्त झाले प्रपंचातून! मनुष्यदेह सार्थकी लावण्याची त्यांनी मला संधी दिली म्हणून मी कृतज्ञ आहे. ते तसे निघून गेले नसते तर मला ही संधी मिळाली नसती.'
 असे वाद नेहमी चालत. काशीला तर कधी कधी मैत्रिणीच्या दुःखामुळ रडू कोसळे. पण अशा वेळी ताईच तिचे सान्त्वन करी. पुनः पुन्हा ती सांगे, 'तू का शीण करतेस ? मला अपार शांती मिळाली आहे. मी अवघ्या पाशांतून मुक्त आहे. माझे चित्त सदा प्रसन्न असते. किती अद्भुत जीवन मिळाले आहे मला ! कधीच कुणाला न गवसलेले. ते ज्यांच्यामुळे प्राप्त झाले त्यांना दोष कशाला देऊ ?'
 पुढल्या काळात तपश्चर्या, तीर्थाटन आटपून समर्थ जांबेस आले. त्यांची कीर्तने प्रवचन होऊ लागली. ताईच्या गावचे लोकही कीर्तनाला जात. काशी पण गेली होती. ताईने तिला विचारले, 'काय सांगितले त्यांनी ?'
 'अग, मी काय सांगू ? पण सांगते. म्हणाले, भक्तीबरोबर स्वशक्तीची जाण हवी. दुष्टसंहार करणे आहे. बसल्या जागी टाळ कुटीत बसल्याने ते होणे नाही. रावण मातला त्याचा नाश कोणी केला ? वनवासी रामाने. कोठे होती शस्त्रे ? तरी जय झाला. तऱ्ही भय सोडणे. काय सांगू ताई तुला, श्रोता बसली मांडी चाळवीत नाही !'
 'आणि काशी त्या दिवशी काय म्हणत होतीस ?'
 'चुकलेच माझे, ताई, तूच खरी त्याची योग्यता ओळखलीस. तुझ्यावरून जीव ओवाळून टाकावासा वाटतो.',
 एका परित्यक्ता स्त्रीचे हे केवढे उदात्त मन आहे ! किती समर्थ आहे. ही मूर्ती स्नेहलताबाईंनी आपल्या लेखणीने निर्माण केली आहे. हा कल्पिताचा महिमा आहे.
 शिवप्रभूंना ताईची वार्ता समजली तेव्हा आधी पुढे चिटणीस पाठवून मागोमाग ते दर्शनास आले. आणि म्हणाले, 'कळो आले की, सकळ तीर्थरूप मातोश्री येथे वास्तव्य करून आहेत. म्हणून आशीर्वाद घेण्यास आलो.' असे म्हणून त्यांनी तिच्या पायांवर डोके ठेवले.
 ताईला धन्यता वाटली. ती म्हणाली, 'मऱ्हाटी साम्राज्याचे धनी आम्हास मातोश्री म्हणतात, आमचे अवघे कष्ट फिटले. कोणी आमची कीव करतात. पण आज दिसोन आले की, आमचा पुत्र कोटयवधींचा पोशिंदा आहे. अवधी खंत निमाली. त्रैलोक्यविजयी व्हा! उदंड औक्षवंत व्हा! आमचा आशीर्वाद आहे!'
 महाराजांनी वस्त्रालंकारांनी भरलेली तबके भेट म्हणून तिच्यापुढे ठवली. तेव्हा ती म्हणाली, 'आम्हास याची गरज नाही. जे खातो ते आपलेच आहे. आमचे गुरू समर्थस्वामी भिक्षा मागून निर्वाह करतात. ऐसियास आम्हांस ही उपाधी कशास ? राजियांनी रंजीस न व्हावे. आपल्या पुण्याईने आमचे भागते आहे.'
 समर्थांच्या शिष्यांनाही मातुःश्रींची चिंता असे, त्यांना कळले की मातुःश्री अत्यवस्थ आहेत. तेव्हा समर्थांना विचारून त्यांची जपमाळ प्रसाद म्हणून घेऊन, कल्याणस्वामी भेटीला आले. शिवप्रभूही आले. शिष्यांनी मांडी दिली. शिवप्रभू पायाशी बसले. मातोश्री म्हणाल्या, 'काय कमी पडले आम्हांस? एक पुत्र उशाशी, एक पायथ्याशी! प्रसादही प्राप्त झाला आहे. जीवनाचे सार्थक झाले.'
 असे म्हणून मोठ्या प्रयासाने मातोश्री उठून बसल्या. त्यांनी पद्मासन घातले. हातात जपमाळ घेतली. क्षणातच त्यांच्या नेत्रांतून तेज निघून सीतेच्या नेत्री सामावले.
 शरीर मागे कलंडले. शिवप्रभूंनी त्या तपःसंपन्न देहावर स्वतः पांघरूण घातले.
 परित्यक्ता म्हणून जी अभागी, दुर्दैवी, मातीमोल जिणे जगत असेल, अशी कल्पना होती तिच्या ठायी, शिवप्रभूंनाही आशीर्वाद देणारी अशी एक अद्भुत स्त्री लेखिकेने निर्माण केली आहे.
 आणि तसे करताना त्या काळचे वातावरण निर्माण करण्याचीही तिने कसोशी केली आहे. या घटनेची, त्या वेळचे लोक सारखी चर्चा करीत. त्यांच्या बोलण्यातून त्या वेळच्या धर्मकल्पना, आचार-विचार, माणसांच्या श्रद्धा, मनोवृत्ती- सर्व सर्व समोर दिसू लागते. गोंदाकाका हा जरा ठस माणूस. तो म्हणे ताईचे लग्न झालेच नाही. कन्यादान नाही. लाजाहोम नाही. सप्तपदी नाही. मग लग्न कसले ? तेव्हा तिच्याबद्दल पुन्हा विचार करायला हरकत नाही. असे म्हणताच सर्वांनी त्याच्यावर गहजब केला. हा चार्वाक आहे! कलिपुरुष आहे!
 मुलगी देताना ते घराणे शैव आहे का वैष्णव हे पहावे लागत असे. एका घरी आडवे सारवण, आडवे पोतेरे, एका घरी उभे ! एका घरी आडवे कुंकू, एका घरी उभे ! यात चूक झाली की पोरीचा छळ.
 भाषा कटाक्षाने सतराव्या शतकातली ठेवल्याने मनाला मोठा आल्हाद होतो. 'अवघे शिकले पाहिजे बरे', 'वडिली सांगितले ते सत्य म्हणून मी वागले. तू तशीच वाग', 'त्यांचे काय झाले म्हणवे ? आकाशाने उचलिला किंवा भूमीने गिळिला', 'सकळ चिंतिले मनोदय पावलो.' 'मातुश्रींची सेवा घडावी हा निश्चय जाहला', 'देहास अतिक्षीणता प्राप्त झाली आहे.', 'देव राजियास उदंड आयुष्य देवो', 'आता नाते एकट्या रघुनाथाशी, प्रपंच करणेस फुरसद फावत नाही, मज रघुनाथजीवेगळे कोणी जिवलग नाही !'
 ही लघुकथा म्हणजे मराठीचे एक लेणे आहे!
 आणि तसेच दुसरे लेणे म्हणजे बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेली 'कस्तुरा' शिवछत्रपतींनी जयसिंगापुढे शरणागती पत्करली. कराराप्रमाणे तेवीस किल्ले- त्यातच मावळातले किल्ले- त्याच्या स्वाधीन केले, आग्ऱ्याला ते औरंगजेबाच्या भेटीस गेले, तेथून निसटून परत आले आणि गेलेले किल्ले परत घेण्याचा उद्योग त्यांनी सुरू केला- या काळातली ही कथा आहे.
 किल्ले ताब्यात मिळाल्यावर भोवतालच्या प्रदेशात मोगलांची सत्ता सुरू झाली आणि त्याबरोबरच त्यांचे अत्याचारही सुरू झाले. धनधान्य लुटणे आणि स्त्रियांची विटंबना करणे हा त्यांचा नित्यक्रम असे. मावळातले चाफेगड आणि दवणागड या किल्ल्यांचा परिसर याला अपवाद नव्हता. या किल्ल्यामधल्या खिंडींच्या कुशीत मोहोरी हे लहानसे पाचपंचवीस उंबऱ्यांचे खेडे होते. तेथे गौरा आणि तिची मुलगी कस्तुरा या दोघी रहात असत. त्या डोंबारी जातीच्या होत्या. पलीकडल्या मुळशी परगण्याला डोंबारी लखा याचा मुलगा सर्जा, याची कस्तुरा ही बायको. मोगली अमल सुरू झाला तेव्हा कस्तुरा तेरा-चौदा वर्षांची होती. रूपान ती उजवी असल्यामुळे मोगली सरदारांचा तिच्यावर डोळा होता. प्रथम त्यांनी गौराक्काजवळ तिला विकत मागितले. पण तिने संतापून नकार दिला तेव्हा तिला पळवून नेण्याचाही एक-दोनदा प्रयत्न केला. पण त्या दोघी शिताफीने निसटल्या. पण काही करून कस्तुराला पळवायचीच, असे चाफेगडचा किल्लेदार बक्षी चंद्रभान दुर्जयसाल याचे ठरले होते. त्याचा कारभारी रुस्तुमराव नाइकवडी याची त्याला साथ होती.
 मावळात मोगलांचा बदअंमल चालू होता. लोक सर्व धास्तावून गेले होते. पण महाराज एक दिवस परत येतील आणि आपल्याला या नरकातून सोडवतील, अशी सर्वांना आशा होती. त्याप्रमाणे महाराज परत आले. आणि गेलेले किल्ले परत घेण्याचा विचार सुरू झाला. प्रथम त्यांचे लक्ष चाफेगड आणि दवणागड हे कार्ल्याजवळचे किल्ले यांकडे गेले. या दोन्ही किल्ल्यांवर मोगलांनी बारागंजी तोफा आणून बसवल्या होत्या. त्यामुळे ते अगदी दुर्भेद्य होऊन बसले होते. पण चाफेगडचा किल्लेदार दुर्जयसाल याच्या पापबुद्धीमुळे ते घेण्याची उत्तम संधी महाराजांना मिळाली.
 सर्जा आणि कस्तुरा यांचे डोंबाऱ्याचे खेळ गावोगाव चालत असत. रुस्तुमराव आणि दुर्जयसाल यांच्या ते वारंवार नजरेस पडत. आता कस्तुरा तारुण्यामुळे फारच लोभस दिसू लागली होती. त्यामुळे ते दोघे फार अस्वस्थ होऊन गेले होते. त्यातूनच रुस्तुमरावाला एक युक्ती सुचली. चाफेगड आणि दवणागड यांच्या मधे एक खिंड होती. या दोन्ही गडांवर दोन तोफा बसवल्या होत्या. खिंडीवरून त्या तोफांना त्यांनी एक मोठा दोर बांधला आणि जाहीर केले की, या दोरावरून जो चालत येईल त्याला पन्नास पुतळयांची माळ अन् एका गावची पाटीलकी असे बक्षिस मिळेल. कस्तुरा डोंबारी आहे आणि अतिसाहसी आहे, हे ध्यानात घेऊनच त्यांनी हे बक्षिस जाहीर केले होते. आणि तशी ती दोरावरनं किल्ल्यात आली की मग ती किल्लेदाराचीच होणारे, तिला तिथून कोणी सोडवू शकणार नाही हा त्यांचा डाव.
 गावोगाव दवंडी पिटलेली सर्जा- कस्तुरांनी ऐकली आणि कस्तुराने ते साहस करायचे ठरवले. सर्जाने तिला साथ दिली आणि महाराजांचा हेर बहिरजी नाईक याने पण त्यांना साथ दिली. गेलेले किल्ले परत घ्यायचे महाराजांचे ठरलेच होते.
 एका पुनवेच्या रात्री दवणागडाच्या बाजूने कस्तुरा हातात भाला घेऊन दोराजवळ निघाली. तेथल्या तोफेजवळ सर्जा ढोलगं वाजवीत उभा होता. त्या दोघांनी अट घातली होती की, या वेळी तोफेपाशी कोणीही उभे राहता कामा नये. कारण गलगा होईल आणि कस्तुरा बिचकेल. किल्लेदारांनी अट मान्य केली. फक्त एकेक शिपाई तोफेजवळ रहाणार होता.
 कस्तुरा निघाली. भाला आडवा धरून ती तोल सावरीत होती. तोफेजवळ पुतळयांची माळ लटकत होती. हजारो लोक घोंगड्या पांघरून तो चमत्कार पाहायला खाली जमले होते. कस्तुरा चाफेगडाच्या तोफेपाशी पोचली आणि क्षणार्धात झेप घेऊन तिने तेथल्या पहारेकऱ्याच्या छातीत भाला खुपसला. तो आडवा होताच तिने चपळाईने मोठा खिळा काढला आणि तोफेच्या कान्यात तो हातोड्याने ठोकून तोफ निकामी करून टाकली. इकडे सर्जाने दवणागडाच्या तोफेचे हेच केले आणि इशारा दिला. खेळ पाहायला आलेले हजारो घोंगडे हे महाराजांचे शिपाई होते. तोफा निकामी झालेल्या पाहताच त्यांनी गडावर चढाई केली. दरवाजे फोडून ते आत घुसले आणि भयंकर मारगिरी करून एका प्रहाराच्या आत त्यांनी दोन्ही किल्ल्यांवर भगवा झेंडा चढविला.
 'ए टेल ऑल टू सिटीज्' या डिकन्सच्या कादंबरीचे विवेचन करताना, ई. एम्. फॉर्स्टर या प्रख्यात लेखकाने म्हटले आहे की 'फ्रेंच राज्यक्रांतीसारख्या सार्वजनिक घटनेशी सामान्य खाजगी व्यक्तींच्या जीवनाची इतकी एकजीव केलेली गुंफण मी दुसऱ्या कोणत्याही कथेत पाहिलेली नाही.'
 या गुंफणीतूनच साहित्यात एक सुंदर लेणे तयार होते. पुरंदरे यांनी 'कस्तुरा' हे तसे लेणे घडविले आहे.
 ही कथा आहे कस्तुराची आणि सर्जाची. त्यांचा प्रपंच उद्ध्वस्त होण्याची वेळ आली ती मोगली अमल या ऐतिहासिक घटनेमुळे. सिद्दीच्या अमलामुळे घोसाळगडच्या यशोदेवर जसा प्रसंग आला होता तसाच हा प्रसंग! आग्ऱ्याहून निसटून आल्यावर महाराजांनी किल्ले परत घेण्याचा उद्योग आरंभिला ही सार्वजनिक घटना कस्तुराला डोळयापुढे ठेवून दुर्जयसालाने बक्षिस जाहीर केले ही वैयक्तिक वासनांमुळे झालेली घटना. कस्तुरेच्या साहसामुळे तिच्यावरचे संकट टळले. आणि दवणा-चाफेगडावर भगवे झेंडे चढले.
 बाबासाहेब पुरंदरे हे शिवशाहीर आहेत. ते अहोरात्र शिवकाळांतच रहातात. सध्याच्या काळात त्यांचे वास्तव्य फार थोडे असते. म्हणजे शिवकालाचे वातावरण त्यांनी प्रत्यक्ष जणू पाहिलेलेच आहे. तेव्हा ते त्यांनी किती सहजतेने निर्माण केले असेल ते सांगायला नको. मोहोरी, नांदिवली या खेड्यांची वर्णने, दवणा-चाफेगड किल्ल्यांची, मधल्या खिंडीची वर्णने. शिवगंगेच्या काठापासून चाललेली महाराजांची स्वारी, रायगडचे वर्णन, त्याचा उभा कडा सर्जा चढून गेला त्या वेळचे वर्णन- ही वर्णने वाचताना आपणही बाबासाहेबांच्याबरोबर मावळच्या प्रवासाला जातो. कस्तुरा, सर्जा, यांच्या भावभावना त्या काळाला आणि डोंबाऱ्याच्या जातीला अनुरूप आहेत. महाराजांची सेवा आपण कशी करावी, असा प्रश्न मनात येताच कस्तुराला वाटते, आपण राजाला आपल्या दोरीवर कसरतीचा ख्योळ दावावा.! स्त्रीच्या संरक्षणाविषयी महाराजांचा कटाक्ष कसा होता ? चाफेगडचा किल्लेदार दुर्जयसाल याच्याही ध्यानात आलेले आहे की शिवाजीच्या राज्यात बाईच्या वाटेस कुणी गेला तर त्याचे हातपाय तुटतात. आपल्या राजाचा मोठेपणा सांगणारा सर्जा म्हणाला, 'केवढा मोठ्ठा राजा त्यो, कुठं आपून. काय हाय आपला मायना! पण त्येनं मला बाहूत कवळलं. (मी रायगडचा कडा येंगला.) तव्हा मला शाबास म्हनाला आन मला काळजाशी धरलं. या देहाचं सोनं झालं बघ.'
 जड सृष्टीतल्या घडामोडी, मनातल्या घडामोडी आणि यांच्या जोडीला ती भाषा,
 'ही मोगलाई काय ऱ्हातीय व्हय कायमची ? आपला राजा पुन्ना समदा पवनपट्टा जितून घेईल.' राजधानीसाठी गड कसा असावा ? 'गड बेलाग असावा, ताशीव चखोट, तालेवार असावा. बारा महाल, अठरा कारखाने राहतील असा औरसचौरस, पैस, आबदार असावा!' कस्तुरा दुर्जयसालाला कशी दिसली? 'क्या लडकी है. इष्काची परी. आता तर जादा खूबसूरत दिसतेय.' रुस्तुमराव म्हणाला, 'खुपसूरत म्हंजी ! चंद्राला म्हणतीय उगवू नगं, आन् सुक्राला म्हणतीय मावळू नगं !' रायगड किती दुर्भेद्य आहे? 'सीतेच्या अंतःकरणात रावणाला प्रवेश करणं जसं अशक्य तसंच या रायगडात शत्रूला प्रवेश करणं अशक्य आहे.' महाराज म्हणाले, 'राजधानीस जागा गडकोटावर दुसरी पहावी लागेल.', 'का ? राजगडाने काय कसूर केली महाराज ?' 'कसूर नाही सरनोबत, पण मावळमुलखाच्या जन्मकुंडलीत हा रायगड सोप्या घरात येऊन पडलाय. परवाच्या युद्धी मोगलांचा दाऊदखान अरब सहजी राजगडाच्या पायथ्यापावेतो आला !' 'होय, हे घडलं खरं. राजधानीचा गड एल्गारास अवघड पण आमदरपतीस सोयीचा असावा.' कस्तुरा रडत होती. सर्जाने विचारले, 'काय झालं कस्तुरा ?' त्यो रुस्तुमराव अन् तो चापेगडचा किल्लेदार दिसल्यापून माजा डोळा लवलवतोया. माजा जीव काळजीनं उडून गेलाया !' 'येडी का काय तू ? म्या तुज्यापाशी असताना आन तुज्यामाज्यावर आपल्या राजाची सावली असताना तुला कोन हात लावील ? आपुन रानची पाखरं. भ्या धरून जगायचं व्हय ग ? आपला राजा गरुड हाय अन आपुन त्येची पिल्लं आहू. त्येला सोभंसं वागावं मानसानं!'
 शिवछत्रपतीचे मोठाले पराक्रम इतिहासात वर्णिलेले असतात. पण सामान्य जनतेच्या मनीमानसी त्यांचे कोणते रूप साठविलेले असते ते इतिहास सांगत नाही. ते सांगणे हे लघुकथेचे काम आहे. 'मी शिवाजीमहाराजांचा तांडेल आहे, तेव्हा तू भिऊ नको' असे त्या खलाशाने यशोदेला आश्वासन दिले, आणि तिला तो धर्माची भैण म्हणाला, 'राजाची सावली आपल्यावर आहे; तेव्हा तुला कोन हात लावील' असे आश्वासन सर्जाने कस्तुराला दिले. यातून छत्रपतींचे जे रूप दिसते ते इतिहासापेक्षा जास्त विलोभनीय आहे!
 इतिहासाला अशी जिवंत कळा प्राप्त करून देणे हे ऐतिहासिक लघुकथेचे कार्य आहे. लघुकथा कल्पित असते. पण सर्व इतिहासाचे स्वच्छ प्रतिबिंब तिच्यात दिसत असल्यामुळे ते कल्पित जास्त सत्य असते. कल्पिताचा महिमा असा आहे.