स्मरणी
<poem>
स्मरणी (वृत्त-सारंगी)
श्रीविठ्ठला ! साधुवृंदांत दे वास, । हे मागतो बा ! तुला देवदेवास ।
यावे मुखाला सदाही तुज नाम । चित्ती नसो पांडुरंगा ! दुजा काम ॥१॥
श्रीज्ञानदेवा ! तुज्या सर्व ओवीस । गातो, ह्मणे, तूचि विश्वास होवीस ।
जैसी कृति, स्पष्ट तैसी तुज उक्ति । देती समस्ता जडालाहि हे मुक्ति ॥२॥
बा ! नामदेवा ! तुजे साजिरे बोल । वित्तेशसंपत्ति यांचे नव्हे मोल ।
येतोचि हे ऐकता विठ्ठला डोल । सद्वृंद होतेचि सेवावया लोल ॥३॥
बापा तुकोबा ! अभंगी तुज्या भक्ति- । वैराग्य, अन्यत्र ऐसी नव्हे शक्ति ।
केली समस्ती जनी त्वां दया फार । दावी मलाही भवाम्बोधिचा पार ॥४॥
बा ! एकनाथा ! दयाळूंत तू थोर । दीनाजनांचाचि भारी तुला घोर ।
त्वा अंत्यजाचे कडे घेतले पोर । तारी, जसे कोटि, तैसाचि हा मोर ॥५॥
दत्ता ! तुझी कीर्ति गाईन मी गोड । सत्ता करी सत्य, मत्ताप हा खोड ।
मत्तारिषड्वर्ग बा ! एकदा मोड । लत्ता हरी कालियाची कसी खोड ? ॥६॥
श्रीपुंडरीका ! जगी एक तू धन्य । भक्तात न त्वत्सम श्रेष्ठ बा ! अन्य ।
केला उभा देव तारावया अज्ञ । या त्वत्प्रतापासि गाती महायज्ञ ॥७॥
बा ! नारदा ! फार दास स्वये मुक्त । केले तुवा, मान्य देवा तुजे उक्त ।
ते नावडवे मना भोग, जे भुक्त । तारी दयाब्धे ! मला हे तुला युक्त ॥८॥
बा ! मारुते ! प्रेम रामी तुजे फार । सीतेसि शोकाब्धिचा दाविला पार ।
माहात्म्य, रामायणी वर्णिले सार । ऐकोनिया, प्रार्थितो, दीन हा तार ॥९॥
श्रीरामनामा ! तुजा अद्भुत व्याप । आह्मा अनाथांसि तू माय, तु बाप ।
कर्णीहि येवोनि संहारिसी पाप । बाधो न देशी कधी लेशही ताप ॥१०॥
श्रीसाधु हो ! द्या यशोवर्णनी धीर । हा बोलवावा दयेने जसा कीर ।
याला ह्मणा आत्मदासात ये सीर । पावो पर क्षिप्र मोहाब्धिचे तीर ॥११॥
बा ! सद्गुरो ! इष्ट दात्यात तू शूर । राहो न देता तमाते, जसा सूर ।
गाता भवभ्रांतिते घालिसी दूर । वाहो मयूरावरी त्वद्दयापूर ॥१२॥
(उपसंहार-गीतिवृत्त)
श्रीरामाचे करिती जैसे अहितांसि भल्ल भस्म रणी ।
श्लोक तसे बारा हे धरुत रसिक विष्णुवल्लभ स्मरणी ॥१३॥
हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. |