'भारता'साठी/हिमतीचे झाड उगवते कसे?
'साधु लोकांचा छळ होऊ लागला की दुष्टांचे पारिपत्य करण्यासाठी प्रत्यक्ष मी अवतार घेतो' असे श्रीकृष्णाचे भगवद्गीतेतील वचन आहे.
समूहाची शक्ती
खल दैत्य माजले आणि सरळधोपट संसार-प्रपंच करणाऱ्यांना जगणे अशक्य झाले की सामान्यांच्या अश्रूंतून, आक्रोशातून आणि वेदनांतून एक सामूहिक शक्ती उभी राहते आणि तिचे तांडवनृत्य चालू झाले की, ते दुष्टांचे पारिपत्य करूनच थांबते. भगवद्गीतेच्या संदर्भाखेरीजही या सनातन सत्याचा अनुभव वारंवार येतो.
सामूहिक उद्रेकाची शक्ती उभी राहिली म्हणजे मोठे मोठे चमत्कार घडू लागतात. एकमेकांना पूर्वी कधीही न भेटलेले लाखालाखांचा जमाव जणू काही सगळा कार्यक्रम पूर्वनियोजित असावा किंवा त्या कार्यक्रमाच्या वारंवार रंगीत तालमीही झाल्या असाव्यात अशा तऱ्हेने एका सांघिक जाणीवेने काम करू लागतो.
संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा दाखला
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत फ्लोरा फाऊंटनवर शंभरावर तरुण हुतात्मा झाले, त्या प्रसंगी मी हजर होतो. पोलिसांनी अश्रुधूर सोडला, आता लोक काय करणार असा मी अचंबा करत होतो. तेवढ्यातच, आश्चर्याने पहात राहिलो. अनेकांनी पाण्याने भरलेल्या बादल्या, तांबे, छोटी मोठी भांडी भराभरा आणायला सुरुवात केली. एवढ्या भाऊगर्दीत त्यांना ही सारी सामग्री मिळाली तरी कोठे आणि कशी? अश्रुधुराला तोंड देण्याकरिता पाण्याने चिंब भिजलेली फडकी, रुमाल तोंडावर धरले म्हणजे अश्रुधुराचा फारसा त्रास होत नाही हे यांना सांगितले तरी कुणी, कळले तरी कसे आणि त्यांनी इतक्या तातडीने अंमलात आणलेकसे?
मी विद्यार्थी. जगाच्या इतिहासात झालेल्या काही नामांकित लढाया, त्यातील सेनापतींच्या व्यूहरचना, वेगवेगळ्या चाली, पुष्कळशा चुका, सर्वसाधारण जवानांचे बेछूट हौतात्म्य यांविषयी बरेच पुस्तकी वाचले होते; पण, अश्रुधूर सुटल्याचे आवाज येऊ लागले की पटकन पाणी आणण्याची बुद्धी झालेले हे कोण महाभाग?
समूहाची मर्दुमकी
फ्लोरा फाऊंटनला जमलेल्या लाखांच्या गर्दीत सारेच काही पांढरपेशे - धोपटमार्गाने चालणारे पांढरपेशे नव्हते. असले भद्र लोक कितीही चिडले तरी हातात दगड प्रत्यक्ष उचलून घेत नाहीत; दगड उचलावा, फेकावा अशी मनात प्रबळ ऊर्मी होते, पण गरीबांच्या मनोरथाप्रमाणे थोड्याच वेळात त्या ऊर्मी शमून जातात. उत्पयन्ते विलियन्ते दरिद्राणाम् मनोरथाः।
आम्ही सारे धोपटमार्गी. पोटात थोडी भीती घेऊन पुढे काय होते ते जाणण्याच्या औत्सुक्यापोटी जागीच उभे होतो. काही अधिक हुशार धोपटमार्गी पाय काढता घेऊन पसार झाले होते.
मग, पोलिसांच्या दिशेने हा दगडांचा वर्षाव कोण करत होते? पोलिसांच्या अश्रुधुराला तोंड देण्यासाठी चेहऱ्यावर ओली फडकी गुंडाळून घेऊन अश्रुधूराची नळकांडी उचलताना हात पोळत असताना पोलिसांकडे कोण भिरकावून देत होते? नंतर, गोळीबार सुरू झाल्यावरदेखील शंभरावर माणसे न हलता थांबली, हुतात्मा झाली, त्यांना हे धैर्य कोठून आले? हे कोण होते? यांची पार्श्वभूमी काय, यांचे बालपण कसे गेले, चरितार्थाचे साधन काय, कुटुंबाची परिस्थिती काय? आम्हा धोपटमार्ग्यांच्या विचारातही न येणाऱ्या गोष्टी यांच्या हातून कशा घडत होत्या?
मग दुकाने फुटू लागली, खुलेआम दिवसाढवळ्या दुकानातल्या चांगल्या चांगल्या मोठमोठ्या चैनीच्या आकर्षक वस्तू घेऊन तुमच्या माझ्यासारखेच - कदाचित थोडे जास्त फाटके आणि मळके कपडे घातलेले लोक भराभर दुकानातून सामान उचलून पटापट गल्लीबोळात नाहीसे होत होते.
धोपटमार्गी काही सारेच सच्छील असतात असे नाही; लपून छपून, पकडले जाण्याचा धोका फारसा नसेल तर लभ्यांश साधून घेण्याइतकी बहादुरी आम्हीही करतो. परंतु, लोक सैरावैरा धावताहेत, बंदुकीच्या गोळ्यांचे आवाज सर्वत्र भरून राहिले आहेत, मधूनच कोणाची किंकाळी ऐकू येत आहे अशा धांदलीत दगड उचलून दुकानाच्या काचेच्या तावदानावर नेमका कसा मारला जातो आणिदुकानाचे दार फुटल्यानंतर लुटालूट करणारे हे कसले लोक? या प्रश्नांची उत्तरे फ्लोराफाऊंटनच्या आसपास असेपर्यंत मला मिळाली नव्हती.
मग एकदम कोठून विधानसभेतून भाई एस. एम. जोशी बाहेर आले. एवढासा किरकोळ शरीरयष्टीचा माणूस, पण सगळ्या जनसमूहाचे लक्ष त्याच्याकडे गेले. त्याने हात वर केला आणि जादूची कांडी फिरावी तसे सर्वत्र शांत शांत झाले. त्यांनी खूण केली पुढे चला आणि सारे लोक त्यांच्या मागे चालू लागले. मुरलीवाल्याने मुरली वाजवताच सारे उंदीर त्याच्या मागून चालू लागावे तसा हा प्रकार. काळे उंदीर, गोरे उंदीर, छोटे उंदीर, मोठे उंदीर, धोपटमार्गी उंदीर, लुटलेले सामान कोठेतरी तात्पुरते ठेवण्याची व्यवस्था करून आपण जणू त्या गावचेच नाही असा आव आणून चालणारे गुंड उंदीर. सारे एस. एम. जोशींच्या मागोमाग दोनतीन मैल चालत चौपाटीवर पोचले. तेथे एक जुजबी, पण मोठे व्यासपीठ आम्ही पोचेपर्यंत तयार झालेले होते.
अर्ध्याएक तासातच संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाची सर्व नामांकित नेते मंडळी मंचावर जमू लागली. चौपाटीची सारी वाळू तुडूंब जनसमुदायाने भरली होती. फ्लोरा फाऊंटनच्या गोळीबारात प्रत्यक्ष हुतात्मे किती झाले याचा प्रत्यक्ष कोणालाच अंदाज नव्हता. कोणी म्हणे दहा तर गेलेच, दुसरा म्हणे दहावीस मुडदे तर मी प्रत्यक्ष डोळ्याने पाहिले. प्रत्यक्षातल्या आकड्याइतकी मजल कोणाच्या कल्पनेतील जात नव्हती; पण मृतांचा आणि जखमींचा नक्की आकडा माहीत नसताना काहीतरी लोकविलक्षण रौद्र घडून गेले आहे आणि त्याचे आपण साक्षीदार आहोत या सामूहिक जाणीवेनेच सर्वांच्या मनावर नकळत एक शिस्तीचे बंधन आले होते. धांगडधिंगा घातल्यावर वर्गात साळसूदपणे बसणाऱ्या उनाड पोरांचा नाटकीपणा त्यात काही असणार. आपल्या हातून जे काही झाले त्याच्या शोधात पोलिस आपल्यावर नजर ठेवून असणार असा धास्तीचा काही जणांच्या पोटात गोळा उठला असणार. आता घरी कसे सुखरूप पोचतो याचीही चिंता धोपटमार्ग्यांना तरी तोंड उघडू देत नसणार. लाखो माणसे, हजारो कारणे; पण, सगळी लष्कराच्या कवायतीत असल्यासारखी कडक शिस्तीत बसली होती. अंगावरचे कपडे पांढरपेशे अथवा गिरणी कामगारांचे मळके आणि फाटके. लष्करी खादीचे गणवेश असते तर शिस्तीत तरी लवमात्र न्यून कोठे दिसले नसते.
दोन तासांपूर्वी फ्लोरा फाऊंटनच्या रणमैदानावर सुसज्ज पोलिसांच्या तुकड्यांशी गनिमी काव्याने झुंज घेऊन मुरारजींच्या फौजांना हैराण करणारा हा जमाव आता कसा शहाण्या मुलासारखा शांत शिस्तीने बसला होता!मंचावर अनेक वक्ते बोलले. संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीची यथासांग मांडणी झाली. मराठी महाराष्ट्रद्रोही नेते आणि बिगरमराठी मराठ्यांचे शत्रू यांच्यावर भरपूर तोंडसुख घेतले गेले. आचार्य अत्र्यांनी अशा भयरुद्र मानसिकतेतल्या जमावालाही धो धो हसवले; शंकरराव देव, काकासाहेब गाडगीळ, यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने साग्रसंगीत शिमगा झाला. लोकांच्या उत्साहाला उधाण फुटले होते.
हे काय घडते आहे हे बहुतेकांना उमजत नव्हते; मलाही नाही. अर्वाचीन इतिहासाचे उदंड व्यासंगी आणि कामगारांचे झुंजार नेते भाई श्रीपाद अमृत डांगे बोलायला उभे राहिले. त्यांना आमच्या मनातली प्रश्नचिन्हे जाणवली असावीत. भाषणाच्या ओघात त्यांनी एका वाक्यात उत्तर दिले. 'क्रांतीकाळात उभी राहणारी शक्ती सर्वक्षम असते, ती कधी रौद्र होऊ शकते, कधी शांत, कधी प्रचंड करुणामयी. मराठी माणसांच्या मनातील आकांताने फ्लोरा फाऊंटनच्या मैदानावर दाखवली ती क्रांतीकारी बेशिस्त. चौपाटीच्या या प्रचंड मैदानावर टाचणी पडली तरी ऐकू येईल अशा शांतपणे बसलेली ही माणसे ही क्रांतीच्या उद्रेकातील क्रांतीकारी शिस्त आहे.'
वाक्य मोठे जबरदस्त, त्यातली काव्यशक्ती, लय आणि ठेका असा की तो भेदून अर्थाच्या गाभ्याला हात घालण्याची इच्छासुद्धा होऊ नये.
अश्रुधुराची चाहूल लागताच पाणी जमा करणारे कोण, दगडफेक करणारे कोण, मरणाला सामोरे जाणारे कोण आणि दुकानांची तावदाने फोडून माल बिनधास्तपणे पळवणारे कोण? या प्रश्नांचा काही उलगडा झाला नाही. या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न सगळ्या नोकरमान्या आयुष्यात शीतपेटीतच थंड राहिला.
नव्या पाटीवर तोच प्रश्न
परदेशातून परत आलो, शेतकरी बनलो, क्षणाक्षणाने आणि कणाकणाने गरीबीत पाय खचू लागल्यावर शेतकऱ्यांच्या मनात तयार होणारी वेदना अनुभवली आणि नकळत मी धोपटमार्गी अनिश्चितकालीन उपोषणाच्या, त्यावेळी तरी निश्चित वाटणाऱ्या, मृत्यूला सामोरा गेलो. चाकणच्या कांदा आंदोलनाच्या काळात एक गोष्ट शिकलो. 'परित्राणाय साधूनाम् विनाशायच दुष्कृताम्' उभी राहणारी विश्वशक्ती कणमात्राने का होईना एका हाडामांसाच्या प्राण्यात प्रगट झाली की आजूबाजूच्या जनसमुदायात एक मोठा मानसिक बदल घडून येतो. आपला संसार, दररोजच्या काळज्या, संध्याकाळच्या भाकरीची चिंता, बायकापोरांचे आजारपाणी, डॉक्टर-वाण्यांची थकलेली बिले अशा, एरव्ही जखडून टाकणाऱ्या साऱ्या चिंता, क्षणार्धात निष्प्रभ होऊन जातात. उंच डोंगर चढून गेल्यावर पायथ्याशी असलेली घरे, जनावरे निरर्थक वाटू लागावी तसे काहीसे मनुष्यदेहात प्रकट झालेल्या विश्वतेजाच्या कणाच्या आसमंतात होऊन जाते.
साधीसुधी माणसे सारा प्रपंच निरर्थक मानून सोडायला तयार होतात, तुरुंगात जायला तयार होतात, लाठ्यांसमोरही अगदीच भागूबाई बनत नाहीत. आसपास प्रत्यक्ष मृत्यु दिसला तरी त्यामुळे घाबरून जात नाहीत; उलट, अधिक निश्चयाने वाटचाल करत राहण्याच्या गोष्टी बोलतात. हा एक चमत्कार! आपल्या जीवाची पर्वा न करता सेनापती, घोड्याला टाच मारून, पुढे झाला की काही काळापुरतेतरी सेनापतीचे रक्तामांसाचे शरीरच आंदोलक जनसमुदायाच्या विकीर्ण शरीराचा आत्मा बनतो आणि काय वाटेल तो त्याग, सहन करायला आंदोलक तयार होऊन जातात.
ध्येयासाठी हौतात्म्याचे मरण पत्करणे हे सोपे असते; पण, मनामध्ये जे दिव्य भव्य, जे उन्नत आणि उदात्त मानले त्यासाठी दुसऱ्याला इजा करण्याची वा प्रसंगी त्याचा जीव घेण्याची तयारी सर्वसामान्य धोपटमार्गी माणसाच्या मनाची होत नाही.
सशस्त्र आणि निःशस्त्रांतील लढाई
आंदोलनाच्या रसायनातील हा एक नवा गूढ प्रश्न उद्भवला. नाशिकच्या १९८० सालच्या ऊस कांदा आंदोलनात मंगरूळपीर फाट्यावर एसआरपी च्या जवानांनी शेतकऱ्यांना लाठीने बडवबडव बडवले. चांदवडच्या टेकड्यांच्या चढामुळे चढता येत नाही, अशा परिस्थितीतील शेतकऱ्यांना, चारपाच लांडग्यांनी मिळून एखाद्या शेळीला गाठावे तसे चारचार पाचपाच जवानांनी एका एका शेतकऱ्याला घेरले, गाठले, पाडले. प्रशिक्षणाच्या काळात शिपायांना निर्जीव चामडी पोत्यांना बडवण्याचा सराव देतात. ज्याला मारतो आहोत त्याला काही संवेदना आहेत, वेदना आहेत याची आठवणसुद्धा होऊ नये याचे शिक्षण स्वतंत्र भारताच्या शिपायांना स्वतंत्र भारताच्या नागरिकांना तुडवण्यासाठी दिले जाते. नाशिकच्या आंदोलनात आदलेच दिवशी खेरवाडी रेल्वे स्टेशनजवळ आंदोलनाच्या दंगलीत एका एसआरपी जवानाचा मृत्यु झाला होता. त्यामुळे, जवानांच्या लाठ्यांना काही असुरी जोर चढला होता. शेतकऱ्यांनी बेदम मार खाल्ला.
मी तेथे जाऊन पोचलो तेव्हा मार खाल्लेल्या शेतकरी तरुणांची श्वासांचीधापसुद्धा शांत झाली नव्हती. धड श्वास घेता येत नाही, धड बोलता येत नाही अशा अवस्थेत सारे तरुण मला एकच सांगत होते, "आता आम्हाला पुन्हा पोलीसासमोर मोकळ्या हाताने जायला सांगू नका. पुढच्यावेळी समसमानांचा सामना होऊ द्या. त्यांच्या हाती काठी तर आमच्याही हाती काठी असू द्या; मग जे व्हायचे ते होऊ द्या. लाठी चालवता चालवता डोके फुटले तरी बेहत्तर, पण 'समोरच्याच्या हाती लाठी आणि आमच्याकडे फक्त पाठी' या परिस्थितीत एक हताशपणाची स्त्रैण जाणीव होते ती लाठीच्या मारापेक्षाही भयानक असते."
हातापायांवर, पाठीवर बसलेल्या लाठीच्या माराचे वळ अजून टरटरून वर येत आहेत अशांना ब्रह्मज्ञान सांगण्यात काही अर्थ नव्हता, हाती नुसती काठी घेण्याची परवानगी देऊन भागणार नाही, ती चालवण्याचे, मार अडवण्याचे आणि वर्मी घाव घालण्याचे शास्त्रीय प्रशिक्षण द्यावे लागते हे त्यावेळी त्यांना पटले नसते.
सामना सशस्त्र शासनाशी आहे. शेतकरी लाठी घेऊन बाहेर पडले तर पोलीस बंदुक घेऊन बाहेर येतील; शेतकरी बंदुका घेऊन बाहेर पडले तर पोलीस मशीनगन्स घेऊन येतील, हंगेरी, पोलंड येथे घडले तसे रणगाडे घेऊन येतील, तोफा डागतील. १८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध कोसळून पडले ते गावोगावच्या वेशीजवळील झाडांवर टांगून फाशी दिलेल्या हजारो वीरांच्या लटकत्या शरीरांच्या दृश्याने. 'शस्त्रांची स्पर्धा वाढवून जनआंदोलने प्रभावी होत नाहीत, यासाठी शत्रूच्या मनातील द्वेषभावना संपवावी लागेल, त्यासाठी आपल्या मनातही लवमात्रही हिंसा-विद्वेषाची भावना असता कामा नये' असा काहीसा विचित्र मंत्र महात्मा गांधींनी दिला होता.
इंग्रजांनी, अगदी नाईलाज झाला तेव्हाच, हिंदुस्थान सोडला. सोडता सोडता देशाची शकले केली, जातीय विद्वेषाचा आगडोंब भडकावून दिला आणि प्रत्यक्ष धुमश्चक्रीत पोसल्या जाणाऱ्या पौरुषी गुणांऐवजी बुळचट कायरतेलाच सद्गुण मानणाऱ्या लोकांच्या हाती सत्ता सोपवून इंग्रज गेले. हा काही फार मोठा विजय नाही पण नि:शस्त्र, असंघटित, दरिद्री, निरक्षर, कोट्यवधी जनतेला उभे करण्याचा युद्धशास्त्रातला तो एक मोठा प्रयोग होता यात काही शंका नाही.
गेल्या पंचवीस वर्षांच्या शेतकरी संघटनेच्या आंदोलनाच्या कालखंडात अनेक तरुण कार्यकर्त्यांनी मला हिणवले आहे, 'शरद जोशी आम्हाला शांत बसायला लावतात त्यामुळे आंदोलन प्रभावी होत नाही, शरद जोशी हा शेतकरी आंदोलनाला मोठा अडथळा झाला आहे, अन्यथा आम्ही तरुणांनी काय चमत्कार करूनदाखवला असता ते सांगता येत नाही.' शेतकरी संघटना तिच्या प्रभावाच्या जोरात होती त्यावेळी शिवसेना ही नगण्य ताकद होती; भारतीय जनता पार्टी तर जवळजवळ समूळ संपली होती. शिवसेनेचे नेते बाळ ठाकरे यांनी शहरी गुंडांच्या टोळ्या, त्यांचे मार्ग, त्यांची साधने यांचा अनमान केला नाही; दगडफेक, मोडतोड, प्रसंगी रक्तपात यांच्या आधारे शिवसेनेविषयी लोकांच्या मनात त्यांच्या सैनिकांनी दहशत तयार केली त्याचे कौतुक केले. हिंगणघाटच्या शिवसेनेच्या आमदारकीच्या उमेदवाराने त्यांच्या शेजाऱ्याची बायको पळवली - प्रेमापोटी नाही, बाजारात विकण्यासाठी - तरी हिंदू हृदयसम्राटाने हिंदू संघटनांना अशा वीरांची गरज आहे अशी उघड शाबासकी दिली असे म्हणतात. यामुळे विचारशून्य हिंदुत्वाची लाट देशभर आली. याउलट, तर्कशुद्ध विचारसंपन्न शेतकरी संघटनामात्र पक्षाघात झाल्याप्रमाणे आंदोलनाच्या क्षेत्रात आणि निवडणुकीच्या तंत्रातही प्रभाव पाडू शकली नाही.
माणसांचे दोन प्रकार
दोस्तोवस्की या रशियन लेखकाने ठीळाश । झींळिीहार्शी या त्याच्या जगविख्यात कादंबरीत म्हटले आहे, "माणसामाणसांत दोनच प्रकार असतात. ज्यांनी कधी कोणा दुसऱ्या माणसाचा प्राण घेतला आहे ते एका बाजूला आणि हत्या केल्याचा अनुभव नसलेले दुसऱ्या बाजूला." हातून एक हत्या घडली की माणसाची सर्व मानसिकताच बदलते. आपण कोण? माणूस म्हणजे काय? हे जग काय आहे? चांगले म्हणजे काय? वाईट म्हणजे काय? या सगळ्या गोष्टींबाबत सारी धारणाच एकदम बदलून जाते. 'सत्यं शिवं सुंदरम्' नैतिकता सगळ्या उलट्यापालट्या होऊन जातात. एक खुनी आणि दुसरा कोणाची हत्या न केलेला अशा दोन माणसांत साधे संभाषणही होऊ शकत नाही. दोघेही बोलतात व्यवहारातलीच वाक्ये, शब्दकोशातलेच शब्द - परिचयाचे; पण, हत्यारा दुसऱ्या माणसाशी बोलताना हा आपल्यासारखाच माणूस आहे अशी भावना मनात आणूच शकत नाही. कसाई बकरीकडे जसा पाहतो तसाच काहीसा हत्यारा सर्वसामान्य लोकांकडे पाहतो. 'माहीत आहे वटवट करतो, एक वाताडा घातला तर उताणा पडेल', अशी एक वाचा न फुटलेली भावना हत्याऱ्याच्या मनात कायम असते.
साऱ्या जगात सध्या आतंकवाद्यांचे थैमान चालू आहे. जवळजवळ दररोज कोठे ना कोठे जीवावर उदार झालेले आतंकवादी हल्ले चढवतात, अनेकांना मारतात, स्वतःही मरण पत्करतात. ११ सप्टेंबर २००१ च्या न्यूयॉर्कमधील विश्व व्यापार केंद्राच्या दोन मनोऱ्यांवर दोन विमाने आतंकवाद्यांनी आदळवलीआणि अशा घातपाती कृत्यांना एक प्रतिष्ठा आली. ओसामा बिन लादेनसारख्या वृद्ध उंदराला शोधण्याकरिता अमेरिकेच्या, अत्याधुनिक शस्त्रांनी सुसज्ज सैन्याने जंग जंग पछाडले पण लादेन काही त्यांच्या हाती लागला नाही. अमेरिकनांना नाक खिजवून दाखवण्यासाठी तो नियमितपणे दूरदर्शनवर व इतर मार्गे आपण अजून चैतन्यशील असल्याचा पुरावा देत असतो.
असमर्थांचे रडगाणे
काश्मीर प्रश्नाबद्दल भारताची बाजू न्याय्य व योग्य आहे अशी बहुतेक भारतीय हिंदू सवर्णांची तरी खात्री आहे. भारताचे सात लाख लष्कर जम्मू काश्मीरमध्ये छावणी घालून बसले आहे तरीही प्रत्यही घातपाती हल्ले होतच आहेत. औरंगजेबाच्या सैन्याची संताजीधनाजींनी केली नाही अशी दुर्दशा काश्मीरातील घातपाती भारतीय लष्कराची करत आहेत. पाकिस्तानच्या आधाराने आणि मदतीनेच ही घातपाती कृत्ये चालू शकतात असे धीरगंभीर प्रकृति पंतप्रधान आणि कडवे उपपंतप्रधान दोघेही दिवसातून दहावेळा सांगत असतात. या रडगाण्याला काही अर्थ नाही, किंबहुना, हा युक्तिवाद हास्यास्पद आहे हे उघड आहे. हिंदुस्थान प्रत्येक क्षेत्रात पाकिस्तानपेक्षा किमान पाच पटीने जड आहे. इस्राएल हे मध्यपूर्वेतील चिमुकले राष्ट्र. सर्व बाजूने इस्रायलचा विध्वंस करण्याची मनीषा बाळगणारी दोन डझनावर अरब राष्ट्रे आणि इस्रायलच्या लोकसंख्येपेक्षा कितीतरी पट अधिक अरब मुसलमान शत्रु म्हणून ठाकले आहेत. तरीही इस्रायलला कधीही 'हे अरब घातपाती अरब राष्ट्रांच्या मदतीने आमच्याविरुद्ध परोक्ष युद्ध चालवीत आहेत' असे आसू गाळीत म्हणावे लागत नाही; किंवा 'लादेन, सद्दाम यांच्यामागे लागण्यापेक्षा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बुशसाहेब यांनी मुशर्रफ विरुद्धच आघाडी उघडून आमच्या काश्मीरातील साप मारून द्यावा' अशी 'षंढ स्वप्ने' ते रंगवीत बसत नाहीत.
'मुंबई बंद', 'महाराष्ट्र बंद' असल्या कार्यक्रमांच्या वेळी गुंडगिरी करून मर्दुमकीच्या आवेशात मिशांवर हात फिरवीत आणि अधिकाधिक भडक भगवा टिळा लावून शिवसैनिक भले फिरोत; बाबरी मशीद पाडण्यात शिवसैनिकांचा मोठा हात होता अशी पडद्याआड फुशारकी हिंदुहृदयसम्राट खुशाल मारोत, तोगडियासारखे निरर्गल आपल्या हिंदू अनुयायांना 'मुसलमानाशी मैत्री अवश्य करा; त्यांच्या घरी सुंदर बायका असतील तर अवश्य करा' असा खास हिंदूवीर सल्ला देवोत, मुसलमान घातपाती हिंदुस्थानभर कोठेही - अगदी लोकसभेवर व लष्कराच्या प्रमुख छावणीवरही बेधडक हल्ले करतात, हरदिन निदान पाचदहा घातपाती त्यांच्या कामाकरिता बाहेर निघतात, आपण जिवंत परत येणार नाही याची खात्री असताना नेटाने निघतात याला हिंदुवीरांकडे जवाब नाही.
हिंदू तरुणांनीही घातपाती कृत्यासाठी सज्ज व्हावे असा आदेश हिंदुहृदयसम्राटांनी दिला पण एकही जौहरी हिंदू आतंकवादी तयार झालेला दिसत नाही. एक लाखानी निघाला पण त्याचा कार्यक्रम ध्येयापोटी नाही, केवळ धनाशेपोटी. त्याने रॉकेट पुरवण्याचा कारभार केला तो पाकिस्तानी घातपात्यांना उत्तर देण्याकरिता नाही, तर अमेरिकेतील इस्लामी गटांना शस्त्रास्त्रे पुरवण्यासाठी.
अर्थवादी आक्रमक बनत नाही
शेतकरी संघटनेची लढाई अर्थवादी चळवळ आहे. त्यात स्वतःच्या फायद्याकरिता दुसऱ्याचे कोणाचे काहीही हिरावून घेण्याची हिणकसता नाही. 'घामाचे दाम तेवढे घेऊ, तो आमचा श्रमसिद्ध अधिकार आहे' या विचाराने मनात तामसी द्वेष उद्भवत नाहीत. त्यासाठी कोणाचा जीव घ्यावा अशी भावना तयार होत नाही. शेतकरी संघटनेचे तरुण कार्यकर्ते अलिकडे शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाचे वर्णन करताना, 'तुमच्या आईबापांना यांनी असे घोळले' अशी भाषा वापरून काही त्वेष तयार करण्याचा प्रयत्न करतात. यातून निघणारे पराक्रम आणि पौरुष किरकोळ झेपेचे आणि फारच तात्कालिक असते. 'शेतकरी तितका एकएक' ही घोषणा अगदी जुनी आहे. शेतकऱ्यांच्या संघर्षाचे स्वरूप भटशाहीविरुद्ध आहे असे महात्मा जोतिबा फुल्यांनी मांडले. चालू कालखंडात लढाई 'इंडिया' विरुद्ध आहे असे तर्कशुद्ध युक्तिवादाने सांगितले गेले पण त्यातून तेजस्वी कार्यक्रम उभा राहिला नाही.
कारखानदारी कामगारांच्या, शेतमजुरांच्या किंवा आदिवासींच्या व दलितांच्या चळवळी, शेतकरी आंदोलनाच्या तुलनेने पाहिले तर, संख्याबळाने किरकोळ पण या आंदोलनांची शाहीरी ताकद अधिक, शहरी पांढरपेशांत त्यांच्याविषयी सहानुभूती आणि संवेदना अधिक. या आंदोलनात घातपाती किंवा आक्रमक कार्यक्रम होऊ शकतात. बाबासाहेब आंबेडकरांना दलितसमाजाने दैवी अवताराचे स्थान दिल्यामुळे निदान बाबासाहेबांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न उद्भवला तर दलित घातपाती कृत्यांनाही तयार होतात.
शोषितांच्या चळवळीत सर्वसाधारणपणे जितकी आक्रमकता आहे तितकीही शेतकरी चळवळीत दिसून येत नाही. लोकसभेत, विधानसभेत शेतकऱ्यांची मुले बहुसंख्य आहेत, तरीही शेतकरी आंदोलक हिम्मत बांधत नाही आणि सरकार शेतकरी आंदोलकांना निघृण पद्धतीने दडपून टाकते, त्याविरुद्ध फारसा आवाजही खासदार आमदार मंडळी उठवत नाहीत.अर्थवादी चळवळीत काव्यात्मकता नसते त्यामुळे वेडेपीर पोसण्याची अशा आंदोलनांची क्षमता कमी असते. याउलट, दररोजच्या जीवनातील आर्थिक, सामाजिक वास्तविकतेला दूर ठेवून जात, धर्म, राष्ट्र अशा अप्रस्तुत मुद्द्यांच्या आधारे तयार करण्यात आलेल्या संघटना व पक्ष लोकांच्या मनाला अधिक भावतात. 'वर्तमानकाळात प्रतिष्ठेने, स्वाभिमाने, सन्मानाने जगण्यासारखे काहीच राहिले नाही' म्हणत माणसाची भूतकाळात जाऊन इतिहासातली अभिमानस्थळे शोधून काढण्याची प्रवृत्ती होते. कालाच्या सुरवातीपासून ते इतिहासाच्या अंतापर्यंत, ना भूतकाळात ना भविष्यकाळात - अभिमान बाळगण्यासारखे काही नाही ही भावना मनुष्याला सोसणारी नाही. ज्यांना अभिमान बाळगण्यासारखे काही नाही असे लोकही काही मिथ्यके तयार करून अभिमानस्थळे उभी करतात. 'नर्मदामय्याने आदेश दिला म्हणून आम्ही परिक्रमावासियांना लुंगवतो' असे शूलपाणीश्वरच्या झाडीतील भिल्ल म्हणतात. 'सीतामाईच्या आदेशाप्रमाणे आम्ही लूटमारी करतो' असे रामोशी मानतात आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखे विवेकी प्रतिभावंतही, '१८५७ चे स्वातंत्र्यसमर हे प्रत्यक्षात केवळ चपात्यांचे बंड असले तरी ते स्वातंत्र्यसमर होते असे सिद्ध करणे आवश्यक आहे' असे आग्रहाने मांडतात.
माझ्या पोटात भूक आहे, माझी पोरं उपाशी आहेत या जाणीवेतून माणसे पराक्रमाला तयार होत नाहीत. बंगालच्या दुष्काळात हजारो माणसे धान्याच्या कोठारांच्या दरवाजासमोर भुकेने तडफडत मेली, पण कोणी दरवाजा फोडण्याचा प्रयत्नसुद्धा केला नाही.
मी हाती शस्त्र घेतो आहे, ते भुकेपोटी नाही तर पूर्वजांच्या प्रतिष्ठेसाठी, धर्माच्या निष्ठेपोटी, जातीच्या अभिमानासाठी ईश्वराच्या आदेशाप्रमाणे घेत आहे. अशा भावनेने माणसे मरायला तर तयार होतातच, पण मारायलाही तयार होतात.
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत फ्लोरा फाउंटनच्या रणसंग्रमात बादल्या भरून पाणी कुणी आणले? पोलीसांवर दगडफेक कुणी केली, दुकाने कुणी लुटली? हे काही सर्वसामान्य नीटपंथे चालणाऱ्या लोकांच्या हातून होणारे नाही. अशा गोष्टी ते पोटात भूक आहे म्हणून करणार नाहीत, एवढेच नाही तर जाती, देव, धर्म, राष्ट्र यांच्या आवाहनापोटी करणार नाहीत. धोपटमार्गी अशा आवाहनांपोटी मरायला तयार होतील, मारायला तयार होणार नाहीत आणि मारायला तयार झाले तरी ती ऊर्मी प्रबळ शक्तींपुढे टिकणार नाही; फार तर, आपल्यापेक्षा कमजोर दुर्बलांविरुद्ध त्यांचा पुरुषार्थ दिसू शकेल.
फ्लोरा फाऊंटनची क्रांतीकारी बेशिस्त दाखवणारे कोण? ज्यांच्या आयुष्यातएरव्हीही खून, मारामाऱ्या, दगडफेकी, लुटालुटी असे प्रसंग हरहमेश नाही, तरी वारंवार येतात ती माणसे आंदोलनाच्या किंवा क्रांतीच्या काळात त्यांच्या स्वधर्माप्रमाणे वागतात आणि उद्रेकाच्या त्या काळात त्याला क्रांतीकारी बेशिस्त म्हणतात.
धोपटमार्गी नेतृत्वगुणात काही ईश्वरी अंश असल्याची जाणीव झाली तर व्यवहारी माणसे प्रापंचिक चिंता दूर टाकून मरायला तयार होतात. अभिमानस्थळांसाठी धोपटमार्गीही मरायला तयार होतात, मारायलाही तयार होतात; पण, प्रचंड सामर्थ्याच्या विरोधकांशी पराक्रम न दाखवता चुटपूट कमजोरांना दादागिरी दाखवण्यापर्यंतच त्यांची वीरश्री टिकते.
'टोळी' वृत्ती
नेहरूवादी समाजवादाचा पाडाव झाला, आर्थिक पुरुषार्थाने सन्मान व स्वाभिमान मिळण्याची आशा दुरावली. कोणी एक नेता किंवा पक्ष साऱ्या देशाला मोठे करील ही आशा संपली. सारे लोक सैरावैरा जीवाच्या धास्तीने धावू लागले. जो कोणी पोटाला लावील त्यालाच नेता म्हणू लागले. अशा परिस्थितीत इतिहासकालातील अभिमानस्थळे उकरून काढून रामाच्या वा शिवाजीच्या नावाने पक्ष आणि सेना उभ्या राहू लागल्या. गतेतिहासात आमच्यावर अन्याय झाला त्याची भरपाई म्हणून मंडलवादही पुढे आला. समाजवाद हरला आणि पुरुषार्थी उद्योजकतावाद पुढे येण्याऐवजी इतिहासातील भुते नाचवणारे मंदीवादी, मंडलवादी सारा देश ताब्यात घेत आहेत.
हिंदुत्ववाद्यांचे चढउतार
'हिंदू हा सर्वसाधारण प्रकृतीने मवाळ असतो, त्याची स्वभावधारणा अतिरेकी जहाल क्रूरतेची नाही. मुसलमानांशी सामना करायचा असेल तर हिंदुंनी संघटित बनले पाहिजे, हिंदुत्वाचा गर्व बाळगला पाहिजे; भल्याबुऱ्या सर्व मार्गाने, हा आमचा देश आहे.येथे आमच्या मर्जीप्रमाणेच चालले पाहिजे. असे हिंदवेतरांना जाणवत ठेवले पाहिजे', ही महत्त्वाकांक्षा महात्मा गांधींनी खिलाफत चळवळ सुरू केल्यानंतर सर्व देशात हळूहळू मूळ धरू लागली. इंग्रज असेपर्यंत हिंदुत्ववाद्यांनी काही पराक्रम गाजवल्याचे दिसत नाही. उलट, राष्ट्रीय स्वातंत्र्याची चळवळ व समाजसुधारक चळवळ या दोघांनाही विरोध करत ही विषवल्ली ब्रिटीश सरकारच्या आश्रयाने फोफावली. महात्मा गांधींच्या हत्येनंतर यांचा जवळजवळ सफायाच झाला; पण, समाजवादाचा जसजसा पाडाव झाला तसतसे हिंदुत्व भावना चेतवण्यात मंदिरवादी, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, शिवसेना यांना यश येऊ लागले.
बेस्ट बेकरीत कोलीत पेटले -
अलीकडच्या वर्षात या हिंदुवीरांचे परमदैवत म्हणजे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी. गोध्रा स्टेशनवरच्या जाळपोळीत काही अयोध्या कारसेवक जळून मेले. प्रत्यक्षात काय घडले ते कधी शाबीत झालेच नाही, पण हे सर्व मुसलमान गुंडांनी घडवून आणले असे वातावरण तयार करून, महात्मा गांधींच्या गुजरातमध्ये, नरेंद्र मोदी यांनी गोडसेवादाचा परमोच्च विजय करून दाखवला. गुजरातभर योजनापूर्वक दंगली घडवून आणल्या, हजारो निरपराध मुसलमानांना मारवले, पोलीसांनी नि:पक्षपातीपणाचे सोंगसुद्धा आणले नाही. फार थोड्या दंगेखोरांना अटक झाली. साक्षीदारांना दमदाटी करून त्यांना फितवण्यात आले आणि साऱ्या हिंदू गुंडाची मुक्तता करण्यात आली. सुदैवाने, 'मानवाधिकार आयोगाने' लक्ष घातल्याने निदान, 'बेस्ट बेकरी' खटला व इतर दोनचार प्रकरणांची सुनावणी गुजरात राज्याबाहेर होण्याचे ठरते आहे. खोट्या इतिहासाची भुते उभी करून नरेंद्र मोदींनी गुजरात विधानसभेत प्रचंड बहुमत मिळविले, त्यामुळे मुसलमानांवर रुबाब दाखवण्याची त्यांची इच्छा काही पुरी होताना दिसत नाही. नरेंद्र मोदींनी उभी केलेली ही राक्षसी ताकद कोसळली ती शेतकऱ्यांच्या डोक्यावर.
- कोलीत शेतकऱ्याला जाळीत सुटले
विजेच्या दरात २५० ते ३०० टक्के वाढ करण्यात आली. त्याचे काही निरर्गल समर्थन एका 'चोपड्या'त मुख्यमंत्र्यांनी केले; आपले सरकार शेतकऱ्यांकरिता काय काय भल्या गोष्टी करते आहे याची जंत्री मांडली आणि विजेच्या अर्थकारणात सगळा दोष पूर्वीच्या काँग्रेस शासनाचा आहे असा कांगावा केला. आपल्याच सरकारने नर्मदेचे पाणी गुजरातभर आणून दिले अशी शेखी या चोपडीत मारली आहे. शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना आठवत असेल की 'बायपास टनेल' खणून मुख्य कालव्याने पाणी साबरमतीपर्यंत नेण्याचा प्रस्ताव खेडूत समाजाने मांडला होता; त्यासाठी कारसेवेचे आंदोलन केले होते; हिंदुस्थानभरातून हजारो शेतकरी त्यासाठी गोळा झाले होते. त्यावेळी नरेंद्र मोदींच्या सांगण्यावरूनच केशूभाई पटेलांनी शेतकऱ्यांवर पोलिसी दडपशाहीचा वरवंटा फिरवला होता आणि आज जणू ही योजना आपलीच होती अशी शेखी गोबेल्सच्या पद्धतीने नरेंद्र मोदी मिरवीत आहेत.
१४ ऑगस्ट २००३ रोजी बडोद्यात नियोजित केलेल्या शेतकरी मेळाव्याला हजर राहण्यासाठी गुजरातच्या सर्व जिल्ह्यातून लाखो शेतकरी गावागावातून निघाले. मुख्यमंत्र्यांनी सर्व पोलिस अधिकाऱ्यांना ताकीद दिली होती की ज्या अधिकाऱ्याच्या भागातून एकदेखील शेतकरी बडोदा येथे पोचेल त्याची नोंद घेतली जाईल. पोलीस अधिकारी म्हणजे 'आधीच मर्कट', त्यात अशी दारु पाजलेली. दंगलीत मुसलमानांविरुद्ध शस्त्र उचलताना प्रतिकार होण्याची मनात काहीतरी धास्ती होती. इथे तर फक्त 'धोतरे' खेडूत. पोलिसांनी शेतकऱ्यांच्या गाड्या जागोजागी अडवल्या आणि त्यांना अक्षरशः गुरासारखे बडवून काढले. मारण्याच्या श्रमाने एक पोलिस इन्स्पेक्टर छातीत कळ येऊन पडला आणि नंतर दुर्दैवाने इस्पितळात त्याचा देहांत झाला. हा इन्स्पेक्टर शेतकऱ्यांच्या दगडफेकीत मेला असा मुख्यमंत्र्यांनी सर्व माध्यमातून प्रचार केला आणि मग पोलिसांनी ज्या तहेने लाठीहल्ला केला त्याच्या दृश्यफिती उपलब्ध असूनही उघड्या डोळ्यांनी पाहणे सहृदयी माणसाला शक्य होत नाही.
मानवी हक्क आयोगाकडे यासंबंधी तक्रार करण्यात आली. 'बेस्ट बेकरी' प्रकरणात प्रसिद्धीचा आणि मोठेपणा मिळण्याचा मोका होता तसा येथे नसल्याने मानवी हक्क आयोगानेही दाद घेतली नसावी. या चित्रफितींचा उपयोग परदेशी वृत्तपत्रे व बीबीसीसारख्या वाहिन्या यांच्यामार्फत करण्याचा प्रयत्न चालू आहे.
उपोद्घात
गुजरात आंदोलनाहून मी आलो, आंदोलनाच्या अनुभवांची उजळणी मनात झाली ती संघटकच्या सगळ्या वाचकांना कळावी असे वाटले. सगळ्याचा सारांश असा - क्रांतीकाळातही क्रांतीकारी बेशिस्त करतात. ज्यांची सारी जीवनशैलीतच बेशिस्त झालेली असते अशी माणसे क्रांतीच्या चैतन्यकणाच्या अनुभवाने मरायला तयार होतात, मारायला नाहीत. पूर्वेतिहासातील भुते उकरून मंदिर, मंडल मार्गाने थातुरमातुर आक्रमकता तयार करता येते; पण, तिचा उपयोग बलशाली प्रतिस्पर्ध्यासमोर होत नाही, शेतकऱ्यांसारख्या अजापुत्रांवरच होतो. नरेंद्र मोदींनी सारी जमवाजमवी करून मुसलमान समाजाविरुद्ध केवळ सरावासाठी अत्याचार केले, हिंदुत्ववाद्यांच्या अत्याचारशक्तीचा खरा बळी भारतभरचा शेतकरीच ठरणार!
(२१ ऑगस्ट २००३)
◆◆