अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/ओंडका आणि मासा

णताही उद्योग अथवा संस्थेचे 'व्यवस्थापन’ पाहणाऱ्या अधिकाऱ्यांची नेहमी तक्रार असते की, त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य दिलं जात नाही. ‘वरून’ दबाव येतो, त्यामुळे योग्य निर्णयही बदलावा लागतो. कित्येकदा अंतर्गत ओढाताणीमुळे नाईलाजास्तव इच्छेविरुध्द निर्णय घेण्याची पाळी येते. खास करून राजकीय दबावामुळे अनेकदा योग्य निर्णय घेणं अशक्य बनतं. अशा वेळी ‘प्रेशरमुळे असे करावे लागले’ हे कारण पुढे करून आपल्या चुकीच्या निर्णयांचं समर्थन करण्याची प्रवृत्ती व्यवस्थापकीय अधिकाऱ्यांमध्ये वाढीला लागते.
 'पाहा, ही अशी समस्या आहे. त्याबाबत आपणं काय कराल?’ या प्रश्नाला ते चेहरा टाकून सांगतील, ‘काही करता येईल असं वाटत नाही. शेवटी आपलया हातात आहे तरी काय?’ या हतबल स्थितीचं वर्णन चपखल शब्दांत करताना एका व्यवस्थापकानं मला सांगितलं, “आमची अवस्था नदीच्या पाण्यावर तरंगणाऱ्या लाकडाच्या ओंडक्यासारखी आहे.काठावरून पाहणाऱ्याला वाटतं की, हा ओंडका पाण्याच्या ‘वर' असलयाने त्याची पाण्यावर सत्ता आहे. मात्र, प्रत्यक्षात तो पाणी नेईल तिकडे वाहत जात असतो."
 कित्येक व्यवस्थापक या स्थितीची शिकार बनलेले असतात.बाहेरच्या माणसांना वाटतं की, सर्व अधिकार त्यांच्या हातात आहेत. मात्र सत्य हे असतं की, त्यांचा अधिकार त्यांना वापरू द्यायचा की नाही, हे ठरवण्याचा अधिकार वेगळ्याच माणसांच्या हातात असतो. अर्थात,सर्वच असे नसतात. काही कर्तव्यदक्ष व्यवस्थापक नदीतील ओंडक्याचा नव्हे, तर माशाचा आदर्श पाळतात.
 नदीतलया माशावरही पाण्यांच्या प्रवाहाचा परिणाम होत असतोच. तरीही तो आपलया इप्सिताच्या दिशेने पोहत असतो. पाण्यातच राहून पाण्याशी झुंजण्याचं व स्वतःची दिशा ठरविण्याचं कौशलय त्याच्यापाशी असतं. अन्यथा, नदीबरोबर सर्वच मासे समुद्रात गेले असते आणि नदीत एकही मासा शिल्लक राहिला नसता.
 विशेषत: पुनरुत्पादनाच्या मोसमात अंडी घालण्यासाठी मासे नदीच्या प्रवाहाच्या विरुध्द दिशेने प्रवास करतात.कारण ‘अंडी घालण्याचा' मोसम माशांच्या जीवनात सर्वाधिक महत्वाचा व निर्णायक कालावधी असतो. मत्स्यजातीचे भवितव्य त्यांवर
अवलंबून असतं. अशा वेळी ते प्रवाहाच्या दिशेला जुमानत नाहीत. त्याचप्रमाणे ’खरा' व्यवस्थापक कंपनीचे भवितव्य व हित ज्यावेळी पणाला लागलेलं असतं, तेव्हा सर्व दबाव झुगारून अचूक निर्णय घेण्याचं सामर्थ्य दाखवतो.
 अमृतसर येथील सुवर्णमंदिर. लष्करी कारवाईनंतर काही महिन्यांनी मला तेथे जाण्याची संधी मिळाली. त्यावेळी अजूनही तेथे वातावरण तणावग्रस्त होतं. आमच्या यजमानांनी आम्हाला जालियनवाला बाग व सुवर्णमंदिर दाखवलं, ‘उद्या वाघा बॉर्डर बघावयास जाऊ’ असं ते म्हणाले. ‘सीमारेषेत पाहण्यासारखं काय खास असतं,’ असे मी विचारताच ते म्हणाले की, तेथे दररोज सायंकाळी सीमेच्या एका बाजूला भारतीय व एका बाजूला पाकिस्तानी ध्वज उतरताना सैन्य एकसारख्या पध्दतीने कवायत करतं. ती पाहण्यासारखी असते.
 यजमानांचा आग्रह मोडू नये म्हणून मी ती कवायत पाहावयास गेलो. त्यावेळी तेथे एक शिक्षिका आपल्या २० विद्यार्थ्यांना घेऊन ते दृश्य दाखविण्यास आली होती. ती विद्यार्थ्यांना सांगत होती “मुलांनो आता जेव्हा ध्वज उतरवला जाईल, त्यावेळी तुम्ही एका सुरात ‘सारे जहाँ से अच्छा, हिंदोस्ताँ हमारा' हे गाणे म्हणा."
 मला या प्रकाराविषयी उत्सुकता निर्माण झाली. मी त्या शिक्षिकेला विचारलं तेव्हा त्या म्हणाल्या, "मी दर महिन्याच्या पहिल्या तारखेला येथे मुलांना घेऊन ध्वजावतरण दाखवण्यास येते. या महिन्यात मात्र माझी बरीच अडचण झाली.” मी त्यांना विचारलं, “का बरं?” यावर त्या उत्तरल्या, ‘या महिन्यात पंजाबात शिक्षकांच्या बदल्या केल्या जातात. बदली होऊ नये असे वाटत असेल तर पैसे चारावे लागतात. ‘पे अँँण्ड स्टे' (पैसा मोजा; बदली टाळा) असं धोरण आहे. मला इथंच राहायचं होतं. त्यामुळे बराच पैसा ओतावा लागला. मी येथे ज्या मुलांना घेऊन येते. त्यातील तीन-चारांना तरी शाळेपासून इथपर्यंतचा प्रवास खर्च न झेपणारा असतो. त्यांचा खर्च मला करावा लागतो. पण या महिन्यात बदली टाळण्यासाठी पैसे द्यावे लागल्याने मुलांचा प्रवास खर्च भागवताना नाकी नऊ आले.”
 “इतका वाईट अनुभव येऊनही 'सारे जहाँ से अच्छा, हिंदोस्ताँ हमारा'हे गाणं मुलांकडून कशाला म्हणून घेता?” माझा नैसर्गिक प्रश्न.
 मग आपल्या देशात सुधारणा मुलांखेरीच कोण घडवून आणील ?" बाईंनी तडफदार प्रतिप्रश्न केला. त्या पुढे म्हणाल्या, "मला ते शक्य झालं नाही. पंतप्रधान, मुख्यमंत्री यांसारख्या अधिकारी व्यक्तींना देशाची प्रगती घडवून आणण्यास भाग पाडण्याइतका माझा प्रभाव नाही; पण माझा माझ्या विद्यार्थ्यांवर प्रभाव आहे. त्याचा उपयोग मी देशासाठी करणार आहे. विद्यार्थ्यांची माझ्यावर श्रध्दा आहे. म्हणून मी येथे त्यांना घेऊन येते. त्यांना राष्ट्रध्वजाचे दर्शन घडवते. त्यांच्याकडून देशभक्तीपर गीत म्हणून घेते. त्यांचा देशाभिमान जागृत करण्याचा प्रयत्न करते. ही मुले मोठी होतील, तेव्हा त्यांना देशाबद्दल गर्व वाटेल आणि त्यातील काही जण तरी देश सुधारण्याचा प्रयत्न करतील."
 बाईंंचं उत्तर ऐकून मी भारावून गेलो. मला वाटलं, ‘या शिक्षिकेला ‘व्यवस्थापन' म्हणजे काय ते नेमकं उमजलं आहे. तिला व्यवस्थापनशास्त्राच्या तीन मूलभूत तत्त्वांची जाण आहे. ही तत्त्वं कोणती? तर
 १) आपल्यावर असणाऱ्या जबाबदारीची अचूक जाण व ती पूर्ण करण्यासाठी स्वतःला वाहून घेणे.
 २) आपली शक्तिस्थाने वा साधनस्त्रोत नेमके ओळखण्याची कुवत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे खरा स्त्रोत आपण स्वतःच आहोत हे जाणणे.
 ३) आपल्या साधनस्त्रोतांचा कल्पकतेने आणि प्रयोगशील वृत्तीने वापर करणे. देश सुधारणं ही आपली जबाबदारी आहे,याची जाण या शिक्षिकेला आहे. विद्यार्थी तिचा साधनस्त्रोत आहे आणि या साधनस्रोतावर ती कल्पकतेनं प्रयोग करीत आहे.
 आपण सर्व जण ज्या 'पाण्यात' आहोत, त्याच पाण्यात ही शिक्षिकाही आहे. पाण्याचा दबाव तिच्यावरही आहे. तिलाही तिच्या तत्त्वाविरुध्द काही अनिवार्य तडजोडी कराव्या लागत आहेत, आणि तरीही तिची ध्येयपूर्तीकडे योजनाबध्द रीतीने अहर्निश वाटचाल सुरू आहे. व्यवस्थापन महर्षि पीटर ड्रकर म्हणतात, "नियोजनपूर्वक काम कराल तर ध्येयापर्यंत नाही तर निदान त्याच्या जवळपास नक्कीच पोहोचाल, पण योजनाबध्दता नसेल, तर ध्येयपूर्ती दृष्टिपथातही येणार नाही. परिणाम मात्र भोगावे लागतात."
 तात्पर्य, प्रवाहपतित ओंडक्याकडे (वरचंं) स्थान आहे, पण त्याच्यापाशी बळ नाही. याउलट मासा क्वचित पाण्याच्या पृष्ठभागावर दिसतो. पण पाणी कापत कापत स्वतःचा मार्ग आक्रमिण्याची शक्ती आणि संधी त्याच्याजवळ आहे.