अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/मालकाकडून वाटणारी भीती
हा कारखाना शहरापासून दूर होता.मालक त्याला वर्षानुवर्षे भेट देत नसत.एकदा काही कामानिमित्त मला कारखान्याच्या गेस्ट हाऊसमध्ये मुक्काम करावा लागला. आता मी मालकांचा सल्लागार म्हणून मला मालक ज्या खोलीत उतरत ती खास ‘पंचतारांकित`खोली देण्यात आली होती.‘वॉश'घेऊन प्रवासाचा शीण घालवावा, म्हणून मी खोलीच्या बाथरूममध्ये प्रवेश केला,आणि चक्रावूनच गेलो.बाथरूममध्ये एक-दोन नाही तर चांगले सात उत्तमोत्तम साबण माझ्या स्वागतांला सज्ज होते. त्यात लक्स इंटरनॅशनलपासून सिंथॉलपर्यंत सर्व प्रकार होते. मी कायम आंघोळच करीत राहावं असं या लोकांना वाटतं की काय, अशी शंका माझ्या मनाला चाटून गेली. नंतर मी गेस्ट हाऊसच्या व्यवस्थापकाला विचारलं, "का हो, बाथरूममध्ये इतके साबण कशासाठी ठेवलेत?"
तो म्हणाला, “काय सांगू साहेब, मालक येथे येतात,तेव्हा याच खोलीत उतरतात, पण त्यांच्या आवडीचा साबण कोणता, ते मला ठाऊक नाही. त्यामुळे उगाच भानगड नको, म्हणून मी..."
“अरे, पण तुम्ही मालकांना विचारायचं त्यांच्या आवडीच्या साबणाबाबत."
“छे, छे तसं कसं साहेब,ते मालक, आम्ही नोकर! मालकांना काही विचारायची पध्दत असती का साहेब?” तो अजिजीने म्हणाला: मी
स्वतःशीच हसलो, त्याची जास्तच फिरकी घेण्यासाठी मी विचारलं, “मागच्या वेळी
मालक आले होते, तेव्हा त्यांनी कोणता साबण वापरला होता ते तुम्हाला माहिती
असेलच!’ नाही, तो म्हणाला, “त्यावेळी त्यांनी त्यांचा साबण स्वतःबरोबर आणला
होता. जाताना घेऊन गेले. त्यामुळे काही कळू शकले नाही.” ‘धन्य आहे तुझी' मी
मनात म्हटलं.
मालकाबद्दल वाटणारी ही खरी किंवा काल्पनिक भीती हे आपल्या व्यवस्थापकीय
संस्कृतीचे खास वैशिष्ट्य आहे आणि हीच सुयोग्य व्यवस्थापनामधली सर्वात मोठी
अडचण असते. या भीतीपोटी सोप्या गोष्टी विनाकारण अवघड होतात. वर सांगितलेल्या
प्रसंगाचेच पाहा, केवळ मालकाबरोबर सुसंवाद नसल्याने गेस्ट हाऊसच्या व्यवस्थापकाने
एकाऐवजी सात साबण आणून कारखान्याचा पैसा निरुपयोगी व अनुत्पादक कामांसाठी
खर्च केला. अशा साध्या साध्या गोष्टीत इतकी अनागोंदी व पैशाचा इतका अपव्यय होत
असेल, तर कारखान्याची मोठमोठी कामे करताना काय होत असेल याची कल्पना
केलेली बरी.
या भीतीमुळे उद्योगांचेच नव्हे तर कोणत्याही कामाचं कसं वाटोळे होते व ते
टाळण्यासाठी काय उपाय आहेत, ते आपण या लेखात पुढे पाहणारच आहोत. पण
त्या अगोदर आणखी एक मजेदार किस्सा सांगतो.
बऱ्याच वर्षांपूवीं मी केरळला गेलो होतो. त्यावेळी सहज मित्रांबरोबर खाण्यापिण्याविषयी
गप्पा मारताना एकाने जी.डी. बिर्ला यांच्याबाबत घडलेली गोष्ट सांगितली. केरळमधील
‘ग्वालियर रेयॉन फॅक्टरी'ला भेट देण्यासाठी ते तेथे आले होते. त्यांना सकाळच्या
नाश्त्यासाठी जिलबी लागत असे, पण केरळमध्ये जिलबी त्यावेळी मिळत नसे. म्हणून
बिर्ला यांच्याकरीता मुंबईहून खास विमानाने जिलबी मागवण्यात आली.
आता एवढ्या अपसव्यानंतर बिलनी नाश्ता कितीसा केला? तर दोन जिलब्या,
एक समोसा व एक कप चहा, बस्स.
हे ऐकल्यावर मी विचारलं, “पण जिलबी एवढ्या विमानाने मागवायची काय गरज
होती? केरळमध्ये किती सुंदर व चविष्ट खाद्यपदार्थ मिळतात. इडली, सांबर, डोसा,
वडा, अप्पम... या पैकी काही तरी घेऊन पाहा, असं तुम्ही बिर्लांना का नाही सांगितलं.
नवा पदार्थ चाखून ते कदाचित खूश झाले असते.”
"हॅ, भलतंच काय, मालकांना कसं सांगायचं?’ मित्र म्हणाला.
म्हणजे 'मालकांना विचारायचं कसं’ आणि 'मालकांना सांगायचं कसं?' हे
व्यवस्थापकापासून ते अगदी निम्न पातळीवरील कर्मचाऱ्याला पडणारे यक्षप्रश्न आहेत.
मात्र, हे केवळ प्रश्न नाहीत तर ती एक संस्कृती आहे. एक मानसिकता आहे आणि ती आजची नसून तिला हजारो वर्षांचा इतिहास आहे.
सुमारे १० हजार वर्षांपूर्वी मानव शेती करू लागला. त्यामुळे भटकंती संपून
त्याच्या जीवनात स्थिरता आली. ही स्थिरता आपल्या पुढच्या पिढ्यांनाही मिळावी या
विचारातून मालकी हक्काच्या संकल्पनेची जाणीव निर्माण झाली. आपण कसतो ती
जमीन, पाळतो ती गुरेढोरे यांच्यावर आपला अधिकार आहे. या जाणिवेतून 'मालमत्ते'चा
जन्म झाला. मालमत्ता जितकी जास्त तितकी स्थिरता अधिक हे सूत्र उमगल्यानंतर
अधिकाधिक मालमत्ता संग्रहित करण्याचा प्रयत्नं त्याने सुरू केला.
या प्रयत्नात जे यशस्वी झाले; त्यांना ‘मालक'किंवा राजा' म्हणून ओळखण्यात
येऊ लागले. मालक व त्याचं संपूर्ण कुटुंब मालमत्तेची देखभाल करीत असे. पुढे या
मालकांची मालमत्ता इतकी वाढली की, तिची राखण व उपयोग व्यवस्थितपणे करणं
एका कुटुंबाला शक्य होईना. त्यामुळे तिचा कारभार पाहण्यासाठी पगार किंवा मोबदला
देऊनं कुटुंबाबाहेरील व्यक्तींना नेमण्यात येऊ लागले. त्यांना ‘नोकर’ किंवा ‘दास'असं
संबोधण्यात येऊ लागले.
कालांतराने काही मालक कुटुंबाकडे नोकरांची संख्या इतकी वाढली की, त्यांच्यावर
नियंत्रण ठेवणे त्यांना अशक्य झाले. त्यावेळी या नोकरांपैकीच काही जणांना वरचा दर्जा
देण्यात येऊन अन्य नोकरांकडून काम करून घेण्याचा अधिकार देण्यात आला.
याचवेळी 'व्यावसायिक व्यवस्थापन' ही संकल्पना अस्तित्वात आली.
मालक व नोकर यांच्यामधलं स्थान असणाऱ्या या नव्या कर्मचारी वर्षाला उत्तर
भारतात ‘मुन्शी' असं नामाभिधान प्राप्त झाले. महाराष्ट्रात यांनाच ‘कारभारी' अशी संज्ञा
होती. नोकरांकडून काम करून घेऊन मालकाचा फायदा करून देण्याची जबाबदारी या
वर्गाची असे. यापुढील काळात शेती व पशुपालनाच्या तंत्रज्ञानात प्रगती होत गेली. या
तंत्रज्ञानाची माहिती मालकांना असेच असे नसे. त्यामुळे कारभारी वर्गावर मालक
अधिकाधिक अवलंबून राहू लागले. कारभारी मालक व नोकर यांच्यातील दुवा बनले.
नोकरांना मालकांशी संपर्क करायचा असेल, तर या कारभाऱ्यांमार्फत करावा लागे.
मालकांनां वेळप्रसंगी सल्ला देण्याचे कामही या कारभाऱ्यांना करावं लागे.
अशा तऱ्हेने जुन्या काळातील शेती व पशुपालन हे उद्योग सांभाळण्यासाठी
लागणाऱ्या मनुष्यबळाची मालक, कारभारी व नोकर अशी तीन स्तरीय पध्दती
अस्तित्वात आली. या पध्दतीत या तिघांनाही विवक्षित भूमिका होती.
कालांतराने या पध्दतीत अनेक अपप्रवृत्ती शिरल्या. नोकरांचे शोषण करून जास्तीत
जास्त फायदा मिळवण्याकडे मालकांचं लक्ष राहू लागलं. मालक स्वत:ला परमेश्वराचा
अवतार व नोकरांना तुच्छ समजू लागले. प्रचंड संपत्ती व सत्ता हाती आल्याने अनेक
मालक भोगविलासात मग्न राहू लागले. मदिरा, मदिराक्षी, जुगार आदी व्यसनांकरीता धन मिळवणं, नोकरांची क्रूरपणे पिळवणूक करणंं हे त्यांचंं ध्येय बनले. या ‘ध्येयपूर्तींत'
त्यांना कारभाऱ्यांचं मोलाचं सहाय्य लाभू लागलं.
बहुतेक कारभाऱ्यांनीही या परिस्थितीचा फायदा व्यवस्थित उठवला. एकीकडे
मालकांची चमचेगिरी करून त्यांच्याकडून फायदा करून घेणे तर दुसरीकडे मालकाचा
धाक दाखवून नोकरांना पिळणंं असा त्यांचा दुहेरी खाक्या होता.`मालक म्हणजे देव!
तुम्ही त्यांना काही विचारता कामा नये. त्यांना काही सांगता कामा नये. आम्ही कारभारी
मालकांचे प्रतिनिधी आहोत. आमची आज्ञा म्हणजे मालकांचीच आज्ञा. तिचं तुम्ही
मुकाट पालन केलं पाहिजे' असं नोकरांच्या मनावर बिंबविण्यात येऊ लागलं. आज्ञापालन
न करणाऱ्या `चुकार` नोकरांना क्रूर शिक्षा देण्यात येऊ लागल्या. (थोडक्यात, ‘मालिकके
जूते मेरे सर पर, आणि मेरे जूते नौकरों के सर पर’ अशी कारभाऱ्यांची कार्यपध्दती
असे.) या शिक्षेला घाबरून म्हणा किंवा पैशाच्या गरजेपोटी म्हणा, नोकरांनी कारभाऱ्यांची
सत्ता निमूटपणे स्वीकारलीः मालकांबाबत त्यांच्या मनात एक प्रकारची भीती निर्माण
झाली. महाभारतात म्हटलेच आहे, ‘अर्थस्य पुरुषो दासः` म्हणजे पुरुष संपत्तीचा दास
असतो. पैशासाठी तो अपमानही गिळतो. हजारो वर्षे ही पध्दती वंशपरंपरागत व
अव्याहतपणे सुरू होती, याचा दुष्परिणामही जो व्हायचा तों झालाच. ज्याने उद्योगाचा
विकास करावयाचा तो मालकच चैनीत दंग असल्याने प्रगती खुंटली. आपला देश
परकीय आक्रमणाला बळी पडण्यासही जमीनदार, राजे, वतनदार म्हणजे `मालक'
यांची ही सरंजामी वृत्ती व कारभाऱ्यांचा स्वार्थ कारणीभूत आहे.
‘मालकांना विचारायचं कसं’ आणि `मालकांना सांगायचं कसं?’ या संस्कृतीचा
जन्म हा असा झाला.
सुमारे २०० वर्षांपूर्वी युरोपात औद्योगिक क्रांती झाली. त्यानंतर ती पुढील १००
वर्षात जगभर पसरली. केवळ शेती, पशुपालन व छोटे उद्योग यावर अवलंबून
राहणाऱ्या जनतेला रोजगाराच्या नव्या संधी या औद्योगिक क्रांतीमुळे उपलब्ध झाल्या.
संपत्ती निर्माण करण्याचे नवे स्रोत निर्माण झाले. यंत्रांच्या साह्याने तयार झालेल्या
विविध वस्तूंचंं उत्पादन प्रचंड प्रमाणात वाढलं. नवी बाजारपेठ आधारित अर्थव्यवस्था
निर्माण झाली. एकंदरीतच जगाचं आर्थिक जीवनमान उंचावलं.
पूर्वीच्या काळी फक्त शेतीचे किंवा गुराढोरांचे मालक असत. औद्योगिक क्रांतीनंतरच्या
नव्या जगात विविध व्यवसाय, कारखाने व कंपन्यांचा नवा मालकवर्ग तयार झाला.
या नव्या काळातही उद्योगधंदे सांभाळण्यासाठी मालक, कारभारी व नोकर ही तीन
पदरी मनुष्यबळ व्यवस्था पूर्वीप्रमाणेच कायम राहिली. इतकेच नव्हे तर या तिन्ही
गटांची मानसिकता, कार्यपध्दती व परस्परांशी संबंधही कमी अधिक प्रमाणात तसेच
राहिले. फरक एवढाच झाला मालकाचा उद्योगपती झाला आणि नोकर या शब्दाऐवजी ‘कर्मचारी' हा सभ्य शब्द रूढ झाला.
पूर्वीच्या मालकांची जागा घेतलेल्या आजच्या 'उद्योगपती`पैकी कित्येकांची वर्तणूक
पूर्वीच्या मालकांसारखीच आहे. ते उच्चशिक्षित आहेत, पण वृती सरंजामीच आहे.
मालकाला अप्रिय पण उद्योगाच्या दृष्टीने हितकारक निर्णय घेणारे कर्मचारी, व्यवस्थापक
त्यांना नकोसे वाटतात. याउलट स्वतःसमोर लाळघोटेपणा करणारे व आपली री
ओढणारे 'कारभारी’ त्यांना हवे असतात. त्यांची कर्मचाच्यांशी वागणूकही सौहार्दपूर्ण
नसते. कर्मचारी म्हणजे आज्ञापालन करणारं यंत्र अशा भावनेनं पाहिलं जातं. नव्या
तंत्रज्ञानाचा स्वीकार करावा, व्यवसाय वर्धिष्णू करावा अशी आच त्यांना नसते. ते
उद्योगाच्या व्यवस्थापनात लक्ष घालतात, पण ते स्वतःच्या फायद्यासाठीच! धंद्याच्या
विकासासाठी नव्हे. प्रामाणिक कर्मचारी वर्गही त्यांना भिऊन भिऊनच असतो. नव्या
युगातील कर्मचारी किंवा नोकरही पारंपरिक मानसिकतेचे बळी आहेत. भारतात आजही
कुटुंबाच्या मालकीचे (फॅमिली ओन्ड) उद्योगच जास्त आहेत. त्यातील अधिकारपदं
सक्षम व्यक्तीच्या हातात असण्यापेक्षा त्या कुटुंबातील व्यक्तीच्या हातात (अकार्यक्षम
असूनही केवळ मालक म्हणून) आहेत. म्हणून मी सुरुवातीला सांगितलेले प्रसंग
आजच्या काळातही घडत असतात.
या परंपरेचे फार मोठे दुष्परिणाम उद्योगक्षेत्राला भोगावे लागत आहेत. मालकांची
सरंजामी वृत्ती, कारभाऱ्यांचा स्वार्थ व नोकरांचं भय यामुळे उत्पादकता घटत आहे.
निर्णय घेणारा व तो अंमलात आणणारा यांच्यातील संपर्काच्या अभावामुळे अनुत्पादक
खर्च वाढतो. उद्योगाचे भांडवल घटत जाते. चैनीच्या मागे लागून विजिगिषु व संशोधक
वृत्ती संपल्याने नवं तंत्रज्ञान निर्माण होत नाही. त्यामुळे जगाच्या बाजारात आपल्या
मालाची पत घसरते. अखेरीस परदेशी कंपन्या त्यांना ‘टेक ओव्हर' करतात.
आता यावरील उपाय मुख्यत: मालकांच्या हातात आहे. त्यांनी केवळ स्वतःच्या
फायद्यासाठी नव्हे तर व्यवसायाच्या विकासासाठी व्यवस्थापनात दखल घेतली, तर
बऱ्याच समस्या सुटू शकतात. यामुळे कंपनीसाठी खऱ्या अर्थाने राबणाच्या कर्मचाऱ्यांशी
त्यांचा संपर्क येऊ शकेल. कर्मचाऱ्यांच्या मनात असणारी मालकांबद्दलची भीती चेपेल.
त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वृध्दिंगत होईल. नव्या संकल्पना, युक्त्या, तंत्रे यांची
देवाणघेवाण होईल. वस्तुस्थितीची जाणीव होईल व त्यातून प्रगतीचे मार्ग प्रकाशमान
होतील. कारभाऱ्यांची भूमिका मर्यादित होईल. याखेरीज महत्त्वाच्या पदांवर माणसं
नेमताना नातेवाईकबाजीला फाटा दिला तर मार्ग आणखी सुकर बनेल.