अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/नोकरदारांची निवड
यापैकी 'पैसा’ या थोरल्या भावाचं वर्णन ‘अर्थमनर्थम्’ या फक्त एका संस्कृत म्हणीमध्ये सुरेखरीत्या करण्यात आलं आहे. तिचा सरळ, सोपा अर्थ असा की, 'पैसा अनर्थकारी आहे'. तो नसला तरी अनर्थ, असला तरी अनर्थ. ज्याच्यापाशी नाही किंवा अपुरा आहे, त्याला आपली ‘उद्या’ कशी निभणार, याची चिंता, तर गडगंज आहे, त्याला तो राखायचा कसा आणि आपल्यानंतर त्याचं काय होणार याची चिंता!
पैशाचा तितकाच अनर्थकारी धाकटा भाऊ म्हणजे वारसाहक्क. तो पैशाच्या पाठोपाठच जन्मला. या दोघांनी अनेक राज्यं धुळीला मिळवली. घराणी नष्ट केली.उद्योगधंद्यांची वाट लावली. सुखी संसार दु:खीकष्टी केले.
भारतीय उद्योगविश्व व व्यवस्थापन क्षेत्राला या दुकलीने, विशेषतः वारसा हक्काच्या समस्येने बरेच ग्रासलं आहे. त्याचा काय परिणाम झाला आहे व त्यावर उपाय कोणता, याचा विचार या लेखात आपण करणारच आहोत. तथापि, त्यापूर्वी या भावंडांच्या इतिहासाकडे थोडी नजर टाकू या. एक उदाहरण फारच बोलकं आहे.
सुमारे ८०० वर्षांपूर्वी तुर्कस्तान देशात सुप्रसिध्द ओटोमान साम्राज्य उदयास आलं. ओटोमान राजघराण्यातील सर्वात कर्तृत्ववान समजला जाणारा 'महमूद-दुसरा' हा १४५१ मध्ये गादीवर आला, पण गादीवर अधिकार सांगणारे त्याचे इतरही अनेक भाऊबंद होते. त्यांनी त्याच्याविरुध्द बंड करून त्याला अत्यंत त्रास दिला. त्याला वैतागून त्याने शेवटी कायदा केला की, जो सुलतान गादीवर येईल त्याने आपल्या सर्व पुरुष भाऊबंदांना खुशाल ठार करावं. त्याच्यानंतर सत्तेवर आलेला त्याचा पुत्र महमूद तिसरा याने हा कायदा तंतोतंत अंमलात आणून गादीवर येताच आपल्या १९ भावांना सुळावर चढवलं. ईतकेच नव्हे, तर आपल्या वडिलाच्या सात गर्भवती रखेल्यांचे तुकडे करू समुद्रात फेकून दिले. या भावनेनी की न जाणे, त्यांच्यापैकी एखादीला मुलगा
व्हायचा आणि तो उद्या आपल्या साम्राज्यात हिस्सा मागायचा!
यानंतर सुमारे पावणे-दोनशे वर्षांनी आपल्याकडे औरंगजेबानेही याच घटनेचा ‘अॅक्शन रिप्ले’ करून दाखवला होता.
या उदाहरणावरून आपल्या लक्षात येईल की, संपत्ती आणि तिची वाटणी यामुळे ओढवणारा अनर्थ कोणती सीमा गाठू शकतो.
या समस्येवर काही उपाय शोधण्याचाही प्रयत्न झाला होता. सर्वात मोठ्या मुलाने कुटुंबाचा ‘कर्ता’ व्हायचं आणि बाकीच्या भावांनी त्याच्या नेतृत्वाखाली काम करायचं ही पध्दत त्यातूनच रूढ झाली, पण कर्त्याच्या अधिकाराला आव्हान देणारे धाकटे भाऊही असायचे. अखेरीस भांडणाला वैतागून कुटुंबाच्या मालमत्तेची वाटणी करणं व सर्व भावांनी आपापल्या हिश्श्याचे मालक बनणं, हा सर्वमान्य उपाय शोधण्यात आला. यामुळे घराण्यातील भांडणं व त्यातून वेळप्रसंगी होणारा हिंसाचार याला आळा बसत असे, पण घराण्याची प्रतिष्ठा, समाजात असणारे वजन, घराण्याची थोरवी आणि आर्थिक ताकद कमजोर होत असे.
इतिहासकाळी एखादं साम्राज्य किंवा घराणं यांचा विस्तार जसजसा वाढत असे, तशी त्याचा कारभार पाहण्यासाठी राजघराणं किंवा कुटुंबातील माणसे कमी पडत. मग घराण्याच्या बाहेरच्या व्यक्तींना मोबदला देऊन घराण्याची मालमत्ता, उद्योग, व्यवसाय व संपत्ती यांच्या देखभालीसाठी नेमलं जाऊ लागलं. यातूनच नोकरशाही, ज्याचं गोंडस नाव प्रशासन आहे, तिचा जन्म झाला. या बाहेरच्या व्यक्तींना म्हणजेच नोकरदारांना त्यांच्या मगदुराप्रमाणे व पात्रतेनुसार निरनिराळी कामे सोपविली जात. त्यांना ती राजा किंवा मालक यांनी घालून दिलेल्या नियमांप्रमाणे पार पाडावी लागत.
नोकरदारांची निवड:
एखादा उद्योग, व्यवसाय, संस्था किंवा शासन यांचा कारभार पाहण्यासाठी लागणाऱ्या नोकरदारांची निवड पूर्वीच्या काळापासून आजपर्यंत मुख्यत्वे दोन कसोट्यांवर केली जाते. पहिली कसोटी म्हणजे पात्रता तर दुसरी इमान. राज्यकारभारांचे विविध विभाग सांभाळण्यासाठी योग्य व तज्ज्ञ कर्मचाऱ्यांची निवड स्पर्धात्मक चाचणी परीक्षेद्वारा घेण्याची पध्दत प्राचीन चीनमध्ये अस्तित्वात होती. तिचं अनुकरण नंतर अनेक राज्यांनी केलं.
ओटोमान साम्राज्यात यासाठी वेगळीच पध्दत उपयोगात आणली जात असे. तिचं नाव ‘कापी कुल्लारी’ असं होतं. त्यानुसार खिश्चन पण नंतर इस्लाम धर्म स्वीकारलेल्या व्यक्तींची निवड निरनिराळे प्रशासकीय विभाग सांभाळण्यासाठी करण्यात येत असे. या व्यक्तींना मोठे अधिकार जरी देण्यात येत असले तरी सुलतानाचे ते गुलामच असत. त्यांना त्यांच्या कामाचं प्रशिक्षण शासनाकडून दिले जाई. ते गुलाम असले तरी त्यांना समाजात मान होता. मात्र, सुलतानांची चाकरी सोडून अन्य कुणाचंही काम करण्याचा त्यांना अधिकार नव्हता. त्यांना अधिकृतपणे लग्न करण्याची किंवा खाजगी मालमत्ता वाढविण्याची परवानगी नसे. त्यांचं वेतन, पदोन्नती, पदावनती सारं काही सुलतानाच्या हातात असे. समाधानकारक काम न केल्यास किंवा विश्वासघात केल्यास त्यांना ठार करण्याचा अधिकारही सुलतानास होता. पाळलेला कुत्रा जसा त्याच्या सर्व गरजांसाठी मालकावर अवलंबून असतो व त्या मोबदल्यात तो प्राणपणाने मालकाचे संरक्षण करतो तशी त्यांची अवस्था असे. अशा स्थितीत त्यांच्यासमोर दोन पर्याय असत. एक जिवंंत असेपर्यंत सुलतानाची चाकरी करणं. किंवा मृत्यूला सामोरं जाणं. बहुतेक जण पहिल्या पर्यायाची निवड करत.
ही पध्दत आधुनिक काळाच्या दृष्टीने अमानुष असली, तरी त्यामुळे ओटोमान राजघराण्याचे दोन फायदे झाले. एक, त्याला एकनिष्ठ, प्रामाणिक व पूर्णतः समर्पित अशा नोकरदारांचा कधीही तुटवडा पडला नाही आणि या नोकरदारांना लग्न करण्याचा व संपत्ती जमा करण्याचा अधिकार नसल्याने त्यांच्या पुढच्या पिढीकडून सुलतानशाहीला आव्हान दिलं जाण्याची शक्यता मुळापासूनच नाहीशी झाली.
पुराणकाळ व इतिहासकाळाच्या या खुणा अंगावर बाळगूनच मानसाने एकविसाच्या शतकात प्रवेश केला आहे.पूर्वीच्या सलतानांची व जमीनदारांची जागा आता अनुक्रमे राजकारणी व उद्योगपतींनी घेतली आहे. भारतापुरतं बोलायचं तर राजकारण व उद्योगक्षेत्र या दोन्ही संस्थांमध्ये घराणेशाहीचा बोलबाला आहे. सत्तेची पदंं (मग ती राजकारणातील असोत किंवा उद्योगातील) आपल्या पुत्रपौत्रांच्या, किमानपक्षाी आपल्या घराण्यातील लोकांच्याच हातात रहावीत यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची सवय सुटलेली नाही. पैसा व वारसाहक्क या सुंद व उपसुंंदांंनी कालमानानुसार आपला पोषाख बदलला, भाषा बदलली पण वृत्ती तशीच आहे. सुलतानशाहीमध्ये सरळ खूनबाजी करून सत्ता बळकावण्याची व सत्ता टिकविण्यासाठी गुलामांंना वेठीस धरण्याची पध्दत होती. सध्याच्या सुलतानांंचे वारसदार शिकले सवरलेले असतात. त्यांना ही रानटी रीत आवडत नाही. त्याऐवजी एकमेकांविरुध्द कोर्टबाजी, कज्जे खटले, प्रसार माध्यमांना हाताशी धरून एकमेकांची निंदानालस्ती, कुलंगडी बाहेर काढणं अशा ‘कोल्ड वॉर’ पध्दतीने उद्देश साध्य करण्याचा प्रयत्न केला जातो.
नोकर भरतीबाबतही ऐतिहासिक मनोवृत्ती कायम आहे.गुलामीची पध्दती नाहीशी झाली, तरी आपल्या कार्यकर्त्यांना वा कर्मचाऱ्यांना मानसिकदृष्ट्या गुलाम करण्याची किंवा त्यांच्या आर्थिक अडचणींचा फायदा उठवून त्यांना कायमचे आपल्याशी बांंधून ठेवण्याची वृत्ती राजकारणी व उद्योगपती या दोघांचीही असते. आपले कार्यकर्ते आपल्यावरच अवलंबून राहतील अशी व्यवस्था नेते मंडळी करतात. त्यासाठी वेगवेगळ्या ‘सहकारी’ संस्था किंवा कारखाने काढून जनतेचा पैसा आपल्या कार्यकर्त्यांच्या हातात पडेल, अशी व्यवस्था केली जाते. कालांतराने अशा संस्था तोट्यात गेल्या तरी अनुदानं, कमी व्याजदराने कर्जपुरवठा इत्यादी मार्गांनी त्या जगवल्या जातात. संस्थेची प्रगती होणं किंवा औद्योगिक विकास हा नेत्याचा उद्देश नसतोच. तर अशा संस्थांच्या माध्यमातून कार्यकर्ता आपल्यावर अवलंबून राहावा, स्वत:च्याही पैशाची सोय व्हावी व त्यांचा उपयोग सत्तेचं सिंहासन चढण्यासाठी सोपान म्हणून व्हावा ही त्याची मनोमन इच्छा असते.
घराण्यांनी चालवलेल्या उद्योगांचीही तीच अवस्था आहे.कर्मचारी निवडताना अनेकदा त्याची क्षमता पाहण्याऐवजी तो मालकाशी किती एकनिष्ठ आहे, याची कसोटी लावली जाते. आपल्या ‘जातीच्या’ कर्मचाऱ्यांना प्राधान्य दिलं जातं. नेमून दिलेल्या कामाखेरीज तो दुसरं काही शिकू शकणार नाही अशी व्यवस्था केली जाते. पर्यायाने, त्याला संपूर्णपणे मालकावर अवलंबून राहावं लागतं. इथलं काम गमवावं लागलं तर दुसरं कोणतंच काम आपण करू शकणार नाही याची जाणीव त्या कर्मचाऱ्यालाही असल्याने तो मालकासाठी गुलामासारखाच राबत राहतो. पिंजऱ्यात ठेवलेल्या पक्ष्याला जगवलं जातं, पण उडू दिलं जात नाही. तशीच या कर्मचाऱ्यांची अवस्था होते. यात मालकाचा काही काळ फायदा होतो, पण कर्मचाऱ्याचं कायमचं नुकसान होतं.
असे कर्मचारी प्रामाणिक असतात, पण काळाबरोबर बदलण्याची त्यांची क्षमता नसते. नवे तंत्रज्ञान त्यांना आत्मसात करता येत नाहीत. त्यामुळे उद्योग स्पर्धेत टिकू शकत नाही. अशी वेळ आली की, मालक नव्या उच्चशिक्षित तंत्रज्ञांची नेमणूक करतात. मग हे जुने नोकर व नवे आधुनिक ज्ञान असणारे कर्मचारी यांच्यात अधिकारांसाठी रस्सीखेच सुरू होते. संस्थेची कार्यशक्ती उत्पादनापेक्षा या अंतर्गत स्पर्धेपोटी वाया जाते.