अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/व्यवस्थापकीय भ्रष्टाचार : एक चिंतन
१) भ्रष्टाचाराचा गाजावाजा होऊ नये, यासाठी आटोकाट प्रयत्न करणं.
२) आपल्या भ्रष्टाचारात अन्य व्यक्तींनाही समाविष्ट करून घेणं.
३) लोकांच्या नजरेत भरेल अशा पध्दतीनं खर्च न करणं.
एखाद्या व्यवहारात भ्रष्टाचार झाला की, त्यासंबंधी आरडाओरड सुरू होतेच. काही वेळा भ्रष्टाचारातून मिळणाऱ्या फायद्यापेक्षा त्याबद्दलची चर्चाच अधिक होते. तर काही वेळा भ्रष्टाचाराच्या मोठ्या 'डील' संबंधीही इतकी बोलवार होत नाही. चलाख व्यवस्थापक भ्रष्टाचारातून होणारा फायदा अधिक असावा, पण त्यासंबंधी होणारी आरडाओरड कमीत कमी राहावी यासाठी प्रयत्न करताना दिसतात. हे ज्याला यशस्वीरीत्या करता येतं, तो भ्रष्टाचार करूनही नामानिराळा राहू शकतो.
भ्रष्टाचारातून मिळणारे फायदे पुढील प्रकारचे असतात.
१. थेट आर्थिक लाभ
२. अप्रत्यक्ष आर्थिक लाभ
३. सग्यासोयऱ्यांना नोकरी
४. 'सेक्स'च्या दृष्टीनं फायदा.
यापैकी 'सेक्स'बद्दल सर्वाधिक चर्चा होते. संस्थेतील एखाद्या महिलेला पुरुष वरिष्ठानं पदोन्नती दिली की, ती कशी मिळाली असेल हा विषय चवीचवीनं चघळला जातो. त्यात असूया आणि मत्सर अधिक प्रमाणात असतो. कंपनीचे कंत्राटदार, पुरवठादार, जाहिरात संस्था यांच्यामार्फत आपली 'ती' सोय करून घेणं, व्यवस्थापकाच्या दृष्टीनं कमी धोक्याचं असतं. तरीही लैंगिक भ्रष्टाचार हा सर्वाधिक चर्चेचा विषय राहतोच. याचा व्यवस्थापकाच्या नैतिक प्रतिमेवरही सर्वाधिक परिणाम होतो.
थेट पैशाचा भ्रष्टाचार (उदाहरणार्थ, खरेदी करताना पर्सेंटेज मागणं) केल्याने बऱ्याच वेळा पक्षपात होण्याची शक्यता असते. मोठे पुरवठादार अधिक पैसा चारून आपला माल खरेदी करावयास लावू शकतात. छोटे पुरवठादार इतका पैसा पुरवू शकत नाहीत. त्यामुळं त्यांचा माल खरेदी केला जात नाही, मग ते आरडाओरड करतात. परिणामी 'गुप्तता' धोक्यात येते. हे टाळण्यासाठी हुशार व्यवस्थापक साधारण २० टक्के माल मोठ्या पुरवठादाराकडून 'पर्सेंटेज' घेऊन, तर ८० टक्के माल छोट्या पुरवठादारांकडून प्रामाणिकपणाने खरेदी करतात. (याला ‘पॅॅरेटोचा नियम' असं नामाभिधान आहे.) त्यामुळं पैसा आणि प्रामाणिकतेबद्दल प्रसिध्दी हे दोन्ही उद्देश साध्य होऊ शकतात.
थेट आर्थिक भ्रष्टाचारापेक्षा अप्रत्यक्ष भ्रष्टाचाराची चर्चा कमी होते. प्रमोटर्सच्या कोट्यातून शेअर्स मिळविणे, चेक पेमेंट केल्याचं दाखवून स्थावर मालमत्ता मिळवणं, सभा, चर्चासत्र इत्यादींसाठी निमंत्रणं मिळवणं आणि खर्च आयोजक संस्थेवर टाकणं इत्यादी मार्गानी हा भ्रष्टाचार केला जातो.
खानेखिलानेवाला :
भ्रष्टाचाराच्या चर्चेची सुरुवात संस्थेपासूनच - विशेषत: कनिष्ठ व सहयोगी कर्मचाऱ्यांपासून होते. यातही नैतिकतेच्या काळजीपेक्षा मत्सराचा भाग अधिकार असतो. हे टाळण्यासाठी व्यवस्थापक आपल्या भ्रष्टाचारात इतरांनाही सामावून घेतात. 'एकमेकां साहाय्य करू, अवघे धरू सुपंथ' या उक्तीचा वापर केला जातो. अशा व्यवस्थापकाची प्रतिमा 'खाने - खिलानेवाला' अशी होते. त्यामुळे चर्चेला वाव कमी मिळतो
भ्रष्टाचाराचा सर्वात मोठा शत्रू नैतिकता नसून मत्सर आहे. आवाज उठविणाऱ्यांची तक्रार मुख्यतः भ्रष्टाचाराबद्दल नसून आपल्याला तो करावयाला मिळत नाही किंवा त्यात वाटा मिळत नाही, याबद्दल असते. त्यामुळे भ्रष्टाचारातून मिळणारी प्राप्ती इतरांच्या, निदान जवळच्या लोकांच्या नजरेस पडू नये म्हणन काळजी घेतली जाते. भ्रष्टाचाऱ्यांना यासंबंधी आपल्या बायकोवर अधिक लक्ष द्यावं लागतं. कारण मिरविण्याची हौस बायकांना अधिक असते असं आढळून आले आहे. भ्रष्टाचाराच्या मार्गानं मिळविलेली संपत्ती दिसून येऊ नये म्हणून व्यवस्थापक पुढील काळजी घेत असल्याचं दिसून आलं आहे.
१. कोणत्याही जाहीर समारंभात आपल्या पत्नीचे कपडे व दागिने इतर उपस्थित बायकांप्रमाणेच असतील, याची काळजी घेतली जाते.
२. आपला बॉस किंवा सहयोगी यांच्याकडं असणारी कार, फ्रीज, टीव्ही, व्ही.सी.आर, एअर कंडिशनर इत्यादी वस्तूंपेक्षा अधिक महाग वस्तू आपल्याकडे नसतील हे पाहिलं जातं.
३. सार्वजनिक ठिकाणी अतिमहागडं मद्य किंवा खाणं यांचं सेवन टाळलं जातं. निदानपक्षी प्रदर्शन टाळलं जातं. उदाहरणार्थ, स्कॉच व्हिस्की, पीटर स्कॉचच्या बाटलीत टाकून प्याली जाते. म्हणजे पाहणाऱ्याला वाटावं की, हे मद्य इतकं महाग नाही.
४. आपले कुटुंबीय किंवा पाहुणे यांचा आपल्याच शहरातील पंचतारांकित हाटेलांमध्ये पाहुणचार केला जात नाही. किंवा तसं करण्याची वेळ आलीच तर पैसे अगोदरच पाहुण्यांकडं दिले जातात आणि त्यांनाच बिल देण्यास सांगण्यात येतं.
५. आपण राहत असलेल्या शहरात आलिशान घर न बांधण्याची दक्षता घेतली जाते. त्याऐवजी तीन, चार छोटी घरं किंवा फ्लॅट्स घेतले जातात. किंवा मोठं घर बाधावयाचंच असेल आणि निवृत्तीनंतर तिथं वास्तव्य करायचं असेल तर ते दुसऱ्या शहरात बांधलं जातं.
६. आपले नातेवाईक, विशेषत: पत्नीच्या माहेरची मंडळी खूप श्रीमंत आहेत असं सर्वाना सांगितलं जातं. त्यामुळं आपणच विकत घेतलेल्या महागड्या वस्तू सासूरवाडीकडून मिळालेल्या आहेत असं सांगून वेळ मारून नेता येते.
७. पैसा उडवायचा असेल, तर आपल्या शहरात तसं केलं जात नाही. घरापासून बऱ्याच अंतरावर असलेल्या हॉलिडे रिसॉर्टची निवड केली जाते किंवा शक्य झाल्यास परदेशवारी केली जाते. तिथं निकटवर्तीय किंवा मित्रांपैकी कुणी येण्याची शक्यता कमी असल्याने ते ठिकाण सुरक्षित असतं.
सरतेशेवटी, भ्रष्टाचार हा होतच राहणार हे गृहीत धरलं तरी तो प्रमाणाबाहेर झाल्यास कंपनी किंवा संस्थेच्या मुळावर येऊ शकतो. त्यामुळं त्यावर नियंत्रण ठेवणं भाग आहे. दक्ष व्यवस्थापनाला भ्रष्टाचाराची अपरिहार्यता लक्षात घेऊन त्याच्या नियंत्रणासाठी योग्य ते उपाय शोधण्याची खबरदारी घ्यावी लागते. भ्रष्टाचार होतच राहणार म्हणून त्याकडे दुर्लक्ष करणं भ्रष्टाचारापेक्षाही घातक आहे. कधी तरी आपण जाणारच आहोत, म्हणून जिवंतपणी प्रकतीची हेळसांड करणं जसं चुकीचं आहे, तसंच भ्रष्टाचाराकडं कानाडोळा करणं चुकीचं आहे हे व्यवस्थापनानं जाणलं पाहिजे.
☐