अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/व्यवस्थापकीय सल्लागर आणि संस्था
बहुतेक सर्व मध्यम व मोठे उद्योग स्वतंत्र व्यवस्थापकीय सल्लागारांचे सहकार्य वाढत्या प्रमाणात घेऊ लागलेले आहेत. या व्यवसायाविषयी मागच्या एका लेखात आपण काही माहिती करून घेतलेली आहे. प्रस्तुत लेखात ‘व्यवस्थापकीय सल्लागार व्यवसायात सल्ला घेऊ इच्छिणाऱ्यांची भूमिका व त्यांच्या अपेक्षा’ या महत्त्वाच्या विषयाचा विचार करणार आहोत. याचा फायदा सल्ला व्यावसायिक व त्यांचे ग्राहक अशा दोघांनाही होण्याची शक्यता आहे.
यापैकी तंत्रज्ञानविषयक मार्गदर्शनाची आवश्यकता सातत्याने लागत नाही. कारण एकदा यंत्रसामुग्री आणून बसवली की कित्येक वर्षे ती बदलावी लागत नाही. मात्र, संस्थेची संरचना, ती चालविण्याची पध्दती आणि त्या निमित्तानं निर्माण होणारे व्यावसायिक संबंध याबाबत नेहमी मार्गदर्शनाची आवश्यकता असते. कारण संस्थेमधील अंतर्गत व बाह्य वातावरण सुयोग्य ठेवण्यासाठी या तीन बाबी महत्त्वाच्या असतात.
त्यामुळं त्यांच्यावर सतत लक्ष ठेवणं आणि जागरूक राहणं आवश्यक असतं. व्यवस्थापकीय मार्गदर्शकाला इथंच महत्त्वाची भूमिका बजावायची संधी मिळत.
संस्थेची संरचना म्हणजे नेमकं काय हे पाहणंही आवश्यक आहे. उत्पादन व त्याची विक्री यांना आधारभूत बाबी म्हणजे संरचना. उदाहरणार्थ संस्थेला पैसा पुरविणारे स्त्रोत, कच्चा माल पुरविणारे स्रोत, संस्थेत तयार होणाऱ्या मालाची विक्री करणारी व्यवस्था, हिशेबी व्यवस्था व तो तपासणारी व्यवस्था या सर्वांचा समावेश ‘संरचने'त होतो.
संस्थेची स्थिती व मार्गदर्शन:
मार्गदर्शक कोणता सल्ला देणार हे संस्थेच्या सद्य:स्थितीवर अवलंबून असू शकतं. संस्था तीन प्रकारच्या असू शकतात १.नवस्थापित संस्था २. वर्धिष्णू संस्था 3. परिवर्तनक्षम संस्था
नवस्थापित म्हणजे नुकतीच स्थापन झालेली संस्था एखाद्या वस्तूचं उत्पादन व विक्री करीत असते. यासाठी पैशाची गुंतवणूक करून तंत्रज्ञान व यंत्रं खरेदी केली जातात. मात्र, ही खरेदी, त्यासाठी लागणारा पैसा, मनुष्यबळ, प्रशासन इत्यादी घटकांची जुळणी सुयोग्य पध्दतीनं न झाल्यास केवळ तंत्रज्ञान काहीच प्रभाव पाडू शकत नाही. हे सर्व घटक पुरविणाच्या व्यक्ती भिन्न भिन्न असतात. त्यांचा एकमेकांशी विसंवाद होण्याची शक्यता असते. त्यामुळं रचना, पध्दती आणि व्यावसायिक संबंध या सर्वांवर विपरीत परिणाम होऊ शकतो. अशावेळी रचना व पध्दतीत सुसूत्रता आणण्यासाठी व्यवस्थापकीय सल्लागाराची मदत घेतली जाते.
वर्धिष्णू किंवा विस्तार पावणाच्या संस्थांमध्ये उत्पादन व विक्री यांच्यामानानं संरचना, प्रशासन किंवा कार्यपध्दती हे घटक काहीसे मागं पडलेले दिसून येतात. त्यामुळं उत्पादन व विक्रीक्षमतेचा पुरेपूर लाभ उठवता येत नाही. यावेळीही त्यांची क्षमता सुधारण्यासाठी व्यवस्थापकीय मार्गदर्शकाची जरुरी लागते.
या मार्गदर्शनाची सर्वाधिक गरज परिवर्तनक्षम म्हणजेच ज्या संस्थांमध्ये सतत बदल घडून येत आहेत, किंवा बदल घडण्याची शक्यता आहे, अशांना सर्वाधिक असते. उत्पादनाच्या मागणीत अचानक घट होणं, संस्थेचं अन्य संस्थेमध्ये विलीनीकरण होणं, संस्था 'आजारी’ होणं, बाजारपेठेची स्थिती बदलणं, वित्तीय अडचणी इत्यादीमुळं संस्थेच्या संरचनेत बदल होतो किंवा करावा लागतो. यावेळी मार्गदर्शनाची नितांत आवश्यकता असते. मात्र, केवळ असमतोल संरचना किंवा कार्यपध्दती यामुळंच
संस्थेवर विपरीत परिणाम होतो असं नाही. तर व्यावसायिक संबंधांमध्ये निर्माण झालेली समस्या हे अधोगतीचं महत्त्वाचं कारण असू शकतं.
व्यावसायिक संबंधांमध्ये संस्थांतर्गत संबंध हे बहिर्गत संबंध यांचा समावेश आहे. संस्थेच्या विविध विभागांच्या एकमेकांशी असलेल्या संबंधांना अंतर्गत संबंध तर ग्राहक, पुरवठादार, कामगार संघटना, सरकार, समभागधारक इत्यादींशी असणाच्या संस्थेच्या संबंधांना बहिर्गत संबंध म्हणतात.
संस्थेची संरचना, कार्यपध्दती व व्यावसायिक संबंध याबाबत निर्माण होणाऱ्या समस्या सोडविण्याचे अनेक मार्ग आहेत. त्यापैकी कशाचा उपयोग किती प्रमाणात व कोणत्या वेळी करावयाचा हे ठरविण्यासाठी समस्येचं व्यवस्थित आकलन होणं आवश्यक असतं. ते कसं केलं जात आणि मार्ग कसा शोधला जातो याविषयी पुढील लेखात माहिती घेऊ.