अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/संस्थेच्या समस्यांचे निदान
१. समस्येचं निदान २. उपाययोजना ३.उपाययोजनेची अंमलबजावणी
४. छाननी
समस्येचं निदान : आपल्याला काय होतंय हे रुग्ण डॉक्टरला नेमकं सांगू शकला, तर औषध योजना करणं अतिसुलभ होतं. पण अनेकदा आपली अडचण कोणती आहे हे रुग्ण अचूकपणे सांगू शकत नाही. त्याच्या वैद्यकीय चाचण्यांचे अहवालही त्यावर प्रकाश टाकू शकत नाहीत. अशा वेळी रुग्णामध्ये दिसून येणारी लक्षणं आणि आपलं ज्ञान, अनुभव व तर्कबुध्दी यांचा उपयोग करून रोगनिदान करावं लागतं. इथंंच डॉक्टरच्या कौशल्याची कसोटी लागते. व्यवस्थापकीय सल्लागाराचंही असंच आहे.‘रुग्ण' संस्थांचे ‘सल्लेच्छुुक ' अधिकारी त्याला संस्थेच्या पध्दतीबद्दल ढोबळ कल्पना देऊ शकतात. पण नेमका आजार कोणता हे सांगू शकत नाहीत. ‘आम्ही ठरलेल्या मुदतीत माल पुरवू शकत नाही’ ‘आमच्याकडे कर्मचाच्यांची संख्या फारच अधिक आहे’ ‘आमच्याकडे वस्तू - मालमत्ता (इन्व्हेंटरी) नको इतकी आहे. अशा स्वरूपात मोघम तक्रारी मांडल्या जातात. मग सल्लागाराला त्या मागची कारणं शोधावी लागतात. याकरिता अनेकदा अनुभवी सल्लागारालाही 'ट्रायल अँड एरर’ पध्दतीचा अवलंब करावा लागतो.‘डॉक्टर,फटकन एक इंजेक्शन द्या आणि मला झटपट बरं करा. घरी झाेेपून राहायला मला वेळ नाही, हे बहुतेक रुग्णांचं घोषवाक्य असतं. कारण तो आजारामुळंं अधीर झालेला असतो. व्यवस्थापकीय सल्लागाराकडंं येणारे ‘रुग्ण'अशाच प्रकारचे असतात. मग त्यांना शांतपणे विश्वासात घेऊन युुक्तीनं पटवूून द्यावं लागतं. डॉक्टरलाच सूचना करण्याची सवय काही रुग्णांना असते. आपल्या तथाकथित जनरल नॉलेजच्या आधारावर ते डॉक्टरकडे एखाद्या औषधाची मागणी करतात.हाच प्रकार संस्थांच्या बाबतीतही घडतो. संगणक बसवला की आपल्या सर्व समस्या सुटतील अशी अनेक चालकांची खात्री असते. कित्येक ‘कुटुंबनियंत्रित’ संस्थांना सहा माहन्यांच्या आत ‘व्यावसायिक' बनण्याची गडबड सुटलेली असते. मग तशी अपेक्षा सल्लागाराकडून केली जाते. अशा वेळी संस्थेची संरचना, कार्यपध्दती व व्यावसायिक संबंध यांच्यातील समस्यांची नेमकी कल्पना संंस्थाचालकांंना देऊन त्या सोडविण्यासाठी काय करावंं लागेल. किती वेळ लागेल, कोणत्या सुधारणा कराव्या लागतील याची पूर्ण माहिती देऊन समस्येचं गांभीर्य त्यांच्या लक्षात आणून द्यावं लागतं.
कित्येकदा बाह्य लक्षणं फसवी असतात. डोळ्यांची आग होत असली तरी आजार डोळ्यांना नसून त्याचं मूळ पोटाच्या विकारात असू शकतं.‘कान दुखतो’ अशी तक्रार असली तरी, प्रत्यक्षात श्वसन यंत्रणा बिघडलेली असू शकते.कारण नाक, कान, घसा, डोळे इत्यादी अवयव बाहेरून वेगळे दिसत असले तरी शरीराच्या आत ते कुठंं तरी एकमेकांशी संलग्न असतात. संस्थांमध्येही रोगनिदान करताना, तिचे विविध विभाग एकमेकांशी कसे आणि कुठं जुळलेले आहेत हे बघून समस्या निदान करावं लागतं. कारण आजाराची लक्षणंं जरी एका विभागात दिसून येत असली, तरी त्याचं मूळ दुसऱ्याच विभागात असू शकतं. त्यामुळे सर्व विभागांच्या कार्यपध्दतीची सखोल तपासणी करून कुठंं कशा सुधारणा करणे भाग आहे आणि त्यासाठी काय केलं पाहिजे याचा निर्णय घ्यावा लागतो. मुख्य म्हणजे तो संस्थेला पटवून द्यावा लागतो. आपण समजता त्यापेक्षा समस्या जास्त गंभीर आहे याची जाणीव करून द्यावी लागते.
यापुढची आणि सर्वात महत्वाची पायरी म्हणजे समस्येवरील उपाययोजना. आपल्याकडे सल्ल्यासाठी आलेल्या संस्थेबरोबर सल्लागाराला सर्वाधिक विवाद होऊ शकतो तो याच ठिकाणी. कारण सल्लागारानंं सुचवलेली उपाययोजना संस्थेला पसंत पडेलच याची खात्री नसते आणि सल्लागारावर पूर्ण विश्वास टाकण्याची संस्थेची तयारी अनेकदा नसते. अशा वेळी सल्लागाराला संवाद कौशल्यांचा वापर करून संस्थाचालकांना आपण सुचविलेली उपाययोजना पटवून दयावी लागते. हे अवघड काम असतंं. कसं करावं लागतं याबाबत पुढच्या लेखात पाहू.