अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/हितगूज (भाग दुसरा)
त्यावेळी मी नांदेड येथे राहत होतो. तेथून मुंबईला पुन्हा मुलाखतीसाठी येणं अत्यंत कठीण होतं. ‘माझी मुलाखत आजच घेण्याची विनंती केल्यास माझी सोय होईल' असं मी तेथील अधिकाऱ्यांना सांगून पाहिलं, पण ते त्यांच्या मनास येईना. तेथील एका स्टेनोग्राफरने यावर तोडगा काढला. मुलाखत मंडळाचे सदस्य ठराविक वेळाने चहा घेण्यासाठी मुलाखती घेण्याचंं काम थांबवत असत. चहा घेता घेता यांनी माझी मुलाखत घ्यावी असा उपाय त्या स्टेनोग्राफरने सुचविला. तो त्वरित मान्य करण्यात आला.
दिवसभर मुलाखती घेऊन मंडळाचे सदस्य दमलेले होते. तरीही त्यांनी चहा घेता घेता केवळ पाच मिनिटांसाठी त्यांच्या खोलीत बोलावलं. माझ्या आग्रही भूमिकेमुळे ते थोडेसे कातावले होते.
"तुम्ही अमेरिकेत जाऊ इच्छिता. अमेरिकेची लोकसंख्या किती, ते तरी तुम्हाला माहीत आहे का?" त्यांच्यापैकी एकाने माझ्या तोंडावर प्रश्न लगावला. मीही थोडा वैतागलेलोच होतो. "मी तेथे अमेरिकेची लोकसंख्या वाढविण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी जात नाहीये!" असं उत्तर एका झटक्यात माझ्या तोंडून बाहेर पडलंं. चहाच्या खोलीत हास्याचे फवारे उडाले. मघाचं तणावयुक्त वातावरण एका क्षणात नाहीसे झालं. त्यानंतर मुलाखत ४५ मिनिटे चालली. माझी निवड करण्यात आली.
या कहाणीचंं तात्पर्य सर्व व्यवस्थापकांसाठी उद्बोधक आहे. परिस्थिती कितीही कठीण असली, तरी ती आपल्या बाजूने बदलण्याची संधी जरूर मिळते. फक्त त्यासाठी धीर धरला पाहिजे. व्यवस्थापनशास्त्रातील हे मूलभूत तत्व आहे.
कार्नेजी विद्यापीठातले दिवस :
माझं अमेरिकेतील प्रशिक्षण सुरू झाल्यानंतर माझी प्रथम नौदल संशोधन प्रकल्पााच्या कार्यालयात नियुक्ती करण्यात आली. उत्पादनासाठी लागणाऱ्या वस्तू व मजुरीचा खर्च यावर अहवाल तयार करण्याचं काम माझ्यावर सोपविण्यात आलं होतंं. माझ्या अहवालाच नंतर पुस्तकही काढण्यात आले.
माझा अहवाल चार वरिष्ठांच्या एका मंडळाने तपासला होता. (या चारांपैकी प्राध्यापक हर्बर्ट सायमन व प्राध्यापक फ्राँँको मोडिग्लिआनी यांना नंतर नोबेल पुरस्कारही मिळाला.)सुरुवातीच्या काळात त्यांनी मला ५० टक्के गुण देऊ केले होते. ५० टक्के गुण काही वाईट नाहीत असं या मंडळाचे मुख्य प्राध्यपक चार्ल्स होल्ट यांनी मला पत्राद्वारे कळविलंं. 'अजून बराच वेळ आहे. माझी टक्केवारी वाढू शकते' असं उत्तर पाठवून मी मोकळा झालो होतो. माझा आत्मविश्वास चांगलाच वधारला होता. आपणही नोबेल प्राईझ मिळवू शकतो असंही वाटू लागलंं होते. तो योग मात्र अजून आलेला नाही. पहिले जाहीर भाषण :
माझ्या जीवनातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे माझं पहिलं जाहीर व्याख्यान. कोलकाता येथे एका व्यावसायिक संस्थेने माझ्या बॉसचे 'भारतातील कामगार कायदे’ या विषयावर व्याख्यान आयोजित केलं होतं. पण ऐन वेळी बॉसना लंडनला जावं लागल्याने व त्यांचा 'इनचार्ज’ मी असल्याने व्याख्यानाची जबाबदारी माझ्यावरच येऊन पडली. मी कायद्याचा पदवीधर नसल्याने मला या विषयाची काहीच माहिती नव्हती. त्यामुळे कामगार कायद्यातील तरतुदीविषयी बोलणं शक्यच नव्हतं. मी माझं वाचन व सामान्य ज्ञान याचा उपयोग करून कामगार कायदे कसे असावेत याविषयीची माझी मतं व संकल्पना श्रोत्यांसमोर मांडल्या. कशा कुणास ठाऊक, पण त्यांना आवडल्या. बालपणी लागलेली वाचनाची सवय अशी उपयोगी पडली. एका व्याख्याता या नात्याने माझ्या करिअरची ती सुरुवात होती.
व्यवस्थापन प्रशिक्षण :
व्यवस्थापन प्रशिक्षक म्हणून माझी कारकीर्द सुरू करून देण्याचं श्रेय प्राध्यापक एन.एस. रामस्वामी यांना दिलं पाहिजे. माझ्या वार्षिक सुटीमध्ये त्यांनी मला केरळमध्ये बोलावून ऑटोमेशन, सिस्टिम्स, प्रोसिजर्स व किफायतशीर उत्पादन या विषयांवर माझ्या अनेक कार्यशाळा कोचीनपासून त्रिवेंद्रमपर्यंत आयोजित केल्या. तेव्हापासूनच मी व्यवस्थापकीय प्रशिक्षक म्हणून नावारूपाला आलो. माझ्या करिअरला आणखी एक तेजस्वी पैलू पडला.
तेव्हापासून आजपर्यंत मी व्यवस्थापकीय प्रशिक्षणाच्या अनेक कार्यशाळा आयोजित केल्या आहेत. अनेक संस्थांमधील व्यवस्थापकांना नवी दृष्टी देण्याचा माझा प्रयत्न आजही सुरू आहे.
व्यवस्थापकीय बोधपट निर्मिती :
चित्रपट हे केवळ एक करमणुकीचे नव्हे तर लोकशिक्षणाचेही प्रभावी माध्यम आहे. माझा या क्षेत्रात प्रवेश अपघातानेच झाला असं म्हणावं लागेल. मुंबईत राष्ट्रीय केमिकल्स अँँण्ड फर्टिलायझरमध्ये व्यवस्थापनावर कार्यशाळा घेत होतो. त्यावेळी या कंपनीने बोधपट तयार करण्याचं काम हाती घेतलं होतं. प्रशिक्षण कसं दिलं जातं यावर एका प्रसंगाचंं चित्रण त्यांना करावयाचं होतं. माझी कार्यशाळा सुरू असताना त्यांनी वेळ त्याचं चित्रण केले. माझ्या प्रशिक्षणाच्या शैलीने प्रभावीत झाल्याने त्यांनी मला व्यवस्थापन या विषयावर चित्रफीत तयार करण्याची ऑफर दिली. तो वेळपर्यंत मी फक्त पीटर ड्रकर यांनी या विषयावर तयार केलेल्या चित्रफिती पाहिल्या होत्या. आपल्यालाही अशी फिल्म बनविण्याची संधी मिळेल असं स्वप्नातही वाटत नव्हतं.
‘व्यवस्थापकाची भूमिका’ या विषयावर चार चित्रफितींची एक मालिका तयार करता येईल अशी कल्पना मी मांडली, पण त्यात एक समस्या होती. चित्रफीत तयार करणाऱ्यांना व्यवस्थापनाबद्दलची माहिती नव्हती, तर मी चित्रफीत कशी तयार करतात या संबंधी अज्ञानात होतो. दोघांच्याही अज्ञानाची गोळाबेरीज करून आम्ही एक मालिका तयार केली. ती भलतीच लोकप्रिय झाली.
१९८२ मध्ये तयार केलेल्या या मालिकेला आजही मागणी आहे. या मालिकेतील प्रत्येक चित्रफितीच्या शेकडो प्रती आजपर्यंत खपल्या आहेत. व्हिडिओ चित्रणात प्रगती होत गेली. तसतशा मी आणखी चित्रफिती तयार केल्या. प्रथम आम्ही व्हिडिओ कॅसेट्स तयार करत होतो. आता सीडीचा उपयोग करतो. आतापर्यंत मी व्यवस्थापन या विषयावर ५० चित्रफिती तयार केल्या आहेत. या खेरीज माझ्याकडे आणखी ७० चित्रफितीच्या मार्केटिंगचे अधिकार आहेत. एकंदर माझा हा उद्योग चांगलाच लाभदायक ठरला आहे.
माझ्या जीवनातील या प्रसंगाने मला वेळोवेळी नवी दृष्टी दिली. यशाचे नवे मार्ग दाखवले. कर्तृत्वासाठी नवी दालने खोलून दिली. हे प्रसंग माझ्या अंत:करणात शिलालेख कोरावा तसे कोरले गेले आहेत. ते केवळ माझ्यापुरतेच मर्यादित नाहीत. त्यांचं स्वरूप प्रातिनिधिक आहे. माझ्याप्रमाणे व्यवस्थापन क्षेत्रात काही तरी नवे करून दाखविण्याची नोंद बाळगणाऱ्यांसाठी ते एखाद्या दीपस्तंभाचे कार्य बजावू शकतात.