अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/ स्थलांतर शाप की वरदान?

लांतराविरुध्द सध्या बरच काहूर उठविण्यात आलेले आहे.स्थलांतर म्हणजे एका देशातून दुसऱ्या देशात किंवा एकाच देशातील एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं. बिगरमुंबईकरांचं मुंबईत होणारं किंवा बांगलादेशियांचं भारतात होणारं स्थलांतर हे गरमागरम चर्चेचे विषय आहेत. बहुतेक वेळा स्थलांतर म्हणजे 'घुसखोरी'

किंवा ‘आक्रमण’ असंच समजण्यात येतं. मुंबईत दाक्षिणात्यांची घुसखोरी होत आहे, अशी आवई दोन दशकांपूर्वी उठविण्यात येत होती. ‘लुंगी हटाव’ ही तर शिवसेनेची पहिली घोषणा होती.
 हे 'घुसखोर' स्थानिक लोकांचे म्हणजेच ‘भूमीपुत्रां` चे रोजगार हिरावून घेतात. पाणी, वीज, वाहतूक, निवास इत्यादी मूलभूत सुविधा पुरविणाऱ्या संस्थावरच बोजा वाढवितात. त्यांच्यामुळं गुन्हेगारी वाढते. स्थानिक शांतता धोक्यात येते. झोपडपट्ट्यांची बेसुमार वाढ होते. त्यामुळं अस्वच्छता, रोगराई वाढते. शहर बकाल होते.त्यांच्या वाढत्या संख्येमुळं स्थानिक संस्कृतीची गळचेपी होते इत्यादी टीका नेहमीच होत असते.
 हे आरोप काही प्रमाणात सत्य आहेत हे निश्चित. पण या गुंतागुंतीच्या प्रश्नाची दुसरी बाजू समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. ज्या भागात मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होतं त्या भागाचा आर्थिक विकासही झपाट्याने होतो असं दिसून आलं आहे. म्हणजेच स्थलांतरित प्रत्येक गोष्ट हिसकावूनच घेतात असं नाही तर त्यांचं योगदानही मोलाचं असतं. त्यामुळे या प्रश्नाचा व्यवस्थापकीय दृष्टीनं कसा विचार करता येईल हे आपण या लेखात पाहणार आहोत.
 स्थलांतराचा प्रश्न समजून घेण्यापूर्वी स्थलांतर आणि घुसखोरी यातील फरक समजून घेणं आवश्यक आहे. स्थलांतर हे काम करून रोजगार मिळविण्यासाठी होतं. म्हणजेच त्याचा उद्देश व्यापाराप्रमाणं देणं आणि घेणं असा असतो. आपला रोजगार स्थानिकांच्या सहकार्यावर अवलंबून आहे याची जाणीव स्थलांतरितांना असते. त्यामुळे रोजगार धोक्यात येईल अशी कृती सहसा त्यांच्या हातून होत नाही.
 घुसखोरीचं तसं नसतं. तिचा उद्देश देवाण-घेवाणीचा नसून लूटमार करण्याचा असतो.हिंसाचार माजवणं, स्थानिकांना घाबरवणं आणि त्यांची संपती हरण करणं, प्रदेश बळकावणं यासाठी घुसखोरी केली जाते. काश्मीरमध्ये पाकिस्तानातून होणारं दहशतवाद्यांचं स्थलांतर ही घुसखोरी आहे. पण महानगरांमध्ये देशाच्या गरीब भागांतून होणारं स्थलांतर ही घुसखोरी म्हणता येणार नाही.
 स्थलांतराचे फायदे-तोटे समजून घेण्यासाठी आपण काही उदाहरणं पाहू. अमेरिका हा देश सर्वाधिक स्थलांतर होणारा देश आहे. जगाच्या सर्व भागांमधून गरीब, श्रीमंत, सुशिक्षित, अशिक्षित पुरुष-महिला संधी मिळेल तेव्हा अमेरिकेकडं धाव घेताना दिसतात. आता तर परिस्थिती अशी आहे की, तो स्थलांतरितांचाच देश बनला आहे. पिढ्यान् पिढ्या तिथं राहणारे एतद्देशीय आता अल्पसंख्य झालेत आणि ‘बाहेरून' आलेले बहुसंख्य बनले आहेत.
 पण याच स्थलांतरितांनी गेल्या १०० वर्षांत अमेरिकेला जगातील सर्वात मोठी औद्योगिक, सामाजिक आणि आर्थिक महाशक्ती बनविली आहे. १०० वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या अवजड उद्योगांपासून ते २५ वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेल्या अत्याधुनिक संगणक सॉफ्टवेअर आणि माहिती तंत्रज्ञानासारख्या उद्योगांपर्यंत सर्व क्षेत्रात स्थलांतरितांचाच बोलबाला झाला आहे. केवळ विज्ञान, तंत्रज्ञान, सेवा, अर्थ या क्षेत्रांतच नाही तर कला, संगीत, क्रीडा इत्यादी सांस्कृतिक क्षेत्रांतही स्थलांतरितांचे योगदान लक्षणीय आहे. ऑलिम्पिकची सुवर्णपदकं असोत वा नोबेल पारितोषिकं, ती मिळवून स्थलांतरित अमेरिकेच्या प्रतिष्ठेत भर घालत असतात.
 आपल्या मुंबईचंही असंच नाही का? ‘१०० वर्षांपूर्वीपासूनच आमचे पूर्वज इथं राहत आहेत,’ असं सांगणारे फार थोडे लोक मुंबईत सापडतील. विशेषतः दुसरं महायुध्द आणि भारताच्या फाळणीनंतर मुंबईत देशाच्या सर्व भागांतून स्थलांतरितांचे लोंढे आले. त्यांनी मुंबईला देशाची आर्थिक राजधानी बनविलं.
 १९५० च्या आसपास मुंबईत संयुक्त महाराष्ट्र चळवळ जोरात होती. त्यावेळी गुजराथी समाजाविरुध्द वातावरण बरंच तापलं होतं. कालांतरानं ते निवलं. गुजराथ्यांनी जितके रोजगार बळकावले असतील त्याहीपेक्षा जास्त रोजगार निर्माणही झाले आहेत आणि त्यांचा स्थानिक जनतेला फायदाही झाला आहे हे नाकारून चालणार नाही. आजही मुंबईत शहरात गुजराथ्यांपेक्षा मराठी लोकांची संख्या अधिक आहे. तरी, मराठी लोकांनी जितके उद्योग आणि रोजगार निर्माण केले त्याच्या काही पट अधिक उद्योग व रोजगार गुजराथ्यांनी निर्माण केले हे सत्य आहे.
 अमेरिकेतल्या भारतीयांची कथाही अशीच आहे. प्रारंभी नोकरी मिळविण्यासाठी तेथे गेलेल्या भारतीयांनी स्वतःच्या हिकमतीवर व्यवसाय उभारले आणि त्या देशात रोजगार निर्मिती केली. अमेरिकेतील सॉफ्टवेअर व्यवसाय आज भारतीयांच्या व्यावसायिकतेवर सर्वस्वी अवलंबून आहे.
असं का घडतं? :
 स्थानिक आणि स्थलांतरित यांच्यामधल्या आर्थिक शर्यतीत स्थलांतरितांनी बाजी मारलेली जगभर दिसून येते. असं का होंतं तर स्थलांतरित हे काम करणं आणि पैसा मिळविणं या एकाच मुख्य उद्देशानं आपलं मूळ स्थान सोडून आलेले असतात. त्यामुळं त्यांची मानसिकता पडेल ते काम करण्याची असते. या उलट स्थानिक हे निरुत्साही आणि काहीसे आळशी असतात. स्पर्धेत उतरण्यापेक्षा स्वतःच्या सुरक्षित आसऱ्यांंमध्ये राहणं ते पसंत करतात. आपण येथील मूळ नागरिक आहोत, आपल्याला येथून कोणी हलवू शकत नाही या भावनेनं ते वावरतात. स्वतःची सुरक्षितता त्यांनी गृहीत धरलेली असते. त्यामुळं त्यांना एक प्रकारचं जाड्य किंवा मंदपणा येतो. साहजिकच ते मागं पडतात. ‘सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट’ हा नियम तिथं लागू पडतो.
 काही वर्षांपूर्वी मी केरळला गेलो होतो. तेथील एका स्थानिक उद्योजकानं मला विचारलं, ‘माझ्या कंपनीसाठी आपण एखाद्या महाराष्ट्रीयन अकौंटंटचे नाव सुचवू शकाल का?' मला आश्चर्य वाटलं. ‘अहो, केरळमधले अकौटंट मुंबईत येऊन कामं मिळवतात आणि तुम्हाला केरळमध्ये महाराष्ट्रीयन अकौटंट हवाय? केरळमध्ये कोणीच अकौंटंट उरला नाही का? ’ मी विचारलं. तसं नव्हे, पण इथले स्थानिक अकौटंट आळशी आहेत. कामापेक्षा त्यांच्या अटीच जास्त असतात म्हणून विचारलं.' तो म्हणाला. या उदाहरणावरून माझा मुद्दा स्पष्ट होईल.
 मी स्वत: मूळचा कोकणातील असल्यानं कोकण रेल्वेबाबत खूपच आशावादी होतो. या प्रकल्पामुळे स्थानिक लोकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील अशी माझी समजूत होती, पण एकदा कोकण रेल्वेतून प्रवास करताना मला आढळलं की, महाराष्ट्रातल्या प्रत्येक स्थानकावरील हॉटेलं आणि बुकस्टॉल्स `बाहेरचे’ विशेषतः उडपी लोक चालवताहेत.मी एका स्थानिकाला विचारलं, 'हे स्टॉल्स तुम्ही का नाही चालवत?' तो म्हणाला, `चालवले असते पण रेल्वे या स्थानकावर रात्री १ वाजता गाडी येते. त्यावेळी आम्ही गाढ झोपेत असतो. मग स्टॉल कसा चालवणार?' मी म्हटलं, ‘पण दुपारी अडीच वाजताही एक गाडी येते.'
 'हो, पण ती आमची दुपारच्या झोपेची वेळ असते,' तो सहजपणे उत्तरला.
 अशा स्थितीत बाहेरच्यांनी ‘आक्रमण केलं तर दोष त्यांना देता येईल का? कोकणाच्या बाबतीत बोलायचं तर आळशीपणावर मात करून मेहनत करण्याची वृत्ती असणाऱ्या कोकणी नागरिकांनी यापूर्वीच मुंबईत स्थलांतर केलं आहे!
 `ठाण्यात सेल्समनच्या जागेसाठी बिगर महाराष्ट्रीयन उमेदवार हवे आहेत’ अशी जाहिरात एका कंपनीनं नुकतीच दिली. त्यामुळे ठाण्यातील एका स्थानिक दादाच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्यानं कंपनीत जाऊन जाब विचारला. ‘महाराष्ट्रीय लोक आळशी असतात असा आमचा अनुभव आहे,' असं तिथल्या रिसेप्शनिस्टनं त्याला सांगितलं. अशी जाहिरात चुकीचीच आहे, यात वाद नाही. पण त्यावरून धडाही शिकण्यासारखा आहे. बाहेरून आलेले लोक काबाडकष्ट करतात. पैसा मिळवितात आणि आर्थिक प्रगतीच्या शिड्या चढून वर जातात. स्थानिक लोक मात्र त्यांचा निषेध करीत जागच्या जागेवरच राहतात. दुसरऱ्या गावी बदली होते म्हणून प्रमोशन नाकारलेले स्थानिकही मला माहीत आहेत.
 स्थानिकांना ‘कासव संस्कृती’ पसंत असते, तर 'बाहेरच्यां'चं नातं 'गरुड संस्कृती'शी असतं. कासवाचं नैसर्गिक आयुष्य २०० वर्षांचं असतं. पण ते पूर्ण करण्याआधीच त्यातली कित्येक भुकेनं मरतात. कारण एक मैल परिसरात जाऊन अन्न मिळालं नाही तर ती उपाशी राहणे पसंत करतात, पण हद्द ओलांडून जात नाहीत. याउलट गरुडाची कितीही दूर उडत जाऊन शिकार साधण्याची तयारी असते.
 स्थलांतरितांमुळे समस्या निर्माण होतात हे खरं. गुन्हे वाढतात. सांस्कृतिक संघर्ष निर्माण होतात. जुन्या संस्कृतीसमोर, अस्तित्वाचा धोका उभा राहतो, पण असं होणं अपरिहार्य आहे. कारण सतत बदलत राहणं हा संस्कृतीचा स्वभावधर्म आहे. स्थलांतरित याच स्वभावधर्माला खतपाणी घालतात इतकंच.