अन्वयार्थ – २/सीता वनवासीच आहे अजून


सीता वनवासीच आहे अजून


 राठी दुसरीत असताना वडिलांची बदली बेळगावहून नाशिक येथे झाली. गुरुजींना सांगितले, 'मी शाळा सोडणार' त्यात आनंद किंवा अभिमान वाटण्याचे काय कारण? पण वाटला एवढे खरे. गुरुजींनीच विचारले, 'कोठे जाणार?' बेळगावातल्या बेळगावात दुसऱ्या शाळेत जात नाही हे कळून त्यांना समाधान वाटलेसे दिसले. नाशिकला जाणार का? मग, तुम्हाला आता द्राक्षे टोपलीटोपलीने खायला मिळणार!' ते म्हणाले. बेळगावात आंबे, फणस, काजू इत्यादी फळांची अगदी रेलचेल असे. पण, द्राक्षाची मोठी नवलाई होती. माझ्या तोंडालाही मेव्याच्या कल्पनेने पाणी सुटले. शाळूमित्रांना मोठा हेवा वाटला.
 घरी आल्यावर आईने सांगितले, 'राम जेथे वनवासात गेला होता त्या गावी आपण चाललो आहोत. तेथे रामाची मोठी मंदिरे आहेत, सीतेचे जेथून रावणाने अपहरण केले ती गुंफा आहे. रामदासांनी तेथेच जपतप केले.' एवढी सगळी प्रवासी माहिती सांगण्याचे कारण, 'तेथे गेल्यावर बेळगावसारखी दंगामस्ती चालणार नाही, रामलक्ष्मणासारखे वागावे लागेल' हा इशारा.
 त्या काळचे जुने नाशिक आणि त्यातल्या त्यात पंचवटीचा भाग खरोखरीच राममय होता. वर्गाची सहल पंचवटीला गेली. सीतागुंफा पाहिली. एकाखाली एक तीन मजल्यांची भुयारे, त्यात एखाद्या उंदरासारखे राम, सीता, लक्ष्मण रहात होते याचा मोठा अचंबा वाटला. तीन टप्पे बोळकांडांची ती भुयारे आठवली म्हणजे आजही जीव गुदमरल्यासारखे होते. वनवासी रघुनंदन खरंच या पर्णकुटीत राहिले असतील, या समोरच्या पायऱ्यांवर त्यांचा पदस्पर्श झाला असेल या कल्पनेनेही मोठे अद्भूत वाटायचे.
 पुढे नाशिक सोडले. वेगवेगळ्या निमित्तांनी गोदावरीचा प्रदेश पाहिला. दंडकारण्य नेमके कोठे असावे याची कोठे निश्चिती दिसली नाही. विंध्य
पर्वतरांगांच्या दक्षिणेला दंडकारण्य हे नक्की; पण त्याची भौगोलिक नकाशातील नेमकी जागा निश्चित नाही. आंध्र प्रदेशात दोनचार जागी वनवासी राम येथेच राहिले असे छातीवर हात ठेऊन सांगतात. अगदी अलीकडे गुजरातमध्ये घातलेल्या डांग जिल्ह्यात 'डांग' हा 'दंड'चाच अपभ्रंश असल्याचे स्थानिक लोक निश्चितीने सांगतात.
 तीस वर्षापूर्वी बँकॉकला जाण्याचा योग आला. तेथे पाचूच्या बुद्धाच्या मंदिरात भोवतालच्या कोटावर सुंदर सुंदर चित्रकथा रंगविलेली होती. 'ही रामायणाची कथा आहे', वाटाड्याने सांगितले. चाळीस पन्नास चित्रांच्या मालिकेत रामायणाच्या कथानकाशी मिळतेजुळते एकही चित्र दिसेना. एक एक चित्र समजावून घेतले. सारी कथा रामापेक्षा रावणासंबंधीची. महापराक्रमी महातपस्वी सम्राट रावण; पण त्याची नियत बिघडली. तेव्हा त्याचा भाऊ बिभीषण याने उठाव घडवून आणला, रावणाचा वध केला. या साऱ्या कामगिरीत त्याला राम आणि त्याची वानरसेना यांचीही मोठी मदत झाली. या माहितीच्या धक्क्यातून सावरातो, न सावरतो तो वाटाड्याने सांगितले, "हेच खरे रामायण आहे. इंडियात लोक मानतात ते 'वाल्मिकी रामायण.' रामाचा जन्मदेखील हिंदुस्थानातील नाही, थायलंडमधला!" आता काय बोलता, कपाळ? मग मुद्दाम थायलंडची जुनी राजधानी अयोद्ध्या येथे जाऊन आलो. 'सा रम्या नगरी' असावी याची खात्री वाटावी इतपत भव्य वास्तू गतवैभवाची साक्ष देत अजूनही उभ्या आहेत. थाई राजघराण्यात रामाचे नाव परंपरेने चालते हे कळल्यावर भारतातील रामचरितासंबंधीच्या सर्वच अवशेषांविषयी मनात मोठा गोंधळ माजला.
 काही काळाने वाचनात आले की, भारतातही एकच एक वाल्मिकी रामायण प्रचलित नाही; अनेक रामायणे आहेत. वाल्मिकीचा राम पुरुषोत्तम, धीरोदात्त नायक आहे. तुळशीदासाचा राम 'प्रभु रामचंद्र' आहे. दक्षिणेत आणि जैन रामायणात तर मोठी विचित्र विचित्र कथानके प्रचलित आहेत. द्रविड चळवळीच्या साहित्यात रावणनिष्ठा भरपूर आहे आणि आजकालचे DMKचे नेते रामाची भरपूर निर्भत्सनाही करतात.
 स्त्रियांच्या लोकगीतांत रामाचे अग्रस्थान रहाते, लक्ष्मणचे बंधुप्रेमही मानले जाते; पण त्यांच्या गीतांतील खरी कथा सीतेच्या त्यागाची, सोशिकतेची आणि शांत, गंभीर, सोज्वळ बलिदानाची आहे.
 रामायणाचा विषय मनातही नसताना यवतमाळ जिल्ह्यात लक्ष्मीमुक्तीच्या कामासाठी गेलो. या कार्यक्रमाचा फारसा गवगवा झाला नाही; पण शेतकरी महिला आघाडीने दोन लाख स्त्रियांना त्यांच्या पतीच्या जमिनीतील एका भागाची मालकी मिळवून दिली आणि दानपत्राचा कार्यक्रम दोनशेवर गावांनी गावभर सडारांगोळ्या घालून, रोषणाई करून, ढोल लेझीम लावून मिरवणुका काढून साजरा केला ही मोठी लोकविलक्षण गोष्ट आहे. या आंदोलनाला विनोबाजींच्या व्यक्तिमत्वाची कोणी स्त्री-अग्रणी मिळाली असती तर साऱ्या देशात मोठी क्रांती घडून आली असती. अशी अग्रणी मिळेपर्यंत लक्ष्मीमुक्तीची ज्योत तेवत ठेवण्याचे काम मी जमेल तसे करीत होतो.
 यवतमाळ जिल्ह्याच्या रावेरी गावी लक्ष्मीमुक्तीचा कार्यक्रम झाला. मोठी सभा झाली. सभेत 'स्त्रियांच्या मालमत्तेचा हक्क हा प्रश्न मांडताना मी, रामामागोमाग वनवासात गेलेल्या सीतेची महाराणी बनल्यानंतर रामाने घरातून काढून लावल्यानंतर काय दैना झाली याचे वर्णन केले.
 सभा झाल्यानंतर गावकरी म्हणाले, "साहेब, तुम्ही कथा सांगितली ती आमच्या गावचीच. वनवासी सीता जंगले तुडवीत तुडवीत आमच्या गावी आली. तिची बाळंतपणाची वेळ झाली होती. लवकुशांना तिने जन्म दिला तो याच गावी."
 माझ्या मनात पुन्हा गोंधळ. रामराज्य सिनेमामुळे, टी.व्ही. वरील रामायणामुळे, परित्यक्ता सीता वल्मिकी ऋषींच्या आश्रमात कालक्रमणा करीत होती, तेथेच लवकुशांचा जन्म झाला आणि वाल्मिकीने त्या दोन बाळांना मोठे केले अशी समजूत पक्की झाली होती. पंजाबातील अमृतसरजवळ एका गावातही 'लवकुशांचा जन्म येथेच झाला' असे आख्यान ऐकले होते.
 रावेरीकर मंडळींना मी विचारले, "काय पुरावा आहे?"
 गावाबाहेर आजही प्रसूतीस्थानी मंदिर आहे. मंदिर हेमाडपंथी आहे, त्यामुळे ते फारसे प्राचीन नसावे. शेजारी लवकुशांनी बांधून घातलेल्या भीमकाय हनुमानाची मूर्ती आहे. अशी निर्वीर्य हनुमानाची मूर्ती हिंदुस्थानात इतर कोठेही नाही.
 माझ्या चेहेऱ्यावरची संशयाची भावना गावच्या देशमुखांनी ओळखली. "दगडाची देवळे आणि मूर्ती हा काही पुरावा नाही; पण सांगतो ऐका. गावात आणि आसपासच्या प्रदेशात मौखिक परंपरेने चालत आलेली ही कथा आहे. प्रसूतिश्रमांनी क्लांत झालेल्या सीतेने थोडी लापशी करून पिता यावी म्हणून गावकऱ्यांकडे मूठभर गहू मागितले. गावात उपऱ्या आलेल्या या बाईची या लोकांनी हेटाळणी केली; एवढीशी भीक घालण्यालाही नकार दिला आणि अद्भूत घडले. नवजात मुलांना दूधही मिळणार नाही या कल्पनेने सुशांता, संयमधना
जानकी छाव्यांच्या संरक्षणाकरीता सरसावणाऱ्या सिंहीणीच्या त्वेषाने गावकऱ्यांवर तुटून पडली. साऱ्या गावाला तिने शाप दिला, 'या परिसरात गहू कधीच उगवणार नाही.' "
 गावकरी मोठ्या अपराधी भावनेने सांगत होते, "खरंच साहेब, गहू कधी येथे उगवलाच नाही; गावकऱ्यांनी लावायचा कधी प्रयत्नही केला नाही. अलीकडे पंजाबमधून हायब्रीड गहू आला तेव्हा लोक तो लावू लागले."
 साऱ्या गावाने आपल्या पूर्वजांच्या अपराधाचा इतक्या निखळ प्रामाणिकपणाने जवाब द्यावा ही बाब कोणत्याही शीलाखंडापेक्षा मला अधिक विश्वसनीय वाटते.
 सीतामातेच्या या दिव्याचे काही स्मारक व्हायला पाहिजे असे वाटले. त्या काळी निवडणुकांच्या राजकारणासाठी अयोद्धेतील मशिद पाडून तेथे राममंदिर बांधण्याचा मोठा अट्टाहास चालू होता. कोट्यवधी रुपये त्या कामासाठी खर्च होत होते. अयोध्या मंदिराचे काही होवो, राममंदिरांचा देशात काही तोटा नाही. राम पुरुषोत्तम कितपत होता यासंबंधी शंबूकवादी संशय उभा करतात, पण जनककन्येच्या दिव्यत्वाबद्दल कोठे चकार शंकासुद्धा घेतली जात नाही.
 तेव्हापासून रावेरीचे गावकरी आणि शेतकरी महिला आघाडी एकत्र होऊन रावेरी गावी सीतेचे काही स्मारक असावे, साधने जुटविता आल्यास परित्यक्ता निराधार स्त्रियांना तेथे आतातरी लापशीसाठी पसाभर गहू मिळण्याची सोय व्हावी अशी योजना आखीत आहेत. गावकऱ्यांनी जमीन देऊ केली आहे, श्रमदानाची तयारी ठेवली आहे. पण यथोचित स्मारक म्हणजे मोठी खर्चाची बाब आहे. ज्या संघटनेचे त्यातले त्यात बरे कार्यकर्ते मोटारसायकलीत रॉकेल घालून प्रचाराचे काम करतात ती या कामासाठी पैसा कोठून उभा करणार? दहा वर्षे झाली, काम रखडले आहे. देशभर त्या अवधीत कित्येक स्वामीमहाराजांची वैभवशाली मंदिरे उभी राहिली. वनवासी सीतेचे रावेरीतील मंदिर अजूनही भग्नावस्थेत आहे; सीता अजूनही वनवासीच राहिली आहे.

दि. १०/१/२००१
■ ■