अन्वयार्थ - १/'हरिजन'वरील वाद अनाठायी


'हरिजन'वरील वाद अनाठायी


 गावाच्या वेशीबाहेर शतकानुशतके ठेवल्या गेलेल्या समाजांना काय नावाने संबोधावे हा मोठा नाजूक, कठीण आणि क्लिष्ट चर्चेचा विषय अनेक वर्षे चघळला जातो आहे. कांशीराम आणि मायावती यांनी अलीकडे 'हरिजन' शब्दाचा प्रयोग करणाऱ्या महात्मा गांधींवरही ते तुटून पडत; या जातीचा उल्लेख 'दलित' म्हणूनच झाला पाहिजे असा आग्रह धरला, तेव्हापासून या प्रश्नाला पुन्हा एकदा उकळी फुटली आहे एवढेच.
 फुकटची 'महारकी'
 नामाभिधानाचा प्रश्न किती नाजूक आहे याचा अनुभव संघटनेच्या कामात अगदी सुरुवाती सुरुवातीलाच मला आला. "शेती परवडत असती तर निवडणुका लढवून पुढारी होण्यासाठी कोणी धडपड केली नसती; शेतीत काही भेटत नाही, पुढारी बनले म्हणजे चंगळ होते म्हणून लोक राजकारणाकडे वळतात; नाहीतर पुढारीपणाची फुकटची उठाठेव करायला कोण जाईल? या लष्कराच्या भाकऱ्या कोण भाजेल?" ही कल्पना मांडण्याकरिता मराठीतील एका फार जुन्या वाक्प्रचाराचा मी एका सभेत उपयोग केला. "नाहीतर ही फुकटची म्हारकी कोण करेल?" असा प्रश्न टाकला. भाषणानंतर एक तरुण मला भेटायला आला आणि त्याने वाक्प्रचार म्हणूनसुद्धा 'म्हारकी' शब्द वापरला जावा याचा विरोध केला. मुद्दा काही मला पटला नाही.
 मुसलमान अमलात हिंदूंचा उल्लेख तुच्छतेने 'काफीर' व्हायचा म्हणून आम्हाला हिंदू म्हणू नका असा आग्रह कोणी धरला नाही. इंग्रजी अमदानीत 'भारतीय व कुत्रे यांना प्रवेश नाही' अशा पाट्या गौरकायांच्या खास राखीव जागात असत; पण म्हणून कोणी आम्हाला भारतीय म्हणू का असे कुणी म्हटले नाही. मग सनातन समाजाने ज्यांच्यावर अमानुष अत्याचार केले, त्यांनी आपल्याला मिळालेल्या ऐतिहासिक नावाचा राग का करावा? 'तुमच्या महाराचा मी महार' असे चोखोबांनी म्हटले; मग 'महार' म्हणून ओळखले जाण्यात अपमान तो काय आहे? मांग-चांभार ही व्यवसायांची नावे आहेत, त्या नावात वाईट काहीच नाही; त्या व्यवसायांना हीनता आली म्हणून ती नावे हीन बनली; पण, महार समाजाची कलाकार म्हणून कीर्तीही आहे. ब्रिटिश फौजेत महार बटालियनची शौर्याची कामगिरी मोठी सन्मानली जात असे. मग केवळ मराठी वाक्प्रचार वापरला गेला तर त्यात दुखावले जाण्याचे काही कारण नाही. 'फुकटची म्हारकी करायला लागणे' या वाक्प्रचारातल्या जातीचा उपमर्द नाही, उलट तिच्यावर होणाऱ्या घनघोर अन्यायाची जाणीव दाखविली आहे; अशा वाक्प्रचारांना तरी विरोध असू नये. महारांनी 'महार' अभिमानाने म्हणवून घेतले पाहिजे; सवर्णांनाच आपल्या जातीचे नाव सांगायला शरम वाटली पाहिजे. इ. इ. त्या तरुणाला पुष्कळ समजावण्याचा प्रयत्न केला; पण व्यर्थ.
 राजवाड्याचे रहस्य
 शेतीमालाच्या भावाचा लढा हाती घेऊन निघालो असता दुसऱ्या कोणत्याही मुद्यावर लक्ष विचलित होऊ देणे मला परवडण्यासारखे नसल्याने तो विषय मी सोडून दिला. दुसऱ्या एका सभेत पूर्वानुभवाने शहाणा झाल्यामुळे 'हरिजन' हा महात्माजींनी प्रचारात आणलेला शब्द वापरला. तेथेही विरोध करण्यासाठी एक तरुण भेटायला आला. महाराष्ट्रभर गावोगावी वेशीबाहेरच्या समाजात माझ्याविषयी मोठे प्रेम आहे. बहुतेक गावांत मी गेलो म्हणजे तेथील स्त्रिया प्रथम ओवाळायला येतात. त्यामुळे नामाभिधानाचा हा प्रश्न नाममात्रच त्रास देऊन गेला. महार एके काळी राज्यकर्ते होते; त्यामुळे गावोगावच्या त्यांच्या वस्तीस 'राजवाडा' म्हणतात. याचा उपयोग करून घेऊन 'गावठाण-राजवाडा' ऐक्याच्या कार्यक्रमात वेशीबाहेरील समाजाला नाव देण्याचे कुशलतेने टाळण्यात आले.
 ल्यबन्त का कभूधावि?
 महाराष्ट्रात बहिष्कृत समाजाचा प्रश्न श्री. म. माटे यांनी फार चिकाटीने हाताळला. परंपरागत रूढ शब्द 'अस्पृश्य' म्हणजे स्पर्श करण्यास अयोग्य अशा अर्थाचा होता. माट्यांनी 'अस्पृष्ट' म्हणजे आजपावेतो स्पर्श न झालेला असा शब्द आग्रहाने वापरला; पण दुसऱ्या कुणीच माट्यांचा शब्द उचलला नाही. कारण 'अस्पृष्ट' शब्द यथार्थ नव्हताच. शिवाशिवीचे प्रकरण पूर्णपणे कडकपणे पाळण्याचे दिवस केव्हाचं संपलेले होते; एका सबंध समाजाला स्पर्श न झालेले असे म्हणणेही चुकीचे होते. त्यांना स्पर्श झाला नसेल तर तो सवर्णांचा; पण म्हणजे त्यांना कधी कोणाचा स्पर्श झालाच नाही हे खरे नाही. 'अस्पृष्ट' शब्द बाद ठरला.
 खुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनाही हा नामाभिधानाचा प्रश्न खूप सतावून गेला. त्यांच्या लिखाणात त्यांनी अस्पृश्य आणि महार, मांग असे जातिवाचक शब्द सरसकट वापरले. इंग्रजी भाषेचा आधार घेऊन Depressed Classes असा शब्द त्यांनी वापरला. नंतर संबंधित जमातींची जंत्री १९३५ च्या कायद्यात परिशिष्टात देण्यात आली तेव्हा त्यांनी या समाजांचा उल्लेख 'शेड्यूल कास्ट्स (अनुसूचित जाती)' म्हणून केला. शेवटी बौद्ध धर्म स्वीकारून 'नवबौद्ध' शब्द तयार केला.
 गांधीजींच्या बाबतीत तर हा प्रश्न आणखीच बिकट होता. गांधीजी स्वतःला सनातनी हिंदू मानत असत. हिंदू धर्माचे स्वरूप वर्णाश्रम धर्माचे आहे. त्यामुळे चातुर्वर्ण्यालाही त्यांची मान्यता होती. विशुद्ध अवस्थेतील चातुर्वर्ण्य कोणाही जातिवर्णावर अन्याय करणारे नव्हते. चातुर्वर्ण्य कोणालाही हीन मानत नाही; आपण सगळी ईश्वराची लेकरे आहोत; त्यात चौथ्या वर्णाचेही लोक आले. 'ही परमेश्वराची लेकरे' आहेत या अर्थाने गांधीजींनी 'हरिजन' शब्द वापरण्यास सुरुवात केली. गांधीजी संपादित असलेल्या साप्ताहिकाचे नावही 'हरिजन' होते.
 हरिजन आणि सैतानपुत्र
 गांधीजींच्या या प्रस्तावाने अडचण दूर झाली नाही. परंपरागत नावे वापरणे विनाकारण निषिद्ध मानले आणि त्याऐवजी दुसरे काही नाव वापरायला सुरुवात केली तर साहजिकच विचित्र प्रश्न उभे राहतात. मायावतीबाईंनी असा एक प्रश्न उपस्थित केला आहे. 'दलित', 'हरिजन' आहेत, 'परमेश्वराची लेकरे' आहेत; मग बाकीचे लोक काय 'सैतानाची लेकरे' आहेत? हा त्यांचा तर्कशुद्ध प्रश्न आहे. (हिंदू व्यवस्थेत ३३ कोटी देव आहेत; पण सैतान नाही ही विसंगती सोडल्यास) पण सर्वांनाच 'हरिजन' म्हटले तर 'बहिष्कृत समाजा'चा उल्लेख वेगळा करायचा झाल्यास शब्द कोणता वापरावा? हा प्रश्न कायमच राहतो.
 नोकरीलक्ष्यी दलित चळवळ
 आंबेडकरी परंपरेतील कार्यकर्त्यांना 'दलित' हा शब्द पसंत आहे; पण हा शब्दही योग्य नाही. 'दलित' काही केवळ काही ठरावीक जातीतच जन्मतात असे नाही; सर्व जातीत अन्यायाचे बळी आहेत. शिवाय, या जातींतील सगळेच आज दलित आहेत असेही नाही. प्रकाश आंबेडकर, रामविलास पास्वान यांना कोणीही दलित कसे म्हणू शकेल?
 हा वाद खरा केवळ नावापुरता मर्यादित नाही. चौथ्या वर्णातील समाजांना भविष्यात काय स्थान राहणार आहे याबद्दल विचार भिन्न असल्यामुळे नावाविषयी वाद तयार होतो.
 चौथ्या वर्णातील माणसे जास्त करून बलुतेदारी करतात. इंग्रजांच्या आगमनानंतर त्यांचे उद्योगधंदे बुडाले. आर्थिक, सामाजिक विक्राळ अन्यायाला तोंड देण्याकरिता आंबेडकरांनी त्यांच्या अनुयायांना शहराकडे जाण्याचा सल्ला दिला. तेथे जाऊन त्यांनी काय करायचे? बलुतेदारीऐवजी आलेल्या उद्योगांचे लागणारे भांडवल त्यांच्याकडे नव्हते आणि तंत्रज्ञानही नव्हते. त्यांच्या परंपरागत कौशल्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन बाजारपेठेत त्यांना उद्योजक म्हणून उभे करणारी व्यवस्था मांडण्याऐवजी त्यांनी शहरात जाऊन नोकऱ्या मिळवाव्यात म्हणजे परंपरागत सामाजिक अन्यायातून त्यांची मुक्तता होईल, अशा विचाराची नोकरीलक्ष्यी दलित चळवळ उभी राहिली.
 बन्सीधरा! आता तू कोठे जाशील?
 याउलट, गांधीजींचा सल्ला 'गावाकडे चला' असा होता. स्वयंभू गावेच त्यांचे आदर्श जग होते. एक सारा बहुसंख्य समाज नोकऱ्या करून वर येईल अशा अजागळ कल्पनेवर त्यांचा विश्वास नव्हता.
 आता गांधीजींच्या स्वावलंबी गावांच्या स्वप्नाचा पाडाव झाला आहे आणि मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या उपलब्ध करून देणाऱ्या समाजवादी व्यवस्थेचाही पाडाव झाला आहे. स्वतःच्या पायावर उभे राहून स्पर्धेला टक्कर देऊ शकणाऱ्या उद्योजकांचे नवे युग येते आहे. या खुल्या व्यवस्थेच्या समाजाचे नेतृत्व भारतीय उद्योजकांचे नवे युग येते आहे. या खुल्या व्यवस्थेच्या समाजाचे नेतृत्व भारतीय उद्योजकांकडे म्हणजे बलुतेदार समाजाकडे असावयास पाहिजे होते; पण त्यांचे व्यवसाय केव्हाच मोडून पडले आहेत आणि उद्योजकतेकडे जाण्याऐवजी नोकऱ्यांकडे धाव घेण्यास, सांगितले. काही काम न करता, उत्पादन न करता भरपेट पगार भत्ते मिळवून देणाऱ्या नोकऱ्यांचा जमानाही संपत आला आहे. माट्यांच्या कथेतील 'बन्सीधरा'प्रमाणे दलित समाज गावचा राहिला नाही आणि शहरातला बनला नाही. सगळ्या समाजाची आर्थिक कोंडी झाल्याने उदारमनस्कता संपली. परिणामतः पिढ्यान्पिढ्यांचे अन्याय दूर करायचे म्हटले तरी खळखळ सुरू होते.
 हरिजन शरद जोशी
 आजच्या दलित चळवळीला अर्थशास्त्राचे वावडे आहे. त्यांच्या म्होरक्यांना परंपरागत खालच्या समजल्या जाणाऱ्या जातीत अपघाताने जन्म मिळाल्याचा लाभ उठवायचा आहे. जातीचे नामाभिधान त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे; विद्यापीठाचे नामांतर महत्त्वाचे आहे; त्यांच्या समाजाचे काय व्हायचे असेल ते होवो.
 मी माझ्यापुरता एक उपाय शोधून काढला आहे. मी परमेश्वर मानत नाही; तेव्हा स्वतःला परमेश्वराचे लेकरू 'हरिजन' म्हणवून घेण्याचा मला काही अधिकार नाही; पण शब्दार्थाने पाहायचे झाले तर माझ्या नावापुढे श्रीमान किंवा श्री. असे उपपद लावून घेण्याचाही मला अधिकार नाही. कोणतेही उपपद लावले तर ते चुकीचेच होणार, मग 'हरिजन' हे उपपद का वापरू नये? माझ्याशी पत्रव्यवहार करणाऱ्या आणि एरवी माझा उल्लेख करणाऱ्या सर्वांना माझी विनंती आहे; सगळ्या जगापुढे मी जाहीर करतो; यापुढे मला श्री. शरद जोशी असे न संबोधता 'हरिजन शरद जोशी' किंवा नसते 'ह. शरद जोशी' म्हणून संबोधण्यात यावे. श्री. हे उपपद माझ्या नावापूर्वी वापरल्यास माझ्या भावना दुखावतील.

(१३ मे १९९४)
■ ■