अन्वयार्थ - १/फटक्यांच्या शिक्षेतील माणुसकी
सिंगापूर एक स्वतंत्र श्रीमंत राष्ट्र मानले जाते. याचा आकार मुबई शहराएवढासुद्धा नाही. मलेशिया स्वतंत्र झाला, त्यानंतर सिंगापूर मलेशियातून वेगळे झाले, कोणताही भांडणतंटा न करता सामोपचाराने वेगळे झाले.
काही अजागळ सिद्धांत अनुसरण्याऐवजी हा चिमुकला देश सरळ कामाला लागला. स्वस्त मजुरीचा फायदा घेऊन श्रीमंत राष्ट्रांना लागणाऱ्या वस्तू आणि सुटे भाग स्वस्तात पुरवण्याची कारखानदारी सुरू झाली. आज इलेक्ट्रॉनिक आणि इतर काही क्षेत्रांत सिंगापूरमध्ये तयार झालेल्या मालावर अमेरिकन कारखानदारीसुद्धा अवलंबून राहते.
दोन महिन्यांपूर्वी या चिमुरड्या सिंगापूरचे पंतप्रधान आपल्या देशात भेट देण्यासाठी आले तेव्हा सारे पुढारी, कारखानदार इत्यादी मंडळी त्यांच्या अवतीभोवती नुसती आदाब घालत होती. सिंगापूरच्या पंतप्रधानांनी चांगल्या परखड शब्दांत त्यांना काही हिताच्या गोष्टी सांगितल्या आणि ते मोठे कडक आहेत. मादके बाळगणे हा मृत्यूदंडपात्र गुन्हा आहे. रस्त्यावरती थुंकले तरी प्रचंड दंड होतो. इकडे तिकडे घाण करणे याकरिता फटक्यांच्या शिक्षेचीही तरतूद आहे.
कायदा पुस्तकी दाखल होऊन बराच काळ झाला. वर्षाला पाचएकशे माणसांना फटक्यांची शिक्षा होते. सिंगापूरच्या रहिवाशांपैकी कोणाला फटक्यांची शिक्षा देण्याची फारशी वेळ येत नाही. मायकेल फे हा विशीतील अमेरिकन तरुण. सिंगापूर भेटीसाठी गेला आणि पुरे १० दिवस त्याने रस्त्यावर मोठा धुमाकूळ घातला. रंगाचे फव्वारे डबे घेऊन बाजूस उभ्या असलेल्या मोटारगाड्या वेड्यावाकड्या रंगवून टाकल्या. पोलिसांनी फेला पकडले. कोर्टापुढे उभे केले. त्याला चार महिने कैद, ७० हजार रुपये दंड आणि वर सहा फटक्यांची शिक्षा सुनावली गेली आणि येथे एका मेठ्या नाट्यमय कथानकाला सुरुवात झाली.
सिंगापूरमध्ये फक्याची शिक्षा अरब राष्ट्रांप्रमाणे जाहीररीत्या दिली जात नाही. कैद्याच्या अंगावरून चड्डीखेरीज सगळे कपडे उतरवले जातात. किडनींना अपाय होऊ नये म्हणन खास पॅडस लावले जातात. निर्जतुकात बडवलेल्या १.२७ सेंमी जाडी आणि १.२० मीटर लांबीच्या दंडुक्याने फटके देण्यात येतात.
अमेरिकेची मग्रुरी आणि तत्त्वज्ञान
अमेरिकन तरुणाला फटक्यांची शिक्षा होणार असे कळताच अमेरिकेत मोठी खळबळ माजली. खुद्द राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी फेवर दया दाखवण्यात यावी अशी विनंती केली. फटक्यांची शिक्षा योग्य-अयोग्य याबद्दल मोठा वादविवाद चालू आहे. अशा कडक शिक्षांमुळे सिंगापूरने जी प्रगती साधली तिची सगळेजण शिफारस करतात. इंग्लिश शाळांचा अनुभव असलेले शिक्षकांच्या हातून खाल्लेल्या छड्यांच्या फटक्यांमुळे आपले आयुष्याचे कल्याण झाले असे आग्रहाने सांगतात. 'छडी वाजे छम छम् विद्या येई घमघम्' या अर्थाच्या म्हणी प्रत्येक भाषेत आहेतच.
याउलट शारीरिक दंड देण्याची कल्पना बहुतेक भद्र लोकांना अमानुष वाटते. अशा शिक्षांना मान्यता मिळाली तर कैद्यांचा छळ करण्यासाठी त्याचा उपयोग होईल अशी त्यांना थोडीफार रास्त भीती पण वाटते. शरीरिक दंड झालेल्या माणसाला होतात त्यापेक्षाही जास्त वेदना त्याच्या जवळच्या नातेवाईक मित्रमंडळींना होतात. आपल्या कोणा प्रिय माणसास जाणीवपूर्वक ठरवून ठरावीक वेळी शरीरयातना दिल्या जाणार आहेत या कल्पनेनेच जवळच्या नातेवाइकांना आजारीपण ओढवते. इत्यादी युक्तिवाद अमेरिकेत केले जात आहेत. गमतीची गोष्ट म्हणजे फटक्यांची शिक्षा रानटी वाटणाऱ्या अमेरिकेत आजही मृत्युदंड रद्द झालेला नाही. विजेची खुर्ची, गॅस चेंबर अशा आधुनिक मर्गांनी मृत्युदंड दिला जातो; पण फटक्यांची शिक्षा मात्र त्यांना अमानुष वाटते.
या तक्रारीमागे एक महासत्तेचा दंभ आहेच. अमेरिकेच्या नागरिकाला एवढ्याशा चिमुरड्या देशात फटक्यांची शिक्षा होणे हा राष्ट्रीय अपमान आहे ही मनातली रुखरुख, तत्त्वज्ञान मात्र वेगळे, फटक्यांची शिक्षा जंगली आहे, सुसंस्कृत समाजात कोणत्याही गुन्ह्याकरतिा दंड आणि कैद एवढ्याच शिक्षा असाव्यात, बाकीच्या सगळ्या शिक्षा मानवतेविरुद्ध आहेत. अमानवता कशात आहे आणि कशात नाही हे ठरवण्याचा स्वयंसिद्ध अधिकार अमेरिकींना आहे. इतर देशांनी आपला रानवटपणा आपल्या नागरिकांवर चालवावा. इ.इ. पण अमेरिकी नागरिकांवर जगभर अमेरिकी कायद्यांचाच अंमल झाला पाहिजे ही मग्रुरी या बडबडीमागे लपलेली आहे.
अमेरिकन तुरुंगापेक्षा फटके परवडले
अमेरिकन तुरुंगामध्ये ज्यांनी काही काळ कंठला आहे अशांनी लिहिलेली वर्णने आणि आत्मचरित्रे उपलब्ध आहेत. अमेरिकन तुरुंगांची रचना बहुमजली पिंजऱ्यांसारखी असते, कोठड्या छान स्वच्छ असतात. अंथरूण, पांघरूनण, कपडे साफ स्वच्छ असतात. कैद्यांना मिळणाऱ्या जेवणाचा मेनू पाहून आमच्यापैकी भल्या मध्यमवर्गीयांच्या तोंडाला पाणी सुटले, वैद्यकीय सेवा उत्तम, अमेरिकन कैदेत काही काळ राहिलेल्या माणसाची दातांची निगा इतकी चांगली राखली जाते, की तुरुंगात राहिलेला माणूस त्याच्या दातावरून ओळखू येतो; पण संध्याकाळी एकदा कोठडीत परतले, की भयानक गुंडगिरीचे साम्राज्य न मानल्यास तुरुंगातही खून पाडले जातात. अमेरिकन कैदेत राहिला आणि समलिंगी संभोगाला बळी पडला नाही असा कैदी स्त्री किंवा पुरुष असणे जवळजवळ अशक्य आहे. मध्यंतरी हिंदुस्थानातील एक पुढारी, नेहरू घराण्याचा दोस्त श्री. युनुस यांच्या मुलाने अमेरिकेत काही पराक्रम गाजवले. त्याला दीर्घ मुदतीची कैदेची सजा झाली. अमेरिकन कैद म्हणजे काय भयानक अनुभव आहे याची शब्दचित्रे त्यावेळी आपल्याकडील वर्तमानपत्रात आली होती. पंतप्रधान राजीव गांधी यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावून युनुसपुत्राची सोडवणूक केली. अमेरिकन कैदेतील अत्याचारांना सामोरे जाण्यापेक्षा पाचपन्नास फटक्यांची शिक्षा पुष्कळ कैदी आनंदाने कबूल करतील.
अमेरिकी तुरुगपद्धतीबद्दल अनेक तक्रारी आहेत. तुरुंगात गुन्हेगारी बळावते, एका कैद्यावर ३०,००० डॉलरच्या आसपास वार्षिक खर्च होतो, कैदी आरामात राहतात आणि त्यांच्या गुन्ह्यांना बळी पडलेले आणि त्यांचे कुटुंबीय दारिद्र्यात आणि हालअपेष्टात दिवस काढतात हाही मोठा अन्याय आहे.
फटक्यांचा प्रथमपुरुषी अनुभव
थोडक्यात फटके म्हणजे अमानुषता आणि कैद म्हणजे सुसंस्कृतपणा हा समज काही खरा नाही; तरीही अमेरिकेतील वर्तमानपत्रे फटक्यांच्या शिक्षेविरुद्ध लिखाणांनी भरून गेली आहेत. फटक्यांच्या शिक्षेचा अनुभव घेतलेली माणसे त्या अनुभवाबद्दल तपशीलवार लिहीत आहेत. ४० वर्षांचा एक माणूस २३ वर्षांपूर्वी म्हणजे तो केवळ १० वर्षांचा असताना त्याने सोसलेल्या फटक्यांच्या शिक्षेचा अनुभव लिहतो.
"त्या दिवशी दुपारी फटक्याची शिक्षा देणारे आम्ही पाचजण होतो. प्रत्येकाला मनात आशा वाटत होती, की आपली पाळी शेवटी यावी, कदाचित फटके मारणाऱ्याचे हात तोपर्यंत थोडेफार तरी थकून जातील. माझे दुर्दैव, मला पहिल्यांदाच नेण्यात आले."
दोन वॉर्डर्सनी मला धरून फटके मारण्याच्या खोलीकडे नेले, नंतर त्यांच्या आधाराखेरीज मला परत येता आलेच नसते. फटका मारणारा छडी दोन्ही हाताने वाकवून बघत होता, माझे पाय कापू लागले.
फटके मारणारा मोठा धिप्पाड आणि कमावलेल्या शेरीराचा होता. तो माझ्याकडे पाहत होता; पण मी त्याला दिसत नव्हतो. दुसऱ्या वॉर्डरने माझे कपडे उतरवले. एका लाकडी चौकटीला हातपाय बांधण्यात आले. माझ्या सगळ्या अंगास कापरे भरले होते आणि भीतीने घाम फुटला होता.
मग छडीचा आवाज मी ऐकला. एखादी सपाट फळी भिंतीवर आपटावी तसा. अर्ध्याएक सेकंदानंतर छडी माझा पृष्ठभाग फाडून घुसली आहे याची मला जाणीव झाली. मी किंचाळलो. एखाद्या पिसाळलेल्या प्राण्याप्रमाणे धडपडलो. काहीही करून येथून सुटून पळून जावे एवढी एकच इच्छा राहिली. मला बांधून ठेवले नसते तर पहिल्याच छडीच्या झटक्याने मी मैलभर तरी पळत गेलो असतो.
मी किंचाळ्या देतच राहिलो आणि फटके चालूच राहिले. एक फटका एक मिनिट काही फटके पूर्वीच्या फटक्यांच्या जागीच पडत आधीच फाटलेले कातडे आणखी फाटत जाई.
शिक्षा पार पडल्यानंतर एक डॉक्टरने काही निर्जंतुकं लावली. माझा पृष्ठभाग सुजून मूळ आकाराच्या दुप्पट झाला होता. मांड्या निळ्याकाळ्या पडल्या होत्या. दोन आठवडे मला बसता येत नव्हते, पाठीवर झोपता येत नव्हते, अंघोळ करता येत नव्हती, की साधी चड्डीसुद्धा घालता येत नव्हती.
राक्षसांचे योग्य पारिपत्य
आर्थर रोड, तिहार, नाशिक येथील तुरुंगात अट्टल खुनी, गुंड, कैदी तुरुंगात स्वतःकरिता आलिशान कमरे बांधून घेतात. भरगच्च जेवण, मद्ये, मादके, त्यांना उपलब्ध असतात. टेलिव्हिजन, टेलिफोन, वातानुकूलक, काहीच कमी नाही आणि त्याचवेळी या गुंडांच्या अत्याचाराला बळी पडलेले भाकरीला मोताद होऊन वणवण फिरत असतात आणि त्यांनी बलात्कार केलेल्या तरुणी आकाश फाटल्याप्रमाणे धाय मोकलून रडत असतात. ही चित्रे पाहिली म्हणजे आमच्या कैदेपेक्षा सिंगापूरची फटक्यांची सजा मानवतेचा अधिक सन्मान करणारी आहे असे वाटते. निदान अजाण मुली आणि स्त्रिया यावर केवळ पाशवी ताकदीने बलात्कार करणारे आणि सरकारी सत्तेच्या माजात देशावर बलात्कार करणाऱ्यांसाठी फटक्यांची शिक्षा आणली पाहिजे, काही काळ तरी ठेवली पाहिजे. मानवतेचे हक्क गुन्हेगारांनाच आहेत आणि सामान्य जनांना नसतात असे थोडेच आहे!
(२० मे १९९४)
■ ■