अन्वयार्थ - १/पंतप्रधान नरसिंह राव अमेरिकेचे 'स्टेट गेस्ट'
पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांची अमेरिका भेट पार पडली. गरीब देशांच्या नेत्यांच्या आयुष्यात अमेरिकेचा दौरा म्हणजे यशाचे शिखर. अमेरिकन राष्ट्रपतींबरोबर त्यांची झालेली आमने सामने शिखर बोलणी हा पंतप्रधानांच्या अमेरिका दौऱ्याला सर्वात महत्त्वाचा कार्यक्रम. भेटीत प्रत्यक्षात काय घडले असेल हे सामान्य लोकांना समजण्याचा काही मार्ग नाही. बोलणी सुरू होण्याच्या आधी, नंतर दोघा नेत्यांचे हास्यमुख चेहरे स्थिर आणि चलत कॅमेऱ्यांनी टिपले; जगभर प्रसिद्ध झाले. भेटीनंतर दोघांनीही पत्रकारांसमोर निवेदने दिली; पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. हे सगळे लोकांना पाहायला आणि ऐकायला मिळाले; पण अमेरिकन राष्ट्रपती भवनात आत गेल्यानंतर काय घडले हे पाहायला आणि ऐकायला कोणी कॅमेरा उपस्थित नव्हता. दरवाजा बंद झाल्यानंतर आत काय घडले याबद्दलचे कुतूहल कितीही प्रबळ असले तरीही ते दाबून ठेवण्याखेरीज काही गत्यंतर नाही; पण ही शिखर परिषद म्हणजे एवरेस्ट आणि खैरोबाचा डोंगर यांच्या भेटीसारखीच.
नरसिंह राव कोणत्या पंक्तीत?
पंतप्रधानांच्या अमेरिका भेटीचा क्रमांक दोनचा महत्त्वाचा प्रसंग म्हणजे पंतप्रधानांचे अमेरिकन प्रतिनिधी सभेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीसमोर झालेले अभिभाषण. साऱ्या जगाचे, जवळजवळ सर्वच क्षेत्रात अमेरिका नेतृत्व करते. त्यामळे परदेशी अति अति महत्वाच्या व्यक्तींची तेथे रीघ लागलेली असते. निदान दर दिवसाआड कोणी ना कोणी पंतप्रधान, राष्ट्रपती भेटीसाठी तेथे जातोच. इंग्लंड, जर्मनी, जपान अशा बड्या देशांचे नेते वॉशिग्टनला जातात ते कामकाजासाठी. त्यात उभय पक्षांना स्वारस्य असल्यामुळे भेटीचे कार्यक्रम शिस्तशीर आखले जातात. अलबत्या गलबत्या देशांचे प्रमुख अमेरिकन भेटीत जातात ते मायदेशी आपली प्रतिमा उंचावावी याकरिता. अमेरिकन राष्ट्रध्यक्षांनी हस्तांदोलन करतानाचे चित्रण देशातील वर्तमानपत्रात आणि टेलिव्हिजनवर झळकले म्हणजे आपली लोकप्रियता वाढेल आणि निवडणुकात दोन मत जास्त मिळतील अशा आशेने टिनपाट राष्ट्रांचे नेते अमेरिकेत मिरवायला धडपडत असतात.
मराठीतील प्रख्यात विनोदी लेखक चि.वि. जोशी यांनी चंदनवाड संस्थानातील त्यांच्या भेटीचे मोठे बहारदार वर्णय 'चिमणराव स्टेट गेस्ट' या कथेत केले आहे. संस्थानिकांच्या पंक्तीला बसायचा मान अनेकांना मिळे. पंगतीत वर्गवारी असे. खाशांच्या पंक्तीला दोन दोन पक्वान्ने, साजूक तूप, ते वाढायला स्वतः राणीसाहेब, दुसऱ्या पंक्तीला पुरणपोळी, वाढप आचाऱ्यांकडे. तिसऱ्या वर्गाला पुरी आणि चौथ्या वर्गाला चपाती अशा पंक्तीप्रपंचाचे मोठे गंमतीदार वर्णन त्यात आहे.
सुलतानांच्या कतारी
भेट देणाऱ्या पाहुण्याची स्थिती चंदनवाड संस्थानाच्या शाही पाहुण्यांसारखीच असते. आलेल्या पाहुण्याला त्याच्या त्याच्या वर्गाप्रमाणे वागणूक मिळते. आपापल्या देशात सम्राटाप्रमाणे येथे रांगा लावून उभे राहतात. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष विमानतळावर स्वागत करण्यासाठी कधीच जात नाहीत. राष्ट्रपतीभवन श्वेतनिकेतनजवळ असलेल्या हेलिकॉप्टरच्या धावपट्टीवर राष्ट्रपती पाहुण्यांच्या स्वागतासाठी आले, की त्यांचा मोठा मान झाला समजायचे. राष्ट्रपतींशी चर्चा किती वेळ चालली हे दुसरे पाहुण्यांच्या स्वागतासाठी आले, की त्यांचा मोठा मान झाला समजायचे. राष्ट्रपतींशी चर्चा किती वेळ चालली हे दुसरे पाहुण्यांच्या प्रतिष्ठेच गमक. राष्ट्रपती भावनात पाहुण्यांकरिता खास मेजवानी झाली काय? ती किती जंगी होती? ही पाहुण्यांच्या वर्गवारांची आणखी एक फूटपट्टी. अमेरिकन प्रतिनिधी सभागृहासमोर भाषण करायला मिळणे हा विशेष मान समजला जातो. काही खास प्रसंगाने किंवा उभयराष्ट्रांत काही महत्त्वाच्या समस्या उभ्या असतील तरच असे अभिभाषण ठरवले जाते.
हम भी कुछ कम नही
पंतप्रधानांचा अमेरिका दौरा ठरला, त्याबरोबर अमेरिकन प्रतिनिधी सभेच्या बैठकीसमोर अभिभाषण करण्याकरिता त्यांना निमंत्रण यावे यासाठी विदेश मंत्रालयाची धडपड सुरू झाली. कारण समजण्यासारखे आहे. आपणास निमंत्रण मिळावे अशी कोणत्याही नेत्याची, अगदी टिनपाट देशाचा का असेना, तहान असणारच.राव साहेबांच्या दृष्टीने तर अभिभाषणाचे निमंत्रण येणे हा जीवनमरणाचा प्रश्न होता. राजीव गांधी अमेरिकेत गेले तेव्हा त्यांना अमेरिकन संसदेच्या सभापतींनी आपणहून निमंत्रण दिले होते. तरुण रुबाबदार व्यक्तिमत्त्व, ऋजुहास्य आणि घासून पुसून तयार केलेले भाषण यामुळे राजीवजींनी मोठी जबरदस्त छाप पाडली होती. त्यांचे भाषण दूरदर्शनवर ज्यांनी ज्यांनी पाहिले त्यांना आपण भारतीय असल्याचा अभिमान वाटला होता.
'सोनिया'चा दिवस
राव साहेबांना अभिभाषणाचे निमंत्रणदेखील न येणे हे त्यांच्या इथल्या प्रतिमेस बाधा आणणारे झाले असते. राव साहेब पंतप्रधानाच्या खुर्चीवर भले विराजमान झालेले असोत, त्यांची बरोबरी काही जगाच्या नजरेत राजीव गांधींशी नाही असा अर्थ निघतो. विदेश मंत्रालयाने धडपड करून अभिभाषणाचे निमंत्रण तर मिळविले, "सोनियाचा दिवस आजि अमृते पाहिला." राव साहेबांना धन्य धन्य झाले. १० जनपथच्या सोनियाने विरोध केला नसावा.
अलीकडे अमेरिकन संसदेच्या संयुक्त बैठकीसमोर झालेले आणि गाजलेले भाषण पॅलेस्टिनी मुक्ती शासनाचे यासर अराफत आणि आयरिश मुक्ती चळवळीचे जेरी ॲडम्स यांचे. दोघांच्याही भाषणाच्या वेळी सभागृह तुडुंब भरलेले; किरकोळ अपवाद सोडल्यास सर्व सिनेटर आणि प्रतिनिधी पाहुण्यांच्या प्रेक्षाकक्षेत तुडुंब गर्दी; असा मोठा जबरदस्त कार्यक्रम झाला.
तीन मिनिटांच्या टाळ्या
ज्या दिवशी पंतप्रधान नरसिंह राव यांचे अमेरिकन प्रतिनिधी सभागृहात भाषण झाले त्यावेळी मी प्रवासात होतो. भाषण ऐकण्याची, पाहण्याची संधी काही मिळाली नाही. नागपूरला पोचलो तेव्हा ॲडव्होकेट शरद बोबडे आनंदात आणि खुष दिसले. सौ. कामिनी बोबडे पंतप्रधानांबरोबर पत्रकार म्हणून गेलेल्या आहेत; त्यांचा फोनवरून निरोप आला होता, "पंतप्रधानांच्या भाषणानंतर सर्व सभागृहाने तीन मिनिटे उभे राहून टाळ्यांचा कडकडाट केला. पंतप्रधानांच्या भाषणातही अनेक वेळा टाळ्यांचा कडकडाट झाला." राजीव गांधीपेक्षा राव साहेब काही कमी नाहीत त्यांनीही मैदान तितकेच भरले, असे मस्त वातावरण होते. तीन मिनिटांच्या टाळ्या म्हणजे अमेरिकेत विशेष नाही. अमेरिकन रिपब्लिकन किंवा डेमॉक्रेटिक पक्षाच्या अधिवेशनात अध्यक्षीय उमेदवाराची निवड जाहीर होते तेव्हा नवा उमेदवार बोलायला उभा राहतो तेव्हा किंवा त्यांचे भाषण संपल्यावर सारे लोक उभे राहून टाळ्यांचा कडकडाट करतात. शेकडो युवतींचे खास ताफे उत्साहवर्धक नृत्ये करतात. संगीत बेडबाजा यांचा एकच गदारोळ होतो. आपल्या उमेदवारांसाठी इतर कोणाहीपेक्षा जास्त वेळ टाळ्यांचा कडकडाट चालेल असे नियोजन करण्याची अमेरिकेतील राजकीय दलालांची पद्धत आहे. दंतमंजनाच्या ट्यूबवर तीनच प्रकारचे आकार दाखवले जातात. लार्ज, सुपर, आणि जायन्ट. लहान किंवा छोटी ट्यूब नसतेच. तसे अमेरिकेतील औषचारिक टाळ्यांचा कडकडाट तीन मिनिटांच्या खाली नसतोच. मी ही टिप्पणी केली आणि आसपासचे लोक थोडे नाराज झाले.
किती येती जाती!
आपल्या देशाचा पंतप्रधान अमेरिकेत गेला म्हणजे आपल्याकडली वर्तमानपत्रे आणि बाकीची सारी माध्यमे त्यांच्या दौऱ्यासंबंधीच्या बातम्यांनीच भरून जातात. आपली समजूत अशी होते की तेथे भेटीच्या काळात लोकांचा चर्चेचा, एकमेव नसला तरी मुख्य विषय भेटीचाच असला पाहिजे. प्रत्यक्षात परिस्थिती अगदी वेगळी असते. राव साहेबांच्या दौऱ्याच्या काळात बहुतेक अमेरिकन नागरिकांना दौरा चाल असल्याची माहितीही नव्हती. तिथल्या वर्तमानपत्रात अग्रभागी विदेशी बातम्या बोस्निया, रुआंडा, सोमालिया आणि येमेन येथील पत्रकारांनी उपेक्षाच केली. त्यांच्या भेटीबद्दल कमालीची उदासिनता होती.
सभेला गर्दी जमवणे
राव साहेबांच्या संयुक्त अभिभाषणाच्या वेळी प्रत्यक्षात काय घडले? सभागृह गच्च भरलेले होते. प्रत्यक्ष मोजदाद केली तेव्हा उपस्थितांत एकूण १०० पैकी फक्त १८ सिनेटर आणि ४३५ खासदारांपैकी फक्त ३० राव साहेबांच्या भाषणाला उपस्थित होते. म्हणजे बहुतेक प्रतिनिधी आठवड्याच्या सुट्टीसाठी आपापल्या मतदारसंघात निघून गेले होते. सभागृहाच्या नियमांप्रमाणे कोरमसुद्धा पुरा नव्हता. सभागृहाच्या मोकळ्या जागा पंतप्रधानांबरोबरच गेलेली एक जंबोजेटभर माणसे, इतर निमंत्रित आणि अमेरिकन काँग्रेसच्या सचिवालयातील कर्मचारी यांची भरल्या होत्या. सभागृह भरलेले असणे अमेरिकन संसदेच्या प्रतिष्ठेकरिता आवश्यक होते. गैरहजर सिनेटर आणि खासदार यांनी जाणून बुजून राव साहेबांचा अपमान केला असे नाही. राव साहेबांच्या येण्या-जाण्यात त्यांना काही स्वारस्यच नव्हते.
शालेय वक्तृत्व स्पर्धा
राव साहेबांच्या भाषणास खूप टाळ्या पडल्या 'वॉशिंग्टन पोस्ट'ची पत्रकार मेरी मोनोरो लिहिते, "टाळ्या वाजवणारे प्रामुख्याने जागा भरण्यासाठी घुसवलेले कर्मचारी होते." त्यांची बुडे कधी नव्हे ती सभागृहातील खुर्त्यांना लागलेली, ते प्रसंग खुशीत साजरा करण्याच्या मनस्थितीत होतेच. राव साहेब मात्र पडणाऱ्या टाळ्यांवर खुष होते. त्यांना मारून मुटकून जमा केलेल्या सभांची चांगली सवय आहे. महाविद्यालयातील वक्तृत्व स्पर्धेत बोलत असल्याप्रमाणे अब्राहम लिंकन, इमर्सन इत्यादींची वचने थाटात उद्धृत करीत राहिले. साखर खाण्याची सवय मोडण्यासंबंधी गांधीजींची त्यांनी सांगितलेली कथा लोकांना खूप हसवून गेली. शालेय वक्तृत्व स्पर्धेतही या कथेवर हुकमी टाळ्या पडतातच पडतात.
दोष नसे गरिबीला; दोष दरिद्री गर्वाला
आम्ही एक गरीब देश आहोत, आमचा इतिहास मोठा आहे, भविष्यातही एक ना एक दिवस भारत वैभवाच्या शिखराला पोहोचेल; पण तोपर्यंत आम्ही मोठे आहोतच, आमचे शास्त्रज्ञ थोर, आमचे राजकीय नेते तर महाथोर असल्या आत्मवचनांनी काय साधायचे आहे? इतके दिवस देशी लोक तरी फसले आता तेही कठीण आहे. देशाची प्रगती शासनाने खुंटवली आहे, इतर नाटके, सोंगेढोंगे करण्यापेक्षा आम जनतेच्या कर्तबगारीला पूर्ण वाव देऊन सरकारी हस्तक्षेप कमी केला तर भारत इतक्या झपाट्याने प्रगती करेल, की पाच-दहा वर्षात भारतीय पंतप्रधानांनी अमेरिकेला भेट द्यावी याकरिता तिकडून आवर्जून प्रयत्न होतील आणि पंतप्रधानांच्या भाषणाच्या वेळी लुंग्यासुंग्यांना सभागृहात बसवून गर्दी जमवण्याची गरज पडणार नाही. तोपर्यंत देशातील प्रतिष्ठेसाठी परदेशी अवहेलना सहन करणे सहज टाळता येईल.
(१० जून १९९४)
■ ■