अन्वयार्थ - १/भ्रष्टाचाराचा समुद्र प्राशन करण्या पद्मभूषण अगस्ती आला
राळेगण शिंदीचे अण्णासाहेब हजारे हे देशभरातील मान्यवर व्यक्तिमत्व आहे. लष्करातील एक साधा जवान. सेवानिवृत्तीनंतर आपल्या गावी परततो, काही कामाला लागतो. थोड्याच वर्षात त्याचा इतका बोलबाला होतो, की देशविदेशातील पत्रकार आणि टेलिव्हिजनचे कॅमेरावाले राळेगण शिंदीला रांगा लावतात. फारसे उच्चशिक्षित नसलेले अण्णासाहेब अनेक सरकारी, निमसरकारी समित्यांवर सन्मानाने नियुक्त झालेले आहेत. देशी-परदेशी दानशूर संस्थांची राळेगण शिंदीबरोबर आपलेही नाव जोडले जावे म्हणून धडपड चालते. त्याखेरीज विकासाच्या यच्चयावत योजनांचा फायदा अण्णसाहेबांच्या दबदब्याने राळेगण शिंदीस मिळाला, एवढेच नव्हे तर प्रयत्न न करता मिळाला. महाराष्ट्रातील बहुतेक गावांना भगीरथ प्रयत्न करून एकअर्धा प्रकल्पही मिळत नाही. सरकारी अधिकारी आपणहून राळेगण शिंदीत येऊन योजना राबवून देतात. विनोबा भाव्यांप्रमाणेच अण्णासाहेबांची गणना सरकारी संता मध्ये कित्येक वर्षे होत आहे. प्रथम पद्मश्री मग पद्मभूषण अशा राष्ट्रीय सन्मानांनी अण्णासाहेब भूषविले गेले.
१०-१२ वर्षांपूर्वी मीही कुतूहलापोटी राळेगण शिंदीस गेलो होते. 'योद्धा शेतकरी'चे लेखक विजय परूळकर अण्णासाहेब जगाला फारसे परिचित नव्हते तेव्हापासूनचे त्यांचे चाहते. ते मला आग्रहाने घेऊन गेले. त्यावेळी अण्णासाहेबांच्या कामाची सुरुवातच होती; पण सगळे गाव अण्णांच्या व्यक्तिमत्त्वाने भारलेले दिसले. गांधीवादी अगदी चिल्लर संत देशभर जागी जागी आश्रमाच्या रूपाने जायदाद जमवून विधायक काम दाखवीत आहेत. त्यांच्या आश्रमात आणि गावात जसा एक आध्यात्मिक दबदबा जाणवतो तसाच या साध्यासुध्या माणसाने तयार करावा याचे थोडे अद्भुतही वाटले.
हिरवी शेती, देणग्यांचा पूर
अण्णासाहेबांनी राळेगण शिंदीस काय दिलेय निव्वळ कोरडवाहू गाव. पाऊसमानही बेताचेच पण जो काही पाऊस पडतो तो वेगवेगळ्या पद्धतीने साठवून आणि जमिनीत जिरवून शेतीला पाण्याचा आधार देण्याचा सामूहिक कार्यक्रम अण्णासाहेबांनी राबवला. ओसाड जागी पिके दिसू लागली. शेती हिरवीगार दिसली, की संपन्नता आली असा शहरवासीयांचा समज होतो. साहजिकच राळेगण शिंदी गावात स्वर्ग अवतरला असा गवगवा झाली. गाव दिसतेही बऱ्यापैकी सुखवस्तू. अण्णासाहेबांच्या तेजोवलयामुळे गावात ओतला जाणारा विविध निधींचा प्रवाह नसता तर काय झाले असते, सांगणे कठीण आहे. शेतकऱ्यांच्या डोक्यावर सरकार उणे ७० टक्के सबसिडी लादते हे 'डंकेल प्रस्तावा'च्या संबंधात जगजाहीर झाल्यानंतर एक एक गावाची सुधारणा आणि उद्धार करण्याची कल्पना किनकालात निघाली आहे.
रुपया-पैशाचा हिशेब बाजूला ठेवला तरी राळेगण शिंदी हिरवे करण्याचा चमत्कार बाकी राहतोच. अण्णासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव नसला तर हा प्रयोग किती दिवस टिकेल? ७२ सालासारखा दुष्काळ पुन्हा आला तर इतर गावांच्या तुलनेने राळेगण शिंदी दोन तीन महिने तरी अधिक टिकाव धरील काय? राळेगण शिंदीसारखाच प्रयोग करण्यासाठी भौगोलिक परिस्थिती असलेली गावे किती? त्यात राळेगण शिंदीच्या नमुन्याबरहुकूम काम उभे राहू शकेल काय? हे सारे प्रश्न अनुत्तरित आहेत; पण महात्म्यांच्या अवतार कार्यात असल्या प्रश्नांना महत्त्व नसते. एका गावातील का होईना लोकांमध्ये त्यांनी चैतन्य उभे केले आणि जगभरच्या ग्रामोद्धार करू पाहणाऱ्या लोकांची मथुरा-काशी नगर जिल्ह्यातील छोट्याशा दुष्काळी गावात अवतरली हे कोणाला नाकारता येणार नाही.
अण्णांचा सात्त्विक क्रोध
अण्णासाहेबांच्या कामाचा एक सामाजिक भागही होता. गावात त्यांनी दारूबंदी जाहीर केली. दारू पिणाऱ्या माणसाला खांबाला बांधून थोबाडून काढण्यास हा महात्मा कचरत नसे. लोकांच्या नैतिकतेची अण्णासाहेबांना इतकी चिंता, की गावातील दूरदर्शनवर छायागीत पाहण्याचीसुद्धा बंदी अण्णासाहेबांनी घातली होती. बंदी उघडपणे मोडलेली तरी कोठे दिसत नसे.
अण्णा लष्करी जवान; पण वेशभूषा साने गुरुजींच्या पद्धतीची. चेहऱ्यावरील मुद्रा अगदी शालीन सौजन्याची. त्यात ग्रामोद्धाराच्या कामाची जोड. साहजिकच यथावकाश अण्णासाहेबांचा गांधीवादी म्हणून वर्तमानपत्रात उल्लेख होऊ लागला. माझी त्यांची भेट झाली तेव्हा आंदोलनाची आवश्यकता आपल्याला वाटत नाही असे त्यांनी सांगितले. आपल्या आपल्या रस्त्याने चालणारा हा मनस्वी कार्यार्थी आहे. सुखदु:खे न गणता काम करतो आहे. अनुभवाने राळेगण शिंदींच्या प्रयोगाच्या मर्यादा उमजून घेईल आणि ग्रामीणांच्या आंदोलनात उतरेल अशी मनात आशा ठेवून होतो. राळेगण शिंदीच्या बाहेर पडून ३०० गावात पाण्याचा प्रयोग सरकारी मदतीने राबवण्याचा त्यांचा अलीकडला निर्धार ऐकून खूप आनंद झाला. या प्रयोगातील मर्यादा आता स्पष्ट होऊन जातील याची मला निश्चिती वाटत होती. ग्रामोद्धाराचा विस्तार, व्याप वाढला, की त्यातली निरर्थकता आपोआपच स्पष्ट होणार आहे.
भ्रष्टाचारावर मोर्चा वळवला
पण हा धोका अण्णांच्या लक्षात आला असावा. एका गावावर २० वर्षे ओतणाऱ्या अण्णासाहेबांनी ३०० गावांचा प्रयोग अर्धवट सोडून दिला आणि ते भ्रष्टाचाराच्या प्रश्नाकडे वळले. भ्रष्टाचार हा खरोखरच मोठा जळता प्रश्न आहे. १० वर्षांवर अनेक सरकारी योजना राबवताना अण्णासाहेबांना याचा दाहक प्रत्यय वेळोवळी आला असणारच. राळेगण शिंदीच्या कल्याणाच्या इच्छेपोटी शासनात वरपासून खालपर्यंत सुटलेली भ्रष्टाचाराची भयंकर दुर्गंधी अण्णासाहेबांनी मोठ्या कष्टाने सहन केली असावी. गेली काही वर्षे ते भ्रष्टाचाराबद्दल. निषेधापोटी त्यांना मिळालेल्या सन्मानांपैकी पद्मश्री परत करण्याचा निश्चय त्यांनी अनेक वेळा जाहीर केला आणि मागे घेतला. पद्मभूषण मिळालेल्या माणसाने पद्मश्री परत करणे म्हणजे एम. ए. झालेल्याने ती पदवी ठेवून बी. ए. ची पदवी परत करण्यासारखा प्रकार; पण अण्णासाहेबांच्या सरळ सोज्वळ मनाला हे बारकावे समजले नसावेत.
गांधींपेक्षा वेगळा महात्मा
१७ अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई व्हावी असा त्यांनी आग्रह धरला. साहजिकच मुख्यमंत्री कात्रीत सापडले. सरकारी संत अण्णांना नाराज करून चालणार नाही हे खरे; पण आखाडसासू नोकरशाहीला तोंड देणे त्याहीपेक्षा कठीण. तीन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले. बाकीच्या अधिकाऱ्याबद्दल चौकशी करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले; पण अण्णांचे समाधान झाले नाही. ते उपोषणासारख्या आंदोलनाच्या कठीण साधनाकडे वळले. राष्ट्रपतींकडे पद्मश्री परत पाठवली. १ मे पासून आळंदीला ज्ञानेश्वराच्या समाधीसमोर आमरण उपोषणाची सुरुवात झाली. आमरण उपोषणाचे अण्णांचे तंत्रही गांधींच्या तंत्रापेक्षा अगदी वेगळे. उपोषण सत्याग्रहाचा मार्ग आहे. लोकांचे न्याय्य हक्क मिळविण्यासाठी आत्मक्लेशाने जनमानसावर आणि सत्ताधीशांवर प्रभाव पाडण्याचा हा मार्ग आहे.
शेंडी तुटो वा पारंबी
सरकार मोठे अडचणीत सापडले. वनखात्याचे अधिकारी भले पूर्णतः दोषी असले तरी त्यांच्यावर कार्यवाही करण्यापूर्वी सरकारी नियमांप्रमाणे काही तजवीज आणि तपशील पुरे करावे लागतात. कोणी सत्याग्रह केला म्हणून अधिकाऱ्यांवर तडकाफडकी कार्यवाही झाली तर दंडाधिकाऱ्यांनी उपोषणाच्या दबावाखाली निर्णय घेतला असा युक्तिवाद करून झालेली कार्यवाही झटक्यात रद्दबातल करता येईल.
गांधीजी उपोषणाला बसत. त्यांच्यावर आत्मक्लेशाचा प्रयत्न केल्याचा आरोप इंग्रज शासनानेही कधी केला नाही. अण्णासाहेबांच्या उपोषणाच्या काही दिवसच आधी सर्वोच्च न्यायालयाने ३०९ कलम बरखास्त करून टाकल्यामुळे सरकारी हस्तक्षेपाने अण्णांचे उपोषण थांबविता येईल ही शक्यता राहिली नव्हती. आता अण्णा उपोषण तडीसच नेणार, भ्रष्टाचाराचा राक्षस आता गाडलाच जाणार अशा आशेने भक्तगण आणखी एका चमत्काराची वाट पाहू लागले.
उपोषण सुरू झाले, अण्णांच्या आजपर्यंतच्या कामाची पावती मिळाली. महाराष्ट्रातील यच्चयावत मान्यवर नेतेगण आळंदीला जाऊन अण्णांबरोबर आपले नाव आणि जमल्यास फोटो वर्तमानपत्रात छापून यावेत या प्रयत्नात लागले. अण्णांच्या अवतीभवती १०-२० तरुण मंडळी उपोषणात पडून होती. भोवतालची व्हीआयपी गर्दी इतकी दाट झाली, की ही तरुण मंडळी पायदळी तुडवली जाऊ लागली.
देवांची आळंदीच्या आकाशात गर्दी
६ मे मोठा दिवस. या दिवशी अण्णा पद्मविभूषणही परत करणार असा गाजावाजा झाला. पद्मभूषण मुळात घ्यायचेच नाकारलेले इतके लोक माझ्या परिचयाचे आहेत, की पद्मविभूषण स्वीकारल्याने ते परत करण्यात काय मोठा त्याग आहे हे समजले नाही; पण खळबळ झाली हे खरे.
६ तारीख उजाडली. दुपारपासून अण्णांचे मन वळवण्यासाठी सतत प्रयत्न चालू होते. आसपासच्या कार्यकर्त्यांनी ते हाणून पाडले होते. उपोषणाच्या जागची सर्व व्यवस्था व अण्णांची देखभाल 'भारतीय विचार मंच आणि ज्ञान प्रबोधिनी' या दोन संघटन परिवारातील संस्थाचे कार्यकर्ते पाहात होते. काँग्रेसचे कार्यकर्ते काहीसे हतबल झाले.
गुप्त खलबते आणि ओमफस
त्यानंतर मात्र रात्री सार्वजनिक शुचितेचे निव्वळ पुतळे असे बाळासाहेब भारदे, मोहन धारिया, उल्हास पवार, नानाभाऊ एंबडवार अशी बडी मंडळी गाड्यातून महाद्वारासमोर आली. उपोषणाला बसलेली व्यक्ती सहसा जागवरून हलत नाही. एकांतात जर जात नाहीच नाही; पण ही मंडळी अण्णांना घेऊन एका खास खोलीत 'बंदिस्त' गेली. बैठक २ तास २० मिनिटे चालली. अण्णांनी उपोषण मागे घेण्यास संमती दिली. अण्णा मंडपात आले; इतर मंडळी गाडीतून पुण्याला रवाना झाली. जाण्यापूर्वी मुख्य सचिव आणि मुख्यमंत्री यांना आपल्या कामगिरीची खुशखबर कळविण्यास विसरली नाहीत. सारे कार्यकर्ते निराश झाले.
पद्मभूषणाची पगडी सलामत
अण्णासाहेब हजारे यांनी उपोषणास सुरुवात करण्यापर्वी पुण्यातील सर्वोदय कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा केली होती. त्या चर्चेत आमरण उपोषण ७-८ दिवसांनी मागे घ्यायचे असे ठरले होते; पण 'पद्मभूषण' कोणत्याही परिस्थितीत परत करायचीच अशी रणनीती ठरली होती. अण्णांनी पद्मभूषण हाती ठेवली. याचा भोवतालच्या कार्यकर्त्यांना मोठा राग आला; पण अण्णांचा हिशेब अचूक होता. पद्मभूषण शिल्लक आहे. तोपर्यंत आंदोलन केव्हाही करता येईल. राळेगण शिंदीतील पाण्याच्या प्रयोगाची झाकली मूठ जगापुढे उघडी होण्याआधी दुसरा विषय मिळाला. शिर सलामत राहिले, पगडीही राहिली. अण्णासाहेब हजारे पाण्याचा प्रश्न सोडवून भ्रष्टाचाराकडे वळले आहेत. भ्रष्टाचाऱ्यांचे आता काही खरे नाही.
(३ जून १९९४)
■ ■