अन्वयार्थ - १/स्त्रीमुक्ती चळवळींची पीछेहाट


स्त्रीमुक्ती चळवळींची पीछेहाट


 कोणत्याही संस्थेची स्वत:ची वास्तू उभी राहिली, की तिचा ऱ्हास चालू होतो. जगप्रसिद्ध शोध हे अर्धपोटी राहणाऱ्या शास्त्रज्ञांनी अहोरात्र परिश्रम करून लावले, ते काही आधुनिक अलिशान प्रयोगशाळांत बसून नाही तर त्यांच्या घरच्या माळ्यावर, कोठीच्या खोलीत लावले. हिंदुस्थानातील इंग्रजी साम्राज्याने नव्या दिल्लीची राजधानी बांधून १९३० मध्ये पुरी केली त्या वेळी इंग्रजी राज्याच्या अंतिम अंकाची सुरुवात झाली होती.
 चळवळींचे आणि आंदोलनांचे काहीसे असेच आहे. प्रभावशाली आंदोलनाचे नेते राष्ट्रीय संघटना बांधू लागले आणि आंतरराष्ट्रीय परिषद भरवू लागले म्हणजे आंदोलनाच्या विषयाची पीछेहाट सुरू झालीच म्हणून समजावे. १९८५ साली महिलांची जागतिक परिषद आदिस अनाबा इथे झाली. लवकरच होणाऱ्या बिजिंग येथील दुसऱ्या महिला आंतरराष्ट्रीय परिषदेचे ढोल वाजू लागले आहेत. १९८५ ते १९९४ हे दशक स्त्री चळवळीच्या जागतिक पिछेहाटीचे ठरले आहे. निदान हिंदुस्थानातील महिला चळवळीबद्दल हे निश्चित खरे आहे.
 सासरी-माहेरी, गळ्यावर सुरी
 नवविवाहित वधूंच्या आत्महत्यांचे - हत्यांचे प्रमाण वाढत राहिले. माहेरी आईबापांच्या सावलीत, गर्भावस्थेपासून बोहल्यावर चढेपर्यंत देखील स्थिती काही वेगळी नाही. भ्रूणहत्या, कुपोषणाचे बळी, आत्महत्या माहेरातही होतात. त्यांची नक्की आकडेवारी जाहीर होत नाही. त्यांच्या शोकांतिकेबद्दल पोलिसात जाऊन तक्रार गुदरायला सुद्धा कोणी पुढे होत नाही. 'शहाबानो' प्रकरणी राजकारण्यांच्या खेळात मुसलमान स्त्री सापडली आणि आता पुन्हा एकदा 'त्रिवार तलाक' पद्धतीबद्दल उठणाऱ्या वादळात हिंदू आणि मुसलमान दोन्ही स्त्रियांची पिछेहाट होणार आहे.
 'एकच प्याला'तील सिंधूचे अवतार
 राजकारणाच्या सोयीसाठी बायकांचा बळी घेणे यात धर्ममार्तंडांना काही विशेष आनंद होत असावा. स्त्रियांमध्येही हौताम्याची आणि कुर्बानीची प्रवृत्ती निसर्गतःच मोठी सामर्थ्यशाली असावी. त्याही धर्ममार्तंडांच्या कारवायांना मोठ्या आवेगाने बळी पडतात. देवराला येथे एक राजकुँवर सती गेली तर साऱ्या राजस्थानातील उच्चविद्याविभूषित महिलासुद्धा पारंपरिक राजस्थानी ओढण्या घालून मिरवू लागल्या आणि राजस्थानी सती परंपरेच्या इतिहासाचे गोडवे गाऊ लागल्या. त्यांचे यजमानही आपल्या पाळीव प्राण्यांच्या इमानदारीच्या या प्रदर्शनाने खुष होऊन कृपाकटाक्ष टाकू लागले.
 उपकारकर्त्यांपासून वाचावे कसे?
 'शहाबानो' प्रकरणी मुस्लिम स्त्रियांची अशीच कुचंबणा झाली. शहाबानोस कोर्टाचा आधार घ्यावा लागला त्याअर्थी परित्यक्ता मुसलमान स्त्रियांचा प्रश्न गंभर आहे हे उघड. परित्यक्ता स्त्रियांचा कसला आला आहे धर्म? खडतर जीवन कसेबसे रेटत नेणे, मरण स्वीकारणे किंवा जगाच्या बाजारात शरीर भाड्याने देण्यास उभे राहणे एवढेच काय ते पर्याय. सर्व मुसलमान स्त्रिया त्याविरुद्ध सहजच उठून उभ्या राहिल्या असल्या; पण शहाबानोची कड विश्व हिंदू परिषदेने घेतली, लालकृष्ण अडवाणींनी मुसलमान स्त्रियांचा कैवार घेतला आणि त्या बिचाऱ्यांवर आफत ओढवली. सिंघल - अडवाणी यांच्या सुरात सूर मिळवून आपले हक्क मागणे कोणत्याही मुस्लिम स्त्रीस शक्य नाही. ते परधमींयाशी संग ठेवण्याइतके भयंकर कृत्य मानले जाईल.
 इस देश में रहना होगा
 हिंदू परिवारातील नववधूंच्या दारुण अवस्थेविषयी शहाबुद्दिन किंवा इमाम बुखारी यांनी कधी आपली जबान खोललेली नाही, हे हिंदू अबलांचे भाग्यच म्हटले पाहिजे. मुल्लामौलवींनी तसे केले तर, "आमच्या पुत्रवधू लाखांनी का जळेनात या मुसमानांनी तिकडे लक्ष देण्याचे कारण नाही. सासुरवाशिणींना घराबाहेर काढणे आणि त्यांनी जीव देणे ही आमची उज्ज्वल परंपरा आहे. तिचा आम्हाला अभिमान आहे. ज्यांना हे पाहवत नसेल तर त्यांनी पाकिस्तानात निघून जावे." अशी भाषा चालू होईल. अनेक साध्वी ऋतंभरा, "जाळून मारण्यात आर्य स्त्रियांच्या सनातन संस्कृतीचा परमोच्च बिंदू कसा आहे." असे मोठ्या आवेशाने प्रतिपादू लागतील. मुसलमान नेत्यांनी शरियतचा बचाव केला. कडवेपणे केला; पण मनुस्मृतीवर ते घसरले नाहीत हे हिंदू स्त्रियांचे नशिब. याउलट जनान्यात डोकावण्याचा मोह आर्य धर्ममार्तंडांना आवरत नाही आणि गोषातील दुखियाऱ्यांचा जीव त्यामुळे अधिकच गुदमरतो.
 करारातील 'ठेवा-हकला' कलम
 त्रिवार तलाक प्रकरणात असेच काही होते आहे. दरवर्षादोन वर्षांनी हा विषय फिरून फिरून चर्चेला येतो. यावेळी अलाहाबाद कोर्टातील न्यायमूर्ती तिल्हारी यांच्या एका निवाड्याने हा प्रश्न गाजत आहे.
 एका बैठकीत किंवा एका भूतकाळात तीन वेळा 'तलाक' शब्द उच्चारल्याने पुरुषाला फारकत मिळण्याची पद्धत निदान हिंदुस्थानातील मुसलमान समाजात आहे. इस्लामिक देश म्हणवणाऱ्या पाकिस्तान, इराण, इराक, मोरोक्को, इजिप्त या देशातही त्रिवार तलाकाला मान्यता नाही. हिंदुस्थानातही या पद्धतीने घटस्फोट घेणाऱ्या मुसलमानांची संख्या टक्केवारीत किरकाळ आहे. तरीही या पद्धतीने परित्यक्ता झालेल्या मुस्लिम स्त्रियांचे दुःख कष्ट काय वर्णावे! पण धर्मव्यवस्था ही पुरुषांनी, पुरुषांची, पुरुषांसाठी केलेली असते, तिथे स्त्रियांना न्याय कोठून मिळायचा?
 इस्लाममध्ये विवाह हा संस्कार नाही करार आहे. इस्लामच्या उदयकाळी स्त्रियांची स्थिती निव्वळ गुलामीची होती. त्याऐवजी इस्लामने त्यांना करारी नोकरदारांचे स्थान मिळवून दिले. नको असलेला नोकर झटपट काढता येणे हे कार्यक्षम व्यवस्थेचे लक्षण आहे. खुल्या व्यवस्थेत कामगारांना व पगारदारांना ठेवण्याचे आणि हाकलण्याचे सर्वाधिकार मालकाकडे असावेत. याला आज मान्यता मिळत आहे. मुस्लिम विवाहातील 'ठेवा-हकला' पद्धतीत दोष एवढाच, की ती एकांगी आहे आणि पक्षपाती आहे. स्त्रियांना ठेवा-हकला'चे अधिकार नाहीत. कारण उघड आहे.
 विवाह करार सारे खोटे
 करारनामे दोन तुल्यबळ पक्षात होतात. निकाल लावण्याच्यावेळी काझीने बुरख्यातील दुल्हन राजी असल्याची प्रश्न विचारून कितीही खात्री करून घेतली तरी निकाह काही समबल पक्षातील करारनामा नाही. वधू पक्षाच्या कमजोरीचा फायदा घेऊन त्यांच्यावर लादलेला करार हा मुळातच बेकायदेशीर म्हटला पाहिजे. तुल्यबळपक्षात राजीखुषीने होतो तो करार. विवाहाचा करार वधू पक्षाच्या कमजोरीच्या कारणाने आपोआपच अनैतिक आणि म्हणून बेकायदेशीर जी स्थिती निकाहाची तीच रजिस्टर्ड लग्नाची. हे सगळेच 'करार' समाजातील स्त्रियांची स्थिती पुरुषांच्या बरोबरीची होत नाही तोपर्यंत रद्दबातलच मानले पाहिजे.
 मंगल संस्काराचे सोंग
 हिंदू विवाहाची परंपरा व्यवहाराच्या देवघेवाची नाही 'मंगलसंस्कार', शब्द मोठे मोहक आणि उदात्त, स्त्रियांना 'देवता' म्हणायचे आणि पायदळी तुडवायचे असा हा कसला संस्कार? 'संस्कार' आणि 'करार' दोन्ही गुऱ्हाळात स्त्रियांचे चिपाडच होत आले.
 संस्कार, आयुष्यभराकरिता घेतलेली 'नातिचरामि' शपथ असल्या संकल्पना कधी महत्त्वाच्या होत्या किंवा नाही याबद्दल शंका आहे. रामाने सीतेला वनवासात पाठवले. त्याला काही मिथिलेतील मंगल विवाहात घडलेल्या संस्कारांची अडचण वाटली नाही. मग 'कलियुगात' संस्कारांची काय ती मातब्बरी!
 करारनामा भागीदारीचा हवा
 पती-पत्नीचे नाते जमीनदार - कुळासारखे आहे. सारे एकतर्फी. मालक संतुष्ट झाला, त्याची मेहरनजर झाली तर काय वाटेल ते औदार्य दाखवले; पण कशाने नाराज झाला तर लाथ मारून हाकूनही लावेल. पत्नीला आणि कुळाला हक्क म्हणून काही नाहीत. त्यामुळे सर्व समाजातील स्त्रियांची भूमिका एकसारखीच आहे, "तुमच्या औदार्यावर आम्ही जगू इच्छित नाही. आमच्या हक्काचे काय ते बोला!"
 विवाह संबंध भविष्यकाळात कराराच्या स्वरूपाचे होणार आहेत यात काही शंका नाही. संस्काराच्या सोंगाचे दिवस आता संपत आले आहेत; पण येणाऱ्या युगातील विवाह करार भागीदारीच्या स्वरूपाचेच असतील. गुलामगिरीचे किंवा नोकरदारीचे नसतील.
 या वाटचालीत अडथळा येतो आहे तो सुधारणावाद्यांचा आणि दुसऱ्यांच्या धर्मव्यवस्थेत लुडबुड करणाऱ्यांचा.
 लुडबुड्यांना स्त्रियांच्या वेदनांचे काय होय?
 "संस्कार म्हणून मुलीचे कन्यादान केलेत ना त्याच दिवशी ती तुम्हाला मेली, आता तिच्या मरणाबद्दल पोलिसात जाऊन तक्रार कसली करता? सासरच्यांनी मुलीचे काहीही हाल केले तरी त्याबद्दल वधूकडील लोकांनी चकार शब्द काढू नये. न तद्वाच्यम वधूबंधूभिः असा कालीदासी नियम आहे. पोलिसात मुलीच्या मृत्यूबद्दल तक्रार करणारा हरेक आईबाप हिंदू परंपरेचा भंग करतो." असा आक्रोश धर्ममार्तंडानी केला तर? त्रिवार तलाक इस्लामचा अविभाज्य भाग आहे. असा आग्रह मुल्ला मौलवींनी धरला तर?
हिंदू मुसलमान दोन्ही धर्मातील स्त्रियांनी जुजबी सुधारणांची मागणी न करता सर्व धर्माची चौकटच उधळून लावली पाहिजे.
 न्यायमूर्ती तिल्हारी-सिंघल-अडवाणी यांच्या लुडबुडींना वेसण घालणे महत्त्वाचे आहे. न्यायमर्ती तिल्हारी स्वतःला जाहीररित्या 'हिंदुराष्टवादी' म्हणवतात. अयोध्येची मशीद पाडल्यानंतर त्या जागी बांधलेल्या राम मंदिरात जाऊन दर्शन घेण्याची परवानगी देणारे हेच ते न्यायमूर्ती! अलाहाबाद हायकोर्टातून त्यांची बदली झाली, तेव्हा शेवटच्या काही तासात त्रिवार तलाक घटनाबाह्य असल्याचा निर्णय त्यांनी दिला. तिल्हार साहेबांनी हा निर्णय दिला एवढ्या एकाच गोष्टीने मुसलमान स्त्रियांची अवस्था मोठी अवघड करून टाकली. या विषयावर वाद होतील, दंगे होतील, रक्ताचे पाट वाहतील. मुसलमान स्त्रिया मजबुरीने आपल्या पुरुषांच्या बाजूने उभ्या राहतीलही आणि हिंदू स्त्रियाही सर्व हालअपेष्टा आसवे पुसून हिंदू संस्कार व्यवस्था कशी? किती? आहे याची महती गाऊ लागतील.

(१७ जून १९९४)
■ ■