एकनाथी भागवत/अध्याय एकोणीसावा
<poem>
एकनाथी भागवत - आरंभ ॥श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥
ॐ नमो सद्गु रु त्र्यंबका । ब्रह्मगिरिनिवासनायका । त्रिगुणत्रिपुरभेदका । कामांतका गिरिजेशा ॥१॥ तुझा अनाहताचा डमरु । सर्व शब्दें करी गजरु । वेदानुवादें निरंतरु । त्रिकांडीं थोरु गर्जत ॥२॥ तुझें हातींचें खट्वांग । करी जीवाचा जीवभंग । अनंगेंसीं जाळूनि अंग । अंगसंग तैं देशी ॥३॥ त्रिनयना त्र्यंबकलिंगा । तुजपासोनि प्रवाहे चिद्गंागा । ते पवित्रपणें उद्धरी जगा । प्रकाशगर्भा शंकरा ॥४॥ प्रत्यक्ष दिसती दोन्ही लोचन । तिसरा गुप्त ज्ञाननयन । यालागीं तूं त्रिलोचन । नयनेंवीण दीसशी ॥५॥ निजांगें वाहसी बोधचंद्र । यालागीं तूं चंद्रशेखर । चंद्रसूर्यादि चराचर । तुझेनि साचार प्रकाशे ॥६॥ ` भव ' या नांवाची ख्याती । भवप्रकाशक तुझी चिच्छ्क्ती । तूंचि विष्णु प्रजापती । रुद्र तूं अंतीं संहर्ता ॥७॥ मोडूनियां नामरूपमुद्रा । जीव आणिशी एकाकारा । अत्यंत प्रळयींच्या प्रळयरुद्रा । चित्समुद्रा शिवरूपा ॥८॥ शिव शिव जी गुरुराया । निजभावें लागतां पायां । तंव गुरुशिष्यत्व गेलें लया । दावूनियां निजरूप ॥९॥ तें निजरूप देखतां दृष्टीं । कैंचा जीव कैंची सृष्टी । निमाली त्रिगुणेंसीं त्रिपुटी । पडली मिठी स्वानंदीं ॥१०॥ त्या स्वानंदाचे उद्गा्र । सांवरतां नावरती थोर । त्या स्वानंदाचें निजसार । सत्य साचार एकादश ॥११॥ त्याहीमाजीं अतिगहन । सुखस्वानंदनिरूपण । तो हा एकुणिसावा अध्याय जाण । परमकारण शास्त्रार्थीं ॥१२॥ जें ऐकतां निरूपण । परमानंद उथळे जाण । एका विनवी जनार्दन । श्रोतां अवधान मज द्यावें ॥१३॥ सत्रावे अठरावे अध्यायांप्रती । स्वधर्मकर्में ब्रह्मप्राप्ती । वर्णाश्रमस्थितिगती । उद्धवाप्रती सांगीतली ॥१४॥ एकुणिसावे अध्यायीं जाण । जेणें ज्ञानें साधिलें निजज्ञान । त्या ज्ञानाचें त्यागलक्षण । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥१५॥ कर्म-कर्तव्यता-कारण । जीवन्मुक्तासी नाहीं जाण । उद्धवाचे यमादि प्रश्न । हेही श्रीकृष्ण सांगेल ॥१६॥ शास्त्रयुक्त पांडित्यज्ञान । प्रपंचाचें मिथ्या निरूपण । तें `आनुमानिक' पुस्तकज्ञान । सत्यपण त्या नाहीं ॥१७॥ पूर्वे आहे माझें गमन । हें पूर्वील शुद्ध स्मरण । परी दिग्भ्रम पडिल्या जाण । पश्चिमे आपण पूर्व मानी ॥१८॥ तैसें शाब्दिक शास्त्रज्ञान । बोले आन करी आन । तेणें नव्हे समाधान । सर्वथा जाण साधकां ॥१९॥ जेवीं कां दिग्भ्रम मोडे । तैं पूर्वेचा चाले पूर्वेकडे । तेवीं अपरोक्षज्ञान जैं जोडे । तैं साधक पडे स्वानंदीं ॥२०॥ जें जें ऐके वेदांतश्रवण । तें अंगें होत जाण आपण । हें अपरोक्षाचें लक्षण । सत्यत्वें जाण अतिशुद्ध ॥२१॥ ऐसें नव्हतां अपरोक्षज्ञान । सांडूं नये श्रवणमनन । अवश्य करावें साधन । प्रत्यगावृत्ती जाण अत्यादरें ॥२२॥ झालिया अपरोक्षज्ञान । प्रपंचाचें मिथ्या भान । विषयांसी पडलें शून्य । कल्पना जाण निमाली ॥२३॥ तेणेंचि पुरुषें आपण । त्यागावें गा ज्ञानसाधन । हेंचि निरूपणीं निरूपण । देव संपूर्ण सांगत ॥२४॥
एकनाथी भागवत - श्लोक १ ला
श्रीभगवानुवाच- यो विद्याश्रुतसंपन्न आत्मवात्रानुमानिकः । मायामात्रमिदं ज्ञात्वा ज्ञानं च मयि संन्यसेत् ॥१॥
वेदशास्त्रार्थीं परिनिष्ठित । श्रवणमननाभ्यासयुक्त । ज्यासी ब्रह्मविद्या प्राप्तः । सुनिश्चित स्वानुभवें ॥२५॥ तोचि अनुभव ऐसा । दोराअंगी सर्पु जैसा । न मारितां नाशे आपैसा । भवभ्रम तैसा त्या नाहीं ॥२६॥ जेवीं कां नटाची रावो राणी । दोघें खेळती लटिकेपणीं । तेवीं प्रकृतिपुरुषउोभवणी । मिथ्यापणीं जो जाणे ॥२७॥ जैशीं भिंतीमाजीं नानाकार । चित्रें लिहिलीं विचित्र । ते भिंतीचि एक साचार । तेंवी ऐक्यें चराचर जो देखे ॥२८॥ स्वप्नींचीं नाना कर्में जाण । त्याचें जागृतीं नव्हे बंधन । तेवीं मिथ्या निजकर्माचरण । जीवीत्वेंसीं प्राण जो देखे ॥२९॥ ऐशी साचार ज्याची स्थिती । त्या नांव शुद्ध `आत्मप्राप्ती' । `निजानुभव' त्यातें म्हणती । हें जाण निश्चितीं उद्धवा ॥३०॥ आणिक एक तेथींची खूण । `विषयावीण स्वानंद पूर्ण' । हें अनुभवाचें मुख्य लक्षण । सत्य जाण सात्वता ॥३१॥ ऐसा अनुभव नसतां देख । केवळ ज्ञान जें शाब्दिक । त्यातें म्हणिजे `आनुमानिक' । जाण निष्टंक निजभक्ता ॥३२॥ ज्याच्या अनुभवाभीतरीं । नाहीं अनुमानासी उरी । जो अपरोक्षसाक्षात्कारीं । निरंतरी नांदत ॥३३॥ ऐसा जो पुरुष जाण । तेणें ज्ञानाचें साधन । आणि वृत्तिरूप जें ज्ञान । तेंही आपण त्यागावें ॥३४॥ तें न त्यागितां लवलाहें । सहजचि त्याचा त्याग होये । जेवीं सूर्योदयीं पाहें । सचंद्र तेज जाये तारागणाचें ॥३५॥ जेवीं हनुमंत देखोनि येतां । नवचंडी पळे तत्त्वतां । मा राहावया येरां भूतां । उरी सर्वथा उरेना ॥३६॥ तेवीं माझे साक्षात्कारीं । त्यासी बद्धता नाहीं खरी । मा ज्ञान तियेचे निवृत्तीवरी । कैशापरी राहेल ॥३७॥ माझिया अनुभवाच्या ठायीं । बंधमोक्ष मिथ्या पाहीं । तेथ साधनज्ञानाचा कांहीं । उपेगु नाहीं उद्धवा ॥३८॥ परमात्मस्वरूपाच्या ठायीं । बंधमोक्ष मायिक पाहीं । तेथें ज्ञानध्यान जें कांहीं । न त्यागितां पाहीं त्यागिलें ॥३९॥ त्यागोनियां ज्ञानध्यान । ज्ञानियांसी माझी प्रीति गहन । तेंचि प्रीतीचें लक्षण । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥४०॥
एकनाथी भागवत - श्लोक २ रा
ज्ञानिनस्त्वहमेवेष्टः स्वार्थो हेतुश्च संमतः । स्वर्गश्चैवापवर्गश्च नान्योऽर्थो मदृते प्रियः ॥२॥
जो मी अद्वयानंदस्थिती । त्या माझी ज्ञानियांसी प्रीती । ते प्रीतीची उपपत्ती । ऐक निश्चितीं उद्धवा ॥४१॥ ज्ञानियांसी अतिवल्लभ । जो मी परमात्मा स्वयंभ । ज्ञानियांचा परम लाभ । मी पद्मनाभ निजधन ॥४२॥ ज्ञानियांसी जो स्वर्ग चांग । तो मज वेगळा नाहीं मार्ग । ज्ञानियांचा जो मोक्षभाग । तो मी श्रीरंग निजात्मा ॥४३॥ ज्ञानियांचें स्वधर्मसाधन । तें मी परमात्मा नारायण । मजवेगळें कांहीं आन । ज्ञात्यांसी जाण असेना ॥४४॥ ज्ञात्यांसी स्वर्गमोक्षसुख । मजवेगळें उरलें नाहीं देख । मी चिदात्मा निजव्यापक । भावें निष्टंक पावले ॥४५॥ ज्ञात्यांचा अर्थ स्वार्थ परमार्थ । मी पुरुषोत्तम गा समस्त । आद्य अव्यय अनंत । माझें निजसुख प्राप्त त्यां जाहलें ॥४६॥ ऐशी ज्ञानियांसी माझी प्रीती । तेही तैसेच मज प्रिय होती । तेंचि स्वयें श्रीपती । उद्धवाप्रती सांगत ॥४७॥
एकनाथी भागवत - श्लोक ३ रा
ज्ञानविज्ञानसंसिद्धाः पदं श्रेष्ठं विदुर्मम । ज्ञानी प्रियतमोऽतो मे ज्ञानेनासौ बिभर्ति माम् ॥३॥ ज्ञानविज्ञाननिजसंपत्ती । जाहलियावीण माझी प्राप्ती । कोणासी नव्हे स्वरूपस्थिती । मत्पदीं गती ज्ञानविज्ञानें ॥४८॥ करितां गुरुमुखें शास्त्रशुद्धश्रवण । तेणें जाहलें तें म्हणिजे `ज्ञान' । त्याचा अनुभव तेंचि `विज्ञान' । ऐक लक्षण त्याचेंही ॥४९॥ स्वयें स्वयंपाक केला जाण । न जाणे कटु मधुर लवण । जंव चाखिला नाहीं आपण । ते दशा सज्ञान `ज्ञान' म्हणती ॥५०॥ केलिया रसाचें रसस्वादन । स्वयें गोडी सेवी आपण । ऐशी जे दशा तें `विज्ञान' । उद्धवा जाण निश्चितीं ॥५१॥ एवं विज्ञानज्ञाननिजसंपत्तीं । माझ्या उत्तमपदाची पदप्राप्री । माझें वास्तवस्वरूप जे जाणती । त्यांची मज प्रीती अनन्यत्वें ॥५२॥ वेद-शास्त्र-युक्तिबळें । माझें स्वरूप काइसेनि न कळे । तें ज्यासी वस्तुतां आकळे । मज त्यावेगळें प्रिय नाहीं ॥५३॥ तेंचि अतिप्रीतीचें लक्षण । त्याच्या पाउलापाउलीं जाण । सर्वांग वोडवीं मी आपण । करीं निंबलोण । सर्वस्वें ॥५४॥ त्यासी जे वेळे जें लागे । तें मी न मागतां पुरवीं वेगें । त्यासी विरुद्ध ये जेणें मार्गें । तें मी निजांगें निवारीं ॥५५॥ त्यासी झणीं संसारवारा लागे । यालागीं मीच मी पुढेंमागें । सभंवतां राहें सर्वांगें । अतिप्रीतिपांगें पांगलों ॥५६॥ जेणें ज्ञानें ज्ञानी प्रिय होती । त्या ज्ञानाची पवित्र कीर्ती । देवो सांगे उद्धवाप्रती । यथार्थस्थिती निजबोधें ॥५७॥
एकनाथी भागवत - श्लोक ४ था
तपस्तीर्थं जपो दानं पवित्राणीतरणि च । नालंकुर्वन्ति तां सिद्धिं या ज्ञानकल्या कृता ॥४॥
सकळ साधनां नव्हे जे शुद्धी । ते ज्ञानलेशें होय त्रिशुद्धी । ऐक उद्धवा सुबुद्धी । ते ज्ञानशुद्धीचा महिमा ॥५८॥ `तप' जें परार्क पंचाग्नी । `तीर्थ' गंगादि सविता त्रिवेणी । `जपु' जे नाना मंत्रश्रेणी । गो-भू-तिल `दानीं' सुवर्णादि ॥५९॥ आणिकही इतर `पवित्रें' । जें `स्वधर्मकर्मादि' स्वाचारें । नाना `याग' अग्निहोत्रें । पवित्रकरें अतिशुद्ध ॥६०॥ एवं तपादिक जें साधन । या सकळांची शुद्धी गहन । ते ज्ञानलेशासमान । पवित्रपण तुळेना ॥६१॥ ज्ञाननिष्ठा अर्धक्षणें । जे पवित्रता स्वयें लाहणें । तें तपादि नाना साधनें । नाहीं पावणें कल्पांतीं ॥६२॥ ऐसें जें `पवित्रज्ञान' । तें मुख्यत्वें धरोनि जाण । माझे करावें भजन । तेंचि निरूपण हरि बोले ॥६३॥
एकनाथी भागवत - श्लोक ५ वा
तस्माञ्ज्ञानेन सहितं ज्ञात्वा स्वात्मानमुद्धव । ज्ञानविज्ञानसंपन्नो भज मां भक्तिभावितः ॥५॥
याकारणें गा उद्धवा । ऐसा पवित्र ज्ञानाचा यावा । तेथ प्रक्षाळूनि निजभावा । जीवु तो वोळखावा परमात्मत्वें ॥६४॥ जीवु परमात्मा दोनि एक । ऐसें जाणणें तें `ज्ञान' देख । ऐक्यें भोगणें परमात्मसुख । `विज्ञान' सम्यक त्या नांव ॥६५॥ ऐसा ज्ञानविज्ञानसंपन्न । होऊन करावें माझें भजन । त्या निजभजनाची खूण । ऐक संपूर्ण उद्धवा ॥६६॥ तेव्हां जेथें देखे जें कांहीं । तें मीवांचूनि आन नाहीं । मग अनन्यभावें तिये ठायीं । भजे पाहीं भावार्थें ॥६७॥ ऐशिया माझ्या भजनाहातीं । उसंत नाहीं अहोरातीं । जागृति-स्वप्न-सुषुप्तीं । माझी निजभक्ती न मोडे ॥६८॥ विसरोनि जावें जेथें । तेथेंचि देखे मातें । मरण आलें विस्मरणातें । स्मरणही तेथें हारपलें ॥६९॥ यापरी ज्ञानविज्ञानसंपन्न । मजवेगळें न देखती आन । तैसेंचि माझें अनन्य भजन । `शुद्धभक्ति' जाण या नांव ॥७०॥ मागां मुनीश्वरीं याचि गतीं । माझी करोनि अनन्य भक्ती । मज पावले जैशा रीतीं । ऐक तुजप्रती सांगेन ॥७१॥
एकनाथी भागवत - श्लोक ६ वा
ज्ञानविज्ञानयज्ञेन मामिष्ट्वाऽऽत्मानमात्मनि । सर्वयज्ञपतिं मां वै संसिद्धिं मुनयोऽगमन् ॥६॥
जे ज्ञानधनें अतिसंपन्न । परम पवित्र विज्ञानें जाण । ऐसे ब्रह्मभूत जे ब्राह्मण । यज्ञद्वारा यजन करिती माझें ॥७२॥ हृदयाच्या निजभुवनीं । विकल्पाची भूमि खाणोनी । शम-दम-विरक्ती कुंडें तिन्ही । केलीं आवो साधुनी श्रद्धेचा ॥७३॥ तेथ क्षराक्षर अरणी दोन्ही । गुरुमंत्रें दृढ मंथूनी । काढिला सूक्ष्म निर्धूमाग्नी । कुंडीं स्थापूनी पेटविला ॥७४॥ शुद्धसत्त्वाचें घृत तेथ । रजतमद्रव्येंसीं मिश्रित । वैराग्यस्त्रुवेनें आहुती देत । मंत्र तेथ युक्तीचे ॥७५॥ घेऊनि विद्याशस्त्र लखलखित । संकल्पपशूचा करूनि घात । तेणें यज्ञपति श्रीअनंत । केला तृप्त निजबोधें ॥७६॥ तेथ पूर्णाहुतीस कारण । घालितां जीवभावाचें अवदान । यज्ञभोक्ता मी श्रीनारायण । परमात्मा जाण सुखी झालों ॥७७॥ यापरी माझें यजन । करूनियां मुनिगण । निवारूनि जन्ममरण । माझी सिद्धि जाण पावले ॥७८॥ मुनीश्वरीं साधिली सिद्धी । तेचि उद्धवालागीं त्रिशुद्धी । व्हावया कृष्ण कृपानिधी । प्रपंचनिषेधीं वस्तु सांगे ॥७९॥
एकनाथी भागवत - श्लोक ७ वा
त्वय्युद्धवाश्रयति यस्त्रिविधो विकारो मायान्तराऽऽपतति नाद्यपवर्गयोर्यत् । जन्मादयोऽस्य यदमी तव तस्य किं स्युराद्यन्तयोर्यदसतोऽस्ति तदेव मध्ये ॥७॥
`मी उद्धव' ऐसें म्हणतां । तूं कोण आहेसी तत्त्वतां । ऐक त्या स्वरूपाची कथा । तुज मी आतां सांगेन ॥८०॥ जन्म स्थिति आणि निधन । त्रिविधविकारेंसीं त्रिगुण । त्यांची अधिष्ठात्री माया जाण । तिसी चळण तुझेनी ॥८१॥ मायादि गुणकार्यां समस्तां । तूं आश्रयो पैं सबाह्यतां । तुझेनि अंगें यासी चपळता । तूं यापरता चिदात्मा ॥८२॥ `माझेनि गुणकर्मा चळणता । तैं प्रपंचासी आली सत्यता' । हें मायामय गा तत्त्वतां । मृगजळता आभासु ॥८३॥ सकळ प्रपंचाचें जें भान । तें तंव मृगजळासमान । दिसे तेंही मिथ्या दर्शन । वस्तुत्वें जाण सत्य नव्हे ॥८४॥ तूं जन्ममरणापरता । त्रिगुणांतें नातळता । प्रपंचासी अलिप्तता । तुझी तत्त्वतां तूं ऐक ॥८५॥ तेचि प्रपंचाची अलिप्त युक्ती । ऐशी आहे परम प्रतीती । उत्पत्तिस्थितिप्रळयांतीं । प्रपंचाची वस्ती सत्यत्वें नाहीं ॥८६॥ उत्पत्ति आदीं प्रपंच नसे । अंतीं कांहीं उरला न दिसे । मध्यें जो कांहीं आभासे । तो मायावशें मिथ्याभूत ॥८७॥ प्रपंचाआदीं परब्रह्म । अंतीं तेंचि उरे निरुपम । मध्यें स्थितिकाळीं तेंचि ब्रह्म । मिथ्या भवभ्रम भ्रांतासी ॥८८॥ सूर्याआदीं मृगजळ नसे । अस्तमानीं उरलें न दिसे । मध्यें जें काहीं आभासे । तेथही नसे जळलेश ॥८९॥ सर्पाआदीं दोरत्वें दोरु । अंतीं दोर उरे साचारु । मध्यें भ्रमें भासे सर्पाकारु । तोही दोरु दोररूपें ॥९०॥ यापरी आद्यंतीं विचारिता । वस्तु सत्य प्रपंच मिथ्या । हें उद्धवा जाण तत्त्वतां । वेदशास्त्रार्थां संमत ॥९१॥ ऐशी या प्रपंचाची घडामोडी । होतां जन्ममरणकोडी । उद्धवा तुज न लागे वोढी । तूं परापरथडीं नित्यमुक्त ॥९२॥ निर्गुण निःसंग निर्विकार । अज अव्यय अक्षर । ब्रह्म अनंत अपरंपार । तें तूं साचार उद्धवा ॥९३॥ हे ऐकोनि देवाची गोष्टी । उद्धवें बांधिली शकुनगाठीं । हरिखें आनंदु न जिरे पोटीं । एकला सृष्टीं न समाये ॥९४॥ `तूं ब्रह्म' म्हणतां यदुराजें । तेणें हरिखाचेनि फुंजें । उद्धव नाचे स्वानंदभोजें । वैकुंठराजे तुष्टले ॥९५॥ स्वमुखें तुष्टोनि श्रीकृष्ण । मज म्हणे `तूं ब्रह्म पूर्ण' । आजि मी सभाग्य धन्य धन्य । धांवोनि श्रीचरण वंदिले ॥९६॥ `तूंचि अंगें परब्रह्म' । ऐसें बोलिला मेघश्याम । तेचि अर्थींचें निजवर्म । उद्धव सप्रेम पूसत ॥९७॥
एकनाथी भागवत - श्लोक ८ वा
उद्धव उवाच- ज्ञानं विशुद्धं विपुलं यथैतद्वैराग्यविज्ञानयुतं पुराणम् । आख्याहि विश्वेश्वर विश्वमूर्ते त्वद्भिक्तियोगं च महद्विमृग्यम् ॥८॥
विष्वक्सेना विश्वेश्वरा । विश्वमूर्ती विश्वंभरा । जेणें पाविजे ब्रह्मसाक्षात्कारा । त्या ज्ञाननिर्धारा मज सांगा ॥९८॥ नुसधें सांगती ज्ञान । ते केवळ मूढ जाण । सांग तूं वैराग्ययुक्ति तीक्ष्ण । जें छेदी बंधन जीवांचें ॥९९॥ ज्ञानेंवीण वैराग्य आंधळें । तें अरडीदरडी आदळे । वैराग्येंवीण ज्ञान पांगळें । युक्ति देखे परी न चले पुरुषार्थ ॥१००॥ विवेक वैराग्य दोनी । प्रवेशल्या हृदयभुवनीं । तों विषयावस्था निरसूनी । सोहंपणीं जीव वर्तें ॥१॥ जंव ज्ञानासी न भेटे विज्ञान । तंव न निरसे जीवपण । यालागीं सांगावें विज्ञान । जें जीवशिवपण निवारी ॥२॥ असंभावनादोषशून्य । तें बोलिजे `शुद्ध ज्ञान' । जें विपरीतभावनेवीण । त्यातें सज्ञान `विपुल' म्हणती ॥३॥ ऐसें विशुद्ध-विपुल-ज्ञान । तद्युक्त वैराग्य-विज्ञान । त्यांमाजींही श्रेष्ठ तुझें भजन । कृपा करून सांगिजे ॥४॥ ज्ञान-विज्ञान-वैराग्यस्थितीं । जुनाट तुझी भगवद्भिक्ती । मज सांगावी सुनिश्चितीं । कृपामूर्ती श्रीकृष्णा ॥५॥ तुझे उत्तमभक्तिकारणें । साधु पडले गवेषणें । धरणें बैसले जीवेंप्राणें । ते भक्ती सांगणें मजलागीं ॥६॥ तुझी करितां उत्तम भक्ती । त्रिविध ताप क्षया जाती । आपुली लाभे निजमुक्ती । उद्धव ते अर्थीं विनवीत ॥७॥
एकनाथी भागवत - श्लोक ९ वा
तापत्रयेणाभिहतस्य घोरे सन्तप्यमानस्य भवाध्वनीश । पश्यामि नान्यच्छरणं तवाङ्घ्रि द्वन्द्वातपत्रादमृताभिवर्षात् ॥९॥
जे त्रिविध तापें तापले । जे कामक्रोधीं जर्जर केले । आशातृष्णा विसंचिले । जे निर्बुजले जन्ममरणें ॥८॥ संसारमार्ग अतिघोर । दुःखें नुल्लंघवे दुस्तर । ऐसे श्रमले जे नर । त्यांसी निजछत्र हरिपादपद्म ॥९॥ तुझ्या चरणारविंदापरतें । शरण्य न देखों अणिकांतें । यालागीं कायावाचाचित्तें । शरण भावार्थें तुज आलों ॥११०॥ छत्र निवारी केवळ ताप । चरणछत्राचें भिन्न रूप । त्रिविध तापेंसीं संताप । निरसोनि निष्पाप करी जन ॥११॥ एक शरण निजचित्तें । एक वैरें मिसळले तूतें । एक ते भजनभावार्थें । एक ते भयार्तें स्मरले तूतें ॥१२॥ एक ते सुहृदत्वें सगोत्र । एकाचें केवळ स्नेहसूत्र । एका अंगसंग कामतंत्र । एक आज्ञाधारक नेमस्त ॥१३॥ एवं नानापरी विचित्र । जिंहीं ठाकिलें चरणच्छत्र । भवभय जें महाघोर । तें त्यांसमोर हों न शके ॥१४॥ भक्त वैरी आणि सुहृद । अवघ्यां देणें निज ऐक्यपद । बाप उदारता अगाध । तूं स्वानंदबोध सर्वांचा ॥१५॥ होमें जें दीजे अग्नीवरी । तें अग्नी आपुल्याऐसें करी । मा अवचटें पडिल्यावरी । तेंही करी तैसेंचि ॥१६॥ एवं नानायोगें गोविंदा । जे मीनले तुझिया संबंधा । त्यांची निरसोनि संसारबाधा । समत्वें निजपदा तूं नेसी ॥१७॥ त्या तुझें चरणछत्र येथें । निवारी त्रिविध तापांतें । सदा वर्षे परमामृतें । शरण चरणांतें यालागीं ॥१८॥ ज्या संसारभयाभेण । तुझ्या चरणा आलों शरण । त्या भवभयाचें निरूपण । उद्धव आपण सांगत ॥१९॥
एकनाथी भागवत - श्लोक १० वा
दष्टं जनं संपतितं बिलेऽस्मिन् कालाहिना क्षुद्रसुखोरुतर्षम् । समुद्धरैनं कृपयाऽऽपवर्ग्यैर्वचोभिरासिञ्च महानुभाव ॥१०॥
संसारकुहरामाजीं जन । गृहदाराकूपीं पडले जाण । त्याहीमाजीं दुःख गहन । काळसर्पें दारुण डंखिलें ॥१२०॥ त्या काळसर्पाचें विख । क्षणक्षणां चढे देख । अभिमानें भुलले लोक । विषयसुख वांछिती ॥२१॥ नवल काळसर्पाचा पडिपाडु । विषप्राय विषय केले गोडु । गोडांचा गोड परमार्थ दृढु । तो केला कडू जीवेंभावें ॥२२॥ विखाहूनि विषय अधिक । विख एक वेळां मारक । विषयो पुनः पुनः घातक । काळसर्पें लोक भुलविले ॥२३॥ विषय तो केवळ विख । त्यालागीं भुलले मूर्ख । विषयांची तृष्णा देख । अधिकाधिक वाढविती ॥२४॥ ऐसे दुःखनिमग्न जे जन । त्यांचें करावें जी उद्धरण । म्हणशील `हे करितील साधन । तैं उद्धरण करीन मी' ॥२५॥ स्वामी तुझी कृपा न होतां । कोट्यानुकोटी साधन तें वृथा । तुझी कृपा जाहलिया अच्युता । भवव्यथा स्पर्शेना ॥२६॥ ऐकें कृपाळुवा श्रीअनंता । तुझ्या मोक्षफळरूप ज्या कथा । तेणें अमृतें शिंपोनि कृष्णनाथा । जनां समस्तां उद्धरीं ॥२७॥ तुझे मुखींचें कथापीयूख । बिंदुमात्र लाभतां देख । भवसर्पाचें उतरे विख । उपजवी सुख स्वानंदें ॥२८॥ `सकळ जनांच्या विषयीं' । म्हणसी आग्रह कां तुझ्या ठायीं । जन मातें प्रार्थीत नाहीं । देवा ऐसें कांहीं कल्पिसी ॥२९॥ अंधळें अंधकूपीं पडतां । देखणेनीं लावावें सत्पथा । तेवीं ज्ञानांध दुःखी बुडतां । उद्धरावया तत्त्वतां मी प्रार्थितसें ॥१३०॥ जन अंध कां जाहले म्हणसी । संसारसर्पें ग्रासिलें त्यांसी । यालागीं विसरोनि निजसुखासी । विषयसुखासी लोधले ॥३१॥ ऐशिया दीनांतें श्रीअनंता । कृपेनें उद्धरावें तत्त्वतां । म्हणोनि चरणीं ठेविला माथा । श्रीकृष्णनाथा प्रार्थिलें ॥३२॥ ऐकोनि भक्ताची विनंती । संतोषला भक्तपती । उत्तम सभेची ज्ञानस्थिती । उद्धवाप्रती सांगेल ॥३३॥ जे सभेसी मुख्यत्वें हृषीकेशी । देवर्षी आणि ब्रह्मर्षी । तेथ मीनले राजर्षी । तपोराशी ज्ञाननिधी ॥३४॥ ते सभेचा ज्ञानमथितार्थ । उद्धवासी सांगेल श्रीकृष्णनाथ । श्रोतीं अवधान द्यावें तेथ । एका विनवीत जनार्दनु ॥३५॥ ज्ञान आणि पुरातन । वक्ता भगवंत आपण । श्रोता उद्धव सावधान । काय श्रीकृष्ण बोलिला ॥३६॥
एकनाथी भागवत - श्लोक ११ वा
श्रीभगानुवाच- इत्थमेतत्पुरा राजा भीष्मं धर्मभृतां वरम् । अजातशत्रुः पप्रच्छ सर्वेषां नोऽनुश्रृण्वताम् ॥११॥
तुवां पुशिलें जैशा रीतीं । तैसियाचि गा उपपत्तीं । धर्में पुशिले भीष्माप्रती । देहांतीं शरपंजरीं ॥३७॥ ऐक त्या धर्माची थोरी । ज्यासी शत्रु नाहीं संसारीं । सत्यवादी निजनिर्धारीं । जो ऋषिमंत्रीं जन्मला ॥३८॥ करावया पांडवनिर्दळण । वज्रदेही व्हावया आपण । वर्म पुसतां दुर्योधन । धर्म असत्य वचन न बोले ॥३९॥ ऐसा राजा युधिष्ठिर । निर्मत्सर परम पवित्र । तेणें करूनि अत्यादर । भीष्म महावीर विनविला ॥१४०॥ जो परम धार्मिक निजनिर्धारीं । जो स्वधर्मनियमें व्रतधारी । जो यावज्जन्म ब्रह्मचारी । जो महाशूरीं वंदिजे ॥४१॥ न मोडतां गुरुत्वाची पायरी । जो परशुरामेंसीं युद्ध करी । परी काशीश्वराची कुमरी । जो न करीच नोवरी ब्रह्मचर्यें ॥४२॥ धनुर्विद्येसी गुरु परशुराम । तो रणीं जिंतिला करूनि नेम । तेणें संतोषोनि परम । आपुलें नाम आंकणां घातलें ॥४३॥ अधिक संतुष्टे परशुराम । माझ्या ब्रह्मचर्याचा व्रतनेम । भीष्मा तुज कदा बाधिना काम । वर परम दीधला ॥४४॥ जनकसंतोषाकारणें । आपुलें तारुण्य दीधलें जेणें । वार्धक्य घेऊनि आपणें । सुखी करणें शंतनु ॥४५॥ पित्यानें दीधलें आशीर्वादा । `ऐक भीष्मा अतिप्रबुद्धा । वार्धकीं क्षीणशक्तीची आपदा । ते तुज कदा बाधेना' ॥४६॥ यालागीं जंव जंव म्हातारपण । तंव तंव त्याचा प्रताप गहन । काळाची शक्ति खुंटली जाण । ज करवे क्षीण भीष्मासी ॥४७॥ यालागीं तोडरीं काळ काम । आंकणा रिघाला परशुराम । हाचि धर्मिष्ठीं `वरिष्ठधर्म' । हें साजे नाम भीष्मासी ॥४८॥ ज्याचिये प्रतिज्ञेच्या निर्धारीं । देवासी लावूनियां हारी । निःशस्त्रा करी शस्त्रधारी । एवढी थोरी प्रतिज्ञेची ॥४९॥ न मोडतां भजनमर्यादा । युद्धीं मिसळोनि गोविंदा । हारी लावूनियां मुकुंदा । चरणारविंदा लागला ॥१५०॥ आण वाहूनि निर्धारीं । शस्त्रास्त्रें सांडिलीं दूरीं । पुढती बाण भेदितां जिव्हारीं । शस्त्र करीं न धरीच ॥५१॥ बाणीं खडतरलें जिव्हार । विकळता देखोनि थोर । भीष्में करूनि निजनिर्धार । जाहला तत्पर देहत्यागा ॥५२॥ हें दक्षिणायन अतिघोर । भीष्में ऐकतां उत्तर । काळासी करूनियां दूर । स्वशरीर राखिलें ॥५३॥ मग निजात्मनिर्धारीं । भीष्म पहुडे शरपंजरीं । त्यातें युधिष्ठिर प्रश्न करी । महाऋषीश्वरीं परिवारिला ॥५४॥ आम्हां सकळां देखतां । जाहला युधिष्ठिर पुसता । तेचि पुरातन कथा । तुज मी आतां सांगेन ॥५५॥
एकनाथी भागवत - श्लोक १२ वा
निवृत्ते भारते युद्धे सुहृन्निधनविह्वलः । श्रुत्वा धर्मान् बहून्पश्चान्मोक्षधर्मानपृच्छत ॥१२॥
मी संधि करितां श्रीकृष्ण । तें न मानीच दुर्योधन । व्यासें वर्जितां आपण । तरी दृप्तपण युद्धासी ॥५६॥ एवं दैवबळें कुरुक्षेत्रीं । कौरवपांडवां झुंजारीं । सापत्नव दुर्योधनादि वैरी । सपरिवारीं मारिले ॥५७॥ युद्ध निवर्तल्यापाठीं । धर्म बैसल्या राज्यपटीं । तेणें अभिमान घेतला पोटीं । महादोषी सृष्टीं मी एक ॥५८॥ मी राज्यीं बैसवितां आपण । म्हणें म्यां मारिला गुरु ब्राह्मण । म्यां मारिला कर्ण दुःशासन । राजा दुर्योधन म्यां मारिला ॥५९॥ उत्पत्तिस्थितिप्रलयकर्ता । येथ ईश्वरु जाण तत्त्वतां । तें सांडोनियां सर्वथा । `अहं कर्ता' म्हणे धर्म ॥१६०॥ देहाभिमानाचे खटाटोपीं । थोर होऊनियां अनुतापी । गोत्रहंता मी महापापी । ऐसें आरोपी निजमाथां ॥६१॥ त्यासी द्यावया समाधान । समयो भीष्माचें निर्याण । तेथें म्यां नेउनियां जाण । धर्में केले प्रश्न ते ऐका ॥६२॥ राजधर्म दानधर्म । पुशिला तेणें आपद्धर्म । मुख्यत्वें पुशिला `मोक्षधर्म' । उत्तमोत्तम परियेसीं ॥६३॥
एकनाथी भागवत - श्लोक १३ वा
तानहं तेऽभिधास्यामि देवव्रतमुखाच्छ्रुतान् । ज्ञानवैराग्यविज्ञान श्रद्धाभक्त्युपबृंहितान् ॥१३॥
ते भीष्ममुखींचे मोक्षधर्म । म्यां परिशिले अतिउत्तम । जे निरसिती भवभ्रम । सकळ कर्मदाहक ॥६४॥ ज्ञान विज्ञान श्रद्धा भक्ती । अनित्य नासे वैराग्यस्थिती । भीष्में सांगितली धर्माप्रती । ते मी निश्चितीं सांगेन ॥६५॥ म्हणणें भीष्मासी `देवव्रत' । तेणें देवावरी ठेवूनि चित्त । शरपंजरीं सुनिश्चित । निजात्मयुक्त पहुडला ॥६६॥ तेणें सांगितला मोक्षधर्म । त्यांत मुख्यत्वें `ज्ञान' प्रथम । तें ज्ञान सांगे पुरुषोत्तम । अतिउत्तम अवधारीं ॥६७॥
एकनाथी भागवत - श्लोक १४ वा
नवैकादश पञ्च त्रीन् भावान् भूतेषु येन वै । ईक्षेताथैकमप्येषु तञ्ज्ञानं मम निश्चितम् ॥१४॥
प्रकृति पुरुष महत्तत्त्व । पंचतन्मात्रा सूक्षस्वभाव । अहंकारासकट `नव' । तत्त्ववैभव हे संख्या ॥६८॥ `एकादश' बोलिजेतें । तें अकराही इंद्रियें येथें । `पंच' ते पंचमहाभूतें । `तिनी' ते निश्चित तीन गुण ॥६९॥ हे तत्त्वसंख्या उणखूण । गणितां अठ्ठावीस जाण । इयें सर्व भूतीं समसमान । तत्त्वें जाण वर्तती ॥१७०॥ हिरण्यगर्भादि स्थावरान्त । तत्त्वें समान गा समस्त । अधिक उणें नाहीं येथ । जाण निश्चित उद्धवा ॥७१॥ तैसेंचि गा जीवचैतन्य । प्रतिबिंबलेंसे समसमान । जें नाम रूप अभिमान । सर्वांसी जाण प्रकाशक ॥७२॥ थिल्लरीं विहिरीं सागरीं । चंद्रमा प्रतिबिंब समचि धरी । तेवीं ब्रह्मादि मशकवरी । जीवत्व शरीरीं समसाम्यें ॥७३॥ भूतें समसमान चैतन्य । एकात्मता देखणें जाण । या नांव गा `शुद्धज्ञान' । माझाही जाण हा निश्चय ॥७४॥ आतां विज्ञानाचें लक्षण । तुज मी सांगेन संपूर्ण । ते श्लोकार्धें निरूपण । स्वयें नारायण सांगत ॥७५॥ एतदेव हि विज्ञानं न नथैकेन येन यत् ॥ पूर्वीं देखतेनी स्वभावें । व्यापक वस्तूनियें सर्वें । व्यापिलीं असती देहादि तत्त्वें । हें मानी जीवेंभावें निश्चित ॥७६॥ जेवीं कां घटमात्रास । सबाह्य व्यापक आकाश । तेवीं सकळ प्रपंचास । चिदाभास व्यापक ॥७७॥ ऐसें जें कां शुद्ध ज्ञान । तें ज्ञेयप्राप्तीचें कारण । ज्ञेय पावलिया ज्ञान । हारपे जाण वृत्तींसीं ॥१८॥ ज्ञानैकगम्य वस्तु जे । यालागीं त्या `ज्ञेय' म्हणिजे । ज्ञेय पावलिया ज्ञान लाजे । जेवीं कां सूर्यतेजें खद्योत ॥७९॥ जळीं रिघल्या लवण । लवणपणा मुके जाण । तेवीं ज्ञेय पावलिया ज्ञान । ज्ञातेपण हारवी ॥१८०॥ ज्ञेय पावलिया सम्यक । स्वरूपीं चिन्मात्रैक एक । तेथ मिथ्या व्याप्यव्यापक । साधक बाधक असेना ॥८१॥ जेवीं उदेलिया गभस्ती । सतारा लोपे रोहिणीपती । तेवीं जगेंसीं ज्ञानसंपत्ती । ज्ञेयाचे प्राप्तीपुढें लोपे ॥८२॥ ऐसें अपरोक्ष नव्हतां साङ्ग् । देहादि प्रपंचाचें लिंग । आत्म्यवेगळें देखे जग । शब्दें लगबग ब्रह्मज्ञाना ॥८३॥ शुद्ध शब्दिक जें ब्रह्मज्ञान । तेहीं गुणात्मक जाण । वस्तु निराकार निर्गुण । जन्ममरण तिशी नाहीं ॥८४॥ त्रिगुण तितुकें नाशवंत । येचि विखीं प्रस्तुत । सांगाताहे श्रीकृष्णनाथ । अंतवंत साकार ॥८५॥
एकनाथी भागवत - श्लोक १५ वा
(उत्तरार्ध) स्थित्युत्पत्त्यप्ययान्पश्येद्भा-वानां त्रिगुणात्मनाम् ॥१५॥
जरी नसतें नाशवंत । तरी सगुण मानूं येतें सत्य । उत्पत्तिस्थितिनिदानवंत । जाण येथ त्रिगुणाचि ॥८६॥ रजोगुणें होय उत्पत्ति । सत्वगुणें कीजे स्थिती । तमोगुण नाशी अंतीं । हा गुणप्रवृत्ती-स्वभावो ॥८७॥ या गुणांमाजीं वस्तु असे । जिचेनि गुणकर्म प्रकाशे । परी जन्ममरणादि दोषें । अलिप्त वसे अविनाशी ॥८८॥ जे तिनी गुणां आश्रयभूत । जिचेनि गुणकर्में वर्तत । ती वस्तु त्रिगुणातीत । तेचि सांगत श्रीकृष्ण ॥८९॥
एकनाथी भागवत - श्लोक १६ वा
आदावन्ते च मध्ये च सुज्यात्सृज्यं यदन्वियात् । पुनस्तत्प्रतिसंक्रामे यच्छिष्येत तदेव सत् ॥१६॥
गुणां आदि-मध्य-अवसानीं । सृष्टिउत्पत्ति-स्थिति-निदानीं । जें असे अविनाशपणीं । तें मी मानें संतत्वें ॥१९०॥ तेंचि संतत्व गा ऐसें । ज्याचेनि आधारें जग वसे । जें जगा सबाह्य भरलें असे । जग प्रकाशे ज्याचेनी ॥९१॥ हें जगचि होय जाये । परीं तें संचलेंचि राहे । ऐशी जे निजवस्तु आहे । ते तूं पाहे संतत्वें ॥९२॥ जैसे घटमठ होती जाती । आकाश राहे सहजगती । तेवीं ब्रह्मांडा लयोत्पत्ती । वस्तूची स्थिती संचली ॥९३॥ जेवीं अलंकारपूर्वीं सोनें । अलंकारीं सोनें सोनेंपणें । अलंकारनाशीं नासों नेणे । जेवीं कां सोनें निजस्थिती ॥९४॥ तेवीं आकळोनि चराचर । वस्तु असे अखंडाकार । होतां जातां आकारविकार । वस्तु अणुमात्र विकारेना ॥९५॥ ऐशी जे वस्तु अखंडपणें । तिच्या ठायीं चार प्रमाणें । इहीं प्रामार्णीं वस्तु जाणणें । प्रपंच देखणें मिथ्यात्वें ॥९६॥
एकनाथी भागवत - श्लोक १७ वा
श्रुतिः प्रत्यक्षमैतिह्यमनुमानं चतुष्टयम् । प्रमाणेष्वनवस्थानाद्विकल्पात्स विरज्यते ॥१७॥
एक अद्वैत ब्रह्म पाहीं । दूसरें आणिक कांहीं नाहीं । प्रपंच विथ्या वस्तूचे ठायीं । हें प्रमाण पाहीं `वेदवाक्य' ॥९७॥ `प्रत्यक्ष' देखिजे आपण । देहादिकांचें नश्वरपण । हें दुसरें परम प्रमाण । जें क्षणिकत्व जाण प्रपंचा ॥९८॥ मार्कंडेयो आणि भुशुंडी । इंहीं प्रपंचाची राखोंडी । देखिली गा रोकडी । वेळां कोडी कल्पांतीं ॥९९॥ महाजनप्रसिद्ध हें श्रवण । प्रपंचासी क्षणिकपण । हें तिसरें गा प्रमाण । उद्धवा जाण `ऐतिह्य' ॥२००॥ शास्त्रप्रसिद्धी अनुमान । मिथ्या प्रपंचाचें भान । दिसे मृगजळासमान । वस्तुतां जाण असेना ॥१॥ दोर दोरपणें साचार । भ्रमें भासे नानाकार । काष्ठ सर्प कीं मोत्यांचा हार । ना हे जळधार जळाची ॥२॥ तेवीं वस्तु एक चिद्घान । तेथ भ्रमें मतवाद गहन । हें शून्य किंवा सगुण । कर्मधर्माचरण तें मिथ्या ॥३॥ यापरी करितां `अनुमान' । मिथ्या प्रवृत्तिप्रपंचज्ञान । हें वेदान्तमत प्रमाण । सत्य जाण उद्धवा ॥४॥ तंतूवेगळा पट कांहीं । योजेना आणीकिये ठायीं । तेंवी ब्रह्मावेगळा पाहीं । प्रपंचु नाहीं सत्यत्वें ॥५॥ चहूं प्रमाणीं प्रपंचस्थिती । मिथ्या साधिली निश्चितीं । ते प्रपंचीं विषयासक्ती । सांडूनि विरक्ती धरावी ॥६॥ येचिविखींचें निरूपण । स्वयें सांगताहे नारायण । उभय लोकीं विषयध्यान । तें मिथ्या जाण अमंगळ ॥७॥
एकनाथी भागवत - श्लोक १८ वा
कर्मणां परिणामित्वादाविरिञ्चादमङ्गलम् । विपश्चिन्नश्वरं पश्येददृष्टमपि दृष्टवत् ॥१८॥
करूनि कर्मांचें साधन । पाविजे लोक तो नश्वर जाण । आदिकरूनि ब्रह्मसदन । नश्वरत्वें जाण अमंगळ ॥८॥ जें ते लोकींचें सुख गहन । तें विखें रांधिलें जैसें अन्न । खातां गोड परिपाकें मरण । तेवीं अधःपतन स्वर्गस्था ॥९॥ जैसा देखिला हा लोक येथ । तैसाचि स्वर्गभोग तेथ । जे दोन्ही जाण अंतवंत । नाश प्राप्त दोंहीसी ॥२१०॥ काळें पांढरें दोनी सुणीं । जेवीं सम अपवित्रपणीं । तेवीं इहपरलोक दोन्ही । नश्वरपणीं समान ॥११॥ इहामुत्र भोगासक्ती । यांवरी धरावी विरक्ती । या नांव `वैराग्यस्थिती' । जाण निश्चितीं उद्धवा ॥१२॥ मागील तुझी प्रश्नस्थिती । पुशिली होती माझी भक्ती । ते मी सांगेन तुजप्रती । यथानिगुतीं निजबोधें ॥१३॥
एकनाथी भागवत - श्लोक १९ वा
भक्तियोगः पुरैवोक्तः प्रीयमाणाय तेऽनघ । पुनश्च कथयिष्यामि मद्भ्क्तेः कारणं परम् ॥१९॥
पूर्वीं भक्तीची महत्ख्याती । तुज सांगितली निजस्थिती । ते भक्तीची तुज अति प्रीती । तरी मी मागुतीं सांगेन ॥१४॥ ऐक उद्धवा पुण्यमूर्ती । ज्यासी आवडे माझी भक्ती । तो मज पढिया त्रिजगतीं । भजनें परम प्राप्ती मद्भ्क्तां ॥१५॥ ते भक्तीचें निजलक्षण । प्रथम भूमिका आरंभून । देवो सांगताहे आपण । येथें सावधान व्हावें श्रोतां ॥१६॥
एकनाथी भागवत - श्लोक २० वा
श्रद्धामृतकथायां मे शश्वन्मदनुकीर्तनम् । परिनिष्ठा च पूजायां स्तुतुभिःस्तवनं मम ॥२०॥
अमृतरूपा ज्या माझ्या कथा । श्रद्धायुक्त श्रवण करितां । फिकें करूनियां अमृता । गोडी भक्तिपंथा तत्काळ लागे ॥१७॥ अमर अमृतपान करिती । तेही शेखीं मरोनि जाती । माझें कथामृत जे सेविती । ते नागवती कळिकाळा ॥१८॥ सेवितां कथासारामृत । अतिशयें जाहले उन्मत्त । मातले मरणातें मारित । धाकें पळे समस्त संसारु ॥१९॥ सेवितां कथामृतसार । मद्भाेवीं रंगलें अंतर । तैं माझे गुण माझें चरित्र । गाती सादर उल्हासें ॥२२०॥ माझे नाम माझीं पदें । नाना छंदें अद्वैतबोधें । कीर्तनीं गाती स्वानंदें । परमानंदें डुल्लत ॥२१॥ सप्रेम संभ्रमाचे मेळीं । गर्जती नामाच्या कल्लोळीं । नामासरिसी वाजे टाळी । जाहली होळी महापापां ॥२२॥ ऐशिया कीर्तनाचे आवडीं । जाहलीं प्रायश्चित्तें देशधडी । तीर्थें होऊनि ठेलीं बापुडीं । फिटलीं सांकडीं जपतपांचीं ॥२३॥ ऐकोनि कीर्तनाचा गजर । ठेला यमलोकींचा व्यापार । रिकामें यमकिंकर । यमें पाशभार लपविला ॥२४॥ देखोनि कीर्तनाचे गोडी । देव धांवे लवडसवडीं । वैकुंठींहूनि घालीं उडी । अतितांतडीं स्वानंदें ॥२५॥ ऐसा कीर्तनाचा गजर । करितां नित्य निरंतर । त्या अधीन मी श्रीधर । भुललों साचार कीर्तनें ॥२६॥ जैसें कीर्तन तैशीच पूजा । आदरें पूजी गरुडध्वजा । पुष्पादिसंभारसमाजा । अतिवोजा घमघवीत ॥२७॥ अतिनिष्ठा सावधान । यापरी करी माझें पूजन । माझी स्तुति माझें स्तवन । रिकामा अर्ध क्षण जावों नेदी ॥२८॥
एकनाथी भागवत - श्लोक २१ वा
आदरः परिचर्यायां सर्वाङ्गैरभिवन्दनम् । मद्भ क्तपूजाऽभ्यधिका सर्वभूतेषु मन्मतिः ॥२१॥
`इंद्रिये' वेंचिलीं पूजाविधानें । `वाचा' वेंचली हरिकीर्तनें । `हृदय' वेंचलें माझोनि ध्यानें । `अष्टांग' नमनें वेंचले ॥२९॥ ऐसा अत्यादरे वाडेंकोडें । सबाह्य वेंचला मजकडे । माझे भक्त देखिल्या पुढें । हरिखें मजकडे येवोंचि विसरे ॥२३०॥ माझे भक्त भाग्यें येती घरा । तैं पर्वकाळ दिवाळी दसरा । तेथें तीर्थें धांवती माहेरा । जेवीं सासराहूनि कुमारी ॥३१॥ पहावया भक्तपूजेची आवडी । सनकादिकांची पडे उडी । नारदप्रल्हादादि भक्तकोडी । चढोवढी धांवती ॥३२॥ तेथ सिद्ध येती गा अलोटें । सुरवरांचे टेक फुटे । महानुभवांचा ढीग दाटे । पितर नेटेंपाटें धांवती ॥३३॥ वेदांसी रिघावा न घडे । विधि निर्बुजला मागें मुरडे । माझ्या भक्तपूजेचेनि कोडें । दारापुढें थाट दाटे ॥३४॥ मद्भयक्तपूजेचिया उल्हासा । मज टक पडे हृषीकेशा । इतरांचा पाड काइसा । भक्तपूजनीं ऐसा महिमा आहे ॥३५॥ मागां सांडूनि माझी पूजा । जेणें मद्भहक्त पूजिले वोजा । तेणें मज पूजिलें अधोक्षजा । परिवारसमाजासमवेत ॥३६॥ प्रतिमा माझ्या अचेतन व्यक्ती । भक्त माझ्या सचेतन मूर्ति । त्यांसी पूजिल्या मीं श्रीपती । यथानिगुतीं संतोषें ॥३७॥ जैसा मद्भाजव मद्भीक्तीं । तोचि भावो सर्वांभूतीं । नानाकार भूताकृती । परी आत्मस्थिती अविकार ॥३८॥ दिसे देहाकृती मुंडली । तीतें म्हणती हे रांडली । परी आत्म्याची रांड नाहीं जाहली । असे संचली आत्मस्थिति ॥३९॥ दीर्घ वक्र आणि वर्तुळ । दिसती भिन्न इंगळ । परी अग्नि एकचि केवळ । तेवीं भूतें सकळ मद्रूपें ॥२४०॥ चित्रांमाजीं नानाकृती । पाहतां अवघी एकचि भिंती । तेवीं मी चिदात्मा सर्वभूतीं । निजभावें निश्चितीं जाणावा ॥४१॥ सांडूनि अहंकार दुजा । सर्व भूतीं भावो माझा । हे उत्तमोत्तम माझी पूजा । मज अधोक्षजा पढियंती ॥४२॥ ऐशी जो माझी पूजा करी । तो मज पढियंता गा भारी । मी सर्वांगे राबें त्याच्या घरीं । तो मजवरी मिराशी ॥४३॥ त्याच्या चेष्टांची जे गती । तेचि माझी भजनस्थिती । हेंचि स्वमुखें श्रीपती । उद्धवाप्रती सांगता ॥४४॥
एकनाथी भागवत - श्लोक २२ वा
मदर्थेष्वङ्गचेष्टा च वचसा मद्गु-णेरणम् । मय्यर्पणं च मनसः सर्वकामविवर्जनम् ॥२२॥
लौकिक शरीर कर्मगती । तद्वारा निपजे माझी भक्ती । अभिनव माझी भजनस्थिती । सांगों किती उद्धवा ॥४५॥ बैसोनियां हाटवटीं । सांगतां लौकिकीही गोष्टी । त्यांमाजीं माझे कीर्तन उठी । मद्गुोणें गोमटी गर्जे वाचा ॥४६॥ स्वधर्मकर्मक्रिया करणें । तेही अर्पी मजकारणें । मजवेगळें कांहीं करणें । करूं नेणे अणुमात्र ॥४७॥ सर्वेंद्रियांचिये स्थितीं । सहजें निपजे माझी भक्ती । माझें नाम माझी कीर्ती । वाचा रिती राहो नेणे ॥४८॥ मनासी आवडे जें जें कांहीं । ते तें अर्पी मजचि पाहीं । शेखीं आपुलें मन तेंही । माझ्या ठायीं समर्पीं ॥४९॥ माझे स्वरूपाचे ठायीं जाण । केवीं घडे मनाचें अर्पण । तेचिविषयींचें निरूपण । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥२५०॥
एकनाथी भागवत - श्लोक २३ वा
मदर्थेऽर्थपरित्यागो भोगस्य च सुखस्य च । इष्टं दत्तं हुतं जप्तं मदर्थं यद्व्रतं तपः ॥२३॥ मी परमात्मा परम स्वार्थ । ऐसा करूनि निश्चितार्थ । वेंचिती धन धान्य सर्वार्थ । निजपरमार्थ साधावया ॥५१॥ परमार्थ साधावया अव्यंग । साचार पोटींचा विराग । मी भेटावया श्रीरंग । सकळ भोग सांडिती ॥५२॥ छत्र चामर हस्ती घोडे । त्यागून होती गा उघडे । ऐसें वैराग्य धडपुडें । मज रोकडें पावायया ॥५३॥ माझें पावावया निजसुख । द्रव्यदारापुत्रादिक । त्यागूनि सांडिती निःशेख । यापरी देख अनुतापी ॥५४॥ आवडीं करितां माझें भजन । विसरे भोगाची आठवण । माझे प्राप्तीलागीं जाण । रिता क्षण जावों नेदी ॥५५॥ माझोनि उद्देशें परम । करी श्रौतस्मार्त स्वकर्म । अग्निहोत्रादि याग परम । व्रत नेम भजलागीं ॥५६॥ माझें ठाकावया चिद्रूप । गायत्रादि मंत्रजप । माझें पावावया निजस्वरूप । दुष्कर तप आचरती ॥५७॥ मी विश्वात्मा विश्वतोमुखी । विश्वंभर होतसें सुखी । यालागीं तो दीनमुखीं । करी आवश्यकीं अन्नदान ॥५८॥ हृदयीं मी स्वतःसिद्ध जाण । त्या माझें करूनि आवाहन । आपण करी जें भोजन । तेंही मदर्पण तो करी ॥५९॥ कवळकवळीं हरिस्मरण । तें अन्नचि होय ब्रह्म पूर्ण । यापरी माझे भक्त जाण । कर्म मदर्पण स्वयें करिती ॥२६०॥ ऐशीं सर्व कर्में कृष्णार्पण । सर्वदा जो करी जाण । त्यांचे मन होय मदर्पण । तेंचि निरूपण देवो सांगे ॥६१॥
एकनाथी भागवत - श्लोक २४ वा
एवं धर्मैर्मनुष्याणामुद्धवात्मनिवेदिनाम् । मयि सञ्जायते भक्तिः कोऽन्योऽर्थोऽस्यावशिष्यते ॥२४॥
सर्व कर्में मदर्पण । करितां शुद्ध होय मन । जेवीं लोह कमावितां जाण । होय दर्पण सोज्ज्वळ ॥६२॥ पुटीं घालितां सुवर्ण । अधिक तेज चढे जाण । करितां वस्त्राचें क्षाळण । स्वच्छपण धोवटी ॥६३॥ तैसीं सर्व कर्में मदर्पण । करितां निर्मळ होय मन । ते काळीं मनाचें अर्पण । मद्रूपीं जाण हों लागे ॥६४॥ पूर दाटलिया सरितांसी । सवेग ठाकती सिंधूसी । तेवीं निर्मळत्वें मनासी । माझ्या स्वरूपासी पावणें ॥६५॥ माझे स्वरूपीं मनाचे स्थिती । तैं आर्त जिज्ञासु अर्थार्थी । हे तीनही ते काळीं हारपती । माझी भक्ती चौथी उल्हासे ॥६६॥ माझें भांडवल मज एक भक्ती । तेथ दुजी तिजी आणि चौथी । हे साधकांची साधनभ्रांती । बहुता भक्ती मज नाहीं ॥६७॥ तेचि माझी मुख्य भक्ती । येणें साधनें होय प्राप्ती । जे भक्तीस्तव भक्त म्हणविती । ब्रह्मा उमापती सनकादिक ॥६८॥ निःशेष मावळल्या अहंकृती । भूतें निजात्मरूप दिसती । माझ्या स्वरूपाची `सहजस्थिती' । ते माझी मुख्य भक्ती उद्धवा ॥६९॥ ये भक्तीच्या लेशस्थितीं । आर्त जिज्ञासु अर्थार्थी । प्रकाशले गा वर्तती । निजस्वार्थी साधक ॥२७०॥ हेचि आर्ताच्या विषयीं । आर्तीतें प्रकाशी पाहीं । मग `आर्त' ऐसे त्याच्या ठायीं । नांवाची नवायी उपतिष्ठे ॥७१॥ रोगिया नांव आर्तता । हें व्याख्यान नव्हे परमार्था । भगवत्प्राप्तीची तीव्र व्यथा । ते आर्तता परमार्थी ॥७२॥ जो भगवंताचे प्राप्तीलागीं । कडां घालूं धांवे वेगीं । कां रिघों पाहे जळते आगीं । तो `आर्ता' सावेगीं बोलिजे ॥७३॥ आर्ताची स्थिति ऐसी । जिज्ञासु निवारी त्यासी । मनुष्यदेह ब्रह्मप्राप्तीसी । तो आत्महत्येसी नको योजूं ॥७४॥ मागील भक्त कोणें रीतीं । जाणोनि पावले भगद्भोक्ती । जीवेंभावें त्या विवरी युक्ती । `जिज्ञासा' निश्चितीं या नांव ॥७५॥ मज जाणावयाची ऐशी जे आशा । तीतें म्हणती शुद्ध `जिज्ञासा' । तेही प्रकाशक माझ्या प्रकाशा । मी जिज्ञासु ऐसा तेणें जाणें ॥७६॥ ब्रह्मप्रापक युक्तीचा ठसा । या नांव `शुद्ध-जिज्ञासा' । वेदशास्त्रजाणीववळसा । `लौकिक-जिज्ञासा' त्या नांव ॥७७॥ सर्वां अर्थीं मीचि अर्थना । शुद्ध `अथार्थी' या नांव जाणा । म्हणती अर्थार्थीं द्रव्यकामना । ते मंद व्याख्याना प्रवर्तती ॥७८॥ दृष्टी पडे नाना अर्थीं । जो विवंचोनि लावी परमार्थीं । त्या नांव बोलिजे `अर्थार्थीं' । त्यातेंही निजभक्ती प्रकाशे माझी ॥७९॥ एवं आर्त-जिज्ञासु-अर्थार्थी । त्यांतें प्रकाशे माझी `सहजभक्ती' । तीतें भक्त चतुर्धा मानिती । अधिकारस्थितिविभागें ॥२८०॥ भक्त कल्पनेचिया भ्रांती । माझी भक्ति चतुर्धा मानिती । ते मिथ्या गा वदंती । माझी निजभक्ती एकली ॥८१॥ ऐशिये निजभक्तीची प्राप्ती । आत्मनिवेदनाची स्थिती । उद्धवा म्यां तुजप्रती । यथानिगुतीं निरूपिली ॥८२॥ माझिये निजभक्तीचें सार । भक्त पावले जे साचार । त्यांचे सर्वही व्यापार । मदाकार होऊनि ठाकती ॥८३॥ तो जेउती वास पाहे । ते दिशाचि मी होऊनि ठायें । तो जेउतें चालवी पाये । ते धरा मी होयें धराधर ॥८४॥ तो करूं बैसल्या भोजन । षड्रस होय मी आपण । त्यासी करावया प्राशन । निजजीवन मी होयें ॥८५॥ त्यासी चालतां निजपदीं । बोधें दृष्याची निवारीं मांदी । शांति पायघड्या घाली आधीं । करी पदोपदीं निंबलोण ॥८६॥ शम दम आज्ञाधारी । हात जोडूनि उभे द्वारीं । ऋद्धिसिद्धी दासी घरीं । विवेक कामारी घरींचा सदा ॥८७॥ त्याचा बैसता अवकाश । अंगें मी होय हृषीकेश । तो निजावया सावकाश । समाधि मी त्यास आंथुरीं ॥८८॥ तो जे कांहीं बोल बोले । ते निःशब्द ब्रह्म-शब्दा आलें । यालागीं श्रोत्यांसी वहिलें । होय भलें समाधान ॥८९॥ तो अवलीला बोले वोठीं । शब्दासवें माझी गोठी उठी । श्रोत्यांची तेथ पडे मिठी । स्वभावें गोठी ऐकतां ॥२९०॥ चढतां परेचे उपरी । वैकुंठ कैलास पायरी । उन्मनी घालोनि बाहेरी । सुखशेजारीं तो पहुडे ॥९१॥ मिळोनियां मुक्ती चारी । पाणी वाहती त्याच्या घरीं । श्रीसहित राबें मी श्रीहरी । येरांची थोरी कोण पुसे ॥९२॥ अवचटें ये त्याच्या मुखासी । म्हणे ज्यासी `तूं उद्धरिलासी' । तो माथां वाहें मी हृषीकेशी । शब्दें निजधामासी पाववीं वेगीं ॥९३॥ जे पावले माझी `सहजभक्ती' । त्यांचे लळे पाळीं मी या रीतीं । त्यांची मज अनन्य प्रीती । सांगों किती उद्धवा ॥९४॥ बहुत बोलीं काय कारण । मी देहो तो आत्मा जाण । तो माझा जीवप्राण । हे जाणती खूण निजभक्त ॥९५॥ नांदतां `सहजभक्ती' आंत । मी देवो तो माझा भक्त । येरवीं मी सगळा त्याआंत । तो समस्त मजमाजीं ॥९६॥ निजभक्त मजभीतरीं । मी तया आंतबाहेरी । ऐसे सामरस्यें नांदों भारी । वेगळे बाहेरीं नाममात्र ॥९७॥ माझिया सायुज्या जे आले । ते मीचि होऊनियां ठेले । परी मी होऊनि मज भजलें । ते `भक्त' मानिले म्यां ऐसे ॥९८॥ सायुज्यापरीस भक्ति गोड । याचि निरूपणांचे कोड । उद्धवा तुझी जाणोनि चाड । विशद निवाड सांगितला ॥९९॥ ऐशिया माझ्या निजभक्तांसी । अवशेष अर्थ नुरेचि त्यांसी । मी तुष्टलों गा हृषीकेशी । निज भावासी सर्वस्वें ॥३००॥ `भक्तिप्राधान्य भागवतशास्त्र' । तें निजभक्तीचें निजसार । तुज मी सांगितले साचार । अत्यादरपूर्वक ॥१॥ उद्धवा तुझे प्रीतीचेनि व्याजें । मज गुह्यांचें निजगुह्य हें जें । तें भक्तीचें करूनियां खाजें । तुज म्यां वोजें दीधलें ॥२॥ म्यां सांगितलें जैशा रीतीं । तैशी सेवावी माझी निजभक्ती । ऐसें बोलत श्रीपती । उद्धव प्रीतीं उचलिला ॥३॥ मागां टाकूनि पीतांबरें । सांडोनियां शंखचक्रें । उद्धव उचलिला श्रीधरें । तरी प्रेम न सांवरे देवाचें ॥४॥ हांव न बाणेचि दों करीं । मग चारी भुजा पसरी । उद्धवातें हृदयावरी । प्रीतीं थोरीं आलिंगी ॥५॥ हृदयीं हृदय एक जाहलें । ये हृदयींचें ते हृदयीं घातिलें । कृष्णें सर्वस्व जें आपुलें । तें हृदयीं सूदलें उद्धवाचे ॥६॥ देव आवाप्तकाम निचाड । त्यासीही भक्तीची ऐसी चाड । अतिशयें उद्धव लागला गोड । स्वानंदें कोड पुरवी त्याचें ॥७॥ उद्धव प्रेमाचा लवलाहो । आलिंगन सोडूं विसरे देवो । कृष्णहृदया हृदय जडल्या पहा हो । उद्धवा उद्धवो विसरला ॥८॥ ऐसे स्वानंदीं वाडाकोडा । दोघेहि मिसळले निचाडचाडा । भक्तिसुखाचा सुरवाडा । उद्धव गाढा मीनला ॥९॥ कृष्णें सर्वस्व आपुलें । उद्धवाचे हृदयीं सूदलें । हें उद्धवा कळों नाहीं दीधलें । लाघव केलें गोविंदें ॥३१०॥ हा अर्थ कळल्या उद्धवासी । हा येईल मजसी ऐक्यासी । पुढील कथा सुरस ऐसी । मग कोणापाशीं सांगावी ॥११॥ उद्धवा मज वाडेंकोडें । अखंड हेंचि बोलों आवडे । परी तैसा श्रोता न जोडे । हें थोर सांकडें मजलागीं ॥१२॥ भक्तिसुखाचा सुरवाड । सांगतां माझें पुरे कोड । ऐसा श्रोता कैंचा गोड । यालागीं उद्धवा आड प्रेम सूये ॥१३॥ सूर्यापासूनि फांकती किरण । तैसें सुटलें आलिंगन । कृष्ण उद्धव जाहले भिन्न । परी अभिन्नपण मोडे ना ॥१४॥ पुढील कथेची संगती । दूर ठेली श्लोकसंगती । श्रोतां विरुद्ध न घ्यावें चित्तीं । समूळार्थ निश्चितीं विचारावा ॥१५॥ मूळींचें पद संकोचित । तेथ उत्तम भक्तिभावार्थ । स्वयें बोलिला श्रीकृष्णनाथ । तोचि म्यां अर्थ विस्तरिला ॥१६॥ नारळांतल्या वस्त्राची घडी । उकलितां थोर वाढे वाढी । तेवीं मूळपदाची घडामोडी । कथा एवढी विस्तारली ॥१७॥ मूळपदाचा पदपदार्थ । श्लोकीं पहावा सावचित्त । श्लोकौत्तरार्धीं भगवंत । ध्वनितार्थ बोलोनि गेला ॥१८॥ त्याचि ध्वनिताचे पोटीं । होती भक्तिरहस्याची पेटी । ते म्यां उघडूनि दाविली दिठीं । वृथा चावटी झणें म्हणाल ॥१९॥ तंव श्रोते म्हणती नवल येथ । मूळींचें पद होतें गुप्त । तें काढिलें भक्तिसारामृत । सुहृदयस्थ हरीचें ॥३२०॥ तुझे हृदयीं श्रीकृष्णनाथ । प्रकटोनि आपुलें हृद्गपत । ग्रंथीं असे बोलवित । हें सुनिश्चित कळलें आम्हां ॥२१॥ आम्हा ऐकतां भक्तिसारामृत । चित्तीं चैतन्य उथळत । होशी देखणा सुनिश्चित । ग्रंथ यथार्थ अर्थिला ॥२२॥ हें ऐकोनि संतांचे वचन । हरिखला एकाजनार्दन । मस्तकीं वेदिले श्रीचरण । पुढील निरूपण अवधारा ॥२३॥ निजभक्तीचे दृढीकरण । आदरें करिताहे श्रीकृष्ण । सांगितलें तेंचि निरूपण । पुढती जाण सांगता ॥२४॥
एकनाथी भागवत - श्लोक २५ वा
यदाऽऽत्मन्यर्पितं चित्तं शान्तं सत्त्वोपबृंहितम् । धर्मं ज्ञान सवैराग्यमैश्वर्यं चभिपद्यते ॥२५॥
आपुलें जें कां अंतःकरण । तें करितां गा मदर्पण । माझी निजभक्ति उल्हासे जाण । जिचें निरूपण म्यां केलें ॥२५॥ मद्रूपीं अर्पावया मन । सुगम वर्म सांगेन जाण । माझें करितां नामस्मरण । पापनिर्दळण तेणें होय ॥२६॥ सकाम स्मरतां नाम । नाम पुरवी सकळ काम । निर्विकल्पें स्मरतां नाम । करी भस्म पापाचें ॥२७॥ होतां पापाचें क्षालण । रज तम जिणोनि जाण । सहजें वाढे सत्त्वगुण । धर्मपरायण धार्मिक ॥२८॥ स्वधर्मनिष्ठ सत्त्वगुणें । अढळ पडे वैराग्याचें ठाणें । वैराग्यें विषय निर्दळणें । निजज्ञान तेणें प्रकाशे ॥२९॥ वाढल्या सविवेक ज्ञान । लागे स्वरूपाचें अनुसंधान । चढे शांतीचें समाधान । तैं मदर्पण मन होये ॥३३०॥ मन जाहल्या मदर्पण । निजभक्ति उल्हासे जाण । जिचें गतश्लोकीं निरूपण । म्यां संपूर्ण सांगितलें ॥३१॥ निजभक्ति पावल्या संपूर्ण । भक्तें न मागतां जाण । अष्ट महासिद्धी आपण । त्याचें आंगण वोळंगती ॥३२॥ जो सिद्धींकडे कदा न पाहे । त्यासी अवशेष कोण अर्थ राहे । माझी संपूर्ण पदवी लाहे । मदैक्य होये मद्भोक्तां ॥३३॥ ऐशी न जोडतां माझी भक्ती । न लाभतां आत्मस्थिती । वर्तणें जैं विषयासक्तीं । तैं अनर्थप्राप्ती अनिवार ॥३४॥
एकनाथी भागवत - श्लोक २६ वा
यदर्पितं तद्विकल्पे इंद्रियैः परिधावति । रजस्वलं चासन्निष्ठं चित्तं विद्धि विपर्ययम् ॥२६॥
जो सत्य न मानी वेदशास्त्रार्थ । साच न म्हणे तो परमार्थ । जो ग्रहदाराद्रव्यासक्त । लोलंगत विषयांसी ॥३५॥ तेणें अत्यंत समळमेळें । दारुण रजोगुण खवळे । तेणें चित्त होय ज्ञानांधळें । विपरीत कळे ज्ञानार्थ ॥३६॥ ज्यासी विषयांच्या युक्ती गहन । त्यासी म्हणती अतिसज्ञान । जो करी युक्तीचें छळण । होय मान्य पंडितपणें ॥३७॥ ज्यासी प्रपंचाचा अतिविस्तार । त्यास म्हणती भाग्य थोर । जो नाना भोगीं पाळी शरीर । सुकृती नर त्या म्हणती ॥३८॥ जो अनुपाती परमार्थविखीं । त्यासी म्हणती परम दुःखी । जो नाना विषयांतें पोखी । त्यांते महासुखी मानिती ॥३९॥ ज्याचेनि बोलें मनुष्य मरे । त्याचें सिद्धत्व मानिती खरें । जो उदास राहटे अनाचारें । मुक्त निर्धारे तो म्हणती ॥३४०॥ ज्याचा दांभिक आचार । त्यातें म्हणती पवित्र नर । जे स्त्रियादि शूद्रां देती मंत्र । ते ज्ञाते थोर मानिती ॥४१॥ जो कां अनुतापी वैरागी । त्यानें म्हणती अतिअभागी । जो उघड विषयांतें भोगी । तो राजयोगी मानिती ॥४२॥ स्वयें द्रव्याचा अभिलाखी । द्रव्य वेंची त्यातें मूर्ख लेखी । न वेंची त्यातें म्हणती विवेकी । धर्मज्ञ लोकीं हा एक ॥४३॥ ज्याचे गांठी बहुसाल धन । तो सर्वांसी अवश्य मान्य । तोचि पवित्र तोचि सज्ञान । ऐसें विपरीत ज्ञान हों लागे ॥४४॥ आपण सर्वात्मा सर्वेश । हें विसरोनियां निःशेष । अधर्मी अकर्मी अनीश । मी अज्ञान पुरुष हें मानी ॥४५॥ तेथ कैं उपजे माझी भक्ती । कैसेनि होईल माझी प्राप्ती । ऐसे भ्रमले नेणों किती । संसारआ।वर्ती वर्ततां ॥४६॥ परमात्मप्राप्तीचीं कारणें । अतिगुह्य चारी लक्षणें । पोटंतुल्या कृपागुणें । उद्धवाकारणें हरि सांगे ॥४७॥ धर्माची भजन भोय । ज्ञान वैराग्य ऐश्वर्य । माझी प्राप्ती अवश्य होय । ते चारी उपाय अवधारीं ॥४८॥
एकनाथी भागवत - श्लोक २७ वा
धर्मो मद्भवक्तिकृत्प्रोक्तो ज्ञानं चैकात्म्यदर्शनम् । गुणेष्वसङ्गो वैराग्यमैश्वर्यं चाणिमादयः ॥२७॥
ऐक उद्धवा निजवर्म । गुह्य सांगेन मी परम । माझी भक्ति जे सप्रेम । उत्तम `धर्म' तो जाण ॥४९॥ ऐक्यें एकात्मता निजबोध । परतोनि कदा नुपजे भेद । या नांव गा `ज्ञान' शुद्ध । कृष्ण परमानंद सांगत ॥३५०॥ धनधान्य रत्नांच्या राशी । उर्वशी आल्या शेजारासी । तें अवघें तृणप्राय ज्यासी । `वैराग्य' त्यासी आम्ही म्हणों ॥५१॥ ऐक उद्धवा सुबुद्धी । माझ्या ज्या अष्ट महासिद्धी । त्या मजवेगळ्या दूरी कधीं । जाण त्रिशुद्धी न ढळती कदा ॥५२॥ माझे निजभक्तीच्या निर्धारीं । जो माझी पदवी घे ऐक्येंकरीं । माझ्या सिद्धी त्याच्या घरीं । होती किंकरी निजदासी ॥५३॥ सिद्धी सेवा करिती । हेंचि नवल सांगों किती । श्रियेसहित मी श्रीपती । भक्तांची भक्ती सर्वस्वें करीं ॥५४॥ `ऐश्वर्याचें मुख्य लक्षण' । अतिशयेंसी संपूर्ण । भगवत्पदवी घेणें आपण । अतिसंपन्न ऐश्वर्यें ॥५५॥ म्यां हे सांगितली जे बोली । ते निजगुह्यभांडाराची किल्ली । येणें उघडूनि स्वानंदखोली । भोगीं आपुली सुखसिद्धी ॥५६॥ चहूं पदांचीं उत्तरें । वाखाणिलीं अतिगंभीरें । ऐकोनि उद्धव चमत्कारें । अत्यादरें विस्मित ॥५७॥ धर्मादि चहूं पदांचा अर्थ । अलोलिक सांगे श्रीकृष्णनाथ । तरी यमादिकांचा उत्तमार्थ । देवासी प्रत्यक्ष पुसो पां ॥५८॥ गुह्यार्थ सांगेल श्रीकृष्ण । यालागीं यमादिकांचे प्रश्न । उद्धव पुसताहे आपण । परमार्थ पूर्ण आकळावया ॥५९॥ पांच श्लोक पंचतीस प्रश्न । उद्धवें केलें ज्ञानगहन । ज्याचें ऐकतां प्रतिवचन । समाधान जीवशिवां ॥३६०॥ पहिल्या श्लोकींचे सहा प्रश्न । दुसर्याेमाजीं नव जाण । तिसरा चौथा आठ आठ पूर्ण । चारी प्रश्न पंचमीं ॥६१॥
एकनाथी भागवत - श्लोक २८ वा
उद्धव उवाच- यमः कतिविधः प्रोक्तो नियमो वाऽरिकर्शन । कः शमः को दमः कृष्ण का तितिक्षा र्थतिः प्रभो ॥२८॥
अहंरिपुनिर्दळणा श्रीपती । `यम' `नियम' प्रकार किती । `शम' `दम' `कोण म्हणीजेती तितिक्षा' `धृती' ते कैशी ॥६२॥
एकनाथी भागवत - श्लोक २९ वा
किं दानं किं तपः शौर्यं किं सत्यमृतमुच्यते । कस्त्यागः किं धनं चेष्टं को यज्ञः का च दक्षिणा ॥२९॥
कोण `दान' कोण `तप' येथ । `शौर्य' कोण कैसें तें `सत्य' । `ऋत' जें कां म्हणिजेत । तेंही निश्चित सांगावें ॥६३॥ कोणता जी `त्याग' येथें । इष्ट `धन' कोण पुरुषातें । `यज्ञ' कशातें म्हणिजेतें । `दक्षिणा' तेथें ते कायी ॥६४॥
एकनाथी भागवत - श्लोक ३० वा
पुंस किंस्विद्बवलं श्रीमन् दया लाभश्च केशव । का विद्या ह्रीः परा का श्रीः किं सुखं दुःखमेव च ॥३०॥
पुरुषासी `बळाची' कोण शक्ती । `दया' बोलिजे कोणे स्थितीं । `लाभ' तो कोण गा श्रीपती । सांग कृपामूर्ती केशवा ॥६५॥ `विद्या' म्हणावें कशातें । `लज्जा' कोणे ठायीं वर्ते । उत्कृष्ट `लक्ष्मी' कोण येथें । तेही अनंतें सांगावी ॥६६॥ येथील कोण पां कैसें `सुख' । मज सांगावें कृपापूर्वक । सुखाचे सांगाती जें `दुःख' । त्याचेंही रूपक सांगावें ॥६७॥
एकनाथी भागवत - श्लोक ३१ वा
कः पण्डितः कश्च मूर्खः कः पन्था उत्पथश्च कः । कः स्वर्गो नरकः कः स्वित्को बन्धुरुत किं गृहम् ॥३१॥
`पण्डिताचें' काय लक्षण । `मूर्ख' म्हणावया कोण गुण । `सुमार्ग' म्हणावया तो कोण । सांगे निरूपण `उन्मार्गाचें' ॥६८॥ `स्वर्ग' कशातें बोलिजे । `नरक' कैसा वोळखिजे । सखा `बंधु' कोण म्हणिजे । `गृह' माझें तें कोण ॥६९॥
एकनाथी भागवत - श्लोक ३२ वा
क आढ्यः को दरिद्रो वा कृपणः कः क ईश्वरः । एतान् प्रश्नान्मम ब्रूहि विपरीतांश्च सत्पते ॥३२॥
`आढ्य' कैसेनि म्हणिजे । `दरिद्री' कैसेनि जाणिजे । `कृपण' कोणातें बोलिजे । `ईश्वर' वोळखिजे तो कैसा ॥३७०॥ हे माझे प्रश्न जी समस्त । यांचा सांगावा विशदार्थ । जो लौकिकाहूनि विपरीत । उपयुक्त परमार्थ ॥७१॥ लौकिकाहूनि विपरीतार्थ । त्यातें बोलती गा `विपरीत' । या अवघियांचा मथितार्थ । परमार्थयुक्त प्रश्न सांगा ॥७२॥ ज्ञानें सज्ञान संतमूर्ती ॥त्यांचा स्वामी तूं निश्चितीं । यालागीं तूतें गा `सत्पत्ती' । सज्ञान म्हणती शास्त्रार्थें ॥७३॥ माझ्या प्रश्नांची प्रश्नोक्ती । परमार्थप्राप्तीलागीं श्रीपती । मज सांगावें यथार्थस्थिती । देवासी विनंती उद्धवें केली ॥७४॥ ऐकोनि भक्ताची विनवण । कृपा द्रवला नारायण । परमार्थरूप त्याचे प्रश्न । स्वयें श्रीकृष्ण सांगेल ॥७५॥ प्रथम तीं श्लोकीं यम नियम । विशद सांगेल पुरुषोत्तम । इतर प्रश्न अतिउत्तम । सांगे मेघश्याम अध्यायांतीं ॥७६॥
एकनाथी भागवत - श्लोक ३३ वा
श्रीभगवानुवाच- अहिंसा सत्यमस्तेयमसङ्गो ह्रीरसञ्चयः । आस्तिक्यं ब्रह्मचर्यं च मौनं स्थैर्यं क्षमाभयम् ॥३३॥
प्रथम श्लोकींचा उभारा । यमाचीं लक्षणें बारा । पुशिल्या प्रश्नानुसारा । प्रतिउत्तरा हरि बोले ॥७७॥ पुढां प्रश्न आहेत फार । यालागीं यमनियमांचें उत्तर । आवरूनि संक्षेपाकार । स्वयें श्रीधर सांगत ॥७८॥ `अहिंसा' कायावाचामनें । परपीडात्याग करणें । `सत्य' यें यथार्थ बोलणें । `अचौर्य' लक्षणें तीं ऐक ॥७९॥ हातें चोरी नाहीं करणें । परी परद्रव्याकारणें । मनीं अभिलाष नाहीं धरणें । `अस्तेय' लक्षण त्या नांव ॥३८०॥ असतां देहगेहसंगती । ज्याचे पोटीं नाहीं आसक्ती । जेवीं यात्रेमाजीं लोक येती । परी संगासक्ती त्यां नाहीं ॥८१॥ स्फटिक ठेविला ज्या रंगावरी । त्यासारिखा दिसे बाहेरी । आपण निर्विकार अंतरीं । तेवीं जो शरीरीं `असंगता' ते ॥८२॥ निंद्य कर्माकारणें । पोटांतूनि कंटाळणें । लौकिकीं निंद्य कर्मा लाजणें । `ह्रीं' म्हणणें या नांव ॥८३॥ इहलोकीं संग्रह करूं नेणें । जाणे दैवाधीन देहाचे जिणें । स्वर्गसुख भोगाकारणें । नाहीं संग्रहणें पुण्यातें ॥८४॥ पुण्यें स्वर्गभोगप्राप्ती । पुण्यक्षयें होय पुनरावृत्ती । जेणें क्षयो पावे पुण्यसंपत्ती । तें न संचिती निजभक्त ॥८५॥ या नांव गा 'असंचयो' । ऐक 'आस्तिक्याचा' निर्वाहो । सर्वत्र माझा ब्रह्मभावो । कोठेंही अभावो घेऊं नेणें ॥८६॥ `ब्रह्मचर्य' ऐसें येथ । जैसे आश्रमप्रयुक्त । बोलिलें शास्त्रीं यथोचित । तेंचि निश्चित करावें ॥८७॥ `मौनिं' न बोलावें इतुकें जाण । मिथ्यालाप असंभाषण । नित्य करावें वेदपठण । गायत्रीस्मरण कां हरिनाम ॥८८॥ स्तिरवृत्ति आत्मारामीं । कां असावी निजधर्मीं । भावार्थें संतसमागमीं । `स्थिरता' उपक्रमीं या नांव ॥८९॥ स्वदेह दंडिलें कां वंदिलें । परी क्षमा सम दोंही काळें । देहाचा भोग तो दैवमेळें । येणें विवेकमेळें क्षमावंत ॥३९०॥ या नांव `क्षमा' म्हणिजे । अभय तें ऐसें जाणिजे । जें जें पारिखें देखिजे । तें तें होइजे आपणचि ॥९१॥ आत्मा एक पंचभूतें एक । दुजें पाहतां नाहीं देख । निमालें भयाचें महादुःख । `अभय' निःशेख या नांव ॥९२॥ निमाल्या दुजयाच्या गोठी । वोखदासी भय न मिळे सृष्टीं । अभयाची स्वानंदपुष्टी । निजदृष्टीं ठसावें ॥९३॥ या नांव गा बाराही `यम' । उद्धवा सांगितले सवर्म । आतां जयाचें नाम `नेम' । तेंही सुगम अवधारीं ॥९४॥
t-------
एकनाथी भागवत - श्लोक ३४ वा
शौचं जपस्तपो होमः श्रद्धाऽऽतिथ्यं मदर्चनम् । तीर्थाटनं परार्थेहा तुष्टिराचार्यसेवनम् ॥३४॥
शौचाची ऐशी परी । अंतरीं शुचि विवेकेंकरीं । बाह्य तें वेदाज्ञेवरी । `शौच' करीं मृज्जलें ॥९५॥ परिसें `जपाचा' विचार । ज्यासी जैसा अधिकार । तैसा जपावा नाममंत्र । कां स्वतंत्र गुरुनाम ॥९६॥ ब्राह्मणाचा जप वेदोच्चार । संन्यासी जपे ओंकार । द्विजन्म्यासी आगममंत्र । कां नाममंत्र सर्वांसी ॥९७॥ तपाचा जो मुख्य प्रकार । जेणें शुद्ध होय अभ्यंतर । तो स्वधर्मीं गा सादर । अत्यादर करावा ॥९८॥ शरीरशोषणा नांव तप । हा मूर्खाचा खटाटोप । हृदयीं श्रीहरि चिंतणें सद्रूप । परम `तप' या नांव ॥९९॥ ऐक होमाचा विचार । देवाचे मुख वैश्वानर । पंचमहायज्ञ अग्निहोत्र । `होम' साचार या नांव ॥४००॥ भजनाची अतिआवडी । कां धर्माची अधिक गोडी । या नांव `श्रद्धा' रोकडी । जाण धडपडी उद्धवा ॥१॥ नसतांही अन्नधनें । आतिथ्यें दे समाधानें । मस्तकीं वंदूनियां दीनें । निववी वचनें सुखरूपें ॥२॥ दीन देखोनि तत्त्वतां । अतिनम्र विनीतता । यथाशक्ति अर्पणें अर्था । `आतिथ्य' तत्त्वतां या नांव ॥३॥ पोटींच्या कळवळेंनि वोजा । अत्यादरें गरुडध्वजा । सांङ्ग साजिरी करणें पूजा । श्रद्धा समाजासंभारीं ॥४॥ मेळवूनि ब्राह्मणसंभार । श्रद्धायुक्त षोडशोपचार । पूजितां संतोषें मी श्रीधर । `पूजा' पवित्र ब्राह्मणांची ॥५॥ शुद्ध व्हावया अंतःकरण । करावें गा तीर्थगमन । तीर्थयात्रीं श्रद्धा गहन । `तीर्थाटन' या नांव ॥६॥ पदोपदीं माझें नाम । गर्जतां स्मरती माझें कर्म । यात्रा करणें निजनिष्काम । `तीर्थयात्रा' परम या नांव ॥७॥ परोपकारार्थ पर्वत । जेंवी कां सामग्री वाहत । तेवीं क्रियामात्रें उपकारार्थ । सदा वर्तत उपकारीं ॥८॥ जेवीं का चंद्राचे किरण । लागतंचि निवनिती जाण । तेवीं जयाचें आचरण । `उपकारें' जन सुखी करी ॥९॥ जें प्राप्त जाहलें अदृष्टीं । तेणें काळ यथासुखें लोटी । कदा समासम नाहीं पोटीं । `यथालाभसंतुष्टी' या नांव ॥४१०॥ कायावाचामनें धनें । जो विनटला गुरूकारणें । त्याचें उठे संसारधरणें । `गुरुसेवा' म्हणणें या नांव ॥११॥ उभय शौचाचे दोनी गुण । जपादि येर दशलक्षण । हे बारा `नेम' जाण । देवो आपण बोलिला ॥१२॥
एकनाथी भागवत - श्लोक ३५ वा
एते यमाः सनियमा उभयोर्द्वादश स्मृताः । पुंसामुपासितास्तात यथाकामं दुहन्ति हि ॥३५॥
दोंही श्लोकीं यम नियम । निरूपिले उत्तमोत्तम । बारा बारा यांचें वर्म । गुह्य परम शास्त्रार्थी ॥१३॥ पुरुष यांचें उपासन । जरी करी सकामन । तैं कामधेनूच्या ऐसें जाण । करिती पूर्ण सकळ काम ॥१४॥ हेचि पैं गा यम नेम । पुरुष उपासी निष्काम । तैं त्यासी माझें निजधाम । अतिसुगम निजप्राप्ती ॥१५॥ आतां शमदमादिक तुझे प्रश्न । जेणें हाता पावे ब्रह्मज्ञान । तें सांगेन गुह्य निरूपण । सावधान उद्धवा ॥१६॥ प्रश्नोत्तर सांगेल श्रीकृष्ण । तें अवधारितां सावधान । तत्काळ होय ब्रह्मज्ञान । हें परम प्रमाण अतिगुह्य ॥१७॥ तृप्त व्हावया बालकासी । निजकरें माता ग्रास दे त्यासी । तेवीं श्रीकृष्ण उद्धवासी । ब्रह्मज्ञानासी देतसे ॥१८॥ जो रसु गोड लागे पित्यासी । तो बळेंचि पाजी बालकासी । तेवीं श्रीकृष्ण उद्धवासी । ब्रह्मरसासी देतसे ॥१९॥ आधींचि तानयाचें प्रेम मोठें । वरी लागतां त्याचें मुखवटें । मग स्वानंदाचेनि नेटें । पान्हा लोटे अनिवार ॥४२०॥ तेवीं स्वयें श्रीकृष्ण । दाटूनि देतसे ब्रह्मज्ञान । तेथें उद्धवें पुशिलें प्रश्न । तेणें अधिक जाण तुष्टला ॥२१॥ आधींच पर्जन्य खरा । वरी मीनलासे वीजवारा । मग अनिवार वर्षे धारा । खणोनि धरा वाहतसे ॥२२॥ तेवीं द्यावया ब्रह्मज्ञान । मिष उद्धवाचे प्रश्न । स्वानंदें तुष्टला श्रीकृष्ण । ब्रह्म पूर्ण देतसे ॥२३॥ निमोले देतां मिठाचे खडे । चिंतामणी हातीं चढे । कां विटेसाठीं परीस जोडे । न घे तो नाडे निजस्वार्था ॥२४॥ तेवीं उद्धवाचे थोडे प्रश्न । तेणें आतुडे ब्रह्म पूर्ण । एका विनवी जनार्दन । श्रोतां अवधान मज द्यावें ॥२५॥ उद्धवाचे चौतीस प्रश्न । त्यांत यम नियम जाहले जाण । उरले बत्तीस गुण । तेंही विवंचन अवधारा ॥२६॥ प्रश्नीं दयेचें प्रतिउत्तर । न सांगेचि शारंगधर । त्या अर्थीं भावगर्भ सार । षड्गुसणैश्वर्य बोलिलें ॥२७॥ एही विखींचें व्याख्यान । पुढें सांगेल श्रीकृष्ण । दयेच्या ठायीं भाग्य संपूर्ण । कोण कारण सांगावया ॥२८॥ एवं उरले एकतीस प्रश्न । आधिक एक सांगेल श्रीकृष्ण । `कर्मस्वसंगम शौच' जाण । कार्यकारणसंबंधा ॥२९॥ ऐसे हे तेहतीस प्रश्न । व्याख्यान सांगेल श्रीकृष्ण । तें करतळीं ब्रह्मज्ञान । उद्धवासी जाण देतसे ॥४३०॥
एकनाथी भागवत - श्लोक ३६ वा
शमो मन्निष्ठता बुद्धेर्दम इन्द्रियसंयमः । तितिक्षा दुःखसंमर्षो जिह्वोपस्थजयो धृतिः ॥३६॥
बुद्धि जे कां विवेकवंती । असार सांडूनि सार धरिती । तिणें मनाच्या सकळ वृत्ती । विवेकस्थिती आवरोनि ॥३१॥ त्या वृत्तीसमवेत आपण । बुद्धि परमात्मीं मिळे जाण । जेवीं सागरासी लवण । दे आलिंगन भावार्थें ॥३२॥ समुद्रीं मिळतां लवण । समुद्रचि होय आपण । तेवीं आत्मनिश्चयें बुद्धि पूर्ण । चैतन्यघन स्वयें होय ॥३३॥ ऐसा बुद्धीचा उपरम । त्यानें म्हणिजे गा `शम' । यापूर्वी करावया दम । तोही अनुक्रम अवधारीं ॥३४॥ शत्रूचें जें दुर्दमन । तो दमु येथें नव्हे जाण । करावें इंद्रियदमन । तेंही लक्षण अवधारीं ॥३५॥ जेणें सहाय होती शमासी । त्या युक्तीं राखणें इंद्रियांसी । विधीवेगळें नेदी भोगासी । आवरी अहर्निशीं वैराग्यें ॥३६॥ ऐसें इंद्रियांचें निग्रहण । त्या नांव गा `दम' गुण । आतां तितिक्षेचें लक्षण । ऐक संपूर्ण सांगेन ॥३७॥ महासुख आलें होये । तें जेणें उल्हासें अंगीं वाहे । तेणेंचि उल्हासे पाहे । दुःखही साहे निजांगीं ॥३८॥ तेज आणि महा अंधारी । नभ समत्वें अंगीं धरी । तेवीं जो अविकारी । सुखदुःखपरी साहता ॥३९॥ गोफणेचा सुवर्णपाषाण । लागे तो दुःखी होय पूर्ण । तेचि वोळखिलिया सुवर्ण । दुःख जाऊन सुख वाटे ॥४४०॥ तैसें द्वंद्वांचें निजस्वरूप । वोळखिलिया सद्रूप । तेव्हा द्वंद्वें होती चिद्रूप । हें मुख्य स्वरूप तितिक्षेचें ॥४१॥ सांडूनियां देहअंहंते । सुखदुःखांहीपरतें । देखणें जें आपणातें । तेचि येथें `तितिक्षा' ॥४२॥ स्वप्नींचे दरिद्र आणि सधनता । जागृतीसी दोन्ही मिथ्या । तेवीं सुखदुःखापरता । देखणें तत्त्वतां ते `तितिक्षा' ॥४३॥ जिव्हा आणि दुसरें शिश्न । यांचा जयो करावा आपण । या नांव `धृति' संपूर्ण । विद्याधारण धृती नव्हे ॥४४॥ जेवीं कृष्णसर्प धरिजे हातीं । हे दोनी धरिजे तैशिया रीतीं । अळुमाळ ढिलावतां धृती । परतोनि खाती धरित्यासी ॥४५॥ ज्यासी द्रव्यदारासक्ती । तेथ कदा न रिगे हे धृती । द्रव्यदाराअनासक्ती । त्याचे घरीं धृती पोषणी सदा ॥४६॥
एकनाथी भागवत - श्लोक ३७ वा
दण्डन्यासः परं दानं कामत्यागस्तपः स्मृतम् । स्वभावविजयः शौर्यं सत्यं च समदर्शनम् ॥३७॥
सर्व भूतांसी न द्यावें दुःख । याचे पोटीं आलें सुख । `महादान' तें हेंचि देख । द्यावें सुख सर्वांसी ॥४७॥ दुःख निरसूनि भूतांसी । सुख देणें गा सर्वांसी । हेंचि उत्तम दान पृथ्वीसी । आन यासी तुकेना ॥४८॥ जन्ममरणाचें दुःख । निरसूनि द्यावें निजसुख । याचि नांवें `दान' देख । अलौकिक उद्धवा ॥४९॥ या नांव गा `परमदान' । उद्धवा निश्चयेंसीं जाण । ऐक तपाचें लक्षण । तुज संपूर्ण सांगेन ॥४५०॥ करूनियां कामाचा त्याग । तप करणें तें अतिचांग । हृदयीं असतां कामदाघ । तपाचें लिंग शोभेना ॥५१॥ सकाम वना जाय तपासी । तो वनींही चिंती वनितेसी । तें तपचि बाधक होय त्यासी । काम आंगेंसीं वर्ततां ॥५२॥ त्यागोनि कामाची कामस्थिती । तैं तपाची उत्तम गती । अखंड लागे माझी स्मृती । `शुद्धतप' प्राप्ती या नांव ॥५३॥ माझ्या ठायीं अनुताप । त्या नांव गा `शुद्ध' तप । कां हृदयीं चिंतितां चित्स्वरूप । हें `परमतप' तपांमाजीं ॥५४॥ ऐक शौर्याचा विचार । रणीं मर्दूनि अरिवीर । जिंतिला शत्रूंचा संभार । तो एथ शूर मानेना ॥५५॥ प्रवाहरूपें अनिवार । जीवभाव लागला थोर । त्यातें जिंके जो महावीर । तो `परम शूर' बोलिजे ॥५६॥ ``माझा सदाचार निर्वाहो । मी सज्ञान निःसंदेहो । माझा पवित्र ब्राह्मणदेहो । हा `जीवभावो' जीवाचा ॥५७॥ देहाचे माथां वर्णाश्रम । आश्रमाचे माथां कर्म । तो कर्माभिमान ज्यां परम । त्यांसी देहभ्रम अनिवार ॥५८॥ जिणोनि जीवाचे स्वभाव । चिदानंदाची राणीव । भोगिजे स्वराज्यवैभव । हें परम गौरव शौर्याचें ॥५९॥ ज्या नांव बोलिजे निजसत्य । तें मी सांगेन निश्चित । सम ब्रह्म देखणें संतत । तें `परम सत्य' उद्धवा ॥४६०॥ वस्तु न देखतां सर्वसम । जें जें देखणें गा विषम । तेंचि असत्य अतिदुर्गम । `सत्य' तें ब्रह्म समसाम्य ॥६१॥ केवळ जें सत्य भाषण । तें निजसत्य नव्हे जाण । तेचिविखींचें निरूपण । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥६२॥
एकनाथी भागवत - श्लोक ३८ वा
ऋतं च सूनृता वाणी कविभिः परिकीर्तिता । कर्मस्वसङ्गमः शौचं त्यागः संन्यास उच्यते ॥३८॥
इतर कवींची वदंती । `ऋत' या नांव सत्य म्हणती । हें सत्य मानावें प्रवृत्तीं । सम ब्रह्म निवृत्तीमाजीं सत्य ॥६३॥ ऋत म्हणिजे तें ऐसें येथ । सत्य वाचा जें श्रोत्यांचें हित । तेंही दुःखसंबंधरहित । `ऋत' निश्चित या नांव ॥६४॥ चित्रीं पाहतां दिसे विषम । त्यामाजीं भिंती सदा सम । तेवीं जग देखतां विषम । ज्यां ब्रह्म सम निजबोधें ॥६५॥ या नांव गा `सत्य' जाण । उद्धवें केला नाहीं जो प्रश्न । त्या शौचाचें निरूपण । देवो आपण सांगत ॥६६॥ नव्हतां शुद्ध अंतःकरण । त्याग संन्यास न घडे जाण । अंतरशुद्ध्यर्थ शौच पूर्ण । स्वधर्माचरण हरि सांगे ॥६७॥ अंतरीं कर्ममळाचें बंधन । त्याचें स्वधर्में करावें क्षालन । कर्मे कर्माचें निर्दळण । करूनि आपण निष्कर्म व्हावें ॥६८॥ ते स्वधर्मीं फळाशा सुटता । कर्मबंधनें तुटती सर्वथा । यालागीं फळनिराशता । अंतरशौचता अतिशीघ्र ॥६९॥ नैराश्यें स्वधर्माचरण । तेणें अंतरमळाचें क्षालन । या नांव गा शौच जाण । `शौच' संपूर्ण नैराश्यें ॥७०॥ `शौच' शुद्धअंेतःकरणीं । ते भूमिका संन्यासग्रहणीं । यालागीं शौच अप्रश्नीं । सारंगपाणी बोलिला ॥७१॥ सकळ संकल्पांचा त्याग । हाचि पैं `संन्यास' चांग । ऐसें बोलिला तो श्रीरंग । `त्याग' तो चांग या नांव ॥७२॥ मी देह हे दृढता जीवीं । संकल्पें तगमग नित्य नवी । बाह्य दंड कमंडलु भगवीं । हें संन्यासपदवी लौकिक ॥७३॥
एकनाथी भागवत - श्लोक ३९ वा
धर्म इष्टं धनं नॄणां यज्ञोऽहं भगवत्तमः । दक्षीणा ज्ञानसंदेशः प्राणायामः परं बलम् ॥३९॥
धन धान्य पशु रत्न । हें प्राण्यासी नव्हे इष्ट धन । मोक्षामार्गीं सबळ जाण । इष्ट धन तो धर्म ॥७४॥ घरीं जें पुरिलें धन । तें घरींच राहे जाण । धर्म तो स्वयें चालतें धन । अंगा बंधन येवो नेदी ॥७५॥ धर्मिष्ठायेवढा कृपण । न देखें मी आणिक जाण । मरतांही स्त्रीपुत्रां वंचून । अवघेंचि धन सवें ने ॥७६॥ धार्मिकीं धर्मार्थ वेंचूनि धन । मी भांडारी केला नारायण । जे समयीं जें जें लागे जाण । तें मी आपण स्वयें पुरवीं ॥७७॥ यालागीं धर्म तो इष्ट धन । हें सत्य सत्य माझें वचन । ऐक यज्ञाचें व्याख्यान । यथार्थ जाण सांगतों ॥७८॥ अग्नि तो माझें मुख जाण । यज्ञभोक्ता मी नारायण । अवघा यज्ञचि मी श्रीकृष्ण । परम प्रमाण वेदोक्त ॥७९॥ तेथें माझें स्वरूप ब्राह्मण । मद्दीक्षादीक्षित जाण । सद्भा वें करूनियां यजन । माझें सुख संपूर्ण पावले ॥४८०॥ तेथ अधर्मद्रव्याचेनि कोडें । अविधी दांभिक याग घडे । तोही मज मुखींच पडे । परी ते कोरडे खडखडीत ॥८१॥ अविधी जाहले पशुघातकी । तेणें अवदानें मी नव्हें सुखी । दंभे पडले कुंभिपाकीं । महानरकीं रौरवीं ॥८२॥ सर्व भूतांच्या भूतमुखीं । अर्पी तें पावे यज्ञपुरुखीं । हे दीक्षा नेणोनि याज्ञिकीं । जाहले नारकी हिंसादोषें ॥८३॥ जो मद्भाावें दीक्षित जाण । विश्वतोमुखीं ज्यांचे यजन । तयांचा `यज्ञ' तो मी नारायण । दक्षीणा कोण ते ऐका ॥८४॥ यज्ञासी मोल नाहीं देख । ज्यासी ज्ञानदक्षिणा अमोलिक । हातां येतांचि याज्ञिक । महासुख पावले ॥८५॥ दक्षिणा आल्या ज्ञानघन । याज्ञिक होती अतिसंपन्न । कल्पांतीं वेंचेना तें धन । निजीं समाधान जीवशिवां ॥८६॥ सर्वांमाजीं प्राण सबळ । प्राणबळें बळी सकळ । प्राणयोगें मन चपळ । अतिचंचळ प्राणस्पंदे ॥८७॥ यापरी गा बळिष्ठ प्राण । प्राणाअधीन सदा मन । तो प्राण जिंकावा आपण । `बळवंतपण' या नांव ॥८८॥ गज उपडिजे पायीं धरून । घायीं चूर कीजे पंचानन । प्राण न जिंकतां जाण । शूरांचें प्रमाण नव्हे बळ ॥८९॥ प्राणाअधीन जीव मन । त्या प्राणाचें करूनि दमन । तो स्वयें कीजे गा स्वाधीन । `अतिबळ' जाण या नांव ॥४९०॥ दृढ प्राणायाम साधिल्यापाठीं । थोरला देवो धांवे भेटी । भेटलिया न सुटे मिठी । ऐसा `बळी' सृष्टीं प्राणायामी ॥९१॥
एकनाथी भागवत - श्लोक ४० वा
भगो म ऐश्वरो भावो लाभो मद्भोक्तिरुत्तमः । विद्याऽऽत्मनि भिदाबाधो जुगुप्सा ह्रीरकर्मसु ॥४०॥
उद्धवें पुशिला दयेचा प्रश्न । तें न सांगोनि श्रीकृष्ण । परम भाग्याचें निरूपण । स्वयें आपण सांगत ॥९२॥ केवळ भाग्येंवीण । दया तितुकी वांझ जाण । यालागीं भाग्यनिरूपण । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥९३॥ म्हणसी कृपणाचें भाग्य । तो असतेनि धनें अभाग्य । परम भाग्य त्याचें चांग । जो दयेतें साङ्ग प्रतिपाळी ॥९४॥ त्या परम भाग्याचें लक्षण । तुज मी सांगेन संपूर्ण । ऐक तेथींची उणखूण । उदारपण भाग्याचें ॥९५॥ `ज्ञान' आणि `वैराग्य' पूर्ण । `लक्ष्मी' आणि `औदार्य' गुण । `ऐश्वर्य' आणि `यश' गहन । हे षड्गु-ण जाण महाभाग्य ॥९६॥ हे षड्गुरण माझें भाग्य । भाग्यें पावे जो सभाग्य । तोचि दयेतें पाळी साङ्ग । अतिअव्यंग पूर्णत्वें ॥९७॥ जो षड्गुसणेंशीं संपन्न । तोचि दीनदयाळू जाण । देऊं जाणे दान सन्मान । दरिद्रविच्छिन्न करूं शके ॥९८॥ ऐशिया सभाग्याची भेटी । होय तें भाग्य पाहिजे ललाटीं । माझ्या भाग्यास सृष्टीं । आणिक दृष्टीं दिसेना ॥९९॥ ऐसोनि ऐश्वर्यें संपन्न । तो दयेचें माहेर जाण । तिसी सोहळे करिती आपण । दया संपन्न त्याचेनि ॥५००॥ यालागीं दयेचे पोटीं । म्यां सांगितली भाग्याची गोठी । भूतदया जयाच्या पोटीं । तो अभाग्य सृष्टीं कदा नोहे ॥१॥ तुवां पुशिला लाभ तो कोण । ऐक त्याचेंही लक्षण । माझी उत्तम भक्ति जाण । `लाभ' संपूर्ण त्या नांव ॥२॥ माझी करिता उत्तम भक्ती । चारी मुक्ती पायां लागती । सुरवर लोटांगणीं येती । लाभ श्रीपति मी लाभें ॥३॥ हा लाभ न येतां हातीं । धनादिकांची जे प्राप्ती । तो नाडु जाण निश्चितीं । नरकगतिदायक ॥४॥ यालागीं परम लाभ माझी भक्ती । जेणें मी लाभें श्रीपती । ऐक विद्येची व्युत्पत्ती । यथानिगुतीं सांगेन ॥५॥ दृढ वासनेचिया संबंधा । शुद्धास आणी जीवपदा । अभेदीं उपजवी भेदा । `अविद्याबाधा' या नांव ॥६॥ देहाचे माथां वर्णाश्रम । आश्रमाचे माथां कर्म । त्या कर्माचा अभिमान परम । तो `जीवधर्म' देहबुद्धी ॥७॥ ते छेदोनि जीवाची बाधा । तो मेळविजे चिदानंदा । ती नांव शुद्ध `आत्मविद्या । येर ते अविद्या सर्वही ॥८॥ जे निरसी गा अविद्या । ते बोलिजे शुद्ध विद्या । येरी शास्त्रादि चौदा विद्या । ते जाण अविद्या पाल्हेली ॥९॥ जे निरसी जीवाची बाधा । ते बोलिजे शुद्ध आत्मविद्या । आइक ह्रीच्या संबंधा । लाजावें सदा निंद्यकर्मी ॥५१०॥ केवळ अवयव झांकणें । ते लज्जा येथ कोण म्हणे । गेलियाही जीवेंप्राणें । अकर्म न करणें ते `लज्जा' ॥११॥
एकनाथी भागवत - श्लोक ४१ वा
श्रीर्गुणा नैरपेक्ष्याद्याः सुखं दुःखसुखात्ययः । दुःखं कामसुखापेक्षा पण्डितो बन्धमोक्षवित् ॥४१॥
सकळ साम्राज्यवैभवेंसीं । चतुर्दशभुवनविलासेंसीं । अंगीं लक्ष्मी आलिया जयापाशीं । परी थुंकोनि तिसी पाहेना ॥१२॥ ऐशी ज्याचे निरपेक्षता । ते उत्कृष्ट `श्री' तत्त्वतां । त्यासी मी श्रीकृष्ण वंदीं माथां । इतरांची कथा कायसी ॥१३॥ ज्यासी लक्ष्मीची निरपेक्षता । त्याची नित्य वस्ती माझे माथां । त्याहीहोनि पढियंता । आणिक सर्वथा मज नाहीं ॥१४॥ सुख आणि महादुःख । दोनींतें ग्रासोनियां देख । प्रकटे स्वानंद स्वाभाविक । या नांव `सुख' उद्धवा ॥१५॥ जेथ दुजयाची चाड नाहीं । इंद्रियांचा पांग न पडे कांहीं । विषयावीण आनंद हृदयीं । `निजसुख' पाहीं या नांव ॥१६॥ विसरोनि हें निजसुख । कामापेक्षा करणें देख । याचि नांव गा परम `दुःख' । केवळ ते मूर्ख सेविती ॥१७॥ नित्य होतां कामप्राप्ती । कदा नव्हे कामतृप्ती । कामापेक्षा पाडी दुःखावर्ती । दुःख निश्चितीं कामापेक्षा ॥१८॥ हा बंध हा मोक्ष चोख । जाणणें जें अलौकिक । कदा नव्हे आनुमानिक । `पंडित' देख या नांव ॥१९॥ ऐशी न जोडतां अवस्था । आम्ही सज्ञान वेदशास्त्रतां । ऐशी अभिमानि पंडितता । ते न ये सर्वथा उपेगा ॥५२०॥ ज्यासी शांति आणि समाyधान । साचार बंधमोक्षाचें ज्ञान । तो `महापंडित' जाण । ऐसें श्रीकृष्ण बोलिला ॥२१॥
एकनाथी भागवत - श्लोक ४२ वा
मूर्खो देहाद्यहंबुद्धीः पन्था मन्निगमः स्मृतः । उत्पथश्चित्तविक्षेपः स्वर्गः सत्त्वगुणोदयः ॥४२॥
वेदशास्त्र नेणता एक । त्यासी मूर्ख म्हणती लोक । ते मूर्खता येथें न मने देख । केवळ मूर्ख देहाभिमानी ॥२२॥ केवळ नश्वर देह देख । तो मी म्हणोनि मानी हरीख । देहाभिमानें भोगी नरक । यापरता मूर्ख कोण आहे ॥२३॥ विटाळें देहाचा संभवो । विटाळें देहाचा उद्भेवो । विटाळेंचि निधन पहा हो । विटाळासी ठावो देहापाशीं ॥२४॥ देहाचें निजरूप येथ । अस्थि चर्म विष्ठा मूत्र । तो मी म्हणवूनि जो श्लाघत । `मूर्ख' निश्चित तो जाण ॥२५॥ ऐशी जे कां देहअणहंता । ती नांव परममूर्खता । चालणें माझ्या वेदपंथा । `सन्मार्गता' ती नांव ॥२६॥ ज्यासी जाहली चित्तविक्षेपता । तो निंदी गुरुदेवता । जो न मानी वेदशास्त्रार्था । तो उत्पथामाजीं पडे ॥२७॥ जो गुरुदोषदर्शी समत्सरता । जो क्रोध करी सुहृदआप्तां । जो धिक्कारी मातापिता । `चित्तविक्षेपता' त्या नांव ॥२८॥ जो सन्मानालागीं पाही । साधुसज्जनांतें करी द्रोही । जो दोष देखे ठायीं ठायीं । `चित्तविक्षेप' पाहीं या नांव ॥२९॥ जो वदे परापवादा । जो करूं रिघे परनिंदा । जो विश्वासे स्त्रियेचे शब्दा । `चित्तविक्षेपबाधा' । ती नांव ॥५३०॥ जो सन्मार्गापासूनि चेवता । पडे अधर्मअाकर्मउेत्पथा । तेही `चित्तविक्षेपता' । जाण तत्त्वतां उद्धवा ॥३१॥ आपण तत्त्वतां परब्रह्म । जाणणें हा `वेदमार्ग' उत्तम । हें नेणोनि वर्तणें सकाम । तोचि परम `उन्मार्ग' ॥३२॥ स्वर्गशब्दाची व्युप्तत्ती । ते सत्त्वगुणाची उत्पत्ती । जेणें निजसुखाची होय प्राप्ती । परी इंद्रलोकगति तो स्वर्ग नोहे ॥३३॥ अमरभुवना जे जे गेले । ते परतोनि पतना आले । शुद्धसत्त्वीं जे मिसळले । ते पावले निजसुख ॥३४॥ ऐसा जो कां सत्त्वगुण । तोचि येथें `स्वर्ग' जाण । आतां नरकाचें लक्षण । तुज संपूर्ण सांगेन ॥३५॥yy
एकनाथी भागवत - श्लोक ४३ वा
नरकस्तमउान्नाहो बंधुर्गुरुरहं सखे । गृहं शरीरं मानुष्यं गुणाढ्यो ह्याढ्य उच्यते ॥४३॥
कामक्रोधलोभउाद्रेक । तेणें खवळे महामोह देख । तो बुडवी सज्ञान विवेक । एकलें एक तम वाढे ॥३६॥ अरुणोदयीं दाट कुहर । निबिड पडे अंधकार । न कळे दिवसनिशाव्यवहार । सूर्यचंद्र दिसेना ॥३७॥ यापरी गा निजचित्तीं । अंधमते वाढे वृत्ती । कर्तव्याकर्तव्यस्थिती । एकही स्फूर्ति स्फुरेना ॥३८॥ ऐसा तमाचा उन्नाह उद्रेक । त्या नांव जाण `महानरक' । परी यमयातना जें दुःख । तो नरक म्हणों नये ॥३९॥ यमयातनां पाप झडे । महामोहें पाप वाढे । याम्य नरक ते बापुडे । अतिनरक गाढे महामोहीं ॥५४०॥ काम क्रोध लोभ देख । हेचि तीनी निरयदायक । तेथ महामोहो आवश्यक । जें होय एक अंधतम ॥४१॥ इतुका मिळे जेथ समुदावो । त्यांते बोलिजे `तमउनन्नाहो' । ऐसा जेथ घडे भावो । तो पुरुष पहा हो नरकरूप ॥४२॥ जो घोरनरकाप्रती जाये । त्याचा तेथूनि उद्धार होये । `तमउरन्नाह' ज्या प्राप्त होये । त्याचा निर्गम नोहे महाकल्पांतीं ॥४३॥ ऐशी तमउरन्नाहाची ख्याती । ऐकोनि उद्धव कंटाळे चितीं । ऐसे बुडते जीव तमोवृत्तीं । त्यांची उद्धारगति कोण करी ॥४४॥ ऐसा उद्धवाचा भावो । जाणोनि बोलिला देवाधिदेवो । बुडतयातें उद्धरी पहा हो । गुरुरावो निजसखा ॥४५॥ ऐसा गुरु तो तूं कोण म्हणशी । मी नित्य लागें ज्याच्या पायांशीं ।g जो दे चिन्मात्र पूर्णब्रह्मासी । `गुरु' नाम तयासी बोलिजे ॥४६॥ त्या ब्रह्मापरीस अधिकता । गुरूसी आलिसे तत्त्वतां । ब्रह्म ब्रह्मत्वें हा प्रतिपादिता । येर्हववीं ब्रह्माची वार्ता कोण पुसे ॥४७॥ अज अव्यय अनंत । अच्छेद्य अभेद्य अपरिमित । हे ब्रह्ममहिमा समस्त । सद्गुदरूंनीं येथ विस्तारिली ॥४८॥ ऐशी ऐकतां सद्गुसरुकीर्ती । जडजीव उद्धरती । `गुरु' नामाची महाख्याती । ऐकोनि कांपती यमकाळ ॥४९॥ त्या सद्गुसरूचें महिमान । करी बुडत्याचें उद्धरण । निवारी जन्ममरण । शिष्यसमाधान निजदाता ॥५५०॥ सुहृद आप्त सखा बंधु । शिष्याचे सद्गु रु प्रसिद्धु । निवारूनि नरकसंबंधु । परमानंदु सुखदाता ॥५१॥ आतां गृहाचें लक्षण । तुज मी सांगेन संपूर्ण । माड्या गोपुरें धवलारें जाण । गृहप्रमाण तें नव्हे ॥५२॥ मनुष्यदेह तो गृहाश्रम । जेथें नित्य वसें मी पुरुषोत्तम । तेथील करितां स्वधर्मकर्म । आत्माराम उल्हासे ॥५३॥ ज्या नरदेहाचिये प्राप्ती । इंद्रादिक देव वांछिती । वेद वानी ज्या देहाची कीर्ति । निजमोक्षप्राप्ती नरदेहीं ॥५४॥ निज `गृह' जें साचार । तें जाणावें नरशरीर । आतां आढ्यपणाचा विचार । तोही प्रकार अवधारीं ॥५५॥ जो ज्ञानगुणीं अतिसंपन्न । जें कल्पांतींही न वेंचे धन । तोचि `आढ्यतम' जाvण । येर तें धन नश्वर ॥५६॥ नश्वर धनाची आढ्यता । अवश्य नेत अधःपाता । ज्ञानधने जे आढ्यता । तेणें ये हाता परब्रह्म ॥५७॥
एकनाथी भागवत - श्लोक ४४ वा
दरिद्रो यस्त्वसंतुष्टः कृपणो योऽजितेन्द्रियः । गुणेष्वसक्तधीरीशो गुणसङ्गो विपर्ययः ॥४४॥
ऐक दरिद्राचें लक्षण । गांठीं असतां कोटी धन । ज्याचें संतुष्ट नाहीं मन । परम `दरिद्री' जाण या नांव ॥५८॥ ज्याचे गांठीं नाहीं कांचवटी । परी संतुष्टता नित्य पोटीं । तोचि संपन्न सकळ सृष्टीं । सत्य गोष्टी हे उद्धवा ॥५९॥ गांठीं असोनियां धन । जो पोटा न खाय आपण । सदा लोलिंगत मन । दरिद्रलक्षण या नांव ॥५६०॥ यापरी जें कृपणपण । ऐक त्याचेंही लक्षण । जेवीं राजा बांधी सेवकजन । तेवीं इंद्रियांअधीन जो होय ॥६१॥ निर्धारितां निजरूप जाण । सर्वांचा राजा तो आपण । तें विसरोनि होय दीन । इंद्रियांअधीन होऊनि ठाके ॥६२॥ मन तयाचें आज्ञाधार । मनाचीं इंद्रियें किंकर । त्यांचाही हा होय डिंगर । अजितेंद्रियें होय थोर `कृपणत्व' ऐसें ॥६३॥ निज किंकराचीं किंकरें । त्या इंद्रियांचीं हा वोळंगे द्वारें । अजितेंद्रियत्वें अतिखरें । निजांगीं सुभरे कृपणत्व ॥६४॥ या नांव गा `कृपणपण' । तुज म्यां सांगितले जाण । आतां ईश्वराचें सुलक्षण । ऐक संपूर्ण उद्धवा ॥६५॥ कनक आणि कामिनी । ज्यासी नावडे मनींहुनी । तोचि `ईश्वर' त्रिभुवनीं । सत्य सत्य हे वाणी उद्धवा ॥६६॥ तुवां जितुके केले प्रश्न । तितुके ज्यासी वोळंगती गुण । त्यांसीही ज्याचें अलिप्तपण । ईश्वरत्व संपूर्ण त्या नांव ॥६७॥ कनक आणि कामिनी । यांचा पंगिस्त मनींहूनी । तोचि `अनीश्वरु' जनीं । हें सत्य मानीं उद्धवा ॥६८॥ शमादि सांगितले प्रश्न । त्यांचें जें विपरित लक्षण । तेंचि अनीश्वरत्व जाण । अशमादि गुण जे ठायीं ॥६९॥
एकनाथी भागवत - श्लोक ४५ वा
एत उद्धव ते प्रश्नाः सर्वे साधु निरूपिताः । किं वर्णितेन बहुना लक्षणं गुणदोषयोः ॥४५॥
उद्धवा तुझे सकळ प्रश्न । म्यां निरूपिले सुलक्षण । जेणें होइजे ब्रह्मसंपन्न । तैसें व्याख्यान सांगितले ॥५७०॥ संसारीं गुणदोषलक्षण । सांगता अपरिमित जाण । यालागीं धरावें गा मौन । परम कठिण गुणदोष ॥७१॥ गुणदोष नायकावे कानीं । गुणदोष न देखावे नयनीं । गुणदोष न बोलावे वदनीं । गुणदोष मनीं न धरावे ॥७२॥ ब्रह्मज्ञानाचें मुख्य लक्षण । तेंही बहुत नाहीं निरूपण । श्लोकार्धें श्रीकृष्ण । स्वमुखें आपण सांगत ॥७३॥
एकनाथी भागवत - श्लोक ४६ वा
गुणदोषदृशिर्दोषो गुणस्तूभयवर्जितः ॥४६॥
इति श्रीमद्भाोगवते महापुराणे पारमहंस्यां संहितायामेकादशस्कन्धे एकोनविंशोऽध्यायः ॥१९॥
ब्रह्म एक परिपूर्ण । तेथें कैंचे दोष कैंचे गुण । अविद्या क्षोभली ते जाण । गुणदोषलक्षण वाढवी ॥७४॥ जो देखों लागे दोषगुण । त्याची अविद्या क्षोभली जाण । जो न देखे गुणदोषभान । तो `ब्रह्मसंपन्न' उद्धवा ॥७५॥ पराचा देखावा दोषगुण । हाचि दोषांमाजीं महादोष जाण । गुणदोष न देखावा आपण । हा उत्तम गुण सर्वार्थीं ॥७६॥ ब्रह्मीं नाहींत दोषगुण । हें सर्वार्थीं सत्य जाण । जो देखे गा दोषगुण । ब्रह्मत्व जाण तेथें नाहीं ॥७७॥ जे गुणदोष देखों लागले । त्यांचें ब्रह्मत्व कैसेनि गेलें । त्यांपाशीं तें वोस जाहलें । कीं रुसूनि गेलें तेथूनी ॥७८॥ जेवीं रविबिंबा राहु ग्रासी । तैं दिवसा देखिजे नक्षत्रांसी । तेवीं अविद्या ब्रह्मत्व जैं प्राशी । तैं गुणदोषांसी देखिजे ॥७९॥ आदरें सांगे श्रीकृष्ण । उद्धवा न देखावे दोषगुण । हे माझे जीवींची निजखूण । तुज म्यां संपूर्ण सांगितली ॥५८०॥ जनीं चौर्यां शीं लक्षयोनी । त्यांत गुणदोष एके स्थानीं । न देखावे मनुष्ययोनीं । तूं इतुकेनी नित्यमुक्त ॥८१॥ म्हणसी स्वाचारपरिपाठीं । गुणदोष देखावे दृष्टीं । उद्धवा हे गोष्टी । स्वधर्मराहाटी ते भिन्न ॥८२॥ निजदोष निरसावयाकारणें । स्वधर्मकर्म आचरणें । तेणें गुणदोष देखणें । तैं नागवी धांवणें तैसें जाहलें ॥८३॥ साळी पिकावया शेतीं । तृण जाळूनि दाढ करिती । तेथ पिकली साळी जैं जाळिती । तैं तोंडीं माती पडली कीं ॥८४॥ व्हावया दोषनिवृत्ती । वेदें द्योतिली धर्मप्रवृत्ती । तेणें स्वधर्में जैं दोष देखती । तैं निजप्राप्ती नागवले ॥८५॥ जेवीं कां सोंगें नटनटी । दाविती हावभाव नाना गोठी । परी तो भाव नाहीं त्यांचे पोटीं । स्वधर्म त्या दृष्टीं करावा ॥८६॥ न देखोनि दोषगुण । स्वधर्म-मर्यादा नोसंडून । करावें गा स्वधर्माचरण । हें मुख्य लाक्षण कर्मांचें ॥८७॥ ऐशिया स्वधर्मगती । कर्ममळ निःशेष जाटी । साधकां निजपदप्राप्ती । गुणदोषस्थिती सांडितां ॥८८॥ गुणदोष देहाचे ठायीं । आत्मा नित्य विदेही । गुणदोष त्याच्या ठायीं । सर्वथा नाहीं उद्धवा ॥८९॥ साधकें न देखावे दोषगुण । सिद्धासी सहजचि नाहीं जाण । जरी दिसों लागले दोषगुण । तरी आली नागवण दोघांसी ॥५९०॥ साधकाची प्राप्ती बुडे । सिद्धाची सिद्धी तत्काल उडे । एवं गुणदोषांचें सांकडें । दोंहीकडे उद्धवा ॥९१॥ गुणदोषीं भरली सृष्टी । तेथ न ठेवावी निज-दृष्टी । हे कळवळोनियां पोटीं । श्रीकृष्णें गोष्टी सांगितली ॥९२॥ गुणदोष विविधभेद । ऐसे आहेत निषिद्ध । तरी कां पां स्वमुखें श्रीगोविंद । बोलिला प्रसिद्ध वेदानुवादें ॥९३॥ येचि अर्थींचा प्रश्न । पुढें उद्धव करील जाण । तेंचि व्यासाचें निरूपण । विसावा जाण जीवशिवां ॥९४॥ तेथ सकाम आणि निष्काम भक्त । यांचे अधिकार अभिव्यक्त । स्वयें सांगेल भगवंता । कथा अद्भु।त ते आहे ॥९५॥ संतीं द्यावें अवधान । श्रोतां व्हावें सावधान । एका विनवी जनार्दन । रसाळ निरूपण पुढें आहे ॥५९६॥
इति श्रीभागवते महापुराणे एकादशस्कंधे भगवद्उद्धवसंवादे एकाकारटीकायां एकोनविंशोऽध्यायः ॥१९॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥श्लोक ॥४६॥ओव्या ॥५९६॥
हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. |
[[]]