एकनाथी भागवत/अध्याय बारावा

<poem>

एकनाथी भागवत - आरंभ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥

ॐ नमो सद्गुरु वसंतू । ऐक्यकाळीं तुझा ऋतू । तया ऋतुकाळींचा मारुतू । ज्ञानवनांतू जैं रिघे ॥१॥ तैं अविद्येचीं जुनीं पानें । गळूनि जाती तत्क्षणें । नव पल्लवीं विराजमानें । विरक्तपणें अनुरक्त ॥२॥ अत्यंत वैराग्याची हांव । खांकर झाले वृक्ष सर्व । त्यांसी निघाले नव पल्लव । अतिलवलव कोंवळिक ॥३॥ जाहल्या वसंताचें रिगवणें । वृक्ष आडवे फुटले तेणें । सोहंभावाचीं सुमनें । तेणें गुणें विकासलीं ॥४॥ कृष्णसारूप्यें कृष्णभ्रमर । तेथें झेपावले अतिसत्वर । आमोद सेविती अरुवार । कैसेनि केसर कुचंबे ॥५॥ सद्भावाच्या आमोदधारा । सेवितां सुख झालें भ्रमरां । हृदयकमळीं केला थारा । मध्यमद्वारा चालिले ॥६॥ भेदोनियां साही कमळें । द्विदळादि षोडशदळें । झेपावले मळयानिळें । सहस्त्रदळीं मिसळले ॥७॥ तेथ सेवूनि पराग धवळ । उन्मत्त मातलें अलिकुळ । करिती आनंदाचा गोंधळ । सुखकल्लोळ स्वानंदें ॥८॥ लागला अनुहताचा ध्वनी । रुणझुणिती दशलक्षणीं । त्याही नादातें प्राशुनी । निःशब्दपणीं निवांत ॥९॥ तेथें मोक्षसुखाचे घड । डोलतां दिसे अतिगोड । तेणें जीवाचें पुरत कोड । करिती धुमाड सोहंशब्दें ॥१०॥ मुमुक्षुमयुर अतिप्रीतीं । पिच्छें पसरूनि नाचती । येऊन वसंतवनाप्रती । टाहो फोडिती गुरुनामें ॥११॥ नेमस्त कोकिळां होतें मौन । वसंतऋतुराज देखोन । तिंहीं करोनि विसर्जन । मधुरस्तवनें गर्जती ॥१२॥ भक्तिसरोवरीं निर्मळ पाणी । विकासल्या नवविध कमळिणी । भक्त सुस्नात तिये स्थानीं । निमज्जनीं निश्चळ ॥१३॥ ते सरोवरींचे सेवितां पाणी । जीवशिव चक्रवाकें दोनी । सद्गुरुचिद्भानु वसंतवनीं । देखोनि मिळणीं मिळालीं ॥१४॥ वसंतें उल्हास तरुवरां । उलोनि लागल्या स्वानंदधारा । पारंब्या भेदूनियां धरा । धराधरा विगुंतल्या ॥१५॥ बोधमलयानिळ झळकत । तेणें वनश्री मघमघीत । मोक्षमार्गीचे पांथिक तेथ । निजीं निजत निजरूपें ॥१६॥ ऐसा सद्गुरु वसंतरावो । निजभक्तवना दे उत्सावो । तो भागवतभजनअवध्यावो । उद्धवासी देवो सांगत ॥१७॥ बारावे अध्यायीं निरूपण । सत्संगाचा महिमा गहन । कर्माचा कर्ता तेथ कोण । त्यागी तें लक्षण कर्माचें ॥१८॥ संपतां अकरावा अध्यावो । गुह्य सांगेन म्हणे देवो । तें परिसावया उद्धवो । न्याहाळी पहा हो हरिवदन ॥१९॥ काय सांगेल गुह्य गोष्टी । कोण अक्षरें निघती ओंठीं । त्या वचनार्था घालावया मिठी । उल्हास पोटीं उद्धवा ॥२०॥ जैसें मेघमुखींचें उदक । वरच्यावरी झेली चातक । तैसें कृष्णवचनालागीं देख । पसरिलें मुख उद्धवें ॥२१॥ स्नान संध्या भोजन । आवडे या एकें काळें जाण । तैसें ज्ञेय ज्ञाता ज्ञान । घ्यावया सावधान उद्धव ॥२२॥ ऐसा उद्धवाचा आदरू । देखोनि हरि झाला सादरू । भक्तकृपाळू अतिउदारू । निजगुह्यसारू सांगत ॥२३॥


एकनाथी भागवत - श्लोक १ ला व २ रा

श्रीभगवानुवाच । न रोधयति मां योगो न साङ्ख्यं धर्म एव च । न स्वाध्यायस्तपस्त्यागो नेष्टापूर्तं न दक्षिणा ॥१॥

व्रतानि यज्ञश्छन्दांसि तीर्थानि नियमा यमाः । यथावरुन्धे सत्सङ्गः सर्वसङ्गापहो हि माम् ॥२॥

मज वश करावयालागीं । सामर्थ्य नाहीं अष्टांगयोगीं । नित्यानित्यविवेक जगीं । आंगोवांगी मज न पवे ॥२४॥ प्रकृतिपुरुषविवंचना । अखंड आलोडितां मना । पावावया माझिया स्थाना । सामर्थ्य जाणा त्या नाहीं ॥२५॥ धर्म अहिंसादिसहित सत्य । त्यांचेनि मी नव्हें प्राप्त । मुख्य वेदाध्ययनेंही मी अप्राप्त । साङ्ग समस्त जरी पढिले ॥२६॥ तेथ तपें कायसीं बापुडीं । पंचाग्नि असार परवडी । कृच्छ्रचांद्रायणें झालीं वेडीं । त्यांचे जोडी मी न जोडें ॥२७॥ देहगेह सांडूनि उदास । विरजाहोमीं हवी सर्वस्व । साधनीं अतिश्रेष्ठ संन्यास । त्यासी मी परेश नातुडें ॥२८॥ करितां श्रौतस्मार्तकर्मांसी । कर्मठें झालीं पानपिसीं । तरी मी नाकळें त्यांसी । क्लेश होमेंसीं कष्टतां ॥२९॥ गोदान भूदान तिलदान । पान देतां धनधान्य । त्यांसीं मी नाटोपें जाण । दानाभिमान न वचतां ॥३०॥ संकटचतुर्थी ऋषिपंचमी । विष्णुपंचक बुधाष्टमी । अनेक व्रतें करितां नेमीं । ते मी कर्मीं नातुडें ॥३१॥ अश्वमेघ राजसूययाग । सर्वस्व वेंचूनि करितां साङ्ग । माझे प्राप्तीसी नव्हतीचि चांग । तेणें मी श्रीरंग नाटोपें ॥३२॥ हो कां वापी कूप आराम । वृक्षरोपण वनविश्राम । आचरतां स्मार्तकर्म । मी आत्माराम न भेटें ॥३३॥ नाना छंद रहस्यमंत्र । विधिविधाने अतिविचित्र । सामर्थ्यें अतिविशेष पवित्र । नव्हती स्वतंत्र मत्प्राप्ती ॥३४॥ पुष्करादि नाना तीर्थें । पापनिर्दळणीं अतिसमर्थें । शीघ्र पावावया मातें । सामर्थ्य त्यांतें असेना ॥३५॥ यमनियम अहर्निशीं । जे सदा शिणती साधनेंसीं । ते यावया माझ्या द्वारासी । सामर्थ्य त्यांसी असेना ॥३६॥ उद्धवा यमनियमनिर्धार । एकुणिसावे अध्यायीं सविस्तर । तुज मी सांगेन साचार । संक्षेपाकार बारावा ॥३७॥ ते यमनियम बारा बारा । आणि सकळ साधनसंभारा । यावया माझिया नगरा । मार्गु पुढारा चालेना ॥३८॥ ते गेलिया संतांच्या दारा । धरूनि साधूच्या आधारा । अवघी आलीं माझ्या घरां । एवं परंपरा मत्प्राप्ती ॥३९॥ तैसी नव्हे सत्संगती । संगें सकळ संगांतें छेदिती । ठाकठोक माझी प्राप्ती । पंगिस्त नव्हती आणिका ॥४०॥ किडी भिंगुरटीच्या संगतीं । पालटली स्वदेहस्थिती । तेवीं धरिलिया संतांची संगती । भक्त पालटती मद्रूपें ॥४१॥ केवळ पाहें पां जडमूढें । चंदनासभोंवतीं झाडें । तीं सुगंध होऊनि लांकडें । मोल गाढें पावलीं ॥४२॥ तीं अचेतन काष्ठें सर्वथा । चढलीं देवब्राह्मणांचे माथां । त्यांचा पांग पडे श्रीमंता । राजे तत्त्वतां वंदिती ॥४३॥ तैशी धरिल्या सत्संगती । भक्त माझी पदवी पावती । शेखीं मजही पूज्य होती । सांगों किती महिमान ॥४४॥ संतसंगतीवेगळें जाण । तत्काळ पावावया माझें स्थान । आणिक नाहींच साधन । सत्य जाण उद्धवा ॥४५॥ मागां बोलिलीं जीं साधनें । तीं अवघींही मलिन अभिमानें । ऐक तयांचीं लक्षणें । तुजकारणें सांगेन ॥४६॥ अष्टांगयोगीं दुर्जयो पवन । सर्वथा साधेना जाण । साधला तरी नागवण । अनिवार जाण सिद्धींची ॥४७॥ नित्यानित्यविवेकज्ञान । तेथ बाधी पांडित्यअीभिमान । प्रबळ वांच्छी धनमान । ज्ञानचि विघ्न ज्ञान्यासी ॥४८॥ अहिंसाधर्म करितां जनीं । धर्मिष्ठपणीं गाळिती पाणी । गाळितां निमाल्या जीवश्रेणी । अधर्मपणीं तो धर्म ॥४९॥ करितां वेदाध्ययन । मुख्य वेदें धरिलें मौन । पठणमात्रें मी नातुडें जाण । याजनदान वांच्छिती ॥५०॥ तप करूं जातां देहीं । क्रोध तापसांच्या ठायीं । परता जावों नेदी कंहीं । वाढला पाहीं नीच नवा ॥५१॥ सर्वस्वत्यागें संन्यासग्रहण । तेथही न जळे देहाभिमान । व्यर्थ विरजाहोम गेला जाण । मानाभिमान बाधिती ॥५२॥ श्रौत स्मार्त कर्म साङ्ग । इष्टापूर्त जे कां याग । तेथ आडवा ठाके स्वर्गभोग । कर्मक्षय रोग साधकां ॥५३॥ नाना दानें देतां सकळ । वासना वांच्छी दानफळ । कां दातेपणें गर्व प्रबळ । लागला अढळ ढळेना ॥५४॥ अनंतव्रतें व्रती झाला । चौदा गांठीं देवो बांधला । शेखीं अनंतातें विसरला । देवो हरविला हातींचा ॥५५॥ नाना यज्ञ करितां विधी । मंत्र तंत्र पात्रशुद्धी । सहसा पावों न शके सिद्धी । पावल्या बाधी फळभोगू ॥५६॥ नाना छंदें रहस्यमंत्र । विकळ हों नये उच्चार । मंत्रीं मंत्र रचिले साचार । चळले अपार मंत्रवादी ॥५७॥ भगवीं करूनि तांबडीं । तीर्थाभिमानें जाले कापडी । भिके लागलीं बापुडीं । नाहीं अर्धघडीं विश्रांती ॥५८॥ यमनियम बारा बारा । करितां अखंड बोरबारा । चोविसांमाजीं यांचा उभारा । नेणती सोयरा पंचविसावा ॥५९॥ एवं सांगीतल्या साधनांसी । आपमतीं करितां त्यांसी । बाधकता आहे सर्वांसी । ते म्यां तुजपासीं सांगीतली ॥६०॥ करितां साधनें आपमतीसी । तेणें विघ्नें उपजती ऐसी । तींच साधनें साधु उपदेशीं । सर्वही सिद्धीसी पावती ॥६१॥ साधु न सांगतां निर्धारीं । नाना साधनें हा काय करी । कोण विधान कैसी परी । निजनिर्धारीं कळेना ॥६२॥ न करितां साधनव्युत्पत्ती । केवळ जाण सत्संगती । मज पावले नेणों किती । तें मी तुजप्रती सांगेन ॥६३॥


एकनाथी भागवत - श्लोक ३ रा व ४ था

सत्सङ्गेन हि दैतेया यातुधाना मृगाः खगाः । गन्धर्वाप्सरसो नागाः सिद्धाश्चारणगुह्यकाः ॥३॥

विद्याधरा मनुष्येषु वैश्याः शूद्राः स्त्रियोऽन्त्यजाः । रजस्तमःप्रकृतयः तस्मिंस्तस्मिन् युगेऽनघ ॥४॥ पाहतां केवळ जडमूढ । रजतमयोनीं जन्मले गूढ । सत्संगती लागोनि दृढ । मातें सुदृढ पावले ॥६४॥ दैत्य दानव निशाचर । खग मृग गंधर्व अप्सर । सिद्ध चारण विद्याधर । नाग विखार गुह्यक ॥६५॥ खग मृग सर्प पावले मातें । मानव तंव सहजें सरते । वैश्य शूद्र स्त्रियादि समस्तें । पावलीं मातें सत्संगें ॥६६॥ जे सकळवर्णधर्मांवेगळे । ज्यांच्या नामास कोणी नातळे । छाया देखूनि जग पळे । अत्यंत मैळे अंत्यज ॥६७॥ तिंहीं धरोनि सत्संगती । आले माझिया पदाप्रती । देवद्विज तयांतें वंदिती । अभिनव कीर्ति संतांची ॥६८॥ धरिलिया सत्संगती । निंद्य तेही वंद्य होती । उद्धवा तूं निष्पाप निश्चितीं । तरी सत्संगती करावी ॥६९॥ सोनें साडेपंधरें चोखडें । त्यासी रत्नासची संगती जोडे । तैं अधिकाधिक मोल चढे । मुकुटीं चढे महेंद्रा ॥७०॥ तैंसी पुण्य पुरुषा सत्संगती । जाहल्या अनंत सुख पावती । सुरवर त्यांतें वंदिती । शिवादि येती भेटीसी ॥७१॥ यमधर्म पायां लागती । तीर्थें पायवणी मागती । भावें धरिल्या सत्संगती । एवढी प्राप्ती पुरुषासी ॥७२॥ दैत्य राक्षस स्त्री शूद्र पाहीं । अंत्यज तरले म्हणसी कायी । त्या त्या युगाच्या ते ते ठायीं । बहुसाल पाहीं उद्धरिले ॥७३॥


एकनाथी भागवत - श्लोक ५ वा व ६ वा

बहवो मत्पदं प्राप्तास्त्वाष्ट्रकायाधवादयः । वृषपर्वा बलिर्बाणो मयश्चाथ विभीषणः ॥५॥

सुग्रीवो हनुमानृक्षो गजो गृध्रो वणिक्पथः । व्याधः कुब्जा व्रजे गोप्यो यज्ञपत्न्यपस्तथापरे ॥६॥

वृत्रासुर गाइजे वेदीं । जो इंद्रासी मिसळला युद्धीं । युद्धींही अविरुद्ध बुद्धी । माझे निजपदीं पावला ॥७४॥ ऐकतां नारदाच्या गोठी । गर्भींच मजसी घातली मिठी । जो जन्मला कयाधूच्या पोटीं । भक्तजगजेठी प्रल्हादु ॥७५॥ वृषपर्वा दैत्य उद्भटू । माझे पदीं झाला प्रविष्टू । बळीच्या द्वारी मी खुजटू । झालों बटू भिकेसी ॥७६॥ छळें करितां बळिबंधन । छळितां मी छळिलों जाण । अंगा आलें द्वारपाळपण । बळीआधीन मी झालों ॥७७॥ त्या बळीचा पुत्र बाणासुर । शिववरें मातला थोर । माझे पुत्राचा चोरिला पुत्र । दोहींचा हेर नारदू ॥७८॥ तो म्यां साधूनि धरिला चोरू । बाणीं केला अतिजर्जरू । छेदिला सहस्त्र भुजांचा भारू । शिव जीवें मारूं नेदीच ॥७९॥ तो म्हणे भक्तपुत्र तू झणीं मारीं । मजही बळीची भीड भारी । अखंड मी असें त्याच्या द्वारी । यालागीं उद्धरीं बाणातें ॥८०॥ मग संबोखावया शिवातें । बाण आपुले निजहस्तें । ऐक्यें शिवपदीं स्थापिलें त्यातें । कल्याणातें पावला ॥८१॥ खांडववन अग्नीसी । अर्जुनें दीधलें खावयासी । तेथें जळतां मयासुरासी । म्यांचि तयासी उद्धरिलें ॥८२॥ राक्षसकुळीं जन्मला जाण । शत्रूचा बंधू बिभीषण । माझ्या ठायीं अनन्यशरण । जीवप्राण तो माझा ॥८३॥ सुग्रीव हनुमंत जांबवंतू । यांचा पवाडा विख्यातू । जडायु उद्धरिला वनांतू । जो रावणें खस्तू केला होता ॥८४॥ गज सरोवरीं ग्राहग्रस्त । स्त्रियांपुत्रीं सांडिला जीत । तो अंतकाळीं मातें स्मरत । आर्तभूत अतिस्तवनें ॥८५॥ सांडूनि समस्तांची आस । पाहोनि वैकुंठाची वास । राजीव उचलूनि राजस । पाव परेश म्हणे वेगीं ॥८६॥ त्या गजेंद्राचे तांतडी । वैकुंठींहूनि लवडसवडी । म्यां गरुडापुढें घालोनि उडी । बंधन तोडीं गजाचे ॥८७॥ त्यासी पशुयोनीं जन्म होतें । परी तो अंतीं स्मरला मातें । पावला माझ्या निजधामातें । गाइजे त्यातें पुराणीं ॥८८॥ वैश्य तुळाधार वाणी । सत्य वाचा सत्य जोखणी । सत्यें पावला मजलगुनी । सत्यतोलणी त्याचें नांव ॥८९॥ अंत्यजांमाजीं धर्मव्याध । माझें पावला निजपद । जराव्याध गा प्रसिद्ध । करोनि अपराध उद्धरिला ॥९०॥ चरणीं विंधोनियां बाण । घायें घेतला माझा प्राण । तो परीक्षिति जराव्याध जाण । कृष्णें आपण तारिला ॥९१॥ कौलिकांमाजीं गुहक देख । आला श्रीरामासंमुख । कर्म निरसलें निःशेख । निजधाम देख पावला ॥९२॥ कुब्जा तीं ठायीं वांकुडी । नीट निजभावें चोखडी । तिच्या चंदनाची शुद्ध गोडी । अति आवडी मजलागीं ॥९३॥ तिने चर्चूनियां चंदन । मन केलें मदर्पण । मी झालों तिजआधीन । निजधाम ते जाण पावली ॥९४॥ गोकुळींचिया गोपिका । संसारासी होऊनि विमुखा । तनमनप्राणें मजलागीं देखा । भाळोनि निजसुखा पावल्या ॥९५॥ माझी गोपिकांसी परम आवडी । कीं मजचि गोपिकांची गोडी । पाहतां यांचे समान पाडीं । जाहलीं बापुडीं साधनें ॥९६॥ सांडूनि संसाराची चाड । न धरूनि पतिपुत्रांची भीड । यज्ञपत्न्यां सी माझें कोड । भावार्थें दृढ भाविकां ॥९७॥ तिंहीं मज अर्पोनियां अन्न । माझें निजधाम पावल्या जाण । मज न पावतीच ते ब्राह्मण । जयांसी कर्माभिमान कर्माचा ॥९८॥ एक ब्राह्मण अतिशास्त्रबळें । पत्नीरसी येवूं नेदी मजजवळें । तुम्ही वेदशास्त्रांही वेगळे । गोरक्ष गोंवळे केवीं पूजा ॥९९॥ येरी समस्तां जातां देखोन । तिचें मजलागीं तळमळी मन । अति कर्मठ तो ब्राह्मण कठिण । अवरोधूनि राखिली ॥१००॥ पित्यानें लाविलीसी माझ्या हातीं । तेव्हांच मी तुझ्या देहाचा पती । मज सांडूनि केउती । गोवळाप्रती जातेसी ॥१॥ येरी म्हणे तूं या देहाचा पती । तो देह ठेवूनियां तयाप्रती । जीवित्वे मीनलिया मजप्रती । सायुज्य मुक्ति पावली ॥२॥ ज्या माझिया प्राप्तीसी । साधक शिणती नाना सायासीं । तीं साधनें न करितां त्यांसी । अनायासीं मज पावल्या ॥३॥


एकनाथी भागवत - श्लोक ७ वा

ते नाधीतश्रुतिगणा नोपासितमहत्तमाः । अव्रतातप्ततपसः मत्सङ्गान्मामुपागताः ॥७॥

तिंहीं नाहीं केलें वेदपठण । नाहीं गुरु केले केवळ शास्त्रज्ञ । व्रततपादि नाना साधन । नाहीं जाण तिंहीं केलें ॥४॥ केवळ गा सत्संगतीं । मज पावल्या नेणों किती । एकभावें जे भावार्थी । त्यांसी मी श्रीपती सुलभू ॥५॥


एकनाथी भागवत - श्लोक ८ वा

केवलेन हि भावेन गोप्यो गावो नगा मृगाः । येऽन्ये मूढधियो नागाः सिद्धा मामीयुरञ्जसा ॥८॥

केवळस्वरूप जे संत । त्यां माझी संगती झाली प्राप्त । काय करिसी तप व्रत । भावार्थें प्राप्त मज जाहलिया ॥६॥ होआवया माझें पद प्राप्त । त्यांसी भांडवल भावार्थ । भावबळें गा समस्त । पद निश्चित पावल्या ॥७॥ ऐकोनि माझें वेणुगीत । गोपिका सांडूनि समस्त । निजदेहातें न सांभाळीत । मज गिंवसीत पातल्या ॥८॥ सांडूनि पतिपित्यांची चाड । न धरोनि वेदशास्त्रांची भीड । माझे ठायीं निजभाव दृढ । प्रेम अतिगोड गोपिकां ॥९॥ पुत्रस्नेह तोडूनि घायें । विधीतें रगडूनि पायें । माझे आवडीचेनि लवलाहें । गोपिका मज पाहें पावल्या ॥१०॥ त्याचपरी जाण गायी । वेणुध्वनीं वेधल्या पाहीं । व्याघ्रभय विसरल्या देहीं । माझ्या ठायीं विनटल्या ॥११॥ माझ्या वेणुध्वनीं वेधलें मन । वत्सें विसरलीं स्तनपान । मुखींचा कवळ मुखीं जाण । माझें ध्यान लागलें ॥१२॥ माझ्या वेणुश्रवणास्तव जिंहीं । निजवैर सांडूनि देहीं । येरयेरांवरी माना पाहीं । व्याघ्रहरिणें तींही विनटलीं ॥१३॥ म्यां उपडिले यमलार्जुन । ते तरले हें नवल कोण । वृंदावनींचे वृक्ष तृण । माझ्या सांनिध्यें जाण उद्धरले ॥१४॥ मयूर तरले मोरपिसीं । गुल्मलतातृणपाषाणांसी । जड मूढ वृंदावनवासी । मत्सानिध्यें त्यांसी उद्धारू ॥१५॥ माझे संगतीं अनन्य प्रीती । तेचि त्यांस शुद्ध भक्ती । तेणें कृतकृत्य होऊनि निश्चितीं । माझी निजप्राप्ती पावले ॥१६॥ माझेनि चरणघातें साचार । कालिया तरला दुराचार । नागनागिणी सपरिवार । माझेनि विखार उद्धरले ॥१७॥ आपली जे निजपदप्राप्ती । ते सत्संगेंवीण निश्चितीं । दुर्लभ हें उद्धवाप्रती । स्वयें श्रीपती सांगत ॥१८॥


एकनाथी भागवत - श्लोक ९ वा

यं न योगेन साङ्ख्येन दानव्रततपोऽध्वरैः । व्याख्यास्वाध्यायसन्न्यासैः प्राप्नुयाद् यत्नावानपि ॥ ९ ॥

योग याग व्रत दान । वेदाध्ययन व्याख्यान । तप तीर्थ ज्ञान ध्यान । संन्यासग्रहण सादरें ॥१९॥ इत्यादि नाना साधनें । निष्ठा करितां निर्बंधनें । माझी प्राप्ति दुरासतेनें । जीवेंप्राणें न पविजे ॥१२०॥ यापरी शिणतां साधनेंसीं । माझी प्राप्ति नव्हे अतिप्रयासीं । ते गोपी पावल्या अप्रयासीं । सत्संगासी लाहोनी ॥२१॥ त्या गोपिकांसी माझी प्रीती । मीचि त्यांची सत्संगती । सत्संगें निजपदप्राप्ती । जाण निश्चितीं उद्धवा ॥२२॥ गोपिकांची सप्रेम स्थिती । ते तुज गोकुळीं झाली प्रतीती । तुजही न तर्केच त्यांची प्रीती । ते मी तुजप्रती सांगेन ॥२३॥ गोपिकांचें अत्यंत प्रेम । स्वमुखें सांगे पुरुषोत्तम । उद्धवाचें भाग्य उत्तम । आवडीचें वर्म देवो सांगे ॥२४॥


एकनाथी भागवत - श्लोक १० वा

रामेण सार्धं मथुरां प्रणीते श्वाफल्किना मय्यनुरक्तचित्ताः । विगाढभावेन न मे वियोग तीव्राधयोऽन्यं ददृशुः सुखाय ॥१०॥

बळिभद्रासमवेत तत्त्वतां । अक्रूरें मज मथुरे नेतां । तैं गोपिकांसी जे झाली व्यथा । ते सांगतां मज न ये ॥२५॥ ते त्यांची अवस्था सांगतां । मज अद्यापि धीर न धरवे चित्ता । ऐसें देवो सांगतसांगतां । कंठीं बाष्पता दाटली ॥२६॥ सांगतां भक्तांचें निजप्रेम । प्रेमें द्रवला पुरुषोत्तम । जो भक्तकामकल्पद्रुम । कृपा निरुपम भक्तांची ॥२७॥ मज मथुरे जातां देखोनी । आंसुवांचा पूर नयनीं । हृदय फुटे मजलागुनी । प्रेम लोळणी घालिती ॥२८॥ पोटांतील परम प्रीती । सारितां मागें न सरती । धरिले चरण न सोडिती । येती काकुळती मजलागीं ॥२९॥ नवल भावार्थ त्यांच्या पोटीं । माझ्या रूपीं घातली मिठी । सोडवितां न सुटे गांठी । श्वास पोटीं परतेना ॥१३०॥ लाज विसरल्या सर्वथा । सासुरां पतिपित्यां देखतां । माझे चरणीं ठेऊनि माथा । रडती दीर्घता आक्रंदें ॥३१॥ मजवीण अवघें देखती वोस । माझीच पुनःपुन्हा पाहती वास । थोर घालोनि श्वासोच्छ्वास । उकसाबुकसीं स्फुंदत ॥३२॥ आमुचा जिवलग सांगती । घेऊनि जातो हा दुष्टमूर्ती । अक्रूरा संमुख क्रूर म्हणती । येती काकुळती मजलागीं ॥३३॥ उभ्या ठाकोनि संमुख । माझें पाहती श्रीमुख । आठवे वियोगाचें दुःख । तेणें अधोमुख विलपती ॥३४॥ ऐसिया मजलागीं आसक्त । माझ्या ठायीं अनन्यचित्त । विसरल्या देह समस्त । अतिअनुरक्त मजलागीं ॥३५॥ माझेनि वियोगें तत्त्वतां । त्यांसी माझी तीव्र व्यथा । ते व्यथेची अवस्था । बोलीं सांगतां मज न ये ॥३६॥ मजवेगळें जें जें सुख । तें गोपिकांसी केवळ दुःख । कैशी आवडी अलोलिक । मज हृदयीं देख न विसंबती ॥३७॥ मज गोकुळी असतां । माझे ठायीं आसक्तचित्ता । ते आसक्ती समूळ कथा । ऐक आतां सांगेन ॥३८॥


एकनाथी भागवत - श्लोक ११ वा

तास्ताः क्षपाः प्रेष्ठतमेन नीता मयैव वृन्दावनगोचरेण । क्षणार्धवत्ताः पुनरङ्ग तासां हीना मया कल्पसमा बभूवुः ॥११॥

नवल गोपिकांचा हरिख । मज वृंदावना जातां देख । माझें पाहोनि श्रीमुख । प्रातःकाळीं सुख भोगिती ॥३९॥ गायी पाजोनियां पाणी । गोठणीं बैसवीं मध्यान्हीं । तेथें उदकमिषें गौळणी । पहावयालागूनी मज येती ॥१४०॥ तेथें नाना कौतुकें नाना लीला । नाना परींच्या खेळतां खेळां । तो तो देखोनि सोहळा । सुखें वेल्हाळा सुखावती ॥४१॥ मज सायंकाळीं येतां देखोनी । आरत्या निंबलोण घेऊनी । सामोर्याा येती धांवोनी । लागती चरणीं स्वानंदें ॥४२॥ ऐसी त्रिकाळ दर्शनें घेतां । धणी न पुरे त्यांचे चित्ता । त्याहीवरी वर्तली कथा । एकांतता अतिगुह्य ॥४३॥ त्या गुह्याचें निजगुज । उद्धवा मी सांगेन तुज । महासुखाचें सुखभोज । मी अधोक्षजा नाचिंनलों ॥४४॥ तें सुख गोपिका जाणती । कीं माझें मी जाणें श्रीपती । जे रासक्रीडेच्या रातीं । झाली सुखप्राप्ती सकळिकांसी ॥४५॥ त्या सुखाची सुखगोडी । रमा काय जाणे बापुडी । ब्रह्मादिकें केवळ वेडीं । त्या सुखाची गोडी नेणती ॥४६॥ पावावया त्या सुखासी । सदाशिव झाला योगाभ्यासी । तरे प्राप्ती नव्हे तयासी । भुलला मोहिनीसी देखतां ॥४७॥ उमा होऊनि भिल्लटी । तिने भुलविला धूर्जटी । त्या सुखाची हातवटी । नेणती हटी तापसी ॥४८॥ जवळी असोनि निश्चितीं । संकर्षण महामूर्ती । त्यासी त्या सुखाची प्राप्ती । नव्हे निश्चितीं उद्धवा ॥४९॥ रासक्रीडा गोपिकांप्रती । कोणी म्हणेल कामासक्ती । तेथ कामाची कैंची प्राप्ती । ऐक निश्चितीं उद्धवा ॥१५०॥ शिवातें जिणोनि फुडा । काम म्हणे मी सबळ गाढा । माझी भेदावया रासक्रीडा । वाऊनि मेढा चालिला ॥५१॥ जेथ माझ्या स्वरूपाचें वोडण । तेथ न चले कामाचें कामपण । मोडले मदनाचे बाण । दृढ वोडण स्मरणाचें ॥५२॥ काम कामिकां चपळदृष्टी । निजक्षोभाची तीक्ष्ण बाणाटी । संधि साधूनि विंधे हटी । ते नव्हेचि पैठी हरिरंगीं ॥५३॥ जेथ मी क्रीडें आत्मारामू । तेथ केवीं रिघे बापुडा कामू । माझे कामें गोपिका निष्कामू । कामसंभ्रमू त्यां नाहीं ॥५४॥ जो कोणी स्मरे माझें नामू । तिकडे पाहूं न शके कामू । जेथ मी रमें पुरुषोत्तमू । तेथ कामकर्मू रिघेना ॥५५॥ कामू म्हणे कटकटा । अभाग्य भाग्यें झालों मोटा । रासक्रीडेचिया शेवटील गोटा । आज मी करंटा न पवेंचि ॥५६॥ देखोनि रासक्रीडा गोमटी । काम घटघटां लाळ घोटी । लाज सांडूनि जन्मला पोटीं । त्या सुखाचे भेटीलागोनि ॥५७॥ तो काम म्यां आपुले अंकीं । केला निजभावें निजसुखी । तें माझें निजसुख गोपिकीं । रासमिषें कीं भोगिलें ॥५८॥ ते रासक्रीडेची राती । म्यां ब्रह्मषण्मास केली होती । गोपिका अर्धक्षण मानिती । वेगीं कां गभस्ती उगवला ॥५९॥ जेथ माझा क्रीडासुखकल्लोळ । तेथ कोण स्मरे काळवेळ । गोपिकांचें भाग्य प्रबळ । माझें सुख केवळ पावल्या ॥१६०॥ ऐशा माझिया संगतीं । भोगिल्या राती नेणों किती । तरी त्यांसी नव्हे तृप्ती । चढती प्रीती मजलागीं ॥६१॥ गोपिका करूनि माझी भक्ती । मी प्रसन्न केलों श्रीपती । रास मागीतला एकांतीं । माझी सुखप्राप्ती पावावया ॥६२॥ त्या जाण वेदगर्भींच्या श्रुती । श्रुतिरूपें नव्हे मत्प्राप्ती । तैं परतल्या म्हणोनि 'नेति नेति' । माझी सुखसंगती न पवेचि ॥६३॥ विषयबुद्धी तें मुख्य अज्ञान । तें असतां मी न भेटें जाण । असतां वेदोक्त जाणपण । तेणेंही संपूर्ण न भेटें मी ॥६४॥ जाणीवनेणीव गेलिया निःशेष । माझें पाविजे निजात्मसुख । श्रुति जाणोनि हें निष्टंक । गोकुळीं त्या देख सुखार्थ आल्या ॥६५॥ त्याचि जाण समस्त श्रुती । गोपिकारूपें गोकुळा येती । रासक्रीडामिसें एकांतीं । माझी सुखप्राप्ती पावल्या ॥६६॥ हाही असो अभिप्रावो । उद्धवा ज्यासी जैसा भावो । त्यालागीं मी तैसा देवो । यदर्थीं संदेहो असेना ॥६७॥ उद्धवा मी भक्तांसी देख । कोणे काळीं नव्हें विन्मुख । जो तैसा भावी भाविक । तैसा मी देख तयासी ॥६८॥ मी जनांसी सदा सन्मुख । जनचि मजसी होती विन्मुख । यासी कांहीं न चले देख । दाटूनि दुःख भोगिती ॥६९॥ मी सकाम सकामाच्या ठायीं । निष्कामासी निष्काम पाहीं । नास्तिका मी लोकीं तिहीं । असतूचि नाहीं नास्तिक्यें ॥१७०॥ असो हे किती उपपत्ती । ऐक गोपिकांसी माझी प्रीती । माझे सुखसंगें भोगिल्या राती । त्या मानिती निमेषार्ध ॥७१॥ माझ्या वियोगें त्यांसी राती । ज्या आलिया यथास्थिती । त्या गोपिका कल्पप्राय मानिती । सन्निध स्वपती असतांही ॥७२॥ त्यांच्या दुःखाची अवस्था । बोलें न बोलवे सर्वथा । माझेनि वियोगें मातें स्मरतां । समाधिअवस्था पावल्या ॥७३॥


एकनाथी भागवत - श्लोक १२ वा

ता नाविदन् मय्यनुषङ्गबद्ध धियः स्वमात्मानमदस्तथेदम् । यथा समाधौ मुनयोऽब्धितोये नद्यः प्रविष्टा इव नामरूपे ॥१२॥

मज गोकुळीं असतां । माझे ठायीं आसक्तचित्ता । हे अवघी समूळ कथा । तुज म्यां तत्त्वतां सांगीतली ॥७४॥ ऐसियांसी म्यां अतिनिचाडतां । कृतघ्नाचे परी सांडूनि जातां । माझ्या वियोगकाळींची व्यथा । पाषाण पाहतां उतटती ॥७५॥ यापरी मजवेगळ्या असतां । मागें माझी कथा वार्ता । सदा माझें स्मरण करितां । मदाकारता पावल्या ॥७६॥ करितां दळणकांडण । माझे दीर्घस्वरें गाती गुण । कीं आदरिल्या दधिमंथन । माझें चरित्रगायन त्या करिती ॥७७॥ करितां सडासंमार्जन । गोपिकांसी माझें ध्यान । माझेनि स्मरणें जाण । परिये देणें बालकां ॥७८॥ गायीचें दोहन करितां । माझे स्मरणीं आसक्तता । एवं कर्मीं वर्तता । माझ्या विसराची वार्ता विसरल्या ॥७९॥ करितां गमनागमन । अखंड माझ्या ठायीं मन । आसन भोजन प्राशन । करितां मद्ध्यान तयांसी ॥१८०॥ एवं मज गेलियापाठीं । ऐसी माझी आवडी मोठी । अखंड माझ्या ठायीं दृष्टीं । माझ्याचि गोष्टी सर्वदा ॥८१॥ ऐसी अनन्य ठायींच्या ठायीं । गोपिकांसी माझी प्रीती पाहीं । त्या वर्ततांही देहगेहीं । माझ्या ठायीं विनटल्या ॥८२॥ यापरी बुद्धी मदाकार । म्हणोनि विसरल्या घरदार । विसरल्या पुत्रभ्रतार । निजव्यापार विसरल्या ॥८३॥ विसरल्या विषयसुख । विसरल्या द्वंद्वदुःख । विसरल्या तहानभूक । माझेनि एक निदिध्यासें ॥८४॥ जेणें देहें पतिपुत्रांतें । आप्त मानिलें होतें चित्तें । तें चित्त रातलें मातें । त्या देहातें विसरोनी ॥८५॥ विसरल्या इहलोक परलोक । विसरल्या कार्यकारण निःशेख । विसरल्या नामरूप देख । माझें ध्यानसुख भोगितां ॥८६॥ निरसोनि तत्त्वांचे विकार । समाधि पावे मुनीश्वर । तो विसरे जेवीं संसार । तेवीं मदाकार गोपिका ॥८७॥ जेवीं कां नाना सरिता । आलिया सिंधूतें ठाकितां । तेथें पावोनि समरसता । नामरूपता विसरल्या ॥८८॥ तेवीं गोपिका अनन्यप्रीतीं । माझी लाहोनियां प्राप्ती । नामरूपाची व्युत्पत्ती । विसरल्या स्फूर्ती स्फुरेना ॥८९॥ सच्चिदानंदस्वरूपप्रभावो । नेणतां माझा निजस्वभावो । गोपिकांचा अनन्यभावो । परब्रह्म पहा वो पावल्या ॥१९०॥


एकनाथी भागवत - श्लोक १३ वा

मत्कामा रमणं जारमस्वरूपविदोऽबलाः । ब्रह्म मां परमं प्रापुः सङ्गाच्छतसहस्रशः ॥१३॥

त्या केवळ अबला निश्चितीं । मत्संगाची अतिप्रीती । तेही संगती कामासक्ती । शास्त्रप्रवृत्तीविरुद्ध ॥९१॥ मी भ्रतारू नव्हें शास्त्रविधी । रूपें मदनमोहन त्रिशुद्धी । मज रतल्या ज्या अविधी । जारबुद्धीं व्यभिचारें ॥९२॥ चौं प्रकारींच्या कामिनी । हस्तिनी इत्यादि पद्मिनी । चौघींसी चौं मुक्तिस्थानीं । काममोहनीं मी रमवीं ॥९३॥ इतर पुरुषांचे संगतीं । क्षणभंगुर सुख भोगिती । अविनाश निजसुखप्राप्ती । कामासक्ती माझेनि ॥९४॥ स्वपतिसंगें क्षणिक आनंदू । माझ्या सुखाचा निजबोधू । नित्य भोगिती परमानंदू । स्वानंदकंदू सर्वदा ॥९५॥ यालागीं गा अबळा चपळा । सांडूनि स्वपतीचा सोहळा । मजचि रातल्या सकळा । माझी कामकळा अभिनव ॥९६॥ नव रसांचा रसिक । नवरंगडा मीच एक । यालागीं माझ्या कामीं कामुक । भावो निष्टंक गोपिकांचा ॥९७॥ जीवाआंतुलिये खुणे । मीचि एक निववूं जाणें । ऐसें जाणोनि मजकारणें । जीवेंप्राणें विनटल्या ॥९८॥ अंगीं प्रत्यंगीं मीचि भोक्ता । सबाह्य सर्वांगे मीचि निवविता । ऐसें जाणोनि तत्त्वतां । कामासक्तता मजलागीं ॥९९॥ हावभावकटाक्षगुण । मीचि जाणें उणखूण । कोण वेळ कोण लक्षण । कोण स्थान मिळणीचें ॥२००॥ जे निजोनियां निजशेजारीं । जे काळीं माझी इच्छा करी । तेचि काळीं तेचि अवसरीं । सुखशेजारीं मी निववीं ॥१॥ मज कुडकुडें नाहीं येणें । नाहीं कवाड टणत्कारणें । नित्य निजशेजें निववणें । जे जीवेंप्राणें अनुसरली ॥२॥ ऐसा सर्वकामदायक । पुरुषांमाजीं मीचि एक । हा गोपिकीं जाणोनि विवेक । भाव निष्टंक धरियेला ॥३॥ ज्यासी भाळले निष्काम तापसी । ज्यासी भाळले योगी संन्यासी । गोपी भाळल्या त्यासी । देहगेहांसी विसरोनी ॥४॥ अंधारीं गूळ खातां । कडू न लगे तो सर्वथा । तेवीं नेणोनि माझी सच्चिदानंदता । मातें सेवितां मी जाहल्या ॥५॥ परिस मानोनि पाषाण । फोडूं जातां लोहाचा घण । लागतांचि होय सुवर्ण । तैशा जाण गोपिकां ॥६॥ विष म्हणोनि अमृत घेतां । मरण जाऊनि ये अमरता । तेवीं जारबुद्धीं मातें भजतां । माझी सायुज्यता पावल्या ॥७॥ म्यां गोपिकांसी कामू केला । कीं त्यांचा सर्व कामू हरिला । विचारितां अर्थ एथिला । मोक्ष फावला मत्कामें ॥८॥ ज्यांसी झाली माझी संगती । त्या एक दोन सांगों किती । शत सहस्त्र अमिती । निजपदाप्रती पावल्या ॥९॥ वैरागराच्या मणीप्रती । खडे लागले हिरे होती । तैशी गोपिका माझ्या संगतीं । नेणों किती उद्धरल्या ॥२१०॥ मी परब्रह्ममूर्ति चोखडी । माझिया व्यभिचारपरवडी । धुतल्या अविद्यापापकोडी । मुक्ती रोकडी पावल्या ॥११॥ मी अथवा माझे संत । संगती होईल ज्यांसी प्राप्त । ते मज पावले निश्चित । संदेह येथ न धरावा ॥१२॥ माझे स्वरूपावरी लोक । विकल्पें ठेविती नाना दोख । संत माझे निर्दोख । तत्संगें सुख निर्दुष्ट ॥१३॥ उद्धवा त्वांही येचि अर्थीं । बहुत न करावी व्युत्पत्ती । धरोनियां सत्संगती । संसारगुंती उगवावी ॥१४॥


एकनाथी भागवत - श्लोक १४ वा

तस्मात्त्वमुद्धवोत्सृज्य चोदनां प्रतिचोदनाम् । प्रवृत्तिं च निवृत्तिं च श्रोतव्यं श्रुतमेव च ॥१४॥

माझें स्वरूप शुद्ध निर्गुण । वेद तितुका गा त्रिगुण । त्या वेदाचें जें प्रेरण । तें गौण जाण मत्प्राप्तीं ॥१५॥ त्या वेदार्थें श्रुतिस्मृती । नाना कर्में करविती । त्या कर्मांची कर्मगती । न कळे निश्चितीं कोणासी ॥१६॥ कर्म स्वरूपें परम गूढ । विधिनिषेधें अतिअवघड । सज्ञानासी नव्हे निवाड । शास्त्रें दृढ विचारितां ॥१७॥ केवळ कर्मचि कर्माआंत । एक प्रवृत्त एक निवृत्त । सकाम निष्काम अद्भुत । अंगीं आदळत साधकां ॥१८॥ कर्म तितुकें आविद्यक । वेद तों त्रिगुणात्मक । तत्संबंधीं श्रवण देख । साधनरूप वेदांत ॥१९॥ तमोगुणें कर्मकांड । रजोगुणें उपासनाकांड । सत्त्वगुणें ज्ञानकांड । वेद त्रिकांड त्रिगुणात्मक ॥२२०॥ वेदशास्त्र विधानविधी । यांचें मूळ अविद्या आधीं । जे अविद्येस्तव देहबुद्धी । विधिनिषेधीं गोंवित ॥२१॥ यालागीं उद्धवा तूं आधीं । सांडीं अविद्या पां त्रिशुद्धी । अविद्या सांडिल्या संबंधीं । सहजें वेदविधी सांडिला ॥२२॥ आधीं अविद्या ते कोण । हेंच आम्हां न कळे जाण । मग तिचें निराकरण । केवीं आपण करावें ॥२३॥ निजकल्पनेचा जो बोध । तेचि अविद्या स्वतःसिद्ध । तेणेंचि बाधे विधिनिषेध । ते त्यागिल्या शुद्ध ब्रह्मचि तो ॥२४॥ धूर पडिलिया रणीं । सहज कटक जाय पळोनी । तेवीं अविद्या सांडितां सांडणीं । विधिविधान दोनी सहजेंचि ॥२५॥ आंखु छेदिलिया पडिपाडें । रथ न चाले असतांही घोडे । तेवीं अविद्या छेदिलिया निवाडें । विधिनिषेध पुढें न चलती ॥२६॥ मूळ छेदिलिया एके घायीं । शाखा पल्लव छेदिले पाहीं । तेवीं अविद्या छेदिलिया लवलाहीं । विधिनिषेध राही सहजचि ॥२७॥ ऐकें वेदींचा तात्पर्यार्थ । मुख्य भजावा मी भगवंत । तोचि शास्त्रीं विशदार्थ । करी वेदांतश्रवणार्थें ॥२८॥ श्रवण केलियाचें फळ जाण । करावें अविद्यानिरसन । अविद्या निरसिलिया श्रवण । पुढारें जाण लागेना ॥२९॥ जेवीं ठाकिलिया स्वस्थान । पुढारें न लगे गमनागमन । तेवीं झालिया अविद्यानिरसन । श्रवण मनन लागेना ॥२३०॥ म्हणसी अविद्या केवीं सांडे । हेंचि अवघड थोर मांडे । हें अवघें उगवे सांकडें । तें मी तुज पुढें सांगेन ॥३१॥ वेदशास्त्रकर्मविधान । हें अविद्यायुक्त साधन । ते अविद्या जावया जाण । मजलागीं शरण रिघावें ॥३२॥


एकनाथी भागवत - श्लोक १५ वा

मामेकमेव शरणं आत्मानं सर्वदेहिनाम् । याहि सर्वात्मभावेन मया स्या ह्यकुतोभयः ॥१५॥

सांडूनि स्त्रीपुत्रविषयध्यान । सांडूनि योग योग्यता शहाणपण । सांडूनि कर्मठता कर्माभिमान । मजलागीं शरण रिघावें ॥३३॥ सांडूनियां वेदाध्ययन । सांडूनियां शास्त्रश्रवण । सांडूनि प्रवृत्ति निवृत्ति जाण । मजलागीं शरण रिघावें ॥३४॥ सांडूनि धनमानचेष्टा । सांडूनि सज्ञान प्रतिष्ठा । सांडूनियां नाना निष्ठा । शरण वरिष्ठा मज यावें ॥३५॥ सांडूनियां वैदिक लौकिक । सांडूनि आगम तांत्रिक । मज शरण रिघालिया देख । माझें निजसुख पावसी ॥३६॥ सांडूनि कुळाचें उंचपण । सांडूनि जातीचा अभिमान । सांडूनि आश्रमाचें श्रेष्ठपण । मजलागीं शरण रिघावें ॥३७॥ सांडूनियां ज्ञान ध्यान । सांडूनियां विधिविधान । सांडूनियां देहाभिमान । मजलागीं शरण रिघावें ॥३८॥ माझें नांव अंतर्यामी । हृदयींचें जाणता मुख्यत्वें मी । तो मी चाळवेना शब्दधर्मीं । श्रद्धा परब्रह्मीं निर्ममत्वें ॥३९॥ सर्व त्यागाचें त्यागितेपण । उद्धवा तुज मी सांगेन खूण । सर्व सांडावा अभिमान । हें मुख्य लक्षण त्यागाचें ॥२४०॥ सर्वही सांडोनि अभिमान । मज रिघालिया शरण । तुज कैंचें जन्ममरण । माझे प्रतापें जाण तरसील ॥४१॥ शरण रिघावयासाठीं । काय रिघावें गिरिकपाटीं । किंवा सेवावी दरकुटी । अथवा दिक्पटीं भंवावें ॥४२॥ तुज वस्तीसी नाहीं गांवो । नित्य नेमस्त कोण ठावो । शरण रिघावया कोठें धांवों । ऐसा भावो कल्पिसी ॥४३॥ म्हणसी शरण रिघावें कवणे ठायीं । तरी मी असें तुझ्या हृदयीं । त्या हृदयस्थासी लवलाहीं । शरण पाहीं रिघावें ॥४४॥ सर्वभावें सर्वस्वेंसीं । मज हृदयस्था शरण येसी । तैं माझी सर्वगतता पावसी । सर्वभूतनिवासी हृदयस्थू ॥४५॥ तिळभरी राखोनि अभिमान । जरी मज रिघशी शरण । तरी माझी प्राप्ती नव्हे जाण । अभिमान विघ्न प्राप्तीसी ॥४६॥ श्वानें स्पर्शिलें पक्वान्न । तें जेवीं नातळती ब्राह्मण । तेवीं जीवीं असतां अभिमान । साधकासी मी जाण नातळें ॥४७॥ रजस्वलेची ऐकोनि वाणी । दूर पळिजे पुरश्चरणीं । तेवीं अहंकाराच्या साधनीं । थिता जवळुनी मी जायें ॥४८॥ रजकविटाळाचें जीवन । जेवीं नातळती सज्जन । तेवीं हृदयीं असतां अभिमान । उद्धवा मी जाण न भेटें ॥४९॥ डोळां हरळू न विरे । घायीं कोत न जिरे । टांकी मुक्तापळीं न शिरे । खिरीमाजीं न सरे सरांटा ॥२५०॥ तेवीं मजमाजीं अभिमान । उद्धवा न रिघे गा जाण । हे त्यागतात्पर्याची खूण । तुज म्या संपूर्ण सांगीतली ॥५१॥ पत्नी विचरतां परपुरुषीं । देखोनि निजपती त्यागी तिसी । तेवीं अभिमानरत भक्तांसी । मी हृषीकेशी नातळें ॥५२॥ यालागीं सांडूनि अभिमान । मज हृदयस्था रिघालिया शरण । तुज मी उद्धरीन जाण । देवकीची आण उद्धवा ॥५३॥ म्हणसी तुज दोघी माता । कोणतीची आण मानूं आतां । मज तुझीच आण तत्त्वतां । तुज निर्भयता माझेनि ॥५४॥ तूं बोलीं नातुडसी कांहीं । तुज सर्वथा क्रिया नाहीं । तुझी आणभाक मानावी कायी । ऐसें जरी कांहीं कल्पिसी ॥५५॥ पातेजूनि तुझिया बोलासी । थितें सांडावें स्वधर्मासी । लटकें जाहलिया आणेसी । कोणें समर्थासीं भांडावें ॥५६॥ उद्धवा ऐसें न म्हण । म्या जे वाहिली तुझी आण । तें परमात्म्यावरी प्रमाण । सत्य जाण सर्वथा ॥५७॥ उद्धवा तूं आत्मा परिपूर्ण । मज तुज नाहीं मीतूंपण । त्या तुझी म्यां वाहिली आण । परम प्रमाण परमात्मा ॥५८॥ असतां प्रत्यक्ष प्रमाण । कां लागे भाक आण । सर्वभावें मज आलिया शरण । आतांचि जाण तरसील ॥५९॥ मज शरण रिघाल्या वाडेंकोडें । कळिकाळ तुझिया पायां पडे । कायसे भवभय बापुडें । कोण तुजकडे पाहेल ॥२६०॥ शरण रिघतांचि तत्काळ । तूं लाहासी माझें बळ । तेव्हां भवभय पळे सकळ । तुज कळिकाळ कांपती ॥६१॥ तृणीं पेटलिया अग्निस्फुलिंग । तो जाळी नाना वनांचे दांग । तैसें शरण आलिया अव्यंग । संसारदांग तूं जाळिसी ॥६२॥ शरण यावें हृदयस्थासी । तो हृदयस्थ न कळे आम्हांसी । उद्धवा तूं ऐसें म्हणसी । तरी ऐक त्या स्वरूपासी सांगेन ॥६३॥ सांडूनि रूपनामअ भिमान । स्फुरे जें कां उद्धवपण । तें मज हृदयस्थाचें रूप जाण । त्यासी तुवां शरण रिघावें ॥६४॥ नामरूपगुणवार्ता । हे माया जाण तत्त्वतां । ते सांडूनि जे स्फुरे सत्ता । तें मज हृदयस्थाचें रूप ॥६५॥ ऐसेनि हृदयस्थ जोडल्या पहा वो । तेव्हां सर्वभूतीं पाहतां देवो । तेथ वेगळा उरावा उद्धवो । रिता ठावो न दिसेचि ॥६६॥ तेव्हां सर्व भूतीं मी एकू । निश्चयें जाण निष्टंकू । देखतांही अनेक लोकू । त्यांसी मी एकू एकला ॥६७॥ ऐसा तूं मिळोनि हृदयस्थासी । मी होऊनि मज पावसी । माझी प्राप्ती उद्धवा ऐसी । निर्भयेंसी निश्चळ ॥६८॥ ऐसी सांगोनि गुह्य गोष्टी । देवो उद्धवाची पाठी थापटी । येरें चरणीं घातली मिठी । उठवितां नुठी सर्वथा ॥६९॥ तुवां जें सांगितलें निजगुज । तें मज मानलें गा सहज । बोला एकाचा संशय मज । तो मी तुज पुसेन ॥२७०॥


एकनाथी भागवत - श्लोक १६ वा

श्रीउद्धव उवाच । संशयः श्रृण्वतो वाचं तव योगेश्वरेश्वर । न निवर्तत आत्मस्थो येन भ्राम्यति मे मनः ॥१६॥

वेदशास्त्राचें मथित सार । योगदुर्गींचे भांडार । पिकल्या सुखाचा सुखसागर । मज साचार उपदेशिला ॥७१॥ तूं योगियांचा योगेश्वर । सकळ जगाचा ईश्वर । तुझें सत्य गा उत्तर । संशयकर मज वाटे ॥७२॥ तुवांच सांगितलें साक्षेपें जाण । करावें गा स्वधर्माचरण । तें सत्य मानूनि वचन । सर्वस्वें जाण विश्वासलों ॥७३॥ करावें जें स्वधर्माचरण । तेंच म्हणसी माझें भजन । शेखीं तेंही आतां सांडून । रिघावें शरण म्हणतोसी ॥७४॥ तरी आत्मा कर्ता कीं अकर्ता । हेंचि न कळे तत्त्वतां । कर्म करावें कीं सर्वथा । आम्हीं आतां सांडावें ॥७५॥ तुझी विषम उपदेशव्युत्पत्ती । सांगतां आम्हां अबळांप्रती । थोर संदेह वाढत चित्तीं । काय श्रीपती करावें ॥७६॥ जरी आत्मा झाला अकर्ता । तरी कर्माचा कोण कर्ता । जैं आत्म्यासी आली अकर्तव्यता । तैं त्याग सर्वथा घडेना ॥७७॥ ऐकोनि उद्धवाचा प्रश्न । सांवळा राजीवलोचन । काय बोलिला हांसोन । सावधान परिसावें ॥७८॥


एकनाथी भागवत - श्लोक १७ वा

श्रीभगवानुवाच । स एष जीवो विवरप्रसूतिः प्राणेन घोषेण गुहां प्रविष्टः । मनोमयं सूक्ष्ममुपेत्य रूपं मात्रा स्वरो वर्ण इति स्थविष्ठः ॥१७॥

ऐक बापा उद्धवा । मी मायेच्या निजस्वभावा । अनुसरोनि जीवभावा । कर्तृत्व जीवा जीवत्वें ॥७९॥ जळीं प्रतिबिंबला सविता । तो जळकंपें दिसे कांपता । तेवीं अकर्ताचि मी दिसें कर्ता । जीव अहंतास्वभावें ॥२८०॥ राजा झालिया निद्रेआधीन । तो स्वप्नीं रंक होय आपण । तेवीं प्रकृतीस्तव मज जाण । जीवपण आभासे ॥८१॥ स्वयें राजा आहे आपण । तो स्वप्नीं रंकत्वें करी कोरान्न । तेथें जो दे पसाभर कण । त्यासी वानी आपण राजा रे तूं ॥८२॥ आपणचि राजा आहे । हें त्याचें त्यास ठाउकें नव्हे । तैसेंच जीवासही होये । पूर्णत्व स्वयें स्मरेना ॥८३॥ जेवीं स्वप्नाचिया अवस्था । राजा रंकक्रिया करी समस्ता । तेवीं अविद्येस्तव तत्त्वतां । कर्मकर्ता मी झालों ॥८४॥ तेथें वेदोक्त विधिविधान । जीवाअंगीं आदळे जाण । जंव नव्हे ब्रह्मज्ञान । तंव स्वधर्माचरण करावें ॥८५॥ राजा राजपदीं जागा नव्हे । तंव रंकक्रिया त्यासी संभवे । तेवीं जंव ब्रह्मज्ञान नव्हे । तंव सर्व करावे स्वधर्म ॥८६॥ राजा राजपदीं जागा झाला । तो भीक म्हणतांचि लाजला । तेवीं ब्रह्मज्ञान जो पावला । तो 'मी कर्ता' या बोला न बोले कदा ॥८७॥ जैसें रायास मिथ्या रंकपण । तेवीं परमात्म्यासी जीवत्व जाण । त्या जीवास शरीरीं संसरण । तें उपलक्षण अवधारीं ॥८८॥ जैसा जीव जडातें जीवविता । यालागीं जीवू ऐसी वार्ता । सहजें तरी स्वभावतां । चैतन्यरूपता जीवाची ॥८९॥ घटामाजीं दीपू घातला । तैं घटभरी प्रकाशू झाला । तोचि घरामाजीं ठेविला । घरभरी झाला प्रकाश ॥२९०॥ तेवीं शरीरमाजीं तरी जीवू । सहजें तरी हा सदाशिवू । येथ बोलणें न लगे बहू । जीवशिवअेनुभवू तो ऐसा ॥९१॥ आरिशाचा सूर्य दिसे हातीं । तेवीं शरीरीं जीवाची प्रसूती । प्रकर्षेंसीं राहती स्थिती । यालागीं 'प्रसूती' बोलिजे ॥९२॥ आरसा अत्यंत लहान । तेथें सूर्य बिंबे संपूर्ण । तेवीं विदेहा देहधारण । 'विवरप्रवेशन' त्या नांव ॥९३॥ थिल्लरीं चंद्रासी अभिव्यक्ती । तो गगनींचा दिसे अधोगती । तेवीं शरीरीं जीवाची प्रसूती । अव्यक्त व्यक्तीं प्रवेशे ॥९४॥ जळीं सविता प्रतिबिंबला । परी तो जळें नाहीं ओला झाला । तेवीं कर्में करोनि संचरला । अलिप्त ठेला निजआत्मा ॥९५॥ जळीं प्रतिबिंब आंदोलायमान । तेवीं जीवासी जन्ममरण । थिल्लरीं चंद्र अडकला जाण पूर्ण । तेवीं कर्मबंधन जीवासी ॥९६॥ थिल्लरजळ आटलें । तेथें काय चंद्रबिंब निमालें । तें चंद्रबिंब होवोनि ठेलें । जाहलें निमालें दोनी मिथ्या ॥९७॥ थिल्लरींचा चंद्र काढूं जातां । तो मिथ्यात्वें न ये हाता । तेवीं देहीं मिथ्या जीवता । ते सत्य मानितां अतिदुःखी ॥९८॥ आरसा थोर अथवा लहान । तेथें सूर्य बिंबे संपूर्ण । तेवीं मी अंतर्यामी जाण । सर्वांभूतीं समान समग्र असें ॥९९॥ सूर्य थिल्लराआंतौता । अडकला दिसे समस्तां । तेवीं जीवासी कर्मबद्धता । मूर्ख तत्त्वतां मानिती ॥३००॥ गगनींचा सूर्यो न देखती । थिल्लरीं अडकला मानिती । तेवीं निर्गुणीं जया नाहीं प्रतीती । ते बद्ध म्हणती जीवातें ॥१॥ अग्निज्वाळा जाळीं आकळितां । जाळें जळे आकळूं जातां । तेवीं आत्मया कर्मीं बांधतां । कर्मीं कर्मता निर्धर्म ॥२॥ नाद उत्पत्तीसी ठावो । मुख्य वावो कां दुसरा घावो । या दोहीं वेगळा नित्य निर्वाहो । तो नादू पहा हो अनुहत ॥३॥ अनुहताचा सोलींव शब्दू । परापरतीरीं पराख्य नादू । ज्याचा योगियां सदा छंदू । बोलिला अनुवादू नव्हे त्याचा ॥४॥ ज्या नादाची सुखगोडी । सदाशिवूच जाणे फुडी । कां सनकादिकीं चोखडी । चाखिली गाढी ते चवी ॥५॥ वायूचें शोधितां सत्त्व । त्यासी एकवटलें तें शब्दतत्त्व । उभयचेतनें जीवित्व । मनोमयत्व धरूं पाहे ॥६॥ जे चेतनेचें चेतनत्व । तें वायूचें शोधित सत्त्व । तेंचि शब्दाचें निजतत्त्व । तेणे जीवित्व मनोरूप होय ॥७॥ जीवाचा शरीरसंयोग । असे सांगे तो श्रीरंग । आधारादिचक्रप्रयोग । क्रमेंचि साङ्ग सांगत ॥८॥ अहमिति प्रथमाध्यासें । जीवासी जीवत्व आभासे । तो जे जे तत्वीं प्रवेशे । तें मी ऐसें म्हणतचि ॥९॥ तेथ मी देहो म्हणतां । तत्काळ जाय पूर्णता । तेव्हां एकदेशी परिच्छिन्नता । देहात्मता लागली ॥३१०॥ निर्विशेष नाद अतिसूक्ष्म प्राण । त्यासहित आधारीं प्रवेशोन । अतिसूक्ष्म प्रथम स्फुरण । पावोनि जाण परा झाली ॥११॥ आधारचक्रीं सूक्ष्म प्राण । परा वाचा तेथींची जाण । मनाचें कोंवळें स्फुरण । अतिसपूरपण सूक्ष्मत्वें ॥१२॥ स्वाधिष्ठानचक्राच्या ठायीं । मनाचें वाढतें बाळसें पाहीं । पश्यंती वाचा तये ठायीं । बोलूं देखे परी कांहीं बोलेना ॥१३॥ तिये चक्रीं एकवटला प्राण । पुढारां न चलेचि गा जाण । प्राणापानां झालें भांडण । दोघेजण रूसले ॥१४॥ घरकलहो लागला भारी । मग निघाले वेगळेचारी । पांचही राहिले पांचापरी । ऐक निर्धारीं विचारू ॥१५॥ मागें रुसोनि गेला जाण । त्या नांव म्हणती अपान । रागें पुढारां आला जाण । त्या नांव प्राण म्हणताती ॥१६॥ दोहींमाजीं समत्वें जाण । नाभीं राहिला तो समान । कंठीं राहिला तो उदान । व्यानासी रहावया स्थान असेना ॥१७॥ अद्यापि शरीरीं जाण । व्यानासी नाहीं एक स्थान । तो सर्वांगीं सर्वदा जाण । परिभ्रमण करीतसे ॥१८॥ याहून धाकटे पांच प्राण । तेही वेगळे राहिले जाण । तिंहीं वेगळालें आपण । वस्तीसी स्थान योजिलें ॥१९॥ नाग कूर्म कृकल देवदत्तू । पांचवां धनंजय जाण तेथू । यांची वस्ती जे शरीरांतू । ऐक निश्चितू सांगेन ॥३२०॥ शिंक जांभई आणि ढेंकर । नाग कूर्म कृकलांचें घर । उचकी देवदत्ताचें बिढार । धनंजयासी थार मिळेचिना ॥२१॥ जीवदेहांचे आप्तवादापासीं । धनंजयो राहिला वस्तीसी । जीवें सांडिल्या शरीरासी । मुहूर्तार्ध देहासी तो वांचवी ॥२२॥ स्वाधिष्ठानाहोनि जाण । अनुक्रमें दशधा होती प्राण । त्यांचें स्थान मान उपलक्षण । तुज म्यां जाण सांगीतलें ॥२३॥ मागें म्यां सांगितली गोष्टी । प्राणापान रुसल्यापाठीं । दोघां अद्यापि नाहीं भेटी । महाहटी छांदस ॥२४॥ त्या दोघांसी करी बुझावण । तो माझा पढियंता तूं जाण । त्या सर्वस्व दें मी आपण । योगसाधन या नांव ॥२५॥ उद्धवा प्राणलक्षणें सांगतां । अवचटें प्राणापानसमता । प्रसंगीं आली कथा । त्वांही स्वभावतां ऐकावी ॥२६॥ स्वाधिष्ठानाहूनि मणिपुरा येता । जीवामनांची एकात्मता । सूक्ष्मप्राण तेथ वसतां । परेच्या ऐक्यता पश्यंती ॥२७॥ तेथ मनाचें खेळुगेपण । कुमार अवस्था बाणली जाण । तंव डोलत पुढें चाले प्राण । अनाहतस्थान ठाकिलें ॥२८॥ धरोनि पश्यंतीचें अनुसंधान । मध्यमा वाचा उपजे जाण । मौनाची मिठी न सोडून । करी गुणगुण आपणांत ॥२९॥ तेथ मनाची पौगंड अवस्था । मागें पुढें सांभाळितां । वांछी नाना भोग अवस्था । लाजा सर्वथा बोलेना ॥३३०॥ मग वेगें टाकिलें विशुद्धिस्थान । तेथ उसळत उदान झाला प्राण । तंव मनासी तारुण्यपण । पुरतें जाण बाणलें ॥३१॥ त्या विशुद्ध चक्राप्रती । परा मिळोनि आंतौती । पश्यंती मध्यमा एक होती । वाचा घुमघुमती झणत्कारें ॥३२॥ त्या झणत्कारापरिपाठीं । वक्त्रीं वाचा तत्काळ उठी । तारुण्यें उन्मत्त झाली मोठी । त्या स्वरवर्ण चावटी मांडिली ॥३३॥ आज्ञाचक्र भ्रूस्थान । तें याहूनि वेगळें जाण । तेथें वाचेसी नाहीं गमन । हंसलक्षण योग्यांचें ॥३४॥ हीं साही चक्रें अनुक्रमें जाण । चार मातृका अठ्ठावीस वर्ण । सोळाही स्वर संपूर्ण । हंसलक्षण योगियांचें ॥३५॥ कोण चक्रीं कोण वर्ण । मातृकांचें कोणतें स्थान । कोठें उठती स्वर संपूर्ण । तेंही लक्षण अवधारीं ॥३६॥ आधारचक्रीं चतुर्दळ उभारा । तेथ न्यसिल्या चारी मात्रा । व श ष स या अक्षरां । बोलिजे मात्रा शास्त्राज्ञीं ॥३७॥ स्वाधिष्ठान षड्दळ जेथ । साही वर्ण स्थापिले तेथ । बकरादि लकारांत । जाण निश्चित ते स्थानीं ॥३८॥ मणिपूर दशदळ निश्चित । दहा वर्ण स्थापिले तेथ । डकारादि फकारांत । वर्ण नांदत ते चक्रीं ॥३९॥ अनाहतचक्र द्वादशदळयुक्त । बारा वर्ण न्यसिले तेथ । ककारादि ठकारान्त । वर्ण विराजत ते चक्रीं ॥३४०॥ विशुद्धिचक्रींच्या सोळा दळां । अ इ उ ऋ लृ हे वर्ण सोळा । कंठस्थानीं मीनला मेळा । यांचा वेदीं आगळा प्रताप ॥४१॥ आज्ञाचक्र अतिअवघड । नुघडे काकीमुखाचें कवाड । न चले प्राणांची चडफड । मार्ग अतिगूढ लक्षेना ॥४२॥ तें आज्ञाचक्र गा द्विदळ । केवळ हंसाचें राउळ । तेथ पावावया योगबळ । अतिप्रबळ पाहिजे ॥४३॥ हें स्थान पावावयासाठीं । योगी झाले महाहटी । अभ्यास करितां अतिसंकटीं । तेही शेवटीं न पावती ॥४४॥ हें पावावया माझें स्थान । अतिगुह्य आहे अनुष्ठान । सोहंहंसाचें साधन । सावधान जो साधी ॥४५॥ प्राणाचेनि गमनागमनें । सोहंहंसाचेनि स्मरणें । सावधानें जो साधूं जाणे । तेणें पावणें हें स्थान ॥४६॥ त्यासीचि पवनजयो घडे । तोचि आज्ञाचक्रामाजीं चढे । तेथूनिही मार्ग काढी पुढें । अतिनिवाडें अचूक ॥४७॥ तेथ नानाभोगसमृद्धिफळें । आणिती ऋद्धिसिद्धींचें पाळें । तें डावलूनियां सकळें । निघे निर्मळें निजपंथें ॥४८॥ जो कां ऋद्धिसिद्धींसी भुलला । मी सिद्ध ये श्लाघे आला । तो आज्ञाचक्रावरोनि च्यवला । केल्या मुकला कष्टासी ॥४९॥ ज्यासी वैराग्य असे सपुरतें । तो कदा भुलेना सिद्धीतें । लाता हाणोनि भोगमान्यतेतें । निगे निजपंथें मजलागीं ॥३५०॥ तैं औट पीठ गोल्हाट । सांडूनि भ्रमरगुंफा कचाट । शोखूनि सहस्त्रदळाचे पाट । मजमाजीं सुभट मिसळले ॥५१॥ सांगतां आज्ञाचक्राची संस्था । पुढें गोडी लागली योगपंथा । मागील विसरलों जी कथा । क्षमा श्रोतां करावी ॥५२॥ म्हणाल वाहवटीं पडला मासा । तो परतेना जेवीं सहसा । ग्रंथनिरूपणीं तूं तैसा । जल्पू वायवसा कां करिसी ॥५३॥ जेवीं चुकलिया बाळकातें । माता शिकवण दे त्यातें । तेवीं तुमचें वचन मातें । निजहितातें द्योतक ॥५४॥ करितां चक्रांचें निरूपण । योगारूढ झालें मन । विसरोनि मागील निरूपण । गेलें निघून शेवटां ॥५५॥ हें ऐकोनि हांसिले श्रोते । तूं कर्ता नव्हसी येथें । हें कळोनि गेले आमुतें । नको परिहारातें उपपादूं ॥५६॥ आलोडितां ग्रंथकोडी । न कळे योगज्ञानाची गोडी । ते तुवां विशद केली फुडी । निजपरवडीविभागें ॥५७॥ तुझेनि मुखें कृष्णनाथें । श्रीभागवत जें कठिण होतें । तें अर्थविले यथार्थें । सत्य आमुतें मानलें ॥५८॥ हा बारावा अध्यावो । अतिगूढ बोलिला देवाधिदेवो । तेथींचाही त्वां अभिप्रावो । विशद पहावो विवरिला ॥५९॥ ऐसा संतीं करोनि आदरू । निर्भय दिधला नाभीकारू । एका जनार्दनीं हर्षनिर्भरू । केला नमस्कारू संतांसी ॥३६०॥ 'वैखरी मात्रा स्वर वर्ण' । या पदांचें आलें व्याख्यान । तेंचि दृष्टांतें श्रीकृष्ण । उद्धवासी जाण सांगतू ॥६१॥ सूक्ष्म जीवशिवांचे मूळ । तोचि वाग्द्वारा झाला स्थूळ । येचि अर्थीं अति विवळ । करूनि प्रांजळ सांगत ॥६२॥


एकनाथी भागवत - श्लोक १८ वा

यथानलः खेऽनिलबन्धुरुष्मा बलेन दारुण्यधिमथ्यमानः । अणुः प्रजातो हविषा समेधते तथैव मे व्यक्तिरियं हि वाणी ॥१८॥

अव्यक्तरूपें ऊष्मा गगनीं । व्यापकपणें असे वह्नी । तो अरणीमाजीं मथितां मंथनीं । अतिसूक्ष्मपणीं प्रकटला ॥६३॥ अनळा अनिळ निजसखा । कोमळ तूळें फुंकितां देखा । दिसे लखलखीत नेटका । ज्वाळा साजुका कोंवळिया ॥६४॥ तेथ पावला दशा मध्यम । मग हवनद्रव्यें करितां होम । तेणें थोरावला निरुपम । वाढला व्योमचुंबित ॥६५॥ तैसा सूक्ष्म नाद शिवसंयोगें । प्राणसंगमें लागवेगें । षटचक्रादिप्रयोगें । वैखरीयोगें अभिव्यक्त ॥६६॥ मरा हे ऐकतां गोठी । ते वाचा सर्वांशें वाटे खोटी । तेंचि अक्षरें केल्या उफराटीं । रामनामें गोमटी निववी वाचा ॥६७॥ करितां सुष्ठु दुष्टु उच्चार । वर्ण नव्हती क्षर अक्षर । यालागीं नांव तें अक्षर । यापरी पवित्र ते वाणी ॥६८॥ जैशी वाचेची अभिव्यक्ती । तैसीच इतर इंद्रियप्रवृत्ती । संक्षेपें तेही स्थिती । उद्धवाप्रती सांगतू ॥६९॥


एकनाथी भागवत - श्लोक १९ वा

एवं गदिः कर्म गतिर्विसर्गो घ्राणो रसो दृक् स्पर्शः श्रुतिश्च । सङ्कल्पविज्ञानमथाभिमानः सूत्रं रजःसत्त्वतमोविकारः ॥१९॥

जैसी वाचेची व्युत्पत्ती । तैसीच कर्मेंद्रियांची प्रवृत्ती । चरणांच्या ठायीं गती । ग्रहणशक्ती हस्तांची ॥३७०॥ विसर्ग जाण वायूचा । सुखोद्रेक तो लिंगाचा । कर्मेंद्रियीं पांचवी वाचा । विस्तारू तिचा सांगीतला ॥७१॥ तैसीच जाण ज्ञानकरणें । दृष्टी उठी देखणेपणें । रसना रसातें चाखों जाणे । श्रवण श्रवणें अधिकारू ॥७२॥ शीत उष्ण मृदु कठिण । हें त्वगिंद्रियाचें लक्षण । सुगंध दुर्गंध जाणतेपण । घ्राण विचक्षण ते कर्मीं ॥७३॥ संकल्प विकल्प मनाचे । निश्चयो कर्म बुद्धीचें । चिंतन जाण चित्ताचें । अहंकाराचें मीपण ॥७४॥ सूत्र तंव प्रधानाचें । विकार रजतमसत्वांचे । संक्षेपें विवरण तिहींचे । ऐक साचें सांगेन ॥७५॥ आधिदैव आधिभौत । ज्यासी अध्यात्म म्हणत । वाढला जो प्रपंचू येथ । ईश्वराचें अभिव्यक्त स्वरूप जाण ॥७६॥ जगाचें मूळकारण । अंगें ईश्वरचि आपण । त्या कारणाहूनि कार्य भिन्न । नव्हे जाण सर्वथा ॥७७॥ हो कां घृताची एके काळीं । थिजोनि झालि पुतळी । ते घृताहोनि वेगळी । नाहीं देखिली प्रत्यक्ष ॥७८॥ काष्ठाचा घोडा केला । अंगें ठाणें अति मिरविला । तो काष्ठपणा नाहीं मुकला । सर्वांगें शोभला काष्ठत्वें ॥७९॥ त्याचे पाहतां वेगळाले अवयव । खूर खांद काष्ठचि सर्व । तेवीं महाभूतें गुणप्रभव । स्वरूप सावेव शिवाचें ॥३८०॥ सुवर्णाचें झालें लेणें । तें जेवीं मिरवे सोनेपणें । तेवीं महाभूतें विषयकरणें । अभिन्नपणें शिवरूप ॥८१॥ फडा पुच्छ वांकुडा बाग । येणें आकारें म्हणती नाग । तो नाग नव्हे सोनेंचि चांग । तेवीं हें जग मद्रूप ॥८२॥ प्रपंच ईश्वरासी अभिन्न । येचि अर्थीं श्रीनारायण । उद्धवासी सांगें आपण । अभिन्नपणे जीवशिवां ॥८३॥


एकनाथी भागवत - श्लोक २० वा

अयं हि जीवस्त्रिवृदब्जयोनिः अव्यक्त एको वयसा स आद्यः । विश्लिष्टशक्तिर्बहुधेव भाति बीजानि योनिं प्रतिपद्य यद्वत् ॥२०॥

जीवाचा जीवू आपण । यालागीं बोलिजे शिवपण । जीवशिवरूपें हा भिन्न । जीवत्व जाण या हेतू ॥८४॥ सागरु आपुल्या अंगावरी । वर्तुळ आवर्त करी धरी । तेवीं लोकपद्मातें श्रीहरी । करी धरी निजनाभीं ॥८५॥ 'त्रिवृदब्ज' म्हणिजे यापरी । त्या नाभिकमळामाझारीं । स्वलीला त्रैलोक्यातें धरी । पद्मनाभ श्रीहरी या हेतू ॥८६॥ सुवर्णाच्या सिंहासनीं । सुवर्णमूर्ती बैसवूनी । पूजिजे सुवर्णसुमनीं । एकपणें तीन्ही भासती ॥८७॥ तेवीं नाभिपद्मीं त्रैलोक्य धरितां । तिहींतें भासवी अभिन्नता । यालागीं पद्मनाभ तत्त्वतां । आलें वाक्पथा श्रुतीचिया ॥८८॥ दृति मार्दवें पिंवळी । एकली भासे चांपेकळी । तेचि विकासे जेवीं नाना दळीं । तेवीं मी वनमाळी लोकत्वें ॥८९॥ हें नसतां कार्यकारण । यापूर्वी मी अव्यक्त जाण । जो मी प्रमाणांचाही प्रमाण । भेदें जेथ आण वाहिली ॥३९०॥ हेतु मातु दृष्टांत । रिघों न शके ज्याच्या गांवांत । अपार अनादि अनंत । आद्य अव्यक्त मी ऐसा ॥९१॥ एवं केवळ जें अभेद । तेथें कैंचे त्रिविध भेद । जेथ लाजोनि परतले वेद । स्वरूप शुद्ध तें माझें ॥९२॥ तो न मेळवितां साह्यमेळू । स्वलीलाक्षोभें क्षोभक काळू । स्वशक्तीनें झालों सबळू । शक्तिबंबाळू चेतविला ॥९३॥ ते निजशक्तीचे विभाग । म्यांचि विभागिले चांग । त्या विभागांचे भाग । ऐक साङ्ग सांगेन ॥९४॥ गुणशक्ति देवताशक्ती । मनःशक्ती इंद्रियशक्ती । महाभूतांची भूतशक्ती । एथ क्रियाशक्ती मुख्यत्वें ॥९५॥ जीवापासाव अदृष्टशक्ती । झाली अनिवार त्रिजगतीं । हरिहरां नावरे निश्चितीं । अदृष्टशक्ती अनिवार ॥९६॥ जें अदृष्टशक्तीनें जिवातें । बांधोनि केलें आपैतें । तिसी आवरावया मातें । सामर्थ्य येथें आथी ना ॥९७॥ जेवीं कां राजाज्ञा जाण । राजा प्रतिपाळी आपण । तेवीं अदृष्टशक्तिउल्लंघन । मी सर्वथा जाण करीं ना ॥९८॥ जीभ कापूनि देवासी वाहती । तैसें नासिक न छेदिती । तेवीं छेदी कर्मस्थिती । परी अदृष्टगती छेदीं ना ॥९९॥ अथवा विशेषेंसीं निश्चितीं । मीं माया आलिंगिली निजशक्ती । तो मी एकूचि त्रिजगतीं । बहुधाव्यक्तीं आभासे ॥४००॥ माझिया साक्षात्कारा आला । जो जीवन्मुक्तत्व पावला । तोही अदृष्टें बांधिला । वर्ते उगला देहगेहीं ॥१॥ जनकू राजपदीं नांदे । शुक नागवा प्रारब्धें । कळी लाविजे नारदें । अदृष्ट छंदें विनोदी ॥२॥ वसिष्ठ पुरोहितत्व करी । भीष्म पहुडे शरपंजरीं । याज्ञवल्क्या दोनी नारी । अदृष्टाकारीं वर्तत ॥३॥ यापरी गा अदृष्टशक्ती । अनिवार वाढली त्रिजगतीं । त्या जीव बांधले अदृष्टगतीं । जेवीं गारोडियाहातीं वानर ॥४॥ त्या जीवादृष्टें बहुधा व्यक्ती । मी एक भासें त्रिजगतीं । 'विश्वतश्चक्षु' या श्रुतीं । बहुधामूर्तीं मी एक ॥५॥ मृत्तिकेचीं गोकुळें केलीं । नाना नामाकारें पूजिलीं । परी ते मृत्तिकाचि संचली । तेवीं सृष्टि झाली मद्रूपें ॥६॥ जेवीं एकला आपण । निद्रेसी देतां आलिंगन । स्वप्नीं देखे बहुविध आपण । तेवीं मी जाण विश्वात्मा ॥७॥ जेवीं सूक्ष्म वटबीज केवळ । त्यासी मीनल्या भूमिजळ । वाढोनियां अतिप्रबळ । वृक्ष विशाळ आभासे ॥८॥ तेथ नाम रूप पुष्प फळ । तें बीजचि आभासे समूळ । तेवीं जगदाकारें सकळ । भासे केवळ चिदात्मा ॥९॥ जे कां मूळ बीजाची गोडी । तोचि स्वाद वाढला वाढी । कांडोकांडीं स्वादुपरवडी । अविकार गोडी उंसाची ॥४१०॥ तेवीं मूळीं चिदात्माचि कारण । तेथूनि जें जें तत्त्व झालें जाण । तें तें निखळ चैतन्यघन । जग संपूर्ण चिद्रूप ॥११॥ ऊंस सर्वांगें बीज सकळ । बीजरूपें ऊंस सफळ । तेवीं जगाचें चिन्मात्र मूळ । जाण सकळ तें चिद्रूप ॥१२॥ बीज ऊंस दोनी एकरूप । तैसा प्रपंच जाण चित्स्वरूप । येचि अर्थीं अतिसाक्षेप । कृपापूर्वक सांगत ॥१३॥ यस्मिन्निदं प्रोतमशेषमोतं पटो यथा तन्तुवितानसंस्थः । यालागीं संसार जो समस्त । माझ्या ठायीं असे ओतप्रोत । मजवेगळें कांहीं येथ । नाहीं निश्चित अणुमात्र ॥१४॥ येचि अर्थींचा दृष्टांतू । देवो उद्धवासी सांगतू । जेवीं कापुसाचे सूक्ष्मतंतू । कांतोनि निश्चितू पटु केला ॥१५॥ आडवेतिडवे विणले तंतू । त्यांसी वस्त्र नाम हे मृषा मातू । तेवीं संसारशब्द हा व्यर्थू । स्फुरें भगवंतू मी तद्रूपें ॥१६॥ पाहतां सूतचि दिसे उघडें । त्यांचें नाम म्हणती लुगडें । प्रत्यक्ष चैतन्य स्फुरतां पुढें । त्यासी संसारू वेडे म्हणताती ॥१७॥ सुतावेगळें वस्त्र न दिसे । मजवेगळा प्रपंचु नसे । उद्धवा अप्राप्ताचें भाग्य कैसें । मीचि नसें म्हणताती ॥१८॥ यापरी मी सर्वगत । विश्वात्मा विश्वभरित । वृक्षदृष्टांतें प्रस्तुत । तुज म्यां येथ सांगीतलें ॥१९॥ मज देखणा ज्याचा निर्धारू । त्यासी मी केवळ सर्वेश्वरू । मज अप्राप्त जो नरू । त्यासी संसारू आभासे ॥४२०॥ जो सर्वात्मा सर्वेश्वरू । भ्रांतासी भासे भवतरुवरू । त्या भवतरूचा विस्तारू । स्वयें श्रीधरू सांगत ॥२१॥


एकनाथी भागवत - श्लोक २१ वा

य एष संसारतरुः पुराणः कर्मात्मकः पुष्पफले प्रसूते ॥२१॥

भ्रांतीस्तव भवतरुवरू । कर्माकर्मजळें वाढला थोरू । जीर्ण जुनाट अपरंपारू । ओतंबरू फळपुष्पीं ॥२२॥ त्याचें कोण बीज कोण मूळ । कोण रसू कोण फळ । जेणें भ्रमले जीव सकळ । तें मी समूळ सांगेन ॥२३॥


एकनाथी भागवत - श्लोक २२ वा

द्वे अस्य बीजे शतमूलस्त्रिनालः पञ्चस्कन्धः पञ्चरसप्रसूतिः । दशैकशाखो द्विसुपर्णनीडः त्रिवल्कलो द्विफलोऽर्कं प्रविष्टः ॥२२॥ भ्रमभूमीमाजिवडें । पापपुण्यजोडपाडें । बीज पडतांचि वृक्ष विरूढे । अग्नीं वाढे कल्पना ॥२४॥ पान फूल न दिसे फळ । वेलाअंगीं देखा सरळ । तेणेंचि वेला वाढ प्रबळ । तेवीं संसार सबळ कल्पनाग्रें ॥२५॥ कर्माकर्मप्रवाहजळें । भरिलें अविद्येचें आळें । अनंत वासना तेचि मूळें । वृक्ष तेणें बळें ढळेना ॥२६॥ सूक्ष्म वासना कल्पकोडी । अधोगती रुतल्या बुडी । संकल्पविकल्पें चहूंकडीं । पसरल्या बुडीं बुचबुचित ॥२७॥ संचितक्रियमाण वाफे भारी । सुबुद्ध भरले जळेंकरीं । भरिलेच मागुते भरी । प्रवाहो त्यावरी वाहत ॥२८॥ तेणें वृक्ष सबळ भारी । नित्य नूतन वाढी धरी । सगुण गुणाचे वाढीवरी । त्रिगुण अहंकारीं त्रिनाळ ॥२९॥ त्रिगुणगुणांची परवडी । येरांची येरांमाजीं मुरडी । येरायेरांवरी बुडी । मिसळे वाढीं वाढती ॥४३०॥ पंचभूतांच्या खांद्या थोरी । प्रपंच वाढल्या बाहेरी । पसरल्या येरयेरांवरी । मीनल्या परस्परीं वाढती ॥३१॥ समूळ गर्भ साधूनि रुखा । मनोमय वाढलिया शाखा । अग्री दशेंद्रियफांटे देखा । तिच्या झुळका डोलती ॥३२॥ त्या त्या शाखांमाजीं देखा । दैवतें आलीं वस्तीसुखा । करूनि कर्माचा आवांका । आपुलाली शाखा ते धरिती ॥३३॥ दशधा वायूची झडाड । तेणें तें डोलत दिसे झाड । त्यामाजीं दों पक्ष्यांचें नीड । अतिगूढ अतर्क्य ॥३४॥ जेथूनि उपजे निजज्ञान । तेंचि नीड हृदयभुवन । जीवू परमात्मा दोघेजण । अतर्क्य पूर्ण वसताती ॥३५॥ जीवू जो देहाभिमानी । परमात्मा जो निरभिमानी । इंहीं दोघींजणीं मिळोनी । हृदयभुवनीं नीड केलें ॥३६॥ जीव संकल्पविकल्पप्राप्ती । परमात्मा निर्विकल्पस्थिती । दोहींची हृदयामाजीं वस्ती । नीड निश्चितीं या हेतू ॥३७॥ पाहें पां वात पित्त श्लेष्मा । या आंतरत्वचा भवद्रुमा । वल्कलें म्हणावयाचा महिमा । भक्तोत्तमा या हेतू ॥३८॥ गगनाहूनि वाढला वरुता । शून्यासहित लांबला आरुता । सैंघ पसरला सभोंवता । दिशांच्या प्रांता सांडूनी ॥३९॥ एवं विस्तारलेनि विस्तारा । वृक्ष उन्मळोनि मदभरा । पंचरसांच्या विषयधारा । अतिमधुरा वर्षतू ॥४४०॥ श्रुतिस्मृति हींच पानें । त्यामाजीं उगवलीं स्वर्गसुमनें । दीक्षितभ्रमर ज्यांकारणें । अतिसत्राणें उडताती ॥४१॥ त्या वृक्षाचीं जावळीं फळें । सुखदुःख दोनी एके मेळें । शेंडा धरोनि समूळें । दोनीचि फळें पैं त्यासी ॥४२॥ जितुकीं सूर्यमंडळें भासती । तितुकी जाण याची स्थिती । सुखदुःखफळें तितुक्यांप्रती । कर्मप्राप्ती देतुसे ॥४३॥ सूर्यमंडळाआरुतें । सांगीतलें भववृक्षातें । चंद्रमंडळादि समस्तें । भवभय तेथें नाहीं न म्हण ॥४४॥ मी सूर्यमंडळमध्यवर्ती । त्या मजवेगळी जे स्फुरे स्फूर्ती । तेथवरी भवभयाची प्राप्ती । जाण निश्चितीं उद्धवा ॥४५॥ सूर्याचें जें सूर्यमंडळ । तेंही संसारामाजीं केवळ । जो न खाय या वृक्षाचें फळ । तोचि रविमंडळभेदक ॥४६॥ वृक्षाचीं दोनी फळें येथें । दोहों फळांचे दोघे भोक्ते । दोघे संसाराआंतौते । ऐक तूतें सांगेन ॥४७॥


एकनाथी भागवत - श्लोक २३ वा

अदंति चैकं फलमस्य गृध्रा ग्रामेचरा एकमरण्यवासाः । हंसा य एकं बहुरूपमिज्यैः मायामयं वेद स वेद वेदम् ॥२३॥

दुःखफळाचे भोक्ते । अत्यंत विषयासक्त जेचि ते । गीध गृहस्थ कां जे येथें । अविधीं विषयांतें सेविती ॥४८॥ ग्राम्य विषयीं अतितत्पर । यालागीं बोलिजे ग्रामचर । ग्रामगीध जैसे घार । तैसे सादर विषयांसी ॥४९॥ जेवीं कां घार गगना चढे । तेथूनि आविसा उडी पडे । तेवीं नरदेह पावोनि चोखडे । विषयीं झडपडे झोंबती ॥४५०॥ एवं विषयासक्त जे चित्तें । जे अधोगतीतें पावते । ते दुःखफळाचे भोक्ते । जाण निश्चिते उद्धवा ॥५१॥ सांडोनियां गार्हस्थ्य । वनवासी वानप्रस्थ । त्यांसचि सुखफल प्राप्त । जाण निश्चित उद्धवा ॥५२॥ त्या सुखफळाचे विभाग । ब्रह्मसदनांत इतर स्वर्ग । कर्में करूनियां साङ्ग । जेथींचा मार्ग चालिजे ॥५३॥ ब्रह्मचर्यें वेदाध्ययन । गार्हस्थ्यें पूजिते अग्निब्राह्मण । वानप्रस्थाश्रमीं जाण । वन्यफळभोजन वनवासी ॥५४॥ येणें क्रमेंचि क्रममुक्तिस्थान । जिंहीं ठाकिलें ब्रह्मसदन । सुखफळाचे भोक्ते ते जाण । ब्रह्मभुवननिवासी ॥५५॥ इतर स्वर्गीं सुखप्राप्ती । जेथें आहे पुनरावृत्ती । ब्रह्मसदनीं पावल्या वस्ती । त्यांसी क्रमें मुक्ती होईल ॥५६॥ मूळींचें पद 'अरण्यवासी' । तेणें द्योतिलें वानप्रस्थासी । तेथ नाहीं घेतला संन्यासी । त्यासी वनवासी म्हणों नये ॥५७॥ संन्याशांसी निवासस्थान । वेदीं बोलिलें नाहीं जाण । तिंहीं स्वदेहाचें केलें दहन । नेमिलें स्थान त्यां नाहीं ॥५८॥ जे अविद्यादिकर्मप्रवृत्ती । विरजाहोमीं स्वयें जाळिती । ते भववृक्षाचीं फळें खाती । हेही युक्ती घडेना ॥५९॥ जागृतीच्या पाहुण्यासी । जेवूं धाडावें स्वप्नगृहासी । तेवीं न्यस्तसंकल्प संन्यासी । संसारसुखासी केवीं भोक्ते ॥४६०॥ स्वकर्म जाळोनि विरजाहोमीं । जिंहीं साध्य केलें ब्रह्माहमस्मि । त्यांसी निवासस्थान कोण नेमी । वनीं ग्रामीं नेमस्त ॥६१॥ बिढार द्यावया आकाशासी । कोण घर नेमावें त्यासी । तेवीं न्यस्तसंकल्प संन्यासी । त्यांच्या निवासासी कोण नेमी ॥६२॥ जे न्यस्तसंकल्प संन्यासी । त्यांसी कोण म्हणे अरण्यवासी । मायिक भववृक्षींच्या फळासी । भोक्ते त्यांसी म्हणों नये ॥६३॥ मूळींचें पद 'अरण्यवासी' । तें भागा आलें वानप्रस्थासी । वानप्रस्थ सदा वनवासी । दुसर्याक फळासी तो भोक्ता ॥६४॥ ऐक संन्याशांची सुखप्राप्ती । दोनी फळें मिथ्या जाणती । मीचि एक त्रिजगतीं । हे प्रतीति निश्चितीं त्यां झाली ॥६५॥ जो हा बहुरूपें विस्तारू । तो मी चिदात्मा साचारू । जाणोनि गुरुमुखें निर्धारू । माझें सुख साचारू पावले ॥६६॥ ते मद्रूपे मज पावले । माझेनि सुखें सुखरूप झाले । सुखदुःखफळांतें मुकले । येवों चुकले संसारा ॥६७॥ संसार मायामय मिथ्याभास । जाणे तोचि वेदज्ञ विद्वांस । त्यासीच बोलिजे परमहंस । विश्वनिवासनिवासी ॥६८॥ ऐसी होआवया पदप्राप्ती । सुदृढ करावी गुरुभक्ती । तेणें होय संसारनिवृत्ती । तेंचि श्रीपती सांगत ॥६९॥ पहिली सांगितली संतसंगती । तेणें जाहली मत्पदप्राप्ती । तेचि अध्यायाच्या अंतीं । करावी गुरुभक्ती सांगतू ॥४७०॥


एकनाथी भागवत - श्लोक २४ वा

एवं गुरूपासनयैकभक्त्या विद्याकुठारेण शितेन धीरः । विवृश्च्य जीवाशयमप्रमत्तः संपद्य चात्मानमथ त्यजास्त्रम् ॥२४॥

इति श्रीमद्भाागवते महापुराणे पारमहंस्यां एकादशस्कन्धे द्वादशोऽध्यायः ॥ १२ ॥ न करितां सद्गुरुभजन । नव्हे भववृक्षाचें छेदन । जरी कोटिकोटी साधन । आनेआन केलिया ॥७१॥ भववृक्षातें छेदिती । केवळ जाण गुरुभक्ती । अरिनिर्दळणी निश्चितीं । जेवीं निजशक्ति शूरांची ॥७२॥ दूरी करावया दुरित । जेवीं गंगाजळ समर्थ । तेवीं भवभया भस्म करीत । जाण निश्चित गुरुभक्ति ॥७३॥ करितां सत्यव्रतग्रहण । पाप स्वयें जाय पळोन । तेवीं करितां गुरुभजन । भवनिर्दळण स्वयें होय ॥७४॥ हनुमंत देखतां दिठीं । भूतें पळती बारा वाटीं । तेवीं गुरुभजनपरिपाटीं । पळे उठाउठी भवभय ॥७५॥ मरतां घडे अमृतपान । तैं मरणासचि आलें मरण । तेवीं करितां गुरुभजन । जन्ममरण निमालें ॥७६॥ अंतीं अवचटें हरि म्हणतां । पांपरा हाणे यमदूतां । तेवीं सद्गुरूते भजतां । हाणे लाता भवभया ॥७७॥ करावया भवनिर्दळण । मुख्य करावें गुरुभजन । हेंचि श्रेष्ठ गा साधन । सभाग्य जाण गुरुभक्त ॥७८॥ कोण सद्गुरु कैशी भक्ती । ऐसें कांहीं कल्पिसी चित्तीं । तेही मी यथानिगुतीं । मागां तुजप्रती सांगीतली ॥७९॥ जो शब्दपरनिष्णात । शिष्यप्रबोधनीं समर्थ । तोचि सद्गुरु येथ । जाण निश्चित उद्धवा ॥४८०॥ जो स्वरूपीं करी समाधान । तोचि सद्गुरु सत्य जाण । त्यावेगळें सद्गुरुपण । होआवया कारण असेना ॥८१॥ त्या सद्गुरुभजनाची परी । तुज मी सांगेन निर्धारीं । सर्व कर्मधर्मांचिया शिरीं । जो कां करी गुरुभजन ॥८२॥ गुरु म्हणों पित्यासमान । तंव तो एकजन्मींचा जाण । हा मायबापू सनातन । जनक पूर्ण जगाचा ॥८३॥ गुरु मातेसमान पाहों । तंव गर्भजन्में तिचा स्नेहो । गर्भवास निवारी गुरुरावो । अधिक स्नेहो पुत्रापरीस ॥८४॥ उदराबाहेर पडल्यापाठीं । पुत्रस्नेहें माता उठी । तें बाहेरील घालूनि पोटीं । स्नेहें गोमटी गुरुमाता ॥८५॥ गुरु मानूं स्वामीसमान । स्वामी निवारूं न शके मरण । सद्गुरु चुकवी जन्ममरण । स्वामी संपूर्ण गुरुरावो ॥८६॥ गुरु मानूं कुलदेवता । तंव तिसी कुलधर्मी पूज्यता । हा कुलदेवतेची देवता । नित्य पूज्यता निजकर्मीं ॥८७॥ गुरु मानूं कल्पतरूसमान । तंव कल्पतरु दे कल्पिलें दान । सद्गुरु दे निर्विकल्पता पूर्ण । अगाध दान निर्लोभे ॥८८॥ चिंतामणी दे चिंतिल्या अर्था । सद्गुरु करी चिंतेच्या घाता । चित्ता मारूनि दे चैतन्यता । अक्षयता निजदान ॥८९॥ कामधेनूचें दुभतें । तें कामनेचपुरतें । सद्गुरु दुभे स्वानंदार्थे । कामनेतें निर्दळी ॥४९०॥ गुरुसमान म्हणों सागरू । तो गंभीर परी सदा क्षारू । हा स्वानंदें नित्य निर्भरू । अतिमधुरू निजबोधें ॥९१॥ गुरु परब्रह्मसमान । हेंही बोलणें किंचित न्यून । गुरुवाक्यें ब्रह्म सप्रमाण । येरवीं ब्रह्मपण शब्दमात्र ॥९२॥ शब्दीं लोपूनि शब्दार्था । गुरु प्रबोधी संविदर्था । त्याहूनि पूज्य परता । नाहीं सर्वथा त्रिलोकीं ॥९३॥ गुरु माता गुरु पिता । गुरु स्वामी कुळदेवता । गुरूवांचोनि सर्वथा । आणिक देवता स्मरेना ॥९४॥ थोर मांडलिया सांकडें । जैं गगन गडगडूनि पडे । तैं न पाहे आणिकाकडे । नाम पढे गुरूचें ॥९५॥ काया वाचा मनें प्राणें । जो गुरूवांचोनि आन नेणे । तैसाचि भजे अनन्यपणें । गुरुभक्ति म्हणणें त्या नांव ॥९६॥ पक्षिणीचीं अपक्ष पिलें । तीं तिसीच स्मरती सर्वकाळें । तेवीं जागृति स्वप्न सुषुप्तिमेळें । जो गुरुवेगळें स्मरेना ॥९७॥ मागां सांगीतलें भगवद्भजन । आतां सांगसी गुरुसेवन । नाहीं एकविध निरूपण । ऐसा विकल्प जाण न धरावा ॥९८॥ सद्गुरु तोचि माझी मूर्ती । निश्चयेंसी जाण निश्चितीं । विकल्प न धरावा ये अर्थीं । अनन्यभक्ति या नांव ॥९९॥ एकाग्रता जें गुरुभजन । तेंचि माझें परमपूजन । गुरूसी मज वेगळेपण । कल्पांतीं जाण असेना ॥५००॥ गुरु भगवंत दोन्ही एक । येणें भावें निजनिष्टंक । भजे तोचि गुरुसेवक । येरू तो देख अनुमानी ॥१॥ माझिया ऐक्यता अतिप्रीतीं । जेणें आदरिली गुरुभक्ती । तोचि धन्य धन्य त्रिजगतीं । भजती स्थिती तें ऐक ॥२॥ करावया गुरुसेवे । मनापुढें देह धांवे । एकला करीन सर्व सेवे । येवढे हांवे उद्यतू ॥३॥ सेवेच्या दाटणी जाण । अधिकचि होय ठाणमाण । अंग अंगऊनि अंगवण । सेवेमाजी जाण विसांवा त्यासी ॥४॥ सेवेचिया आवडीं । आरायेना अर्ध घडी । आवडीचे चढोवढी । चढती गोडी गुरुभजनीं ॥५॥ नित्य करितां गुरुसेवा । प्रेमपडिभरू नीच नवा । सद्भावाचिया हांवा । गुरुचरणीं जीवा विकिलें ॥६॥ आळसु येवोंचि विसरला । आराणुकेचा ठावो गेला । गुरुसेवासंभ्रमें भुलला । घेवों विसरला विषयांतें ॥७॥ तहान विसरली जीवन । क्षुधा विसरली मिष्टान्न । करितां गुरुचरणसंवाहन । निद्रा जाण विसरला ॥८॥ जांभयी यावयापुरती । सवडी उरेना रिती । तेथें निद्रेलागीं केउती । राहावया वस्ती मिळेल ॥९॥ मुखीं सद्गुरुचे नाम । हृदयीं सद्गुरूचें प्रेम । देहीं सद्गुरूचें कर्म । अविश्रम अहर्निशीं ॥५१०॥ गुरुसेवेसी गुंतलें मन । विसरला स्त्री पुत्र धन । विसरला मनाची आठवण । मी कोण हें स्फुरेना ॥११॥ नवल भजनाचा उत्सावो । भजतां नाठवे निजदेहो । थोर सेवेचा नवलावो । निजात्मभावो गुरुचरणीं ॥१२॥ ऐसाही प्रारब्धमेळा । अवचटें झालिया वेगळा । न तुटे प्रेमाचा जिव्हाळा । भजनीं आगळा सद्भावो ॥१३॥ गुरूचा वसता जो ग्राम । तेथेंचि वसे मनोधर्म । गुरुध्यान तें स्वधर्मकर्म । सेवासंभ्रम सांडीना ॥१४॥ गुरुमूर्तीची सवे त्यासी । ते मूर्ति बैसवी हृदयावकाशीं । मग नानाभजनविलासीं । आवडी कैसी भजनाची ॥१५॥ चिन्मात्र पूर्णिमा गुरु पूर्णचंद्र । तळीं आपण होय आर्त चकोर । मग स्वानंदबोधाचे चंद्रकर । निरंतर स्वयें सेवी ॥१६॥ सद्गुरु सूर्य करी चिद्गगनी । आपण होय सूर्यकांतमणी । त्याचेनि तेजें प्रज्वळोनी । स्वभावें मायावनीं होळी करी ॥१७॥ सद्गुरुकृपामृताच्या डोहीं । स्वयें तरंगू होय तये ठायीं । सबाह्य तद्रूपें पाहीं । भावना हृदयीं भावितु ॥१८॥ आपुला निजस्वामी जो सद्गुरु । भावी निर्विकल्प कल्पतरू । त्याचे छाये बैसोनि साचारू । मागे वरू गुरुभक्ति ॥१९॥ सद्गुरु कामधेनु करी जाणा । वत्सरूपें भावी आपणा । आवडीं चाटवी बोधरसना । स्वानंदपान्हा सेवितू ॥५२०॥ तुझ्या सकळ वृत्तींची सेवा । म्यांचि करावी गा गुरुदेवा । ऐसें प्रार्थूनि सद्भावा । हा वरू मज द्यावा कृपानिधी ॥२१॥ तेथ संतोषोनि गुरुनाथें । वरू दीधला वरदहस्तें । हर्षें वोसंडत चित्तें । धन्य मी वरातें लाधलों ॥२२॥ ऐसी लाहोनि वरदस्थिती । तेचि सेवा आदरी प्रीतीं । अतिधन्य भावार्थ गुरुभक्ति । नाना उपपत्ती गुरुभजना ॥२३॥ सद्गुरूचीं दहाही करणें । मनबुद्ध्यादि अंतःकरणें । क्रियामात्र मीचि होणें । ऐसें जीवेंप्राणें भावितु ॥२४॥ सद्गुरु जे जे भोग भोगिती । ते मीचि होईन निश्चितीं । एवं मीचि एक गुरुभक्ती । दुजी स्थिती हों नेदीं ॥२५॥ सद्गुरु जेथें उभे ठाकती । तैं पायांतळीं मीचि क्षिती । सद्गुरु जेथें जेथें चालती । ते मार्गींची माती मी होईन ॥२६॥ चरणक्षालनासी समस्त । मीचि उदक मीचि तस्त । मीचि चरण प्रक्षालित । चरणतीर्थ मी सेवीं ॥२७॥ सद्गुरुचरणींचे रजःकण । मीचि होईन आपण । सद्गुरु करिती आरोहण । तें सिंहासन होईन मी ॥२८॥ सद्गुरुचें सिंहासन । तें मीचि होईन आपण । त्यावरी बैसतें आसन । तेंही जाण होईन मी ॥२९॥ सद्गुरूसी स्नेह लागे । तें मी होईन सर्वांगे । गुरूसी वोठंगावया पुढें मागें । मृदुळी सर्वांगें मी होईन ॥५३०॥ मनींचा ऐसा आवांका । सद्गुरूच्या सिद्ध पादुका । त्या मी होईन देखा । नेदीं आणिकां आतळों ॥३१॥ मी होईन गुरूच्या श्वासोच्छ्वासा । वेगीं बाहेर निघेन नासा । गुरु घेतील ज्या सुवासा । त्या त्या विलासा मी होईन ॥३२॥ गुरु अवलोकिती कृपादृष्टी । त्या दृश्याची मी होईन सृष्टी । गुरूसी देखती देखणी पुष्टी । ते मी उठाउठीं होईन ॥३३॥ गुरूसी आवडतें निरूपण । तें मी श्रवणीं होईन श्रवण । अथवा रुचेल जें कीर्तन । तें गाता गायन मी होईन ॥३४॥ सद्गुरुमुखींची जे कथा । ते मी आदरें होईन तत्त्वतां । अक्षरीं अक्षर अक्षरार्था । मीचि सर्वथा होईन ॥३५॥ सद्गुरु जेथ करिती स्नान । तें मी अंगस्पर्शनाचें जीवन । गुरु करिती जें आचमन । तेंही जाण होईन मी ॥३६॥ गुरु परिधान करिती वास । तें मी होईन सुवास । गुरुचरण पुसावयास । तेंही धूतवास मी होईन ॥३७॥ गुरूसी करिती विलेपन । तें मी होईन शुद्ध चंदन । चरणीं अर्पितें सुमन । मीचि जाण होईन ॥३८॥ सद्गुरु करिती भोजन । तेथ मीचि ताट मीचि अन्न । रसस्वाद पक्वान्न । पंक्तिकारु जाण मी होईन ॥३९॥ मथोनियां दहीं मथित । सारांश तें नवनीत । वैराग्यअ ग्निसंतप्त । भोजनीं मुख्य घृत मी होईन ॥५४०॥ परिपाकीं स्वादिष्टपण । सर्वां चवींचें कारण । मी होईन वरी लवण । न्यून तें पूर्ण गुरु करिती ॥४१॥ गुरु करिती प्राशन । तें मी होईन जीवन । सद्गुरूचें धालेपण । ते उद्गार जाण मी होईन ॥४२॥ गुरूसी जें जें गोड लागे । ते ते पदार्थ मी होईन अंगें । सद्गुरुसी ज्याची रुचि लागे । तें मी सर्वांगें होईन ॥४३॥ सद्गुरु आंचवती जेथ । मी उष्णोदक मी तस्त । शिंतोडे लागती जेथ जेथ । तेही समस्त होईन मी ॥४४॥ गुरूसी अर्पिती जें फळ । तें मी होईन तत्काळ । गुरुअर्पणें सफळ । फळाचें फळ मी होईन ॥४५॥ सद्गुरूचें घ्यावया उच्छिष्ट । मजचि मोठा लवलवाट । मांजर होऊनियां ताट । चरचराट चाटीन मी ॥४६॥ गुरु करिती करोद्वर्तन । तो मी होईन सुगंधचंदन । मुखवासा सुवासपण । मीचि जाण होईन ॥४७॥ फळाशा फोडूनि फोडी । वासनाशिरा काढूनियां विडी । रिघोनियां सद्गुरूच्या तोंडीं । तांबूल गोडी मी होईन ॥४८॥ जाळूनियां अहंकठिणपणा । मी होईन सोहं शुद्ध चुना । शांति परिपक्व लागोनि पाना । सद्गुरुवदना पावेन ॥४९॥ सर्व सारांचें शुद्ध सार । तो होईन खदिरसार । सद्गुरुमुखी रंगाकार । मीचि साचार शोभेन ॥५५०॥ सद्गुरुमुखींचें पवित्र पीक । वरच्यावरी मी घेईन देख । पिकदाणीचे मुखाचें मुख । आवश्यक मीच होईन ॥५१॥ गुरूचा उगाळू मी होईन । पीक पिकदाणी धरोनि जाण । चवरी जी मक्षिकानिवारण । ती मी होईन निजांगें ॥५२॥ गुरूचा उगाळू घ्यावया देख । मी होईन आगळा सेवक । नातरी लडिवाळ बाळक । गुरुअंकीं देख मी होईन ॥५३॥ माझिया गुणांची सुमनमाळा । आवडीं घालीन गुरूच्या गळां । गुरु झेलिती लीलाकमळा । त्या करकमळा मी होईन ॥५४॥ गुरूसी नीराजन करिती । ते मी निजतेजें उजळीन ज्योती । गुरु जेणें प्रकाशें चालती । ते दीपकादीप्ति मी होईन ॥५५॥ जीवभावाचें निंबलोण । गुरूसी मी करीन आपण । इडापीडा मी घेईन जाण । तें लोणलक्षण मज लागो ॥५६॥ मी छत्र मी छत्राकारू । मी चवर मीचि चवरधरू । मीचि विंजणा मीचि विंजणेवारू । गुरूचा परिवारू मी होईन ॥५७॥ गुरु करिती आरोहण । तो मी होईन श्यामकर्ण । गुरूचा भरभार सहावया जाण । वाजीवाहन होईन मी ॥५८॥ गुरूपुढें मी वाटसुभटू । गुणवर्णनीं मी गर्जता भाटू । गुरुगृहीं शांतिपाठू । पढता भटू मी होईन ॥५९॥ मीचि बारी मी कर्हेपरी । मी हडपी मी फुलारी । मी झाडणा मी खिल्लारी । मी द्वारपाळ द्वारीं होईन ॥५६०॥ गुरु जेथें देती अवधान । ते ते कळा मी होईन जाण । गुरूवेगळा अर्ध क्षण । गेला प्राण तरी न वचें ॥६१॥ गुरु सांगती जे कथा । तेथ मी होईन सादर श्रोता । गुरुकृपा मी होईन वक्ता । निजात्मता बोलका ॥६२॥ गुरु गंभीर दान देता । तेथ दीन होईन मागता । मी होईन दान वाटिता । सादर एकांता होईन ॥६३॥ गुरु बैसती सावकाश । तैं मी होईन अवकाश । गुरुहृदयींचें चिदाकाश । निरवकाश मी होईन ॥६४॥ गुरु बैसती आपण । तें मी होईन सुखासन । तें मीचि वाहेन आपण । भोई होईन चालणा ॥६५॥ स्वामी सूनियां दिठी । चपळ पाउलांच्या नेटीं । चालेन मी उठाउठी । धुरेसी गोठी सांगत ॥६६॥ आंतुले दृष्टीं पुढिले चालीं । गोवींचें पाऊल उगवोनि घालीं । उंच नीच भूमीची खोली । चुकवूनि चालीं चालेन ॥६७॥ संकल्पविकल्पांचे झोंक । ज्यात वाम सव्य अनेक । ते आवरूनियां देख । पाहत श्रीमुख चालेन मी ॥६८॥ न चुकतां निजमार्ग । न्याहाळूनि धुरेचें आंग । न करितां आणिकांचा पांग । भोई चांग मी होईन ॥६९॥ सुखासनाचेनि पडिपाडें । चालतां सुख अधिक वाढे । मागीस सूड काढूनि पुढें । सुखसुरवाडें चालेन ॥५७०॥ चढणें पडणें अडखळणें । दडकणें फडकणें अडकणें । सांभाळूनियां निष्ठेनें । टणकपणें चालेन ॥७१॥ उरीं शिरीं खांदीं कोंपरीं । मागील सूड पुढें धरीं । दृष्टी ठेऊनि पायांवरी । निर्विकारी चालेन ॥७२॥ आटी मुरडी उलट लोट । धापकांप पडे मेट । आधार धरूनि सुभट । चढती वाट चालेन ॥७३॥ उल्लंघूनि कामाचा पाट । आंवरूनि क्रोधाचा लोट । चुकवूनि खोलव्याची वाट । धुरेसकट मी चालेन ॥७४॥ ममतेची ओल प्रबळ । ते ठायीं रुती गुंती सबळ । तेथ न माखतां पाउल । लंघूनि तत्काळ जाईन ॥७५॥ मोहनदीची थोर कराडी । माजीं सबळ जळें प्रबळ वोढी । शिंतोडा न लगतां धूर मी काढीं । परापर थडी तत्काळ ॥७६॥ दृष्टी ठेऊनि स्वामीकडे । सवेग चालतां मागेंपुढें । भोई होईन दोहींकडे । सूड सुडें काढीन ॥७७॥ एवं मीचि मी मागें पुढें । सुखासनाचेनि सुरवाडें । स्वामीची निजनिद्रा न मोडे । तेणें पडिपाडें वाहेन ॥७८॥ उच्छिष्ट अन्नाचा पोसणा । आठां प्रहरांचा जागणा । सदा गुरुगुरु करीत जाणा । गुरुद्वारीं सुणा मी होईन ॥७९॥ विजाती देखोनि नयना । सोहं भावें भुंकेन जाणा । भजनथारोळा बैसणा । गुरुद्वारी सुणा मी होईन ॥५८०॥ ऐसऐथसिया भावना । गुरुसेवेलागीं जाणा । अतिशयें आवडी मना । नाना विवंचना विवंची ॥८१॥ जरी दैववशें दूर गेला । परी तो भावबळें जवळी आला । गुरुसेवे जो जीवें विकला । तो शास्त्र पावला सद्विद्या ॥८२॥ असो जवळी अथवा दूरी । परी गुरुभक्तीची आवडी भारी । जीवित्व ठेविलें सेवेवरी । गुरूच्या द्वारीं भजनासी ॥८३॥ ऐसा गुरुभक्तीसी सादर । चढत्या आवडीं एकाग्र । तेंचि सद्विद्यालक्षण शस्त्र । गुरुकृपाकुठार पैं पावे ॥८४॥ लावोनि वैराग्याचे साहाणे । प्रत्यावृत्तिबोधकपणें । शस्त्र केलें जी सणाणें । तीक्ष्णपणें अतिसज्ज ॥८५॥ शस्त्र सजिलें निजदृष्टीं । दृढ धरिलें ऐक्याचे मुष्टीं । शस्त्र आणि शस्त्रधरा एकी गांठी । करूनि उठी भवच्छेदा ॥८६॥ दृढ साधोनियां आवो । निजबळें घालितां घावो । झाला भववृक्षाचा अभावो । घायेंवीण पहा हो छेदिला ॥८७॥ जीवाशयाची वासना । ते छेदावी निजकल्पना । तोचि भववृक्षाचा छेदू जाणा । सावधाना धृतिबळें ॥८८॥ झालिया चैतन्यपदप्राप्ती । सकळ साधनें सहजें जाती । भोजनीं झालिया पूर्ण तृप्ती । ठायींच राहती पक्वान्नें ॥८९॥ परमतृप्ती उथळल्या पोटीं । अमृतही न लावी ओंठीं । तेवीं ब्रह्मपद पावल्यापाठीं । साधनआटाटी सांडती ॥५९०॥ हाचि भावो धरोनि चित्तीं । मागां सांगीतलें तुजप्रती । सांडीं साधनव्युत्पत्ती । प्रवृत्तिनिवृत्तीसमवेत ॥९१॥ पावलिया परब्रह्म । मिथ्या वेदोक्त सकळ कर्म । मिथ्या आश्रमादि वर्णधर्म । हें त्यागितें वर्म कर्माचें ॥९२॥ स्वप्नीं चालतां लवडसवडीं । जो अडखळूनि पडला आडीं । तो जागा होऊनि आपणातें काढी । तैसी वृथा वोढी साधनीं ॥९३॥ पीक आलिया घुमरी । ते शेतीं कोण नांगर धरी । गजांतलक्ष्मी आलिया घरीं । भीक दारोदारीं कोण मागे ॥९४॥ हातीं लागलिया निधान । नयनीं कोण घाली अंजन । साधलिया निजात्मज्ञान । वृथा साधन कोण सोसी ॥९५॥ अंगीकारोनि ज्ञानशक्ती । केलीं संसारनिवृत्ति । ते हे त्यागावी निजवृत्ती । जाण निश्चतीं उद्धवा ॥९६॥ अग्निस्तव निपजे अन्न । तें वाफ न जिरतां परमान्न । पोळी अवशेष तापलेपण । रांधितेंहीं जाण चवी नेणे ॥९७॥ आंबया पाडु लागला जाण । तरी अंगीं असे आम्लपण । सेजेसी मुरालिया मघमघोन । न चाखतां घ्राण चवी सांगे ॥९८॥ सेजे मुरावयाची गोठी । तेथ न व्हावी द्वैताची दिठी । येरयेरां जाहलिया भेटी । दोनी शेवटीं ठिकाळती ॥९९॥ ठिकाळलीं सेजे घालिती । तत्संगें आणिकें नासती । निश्चळ राहिल्या एकांतीं । परिपाकपूर्ती घ्राण सांगे ॥६००॥ शत्रु जिणोनियां डाडीं । रणांगणीं उभवितां गुढी । शस्त्रेंसी कवच जंव न फेडी । तंव विश्रांति गाढी न पविजे ॥१॥ गरोदरीसी प्रसूति होये । पुत्रजन्में सुखावली ठाये । तेही बारावळी जैं पाहे । तैं भोगूं लाहे पुत्रसुख ॥२॥ पुरुष निमोनियां जाये । त्या देहाचें दहन होये । तरी अवशेष सुतक राहे । तें गेलिया होये निजशुद्धी ॥३॥ तेवीं जावोनियां अज्ञान । उरला जो ज्ञानाभिमान । तोही त्यागिलिया जाण । चित्समाधान स्वानंदें ॥४॥ खैराचा शूळ तत्त्वतां मारी । मा चंदनाचा काय आन करी । तेवीं अभिमान दोहींपरी । बाधकता धरी ज्ञानाज्ञानें ॥५॥ लोखंडाची बेडी तोडी । आवडीं सोनियाची जडी । चालतां तेही तैसीच आडी । बाधा रोकडी जैसी तैसी ॥६॥ 'ब्रह्महमस्मि' हा अभिमान । शुद्ध ब्रह्म नव्हे जाण । अहंपणें तेंही कठिण । तेंचि लक्षण अवधारीं ॥७॥ जळापासोनि लवण होये । तें जळींचें जळीं विरोनि जाये । मोतीं झालें तें कठिण पाहें । उदकीं न जाये विरोनी ॥८॥ मुक्तपणें मोला चढलें । तें वनिताअधरीं फांसा पडिलें । मुक्तचि परी नासा आलें । कठिण केलें अभिमानें ॥९॥ तेवीं अज्ञानअाभिमान आहे । तो सर्वथा तत्काळ जाये । ज्ञानाभिमान कठिण पाहें । गोंविताहे मुक्तत्वें ॥६१०॥ अपक्व घटू तत्काळ गळे । तो पृथ्वीचा पृथ्वीस मिळे । भाजिलें खापर अतिकाळें । पृथ्वीस न मिळे कठिणत्वें ॥११॥ प्रपंच अज्ञानें झाला लाठा । ज्ञानअकज्ञानांचा सत्ववांटा । फेडूनि कांटेन कांटा । दोनी आव्हांटा सांडावे ॥१२॥ जरी सांडिले वाटेवरी । तरी अवचटें आपणासीचि बाधु करी । यालागीं सांडावे दूरी । निजनिर्धारीं हा त्यागू ॥१३॥ जेथवर अहंपण । तेथवरी बद्धकता जाण । शुद्धाशुद्ध अभिमान । निःशेष सज्ञान सांडिती ॥१४॥ उद्धवा तुजकरितां माझी भक्ती । झाली माझ्या निजपदाची प्राप्ती । आतां नाना साधनउंपपत्ती । शास्त्रव्युत्पत्ती कां करिसी ॥१५॥ सद्भावें करितां माझें भजन । तूं झालासी ब्रह्मसंपन्न । आतां सद्विद्यादि सर्व साधन । शास्त्रश्रवणेंसीं सांडीं पां ॥१६॥ 'तस्मादुद्धव उत्सृज्य' । ये श्लोकींचें हें त्यागबीज । विशद सांगीतलें म्यां तुज । निजगुज हृदयस्थ ॥१७॥ सकळां साधनां श्रेष्ठ साधन । शिष्यासी सद्गुरुचे भजन । तेणे पाविजे ब्रह्मसमाधान । सत्य जाण उद्धवा ॥१८॥ जो भावें भजे गुरुचरणीं । तो नांदे सच्चिदानंदभुवनीं । हे सत्य सत्य माझी वाणी । विकल्प कोणीं न धरावा ॥१९॥ ऐसें बोलोनि श्रीहरी । आवडीं चारी बाह्या पसरी । उद्धवातें प्रीतिकरीं । हृदयीं धरी स्वानंदें ॥६२०॥ देवें सद्भक्ता क्षेम दीधलें । निजहृदयीं हृदय एक झालें । सांगणें पुसणें सहज ठेलें । बोलणें बोलें प्राशिलें ॥२१॥ चहूं वाचां पडलें मौन । जीवू विसरला जीवपण । एका तुष्टला जनार्दन । स्वानंदघन सद्भक्तां ॥२२॥ तेचि सद्भक्तीचा भावार्थ । विशद बोलिला बाराव्यांत । निजभावें श्रीकृष्णनाथ । नित्य प्राप्त भाविकां ॥२३॥ निजात्मप्राप्तीचें कारण । केवळ भावार्थचि जाण । भावार्थावेगळें साधन । वृथा जाण परिश्रमू ॥२४॥ जप तप यज्ञ दानें । भावार्थालागीं करणें । तो भावार्थ लाहिजे जेणें । धन्य जिणें तयाचें ॥२५॥ धन्य नरदेहाची प्राप्ती । धन्य साधूची संगती । धन्य धन्य ते भावार्थी । जे भगवद्भक्तीं रंगले ॥२६॥ जे रंगले भगवत्पथा । त्यांचें चित्त विसरलें विषयावस्था । ते हंसगीताची कथा । उद्धव कृष्णनाथा पुसेल ॥२७॥ तें अतिरसाळ निरूपण । केवळ शुद्ध ब्रह्मज्ञान । श्रोतां व्हावें सावधान । एका जनार्दन विनवितू ॥६२८॥

इति श्रीभागवते महापुराणे एकादशस्कंधे श्रीकृष्णोद्धवसंवादे एकाकाराटीकायां द्वादशोऽध्यायः ॥१२॥

॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ मूळश्लोक २४ ॥ ओंव्या ६२८ ॥


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.

[[‎]]