एकनाथी भागवत/अध्याय सोळावा

<poem>

एकनाथी भागवत - आरंभ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥

ॐ नमो सद्गुनरु मूर्ती । चराचर तुझी विभूती । विश्वात्मा विश्वस्फूर्ती । अमूर्तमूर्ती श्रीगुरुराया ॥१॥ तुझे मूर्तीचे महिमान । सकळ शास्त्रां अतर्क्य जाण । श्रुतीने घेतलें मौन । शब्दें आण वाहिली ॥२॥ आण वाहिली दृष्टांती । तुजसमान नाही दुजी स्थिती । जे जे योजावी उपपत्ती । ते ते विभूती पैं तुझी । ३॥ तुझिया प्रभावाची ऐशी खोडी । जे दुजेपणाचें मूळ तोडी । मग एकपणाचे परवडी । दृष्टांत काढी कोण कोठें ॥४॥ कोठें तुझे स्थानमान । हेंच सर्वथा न कळे जाण । अगाध तुझें महिमान । कैसेनि ध्यान करावें ॥५॥ हेतु मातु दृष्टांतू । न रिघे ज्यांचे शिंवे आंतू । तो भागवतींचा भागवतार्थू । ओंवियांआंतू बोलविशी ॥६॥ ते माझे मर्हाभटे आरुष बोल । सद्गुवरूंनी केले सखोल । तेथींच्या प्रेमाचे जे बोल । जाणती केवळ गुरुभक्त ॥७॥ ज्यासी नाहीं गुरुचरणीं भक्ती । त्यासी कैसेनि होईल विरक्ती । जरी पढले श्रुतिस्मृती । शास्त्रव्युत्पत्ती केल्याही ॥८॥ करितां साधनांच्या कोटी । साधनीं समाधान नुठी । झालिया सद्गुंरुकृपादृष्टी । ब्रह्मत्वें पुष्टी गुरुभक्तां ॥९॥ तो तूं सद्गुंरु श्रीजनार्दन । सकळ जगाचें अधिष्टान । भूतीं भूतात्मा तूं आपण । सहजें जाण समसाम्यें ॥१०॥ समसाम्य सर्व भूतीं । ज्यांसी घडे सद्गुारुभक्ती । तेचि ये श्रीमहाभागवतीं । अर्थप्राप्ती प्रविष्ट ॥११॥ झालिया सद्गुमरुकृपा वरिष्ठ । न करितां व्युत्पत्तीचे कष्ट । भागवतार्थीं होय प्रविष्ट । भक्त सुभट भावार्थीं ॥१२॥ हृदयीं झालिया सद्भाववो । भावें प्रकटे देवाधिदेवो । तेथें भागवताचा अभिप्रावो । सहजेंचि पहा वो ठसावे ॥१३॥ यालागीं करितां गुरुभक्ती । प्राप्त होईजे भागवतार्थीं । तेथ काव्यादि व्युत्पत्ती । नाना युक्ती किमर्थ ॥१४॥ किमर्थ करावें शास्त्र ज्ञान । किमर्थ धरावें वृथा ध्यान । चालतें बोलतें ब्रह्म पूर्ण । सद्गु रुचरण साधकां ॥१५॥ वांचूनिया गुरुभजन । शिष्यासी नोहे समाधान । याहूनियां श्रेष्ठ साधन । नाहीं जाण सर्वथा ॥१६॥ त्या सद्गुशरुकृपापरिपाटी । एकादशीं पूर्वार्ध कोटी । वाखाणिली की मर्हाुटी । यथार्थदृष्टीं निजबोधें ॥१७॥ ऊंस गाळितां रस होये । तो ठेविलिया बहुकाळ न राहे । त्याचा आळूनियां पाहे । गूळ होये सपिंड ॥१८॥ तोहि ठेवितां लिवाड धरी । मग साखर कीजे रायपुरी । तेही घोटूनियां चतुरीं । नाबद करिजे कोरडी ॥१९॥ तैसें हे श्रीभागवत जाण । मुळीं बोलिला नारायण । तेंचि श्रीव्यासें आपण । दशलक्षण वर्णिले ॥२०॥ ते दशलक्षण परवडी । श्रीशुकमुखें चढली गोडी । तेथील कठिण पदबंधमोडी । टीका चोखडी श्रीधरी ॥२१॥ ते श्रीधरीचें व्याख्यान । भावार्थदीपिका जाण । त्या भावार्थाची सद्भााव खूण । केलें निरूपण देशभाषा ॥२२॥ मुळीं वक्ता एक नारायण । व्यास शुक श्रीधरव्याख्यान । त्यांत मुळींचे लक्षूनि गोडपण । एका जनार्दन कविकर्ता ॥२३॥ मुळीं बीज श्रीनारायण । ब्रह्मयाचे ठायीं प्रेरिलें जाण । तें नारदक्षेत्रीं संपूर्ण । पीक परिपूर्ण निडारिलें ॥२४॥ त्याचें व्यासें दशलक्षण । संपूर्ण केलें संवगण । शुकें परीक्षितीच्या खळां जाण । मळूनि निजकण काढिले ॥२५॥ तेंचि शास्त्रार्थें जाण । श्रीधरें निजबुद्धीं पाखडून । काढिले निडाराचे कण । अतिसघन सुटंक ॥२६॥ त्याची पक्वान्नें चोखडी । मर्हांटिया पदमोडी । एका जनार्दनें केली परवडी । ते जाणती गोडी निजात्मभक्त ॥२७॥ त्या श्रोत्यांचेनि अवधानें । जनार्दनकृपा सावधानें । पूर्वार्ध एका जनार्दनें । संपूर्ण करणें देशभाषा ॥२८॥ ते प्रथमाध्यायीं अनुक्रम । वैराग्य उत्पत्तीचा संभ्रम । कुलक्षयासी पुरुषोत्तम । करी उपक्रम ब्रह्मशापें ॥२९॥ दुसर्याापासूनि चतुर्थवरी । नारदें वासुदेवाच्या घरीं । निमिजायंत प्रश्नोत्तरीं । पंचाध्यायी खरी संपविली ॥३०॥ षष्ठाध्यायी श्री कृष्णमूर्ती । पाहो आलिया सुरवरपंक्ती । तिहीं प्रर्थिला श्रीपती । निजधामाप्रती यावया ॥३१॥ ऐकोनि सुरवरांची विनंती । देखोनि अरिष्टभूत द्वारावतीं । उद्धवें प्रार्थिला श्रीपती । निजधामाप्रती मज नेईं ॥३२॥ त्याचे प्रश्नांचे प्रश्नोत्तर । त्यागयुक्त ज्ञानगंभीर । सप्तमाध्यायीं शारङ्गधर । थोडेनि फार बोलिला ॥३३॥ तेथ त्यागसंग्रह लक्षण । यदुअवधूत संवादें जाण । चोविसां गुरूंचे प्रकरण । केलें संपूर्ण अष्टमीं नवमीं ॥३४॥ श्राद्धासंपन्न ज्ञानविश्वास । तेथ नाना मतांचा मतनिरास । दशमाध्यायी हृषीकेश । ज्ञानविलास बोलिला ॥३५॥ अकरावें अध्यायीं जाण । बद्धमुक्तांचे वैलक्षण्य । सांगूनि साधूचे लक्षण । भक्तीचे संपूर्ण दाविलें रूप ॥३६॥ भागवतीं बारावा अध्यावो । अतिगुह्य बोलिला देवो । तेथील लावितां अभिप्रावो । पडे संदेहो सज्ञाना ॥३७॥ बारावे अध्यायाची किल्ली । युक्तिप्रयुक्ती नातुडें बोली । जनार्दन कृपा माऊली । तेणें मागी दाविली ग्रंथाची ॥३८॥ तें द्वादशाध्यायी निरूपण । सत्संगाचा महिमा गहन । कर्माचा कर्ता कोण । त्यागितें लक्षण कर्माचें ॥३९॥ तो द्वादशाध्यावो ऐकतां । ज्ञानसंलग्नता होय चित्ता । आडवी ठाके विषयावस्था । तेणें बाधकता साधकां ॥४०॥ गुणवैषम्याचें लक्षण । तेणें विषयावस्था गहन । तेथ सत्त्वशुद्धीचें कारण । केले निरूपण त्रयोदशीं ॥४१॥ तेचि प्रसंगे यथोचित । चित्तविषयांचे जें प्रथित । उगवावया हंसगीत । सुनिश्चित सांगितलें ॥४२॥ हंसगीतीं जे निरूपण ज्ञान । समाधिपर्यंत समाधान । तेंचि साधावया साधन । चवदावा आपण बोलिला देवो ॥४३॥ साधनांमाजी मुख्य भक्ती । सगुण तेचि माझी निर्गुण मूर्ती । योगयुक्त ध्यानस्थिती । बोलिला श्रीपती चतुर्दशीं ॥४४॥ विविधा सिद्धींची धारणास्थिती । देवें सांगितली उद्धवाप्रती । सिद्धी बाधिका माझे प्राप्ती । हें पंधराव्याअंती निरूपिलें ॥४५॥ एवं पंधराव्या अध्यायी पूर्वार्ध । निरूपण झाले अतिशुद्ध । आतां उरलें उत्तरार्ध । तो कथासंबंध अवधारा ॥४६॥ षोडशीं भगवद्विभूती । सतरा अठरा अध्यायांप्रती । वर्णाश्रम कर्मगती । विधानस्थिती निरूपण ॥४७॥ एकुणिसावा अध्याय गहन । ज्ञाननिर्णयाचें महिमान । उद्धवाचें यमनियमादि प्रश्न । सांगितलें ज्ञानपरिपाकें ॥४८॥ त्या ज्ञानाधिकाराचा योग । अज्ञान ज्ञान मध्यस्थ भाग । विसावें अध्यायी श्रीरंग । त्रिविध विभाग बोलिला ॥४९॥ तेथ गुणदोषांची अवस्था । उद्धवें ठेविली वेदांचे माथां । ते वेदवादसंस्था । केली तत्त्वतां एकविसांत । ॥५०॥ तेचि वेदवाद व्युत्पत्ती । तत्त्वांची संख्या किती । ते तत्त्वसंख्या उपपत्ती । केली श्रीपती यथान्वयें ॥५१॥ सकळ तत्त्वांचे विवेचन । प्रकृतिपुरुषांचे लक्षण । जन्ममरणांचें प्रकरण । केलें निरूपण बाविसावां ॥५२॥ साहोनियां परापराध । स्वयें राहावें निर्द्वंद्व । हा भिक्षुगीतसंवाद । केला विशद तेविसांवा ॥५३॥ अद्वैती राहावया स्थिती । चोविसावां सांख्यव्युत्पत्ती । निर्गुणापासोनि गुणोत्पत्ती । गुणक्षया अंती निर्गुण उरे ॥५४॥ आदीं निर्गुण अंतीं निर्गुण । मध्यें भासले मिथ्या गुण । ये अद्वैतप्राप्तीलागीं जाण । केलें निरूपण सांख्याचें ॥५५॥ ते मिथ्यागुण प्रवृत्तियुक्त । त्रिगुणांचा सन्निपात । बोलिला पंचविसाव्यांत । निर्गुणोक्त निजनिष्ठा ॥५६॥ सव्विसावे अध्यायाप्रती । अनिवार अनुतापाची शक्ती । भोगितां उर्वशी कामप्राप्तीं । पावला विरक्ती पुरूरवा ॥५७॥ भजनक्रिया मूर्तिलक्षण । वैदिक तांत्रिक मिश्र भजन । या उद्धवप्रश्नांचे निरूपण । केलें संपूर्ण सत्ताविसावां ॥५८॥ महायोग्यांचे योगभांडार । परम ज्ञानें ज्ञानगंभीर । निजसुखाचें सुखसार । केवळ चिन्मात्र अठ्ठाविसावा ॥५९॥ त्याचि अध्यायामाजीं जाण । संसार असंभवाचा प्रश्न । उद्धवें केला अतिगहन । त्याचेंही प्रतिवचन दिधले देवें ॥६०॥ एकादशाचा निजकळसू । भक्तिप्रेमाचे अतिविलासू । एकुणतिसावां सुरसरसू । ज्ञानोपदेशू भक्तियुक्त ॥६१॥ पुढिले दों अध्यायांआंत । स्त्रीपुत्रादि कुळाचा घात । होतां डंडळीना ज्ञानसमर्थ । तें प्रत्यक्षभूत हरि दावी ॥६२॥ ब्राह्मणांचा शाप कठिण । शापें बाधिला श्रीकृष्ण । इतरांची कथा कोण । कुळनिर्दळण ब्रह्मशापे ॥६३॥ ब्राह्मणांचा कोप समर्थ । सगळा समुद्र केला मूत । शिवाचा झाला लिंगपात । ब्रह्मक्षोभांत निमेषार्धे ॥६४॥ यालागीं सज्ञान अथवा मुग्ध । तिहीं न करावा ब्रह्मविरोध । हेंचि दावावया मुकुंद । कुलक्षयो प्रसिद्ध दाखवी ॥६५॥ निजदेहासी जो करी घात । तो जराव्याध केला मुक्त । येथवरी ज्ञाता देहातीत । क्षमायुक्त तो सज्ञान ॥६६॥ एकुणतीस अध्यायापर्यंत । कृष्णें उपदेशिला ज्ञानार्थ । पुढील दोन अध्यायांत । स्वयें दावीत विदेहत्व ॥६७॥ राम अयोध्या घेऊन गेला । कृष्णें निजदेहही सांडिला । येणें देहाभिमान मिथ्या केला । तरावया पुढिलां मुमुक्षां ॥६८॥ पंधरा अध्याय पूर्वार्ध । व्याख्यान झालें अतिशुद्ध । सूत्रप्राय उत्तरार्ध । दाविले विशद अध्यायार्थ ॥६९॥ साह्य सद्गुउरु जनार्दन । श्रोतीं द्यावें अवधान । पुढील उत्तरार्ध व्याख्यान । एका जनार्दन बोलवी ॥७०॥ झालिया वसंताचे रिगवणें । वृक्ष सपुष्प सफळ तेणें । तेवीं जनार्दनकृपागुणें । सार्थक वचनें कवित्वाचीं ॥७१॥ गगनीं उगवला अंशुमाळी । जेवीं विकासिजे नवकमळीं । तेवीं जनार्दनकृपामेळीं । कवित्ववनमाळी विकासे ॥७२॥ वेणु घेऊनियां हातें । विश्वा मोहिलें कृष्णनाथें । तेवीं कवीश्वर करोनि मातें । वक्ता येथें जनार्दन ॥७३॥ तो जनार्दनकृपाक्षीराब्धी । ज्याची कृपेसी नाहीं अवधी । तेणें उत्तरार्धीं प्रवेशे बुद्धी । अर्थसिद्धीसमवेत ॥७४॥ मागील कथासंगती । पंधरावे अध्यायाअंती । सिद्धी बाधिका माझे प्राप्ती । ऐसें श्रीपती बोलिला ॥७५॥ एवं सांडूनि सिद्धींचें ध्यान । माझे स्वरूपीं राखावें मन । हें ऐकोनि कृष्णवचन । उद्धवें प्रश्न मांडिला ॥७६॥ उद्धव म्हणे श्रीकृष्णनाथा । विनंती अवधारीं समर्था । तुझ्या विभूति समस्ता । मज तत्त्वतां सांगाव्या ॥७७॥


एकनाथी भागवत - श्लोक १ ला

श्रीउद्धव उवाच । त्वं ब्रह्म परमं साक्षाद् अनाद्यन्तमपावृतम् । सर्वेषामपि भावानां त्राणस्थित्यप्ययोद्भ्वः ॥१॥

भूतभौतिकांचें तूं कारण । तुझेनि जन्म-स्थिति-निदान । इतुकें करोनि अकर्ता जाण । ब्रह्म परिपूर्ण तूं यालागीं ॥७८॥ म्हणसी उत्पत्ति स्थिति मरण । भूतांतें प्रकृति करी जाण । ते प्रकृति तुझे अधीन । तुझेनि चलन प्रकृतीसी ॥७९॥ यालागीं प्रकृति ते परतंत्र । तूं परमात्मा स्वतंत्र । अनादि अव्यवो अपार । श्रुतींसी पार न कळेचि ॥८०॥ प्रकृतीसी तुझें आवरण । तूं अनंत गा निरावरण । जीवांचे स्वरूप गा तूं आपण । परी जीवपण तुज नाहीं ॥८१॥ जीवू तितुका अज्ञानयुक्त । तूं ज्ञानाज्ञानातीत निश्चित । यालागीं ब्रह्म तूं साक्षात । अविनाशवंत अपरोक्ष ॥८२॥ तो तूं अपरोक्ष कैसा म्हणशी । सर्वीं सर्वत्र सबाह्य असशी । ऐसा असोनि अतर्क्य होशीं । हृषीकेशी तें ऐक ॥८३॥


एकनाथी भागवत - श्लोक २ रा

उच्चावचेषु भूतेषु दुर्ज्ञेयमकृतात्मभिः । उपासते त्वां भगवन् याथातथ्येन ब्राह्मणाः ॥२॥

मशकादि हिरण्यगर्भ पर्यंत । तूं सबाह्य सर्व भूतीं संतत । ऐशिया तूतें निश्चित । ब्राह्मण जाणत वेदार्थें ॥८४॥ आकळूनि उपनिषदर्थ । तुझ्या ठायीं भजनयुक्त । ते तुज सर्वगतातें जाणत । सुनिश्चित सर्वात्मा ॥८५॥ त्या सर्वात्म्याचा पाहतां पार । अचिंत्यानंत ऐश्वर्यधर । त्या तुज नेणती प्राकृत नर । ऐक विचार तयांचा ॥८६॥ जे मनाचे विकिले । उपस्थाचे अंकिले । जे रसनेचे पोसणे झाले । निद्रेनें केले घरजांवयी ॥८७॥ त्यांसी स्वतः सिद्ध स्वरूप पाहीं । सर्वगत न पडेचि ठायीं । निजात्मता न कळे देहीं । सदा विषयीं भूलले ॥८८॥ विषयीं चंचळ अंतःकरण । त्यांसी नव्हे ध्यान सगुण । निर्गुणीं प्रवेशेना मन । अज्ञान जन केवीं तरती ॥८९॥ न करितां नाना व्युत्पत्ती । न धरितां ध्यानस्थिती । तुझ्या उत्तमा ज्या विभूती । त्या सांग निश्चितीं भजनासी ॥९०॥


एकनाथी भागवत - श्लोक ३ रा

येषु येषु च भावेषु भक्त्या त्वां परमर्षयः । उपासीनाः प्रपद्यन्ते संसिद्धिं तद् वदस्व मे ॥३॥

ज्या ज्या तुझ्या विभूती । पूर्वीं उपासिल्या संतीं । दृढ भावें करोनियां भक्ती । तुझी स्वरूपप्राप्ती पावलें ॥९१॥ त्या सकळ तुझ्या विभूती । कवण स्थिती कवण व्यक्ती । कवण भाव कवण गती । हें निश्चितीं मज सांगा ॥९२॥ म्हणसी सकळ भूतांप्रती । तूंचि वोळख माझ्या विभूती । तरी ते तुझी अतर्क्य स्थिती । न कळे श्रीपती आमुचेनि ॥९३॥


एकनाथी भागवत - श्लोक ४ था

गूढश्चरसि भूतात्मा भूतानां भूतभावन । न त्वां पश्यन्ति भूतानि पश्यन्तं मोहितानि ते ॥४॥

सर्व भूतांचा हृदयस्थ । हृदयीं असोनि गुप्त । त्या तूतें भूतें समस्त । न देखत देहभ्रमें ॥९४॥ त्या देहभ्रमासी देवराया । मूळकारण तुझी माया । तेथें तुझी कृपा झालिया । माया जाय विलया गुणेंसीं ॥९५॥ मग सर्वत्र सर्वां ठायीं । सर्व भूतीं सबाह्य देहीं । तुझें स्वरूप ठायीं ठायीं । प्रकटें पाहीं सदोदित ॥९६॥ एवढें तुझे कृपेचे करणें । ते कृपा लाहिजे कवणें गुणें । यालागीं तुझ्या विभूती उपासणें । तुझे कृपेकारणें गोविंदा ॥९७॥ याचिलागी विभूतींची स्थिती । समूळ सांगावी मजप्रती । तेचि अर्थींची विनंती । पुढतपुढती करीतसें ॥९८॥


एकनाथी भागवत - श्लोक ५ वा

याः काश्च भूमौ दिवि वै रसायां विभूतयो दिक्षु महाविभूते । ता मह्यमाख्याह्यनुभावितास्ते नमामि ते तीर्थपदाङ्‌घ्रिपद्मम् ॥५॥

स्वर्गमृत्युपाताळ स्थिती । विस्तारल्या दशदिशांप्रती । त्या समस्तही तुझ्या विभूती । सांग श्रीपती मजलागीं ॥९९॥ ऐसा करोनियां प्रश्न । उद्धवें घातले लोटांगण । सकळ तीर्थांचे जन्मस्थान । मस्तकीं श्रीचरण वंदिले ॥१००॥ ऐकोनी उद्धवाच्या प्रश्नासी । परम संतोषे हृषीकेशी । पुरस्करोनि उद्धवासी । काय त्यासी बोलिला ॥१॥ जो वैरिगजयूथ पंचानन । कोदंडदीक्षाप्रतापगहन । सखा जिवलग पढियंता जाण । जीवप्राण जो माझा ॥२॥ ज्याचें रथींचे मी धुरेवरी । ज्याच्या अश्वांचे वाग्दोरे धरीं । जो उपदेशिला कुरुक्षेत्रीं । उभय सेनेमाझारी रणांगणीं ॥३॥ तो नरावतार अर्जुन । त्याच्याऐसा तुझा हा प्रश्न । ऐसे उद्धवासी संतोषोन । काय श्रीकृष्ण बोलिला ॥४॥


एकनाथी भागवत - श्लोक ६ वा

श्रीभगवानुवाच । एवमेतदहं पृष्टः प्रश्नं प्रश्नविदां वर । युयुत्सुना विनशने सपत्नैरर्जुनेन वै ॥६॥

हाचि प्रश्न मजकारणें । पूर्वीं पुशिला अर्जुनें । जेव्हां तिरस्कारूनि दुर्योधनें । युद्ध सत्राणें मांडिलें ॥५॥ अरिनिर्दळणीं प्रतापपूर्ण । धीर वीर आणि सज्ञान । प्रश्नकर्त्यामाजीं विचक्षण । माझा आत्मा जाण अर्जुन ॥६॥ तेणें अर्जुनें कुरुक्षेत्रीं । युद्धसमयीं महामारी । स्वजनवधाचें भय भारी । हाचि प्रश्न करी मज तेव्हां ॥७॥


एकनाथी भागवत - श्लोक ७ व ८ वा

ज्ञात्वा ज्ञातिवधं गह्यं अधर्मं राज्यहेतुकम् । ततो निवृत्तो हन्ताहं हतोऽयमिति लौकिकः ॥७॥

स तदा पुरुषव्याघ्रो युक्त्या मे प्रतिबोधितः । अभ्यभाषत मामेवं यथा त्वं रणमूर्धनि ॥८॥

केवळ राज्यलोभाकारणें । गुरुगोत्र पितृव्य वधणें । हें अतिनिंद्य मजकारणें । नाहीं झुंझणें प्राणांती ॥८॥ लौकिक धर्मप्रवृत्ती । मी मारिता हे मरती । हे महामोहाची भ्रांती । उपजली चित्तीं अर्जुना ॥९॥ राज्य भोगाचें धरोनि वर्म । ज्ञातिवधाचें निंद्य कर्म । हा केवळ मज अधर्म । धर्माचा स्वधर्म बुडेल ॥११०॥ ज्यांचें तीर्थ घ्यावें प्रतिदिनीं । जे पूजावे वरासनीं । ते खोंचूनि तिखट बाणीं । भोगावी अवनी स्वगोत्र रुधिरें ॥११॥ स्वगोत्र रुधिराचा पूर । पृथ्वीवरी वाहेल दुस्तर । तेणें आम्हीं होऊं राज्यधर । हें कर्म घोर न करवें मज ॥१२॥ कुळीं सुपुत्र वांछिले जिंही । बाण खोंचावे त्यांचे हृदयीं । यापरी पूर्वजांसी पाहीं । झालो उतराई मानावें ॥१३॥ ज्यांचे करावें श्राद्धतर्पण । त्यांचे बाणवरी घ्यावे प्राण । भलें पूर्वजां झालों उत्तीर्ण । आली नागवण निजधर्मा ॥१४॥ संमत श्लोक ॥ हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम् ॥ युद्धीं निमालिया स्वर्गगती । जयो आलिया राज्यप्राप्ती । दोन्ही नश्वरें गा श्रीपती । कोणे हितार्थी झुंझावें ॥१५॥ ऐसेनि अनुतापें जाण । सांडूनिया धनुष्यबाण । शोकाकुलित अर्जुन । म्लानवदन रणरंगीं ॥१६॥ ते काळीं म्यांची जाण । तो महावीरपंचानन । नाना युक्तिं केलें समाधान । तेंही लक्षण अवधारी ॥१७॥ अर्जुना देह तितुका नश्वर । मळमूत्रांचे कोठार । करितां नाना उपचार । मरणतत्पर समीप ॥१८॥ जीव निज नित्य निर्मळ । अज अव्यय अचळ । अच्छेद्य अभेद्य अमळ । अचंचळ निजांगे ॥१९॥ अर्जुना ऐक साचें । तुझेनि प्रयत्नें न वांचे । जीव तुझेनि मारिला न वचे । पातक हत्येचें अहंभावे ॥१२०॥ हो कां त्वां असते केले । तरी तुझेनि जातें मारिलें । मी मारिता येणे बोले । तुजसि गोंविलें अभिमानें ॥२१॥ जो देहाचा निर्माणकर्ता । तोचि तयाचा संहर्ता । तूं करण्यामारण्या परता । व्यर्थ अहंता कां घेसी ॥२२॥ जरी हे अहंता तूं न सांडिशी । तरी सकळ हत्येचिया राशी । साचचि आल्या तुजपाशी । दोषी झालासी अर्जुना ॥२३॥ ऐक पां बापा पार्था । देहादि कर्मांची अहंता । जो घे आपुले माथां । तो दोषी सर्वथा तिहीं लोकीं ॥२४॥ हो कां स्वधर्मचि तूं पुसशी । तरी ऐक क्षत्रियाच्या क्षात्रधर्मासी । समरांगणीं पित्यापुत्रांसी । वधिता क्षत्रियासी दोष नाहीं ॥२५॥ युद्ध म्हणजे स्वधर्मतीर्थ । समरांगणीं निमे तो नित्यमुक्त । जें तुज निजभाग्यें प्राप्त । तें तूं अहित मानिसी ॥२६॥ कर्ता दोष अहंतेच्या माथां । ते जो नातळे देहअनहंता । तोचि कर्म करूनि अकर्ता । भोगूनि अभोक्ता तोचि एक ॥२७॥ तोचि संगामाजीं निःसंग । अवघें जग तो एकला सांग । जो निरभिमानी अव्यंग । तो सौरा चांग समरंगीं ॥२८॥ अर्जुना अभिमान सांडितां । तूं माझी पावशी समसाम्यता । तेव्हां सकळ पापाची वार्ता । तुज सर्वथा स्पर्शेना ॥२९॥ म्हणशी केवीं जाय अहंता । तरी मज लक्षूनि तत्त्वतां । स्वधर्मकर्मातें आचरितां । चित्तशोधकता तेणें होय ॥३०॥ निर्मळत्व आलिया चित्ता । तो लागे माझिया भक्तिपंथा । भजनें माझिया समरसता । माझिया निजभक्तां तत्काळ ॥३१॥ अर्जुना सांडावया अभिमान । तूं नाइकसी माझें वचन । तरी जन्ममरणांचे भूषण । सकळ दोष जाण भोगासी ॥३२॥ तूं नित्यमुक्त अज अव्ययो । हा बुडेल तुझा सद्भा वो । मग जन्ममरणांचा निर्वाहो । अविश्रम पहा हो भोगिसी ॥३३॥ यालागीं करणें न करणें दोन्ही । प्रकृतीचे माथां ठेवूनी । तूं कायावाचामनींहूनी । मजलागुनी शरण रिघें ॥३४॥ यापरी गा तत्त्वतां । मज सद्भानवें शरण येतां । तुज सकळ कर्मांची वार्ता । मी सर्वथा शिवों नेदी ॥३५॥ यालागीं गा कोदंडपाणी । मरतें मारितें सांडूनि दोन्ही । सौरा होयीं रणांगणीं । मी तुजलागोनी उद्धरीन ॥३६॥ तूं एक येथें कर्म करिता । मी एक तूतें उद्धरिता । ऐसे भिन्नत्व गा पार्था । माझ्या शरणागता असेना ॥३७॥ मज अनंता शरण येणें । आणि जीवत्वें वेगळे उरणें । तें गुळदगडा ऐसें जिणें । अनन्यपणें नव्हे शरण ॥३८॥ सरिता सागरा शरण गेली । ते समुद्रचि होऊनि ठेली । पुढती परतावया मुकली । समरसिली सिंधुत्वें ॥३९॥ गंगा पावोनि सिंधुत्वासी । मागील यावा वंचीना तिसीं । तेवीं सबाह्य आत्मसमरसीं । शरण अहर्निशीं अखंडत्वें ॥१४०॥ दीप दावाग्नी भेटों गेला । तो तेव्हढाची होऊनि ठेला । तेवीं मजलागीं जो शरण आला । तो मीचि झाला अर्जुना ॥४१॥ पार्था परिस पा चिन्ह प्राप्ताचें । हें भूताकार मज अच्युताचें । ऐसें सद्भासवें जो देखे साचें । त्यासी ब्रह्मसायुज्याचें साम्राज्य लाभे ॥४२॥ मज आत्मयाचे निजस्थितीं । संसार मुळीं मुख्य भ्रांती । तेथ मारिता मी हे मरती । कोणें हे युक्ती मानावी ॥४३॥ मृगजळ जेथें नसे । तेथें तव कोरडेंचि असे । मा जे ठायीं आभासे । तेथ तर्हीर असे वोल्हांशु कायी ॥४४॥ तेवीं संसाराचे रूप नाम । ठेविती तेथें निखळ ब्रह्म । हाचि ज्याचा स्वभाव परम । तें चालतें ब्रह्म वर्ततां देहीं ॥४५॥ देहा जडत्वें न बाधी कर्म । आत्मा नातळे धर्माधर्म । हें ज्यासी कळलें वर्म । तें चालतें ब्रह्म वर्ततां देहीं ॥४६॥ देही वर्ततां तो विदेह । विदेह तेंच त्याचें देह । हें माझें परम गुह्य । अर्जुनासी पाहीं सांगितलें ॥४७॥ यापरी म्यां नानायुक्तीं । युद्धीं बोधिला सुभद्रापती । तेणेंही मज करोनि विनंती । पुशिल्या विभूती तुझ्याऐशा ॥४८॥ ज्या सांगितल्या अर्जुनासी । त्याचि मी सांगेन तुजपाशीं । ऐसें पुरस्करूनि उद्धवासी । निजविभूति त्यासी सांगत ॥४९॥ उद्धवा ज्या पुशिल्या विभूती । त्या माझ्या मज न गणवती । मी जगदात्मा त्रिजगतीं । संख्यासंस्थिती गणी कोण ॥१५०॥


एकनाथी भागवत - श्लोक ९ वा

अहमात्मोद्धवामीषां भूतानां सुहृदीश्वरः । अहं सर्वाणि भूतानि तेषां स्थित्युद्भरवाप्ययः ॥९॥

मी हृदयस्थ समर्थ हृदयीं । त्या मज जीवू मागें जें कांही । त्यासी विमुख मी नव्हें कहीं । पुरवीं सर्वही ईश्वरत्वें ॥५१॥ जीवू अतिअडलेपणें । जें मागे मजकरणें । तें मी त्यासी अलोट देणें । यालागी म्हणणें ईश्वर मज ॥५२॥ मी आत्मा असें हृदयीं । हा विश्वास जयांसी नाहीं । ते मृगजळाचे डोहीं । नावेसकट पाहीं बुडबुडों गेले ॥५४॥ माझे प्राप्तीचे मुख्य वर्म । मी हृदयीं असें परब्रह्म । हेंचि ज्याचे नित्य कर्म । तो विभूती मरम पैं माझी ॥५५॥ मी सर्वभूतहृदयवासी । सुहृद सोयरा मी सर्वांसी । नियंता ईश्वरसत्तेसी । नियामक भूतांसी मी एक ॥५६॥ एवं सर्व भूतांचा मी स्वामी । इयें सर्व भूतें तेंही मी । भूतांचे जन्मभूमीची मी भूमी । उत्पत्त्यादि कर्मीं मी कर्ता ॥५७॥ कृषीवळाचियेपरी । मी सृजीं पाळीं संहारीं । ब्रह्मा विष्णु त्रिपुरारी । गुणावतारी मी एक ॥५८॥ कर्माची जे क्रियाशक्ती । ते मी म्हणे श्रीपती । हे साम्यें बोलिली स्थिती । विशेष विभूती त्या ऐक ॥५९॥


एकनाथी भागवत - श्लोक १० वा

अहं गतिर्गतिमतां कालः कलयतामहम् । गुणानां चाप्यहं साम्यं गुणिन्यौत्पत्तिको गुणः ॥१०॥

गतिमंतांमाजी जे गती । ते मी म्हणे लक्ष्मीपती । गतीसी माझेनि निजगती । जाण निश्चितीं उद्धवा ॥१६०॥ चेतनेनें सर्वां गती । ते चेतना चैतन्याची शक्ती । चेतनेस्तव इंद्रियप्रवृत्ती । एवं गतीची गती मी एक ॥६१॥ सकळ गतींची परम गती । प्राण्यासी मुख्यत्वें मुक्ती । ते मुक्तीसी मजमाजीं मुक्ती । एवं गतीची गती मी एक ॥६२॥ सुरनरां आकळिता । ते जाण काळाची सत्ता । त्या काळाचा मी आकळिता । जाण तत्त्वतां मी महाकाळू ॥६३॥ तेहीं गुणांची समानावस्था । ते मी जाण गा निजभक्ता । अकृत्रिम गुण जो धर्मता । तो मी तत्त्वतां म्हणे हरी ॥६४॥


एकनाथी भागवत - श्लोक ११ वा

गुणिनामप्यहं सूत्रं महतां च महानहम् । सूक्ष्माणामप्यहं जीवो दुर्जयानामहं मनः ॥११॥

गुणी म्हणावया हेंचि कारण । ज्या मजमाजीं सूत्र क्रियाप्रधान । मायेचें प्रथमकार्य जाण । तो गुणी मी संपूर्ण उद्धवा ॥६५॥ जगी आकाश थोर पाहीं । तें मजमाजीं खेळे लपंडायी । माझ्या महत्तत्त्वाची नवायी । मजही निश्चयीं नेमेना ॥६६॥ महत्तत्त्व जे ज्ञानप्रधान । तें मी म्हणे नारायण । सूक्ष्मामाजीं जीवूं आपण । ब्रह्मादिकां जाण अतर्क्य ॥६७॥ दुर्जयांमाजीं मी मन । त्यासी जिंकावया जाण । मजवेगळी आंगवण । नाहीं संपूर्ण आणिकासी ॥६८॥ मज लक्षितां मन आकळे । मज विसरतां चौताळे । मन न धरवे वेदशास्त्रबळें । मन नाकडे मजवीण ॥६९॥ मन तेंचि मी आहें । मज चिंतितां तें विरोनि जाये । मज विसरतां तें पाहें । सैरा जाये सुनाट ॥१७०॥


एकनाथी भागवत - श्लोक १२ वा

हिरण्यगर्भो वेदानां मंत्राणां प्रणवस्त्रिवृत् । अक्षराणामकारोऽस्मि पदानि च्छन्दसामहम् ॥१२॥

वेद अध्यापक प्रसिद्ध । हिरण्यगर्भ मी म्हणे गोविंद । माझेनि जगीं अनुल्लंघ्य वेद । वेदवाद तोही मी ॥७१॥ ओंकारेवीण मंत्रश्रेणी । ते जाण बाळकाची कहाणी । मंत्रां ओंकार मी चक्रपाणी । सकळ मंत्र त्याचेनी पावन ॥७२॥ अकार उकार मकार । अर्धमात्रेसी उच्चार । या नांव 'त्रिविध ओंकार' । पावन मंत्र येणेंसीं ॥७३॥ अक्षरांच्या उच्चारासी । अकार लागला सर्वांसी । तो अकारू मी हृषीकेशी । जाण निश्चयेसी उद्धवा ॥७४॥ अक्षरीं अकार मी मुकुंदू । छंदामाजीं गायत्री छंदू । तो मी म्हणे गोविंदू । यालागीं ब्रह्मवंदू सेविती ॥७५॥ छंदामाजीं गायत्री छंद । सकळ द्वंद्वामाजीं निर्द्वंद्व । तो मी म्हणे गोविंद । द्विजवृंद येणेंचि मज ॥७६॥


एकनाथी भागवत - श्लोक १३ वा

इन्द्रोऽहं सर्वदेवानां वसूनामस्मि हव्यवाट् । आदित्यानामहं विष्णू रुद्राणां नीललोहितः ॥१३॥

देवांमाजी मी इंद्र जाण । वसूंमाजीं मी हुताशन । आदित्यांमाजी मी वामन । रुद्रांमाजी जाण मी नीललोहितू ॥७७॥


एकनाथी भागवत - श्लोक १४ वा

ब्रह्मर्षीणां भृगुरहं राजर्षीणामहं मनुः । देवर्षीणां नारदोऽहं हविर्धान्यस्मि धेनुषु ॥१४॥

शापूनि ब्रह्म अपूज्य केला । शिवाचा नैवेद्य त्यागविला । विष्णू हृदयीं लाता हाणितला । भृगु वाखाणिला श्रीवत्सें ॥७८॥ ब्रह्मऋषींमाजीं संपन्न । भृगु तो मी म्हणे श्रीकृष्ण । मनुस्वरूपें मी आपण । राजर्षि जाण मुख्यत्वें ॥७९॥ देवर्षीमाजीं मुनि नारद । तोही मी म्हणे गोविंद । कामधेनु अतिशुद्ध । स्वरूप प्रसिद्ध तें माझें ॥१८०॥


एकनाथी भागवत - श्लोक १५ वा

सिद्धेश्वराणां कपिलः सुपर्णोऽहं पतत्रिणाम् । प्रजापतीनां दक्षोऽहं पितॄणामहमर्यमा ॥१५॥

सिद्धांमाजीं कपिल मुनीश्वर । तो मी म्हणे सारंगधर । पक्ष्यांमाजीं खगेश्वर । तो मी श्रीधर गरुडरूपें ॥८१॥ प्रजापतींमाजी मुख्य । कृष्ण म्हणे तो मी दक्ष । पितृगणांमाजीं अध्यक्ष । अर्यमा प्रत्यक्ष स्वरूप माझे ॥८२॥


एकनाथी भागवत - श्लोक १६ वा

मां विद्ध्युद्धव दैत्यानां प्रह्लादमसुरेश्वरम् । सोमं नक्षत्रौषधीनां धनेशं यक्षरक्षसाम् ॥१६॥

भक्तिप्रतापें अतिअगाध । तो दैत्यांमाजीं मी प्रह्लाद । नक्षत्रऔतषधींचा जो स्वामी चंद्र । तें म्हणे गोविंद स्वरूप माझे ॥८३॥ यक्षराक्षसांमाजीं थोर । माझें स्वरूप तो कुबेर । ज्याचे विश्वासें निरंतर । असे भांडार हरीचें ॥८४॥


एकनाथी भागवत - श्लोक १७ वा

ऐरावतं गजेन्द्राणां यादसां वरुणं प्रभुम् । तपतां द्युमतां सूर्यं मनुष्याणां च भूपतिम् ॥१७॥

ऐरावत जो गजेंद्र । तो मी म्हणे यादवेंद्र । वरुण जो जळचरेंद्र । तें म्हणे उपेंद्र स्वरूप माझे ॥८५॥ स्वप्रभा प्रकाशनिष्ठ । जग प्रकाशूनि उद्भ ट । तो सूर्य मी म्हणे वैकुंठ । अतितिखट निजतेजें ॥८६॥ मनुष्यांमाजीं जो भोगी क्षिती । सर्व भूती ज्याच्या हातीं । ज्यातें बोलती भूपती । ते माझी विभूती हरि म्हणे ॥८७॥


एकनाथी भागवत - श्लोक १८ व १९ वा

उच्चैःश्रवास्तुरङ्गाणां धातूनामस्मि काञ्चनम् । यमः संयमतां चाहं सर्पाणामस्मि वासुकिः ॥१८॥

नागेन्द्राणामनन्तोऽहं मृगेन्द्रः शृङ्‌गिदंष्ट्रिणाम् । आश्रमाणामहं तुर्यो वर्णानां प्रथमोऽनघ ॥१९॥ उच्चैःश्रवा तुरंगजाती । तो मी म्हणे कमळापती । सुवर्ण धातु माझी विभूती । जीलागीं लुलाती तिनी लोक ॥८८॥ दंडधारित्यांमाजी गहन । यमधर्म मी आपण । सर्पामाजी जाण । मी नारायाण वासुकी ॥८९॥ अनंत या नामातें जो धरी । तो नाग मी म्हणे श्रीहरी । नखदंष्ट्राशृंगधारी । त्यांमाजीं केसरी म्हणे देवो ॥१९०॥ चतुर्थाश्रम संन्यास जाण । तो मी म्हणे नारायण । वर्णाग्रज जे ब्राह्मण । ते मी ब्रह्म जाणे बोलतें ॥९१॥


एकनाथी भागवत - श्लोक २० वा

तीर्थानां स्रोतसां गङ्गा समुद्रः सरसामहम् । आयुधानां धनुरहं त्रिपुरघ्नो धनुष्मताम् ॥२०॥

तीर्थसरितांमाजीं गांग । तें मी म्हणे श्रीरंग । तडागीं श्रेष्ठ तडाग । समुद्र सांग मी म्हणे हरी ॥९२॥ आयुधीं धनुष्य हतियेर । तें मी म्हणे सारंगधर । त्रिपुरारि मी धनुर्धर । जेणें केला संहार त्रिपुराचा ॥९३॥


एकनाथी भागवत - श्लोक २१ वा

धिष्ण्यानामस्म्यहं मेरुर्गहनानां हिमालयः । वनस्पतीनामश्वत्थ ओषधीनामहं यवः ॥२१॥

त्रिभुवन निवासस्थान महामेरू । तो मी म्हणे धराधरू । दुर्गमत्वें अतिदुर्धरू । तो मी हिमगिरिवरू म्हणे कृष्ण ॥९४॥ वृक्षांमाजीं जो अश्वत्थू । तो मी म्हणे श्रीकृष्णनाथू । ओषधींमाजीं अतिविख्यातू । यव मी अच्युतू म्हणे वेगें ॥९५॥


एकनाथी भागवत - श्लोक २२ वा

पुरोधसां वसिष्ठोऽहं ब्रह्मिष्ठानां बृहस्पतिः । स्कन्दोऽहं सर्वसेनान्यामग्रण्यां भगवानजः ॥२२॥

श्रीरामपौरोहित्यें श्रेष्ठ । देवो म्हणे तो मी वसिष्ठ । वेदवेत्त्यांमाजीं उद्भेट । सुरगुरु वरिष्ठ मी उद्धवा ॥९६॥ स्कंद सेनापतिशिरोमणी । तो मी म्हणे चक्रपाणी । स्वधर्मप्रवर्तकू अग्रगणी । वंद्य ब्राह्मणीं तो ब्रह्मा मी ॥९७॥


एकनाथी भागवत - श्लोक २३ वा

यज्ञानां ब्रह्मयज्ञोऽहं व्रतानामविहिंसनम् । वाय्वग्न्यर्काम्बुवागात्मा शुचीनामप्यहं शुचिः ॥२३॥

यज्ञांमाजीं ब्रह्मयज्ञ । तो मी म्हणे सर्वज्ञ । देवर्षिपितृभूतगण । आब्रह्म भुवन जेणें तृप्त ॥९८॥ जीवमात्रासी पैं जाणे । नेदावे दुःखवचन । व्रतांमाजीं जें अविहिंसन । ते मी श्रीकृष्ण स्वयें म्हणे ॥९९॥ एका वायूचेनि पवित्रपण । एक अग्नीस्तव पवित्र जाण । एकातें पवित्र करी जीवन । एक पावन वचनमात्रें ॥२००॥ एक बुद्धिस्तव पवित्र जाण । या समस्तांमाजीं पवित्रपण । तें माझे स्वरूप म्हणे श्रीकृष्ण । पावना पावन मी एक ॥१॥ जग माझेनि नामें पुनीत । हें सर्वांचे संमत । त्या माझें स्वरूप जें येथ । परम पुनीत पुनीतां ॥२॥


एकनाथी भागवत - श्लोक २४ वा

योगानामात्मसंरोधो मन्त्रोऽस्मि विजिगीषताम् । आन्वीक्षिकी कौशलानां विकल्पः ख्यातिवादिनाम् ॥२४॥

विविध योगांमाजीं आत्मरोधू । तो योग मी म्हणे गोविंदू । जेणें प्रकटे परमानंदू । समाधिबोधू साधकां ॥३॥ मुख्यत्वें विवेक धरोनि हातीं । जो न्यायतां विजयो वांछी चित्तीं । ते नीतीची नीति मी श्रीपती । जाण निश्चितीं उद्धवा ॥४॥ आत्मानात्मविवेक केवळ । ते आन्वीक्षिकी विद्या कुशळ । ते विद्या म्हणे मी गोपाळ । विवेक प्रबळ माझेनी ॥५॥ वादांमाजी वाद अनंत । जेथ विकल्पा नाही अंत । तो वादू मी म्हणे अच्युत । ऐक निश्चित विकल्प ॥६॥ आख्याती अन्यथाख्याती । शून्यख्याती सत्ख्यापती । अनिर्वचनीय जे ख्याती । तो वादू निश्चितीं मी उद्धवा ॥७॥


एकनाथी भागवत - श्लोक २५ वा

स्त्रीणां तु शतरूपाहं पुंसां स्वायम्भुवो मनुः । नारायणो मुनीनां च कुमारो ब्रह्मचारिणाम् ॥२५॥

शतरूपा आणि मनू । इयें दोनी मी म्हणे जनार्दनू । मुनींमाजीं मी नारायणू । बदरी सेवुनू सदा असे ॥८॥ नैष्ठिक ब्रह्मचर्यधर । माझें स्वरूप सनत्कुमार । स्वयें सांगताहे श्रीधर । जाण साचार उद्धवा ॥९॥


एकनाथी भागवत - श्लोक २६ वा

धर्माणामस्मि सन्यासः क्षेमाणामबहिर्मतिः । गुह्यानां सूनृतं मौनं मिथुनानामजस्त्वहम् ॥२६॥

भूतां अभयदान उपक्रमू । सर्वां भूतीं मी आत्मारामू । हा संन्यासाचा मुख्य धर्मू । तो धर्म पुरुषोत्तमू स्वयें मी म्हणे ॥२१०॥ भूतांसी काया वाचा मनें । दुःख नेदूनि सुख देणें । या नांव संन्यासधर्म म्हणणें । तो धर्म मी म्हणे गोविंद ॥११॥ अंतरीं शुद्ध नाहीं बोध । दांत चावोनि साहतां द्वंद्व । ते क्षमा नोहे शुद्ध । ऐके विनोद क्षमेचा ॥१२॥ अंतरीं ठसावलें परब्रह्म । बाह्य सर्वा भूतीं जाहला सम । ते क्षमा मी म्हणे पुरुषोत्तम । द्वंद्वाराम बाधिना ॥१३॥ असत्य पापी सकळ सृष्टीं । असत्यांमाजीं पापकोटी । असत्याची खोटी गोठी । जो तो पोटीं सांडीना । ॥१४॥ उभय लौकिकीं खोटेपणें । असत्यबहिर्मुख नाणें । तें मनींहूनि जेणें सांडणें । तो म्यां श्रीकृष्ण वंदिजे ॥१५॥ ते गुह्यामाजीं अतिगुह्य जाण । सत्य वाचा कां मनींहूनि मौन । तें मी म्हणे मधुसूदन । सत्य प्रिय जाण निजगुह्य ॥१६॥ स्रष्ट्याचे देह द्विधा जाण । मनू शतरूपा मूळमिथुन । तें मी म्हणे नारायण । मनुष्य सृजन सद्भा वें ॥१७॥


एकनाथी भागवत - श्लोक २७ वा

संवत्सरोऽस्म्यनिमिषाम् ऋतूनां मधुमाधवौ । मासानां मार्गशीर्षोऽहं नक्षत्राणां तथाभिजित् ॥२७॥

सावधानेंअविकळ । न चुकतां पळें पळ । संवत्सरात्मक जो काळ । तो मी गोपाळ स्वयें म्हणे ॥१८॥ त्रसरेणूपासोनि जाण । लवनिमिषदिनमान । संवत्सरवरी सावधान । गणीं मी संकर्षण काळगणना ॥१९॥ मधुमाधव वसंतयुक्तू । कृष्ण म्हणे तो मी ऋतू । मार्गशीर्ष मी मासांआंतू । धान्यपाकयुक्तू आल्हादी ॥२२०॥ गणितां न ये पंचांगांत । नक्षत्रीं असोनि सदा गुप्त । अव्यक्त परी सज्ञाना प्राप्त । तें मी अभिजित् म्हणे हरी ॥२१॥


एकनाथी भागवत - श्लोक २८ वा

अहं युगानां च कृतं धीराणां देवलोऽसितः । द्वैपायनोऽस्मि व्यासानां कवीनां काव्य आत्मवान् ॥२८॥

युगांमाजीं कृतयुग । तें मी म्हणे श्रीरंग । जेथ संपूर्ण धर्म सांग । अधर्मभाग असेना ॥२२॥ निजधैर्य अतिअद्भु।त । असित देवल धैर्यवंत । तो मी म्हणे गा अच्युत । जाण निश्चित उद्धवां ॥२३॥ वेदविभागी राजहंस । जो कां द्वैपायन व्यास । तो मी म्हणे हृषीकेश । निवडूनि द्विजांस दीधले वेद ॥२४॥ कवि त्यांमाजीं परमार्थज्ञाता । उशना कवी जाण तत्त्वतां । तो मी म्हणे रमाभर्ता । निजात्मकविता मी शुक्र ॥२५॥


एकनाथी भागवत - श्लोक २९ वा

वासुदेवो भगवतां त्वं तु भागवतेष्वहम् । किंपुरुषाणां हनुमान् विद्याध्राणां सुदर्शनः ॥२९॥

षड्गुरणभाग्यें भाग्यवंत । पूर्णांशे जो भगवंत । वासुदेवनामें विख्यात । जाण तो मी येथे श्रीकृष्ण ॥२६॥ भागवतांमाजी अतिगहन । उद्धवा तूं तो मीचि जाण । ऐसें बोलतां श्रीकृष्ण । उद्धवें श्रीचरण वंदिले ॥२७॥ उद्धवें करितां नमन । कृष्णें दिधले आलिंगन । आनंदे कोंदलें त्रिभुवन । स्वानंदघन तुष्टला ॥२८॥ उद्धव आणि श्रीकृष्ण । दोनी एक जाहले जाण । 'मी तो तूं' जें बोलिला श्रीकृष्ण । तें उद्धवासी आपण सत्यत्वें दावी ॥२९॥ दोघांचे मोडलें दोनीपण । उद्धव जाहला श्रीकृष्ण । कृष्णाअंगी उद्धवपण । संपूर्ण जाण बाणलें ॥२३०॥ तेणें उद्धव झाला विस्मित । नावेक श्लाघला आपणांत । मीच कृष्णाचा प्रिय भक्त । हें जाणोनि अनंत बोलिला ॥३१॥ वानरांमाजी हनुमंत । तो मी म्हणे कृष्णनाथ । तंव उद्धव जाहला गर्वहत । लाजला पोटांत ते काळीं ॥३२॥ जेथ वानर आणि वनचर । मजहूनि कृष्णाचे प्रियकर । न कळे हरिभक्तांचा पार । मी कोण किंकर ते ठायीं ॥३३॥ ऐसें विचारूनि चित्तां । सवेंचि नमिलें कृष्णनाथा । तुझ्या विभूति अचुंबिता । कृपेनें तत्त्वतां मज सांग ॥३४॥ तंव हांसोनि श्रीधर । काय बोलिला उत्तर । सुदर्शन जो विद्याधर । तो विभूति साचार पैं माझी ॥३५॥


एकनाथी भागवत - श्लोक ३० वा

रत्नाीनां पद्मरागोऽस्मि पद्मकोशः सुपेशसाम् । कुशोऽस्मि दर्भजातीनां गव्यमाज्यं हविःष्वहम् ॥३०॥

रत्नांमाजी जो पद्मराग । तो मी म्हणे श्रीरंग । मनोहरांमाजी अव्यंग । हरि म्हणे सांग पद्मकळा तो मी ॥३६॥ दशदर्भांमाझारीं । कुश तो मी म्हणे श्रीहरी । सकळ हविषांच्या शिरीं । गोघृत श्रीहरि स्वयें मी म्हणे ॥३७॥


एकनाथी भागवत - श्लोक ३१ वा

व्यवसायिनामहं लक्ष्मीः कितवानां छलग्रहः । तितिक्षास्मि तितिक्षूणां सत्त्वं सत्त्ववतामहम् ॥३१॥

व्यवसायाचे व्यवस्थिती । दानयुक्त अतिसंपत्ती । ते लक्ष्मी मी म्हणे श्रीपती । जाण निश्चिती उद्धवा ॥३८॥ कपटाचिये कपटगती । अगम्य जे छळणस्थिती । तो मी कृष्ण मायिकमूर्ती । अतर्क्य युक्ती छळणाची ॥३९॥ ब्रह्माचे अंगी निजजीविता । जीवासी ब्रह्मसायुज्यता । त्या कपटाचा मीचि कर्ता । देवांदेवतां अतर्क्य ॥२४०॥ आम्ही मायानियंते म्हणविती । तो शिवू ठकिला मोहिनीप्रती । ब्रह्मा ठकिला वत्सहरणार्थी । ठकडा निश्चितीं मी एकू ॥४१॥ सहनशीळीं सहनशक्ती । ते मी म्हणे कमळापती । सात्त्विकांची निजसत्त्ववृत्ती । ते मी श्रीपती स्वयें म्हणे ॥४२॥


एकनाथी भागवत - श्लोक ३२ वा

ओजः सहो बलवतां कर्माहं विद्धि सात्वताम् । सात्वतां नवमूर्तीनामादिमूर्तिरहं परा ॥३२॥

बळवंतांच्या ठायीं प्रबळ । मनोबळ शरीरबळ । धैर्यबळ तें मी गोपाळ । जेणें अळुमाळ डंडळीना ॥४३॥ भक्तांच्या ठायीं भजनकर्म । जेणें माझें अनिवार प्रेम । तें कर्म म्हणे मी पुरुषोत्तम । भक्तकामनिर्दळणू ॥४४॥ नवव्यूह अर्चनस्थिती । सात्त्वतां ज्या नवमूर्ती । त्यांत वासुदेव प्रथमस्थिती । ऐक व्युत्पत्ती नवांची ॥४५॥ वासुदेव संकर्षण । अनिरुद्ध आणि प्रद्युम्न । हयग्रीव नारायण । वराह वामन नरसिंह ॥४६॥ हे नवव्यूहांची उत्पत्ती । यांमाजी मी प्रथम मूर्ती । येर आठही माझ्या विभूती । जाण निश्चितीं उद्धवा ॥४७॥ हयग्रीव वेदमूर्ती । तेथें श्रीव्यासें करूनि भक्ती । वेदव्यासपदप्राप्ती । हे केली ख्याती तिहीं लोकीं ॥४८॥ नारायण निजमूर्ती । स्रष्ट्यानें करूनि त्याची भक्ती । चतुःश्लोकी ज्ञानस्थिती । पावोन निश्चितीं ब्रह्मत्वा आला ॥४९॥ श्वेतवराह महामूर्ती । धरेनें केली पूर्ण भक्ती । तीस उद्धरूनि कृपामूर्ती । अभिनव शांती अर्पिली ॥२५०॥ माझी निजमूर्ती वामन । देवीं करूनि पूर्ण भजन । त्यांच्या छळें बळी बांधोन । देवांचा सन्मान स्वाधिकार केला ॥५१॥ नरहरि दिव्यमूर्ती । प्रल्हादें करूनि अनन्यभक्ती । मी सर्वात्मा सर्वांभूतीं । हे लोकप्रतीती विश्वासिली जेणें ॥५२॥ संकर्षण श्रेष्ठ मूर्ती । ब्रह्माज्ञा रैवतें केली भक्ती । अर्पूनियां रेवती । स्वानंदस्थितीं निवाला ॥५३॥ प्रद्युम्न काममूर्ती । सकाम कामुकीं करूनियां भक्ती । जे जे काम वांछिती । ते ते निश्चितीं तो पुरवी ॥५४॥ अनिरुद्ध माझा निजसखा । शिवाज्ञा भक्ती केली उखा । बाणासुर तारिला देखा । साह्य चित्ररेखा नारदाज्ञा ॥५५॥ पूर्णांशे ब्रह्मस्थिती । वासुदेव मी आदिमूर्ती । लीलेनें तारिलें नेणों किती । तेथील निजभक्ती उद्धवार्जुनीं नांदे ॥५६॥ नव भक्ति नव मूर्ती । तेथील भक्तीची स्थिती । उद्धवा म्यां तुजप्रती । यथार्थ गती सांगीतली ॥५७॥


एकनाथी भागवत - श्लोक ३३ वा

विश्वावसुः पूर्वचित्तिर्गन्धर्वाप्सरसामहम् । भूधराणामहं स्थैर्यं गन्धमात्रमहं भुवः ॥३३॥

ज्याचें गायन अतिअपूर्व । जो विश्वावसु गंधर्व । तो मी म्हणे माधव । ऐके उद्धव सावध ॥५८॥ नृत्य करूनि मनोहरा । सबाह्य सद्भा वें सुंदरा । पूर्वचित्ती जे अप्सरा । ते मी म्हणे नोवरा भीमकीचा ॥५९॥ पर्वतांमाजीं जें 'स्थैर्यपण' । तें मी म्हणे नारायण । पृथ्वीमाजीं जो 'गंध' जाण । तो मी श्रीकृष्ण स्वयें म्हणे ॥२६०॥


एकनाथी भागवत - श्लोक ३४ वा

अपां रसश्च परमस्तेजिष्ठानां विभावसुः । प्रभा सूर्येन्दुताराणां शब्दोऽहं नभसः परः ॥३४॥

उदकाच्या ठायीं 'रस' सुरसु । तो मी म्हणे श्रीनिवासु । तेजिष्टांमाजीं जो 'प्रकाशु' । तो मी म्हणे निजतेजसु उद्धवा ॥६१॥ चंद्रसूर्यतारांच्या ठायीं । जें 'तेज' तें माझें पाहीं । 'अनाहतशब्द' तो मीही । जो गगनासीं कंहीं नातळे ॥६२॥


एकनाथी भागवत - श्लोक ३५ वा

ब्रह्मण्यानां बलिरहं वीराणामहमर्जुनः । भूतानां स्थितिरुत्पत्तिरहं वै प्रतिसङ्क्रमः ॥३५॥

ब्राह्मणभजनीं 'बळी'ची थोरी । तो मी कृष्ण म्हणे निर्धारीं । ब्राह्मणभजनप्रतापें करीं । मी बळीच्या द्वारीं द्वारपाळु ॥६३॥ नरावतारें अतिसंपन्न । पांडवांमाजी वीर 'अर्जुन' । तो मी म्हणे नारायण । जीवप्राण तो माझा ॥६४॥ भूतांची 'उत्पत्ति-स्थिती' । तो मी म्हणे श्रीपती । भूतांसी जे 'प्रळयगती' । तेही मी निश्चिती उद्धवा ॥६५॥


एकनाथी भागवत - श्लोक ३६ वा

गत्युक्त्युत्सर्गोपादानम् आनन्दस्पर्शलक्षणम् । आस्वादश्रुत्यवघ्राणम् अहं सर्वेन्द्रियेन्द्रियम् ॥३६॥

ज्ञान-कर्म उभय इंद्रियें । त्या इंद्रियांचे मी इंद्रिय पाहे । त्यांची क्रिया जे जे आहे । ते माझेनि होये अभिव्यक्त ॥६६॥ 'गति-ग्रहण-गमन' । 'उत्सर्ग' आणि 'मोहन' । 'दर्शन' 'स्पर्शन' ' घ्राण' । 'श्रवण' स्वादन' माझेनी । ६७॥ ते इंद्रक्रियेचे चलन । तिळभरी नव्हे मजवीण । ऐक त्याचेंही लक्षण । तुज मी संपूर्ण सांगेन ॥६८॥ मी मनाचेंही 'महामन' । नयनाचेंही 'नयन' । स्पर्शाचेंही 'स्पर्शन' । जिव्हेची जाण 'निजजिव्हा' ॥६९॥ मी घ्राणाचेंही निजघ्राण । श्रवणाचें 'आदिश्रवण' । ग्रहणाचें निज 'ग्रहण' । गतीची जाण मी 'गती' ॥२७०॥ मी आनंदाचा 'आनंदु' । मी बुद्धीचाही 'प्रबोधु' । सकळ इंद्रियांचा 'विषय स्वादु' । तो मी मुकुंदु उद्धवा ॥७१॥ मी वाचेची 'वाचा' सावकाश । मी परेचाही 'परेश' । सकळ इंद्रियांचा मी 'ईश' । यालागीं 'हृषीकेश' नांव माझें ॥७२॥


एकनाथी भागवत - श्लोक ३७ वा

पृथिवी वायुराकाश आपो ज्योतिरहं महान् । विकारः पुरुषोऽव्यक्तं रजः सत्त्वं तमः परम् ॥३७॥

तत्त्वसंख्या पंचवीस । त्रिगुण घालितां अठ्ठावीस । ऐक त्यांचाही विलास । सावकाश सांगेन ॥७३॥ अहं महतत्त्व पंचतन्मात्रा । हा स्थूल प्रकृतीचा उभारा । महाभूतेंद्रियें अकरा । हे षोडश विकारांची संख्या ॥७४॥ यांत मिळाल्या प्रकृति-पुरुष । तत्त्वसंख्या पंचवीस । प्रकृतीमाजीं गुणांचा वास । हा तत्त्वविलास तत्त्वांचा ॥७५॥ प्रकृति गुणविकार । तत्त्वसंख्या निर्धार । हा म्यां सांगितला जो विचार । तें परात्पर स्वरूप माझें ॥७६॥


एकनाथी भागवत - श्लोक ३८ वा

अहमेतत्प्रसङ्ख्यानं ज्ञानं तत्त्वविनिश्चयः । मयेश्वरेण जीवेन गुणेन गुणिना विना ।

सर्वात्मनापि सर्वेण न भावो विद्यते क्वचित् ॥३८॥ एवं 'पंचवीसतत्त्वसंख्यान' । तें अवघें मीचि जाण । या गणण्याचें गणितें 'ज्ञान' । तेंही मी आपण म्हणे देवो ॥७७॥ हेंही जाणतें जें लक्षण । तेंही देवो म्हणे मी आपण । मजवेगळें अणुप्रमाण । सर्वथा जाण असेना ॥७८॥ जीव आणि ईश्वर । गुणी आणि गुणावतार । क्षेत्रक्षेत्रज्ञ निर्धार । सर्वही साचार मीचि मी ॥७९॥ मजवेगळें अणुमात्र । उरलें नाहीं गा स्वतंत्र । मी सर्वात्मा सर्वत्र । केवळ 'चिन्मात्र' तेंही मी ॥२८०॥ मजवेगळें येथें कांही । उद्धवा गा उरले नाही । सर्वसाधारण पाहीं । सर्वां देहीं असें मी ॥८१॥ उद्धवा ऐसें म्हणसी कांही । 'संक्षेपु न करावा पाहीं' । विस्तारू न चले ये ठायीं । ऐक तेंही सांगेन ॥८२॥


एकनाथी भागवत - श्लोक ३९ वा

सङ्ख्यानं परमाणूनां कालेन क्रियते मया । न तथा मे विभूतीनां सृजतोऽण्डानि कोटिशः ॥३९॥

पृथ्वीचिया परमाणुकणा । मी काळरूपें करी गणना । परी विभूतिसंख्याप्रमाणा । माझेनिही जाण न गणवती ॥८३॥ म्यां सृजिलें अनंत ब्रह्मगोळ । ते मज गणवतीना सकळ । मा विभूति माझ्या केवळ । कोण तोंडाळ गणूं शके ॥८४॥ मी सर्वज्ञ श्रीनारायण । माझ्या विभूति मज जाण । गणावया नाहीं आंगवण । मा निरूपण केवीं सांगें ॥८५॥ मनुष्यांमाजी माझी विभूती । नांदतसे कोणे स्थितीं । ते खूण सांगेन मी तुजप्रती । ऐक निश्चितीं उद्धवा ॥८६॥


एकनाथी भागवत - श्लोक ४० वा

तेजः श्रीः कीर्तिरैश्वर्यं ह्रीस्त्यागः सौभगं भगः । वीर्यं तितिक्षा विज्ञानं यत्र यत्र स मेऽंशकः ॥४०॥

ज्याची प्रबळ प्रतापशक्ती । जेथ निरंतर लक्ष्मीची वस्ती । ज्यासी मर्यादा नाहीं संपत्ती । ज्याची उदारकीर्ति स्वधर्में ॥८७॥ ज्याच्या ऐश्वर्याची परमगती । आज्ञेवरी नेमी त्रिजगती । ज्याची अनावर दानस्थिती । जेथे भाग्याची उत्पत्ती नीच नवी दिसे ॥८८॥ ज्याचें सामर्थ्य अतिदुर्धर । कोणी बोलों शकेना उत्तर । ज्याचें सौभाग्य मनोहर । आल्हादकर जननयनां ॥८९॥ ज्यासी सहनशीळतेची वोज । ज्यासी निंद्य कर्माची लाज । जो विज्ञानाचें भोज । सहजेंचि निज नाचत ॥२९०॥ इयें लक्षणें जेथ वर्तती । ते जाण माझी विभूती । यांत एका लक्षणाची जेथ प्राप्ती । तेही विभूती पैं माझी ॥९१॥


एकनाथी भागवत - श्लोक ४१ वा

एतास्ते कीर्तिताः सर्वाः सङ्क्षेपेण विभूतयः । मनोविकारा एवैते यथा वाचाभिधीयते ॥४१॥

केवळ संकोच संक्षेपस्थितीं । म्यां सांगितल्या ज्या विभूति । त्या मनोविकारप्रतीती । जाण निश्चितीं उद्धवा ॥९२॥ साधकांचे साधनस्थिती । सत्य जाणाव्या माझ्या विभूती । विचारितां परमार्थगतीं । तरी या कल्पिती मनोजन्या ॥९३॥ माझें स्वरूप अद्वैत जाण । नाहीं नाम रूप गुण वर्ण । तेथ नाना विभूतिलक्षण । मिथ्या जाण वाचिक ॥९४॥


एकनाथी भागवत - श्लोक ४२ वा

वाचं यच्छ मनो यच्छ प्राणान् यच्छेद्रियाणि च । आत्मानमात्मना यच्छ न भूयः कल्पसेऽध्वने ॥४२॥

माझें स्वरूप नित्य निर्विकार । मनबुद्धिवाचा न कळे पार । तेथ बापुडीं इंद्रियें किंकर । प्राण निर्धार तें नेणे ॥९५॥ यालागीं शमदमांच्या अनुक्रमीं । मनबुद्धि इंद्रियें वाचा नेमीं । प्राण नेमूनि प्राणधर्मीं । आत्मारामासी पावसी ॥९६॥ मनबुद्ध्यादि इंद्रियनेम । करावयाचें न कळे वर्म । म्हणसी तरी तो अनुक्रम । ऐक सुगम सांगेन ॥९७॥ 'वाचा' नेमावी माझेनि नामें । 'मन' नेमावें ध्यानसंभ्रमें । 'प्राण' नेमावा प्राणायामें । 'इंद्रियें' दमें नेमावी ॥९८॥ 'बुद्धि' नेमावी आत्मविवेकें । 'जीव' नेमावा परमार्मसुखें । इतुकेन तूं होसी आवश्यकें । होसी कौतुकें मद्‌रूप ॥९९॥ मद्‌रूप झालियापाठीं । संसारचि न पडे दिठीं । खुंटल्या जन्ममरणांचिया गोठी । गमनागमन आटाआटी निमाली ॥३००॥ म्यां सांगितल्या नेमपरिपाटीं । हा नेम करणें नाहीं ज्याच्या पोटीं । तो भोगी दुःखांचिया कोटी । ऐक ते गोठी सांगेन ॥१॥


एकनाथी भागवत - श्लोक ४३ वा

यो वै वाङ्मतनसी सम्यगसंयच्छन् धिया यतिः । तस्य व्रतं तपो दानं स्रवत्यामघटाम्बुवत् ॥४३॥

म्यां सांगितल्या नेमाचे निगुतीं । मनबुद्धि इंद्रियपंक्ती । जो नेमीना साक्षेपस्थितीं । त्याचीं साधनें होती नश्वर ॥२॥ त्याचें व्रत तप दान । योग याग शब्दज्ञान । काचे भांड्यांतील जीवन । तैशीं जाण नासती ॥३॥ जेवीं राखेमाजीं केला होम । कां अशौचें आचरला कर्म । कुपात्रीं दानधर्म । तैसा संभ्रम साधनां ॥४॥ उखरीं पेरिलें बीज । कां गोळक आवंतिला द्विज । डोहळ्यांचे सोहळे भोगी वांझ । तैशी वोज साधनां ॥५॥ यापरी गा निश्चितीं । विध्युक्त नेम नाहीं चित्ती । त्याचीं साधनें वृथा जाती । हातोहातीं उद्धवा ॥६॥ यालागीं मनादि इंद्रियवृत्ती । नेमाव्या गा यथानिगुतीं । हेंचि उद्धवाप्रती । स्वयें श्रीपति सांगत ॥७॥


एकनाथी भागवत - श्लोक ४४ वा

तस्माद् वचो मनः प्राणान् नियच्छेन् मत्परायणः । मद्भाक्तियुक्तया बुद्ध्या ततः परिसमाप्यते ॥४४॥

इति श्रीमद्भाकगवते महापुराणे पारमहंस्यां एकादशस्कंधे षोडशोऽध्यायः ॥१६॥

मन बुद्धि इंद्रिय प्राण । अवश्य नेमावीं गा जाण । वृत्ति करोनि सावधान । माझें भजन जो करी ॥८॥ भावें करितां माझीं भक्ती । विषयवासना जळोनि जाती । विर्विकल्प उपजे शांती । माझे भक्तिपंथीं चालतां ॥९॥ चालतां माझे भक्तिपंथीं । सकळ साधनें लाजोनि जाती । भावें प्रकटें मी श्रीपती । करीं संसारनिवृत्ती निजभक्तां ॥३१०॥ हो कां माझिया निजभक्तां । संसारबाधेची व्यथा । ते लाज मज भगवंता । गांजूं निजभक्तां मी नेदीं ॥११॥ हो कां माझिया निजभक्तां । संसारबाधेची व्यथा । ते लाज मज भगवंता । गांजूं निजभक्तां मी नेदी ॥१२॥ प्रल्हाद गांजितां जगजेठी । मी प्रकटलों कोरडें काष्ठीं वैकुंठ सांडूनि उठाउठीं । गजेंद्रासाठीं पावलो ॥१२॥ द्रौपदी जांचितां तत्काळीं । म्यां कौरवांची तोंडें केलीं काळीं । आगीनें गांजितां गोवळीं । म्यां प्राशिला ते काळीं दावाग्नी ॥१३॥ गोकुळ गांजितां सुरपती । म्यां गोवर्धन धरिला हातीं । कीं गोपिकांची पुरवावया आर्ती । मी झालों श्रीपति कामारा ॥१४॥ अर्जुनप्रतिज्ञेचे प्राप्ति । म्यां दिवसा लपविला गभस्ती । लावूनि जयद्रथासी ख्याती । सुभद्राप्रति वांचविला ॥१५॥ अंबरीषाचे गर्भवास । म्यांचि सोसिले सावकाश । उणें आपुल्या निजभक्तांस । मी हृषीकेश येवों नेदी ॥१६॥ भक्तांचे पायींची माती । मी हृदयीं वाहें श्रीपती । वानरें वनचरें भावार्थीं । म्यां आपुले पंक्ती बैसविली ॥१७॥ यालागी उद्धवा पुढतपुढती । मी सांगें करावी माझी भक्ती । माझे भजनें माझी प्राप्ती । अवलीळा पावती मद्भाीवें ॥१८॥ मद्भाभवें करितां माझी भक्ती । मी अनंत आतुडें त्यांच्या हातीं । शेखीं कामारा होय भक्तांप्रती । भक्तीची प्रीती मज ऐशी ॥१९॥ माझिये भक्तीपरतें । सुगम साधन नाहीं येथें । हें जाणोनि म्यां तूतें । भजनपंथें लाविलें ॥३२०॥ लाविल्या लागे सद्भूक्ती । तैं संसार बापुडें तें किती । हेळसून चारी मुक्ती । निजसुख भोगिती मद्भाक्त ॥२१॥ मद्भूक्तांचे महिमान । अतिशयें अगम्य गहन । ऐसें बोलूनियां श्रीकृष्ण । उद्धवासी जाण कुरवाळी ॥२२॥ तेणें श्रीकृष्णकराग्रस्पर्शें । उद्धवासी झालें कैसें । व्याले धेनूचेनि वोरसें । वत्स जैसें उल्हासे ॥२३॥ जेवीं कां लागतां चंद्रकर । सबाह्य निवों लागे चकोर । मेघ देखोनि मयूर । नृत्यतत्पर स्वानंदें ॥२४॥ यापरी उद्धव जाण । स्वानंदें झाला परिपूर्ण । विसरला देवभक्तपण । कृष्णही कृष्णपण विसरला ॥२५॥ यापरी भक्तिसुखाआंत । दोघेही ऐक्यें झाले उन्मत्त । परमानंदाचा तेथ । धेंडा नाचत स्वानंदें ॥२६॥ या भक्तिसुखाची गोडी । भाग्येंविण न कळे फुडी । उद्धवभजनाचे कुळवाडी । जोडला जोडी श्रीकृष्ण ॥२७॥ एका जनार्दना शरण । भजनसुखाची उणखूण । तो एक जाणे संपूर्ण । भक्तजीवनजिव्हाळा ॥२८॥ जो निजभक्तांचा जिव्हाळा । तो गोकुळीं होऊनि गोंवळा । क्रीडोनि त्यांचिया खेळामेळा । गोपीगोपाळां उद्धरिलें ॥२९॥ स्वयें खेळोनि त्यांचिया खेळा । उद्धरिलें बाळगोपाळा । हें नवल नव्हे त्याची कळा । उदार लीळा ते ऐका ॥३३०॥ पर्वत पाषाण तृण तरुवर । भृंग मत्स्य मृग मगर । व्याघ्र वनचर विखार । पारावतें मयूर आदिकरून ॥३१॥ येणेंसी समवेत । गोकुळींचे जीव समस्त । स्वयें उद्धरी श्रीकृष्णनाथ । कृपाळू समर्थ स्वलीला ॥३२॥ कां पितृवचन पुढारां । सीतेचिया वियोगद्वारा । रिसां आणि वानरां । उद्धरी निशाचरां रघुनाथ ॥३३॥ सेवेनें तारिले रीसवानर । युद्धें तारिले निशाचर । हें नवल कांहीं नव्हे थोर । ऐक उदार लीला त्याची ॥३४॥ अयोध्येपासून लंकेपर्यंत । मार्गी वृक्षवल्ली पाषाण पर्वत । तृणादि जीव समस्त । उद्धरी रघुनाथ स्वलीला ॥३५॥ एवं नानावतारीं जनार्दन । यापरी उद्धरी सकळ जन । तेणें एका एकू केला पावन । हें नवल कोण मानावें ॥३६॥ परी नवल एक केलें मोठें । मज मूर्खाचेही मुखावाटें । श्रीभागवतबोल केले मर्हा।टे । हें आश्चर्य वाटे माझेंचि मज ॥३७॥ यालागीं एका जनार्दना शरण । ज्याची कृपा ऐशी परिपूर्ण । त्याचे स्मरोनि श्रीचरण । केला संपूर्ण सोळावा ॥३८॥

इति श्रीभागवते महापुराणे एकादशस्कंधे श्रीकृष्णोद्धव संवादे एकाकारटीकायां विभूतियोगो नाम षोडशोऽध्यायः ॥१६॥

॥श्रीकृष्णार्पणमस्तु ॥श्लोकसंख्या ॥४४॥ओव्या ॥३३८॥


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.

[[‎]]