गंगाजल/'थोडे' मैत्रिणीसंबंधी





१. 'थोडे’ मैत्रिणीसंबंधी


२. प्रस्तावना
'थोडे' मैत्रिणीसंबंधी


 गंगाजल' हे इरावतीबाईंचे ललित-निबंधांचे पुस्तक त्या गेल्यानंतर वर्षाने प्रकाशित होत आहे.

 पुस्तकाचे नाव बाईंनी ठेविले नसून ते मी ठेविले आहे. पुस्तक बाईंचे, व नाव मी ठेवणार हे थोडेसे विचित्र वाटले, तरी माझ्या ष्टीने त्याला फार अर्थ आहे. बाई असत्या तरीही कदाचित पुस्तकाला मीच नाव ठेविले असते.

 ह्या ललित निबंधांच्या पुस्तकाला प्रा. कुरुंदकर यांसारख्या विचारवंतांनी प्रस्तावना लिहिल्यानंतर परत मी काहीतरी लिहिण्याची जरूरी नव्हती; परंतु प्रा. कुरुंदकरांनी बाईंचे मराठी ललित निबंधांतील स्थान सांगण्यापुरताच या लेखांचा परामर्श घेतला. ह्या निबंधांबद्दल प्रा. कुरुंदकर मौनच स्वीकारतात

 या पुस्तकातील सर्व ललित-निबंधांमागे बाईंचे सतत जागृत असणारे मन त्याना जीवनात येणारी अनुभूती यांचे एक सूत्र आहे. त्या सूत्राचा किंवा चिंतनाचा विचार जास्त स्पष्ट व्हावयास पाहिजे होता.

 हे सूत्र मला यशस्वीरीत्या सांगता येईल, असे नाही. पण मी प्रयत्न करणार आहे.

 साधारणपणे १९५२ पासून बाईंनी जे ललित निबंध लिहिले, त्या निबंधांचे विषय पुष्कळसे आमच्या दोघींच्या बोलण्यात येऊन जात.

 अशा त-हेची चर्चा त्या आणखीही कुणाजवळ करीत असतील. पण त्यांच्यापैकीच मीही एक आहे. हे लेख निरनिराळ्या स्वरूपातून जाताना, त्यांचे रूपांतर होताना मी पाहिले आहे. आणि त्या-त्या लेखामागची त्या- त्या वेळची बाईंची मनोवृत्ती मी ब-याच जवळून पाहिली आहे.
 मी जे काही लिहीन, त्याहून सर्वस्वी निराळे असे सूत्र दुस-या कोणास सापडले, व त्याने ते मांडले, तर त्यात मला आनंदच आहे. 'परिपर्ती' व ‘भोवरा' हे ललित निबंध संग्रह एकाच वेळी वाचले म्हणजे आपोआपच एक ठळक गोष्ट लक्षात येते. या संग्रहातून बाई स्वत:च्या जीवनाबद्दल आणि स्वत:च्या विचारसरणीबद्दल खूपसे काही सांगून जातात.
 भोवरामधील ‘सुटका' या लेखात त्यांनी ते जास्त स्पष्टपणे सांगितले आहे.
 "एका माणसाची आयुष्याची कमाई किती असणार? ती कमाई करताना अनुभूतींचा प्रवाह तुडुंब भरून वाहून चालला की, मनुष्य आपण होऊन दुस-याला बोलावते, व आपली कमाई वाटीत सुटते."
 बाईंच्या अनुभूतीचा प्रवाह तुडुंब भरून वाहून जाऊ लागला की, बाई सांगायला लागतात. मग त्यांना कुणी आग्रहही करावा लागत नाही.
 'गंगाजल'मधील ललित-निबंधांत बाईंची अनुभूती कुठे सापडते का हे पाहू गेले की, ‘बॉय फ्रेण्ड'पासूनच त्याच्या खुणा दिसू लागतात. बाई स्वत: होऊनच आपले आणि पंढरपूरच्या विठोबाचे नाते सांगतात. त्यात भक्ताचे विविध प्रकार सांगताना आर्त होऊन पंढरपूरला जाणा-या बाई एकीकडे अर्थार्थीही असतात.
 सोसवेनासा भार शिरी पडला की, त्यांना हरी आठवतो. एकाकीपणे प्रसंगाला तोंड देण्याचा प्रसंग आला की, बाई पंढरपूरच्या विठोबाजवळ बळ मागायला जातात. आलेला प्रसंग सोसायचे सामर्थ्य दे, म्हणून काकुळती येऊन त्याला मिठी मारतात. बाईंची ही काकुळती लौकिक नसते. व्यावहारिक अर्थाने त्यांना काही मागावयाचे नसते. माणसाच्या भावजीवनाची गुंतागुंत मोठी विलक्षण असते. माणूस जवळ आला आणि स्वत:ला विसरून आपण त्याच्यावर प्रेम करू लागलो (मग ते प्रेम स्वत:साठी का असेना), की, ही व्याकुलता, हे रडणे-हसणे सगळे आलेच.
 कधी कधी ही गुंतागुंत फारच वाढते. तीतील सुटा धागा कुठे सापडत नाही. अशाही काही प्रसंगी बाई आपल्या जिवलगाला भेटण्यास जात आणि ब-याचशा शांत होऊन परत येत, असे मला ब-याच वेळा जाणवले आहे.
 बाईंच्या मनात जीवनासंबंधी अपार श्रद्धा होती. देवळाविना गाव नाही', म्हणताना त्या स्वत:च्या जीवनातील श्रद्धास्थानांबद्दल, स्वत:ला जाणवलेल्या त्यांच्या अस्तित्त्वाबद्दल सांगण्याच धडपड करतात. हे सांगताना त्यांचे मन या देहाला गाव समजून त्यातल्या देवळाबद्दलही सांगू लागते. म्हणजे यावेळी बाई कसल्यातरी शोधात असाव्यात. परत-परत कशाचेतरी चिंतन आणि कसलीतरी खळबळ त्यांच्या अंतर्मनात चालू असावी, आणि विशेष म्हणजे ती स्वत:ची अनुभूती शोधण्याची होती. त्या खळबळीचा व्यावहारिक जीवनाशी काही संबंध नव्हता.
 ‘दुसरे मामंजी’, ‘आई सापडली' हे निबंध थोडेसे आत्मचरित्रात्मक तर थोडेसे चिंतनशील अंतर्मनाचे स्वरूप व्यक्त करणारे आहेत. स्वत:संबंधीचे विचार चालू असताना, स्वत:चे कठोर आत्मपरीक्षण करीत असताना त्यांचे समाजाचे चिंतन सुटले नव्हते.
 'व्यक्तिस्वातंत्र्य म्हणजे मूल्यहीनता नव्हे', पुनर्जन्माचा बिनतोड पुरावा' हे मध्येच आलेले लेख त्याची प्रचीती देतात. त्याबद्दल विशेष काही सांगण्याची जरूरी नाही. परंतु 'एकाकी', 'किंकाळी', 'आत्मचरित्र लिहिण्यामागील माणसाचे मन', 'उकल', आणि' हे सर्व तूच आहेस!' या लेखांमागे मात्र एक विशिष्ट सूत्र असून बाई स्वत:ची अनुभूती ज्या पद्धतीने संगत आहेत तीत स्वत:बद्दल सांगताना स्वत:च्या भावविश्वाबद्दल, स्वत:च स्वत:शी करीत असलेल्या झगड्याबद्दल खूपसे काही सांगून जातात, आणि ती त्याची अनुभूती दुस-याला चिंतनप्रवण करणारी आहे, असे मला तीव्रतेने जाणवते.
 भोवरा' मधील, 'भटके' लिहिताना बाई स्वत:च्या एकटेपणाला, आजारीपणाला, मृत्यूला भीत होत्या. 'भटके'मध्ये त्यांची कुणा-ना- कुणाबद्दल तक्रार आहे; कुणा-ना-कुणाकडून काही अपेक्षा आहे. पण ही अपेक्षा, एकाकीपणाची ही भीती ‘एकाकी'मध्ये नाहीशी झाल्यासारखी वाटते.
 'एकाकी'पासून पुढचे निबंध वाचू लागलो की, बाईंबरोबर आपणही मनाच्या एका निराळ्याच पातळीवर जातो.
 या मधल्या काळात बाई आत्मरत व अंतर्मुख होत होत्या. आर्त, भयभीत होऊन पंढरपूरच्या विठोबाला मिठी मारीत होत्या. आपल्याला झालेल्या आजारामुळे मृत्युने पाठ धरली आहे, याची तीव्र जाणीव त्यांना झाली होती; आसपासच्या सर्वांना ती झाली होती. कधी मृत्यू येऊन आपल्याला गाठील, याची त्यांना किती भीती वाटे, हे सुरुवातीलच्या काळात आसपासच्या माणसांना प्रकर्षाने जाणवे.
 त्यांचा पंढरीचा विठोबा त्यांना बळ देत होता, की त्यांचे आत्मसामर्थ्यच एवढे मोठे होते, हे सांगणे कठीण; पण मृत्यूच्या या भीतीवर त्यांनी मात केली होती.
 एकाकी' हा एक उत्तम-कलात्मक निबंध आहे.
 ‘एकाकी' मध्ये त्यांना झालेले एकाकीपणाचे ज्ञान, त्या ज्ञानाची, तेजाच्या लोळाची प्रखरता प्रकर्षाने जाणवते, ती ‘भटके' आणि एकाकी' हे निबंध एकाच वेळी वाचले म्हणजे.
 माणूस जगात एकटाच येतो आणि एकटाच जातो. त्याचे सुखदु:ख भोगायला जन्माचा सोबती, मुले, लेकरे, सगेसोयरे असे कितीही वाटेकरी जोडले तरी हा सुखदु:खांचा भार ज्याचा त्यानेच उचलावा लागतो. जो-तो ख-या अर्थाने एकटा असतो; एकाकी असतो. हे समजणे आणि उमजणे यात फरक असतो. अलीकडे हे बाईंना उमजले होते, असे त्यांच्या बोलण्यावरून वाटते.
 ‘किंकाळी' हा उत्तम ललित-निबंध तर आहेच, पण त्यात अॅब्सर्डिटीचा धागा आहे.
 किंकाळी'सारख्या लेखात दिसते की, चुक आणि बरोबर हे सापेक्ष असते. नुसते एका प्रसंगापुरते नसते, तर जन्मभर आपण जे करीत आलो त्यात चूक किती आणि बरोबर किती, याचे परिशीलन करणे कधी संपतच नाही. बाई सगळ्या आयुष्याला चूक-बरोबरच्या खात्यात बसवून उलट-सुलट विचार करीत असत. स्वत:च्या चिंतनात त्यांनी स्वत:चे जीवन परीक्षेसाठी, कसोटीसाठी ठेविले होते, आणि शेवटी त्या अशा निष्कर्षाला आल्या होत्या की, आपण आपल्याला योग्य वाटेल ते कर्तव्यबुद्धीने स्वत:शी प्रामाणिक राहून केले. याच्या पलीकडे ज्या चुका झाल्या असतील, त्यांचे परिणाम आपण भोगलेच पाहिजेत. कारण सर्वार्थानी बरोबर असे वागता येत नाही. निदान आपल्याला तरी ते साधलेले नाही, ही त्यांना झालेली जाणीव त्या सहज सांगून जातात.
 'उकल'मध्ये असाच स्वत:शीच चाललेला स्वत:चा झगडा त्यांनी मांडला आहे. १९५९-पासून त्यांना मृत्यूची जाणीव तीव्रतेने झाली होती; पण मृत्यूच्या भीतीने हातपाय गाळून न बसता त्या नव्या उमेदीने कामाला

गंगाजल / १३१

लागल्या होत्या. मूत्यूचे आव्हान त्यांनी स्वीकारिले होते. त्याचप्रमाणे त्या जास्त अंतर्मुख बनल्या होत्या.

 सत्याचे दर्शन फार भयंकर असते. ते पहायला मनाला बळ यावे लागते. जोपर्यंत माणूस आपल्या मनाच्या किमयेने सत्याकडे डोळेझाक करितो, तोपर्यंत एका अर्थाने तो सुखी असतो; पण या पेटाऱ्याचे दार उघडून त्यातले सत्य पाहण्याची धडपड सुरू झाली, म्हणजे शेवटाला जाईपर्यंत ते चैन पडू देत नाही. आणि सगळ्यांत कसोटीची अवघड गोष्ट अशी आहे की, सत्याचे ज्ञान झाल्यानंतर त्याचा आविष्कार सहन करण्याचे बळ राहणे हे कार्य महाकठीण.

 या सत्याबद्दल बोलताना इरावतीबाई काही मृत्यूच्या जाणिवेबद्दल बोलत नाहीत, तर स्वत:च्या भावनेबद्दल बोलतात. स्वत:च्या निरपेक्ष प्रेमाचीही त्या अशीच चिरफाड करितात. दुसऱ्याबद्दलचे वाटणारे प्रेम, दुसऱ्याची काळजी म्हणजे स्वत:ला स्वत:बद्दल वाटणाऱ्या काळजीचे, प्रेमाचे, भीतीचेच ते एक स्वरूप आहे. माणसाचे स्वत:वरचे प्रेम हेच काय ते खरे. हा सगळा अटाट आपण करितो, हा पसारा मांडतो तो स्वत:साठी,- स्वत:वरच्या प्रेमानेच मांडलेला असतो. म्हणूनच आपण त्यात इतके गुंतून पडतो; ते का, असे प्रश्नचिन्ह आहे.

 स्वत:च्या मनाची चिरफाड करणे आणि त्याचा आविष्कार सोसण्याएवढी मनाची तयारी करणे या दोन्ही स्थितीत माणसाने सतत आत्मचिंतन तर केले पाहिजेच; पण स्वत:शी अत्यंत कठोर झाले पाहिजे.

 इरावतीबाई स्वत:ला अशा सारख्या भट्टीत घालीत होत्या. स्वत:मधले हिणकस जाळून टाकण्याची धडपड करीत होत्या. आणि त्या धडपडीतून स्वत:ला तावून-सुलाखून घेतानाच त्यांना 'हे सर्व तूच आहेस' याची जाणीव झालेली असावी.

 हिटलरने ज्यूच्या केलेल्या शिरकाणात कर्वे-कुटुंबियांचे अनेक जवळचे स्नेही मारिले गेले. त्यामुळे हिटलरचे नाव काढिले की, त्या सात्त्विक संतापाने उफाळून उठत.

 कुठे अन्याय झालेला दिसला की, प्रथम त्या अन्यायाच्या विरुद्ध प्राणपणाने विरोध केल्यासारखा अन्यायाला विरोध करीत. त्या घटनेला, त्या व्यक्तीला न्याय मिळेपर्यंत विरोधाला तोंड देत. न्याय मिळेपर्यंत त्यांना चैन पडत नसे; परंतु म्हणून असे कोणी समजण्याचे कारण नाही की, त्यांना १३२ / गंगाजल

विरोध करणाऱ्या माणसांच्याबद्दल बाईंच्या मनात द्वेष किंवा चीड असे.

 अन्याय्य कृत्य करणाऱ्यांबद्दल त्यांच्या मनात अपार करुणा होती, हे मला माहीत आहे; ती मला जाणवलेली आहे.

 त्यांना कोणी कितीही दुखावले असले, तरी त्या माणसाला न्याय देताना त्या स्वत:शी तर कठोर होतच; पण आपल्या माणसाच्या विरुद्ध त्या न्यायाच्या बाजूने उभ्या राहत.

 त्यांच्या पहिल्या सूनबाईंशी त्या जे वागल्या ते ज्यांना माहीत आहे, त्यांना मी लिहिते यात अतिशयोक्ती वाटणार नाही.

 डेक्कन कॉलेजमधील प्रकरणात अनेक माणसे त्यांना दोष देताना मी ऐकिले आहे. बाईंना जे अन्यायाचे वाटले, त्याविरुद्ध त्या सर्व शक्तीनिशी झगडल्या, हे जितके खरे, तितकेच त्या ज्यांच्याशी झगडल्या त्यांच्यावर त्यांचा मनापासून राग नव्हता, हेही खरे.

 ज्या हिटलरबद्दल त्यांना अत्यंत घृणा होती, तेही स्वत:चेच एक रूप आहे, हे झालेले सत्याचे दर्शन त्यांनी मनोमनी स्वीकारले होते.

 बाईंची वृत्ती 'मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास । कठीण वज्रास भेदू ऐसे' अशीच होती. बाईंच्या लेखांसंबंधी हे लिहीत असताना बाईंना कुणी संतीण बनविण्याचा माझा हेतू नाही. पण या मार्गावरील साधकांपैकी त्या एक होत्या.

 स्वत:मधील हिणकस नष्ट करण्याची धडपड करणारा तो एक अत्यंत प्रामाणिक आत्मा होता, की ज्याने स्वत:च स्वत:शी कठोर आत्मपरीक्षण करून स्वत:ला तावून-सुलाखून घेण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे..

 या 'गंगाजला' बद्दल एवढे लिहिण्याचे कारण नव्हते; पण या संग्रहातील हे निबंध बाईंची अनुभूती सांगत असले तरी ही अनुभूती लौकिक किंवा प्रापंचिक नाही. त्यांच्या नित्याच्या व्यवसायातील, शास्त्रातील नाही, तर ती सर्वस्वी आत्मचिंतनात्मक आहे.

 १९५३ सालापासून ७० सालापर्यंत आम्ही एकमेकींच्या फार निकट होतो असे मला जाणवले, म्हणून या निबंधांची मोड सांगण्याचा हा प्रपंच केला.

- सुलोचना देशमुख