गंगाजल/प्रस्तावना
इरावतीबाई कर्वे यांच्या ललितनिबंधांचा हा तिसरा आणि शेवटचा
संग्रह प्रकाशित होत आहे. ललितवाङ्गय हा इरावतींच्या आवडीचा व
वाचनाचा खास भाग असला, तरी त्यांच्या लेखनाचा आणि चिंतनाचा तो
खरं म्हणजे खास भाग नव्हता. त्यांचे मन फुलपाखरांप्रमाणे अधूनमधून
वेगळ्या-वेगळ्या विषयांचा आस्वाद घेत इतस्तत: उडणारे असे नव्हते.
जन्मभराचा व्यासंग त्यांनी एकाच विषयाचा केला, तो समाजशास्त्राचा. पण
समाजशास्त्राचा व्यासंग करिताना एका जिवंत, संवेदनाशील व्यक्तीच्या
मनात जी अस्वस्थता निर्माण होते ती अस्वस्थता, आणि जी वादळे निर्माण
होतात तशी वादळे इरावतींच्याही मनात निर्माण होत: आणि मग नित्याच्या
अभ्यासाशी एका बाजूने जोडलेले तर एका बाजूने शास्त्राच्या चौकटीतून
मोकळे झालेले असे काही अनुभव त्यांच्या मनात तरळू लागत. या
अनुभवाना अभिव्यक्तीची वाट मोकळी करून देताना इरावतींचा
ललितनिबंध आकार धारण करीत आला आहे.
मराठी वाङमयात काही नियतकालिकांना नव्या प्रयोगांच्या दृष्टीने विशेष मानाचे असे स्थान आहे. अशा प्रकारचे ‘अभिरुची' नावाचे एक नियतकालिक पूर्वी बडोद्याहून निघत असे. त्या ‘अभिरुची' ची आणि प्रथमदर्शनी तरी तुटक, फटकळ आणि तुसड्या वाटणाच्या इरावतींची रुची- कशी कोण जाणे! पण जूळली आणि बाई ‘अभिरुची'मध्ये लिहू लागल्या. या शास्त्रीय लिखाणाखेरीज असणा-या मराठी लेखनाचा एक संग्रह इ.स १९४९ साली 'परिपूर्ति' या नावाने प्रकाशित झाला. लेखनाच्या आरंभापासूनच रसडोळस वाचकांचे लक्ष इरावतींच्या लिखाणाकडे खेचले गेले होते. ललितनिबंधाच्या काही नव्या वाटा इरावतींच्या लिखाणातून प्रकट होत आहेत, असे त्या वेळी कुणाला जाणवले की नाही, हे नक्की सांगता येणार नाही. पण या लेखणीची मोहकता मात्र चटकन वाचकांचे मन वेधून बसली. तेव्हापासून आजतागायत अधूनमधून इरावतींनी ललितनिबंधाच्या वर्गात घालता येईल, अशा प्रकारचे लिखाण केले आहे. या अशा ललित लिखाणाचा 'परिपूर्ति' आणि 'भोवरा' यानंतर येणारा हा तिसरा संग्रह आहे.
एक वाङमयप्रकार म्हणून ललितनिबंध या वाङमयप्रकाराचा विचार इरावतीबाईंनी केला असेल, असे वाटत नाही. उलट, या वाङमयप्रकाराचा जाणीवपूर्वक शोध त्यांनी घेतला नव्हता, याच्याच खाणाखुणा त्याच्या लिखाणात जागजागी आढळतात; आणि झाली गोष्ट एका अर्थी बरीच झाली, असेही वाटते. ललितनिबंध या वाङमयप्रकाराचा विचार इरावतीबाईंनी जर जाणीवपूर्वक केला असता, तर कदाचित आपण ललितलेखक नव्होत, या जाणिवेने त्यांनी लिखाणच केले नसते; किवा जाणीवपूर्वक ललितनिबंध लिहिण्याचा जर त्यांनी प्रयत्न केला असता, तर आज त्यांच्या लिखाणात जो जिवंतपणा आणि ठराविक आकृतिबंध फोडून बाहेर पडणारा चैतन्यांचा आविष्कार दिसतो, तसा तो कदाचित दिसलाही नसता. 'आपण जे लिहीत आहो, त्याचे स्वरूप खरोखरच लालित्याचे आहे काय?' असा मन पोखरणारा भुंगा जर वेळोवेळी बाईंच्या मनात गुंजन करू लागला असता, तर त्या चमत्कारिक दडपणामुळे त्यांच्या हातून एक निर्जीव, साचेबंद पण सजविलेले असे एखादे मखर आपल्या हाती आले असते. माझा आणि त्यांचा परिचय त्यांच्या आयुष्याच्या सायंकाळी झाला. सायंकालीन, मावळती व म्हणून कोवळी झालेली अशी कांती त्यांच्या मनस्वी वागणुकीवर त्या काळी पसरली होती. पण या शेवटच्या काळातसुद्धा वाङमयाचा उल्लेख त्या अधून-मधून थोड्याशा हेटाळणीनेच करीत.
'तुम्ही कादंबरीकार, तुम्ही कवी, तुम्ही ललितलेखक,' असा आरंभ करून त्या मधूनमधून सुचवीत की, ललितवाङमयाचा पसारा कल्पनेचा आणि खोटा असतो. सत्याच्या जवळ जाण्याची ललित-लेखकांना इच्छा नसते. बाईंच्या या लिखाणाचा प्रतिवाद करून कलात्मक सत्याची महती त्यांना पटवून द्यावी अशी इच्छा मला कधीही झाली नाही. ऐन तारुण्यात जे मराठी वाङमय बाईंनी वाचलेले होते, त्या वाङमयाचा सवंग भोळेपणा, त्यातील खोटे स्वप्नरंजन कुठेतरी बाईंच्या मनावर दाट संस्कार करून गेले होते. त्या संस्कारानिशी त्या बोलत असत. आणि तरीही जणू अकृत्रिम आणि मर्मस्पर्शी अशा लालित्याचा गाभा आपल्या हातात सापडला आहे, असे त्या लिहीत असत. जोपर्यंत त्या कोणतीही कृत्रिम बंधने मनावर न लादता मोकळेपणाने लिहीत होत्या, आणि त्यांच्या लेखणीची धार नेहमीच मुलायम आणि त्याच वेळी तीक्ष्ण होती, तोपर्यंत खुर्चीवर बसून आपल्या उंच आणि किनऱ्या आवाजात माझ्याकडे अगर रणजित देसाईंकडे बोट दाखवून त्या ललितवाङमयाविषयी काय बोलत होत्या, याचा फार गंभीरपणे विचार करण्याची मला गरज वाटली नाही.
१९४५ नंतर केव्हातरी बाईंनी मराठीतून लिहिण्यास आरंभ केला. ज्या वातावरणात त्या लिहीत होत्या, त्या वातावरणात गुजगोष्टी ऊर्फ ललितनिबंध ऊर्फ लघुनिबंध हा वाङमयप्रकार कोमेजून गेलेला होता. जेव्हा त्याचे रंग. टवटवीत होते. तेव्हाही या वाङमयप्रकारातील कृत्रिमपणाची जाणीव त्या वेळच्या काही रसिकांना होत असावी, असे माझे अनुमान आहे. जे आदर्श डोळ्यांसमोर ठेवून मराठीत ललितनिबंध निर्माण झाला, ते आदर्श खर्या अर्थाने ललितवाङमयाचे आदर्श नव्हते. आपली स्फूर्तिस्थाने म्हणून आद्य मराठी लघुनिबंधकारांनी ज्या इंग्रज लेखकांचा आवर्जून उल्लेख केला आहे, त्या मूळ प्रेरकांच्याच लिखाणाविषयी ते खरोखरी ललितवाङमय आहे, की तेथे असलेल्या शोभेचा व सजावटीचा ललितवाङमय म्हणून चुकून स्वीकार झाला आहे, याविषयी माझे मन साशंक आहे.
नित्याप्रमाणे मराठी ललितनिबंधांच्या बाबतीतसुद्धा त्यांचा जनक कोण? हा प्रश्न अजून विवाद्य राहिलेला आहे. प्रा.ना.सी.फडके यांचे असे मत आहे की, आपण स्वत: या वाङमयाचे जनक आहोत. गार्डिनर, चेस्टरटन आणि लिंड इत्यादिकांचे निबंध वाचताना फडके यांना असे जाणवले की, मराठीत अशा प्रकारचे लिखाण का नसावे? आणि मग त्यांनी जाणीवपूर्वक हा नवा वाङमयप्रकार जन्माला घातला. त्यांनी लिहिलेला 'सुहास्य' हा पहिला ललित निबंध किंवा ही पहिली 'गुजगोष्ट' इ. स. १९२५ सालची आहे. या ठिकाणापासून मराठी ललितनिबंधांना आरंभ झाला, असे फडके यांचे मत आहे. अर्थातच हे मत भाऊसाहेब खांडेकरांना मान्य असणे शक्य नव्हते. खांडेकरांनी आपले निवेदन सादर करिताना असे म्हटले आहे की, आपल्या मनात वेळोवेळी अनेक अनुभव जागे होत असत. ह्या अनुभवांना नेहमीच कथेचे अगर निबंधाचे रूप देता येणे शक्यही वाटेना, इष्टही वाटेना; म्हणून आपण वेगळ्याच प्रकारे लिहिण्याचा प्रयत्न केला. इंग्रजी लघुनिबंध आपल्या वाचनात त्यानंतर आला. इ.स.१९२७ साली आपल्या ललितनिबंधांना आरंभ करिताना त्यांच्या डोळ्यांसमोर दुसरे काही नव्हते. कदाचित खांडेकरांना असे सुचवायचे असेल की, फडके आणि आपण या दोघांनी एकच वाङमयप्रकार जरी निर्माण केलेला असला, तरी फडके यांची प्रेरणा इंग्रजीतील हा वाङमयप्रकार मराठीत आणण्याची होती. भाऊसाहेबांची प्रेरणा मात्र स्वत:ला जाणवणाऱ्या अनुभवांना आकार शोधण्याची होती. पण हा वाद येथे संपणारा नाही. कारण अनंत काणेकरांनी आपले निबंध लिहिण्यास १९३३च्या सुमारास आरंभ केला. पण त्यांचेही म्हणणे असेच आहे की, त्या वेळपर्यंत आपल्या डोळ्यांसमोर फडके किवा खांडकेर यांचा ललितनिबंध नव्हता.
'मराठीतील ललित-निबंधाचा जनक कोण?' याचे उत्तर इतक्या सरळपणे देता येणे शक्य नाही. कारण फडके-खांडेकरांच्याही पूर्वी शिवरामपंत परांजप्यांचे निबंध होते. वत्सलावहिनींची पत्रे होती. अच्युत बळवंत कोल्हटकरांचे विविध लेख होते. वैचारिक निबंध कोणत्या ठिकाणी संपला आणि वैचारिकाची जागा ललित-निबंधाने नेमक्या कोणत्या ठिकाणी घेतली, ही विभाजक रेषा फारशी स्पष्ट असणे कधीच शक्य नसते. कारण वैचारिक निबंधातही आपला मुद्दा समजावून सांगण्यासाठी दृष्टान्त आणि कहाण्या यांचा वापर केलेला असतोच; या दृष्टान्तांची आणि कहाण्यांची लांबी रुंदी किती असेल, यालाही नियम नसतो. त्यांची संख्या किती असावी, यालाही बंधन नसते. दासोपंतांच्यासारखा एखादा गीताभाष्य- लेखक अद्वैत-तत्वज्ञान सांगताना लांब-रुंद अशी कहाणी सांगून जातो.
एकच मुद्दा मनावर ठसविण्यासाठी ज्या वेळी अनेक गोष्टी सांगितल्या जातात, किंवा ज्या वेळी एका मुद्दयाच्या अनेक बाजू स्पष्ट करण्यासाठी अनेक गोष्टी सांगितल्या जातात, त्या वेळी विवेचन तर्कशुद्ध आणि तर्कप्रमाण नसते. म्हणून त्या ठिकाणी ललितनिबंधांचा अवतार झाला, असे समजावे. ही भूमिका नुसती ढोबळच नसून उघडउघड चुकीची आहे. कारण ह्या भूमिकेप्रमाणे पाहता ठरलेला बोध देण्यासाठी गोष्टी सांगणारे इसाप आणि विष्णुशर्मा आद्य लघुनिबंधकार ठरण्याचा संभव आहे. एक मुद्दा मांडण्यासाठी एक गोष्ट सांगितली काय, किंवा तो मुद्दा अधिक बळकट व्हावा म्हणून अनेक गोष्टी सांगितल्या काय किंवा एकाच गोष्टीचे निरूपण करून त्यातून नानाविध प्रकारांचा बोध काढिला काय, विवेचनाची मांडणी तार्किक असेल तो वैचारिक निबंध, आणि, जेथे विवेचनाची मांडणी तार्किक नसल तो मात्र ललित-निबंध, या भूमिकेला मान्यता देता येणे कठीण आहे. शास्त्र आणि ललितवाङमय यांच्यातील सीमारेषा मांडणीची तर्कनिष्ठता किवा मांडणीची अतार्किकता ही नसते. हा मांडणीवरून निर्माण होणारा फरक नाही; तर तो मूळ भूमिकेचाच फरक आहे, फडके काय, खांडेकर काय, की काणेकर काय, त्यांच्या दृष्टीने ललित-निबंध हा निबंधच होता; फक्त त्याची मांडणी निराळी होती. ही भूमिका त्यांनी जाणीवपूर्वक घेतली होती काय? ती त्यांच्या मनात होती काय? हे प्रश्न वाङमयाच्या चर्चेत- अप्रस्तुत आणि गैरलागू आहेत. फडके, खांडेकर, काणेकर यांच्या मनात काय होते, हा मुद्दा तिघांनाही आत्मवृत्तांत स्पष्ट करण्यासाठी मोकळा ठेवीला पाहिजे. पण त्यांच्या वाङमयाचे स्वरूप मात्र वर सांगितल्याप्रमाणे, म्हणजे मांडणीची सीमारेषा ठरविणारे असे आहे.
मराठीतील टीकाकारांना खांडेकरांचे सगळेच ललितवाङमय नेहमीच कृत्रिम वाटत आले आहे. तेव्हा त्यांना खांडेकरांचा लघुनिबंध कृत्रिम वाटला तर त्यात आश्चर्य वाटण्याजोगे काही नाही. इतर वाङमयप्रकारांचे काहीही असो, पण खांडेकरांचा ललित निबंध कृत्रिम असला तरी मनोरंजक आहे, याविषयी माझ्या मनात शंका नाही. उदाहरण म्हणून खांडेकरांचा 'श्रावणा' सारखा ललित-निबंध घेतला, तरी हा मुद्दा स्पष्ट होऊ शकेल. जीवनात सुखे आहेत. दु:खे आहेत. हसणे-रडणे, वासना-क्षोभ हे सगळेच जीवनात आहे. पण यांपैकी एकही जीवनाचे मूल्य नाही. संयम हे जीवनाचे खरे मूल्य आहे. असा मुद्दा खांडेकरांना पटवून द्यावयाचा आहे. त्यासाठी 'श्रावण' या ललित-निबंधाचा जन्म आहे. जर हा निबंध वैचारिक असता, तर खांडेकरांनी त्याची मांडणी निराळी केली असती. पण कुठल्यातरी अनौपकरिक आणि अप्रस्तुत भासणाऱ्या घटनेने आरंभ करून खांडेकर वाचकांना कृत्रिम अशी भुरळ घालू इच्छितात. कुणीतरी पोरगा त्यांची मुलाखत घेण्यासाठी आलेला आहे. तो अनेक प्रश्न विचारीत आहे. विचारिता-विचारिता एक प्रश्न तो मुलगा विचारितो, "तुमचा आवडता महिना कोणता? आणि खांडेकर सांगतात, “आवडता महिना श्रावण."
यांनतर विविध स्मृती चाळविल्या जातात. वेळोवेळी आपले आवडते महिने बदलत कसे गेले, हे सांगताना खांडेकर विविध महिन्यांची नावे घेतात. शेवटी श्रावणावर येऊन संयमाचे महत्त्व सांगून हा लघुनिबंध संपवितात. सहजगत्या घडलेल्या एका संवादापासून आपण आरंभ करतो आहो, असा लेखकाने कितीही जरी आविर्भाव केला, तरी वाचकांच्या दृष्टीने एक सत्य शिल्लक राहते. ते म्हणजे, काय सांगायचे हे लेखकाने आधी निश्चित केलेले होते; आणि नंतर ते कसे सांगायचे, याची रूपरेखा आखली होती. वाचताना जरी लघुनिबंधाचा आरंभ अप्रस्तुतापासून दिसत असला, व शेवट प्रस्तुतावर होत असला, तरी लेखकाच्या मनात मात्र प्रस्तुत आधीच निश्चित ठरलेले होते. नजरेसमोर प्रस्तुत ठेवून लेखक अनुरूप अप्रस्तुतापासून आरंभ करितो व मग एखादा कुशल खेळाडू समोरच्या गड्यासमोर चेंडू खेळवीत बसतो, त्याप्रमाणे लेखक वाचकाला खेळविण्याचा प्रयत्न करितो, आणि चटकन गोल मारून प्रस्तुत गाठतो. हाच प्रकार जर ललित-निबंध म्हणून येणार असेल, तर मग त्यातली गोडी फार वेळ टिकणे शक्य नव्हते. शेवटचा परिच्छेद वाचल्यानंतर तो ललित निबंध फार वेळ वाङमयीन समाधान देणारा उरू शकत नव्हता. हा वैचारिक निबंधच होता. पण लहान मुलांना गोष्टीरूपाने नीतिबोध करावा, त्याप्रमाणे या लिखाणात आपली मते वाचकांच्या गळी उतरवावी, हा सौदा पटविण्यासाठी कुशल मध्यस्थाप्रमाणे लेखक अघळपघळ गोष्टी सांगत होते. ह्यात क्रीडा असली, आणि कौशल्य असले, तरी ते लेखकाचे होते. वाचकांच्या ख-या भुका यामुळे तृप्त होणे कठीण होते.
खांडेकरांच्या ललित-निबंधाविषयी हे आणि यासारखे असे कितीही विवेचन मी केले तरी मराठी टीकाकार त्यामुळे रागावण्याचा संभव कमी आहे. कारण खांडेकर वाचकांचे नेहमीच आवडते आणि टीकाकारांचे तितकेच नावडते लेखक राहिले. पण जे खांडेकरांच्या लघुनिबंधाचे रूप आहे, तेच फडके यांच्याही गुजगोष्टीचे रूप आहे. फडक्यांनी कितीही जिव्हाळ्याने सांगण्याचा अभिनय केलेला असो, आणि कितीही रेखीवपणे त्यांनी त्याची मांडणी केली असो, त्या लिखाणाचे मूळ रूप तेच होते. फडक्यांचाही निबंध अप्रस्तुतापासून सुरू होई. तेथून वाचकांना भुलवीत- भुलवित प्रस्तुतापर्यंत फडके प्रवास करीत. शेवटच्या परिच्छेदात प्रस्तुत सांगून ते मोकळे होत. 'माणसाला जे मिळत नाही, ते हवे असते, मग ते कितीही वाईट का असेना. जे मिळते त्यावर समाधान नसते, मग ते कितीही चांगले का असेना. हा अप्राप्याचा हव्यास ही माणसाची प्रवृत्ती आहे. हे फडक्यांचे प्रस्तुत. मग जिव्हाळ्याने फडके सांगू लागतात की, 'माझ्या मित्राकडे गोजिरवाणी अशी दोन लहान मुले आहेत. त्यामुळे त्याच्या घरात आनंद बहरलेला आहे. मी मित्राकडे जातो, तेव्हा मुलांच्यासाठी काही घेऊन जातो. एकदा खेळण्यातल्या दोन आगगाड्याच मी नेल्या. यापुढचा फडक्याचा मुद्दा अगदी स्पष्ट आहे. तो म्हणजे दोन्ही आगगाड्या सारख्याच होत्या. एक याला दिली, एक त्याला दिली, पण लवकरच दोघेही भांडू लागली. कारण प्रत्येकाला आपल्याला मिळालेले खेळणे हिणकस वाटत होते. ज्या प्रस्तुताकडे जाण्यासाठी हे अप्रस्तुत आहे, त्याला मुले दोनच असणे, खेळणी सारखी असणे हे आवश्यक होते. दोन्ही खेळणी मला एकट्यालाच हवी, असा हट्ट धरणारे मूल फडक्यांच्या दृष्टीने सोयीस्कर नव्हते. शेवटी फडक्यांचाही लघुनिबंध कोणतातरी मुद्दा पटवून देण्यासाठीच आहे. बोध अगर उपदेश हे वाङमयाचे प्रयोजन नव्हे; कला ही शुद्ध कलेसाठी आहे: असा नित्य उद्घोष करणा-या फडके यांच्या गुजगोष्टींचे स्वरूप मात्र प्राधान्याने उपदेशप्रधान, म्हणजे हा किंवा तो मुद्दा पटवून देण्यासाठी निबंध- असे आहे.
ही अडचण फडके किंवा खांडेकर यांची नव्हती. दोघांच्याही डोळ्यांसमोर आदर्श म्हणून असणा-या गार्डिनरच्या निबंधांचे स्वरूप असेच होते. कारण तोही गोष्टीवेल्हाळपणे कोणता-ना-कोणतातरी उपदेश इंग्लंडच्या जनतेला करू पाहत होता. त्याचाही प्रत्येक निबंध कोणत्यातरी मुद्दयाच्या सिद्धीकडेच जात होता. मुद्दा सांगण्यासाठी निबंध, विचार गळी उतरविण्यासाठी निबंध, हे जे निबंधाचे मूळ रूप त्याला गोष्टींची जोड दिल्यामुळे तो उपदेश शास्त्राप्रमाणे कठोर राहिला नाही. पण उपदेश कांतासम्मित झाला, तरी त्याची मूळ प्रवृत्ती उपदेशाचीच आहे. काणेकरांच्या विरोधाभासात्मक मांडणीमुळे हे उपदेशप्रधान स्वरूप चटकन जाणवत नाही. त्यांचे संवादकौशल्य, त्या निबंधात असणारा अवखळ विनोद, गणूकाकांची रमणीय व्यक्तिरेखा या सगळ्यांनी मन जिंकले, तरी तोही निबंध शेवटी मुद्दा पटवून देण्यासाठीच आहे. त्यातील उरलेल्या सर्व बाबी सजावटीच्या आहेत. आपण मुद्दा पटवून देत आहो, एक विचार वाचकांच्या मनात पेरीत आहो, हे वाचकांच्या लक्षात येऊ नये, म्हणून कधी कथा, कधी आठवणी, कधी संवाद, कधी दिलखुलासपणाचा भास निर्माण करणारी पण योग्य ठिकाणीच घेऊन जाणारी विषयांतरे हा सगळा सजावटीचा भाग होता. विविध कारागिरीने सजविलेल्या या मखरात ठराविक बोधाचा गणपती निश्चलपणे मांडी घालून बसलेला असे. कुणाची सजावट कृत्रिम पण देखण्या फुलांची होती; कुणी या फुलांच्याऐवजी वनश्री आणि झाडेझुडपे, पाने-फुले, वारे-तारे गोळा करून आणली होती; कुणी मखर म्हणून वादविवाद करणारे जय-विजय दारावर उभे केले होते; पण ती होती सगळी सजावटच.
हा निबंध रंजक नव्हता, आकर्षक नव्हता, किंवा वाचकांचा आवडता नव्हता, असा याचा अर्थ नाही. कारागिरी आणि करमणूक यांतही वाचकांना बांधून ठेवण्याचे सामर्थ्य असतेच. तिथेही विरंगुळा असतोच; पण लेखनातील ही आकर्षकता आणि मोहकता म्हणजे लालित्य नव्हे; ती कलात्मकता नव्हे; एवढेच येथे सुचवावयाचे आहे. लघुनिबंध म्हटले तरी निबंध, ललितनिबंध म्हटले तरी निबंध, आणि निबंध म्हणजे मुद्दा पटवून देणे, ही जोपर्यंत भूमिका आहे, आणि जोपर्यंत गुजगोष्टी तात्पर्यासाठी आहे, तोपर्यंत सगळेच प्रकार विशेष मांडणीचे ठरतात. प्रकृती ठरीव, मुद्दा सांगणारी आणि सजावट शोभेची. या वर्तुळाला छेद देता येणे या ललितनिबंधाला शक्य नव्हते. कारण वर्तुळाच्या बाहेर पडण्यासाठी लागणारी खरी चिंतनशीलता किंवा खरी संवेदनक्षमता फडके, खांडेकर काणेकर यांच्या प्रकृतीतच नव्हती. म्हणून हा वाङ्मयप्रकार १९४० नंतर क्रमाने कोमेजला होता. १९४५ नंतर तर तो सुकल्यासारखाच वाटत होता. शेवटी रंजक उपदेशाला कलेचा जिवंतपणा लाभेल. ही अपेक्षाच चुकीची होती.
या वातावरणात इरावतींच्या ललित-निबंधाने आपली पहिलिवहिली पावले टाकली. बाईंच्याबरोबर आणखी एका लेखिकेचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे. ती लेखिका म्हणजे कै.कुसुमावतीबाई देशपांडे ह्या होत. कुसुमावतीबाईंच्या आकलन-अवलोकनाचा परिघ आणि खोली यांना फार मोठ्या मर्यादा होत्या भोवतालच्या निसर्गजीवनाचे हळुवारपणे चित्रण करण्याचा प्रयत्न करतानाही त्या सांकेतिकता पूर्णपणे बाजूला सारू शकत नव्हत्या; पण या सार्या मर्यादा मान्य करूनही कुसुमावतीबाईंच्या रूपाने हळवे, स्वप्नाळू आणि खरेखुरे संवेदनक्षम मन मराठी ललितनिबंधात प्रथमच व्यक्त होत होते. महायुद्धोत्तर काळात मराठी लघुनिबंध फार मोठ्या जोमाने विकसित झाला असे म्हणता येणार नाही, तरी सुद्धा ललितनिबंधातील खरी कलात्मकता आणि खरे लालित्य याचनंतरच्या काळात अभिव्यक्त झाले. विंदा करंदीकर, श्रीनिवास कुलकर्णी, पाडगावकर आणि या सर्वांना काकणभर सरस असणारा अनेकपदी, गुंतागुंतीच्या, सूक्ष्म, भावगर्भ व विचारगर्भ अनुभवांना शब्दबद्ध करणार्या दुर्गा भागवत यांचा ललितनिबंध या कालखंडातील आहे. ज्याला ख-या अर्थाने एखाद्या वाङ्मयप्रकाराचा विकास म्हणता येईल. तो या लेखकांच्या ललितनिबंधामध्ये जाणवतो. इरावतीबाईंच्या ललितनिबंधाकडे या नव्या आणि ख-याखु-या ललितनिबंधाचा अग्रदूत म्हणून पाहिले पाहिजे.
इरावतींचे मन त्यांच्या विशिष्ट जीवनक्रमामुळे तीन पातळ्यांवर वावरणारे मन होते. आपण संसार मांडलेल्या गृहिणी आहो, पत्नी या नात्याने व माता या नात्याने आपणांवर पडणाच्या जबाबदा-या आपण पार पडल्या पाहिजेत. ही गृहिणीची भूमिका त्यांच्या मनातून काही बाजूला सरकली नाही. त्या एक कर्तव्यदक्ष गृहिणी होत्या, असे म्हणणे त्यांच्यावर थोडेसे अन्यायकारक होईल. कारण संसार त्यांनी कर्तव्य म्हणून पतकरिलेला नव्हता, गृहिणीची भूमिका कर्तव्य म्हणून पार पडलेली नव्हती. मनाने सुसंस्कृत असणा-या आणि जीवनात रस घेणा-या या विदुषीला आपण स्त्री आहोत, गृहिणी आहोत. याची उपजत जाणीव होती. मातृत्वात आपल्या जीवनाची परिपूर्ती आहे, याचीही उपजत जाणीव होती. म्हणून त्या घरात, संसारात, आपल्या प्रिय पतीत, मुलाबाळांत मनाने समरस झालेल्या आणि रमलेल्या आहेत. तो जण त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक उपजत धर्म आहे. त्यात कर्तव्याच्या भावनेपेक्षा अंगभूत आपलेपणाची भावना अधिक महत्वाची आहे. या गृहिणीपदातून निर्माण झालेले मन हा इरावतींच्या मनाचा एक कायमचा भाग आहे. कोणत्याही प्रश्नाचा विचार करिताना आपण एक सांसारिक स्त्री आहो, या जाणिवेचा विसर त्यांना कधी होत नाही.
पण ही सांसारिक स्त्री दुस-या बाजूने समाजशास्त्रज्ञ आहे. समाजशास्त्राच्या अध्ययनात एकतर त्यांना संपूर्ण भारतभर हिंडावे लागले. भारताच्या बाहेरही व्याख्यानांच्या निमित्ताने, अभ्यासाच्या निमित्ताने पाश्चात्य जीवनात त्यांना वावरावे लागले; आणि दुसरे म्हणजे विविध जाती, विविध संस्कृती आणि विविध तत्त्वज्ञाने यांचा व्यासंग करावा लागला. मानववंशशास्त्रात त्यांना रस असल्यामुळे देशोदेशीच्या सहस्त्रावधी वर्षे प्राचीन असणा-या, उत्खननातून बाहेर पडलेल्या संस्कृती, जगभर पसरलेले वन्य समाज, त्यांच्या चालीरीतींची विविधता आणि भारतीय संस्कृतीचा काही प्रमाणात बदललेला आणि काही प्रमाणात न बदलता तसाच उरलेला एक सांस्कृतिक आणि सामाजिक असा भव्य पट, या सर्वांच्या निकट परिचयामुळे हिंदू स्त्रीच्या मनात असणाच्या स्वाभाविक ग्रह-आग्रहांपासून आणि सांकेतिकतेपासून त्यांचे मन बरेच अलिप्त झालेले आहे. जीवनाची विविधता सतत न्याहाळीत असल्यामुळे आणि उदारमतवादी वैचारिक भूमिकेत त्यांचे संगोपन झालेले असल्यामुळे त्या जीवनाच्या हिडीस आणि कुरूप भागाकडे तटस्थतेने पाहू शकतात. आत्मीय आणि आपल्या असणार्या माणसांकडे त्यांनी कितीही जिव्हाळ्याने पाहिले, तरी त्यांच्यातला शास्त्रज्ञ नेहमी सावध, जागा असतो. आणि वासनांच्या चित्रणाचा त्यांनी जरी धसका घेतला नसला, तरी त्यांखेरीज असणाच्या जाणिवा त्यांना महत्त्वाच्या वाटतात. उपाशी माणूस अन्नाकडे जसे पाहतो, तसे वासनांचे विकृत आकर्षण त्यांच्याजवळ मुळीच नाही. एका तृप्त आणि व्यासंगी अशा मनाने, तृप्त झाल्यामुळे विरागी झालेल्या मनाने, व्यक्तीच्या आणि समाजाच्या सगळ्या दु:खांचा स्पर्श त्या वाचकांना घडवून देतात, आई ज्याप्रमाणे आपल्या मुलाच्या मलमूत्र विसर्जनाकडे पाहील, त्याप्रमाणे जीवनातील अभद्र आणि बीभत्स त्यांनी तटस्थ ममतेने न्याहाळलेले आहे. हा त्यांच्या मनाचा अतिशय गुंतागुंतीचा आणि तितकाच महत्त्वाचा असा दुसरा भाग आहे.
आणि तरीही बाईंचे मन नवनवे अनुभव घेण्यासाठी, टिपण्यासाठी सदैव उत्सुक असणारे आहे; त्यांच्या मनाची संवेदनक्षमता भोवतालचे प्राणी, पशू पक्षी, निसर्ग, वनस्पती, पाने, फुले या सर्वांशी जवळीक साधणारी आहे. या संवेदनक्षम मनाने सहजगत्या निसर्गाची व भोवतालच्या समाजाची नानाविध चित्रे टिपलेली आहेत. ही चित्रे टिपताना सहवासाने आपले माणूस सुंदर वाटू लागते, तसाही प्रकार पुष्कळ वेळा घडलेला आहे. ज्यांचे बौद्धिक सामर्थ्य सामान्यांच्यापेक्षा थोडेसे अधिक असते, त्यांच्या इंद्रियांना प्रत्येक घटनेचा अर्थ हुडकण्याची एक अपसूक सवय लागलेली असते. या सवयीमुळे इंद्रियसंवेदनांचा जिवंत ताजेपणा अनुभविण्याची त्यांची क्षमता मंदावलेली असते. आणि ज्यांची इंद्रिये रंग-गंधांच्या जाणिवांना हपापलेली असतात, ऐंद्रिय संवेदनेची प्रत्येक छटा ज्यांच्या मनाला जिवलग मैत्रिणीप्रमाणे मिठी घालते, त्यांची पुष्कळदा घटनांचा अर्थ लावण्याची क्षमता बोथट झालेली असते. इरावर्तीच्या बाबतीत घडले आहे ते असे की, त्यांच्या बौद्धिक क्षमतेने इंद्रियांची क्षमता अधिक डोळस केलेली आहे. त्यांच्या इंद्रियांच्या क्षमतेने बुद्धीचा काही प्रमाणात विकासच घडविलेला आहे, आणि कडे-खांद्यावर मुले घेऊन समाधानाने अडखळत चालणा-या गृहिणीप्रमाणे त्यांच्या विशाल व्यासंगाने आद्य मानव- संस्कृतीपासून वर्तमानकाळापर्यंत आपली सौंदर्यबुद्धी व तर्कविलास यांच्यासह लीलया, हसत-हसत आणि नकळत प्रवास केलेला आहे.
असे हे तीनपदरी मन इरावतींच्या लिखाणात एका एकसंध व्यक्तिमत्त्वाचा भाग म्हणून अवतीर्ण होते. आणि म्हणून इरावर्तीचे लिखाण वाचताना पुष्कळदा वाचकाचे मन भारावून जाते, गोंधळून जाते. शास्त्रज्ञ आणि कवी असणारी ही गृहिणी ज्या वेळेला हळूच जवळ घेऊन कुरवाळीत असते, प्रकृतीची वास्तपुस्त करीत असते, त्या वेळी उगीचच हे जाणवत राहते की, हा जिव्हाळा खरा असला, तरी केवळ आपल्यापुरता मर्यादित नाही. कालच उत्खननात सापडलेल्या अस्थींचे सांगाडे हिने इतक्याच हळुवारपणे कुरवाळले असतील; आणि उद्या हिमालयाच्या सरहद्दीवर जिवंत माणसांच्या कवट्यांची मापे आणि रक्तांचे नमुने गोळा करण्यासाठीही जाणार असेल; ज्या कौतुकाने ही आपल्या पाठीवरून हात फिरवीत आहे, त्याच कौतुकाने ही उद्या उमलणाच्या पानाफुलांकडे पाहील; आणि दर वेळी कुंती-गांधारीपासून मध्ययुगीन स्त्रीपर्यंत आणि भारतीय स्त्रीपासून युरोपीय स्त्रीपर्यंत सर्व देशांत, सर्व काळांत जी आदिमाता वावरत होती. तिच्याविषयीचे विचार हिच्या मनात घोळत असतील. आणि एकदा असे जाणवू लागले की, शेजारी खुर्चीवर बसून खाद्यपदार्थाच्या चर्चा करणारी ही स्त्री जवळ असूनही खूप दूर गेल्यासारखी वाटू लागते. आपली असून आपली नसणारी, सर्वांची असून कुणाचीच नसणारी, मिठीच्या आटोक्यात असून फार मोठ्या आकारामुळे कवेत न सापडणारी, अशी ही चमत्कारिक, तरीही ओळखीच्या मनाची स्त्री एकदम मन भारावून टाकते; तितकेच गोंधळून टाकिते.
कारण इरावतींच्या मनात सगळे अनुभव एकाच वेळी ताजे असतात. बालपणी जे जीवन ती जगली, त्याच्या आठवणी एकदम काल घडल्याप्रमाणे ती सांगू लागते. आणि ज्या वेळी ती लहान होऊन बोलू लागते, त्याच वेळी आपल्या मोठ्या आईशी समरस होऊन ती तिचे दु:ख समजून घेत असते. कारण हे दु:ख जणू तिच्या आईचे नव्हतेच. सासरी गेलेल्या आपल्या मुलीच्या आठवणीने व्याकूळ झालेली इरावती आपल्या बालपणात आपली मुलगीही पाहते आणि आपली आईही पाहते. वेगवेगळ्या पातळ्यांशी समरस होण्याची इरावतींची शक्ती, भूत-वर्तमान आणि भविष्य या काळांचे जीवन एका क्षणी जगण्याची तिची जिद्द तिला एकाच क्षणात परकरी पोर, अल्लड तरुणी आणि प्रौढ आई करून टाकिते. आणि सारेच अनुभव ती दरक्षणी जिवंतपणी भोगीत असते. हा अनुभवांचा जिवंतपणा, विचार आणि भावना या सगळ्यांना आपल्यात समावून घेत असतो आणि तरीही पुन्हा हे सगळे कुठूनतरी दुरून न्याहाळणारी तटस्थ इरावती या सर्वांचा एकूण मानवी जीवनातला अर्थ लावीत असते. तो अर्थ सर्वांना समजावून सांगण्यासाठी धडपडणारी मास्तरीण तीच असते. एका निबंधात बाईंनी म्हटले आहे की, मुंग्यांना द-याखोच्या आणि पर्वत जाणवतच नसतात. आपणाला सपाट वाटणाच्या सडकांवर पडलेला प्रत्येक खळगा ही त्यांच्या लेखी दरी असेल आणि प्रत्येक उंचवटा त्यांच्या लेखी पर्वत असेल. आपल्याला ज्या दर्या आणि पर्वत जाणवतात, त्या दर्या आणि ते पर्वत मुंग्यांना जाणवण्याचा संभव फार कमी.
ज्या इरावतीने हे लिहिलेले आहे, त्याच इरावतीने शत-शतकांच्या संस्कृतीच्या अभ्यासाने समृद्ध झालेले आणि सर्व प्रकारच्या तृप्तीने बहरलेले आपले एकाच वेळी लिप्त आणि विरागी असणारे मन सर्वांना उकलून दाखविण्याचा, समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मोठी माणसे मुद्दाम मुलांच्या जवळ जाण्यासाठी बोबडे बोलू लागली, म्हणजे मुलांना जसे काही ओळखीचे, काही दूरचे, काही जिव्हाळ्याचे आणि काही परके असे जाणवते, तसा प्रकार इरावतींचे लिखाण वाचताना सारखा घडतो. चिंतनशीलतेची, संवेदनांची अफाट क्षमता असणारे इरावतींचे वत्सल मन त्यांच्या निबंधांत ठिकठिकाणी व्यक्त होत राहते. म्हणून त्यांना नव्या मराठी ललित-निबंधाचे अग्रदूत असे म्हणावयाचे. एरव्ही, अशा कोणत्या वाङमयप्रकाराचा जाणीवपूर्वक विचार त्यांनी केलेला दिसत नाही.
ठरलेली मते सजवून मांडणारा निबंध आणि चिंतनशील मनाचा
गंगाजल / 145
आविष्कार यांत मूलत:च फरक असतो. अनुभव घेत असताना त्या अनुभवांची संगती लावणे आणि भाष्पनिरूपणांसह सर्व अनुभव पुन्हा अनुभवाच्याच पातळीवर शिल्लक राहणे, ही प्रक्रिया म्हणजे चिंतनशील मनाचा एक धर्म असतो. चिंतनशील मन हे प्रत्येक घटनेवर निरूपण करीतच असते, त्याची संगती लावीत असते. त्या ठिकाणी असणारा विचार नेहमीच सर्वस्वी नवा असतो असे नाही, पण तो अनुभवाचा भाग असतो. आणि ज्या वेळी पूर्वसिद्ध विचार सजवून मांडिलेले असतात, त्या वेळी विचारांना सोयीस्कर होतील असे प्रसंग हुडकून एकत्र आणिलेले असतात. सजावटीसाठी सावडून आणलेल्या सामग्रीलाही अनुभवाच्या पातळीवर जिवंत होता येणे शक्य नसते, आणि या प्रसाधनाशी मूळ विचार एकरूप होणेही शक्य नसते, चिंतनशील मन नुसता विचार करीत नसते, तर तो विचार त्या व्यक्तिमत्वाने रंगलेलाही असतो. इरावतींचे मन हे असे चितनशील मन असल्यामुळे त्यांचा निबंध ललित आणि वैचारिक यांच्या सीमारेषेवर वावरत असतो. कित्येकदा तो वैचारिकाच्या बाजूने अधिक झुकतो आणि मग विचार म्हणून ती मांडणी कितीही रेखीव झाली, तरी ती आपला जिवन्तपणा हरवून बसते. कित्येकदा हा निबंध आपल्याच अनुभवाची संगती लाविताना हरवून जातो आणि मग विविध अनुभवांच्या संगतीचे सूत्र हरवल्यामुळे विस्कळित वाटू लागतो. पण हे दोन्ही प्रकार त्यांच्या लिखाणात पुन:पुन्हा घडतात हे मान्य केले, तरी त्यामुळे या निबंधाचा वेगळेपणा संपत नाही. मी निबंध शब्द वापरतो आहे खरा, पण इरावतींच्या सगळ्याच लिखाणाचे स्वरूप नेहमीच निबंधासारखे असेल, असे नाही. कधी तो निबंध असतो, कधी त्या नुसत्याच आठवणी असतात. कधी प्रवासवर्णन असते, कधी त्यात निरनिराळ्या व्यक्तिरेखा असतात; या ललितनिबंधात इरावतींच्याबरोबर त्यांच्या मुली, जावई, मुले, पती, मित्र हे सगळे डोकावून जातात. कित्येकदा तर ही नावे नुसती नावे म्हणून शिल्लक राहत नाहीत. तीही आपापले व्यक्तिमत्त्व घेऊन इरूच्या वाङमयात हक्काने प्रवेश करितात.
ही कल्पिताची सृष्टी आहे. तिला वास्तवाचे निदान स्थलकालनिबद्ध वास्तवाचे संदर्भ नसावे, हे बंधन इरावतीबाईंनी कधी पाळलेले दिसत नाही. आणि या स्थलकालनिबद्ध वास्तविक सत्याने त्यांच्या वाङमयातील सार्वत्रिक सत्याला कधी अडथळा आणिलेला दिसत नाही. स्थलकालाच्या खुंट्यांना बांधून ठेविलेले एक प्रकारचे सत्य, स्थल-कालाला न बांधलेले पण सार्वत्रिक असणारे दुसऱ्या प्रकारचे सत्य, कल्पनेत, भावविश्वात, सांस्कृतिक मूल्यांत असणारे तिसऱ्या प्रकारचे सत्य, आणि ललित वाङमयात कलात्मक पातळीवर जाणारे आणखी चौथ्या प्रकारचे सत्य-अशी सत्यांची वर्णव्यवस्था इरावतींनी कधी मानिली नाही. ती त्यांना कुणी समजावून सांगितली असती, तरी पटलीही नसती. त्यांच्यात असणारा समाजशास्त्रज्ञ त्यांना पुन:पुन्हा बजावून सांगत होता की, 'ही स्त्री बाळंत झाली, ती स्त्री बाळंत झाली, अशी शेकडो स्थल-कालविशिष्ट सत्ये एका सार्वत्रिक सत्याच्या पोटात असतात आणि हे सार्वत्रिक सत्यच विविध पातळ्यांवर वावरत असते. विशिष्टातून ते सामान्याचा बोध करून देते. संशोधनातली सगळी अनुमाने या जातीची असतात. हेच सामान्याच्या संदर्भात विशिष्टाचा अर्थ लावते. सगळी मानवी आकलनशक्ती या जातीची असते. आणि ज्याला आपण संस्कृती म्हणतो, तीही इतकी खरी असते, इतकी चिवट असते की, प्रकृतीला तिच्यामुळे जुळते घ्यावे लागते; आणि सगळेच कलेत यावयाचे असते. जर माझ्या ललित-निबंधात 'मी' असेन, तर जेथे मी आहे, तिथे माझे मन, माझी नाती-गोती, माझे सोयरसंबंध आपोआप येणारच. जर माझ्या लालित्याला माझाच अडथळा होणार असेल, तर मग ती कला खरीही नाही, आणि ती मग माझीही नाही.'
इरावतींच्या संशोधक मनाने ललितवाङमयाच्या प्रकृतीचा अभ्यास न करिता अजाणताच एक वाङमयीन सत्य हेरलेले होते. त्या सत्याचे स्वरूप असे आहे की, ललितवाङमयात सगळीच नावे एकाच वेळी खरी आणि खोटी असतात. त्या नावांच्या पाठीमागे उभी असणारी व्यक्तिमत्त्वे जितकी विशिष्ट असतात, तितकीच सार्वत्रिक असतात. किंबहुना, अनुभव जितके व्यक्तिविशिष्ट होतात, तितके ते जास्त सार्वत्रिक होतात. अनुभवांचा जिवंतपणा असला, म्हणजे स्थलकालांनी बांधलेले सत्य स्थलकालाचा अडथळा न होता आपोआप सार्वत्रिक होते. लक्ष्मीबाईंच्या स्मृतिचित्रांच्या- प्रमाणे. आणि जर हा अनुभवांचा जिवंतपणा नसला. तर मग सार्वत्रिक सत्य असो, की वैयक्तिक सत्य असो, भाषा-शैलींचे खांब कलेचा तंबू उभा ठेवू शकत नाहीत. सारेच भुईसपाट होते. कारण ते मुळातच सपाट असते.
वैचारिक आणि ललित यांच्या सीमेवर वावरणाऱ्या इरावतींच्या एकूण जीवनविषयक दृष्टिकोणातच एक सूक्ष्म अशी विसंगती आहे. ही विसंगती त्यांना जाणवलीच नाही हे खरे, की ही विसंगती जाणवूनसुद्धा त्यांनी ती जतन केली हे खरे, याविषयी नक्की निवाडा कुणाला देता येईल, असे वाटत नाही. एका सुसंस्कृत अशा उदारमतवादी वातावरणात इरावतीबाई वाढल्या. या उदारमतवादी भूमिकेविषयीचा त्यांचा जिव्हाळा कधी आटला नाही. हिंदुस्थानातील नेमस्त, मवाळ पक्ष एक राजकीय पक्ष म्हणून समाप्त झाला, त्या वेळी इरावतीबाई हळहळल्या. पण हे हळहळणे त्या वेळेपुरतेच नव्हते. पुढे रँग्लर परांजप्यांच्याविषयी लिहिताना हा उदारमतवादाविषयीचा जिव्हाळा पुन्हा एकदा उसळून आलेला आहे. उदारमतवादाविषयी जिव्हाळा असणाऱ्या विदुषीला बेंथमविषयी मात्र फारशी आपुलकी वाटत असलेली दिसत नाही. सदगुणांच्यासाठी सदगुण ही भूमिका मूर्खपणाची आहे. जे परिणामी चांगले, जे बहुतेकांच्या व बहुसंख्येच्या बहुत हिताचे ते चांगले, असे मानणारा जेरमी बेंथेम हा मात्र बाईंना कालिदासाने रंगविलेल्या सिंहाचा नवा अवतार वाटला. अर्थशास्त्रात अॅडम स्मिथ आणि रिकार्डो व काही प्रमाणात बेंथम, समाजचिंतनात मिल, स्पेन्सर आणि बेंथम ही इंग्लंडच्या उदारमतवादाची दैवते होती.
उदारमतवाद हे मुळातच आशिया-आफ्रिकेच्या शोषणावर पुष्ट झालेल्या समृद्ध अशा व्यापारी संस्कृतीचे तत्वज्ञान होते. त्या उदारमत- वादाचा जिव्हाळा बाई कधी टाळू शकल्या नाहीत; आणि हिंदुस्थानभर पसरलेले अफाट दारिद्य आणि दु:ख यांविषयीची कणव त्या कधी टाळू शकल्या नाहीत. उदारमतवाद ज्या निरनिराळ्या योजना आखीत होता, त्या योजनात बाईंना रस नव्हता. स्त्री शिकली म्हणजे सुसंस्कृत होते, स्त्रियांच्या शिक्षणाने त्यांची दु:खे कमी होतील, घटस्फोटाची सोय व्यक्तिस्वातंत्र्य वाढवून व्यक्तीला अधिक सुखी करील, अशा प्रकारच्या कोणत्याच भोळ्या वादावर बाईंचा विश्वास नव्हता. सुधारणावादी कार्यक्रम सुख वाढविणारा आहे, हेही त्यांना पटत नव्हते. अफाट भारतीय दारिद्यावर उदारमतवाद हा तोडगा आहे, यावर त्यांचा विश्वास नव्हता. उदारमतवाद प्रत्येक वेगळेपणाची जपणूक करितो; इतस्ततः आंढळणारा वेगळेपणा उदारमतवादाला व्यक्तिस्वातंत्र्याची आवश्यक अट वाटते. या अलगीकरण आणि विभक्तीकरण टिकविणाऱ्या कार्यक्रमावर त्यांचा विश्वास नव्हता.
वेगवेगळी मते टिकावी. व्यक्तिस्वातंत्र्य असावे, असे त्यांना वाटे. पण आदिवासी समूहांच्या भिन्न-भिन्न संस्कृतींची जपणूक करण्याच्या प्रयत्नात देशातील जो फुटीरपणा जोपासला जात आहे, तो कार्यक्रम मात्र त्यांना मान्य नव्हता. शिक्षणाच्या वाढीमुळे भ्रमनिरास झालेले सुशिक्षित तरुण वाढतात, हे त्यांना दिसत होते. शिक्षण मनाचा सुसंस्कृतपणा वाढविण्याला असमर्थ ठरले आहे, तसेच ते सुखाच्या वाढीलाही उपयोगी ठरत नाही, हेही त्यांना दिसत होते. पण समाजाला काही मूलभूत परिवर्तनाची गरज आहे, असे मात्र त्यांना कधी जाणवत नव्हते. प्राचीन संस्कृतीविषयीची ओढ, भिन्नभिन्न प्रकारच्या समाजांचा अभ्यास यांमुळे बाई उदारमतवादाच्या मर्यादांपर्यंत येऊन पोहोचल्या होत्या. पण त्या मर्यादा ओलांडण्याला त्यांचे मन जणू धजावत नव्हते. उदारमतवादच व्यक्तिस्वातंत्र्य टिकवीत नसतो. एकाच समाजात एकाच वेळी नांदणारी हट्टी, संघर्षमय तत्वज्ञाने परस्परांशी संघर्ष करतानाही व्यक्तिस्वातंत्र्यच टिकवीत असतात, असे बाईंना कधी वाटले नाही. त्यांच्याजवळ आईची करुणा होती; पण त्यांचे सश्रद्ध मन मुळातच उलथापालथ करण्याला धजत नव्हते. इतकाच याचा अर्थ.
याचा परिणाम असा झाला आहे की, इरावतीबाई एकीकडे दारिद्य, उदध्वस्तता, रोग, विद्रूपपणा आणि दुसरीकडे समृद्धी, विविधता टिपीत चालल्या आहेत; मधूनमधून भय, भीतीच्या जाणिवाही आहेत; मृत्यूचे स्मरण आहे; पण त्याबरोबरच सहस्त्र पिढ्यांचा अनुबंध आहे. म्हणून बाईंना सगळेच हवेसे वाटते. त्या आग्रहाने कशाच्या विरुद्ध उभ्या राहू शकत नाहीत. मनाच्या या घडणीमुळे त्यांच्या लिखाणाची विविधता वाढली आहे. पण हे लिखाण काहूर आणि करुणा यांच्या काठांवर थांबणारे आहे; पलीकडच्या काठावर जाण्याची प्रेरणा देणारे नाही. कारण ते कशाच्याचविषयी चीड निर्माण करू शकत नाही. सामाजिक चिंतनात विरोधकांचे सामर्थ्य आणि महत्व जाणणे यालाही महत्व आहे. पण स्वत:च्या आग्रहांनाही काही महत्व आहेच आहे. उदारमतवाद अशा प्रकारची काठापर्यंत जाणारी चिरफाड करू शकत नसतो. फुटू पाहणारे कुटुंब सावरून धरण्याची धडपड करणाऱ्या म्हाताऱ्याप्रमाणे उदारमत-वादाची अवस्था असते.
ललितवाङमयाचे स्वरूप प्रेरक असलेच पाहिजे, असा आग्रह धरण्याचे कारण नाही, हे मलाही समजते. पण ज्या वेळी एखाद्या चिंतनशील मनाच्या सहवासात आपण येतो, त्या वेळी या चिंतनशील मनाने नुसता मनाचा समजूतदारपणा वाढवू नये. भिन्नभिन्न प्रकारे अनुभव घेण्याची सवय
गंगाजल / १४९
लावून केवळ मनाची समृद्धी वाढवू नये, तर विचारांना एक दिशा द्यावी, अशी अपेक्षा असते. इरावती जर समोर दिसणारे अनुभव नाकारून पुढे गेल्या असत्या, तर आपल्या मर्यादित वर्तुळात एखादी संगती त्यांना शोधताही आली असती. पण समोर दिसणारे दाहक सत्य नाकारणे त्यांच्या स्वभावात नव्हते, आणि हे सत्य जर स्वीकारायचे असेल, तर त्या संदर्भात विचारांचे शेवटचे टोक गाठले पाहिजे, अशी त्यांची तयारी नव्हती. कदाचित याचे कारण हेही असेल की, भारतीय स्त्रीच्या उपजत मनाप्रमाणे त्यांनी दु:खांची अपरिहार्यता स्वीकारलेली होती. प्राकृतिक दु:खे, सांस्कृतिक दु:खे आणि सामाजिक दु:खे हा सर्व यातनांचा भोग माणसाला अपरिहार्य आहे, याची जाणीव अगदी तरुणपणापासून त्यांच्या मनात वावरत असताना दिसते. बिहारमध्ये आपल्या कामानिमित्ताने फिरताना त्यांना आढळून आले की, गंगेच्या सुपीक खोर्यात चार भिंतींच्या कोंडवाड्यात बायका केवळ स्वयंपाक करून, यजमानांची वाटच पाहत बसतात. मुलीने विचारले, "जन्मभर असे वाट पाहत कुजतच बसायचे काय?" बाईंनी भारतीय स्त्रीच्या दु:ख अपरिहार्य मानणाच्या थंड मनाने उत्तर दिले, “नाही, त्यांना फार वेळ कुजत बसावे लागत नाही. आजार त्यापूर्वीच त्यांनी सुटका करतात."
दु:ख टाळण्याकडे आणि ते टाळल्यानंतर डोळे झाकून घेऊन स्वप्नात रमण्याकडे बाईंची कधी प्रवृत्ती नव्हती. जी दु:खे आहेत, ती आहेत, ती नाहीत म्हणून चालणार नाही, याचीही त्यांना जाणीव होती आणि ही दु:खे कधी संपणारी नाहीत, याचीही त्यांना जाणीव होती. एकेक अनुभव त्यांना थेट दु:खाच्या गाभ्याजवळ घेऊन जात असे. या दु:खाच्या गाभ्याजवळ आपण पशुंच्या कितीतरी जवळ आहोत, अशी त्यांना अचानक आठवण येई. वारक-यांच्या तांड्याबरोबर हरिनामाचा गजर करीत जातानासुद्धा अचानकच कुठेतरी न टळणारे दु:ख एखाद्या म्हातारीचे रूप घेऊन त्याच्यासमोर उभे राही. सहजगत्या एखाद्या वृद्धेला नातवंडांच्याविषयी प्रश्न विचारावा, तर तिचे डोळे मिटत, तोंड भेसूर दिसू लागे. सारे शरीर भीतीने थरथरत असे. कुत्रीच्या पिलाला जेव्हा जनावर चावले, तेव्हा तीही अशीच भीतीने थरथरत होती, याची आठवण हे मानवी दु:ख पाहताना बाईंना येते. कुठे उत्खननासाठी जावे, तो एखादा युद्धात मारलेल्या माणसाचा सांगाडा सापडत असे, आणि मग अचानक अशी हुरहूर लागायची की, याच्या १५० / गंगाजल
शेजारी एखादी जिवंत तरुणी मारून पुरलेली असावी. स्त्रीजात गरजेनुसार वापरायची. स्त्री म्हणजे केवळ कातडीची थैली. पुरुष हा पुत्ररूपाने पुन्हा जन्मतच असतो. मूल पित्याचे, आई फक्त साधन, असे सांगणारी भारतीय सांस्कृतिक परंपरा कितीही यातनामय असली, तरी ती इरावतींना जवळची होती. कारण ती त्यांची स्वत:ची परंपरा होती.
चौफेर उपस्थित असलेल्या या दु:खाच्या अस्तित्वाने बाई सदैव घेरलेल्या आहेत. मध्येच कुठेतरी मारी-कुट्टीसारखी एखादी कुरूप स्त्री असते. तिच्या केसाच्या मळसूत्राकार गुंडाळीत थकवा येईपर्यंत उवा फिरत असतात. वेड्यांच्या दवाखान्यात ती परिचारिका म्हणून असते. वास्तविक जग विसरून जे मिळविता आले नाही, ते मिळाल्याच्या भ्रांतीत वेडे वावरत असतात; आणि असेच एक खोटे स्वप्नसाम्राज्य निर्माण करून मारी-कुट्टी आपल्या अर्थशून्य जीवनाला अर्थ देण्याचा प्रयत्न करीत असते. कुठे देवळांच्या भोवताली पसरलेले निरनिराळ्या रोगांचे जंगल असते. कुठे ही दु:खे सांस्कृतिक रूप धारण करतात; आणि त्यांचे स्वरूप सांस्कृतिक कारणांमुळे अधिक उत्कट व्हायला लागते. मुले मोठी होतात; आणि मग त्यांना स्वत:च्या जीवनाची गती लागते. म्हातार्या माणसांना एकाएकी आठवण येते की, आता आपली गरज संपलेली आहे. गरज संपल्यानंतरही टिकून राहण्याचा केविलवाणा अट्टाहास कमी यातनांना जन्म देत नाही! तर कुठे मानवी प्रयत्नांची सगळी व्यर्थताच समोर दिसू लागते. किंकाळी फोडणार्या मुलाच्या मदतीला आपण गेलो, हेही व्यर्थच. असे मदतीला आपण गेलो नसतो, तर तेही व्यर्थच! समाजाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करून आपला एकटेपणा विझविला, तरी तोही प्रयत्न व्यर्थ ठरतो, आणि आपल्या एकाकीपणात रमावयाचे असे म्हटले, तर ते रमणेही व्यर्थ ठरते. अशा प्रकारच्या नानाविध दु:खांनी, मृत्यूच्या व भीतीच्या जाणिवांनी, निसर्गात मूलभूत असणारे क्रौर्य आणि त्या क्रौर्याच्या प्रतिकारार्थ नेहमी- नेहमी लुळी पडणारी संस्कृती, अशा जाणिवांनी इरावतींचे अस्तित्व घेरलेले आहे.
या दु:खांकडे पाहताना इरावतींनी मरणाची अपरिहार्यता स्वीकारलेली आहे. शरीराच्या आणि मनाच्या वाढीबरोबर येणारी माणसांची ताटातूट हीही एक अटळ घटना म्हणून मान्य केली आहे. सांस्कृतिक दु:खाचा
अटळपणातर इरावतींना मान्य करणे भागच होते. कारण त्या व्यथेच्या गंगाजल / १५१
भोगातूनच माणसाची माणुसकी शिल्लक राहते. ही विविध दु:खांची अपरिहार्यता स्वीकारीत स्वीकारीत इरावतींचे मन सामाजिक दु:खांकडे आणि विकृतींकडेसुद्धा एक अपरिहार्य व्यथा म्हणूनच पहावयाला शिकले आहे. निदान सामाजिक दु:खांतून माणसाची सुटका करिता येईल, असाही विश्वास त्यांना वाटत नाही; मात्र दु:खाच्या या चौरस जाणिवेने त्यांच्या श्रद्धा ढासळलेल्या नाहीत; मन खचलेले नाही; भट्टीत तापविल्यामुळे सोने अधिकच उजळ व्हावे. त्याप्रमाणे वेदनेच्या भट्टीत दर क्षणी जळताना इरावतींचे मन अधिक उदार आणि सुसंस्कृत झाले आहे.
वेदनेचा स्पर्श नसणारे एक अप्रौढ बालमन घेऊन सगळ्याच घटनांकडे कुतूहलाने पाहत, त्यांचे कौतुक करीत इरावर्तीचा प्रवास सुरू होतो. हा प्रवास शरीराचा आहे, तसा मनाचाही आहे. संशोधनाच्या निमित्ताने चांदागोंदियांच्या जंगलांपासून गुजरात-राजस्थानच्या वाळवंटांपर्यंत, हिमालयाच्या पायथ्याशी असणाच्या डोंगरांपासून बिहारच्या मैदानापर्यंत अणि आसामच्या जंगलांपासून कुर्गपर्यंत हा शरीराचा अखंड प्रवास चालू आहे. या प्रवासात संकेतांची बंधने आरंभापासूनच गळून पडलेली होती. युरोपच्या वातावरणात ज्यांची लग्ने झाली त्या मुलींना सासरच्या अनेक अनोळखी व्यक्तींचे मुके घ्यावे लागतात. असे अपरिचितांचे मुके घेणे चांगले, की भारतीय नववधूला अनेक अपरिचितांना नमस्कार करावा लागतो तसे नमस्कार करणे चांगले, येथपासून दर ठिकाणी थांबत त्या विचार करीत जातात. हा विचार करताना कधी जंगलांच्या, तर कधी वाळवंटांच्या, कधी सतत चालणाच्या नादांच्या, तर कधी न भंगणाऱ्या शांततेच्या अशा अनेक आठवणी त्यांच्या मनात जाग्या होत राहतात. त्या निसर्गाला संवेदनक्षम मनाने शब्दबद्ध करीत, भोवतालच्या समाजाचे समाज म्हणून चित्रण करीत, प्रवासात आढळणाच्या व्यक्तींची एक जिवंत माणूस म्हणून ओळख करून घेत, सुखाचे आणि दु:खाचे नानाविध प्रकार पाहत हा शरीराचा अखंड प्रवास चालू आहे. या प्रवासात निरनिराळ्या व्यक्ती भेटतात. समाज दिसतात, निसर्गाची विविध चित्रे येतात; पण हा प्रवासाचा एक भाग झाला.
ह्याबरोबर त्यांच्या मनाचा प्रवास चालू आहे. दर ठिकाणी थांबून त्या स्वत:च्याच मनाला 'हे असे का?' हा प्रश्न विचारीत असतात. स्त्रियांना आधारासाठी जो बळकट पुरुष लागतो, ती गरज शिक्षणाने मृदू झालेला पुरुष १५२ / गंगाजल
भागवू शकेल काय?', 'माणूस वास्तविक जीवनातील दुःखे स्वप्नात विसरू शकेल काय?', 'माणुसकीची मूल्ये एका पिढीत धुळीला मिळतात, ती पुन्हा उभी करिता येतील काय?', 'स्त्रीराज्य जरी झाले, तरी ते पुरुषांच्या अखंड चिंतनात रमलेले असते; अशी ही स्त्री खऱ्या अर्थाने स्वतंत्र होऊ शकेल काय?', 'स्वाभिमान आणि सुखे यांत स्वाभिमान संभाळण्यासाठी दुःखांना निमंत्रण देणारी माणसे मठ्ठ म्हणता येतील काय?', 'म्हातार्यांना जगवीत बसणे चांगले, की प्रत्येकाने वेळेवर मरणे चांगले?', 'सुप्त इच्छा दाबता येतील काय?'- हे आणि असे अनेक प्रश्न त्यांचे मन उपस्थित करिते, आणि या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करिते. हळूहळू कुतूहलाची जागा गांभीर्य आणि वेदना घेतात; आणि क्रमाने बाईंचे लिखाण जास्तच अंतर्मुख होऊ लागते. आणि मग त्या अधिक मूलभूत प्रश्न उपस्थित करू लागतात. या प्रश्नांची उत्तरे त्यांची त्यांनाही सापडण्याचा संभव नसतो. असा एक मनाचा प्रवासही सतत चालू आहे. आणि या मनाच्या प्रवासात समाजशास्त्र आणि मानसशास्त्र मधूनमधून त्यांना जास्तच घोटाळ्यात टाकण्याचा प्रयल करितात.
या अशा अखंड प्रवासात अखंड सहचर म्हणून बाईंच्या जवळ महाभारत आहे. कधी त्या महाभारताच्या व्यक्तींत आपले जीवन पाहण्याचा प्रयत्न करितात; कधी जुन्या मूल्यांच्या आधारे महाभारतातील व्यक्तीच्या वागणुकीचे समर्थन त्या करू लागतात; कधी नव्या मूल्यांच्या आधारे महाभारतातील व्यक्तींवर त्या दोषारोप करू लागतात; त्यांच्यासाठी महाभारत हे अन्वायार्थ लावण्याचे म्हणून केवळ शिल्लक असणारे इतिहासाचे साधनसाहित्य नाही; किंवा महाभारत हे वंदनीय अशा संस्कृतीने निर्माण केलेले एक पुराणकथेचे मूर्त रूपही नव्हे. महाभारतातील व्यक्ती या जणू त्यांच्या भोवताली सतत वावरत आहेत. बाई जशा आपल्या मुलाबाळांना, सासू-सासऱ्यांना, पतीला, आई-वडिलांना विसरू शकत नाहीत, तसे त्यांच्या भोवती महाभारत आहे. गांधारी किंवा कुंती ही त्यांच्यासाठी जणू शेजारिणीसारखी पात्रे आहेत. त्यांची भलावणी केल्याशिवाय किंवा त्यांच्याविषयी तक्रार केल्याशिवाय बाईंना राहवतच नाही. त्या दिल्लीवरून पाठणकोटला जरी जात असल्या, तरी त्याच रस्त्याने सौंदर्यवती गोरीपान दमयंती, हीन-दीन अशी भटकत-भटकत आपल्या मावशीच्या घरी गेली, हे त्यांना चटकन आठवते.
गंगाजल / १५३
बाईंनी 'युगान्त' हे पुस्तक फार नंतर लिहिले; पण महाभारतावर ठिकठिकाणी भाष्य करण्याची त्यांची प्रथा आरंभापासून आहे. महाभारताच्या जोडीला कधी रामायण तर कधी भागवत असते. पण ते नेहमीचे सहकारी म्हणून नाही; ते ग्रंथ मधूनमधून येतात. मध्येच त्यांना आठवते की, आश्रमात वाढलेल्या अनाथ महत्वाकांक्षी शकुंतलेने 'दुष्यन्त कोण?' हे जाणून त्याच्या गळ्यात मिठी मारली आणि हस्तिनापूरच्या गादीची स्वामिनी होण्याचा धाडसी डाव टाकला. हे सांगत असताना महाभारतातील शाकुंतलावर एक नवीन भाष्य निर्माण होण्याची शक्यता दिसू लागते. अशी विविध भाष्ये बाईंच्या ललित-निबंधांत आलेली आहेत. जे सामान्यत्वे कुणा पुरुषाच्या लक्षात येणार नाही, अशा महाभारतातील जागा इरावतींच्या नारी-मनाला सहज स्पर्श करून जातात आणि मग त्यांना असे वाटते की, अंबिका आणि अंबालिका यांच्याशी व्यासांचा नियोगसंबंध झालाच नाही. भीष्माच्या संमतीने एका कोळ्याच्या पोरीने आपल्या सुनांच्यावर उगविलेला हा सूड आहे. राजवाड्यातील या कन्यकांवर अत्याचार झालेला आहे. कुठे कुंतीचा विचार करिताना कुंतीच्या शहाणपणात त्यांना तत्कालीन समाजाच्या वेडगळ श्रद्धेची बीजे आढळू लागतात.
माद्रीला जेव्हा दोन मुले होतात, तेव्हा कुंतीला असे वाटते, की माद्रीने आपल्याला फसविले. तिने दोघांना आवाहन केले, म्हणून तिला जुळे झाले. जुळे मूल होण्याचा संबंध दोन पुरुषांशी रत होण्याशी आहे, ही तत्कालीन वेडगळ श्रद्धा आणि त्या श्रद्धेला सर्वमान्य सत्य समजून त्यावर आपला सावधपणा उभारणारी कुंती यांचा विचार करतानाच एकदम इरावतीबाई सीतेपर्यंत जाऊन पोहोचतात. सीतेलाही जुळे झाले होते. त्या वेळेच्या समजुतीनुसार यामुळे सीतेचा व्यभिचारीपणा सिद्ध झाला, त्या सीतेला धरित्रीच्या पोटात कायमचे लुप्त होण्याशिवाय दुसरा मार्ग होता तरी कोणता? याच कुंतीविषयी पुन्हा एकदा इरावतींनी विचार केला, आणि खरोखरच कुंतीची संतती नियोगाची समजावी काय, हाही विचार त्यांच्या मनात आला. 'राजधानीच्या बाहेर, वडीलधाऱ्या मंडळींना न विचारिता जे पडले, त्या साऱ्याला नियोगच म्हणावयाचे काय?' असा एक प्रश्न बाईंच्या मनात केव्हातरी तरळून गेला आहे.
पण या भाष्यांच्या बरोबर मधूनमधून जैन वाङ्मयातील माहितीचा १५४ । गंगाजल
स्वीकार करण्याचीही त्यांची पद्धत आहे. कुणीतरी एक पूईगंधा सतत पुरुष सहवासासाठी तळमळत वारली. मरताना तिच्या डोळ्यांसमोर एका रूपवती वेश्येच्या भोवती घोटाळणारे पाच तरुण होते. 'हे ईश्वरा! तिला पाच जण मिळावेत, आणि मला एकही मिळू नये काय?' हा विचार करिताना पूईगंधेचा प्राण गेला. ती पुढच्या जन्मी द्रौपदी झाली. तिला पाच नवरे प्राप्त झाले. ही जैन वाङमयातील माहिती बाईंनी पूरक म्हणून वापरलेली आहे. अशी जैन माहिती पुन्हा द्वारकेच्या संदर्भातही त्यांनी वापरलेली आहे. ही द्वारका कवींना भगवंतांच्या वैभवाचे प्रतीक वाटली; बाईंना द्वारका कृष्णाच्या कायम पराजयाचे स्मृतिचिन्ह वाटते.
यामध्ये महाभारताचे जे सततचे चिंतन चालू आहे, जी विविध स्पष्टीकरणे चालू आहेत, त्यांपेक्षाही बाई सतत महाभारताच्या सहवासात जगत आहेत, ही गोष्ट मला महत्वाची वाटते. न संपणाऱ्या सततच्या सज्जनपणाची प्रतिनिधिभूत पात्रे, न संपणाऱ्या द्वेषाची कहाणी, मनात जळत असणारी दुःखे सतत जपणारे सज्जन, भीष्माच्या रूपाने पापाच्या संरक्षणार्थ उभे असणारे पुण्य आणि पुण्याच्या समर्थनार्थ दर क्षणी कोणतेही पाप करण्यास उद्युक्त होणारा कृष्ण ही गुंतागुंतीची, मनस्वी व्यक्तींची कहाणी ज्यात आहे, तो ग्रंथ बाईंच्या सहवासात निरनिराळे अर्थ दाखवू लागतो. पण महाभारतात शेवटी सारेच व्यर्थ झालेले आहे. जयही पराजयाइतकाच कटू झाला आहे. कर्ते आणि नाकर्ते सर्वांनाच एका विशाल शून्यामध्ये महाभारताने बुडवून टाकिले आहे. सगळे कर्म करीत असताना दर टप्प्यावर 'याचा अर्थ काय?' 'त्याचा अर्थ काय?' असे विचारीत सगळेच निरर्थक ठरविणारा आणि प्रत्येक व्यक्तीचे जीवन मात्र सार्थ करणारा महाभारतासारखा ग्रंथ बाईंचा अखंड सहचर आहे. या आधारामुळेच बाईंचा प्रवास चालू असताना त्या थकत नाहीत; त्यांचे प्रश्न संपत नाहीत; आणि कोणतेही दुःख त्यांच्या मनाला खच्ची करू शकत नाही.
या पार्श्वभूमीवर बाईंच्या दोन व्यक्तिरेखा पाहिल्या पाहिजेत. त्यातली एक त्यांच्याच सासऱ्यांची, म्हणजे महर्षी कर्व्यांची होती. जीवनातल्या नायकांच्या विषयी आपल्या समजुतीही स्वप्नरंजनातच रमलेल्या अशा आहेत. या व्यक्तिरेखेच्या निमित्ताने एका नायकाच्या नायकत्वाची मीमांसाच जणू इरावती करीत आहेत, असे वाटू लागते. ज्याचे सार्वजनिक जीवन सर्व समाजासाठी आहे, तो माणूस घरालाच पारखा होऊन जातो. माया आणि जिव्हाळा समाजासाठी राखून ठेवणाऱ्या आपल्या एकमार्गी सासऱ्यांचा रुक्ष संसार आणि रुक्ष व्यवहार बाईंनी मोठ्या जिव्हाळ्याने सांगितलेला आहे.
व्रतांच्या निमित्ताने आपण नेमके काय करीत आहो, याचे या नायकांनाही कधी भान नसते. महात्मा गांधी हे भारतीय जीवनातील असेच एक नायक होते. दारिद्याचे आणि साधेपणाचे व्रत त्यांनी घेतलेले होते. ते तिसऱ्या वर्गाने प्रवास करीत; त्यांना त्रास होऊ नये, म्हणून सारा डबा राखीव करणे भाग असे. महात्मा गांधींना साधे जीवन जगता यावे, यासाठी जो खर्च होई, त्याचे प्रमाण वैभवशाली जीवन जगण्यासाठी लागणार्या खर्चाहून अधिक होते म्हणून सरोजिनी नायडूंनी एकदा असे म्हटले की, “दरिद्री नारायण को दारिद्य का भोग चढाया जाता है। उसका खर्चा कहीं अधिक है।" गांधींच्या या साधेपणाची आणि महर्षी कर्वे यांच्या अपरिग्रहाची तुलना करून पाहण्याजोगी आहे. महर्षी कर्वे वर्गणी गोळा करण्यासाठी ठिकठिकाणी हिंडले, त्यासाठी जर कुणी तिकीट काढून दिले, तर त्याला कर्व्यांची ना नसे.त्या प्रवासात मोटारीतून हिंडविले, तर त्याला त्यांची ना नसे. वृद्धापकाळी स्वत:च्या खर्चासाठी म्हणून ते काही पैसे देत. तितक्यातच त्यांचा खर्च भागतो की नाही हे पाहण्याची त्यांना जरुरी नाही. पण ज्या गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या, त्यांची मात्र त्यांनी चटकन परतफेड केली. कर्वे यांचे अपरिग्रहाचे व्रत हे असेच तात्पुरते असे. सर्वच महनीय व्यक्तीच्या जीवनाचा एक थर असा असतो. ज्या दऱ्या माणसांना जाणवतात, त्या मुंग्यांना जाणवतच नाहीत, ज्या मुंग्यांना जाणवतात, त्या माणसांना जाणवत नाहीत. हा जो माणूस आणि मुंग्या यांच्या आकलनातला फरक, त्यापेक्षा वेगळा प्रकार माणूस आणि अतिमानव यांच्यात नसतो.
महर्षी कर्वे यांचे बाईंनी जे अलौकिक व्यक्तिचित्र रेखाटलेले आहे, ते व्यक्तिचित्र नाही. ते त्या जीवनावरचे सहृदय, पण तितकेच सत्यनिष्ठ असे भाष्यही आहे. समाजाच्या कल्याणासाठी सर्वस्व वाहिलेल्या कोणत्याही थोर पुरुषाच्या घरगुती जीवनाची जी धूळधाण असते, ती कर्व्यांच्यासारख्या माणसाच्या खाजगी जीवनाची असते. हा माणूस एकदा सर्वांचा झाला म्हणजे बायका-मुलांचा उरतच नाही. हीरोचे सत्य स्वरूप नेहमीच 'अँटी-हीरो' असे असते. नायकाच्या जीवनाचा एक झाकलेला थर 'अ-नायकी' असतो: पुष्कळदा निर्नायकी असतो.
या व्यक्तिरेखेइतकीच अप्रतिम अशी दुसरी व्यक्तिरेखा मला गांधारीची वाटते. महर्षी कर्वे विसाव्या शतकात अस्तित्वात होते; आणि गांधारी फक्त महाभारताच्या रचनेत आहे. हा फरक बाईंच्यासाठी अस्तित्वात नव्हता. बाईंच्यासाठी गांधारी वास्तविक व्यक्तींच्याइतकी सत्य होती. तिच्या डोळ्यांवर बांधलेली पट्टी वरवर जरी पतिनिष्ठेच्या मूल्याची प्रतिनिधी असली, तरी खरोखर तो एक प्रकारचा पतीविषयीचा तिरस्कार होता. स्वत:ची जी फसवणूक झाली, तीविषयी गांधारीने उगविलेला तो एक सूड होता, असे बाईंना वाटते. 'गांधारी शंभर पुत्रांच्याऐवजी शंभर दुःखाना प्रसवली आहे'. या वचनाची आठवण त्यांना सासऱ्यांविषयी लिहिताना येते. पण गांधारीविषयी लिहिताना मात्र तिचेही मन पुत्रवात्सल्यामुळे आंधळे व क्रूर झाले होते, असे त्यांना वाटू लागते. जेव्हा सर्व मुले मारिली जातात, तेव्हा गांधारी खरोखरी शांत होते. गांधारीच्या शांततेचा हा उगम तिच्या वृत्तीचा विकासातून होत नाही, तर आशेच्या सर्वनाशातून होतो. बाईंना या आंधळ्या गांधारीला डोळस करणे आवश्यक वाटते. तिच्या डोळ्यांवरची पट्टी शंभर पुत्रांनी घर भरलेले असताना सोडण्याचा आग्रह न धरणारा धृतराष्ट्र त्यांना तेवढाच सूडाने पेटलेला दिसतो. पतीविषयीच्या सूडाने पेटलेली, पण पतिव्रता भासणारी गांधारी आणि तिच्याविषयीच्या तेवढ्याच उत्कट सूडाने पेटलेला धृतराष्ट्र, पण वरवर समजूतदार दिसणारा आंधळा राजा यांची भुतावळ स्वत:च पेटविलेल्या सूडाच्या अग्नीत जर जळून खाक झाली असेल, तर त्यात आश्चर्य वाटण्याजोगे बाईंना काही नाही. ती गांधारी वार्धक्याच्या पक्व अवस्थेत सगळ्या आशा जळून गेल्यानंतर पतीच्या आज्ञेने डोळस होते; आणि म्हातारपणी पत्नी म्हणून निष्ठेने पतीचा हात हातात घेते व अग्नीकडे चालत जाते. आंधळी गांधारी आंधळ्या सूडाने पेटली, तेव्हाही पतिव्रताच दिसली आणि डोळस गांधारी पतीला घेऊन मरणाकडे वाटचाल करीत गेली, तेव्हाही पतिव्रताच भासली. गांधारीच्या जीवनाचा भयानक अर्थ सांगताना बाई कुठेतरी गांधारीत वर्तमान वाचीत आहेत असे वाटू लागते.
तसे पाहिले, तर 'आजोबा' ही व्यक्तिरेखा; 'गांधारी' ही म्हटली तर कथा. वाटचाल आणि यात्रा ही प्रवास वर्णने कुठेतरी. याच प्रवास वर्णनांत निरनिराळी मते आणि स्पष्टीकरणे, असा हा सगळा बाईंच्या ललित- निबंधांचा विस्तार आहे. हा ललित-निबंध कधी एकीकडे झुकला म्हणजे वैचारिक होतो, दुसरीकडे झुकला म्हणजे कथेच्या आणि कवितेच्या जवळ जातो. पण तो कथेसारखा दिसला, तरी कथा नसतो. ते एक चिंतनशील मनाने कथेच्या आविर्भावात केलेले भाष्यच असते. वेगवेगळ्या पातळ्यांवरून, वेगवेगळ्या दिशेने सतत चिंतन करणारे आणि जीवनाचा अर्थ लावणारे अखंड प्रवासी, भटके मन, युगानुयुगांच्या आठवणी साठवीत सतत प्रवास करीत आहे. या प्रवासात ठिकठिकाणी टिपलेले सौंदर्य हा ह्या प्रवाशाच्या संवेदनक्षम मनाचा एक विभ्रम आहे. एका सुसंस्कृत मनाचा हा सतत जिवंत असलेला अनुभव शब्दबद्ध करणारा सश्रद्ध प्रवास आता कायमचा थांबलेला आहे.
- नरहर कुरुंदकर