गंगाजल/जुन्याच समस्या, नवे उपाय
विद्यार्थी उठून गेला होता. पण ज्या विषयावर आम्ही बोलत होतो, तो माझ्या मनात अजून घोळत होता. कुटुंबसंस्थेतील मोक्याच्या जागा कोणत्या, धोक्याच्या जागा कोणत्या, आणि हा मोका आणि धोका कशामुळे उत्पन्न झाला असावा, हे समजावून सांगण्याचा मी प्रयत्न करीत होते. मोक्याची जागा घरातल्या कर्त्या पुरुषाची, म्हणजे बापाची, धोक्याची जागा हीही कर्त्या पुरुषाचीच, म्हणजे बापाचीच. हे का?
कुटुंब हा दोन किंवा तीन पिढ्यांचा एकत्र राबता असतो. एक पिढी मोठी होत असते, मोठी झालेली दुसरी पिढी कुटुंब चालवीत असते. कुटुंबाला खाऊ-पिऊ घालते, कुटुंबासाठी श्रम करिते आणि त्याच्या मोबदल्यात कुटुंबावर अधिकार गाजविते. धाकट्या पिढीने मोठ्यांचे ऐकावे, मोठे सांगतील तसे वागावे, अशी अपेक्षा असते. सर्वसाधारणपणे थोड्याबहुत प्रमाणात ही अपेक्षा पुरीही होते. पण कधीकधी असे काही प्रसंग उदभवतात की, त्यांमुळे बाप-मुलगा, सासू-सून ह्याचे संबंध धोक्याचे आहेत, हे समजते. मुलगा बापाचा वारस असतो. बापाचे सर्व अधिकार, घरदार, साठविलेली माया त्याला मिळावयाची असते. सून आज-ना-उद्या आपण घराची मालकीण होऊ, अशी वाट पाहत असते. आयुष्याची काही वर्षे आज्ञाधारकपणे रहायला या दोघांचीहा मोठी तक्रार नसते. पण जर वडील माणसे मरणामुळे किंवा अपंग झालो जाणिवेमुळे लवकर दूर झाली नाहीत, तर तरुण पिढीचा आज्ञाधारकपणा, प्रेम व भक्ती यांना ताण बसतो, वाट पाहण्याचा तिला कंटाळा येतो आणि अशा वेळी तरुण पिढी वडिलांच्या विरुद्ध उठते. बंड करिते, क्वचित वडिलांना मारितेसुद्धा.
अंध दीर्घतमा फारफार दिवस जगला. इतका की, मुले त्याला कंटाळली व शेवटी त्याला एका लाकडी तराफ्यावर बसवून मुलानी गंगेत सोडले. बिंबिसार व त्याची राणी इतकी जगली की, अजातशत्रूला त्यांना तुरुंगात टाकून राज्य घ्यावे लागले. तीच गोष्ट औरंगजेबानेही केली. बापलेकांच्या भांडणामध्ये लेकाने बापाला किंवा बापाने लेकाला मारल्याचे कितीतरी गुन्हे होत असतात. एक पिढी जावयाची, दुसरी पिढी यावयाची, आणि एका पिढीचे अधिकार दुसरीला मिळायचे, हा जो क्रम चाललेला असतो, तो होता-होईतो ताणाताणीशिवाय व्हावा, हे कुटुंबसंस्थेचे एक उद्दिष्ट. आणि त्याचमुळे बापाची जागा मोक्याची आणि धोक्याचीही. जी गोष्ट कुटुंबातील परिस्थितीची, तीच सर्व समाजाची. तेथेही अतिशय विस्तृत प्रमाणावर एका पिढीकडून अधिकार दुसऱ्या पिढीकडे जात असतो. आणि म्हणूनच दोन पिढ्या कायमच्या ताणलेल्या, दुरावलेल्या परिस्थितीत असतात.
माझे विचार येथपर्यंत आले आणि एकदम अंधारात मोठा उजेड पडावा, तसे मला झाले. कुठच्याही प्रसंगात माझे विचार ठाम, जलद व परिस्थितीची समज असलेले असे नसतात. थोड्या गोंधळलेल्या मन:स्थितीतच, पण काही श्रद्धांना धरून मी काहीतरी करीत राहते, आणि मग कितीतरी दिवसांनी काहीतरी निराळ्याच संदर्भात पूर्वी घडलेल्या प्रसंगावर एकदम प्रकाश पडतो, मन एकदम लख्ख होऊन जाते. अगदी तसेच आता झाले. एकदा एक प्रसंग असा आला की. त्यामध्ये एका बाजूला मी व एका बाजूला माझे सगळे-सगळे तरुण सहकारी. अशी वेळ आली. त्या वेळी माझे मन भांबावून गेले होते. मी विचार करिताना प्रत्येक सहकाऱ्याबद्दल निरनिराळे विचार होते. अमका विरुद्ध वागला, त्याला हे अमके कारण झाले असावे; पण तो दुसरा आणि तिसरा ह्यांना का बरे माझी भूमिका कळू नेये? न्याय-अन्याय, सत्य-असत्य, अपराध आणि शिक्षा ह्यांबद्दलच्या माझ्या आणि त्यांच्या भूमिकेत एवढा मोठा फरक का बरे पडावा? मी अगदी हतबुद्ध झाले होते. पण आत्ता, ह्या क्षणी मला उमगले की, न्याय-अन्याय, अपराध-निरपराध वगैरे सर्व गोष्टी ह्या भांडणात अवांतर व गैरलागू होत्या. खरे भांडण होते दोन पिढ्यांचे. एक नाही, दोन नाही, २५-३० वर्षे एका विभागाची मुख्य म्हणून मी राहिले. वेळच्या-वेळीच शहाणपणाने बाजूला सरून नव्या पिढीला वाव द्यावा, ते हातून झाले नाही. आणि काही सुदैवी सहका-यांप्रमाणे वेळीच मरणही आले नाही. त्यामुळे मूर्ख म्हाता-यांची जी स्थिती व्हावयाची, तीच माझी झाली. भांडण तत्वाचे नसून सबंध पिढीचे होते. कुठच्याही नीतितत्वापेक्षा अगदी खोलवर गेलेल्या जीवसृष्टीतील एका प्रवृत्तीचा तो आविष्कार होता, हे आता माझ्या ध्यानात आले.
हे पिढ्यांचे भांडण, एका पिढीने दुसरीचा नाश करावयाचा ही प्रवृत्ती सनातन आहे, सर्व जीवनसृष्टीत आहे. एकेका कुटुंबात आहे; सर्व समाजात आहे. गेल्या काही वर्षांमध्ये आढळणारे तरुणांचे मोर्चे तिचेच निदर्शक नाहीत का? पूर्वीच्या इतिहासात धाकट्या पिढीने थोरल्या पिढीवर इतक्या व्यापक प्रमाणावर व इतक्या तीव्रतेने हल्ले केलेले दिसत नाहीत. अशा त-हेचा हल्ला ही जर एक सनातन प्रवृत्ती आहे, तर तिचा आविष्कार हल्लीच एवढ्या तीव्रतेने का व्हावा? पूर्वीची थोरली पिढी मुलांना चांगले जरबेत ठेवीत असे, तेव्हा बंड व्हावयाची शक्यता खरे म्हणजे जास्त असली पाहिजे. हल्लीची थोरली पिढी त्या मानाने तरुणांना दबून असते; तरुणांचे कौतुक करिते. तरीसुद्धा तरुणांनी इतके चेवून उठावयाला कारण काय?
-याला कारणे दोन आहेत. पहिले कारण माणसाच्या शास्त्रीय प्रगतीत आहे; दुसरे कारण म्हातारी पिढी तरुण पिढीचे जे वरवरचे लाड करते, त्यात आहे.
शास्त्रीय प्रगती ती अशी... गेल्या शंभर वर्षांत शास्त्राच्या सहाय्याने मरण टळले नाही तरी लांबले मात्र खास आहे. पूर्वी मूल जन्माला येऊन मोठे होणे म्हणजे एक दिव्यच होते. कित्येक मुले जन्मत:च मरत व निम्म्या- शिम्म्यांना पाच वर्षांच्या आतच मरण येई. आता सर्व जगभर व आपल्या भारतातसुद्धा बालमृत्यूचे प्रमाण खूप घटले आहे. पूर्वी पाचांवरून पंचवीसपर्यंत जाणारी मुलेच कमी होती. आता त्यांची संख्या दुपटी-तिपटीने वाढली. ह्याचप्रमाणे दुस-या टोकाला माणसे बहुतेक पन्नास वर्षाच्या आतबाहेर मरत असत. साधारणपणे चाळीस-पन्नास वर्षे जगणारी माणसे अगदी सर्वस्वी निरोगी क्वचित असत. पण आता यकृत बिघडले, हृदय मंदावले की, त्यावर तोंडाने घ्यावयाची ओषधे आहेत; अंगात टोचायच्या सुया आहेत. ऐकू आले नाही, तर कानाला चिकटवावयाला यंत्रे आहेत; धड दिसत नाही, तर चष्मा आहे. असे निरनिराळे टेकू देऊन माणसे पंचेचाळीस वर्षापुढे खूप जगतात. आणि धिरा देऊन उभ्या केलेल्या खांबाप्रमाणे नुसती उभीच राहतात असे नव्हे, तर आपापल्या अधिकारांच्या जागांना धरून, अगदी घट्ट धरून उभी राहतात. काही लोकांना अमक्या-एका वयाला जागा सोडून द्यावी लागते. कारकून, शिक्षक, सैन्यातले अधिकारी यांना आज- ना- उद्या जागा सोडाव्या लागतात. पण त्यांच्याहून वरचे अधिकारी गव्हर्नर, मिनिस्टर, निरनिराळ्या संस्थांचे मुख्य हे मात्र आपली जागा सोडीत नाहीत. एकतर ते त्या जागेवर असताना मरतात, किंवा त्यांना एका जागेवरून काढले, तर दुसरी मोठी जागा द्यावी लागते. पूर्वी पाच वर्षांची मुले पंचवीस वर्षांची होईपर्यंत सुदैवाने जुनी व्हावयाला तयारच नव्हती. ती मोठी माणसे होती. जबाबदारीच्या जागा संभाळून होती. आणि वडील पिढी लवकर मरून गेल्यामुळे स्वत:ची लहान भावंडे व मुले आणि आपण स्वत: या सर्वांच्या भरणपोषणाचा भार त्यांच्यावर पडलेला असे. इतक्या समजुतीने व इतक्या लवकर आईबाप मेले, म्हणजे मोठ्या श्रद्धेने त्यांचे श्राद्ध होत असे, आठवणी निघत असत. काही वेळेला तर मेलेल्या मनुष्याचा टाक करून देवात ठेवून त्याची पूजा होई. कवींना आईबापांवर काव्ये करावीशी वाटत. आमचे आईबाप होते, तेव्हा आम्हाला कसलीही काळजी नव्हती. ‘ते हि नो दिवसा गताः!' म्हणून रडायला वाव होता.
पण आता पाच वर्षांची पोरे पंचवीस वर्षांची झाली, तर चाळीस वर्षाची माणसे साठ वर्षांची होऊन जगतच असतात आणि जगता-जगता खालच्या पिढीला बाप्ये होऊ न देण्याची खबरदारी घेतात. शाळा काढतात, कॉलेजे काढतात, तीस-तीस वर्षांचे झाले तरी त्यांना शिकवीत असतात. त्यांना पैसे देतात, कपडे देतात; फक्त एकच गोष्ट करीत नाहीत. त्यांना मोठे होऊ देत नाहीत. आपण मरतही नाहीत व बाजूलाही सरत नाहीत. अशा वेळेला बिचार्या खालच्या पिढीने जर बंड उभारले, तर नवल काय?
ज्या शास्त्रीय प्रगतीने ही स्थिती आणिली, त्याच शास्त्राला त्यावर तोड नाही का सापडणार? काहींना जन्मालाच घातले नाही, व काहींना पन्नास वर्षांपर्यंत नाहीसे केले, तर ही सामाजिक समस्या सुटणार नाही का? ह्या दोहोंपैकी पहिला मार्ग पुष्कळ राष्ट्रांनी चोखाळलेला आहे. पण दुसरा मार्ग स्वीकारावयाचा, हे मात्र कोणाच्याही मनात येत नाही. ह्याउलट आयुष्याची मर्यादा वाढवावयाची कशी ? मरावयाला घातलेल्या माणसाला अर्धवट जिवंत अवस्थेत किती दिवस टिकविता येईल, ह्याकडे लोकांचे लक्ष लागलेले आहे पन्नाशीच्या आसपास वय झाले, म्हणजे शक्य तितक्या कमी क्लेशांत वडील माणूस नाहीसे करून टाकणे खरोखर कठीण नाही. आमके-एक वय झाले की लगेच त्या दिवशी त्याला मरणाचे बक्षीस द्यावयाचे, इतका क्रूर व तडकाफडकी प्रकार न करिताही योजनाबद्ध रीतीने पन्नास वर्षावर आयुष्य असलेला मनुष्य समाजातून नाहीसा करून टाकावयाचा, अशी युक्ती योजिता येईल. एखाद्या डोकेबाज संख्या- शास्त्रज्ञाला हा विषय दिला, तर मला वाटते, महिन्याभरात तो ह्याचे उत्तर देऊ शकेल. पन्नास वर्षांच्या वर वय असलेल्या माणसांची एक यादी करावयाची. तीमध्ये दरवर्षी किती भर पडते हे समजू शकते. सध्या फुगलेली ही संख्या व नवीन येणारे, असे मिळून एक दहा वर्षांत सगळ्यांना नाहीसे करावयाचे म्हटले, तर तो शास्त्रज्ञ कुठच्याही त-हेची दया, लोभ, आपलेपणा वगैरे न दाखविता कोणते नंबर मारावयाचे, ते ठरवून देईल. ह्या नंबरांच्या चिठ्या सार्वजनिक रीतीने काढाव्या, नाही तर गुप्त रीतीने. आणि एकदा एका वर्षाचे नंबर मिळाले की ह्या-ना-त्या प्रकाराने वर्ष संपावयाच्या आत त्यांना नाहीसे करावे,- कोणाला सुई टोचून, कोणाला औषध देऊन, कोणाला काही खावयाला देऊन, कोणाला काही प्यावयाला देऊन. प्रसंगाप्रमाणे योग्य ते उपाय योजून त्यांना नाहीसे करणे शक्य आहे. ह्यामुळे फार फायदे होणार आहेत.
जुगाराची चटक लागलेल्या राज्यकर्त्यांना व प्रजेला जुगार खेळायला एक नवी संधी मिळणार आहे. यंदा कोणते बरे म्हातारे जाणार आहेत? पुढच्या आठवड्यात कोण जाणार आहेत? -हे ओळखणा-यांना पहिले बक्षीस जाहीर करिता येईल. म्हातारी माणसेसुद्धा जाताना कोणालातरी द्रव्य देऊन जातील!
संतप्त तरुण नाहीतसे होतील. कारण ज्यांच्यावर दात-ओठ खावयाचे ज्यांची मूल्ये चुकली म्हणून आरडाओरडा करावयाचा, ती पिढीच मुळी नाहीशी झालेली असणार. सर्वच त-हेचे मोर्चे कमी होतील. कारणे दोन : ज्यांच्याविरुद्ध मोर्चा न्यावयाचा, असे कोणी उरणार नाही; आणि ब-याचशा तरुणांवर आयुष्याच्या जबाबदा-या पडल्यामुळे अजून मुलेच असलेले असे तरुण मोर्चात सामील व्हावयाला राहणारच नाहीत.
हातचे एक शस्त्र नाहीसे झाले, म्हणून राजकीय पक्षांना व पुढार्यांना वाईट वाटण्याची शक्यता आहे. पण त्यांनी विचार केला, तर असे दिसेल की, वाईट वाटण्याचे कारण खरोखरच त्यांना राहणार नाही. म्हातारी माणसे मेली, म्हणजे तरुणांना त्यांच्या जागांवर बसता येईल. तेथून उचकटावयाला प्रयत्न करावे लागणार नाहीत. जुने पुढारी मेल्यामुळे नव्यांना भरपूर वाव राहील.
म्हाता-यांचासुद्धा या योजनेत फायदा आहे, हे विचाराअंती त्यांना दिसून येईल. जास्ती जगल्यामुळे वरवर दिसावयाला म्हातारी माणसे जरी अधिकाराच्या पदांवर असली, तरी खालच्या पिढीच्या सतत प्रहारांमुळे त्यांची मने हबकून गेलेली असतात. ती जिवंतपणीच मेलेली असतात: हृदयातील व्यथा लपवून वरवर हसत असतात; जिवंतपणाचे सोंग घेऊन वावरत असतात. ह्या असल्या जिवंत मरणापेक्षा खरोखरीचे नाहीसे झालेले काय वाईट?
माझे विचार कुठे भरकटले असते कोण जाणे! पण मला शब्द ऐकू आले, “बाई, कॉफी आलीय, पिता ना?'
एकच कप कॉफी आली होती. “तू नाही घेणार? मी विचारले.
“मला नकोय आज."
मी मुकाट्याने कप तोंडाला लावला. कॉफी छान गरम होती. पण आज नेहमीपेक्षा कडू लागली. का बरं?
मी वरती पाहिले. माझ्या तरुण मदतनिसाचा चेहरा नेहमीप्रमाणेच प्रसन्न, निर्व्याज व निरागस होता.
१९६९