गंगाजल/पुनर्जन्माचा विनतोड पुरावा
किती हजार वर्षे झाली कोण जाणे, अयोध्येत दिलीप नावाचा राजा
राज्य करीत होता. त्याला मूल होईना, म्हणून तो व त्याची राणी सुदक्षिणा
रानात गुरुगृही वसिष्ठाश्रमाजवळ जाऊन राहिली. ऋषीच्या जवळ नंदिनी
नावाची एक गाय होती. रोज रानात जाऊन ती चरत असता राजाने तिचे
रक्षण करावे व राणीने तिची सकाळ-संध्याकाळ पूजा करावी, असे व्रत
गुरूने सांगितले.
राजा रोज गायीपाठीमागे रानात जाई. एकदा राजा भोवतालची वनश्री पाहात असताना एका सिंहाने नंदिनीवर झडप घातली. राजा धनुष्याला बाण लावून सिंहाला मारावयाला निघाला, पण त्याच्या हातापायांतली सर्व हालचाल जाऊन एखाद्या पुतळ्याचे जडत्व त्याच्या अंगी आले. मनातल्या मनात तो रागाने जळू लागला. एवढ्यात सिंह त्याला मनुष्यवाणीने संस्कृतात म्हणाला -
'बाबा राजा, उगीच श्रम घेऊ नकोस. अस्त्राचासुद्धा येथे पाडाव लागणार नाही. वारा जोराने वाहून झाड पाडू शकेल, पण मोठमोठ्या शिळा तो कशा उलथवील?'
ढवळ्या नंदीच्या पाठीवर बसणाच्या साक्षात शंकराचा मी कुम्भोदार नावाचा अनुचर आहे.
हे तुझ्या पुढ्यात देवदारूचे झाड दिसते आहे ना, ते पार्वतीमाईने सोन्याच्या घड्याने पाणी घालून स्वत:च्या मुलांप्रमाणे वाढविले आहे.
एकदा कोणा तरी रानपशूच्या अंग घासण्यामुळे ह्या झाडाची साल ७२ / गंगाजल
निघाली. तेव्हा आपला मुलगा जो स्कंद त्याला शत्रूच्या बाणाने जणू जखम केली, इतके दु:ख पार्वतीमाईंना झाले.
'तेव्हा वन्यपशूपासून ह्या झाडाचे संरक्षण करण्यासाठी शंकराने माझी योजना केली. त्याने मला सिंहाचे रूप दिले व येणा-या-जाणा-या पशूंवर उपजीविका करण्यास सांगितले.'
'ह्या कामात मला कधीचा उपास पडला आहे; भूक लागली आहे. बरी ही गाय आली आहे. आता हिच्या मांसाने पारणे करून मी आपला उपवास फेडणार आहे.'
'तेव्हा तू आता परत जा. मनात खंत करू नकोस. तू गुरूची पुरेशी भक्ती केली आहेस. ज्याचे शस्त्राने रक्षण करणे अशक्य आहे, त्याचे रक्षण केले नाही, म्हणून क्षत्रियाला कमीपणा येण्याचे कारण नाही.'
सिंहाचे बोलणे ऐकून राजा म्हणाला,
'माझी हालचाल खुटली आहे. तेव्हा मी काय बोलतो, त्याचे तुला हसू येईल. पण तुला माझ्या अंत:करणाचा ठाव घेण्याची शक्ती आहे. मी जे बोलतो, ते मनापासून हे तुला उमगेलच.'
'जगाच्या उत्पत्ति-स्थिति-लयाला कारणीभूत अशा ईश्वराने तुला नियम घातला आहे; तो मी मान्य केलाच पाहिजे. पण आहिताग्नी गुरूचे माझ्या ताब्यात दिलेले धन डोळ्यांदेखत नष्ट झालेले पाहणेही मला अशक्य आहे.'
'तेव्हा मला खाऊन तू आपली भूक भागव. आणि संध्याकाळच्या वेळी वासराकडे ओढ घेणार्या ह्या गायीला सोडून दे.'
हे बोलणे ऐकून, हसत-हसत किंचित औपरोधिक स्वराने सिह म्हणाला,
'तू जगाचा एकमेव राजा आहेस; तरुण आहेस; रूपाने देखणा आहेस. अशा थोडक्यासाठी पुष्कळाची हानी करणारा तू मला विचारशून्य मूर्खच दिसतोस.'
'जीवदयेमुळे ह्या एका गायीचे काय- ते कल्याण होईल, पण तू जिवंत असलास, तर समस्त प्रजाजनांना बापाप्रमाणे निरनिराळ्या संकटांपासून वाचविशील.'
'एकुलती-एक गाय असलेल्या आगजाळ कोपिष्ट गुरूच्या रागाची तुला जर भीती वाटत असेल, तर दुसऱ्या कोट्यवधी दुभत्या गायी देऊन त्याचा राग तू शमवू शकतोस.'
गंगाजल / ७३
'तुझ्या जिवंत राहण्यामुळे होणाच्या कल्याण-परंपरेचे जतन कर व इन्द्रपदाहून काकणभरही वैभवाने कमी नसलेल्या राज्याचा उपभोग घे.'
हा व्यवहारिक उपदेश राजाने मानिला नाही. त्याने सिंहाला उत्तर दिले; सिंहाचा अनुनय केला.
'क्षतापासून रक्षण करतो तो 'क्षत्रिय' समजतात. मी जर ते केले नाही, व कोणाचा तळतळाट घेऊन आपला जीव वाचविला, तर ते योग्य होईल का?'
'ही अशी-तशी साधी गाय नाही. प्रत्यक्ष कामधेनूची ती मुलगी आहे. तेव्हा मला खा, आणि हिला सोड. तुझा उपवास फिटेल. गुरूंचेही हित साधेल'
'तूही चाकर आहेस. तुझ्यावर नेमलेले काम तू महायत्नाने करितो आहेस. मग माझ्यावर सोपविलेले काम न करिता मी आपल्या नियोजकापुढे कसा उभा राहू?'
क्षणभंगुर नाशवंत शरीराविषयी मला आस्था वाटत नाही. मला काळजी आहे ती माझ्या यशाबद्दल. ते यशोरूपी शरीर राखण्यासाठी तू मला मदत कर.'
ह्या इथे रानात आपण भेटलो, एकमेकांशी बोललो, त्यामुळे आपला मित्रसंबंध जडला आहे. आता, हे भूतनाथानुचरा, माझी एवढी प्रेमाची विनंती ऐक, गायीला सोड व मला खा.'
आपण जीव तोडून सांगितले, तरी राजा ‘मरून कीर्तिरूपे उरण्या'च गोष्टी बोलतो आहे, हे ऐकून सिंहाला नवलच वाटले. 'जिवंत राहून कल्याणपरंपरा जतन करण्याऐवजी कीर्तीच्या हावेने केवढी अनर्थ परंपरा हा राजा ओढवून घेणार आहे, हे त्याला कसे कळत नाही? राजा निपुत्रिक मेला, तर केवढे अराजक माजेल, हे त्याला कळत नाही का?' वगैरे विचार सिंहाच्या मनात आले असणार, ‘पण जाऊ दे, आपल्याला काय करावयाचे? हा स्वप्नाळू माणूस म्हणतो आहे तसे करावे,' असा सिंहाने विचार केला.
भोळ्या सिंहाने गायीला सोडले. राजावर देवांनी पुष्पवृष्टी केली व तोही सुटला. राजावर ऋषी प्रसन्न झाले. गाय प्रसन्न झाली व त्यांच्या प्रसादाने त्याला मुलगा झाला, वगैरे पुढचा कथाभाग कालिदासाने सांगितला आहे. पण त्या बिचार्या सिंहाबद्दल एक शब्दही नाही. ही सर्व ७४ / गंगाजल
बनवाबनवी आहे. सत्त्वपरीक्षा का काय म्हणतात, तसला हा लुटूपुटीचा खेळ आहे, हे त्या बिचार्या सिंहाला उमगले नाही. देवदारु-वृक्षाचे रक्षण करीत-करीत एक दिवस भुकावलेल्या स्थितीत म्हातारपणामुळे तो मेलेला असणार.
जितके राजाचे जीवन सफल झाले, तितकेच सिंहाचे असफल झाले होते. त्याने किती व्यावहारिक उपदेश राजाला केला होता, -अगदी जीव तोडून केला होता. पण राजाने तो ऐकिला नाही. एवढेच नव्हे, तर उपदेश न ऐकिल्यामुळे त्याचा प्राण तर नाहीच गेला, पण एका कवीने गावे एवढे यश त्याला मिळाले. देवांनी जयजयकार केला; पुत्रप्राप्ती झाली. म्हणजे पर्यायाने सिंहाचा उपदेश हीन दर्जाचा ठरला. ह्या सगळ्या खटाटोपात गाय हातची गेली, ती गेलीच. सर्व प्रकारे सिंह नागविला गेला. मरताना तो मनाच्या अतृप्त अवस्थेत, वासनामय परिस्थितीत मेला. ज्ञानदेव म्हणतात त्याप्रमाणे ‘देहास्तमानी' त्याचे सर्व ‘संकल्पविहंगम' नव्या जन्माची, वासनापूर्तीची वाट पाहत शतकानुशतके बसलेले होते.
शेवटी तो दिवस एकदाचा उजाडला. सन १७४८ मध्ये आपल्या भारतीय सिंहाचा बेंथम नावाच्या एका ब्रिटिश कुटुंबात जेरेमी नावाने जन्म झाला. हा मुलगा फार हुषार निपजला. बापाच्या मनात त्याने वकील व्हावे असे होते, पण त्याने वकिली न करिता कायदा व कायद्याची तत्त्वे ह्यांचा अभ्यास केला. तो तर्कशास्त्रात फार पारंगत झाला. आपला भारतीय सिंहही तसाच होता, हे वाचकांना ठाऊक आहेच. त्याने नीतितत्वांचा व आचरणशुद्धतेचा फार खोल व तार्किक विचार केला. त्याच्या मते सत व असत हे क्रियेचे गुण परिणामानेच पारखता येतात. जे परिणामी चांगले, ते चांगले. सदगुणासाठी सदगुण (कोणाच्या फायद्यासाठी, कोणाचे बरे होण्यासाठी नव्हे), हे तत्त्व तो मूर्खपणाचे मानीत असे. ज्या आचरणाने पुष्कळांना पुष्कळ सुख मिळेल, ते आचरण नीतिदृष्ट्या श्रेष्ठ, असा सिद्धान्त त्याने प्रतिपादिला. 'अल्पस्य हेतोर्बहू हातुमिच्छन विचारमूढः प्रातिभासि मे त्वम्' (थोड्यासाठी पुष्कळांच्या कल्याणाचा नाश करणारा तू मला मूर्खच दिसतोस), ह्या सिंहाच्याच उक्तीचे रूपांतर म्हणजे बेंथमचा सिद्धान्त आहे, हे कोणाच्याही लक्षात येईल. बेंथमने पैसे व्याजी देण्याच्या पद्धतीचा वरील तत्वानेच पुरस्कार केला. कायदे करावयाचे, ते बहतांच्या बहुत कल्याणासाठी करावे, उगीच अमक्या एका सदगुणाच्या पालनासाठी नव्हे,
गंगाजल / ७५
असे त्याचे स्पष्ट मत होते. नीतीतत्वाची ही मीमांसा पाश्चात्य जगास फारच पसंत पडली. दोनशे वर्षे ती आपला अंमल जगभर गाजवून आहे. भारतातील सिंहाचे एका राजाने जे ऐकले नाही, ते ह्या ब्रिटिश नरसिंहाचे म्हणणे जगाने शिरोधार्य मानले. शिवाय, गाय खायला मिळाली नाही, वचपाही गायखाऊ राष्ट्रात जन्मल्यामुळे निघाला. जन्मल्यापासून मरेपर्यंत बेंथम नरसिंहाने कितीतरी गुरे खाल्ली असणार. बेंथम १८३२ मध्ये मेला. कृतार्थ, सुफलीत जीवन जगून गेला. परत जन्म घेण्याची त्याला आवश्यकता राहिली नाही.
१९७०
हा लेख कालिदासीय रघुवंशाच्या दुसर्या सर्गावर आधारलेला आहे. भाषांतर गोळाबेरीज आहे; शब्दश: नाही.