गांव-गाडा/गांव-मुकादमानी
वतनपद्धतीच्यायोगाने गांव जरी एक आपला सवता सुभा झाला होता, तरी त्याचा संबंध परगणे-अंमलदारांशी हरवक्त आणि प्रांतअधिकाऱ्यांशी कधीकधीं पडे. ग्रॅन्टडफसाहेब लिहितात की, मोठे सरकार, त्यामध्ये परगणा, त्याचे आंत कर्यात, तिचे पोटी समंत, तिचेमध्ये महाल, त्याचे आंत तालुका, अशी दक्षिणेतील मुसलमानी राज्यांत मुलखांची नांवे होती. मराठशाहीत सुमारे साठपर्यंत गांवें मिळून तरफ, दीडशे पावणे दोनशेपर्यंत गांवें म्हणजे दोन चार तर्फा मिळून महाल किंवा परगणा, व कांहीं परगणे मिळून सुभा, ह्याप्रमाणे राज्याचे विभाग केले होते. डोंगराचा किंवा जंगलाचा भाग अमुक एका गावाच्या हद्दीत सामील केला नसल्यास त्याला तरफेंत घालीत. साधारणतः महालाचे क्षेत्र परगण्यापेक्षा लहान असे. सुभ्याला सरकार, प्रांत किंवा देश म्हणत, व कोठें कोठें सरकार हा सुभ्याचा किंवा प्रांताचा पोटभाग असे. खानदेश, गुजरात, कर्नाटक, वगैरे दूरच्या प्रांतांवर सरसुभेदाराचा अंमल होता. सुभ्यावर कुल अखत्यार सुभेदाराचा असे, व आपल्या ताब्यांतील महाल परगण्यांवर हवालदार, कमाविसदार, मामलेदार, वगैरे अधिकाऱ्यांच्या नेमणुका तो करी. पुढे पुढे हवालदारी वंशपरंपरेने चालू लागली आणि हविलदार वतनदार बनले. मामलतींत एक ते तीन परगणे येत; आणि मामलेदार व कमाविसदार ह्यांचे अधिकार जरी सारखे होते, तरी कमाविसदाराचा दर्जा किंचित् कमी असे, व त्याच्या ताब्यांतला मुलूखही कमी असे. तरफदार पगारी कारकून असत, आणि त्यांच्या हाताखाली चार पांच गांवांवर शेकदार असत. सरपाटील, सरदेशमुख, सरदेशपांड्ये, सरदेसाई व सरनाडगौडा, हे सर्वांत वरिष्ठ दर्जाचे वतनदार अधिकारी होत. पण ह्यांची संख्या फार असल्याचे दिसत नाही. दर प्रांताला दिवाण, फडनवीस, पोतनवीस, मुजूमदार वगैरे वतनदार हुद्देदार असत, त्यांना दरकदार म्हणत. पोतनविसाकडे प्रांताचे नगदीचे हिशेब व फडनविसाकडे सबंध दप्तर होते. दरकदारांची तपासणी परगणे अमलदारांच्या कामांवर असे. परगणे पाटील, देसक, देशमुख, देशपांड्ये, देशकुळकर्णी, देशचौगुला, परगणे-नाईक, महाल नाईक, हे मुख्य वतनदार परगणे-अंमलदार होत. त्यांना जमेदार, महालजमेदार, जमीनदार अथवा हक्कदार म्हणत. देशपरत्वे त्यांचे निरनिराळे पर्याय झाले. देसाई, नाडगीर, नाडकर्णी, नाडगौडा, मुजूमदार, मोहरीर, मोकाशी, शेकदार, हे सर्व महालजमेदार होत. जमेदार, दरकदार व प्रांत-वतनदार ह्यांना बहुमानाने देशाधिकारी म्हणण्याचा संप्रदाय असे. गांवाला जसे पाटील, कुळकर्णी, जागल्या, तसे परगण्याला देशमुख, देशकुळकर्णी, देशपांड्ये, देशचौगुला, परगणे-नाईक हे होत. देशमुख, देशचौगुला हे मराठे; देशपांड्ये, ब्राह्मण; व महाल नाईक भिल्ल, रामोशी, किंवा कोळी असत. वतनाप्रीत्यर्थ मुसलमान झालेले देशमुख, देशपांड्ये, परगणे-नाईक, कोठे कोठे दृष्टीस पडतात. सर्व ग्रामाधिकारी वंशपरंपरेचे हुद्देदार होते. ह्या वर्गात नुसतें गांवच्या दप्तरचे काम करणारे गांवकामगार व त्यांचे हाताखालील गांवनोकर येत होते असे नाही, तर यांमध्ये गांवच्या नित्यनैमित्तिक गांवकी व घरकी व्यवहाराला उपयोगी असे कारूनारू, उदमी, तमासगीर, भिक्षुक, वगैरे सर्व येत; आणि त्यांना गांवकीसंबंधाने थोडे फार नेमलेले काम असे. आतांप्रमाणे पूर्वी उद्योगवृद्धि व प्रवाससौकर्य नसल्यामुळे आणि बहुतेक पगारी व वतनी अंमलदार मिजासखोर बनल्यामुळे ते फिरतीवर निघाले म्हणजे त्यांना गांवगन्ना असतील नसतील तितक्या वतनदारांच्या सेवेची गरज पडे; म्हणून ह्या सर्वांची वतने सरकारने मंजूर केली असावीत. वतनांना देशपरत्वे व जातिपरत्वे निरनिराळी नांवें पडली आहेत. इंग्रज सरकाराने उपयोगाच्या दृष्टीने त्यांचे तीन वर्ग केले आहेतः सरकारउपयोगी, रयतउपयोगी, आणि सरकार व रयत ह्या दोघांनाही निरुपयोगी. वतनदारांची शक्य तितकी विस्तृत व वर्गवार यादी खालील टीपेंत दिली आहे.* तिच्यांतील निरुपयोगी वतनदारांच्या नामावळीकडे लक्ष दिले असतां आठशें लष्कर आणि नऊशे न्हावी अशी अनवस्था झाल्याचे दिसून येईल. हे सर्व वतनदार दरएक गांवांत होते किंवा आहेत अशांतला भाग नाहीं; तरी पण वतनदारी किती फोफावली ह्याची कल्पना करण्याला ही यादी पुष्कळ उपयोगी पडेल.
*(१) सरकारउपयोगी वतनदार-पाटील, राव, खोत, गावडा, गांवकर, नाईक, शेटी. मुकादम, ग्राममनसुबो, मुखी, मत्तादार, वाडेरो इत्यादि.
कुळकर्णी, पांड्या, पटवारी, निसुंदा, तलाठी,कर्णिक,शानभोग, ग्राममिरासीदार, पट्टामणी, करणम्, तापेदार इत्यादि.
महार, धेड, वेसकर, कारभारी, वल्हेर, मांदगेरू, तराळ, जागल्या, चौगुला, कोळी, भील, रामोशी, मांग, हवालदार, जमादार, नाईकवाडी, रखवालदार, पगी, शेतसनदी, कोतवाल, गस्ती, तळवार, अंबीकार, कोलेगार, मधवी, कोरभू, गडकरी, तशदार, शिपाई, वालीकर, बारकेर इत्यादि.
(२) रयतउपयोगी वतनदार-जोशी, गुरव, जंगम, जैनोपाध्याय, काजी, मुलाना, खतीब, मुजावर, सुतार, लोहार, चांभार, कुंभार, आंबेकरी, हळकरी इत्यादि
(३) ज्यांच्या चाकरीची इंग्रजसरकाराला व त्यांच्या रयतेला जरूर नाहीं असे वतनदार-पोतदार ( सोनार ), शेकदार, महाजन, दलाल, शेटे, घाटपांड्ये, निरखदार, चौधरी, डांगे, दानगट, औटी, मुसरीफ, पथकी, पखाली, जिनगर, मेंढगार, थळेकरी, बेलदार, शिकलदार, नावाडी, न्हावी, तांबोळी, परीट, शिंपी, तेली, माळी, गवंडी, कासार, पिंजारी, भाट, ठाकूर, वाजंत्री, घडशी, जोगी, भुत्या, गोसावी, बैरागी, पुजारी, वाघ्या, मुरळी, जोगतिणी, हिजडे, मुंढ्या, डवऱ्या, भराडी, गोंधळी, भगत, घुगरी, पोतराज, फकीर, भोई, वाटाडे, पानडे, गारपगार, डोलीवाले, कलावंतीण, पाट साफ करणारे इत्यादि. मोकदम (मुख्य अदमी) हा किताब पाटलाला असे. पाटील-चौगुल्याखेरीज सोनार, शेटे, सुतार, माळी, कुंभार, परीट, तेली, मठपती, वगैरे स्पृश्यजातींच्या वतनदारांना 'बाजेवतनदार' (बाज म्हणजे संपादन केलेला, गुणी, जसे तालिमबाज ) म्हणत. परंतु साधारणतः गांवचे सगळे श्रेष्ठ वतनदार ‘गांव-मुकादम' या नावाखाली मोडत. त्यांच्या सामान्यतः तीन ओळी किंवा प्रती करतात, त्या येणेप्रमाणे--पहिली ओळ: सुतार लोहार, चांभार, महार; दुसरी ओळः कुंभार, मांग, परीट, न्हावी; तिसरी ओळः जोशी किंवा भट, मुलाना, गुरव, कोळी. बलुतदारांची वरीलप्रमाणे सर्वत्र प्रतबंदी आहे, असे नाही. कारूंचा भरणा, काळी-पांढरीच्या मानाने प्रत्येकाच्या कामाची निकड, ह्या व अशाप्रकारच्या दुसऱ्या कांहीं कारणांचा विचार करून ज्या त्या परगण्याने ( कोठे कोठें गांवाने) आपापल्या सोयीप्रमाणे कारूंची प्रतवारी पहिल्याने लावली; आणि पुढे जसजशी प्रथमची कारणे कायम राहिलीं, अगर बदलत गेली, किंवा नाहीशी झाली, तसतसे ह्या ओळीतले कारू त्या ओळीत गेले, किंवा अजिबात कारूतून नारूंत उतरले, आणि नारूंतले लोक कारुंत चढले१. जागल्या, वेसकर वगैरे महारकीच्याच कामाचे पोटविभाग असल्यामुळे अनेक ठिकाणी ही सर्व कामें महार करतात, आणि तिन्ही ओळींचें बलुतें घेतात. पाटील, कुळकर्णी हेही बलुतदार होते, आणि ते आपले चाकरीबद्दल गांव गावकऱ्यांंकडून परभाऱ्याचे ऐन जिनसीं उत्पन्न घेत. वतनदार गांवमुकादमांची पूर्वीची कामें व आतांची कामें ह्यांत पुष्कळ फरक पडला आहे. परंतु सरकारउपयोगी गांवकामगार ह्यांच्या पूर्वीच्या व आतांच्या
१ अव्वल इंग्रजीत इंदापूर परगण्यांत कारूंची संख्या १४ होती व प्रतवारी येणेप्रमाणे होती-पहिली ओळ:-सुतार, लोहार, चांभार, महार; दुसरी ओळ:कुंभार, न्हावी, परीट, मांग; तिसरी ओळ:-सोनार, मुलाना, गुरव, जोशी, कोली, रामोशी. पंढरपूर परगण्यांत त्यांची संख्या १२ असून प्रतवारी येणेप्रमाणे होती-पहिली ओळ:-महार, सुतार, लोहार, चांभार; दुसरी ओळ:-परीट, कुंभार, न्हावी, मांग; तिसरी ओळ:-कुळकर्णी, जोशी, गुरव, पोतदार, कामाबद्दल जितकी माहिती मिळाली तितकी इतर वतनदारांबद्दल मिळाली नाही. म्हणून फक्त सरकारउपयोगी गांवकामगारांची पूर्वीच्या राजवटीतील कामें येथे नमूद करण्याचे योजिलें आहे.
दर गांवाला पाटील असतो. पाटील हा कांहीं कोणी राजाने दिलेला हुद्दा नसावा. जातपाटलाच्या नमुन्यावर सर्वश्रेष्ठ गांवमुकादमाचे पाटील हे नांव ठेवले असावें. जातपाटलाचे वर्णन दिले आहे त्यावरून गांवपाटलाच्या दर्जाची व अधिकारमर्यादेची अटकळ बांधता येईल. जातपाटलाचे सर्व अधिकार गांवपाटलाला असून खेरीज तो गांवांतला राजाचा प्रतिनिधि होता व आहे. पाटलाला गांवचा प्रभु म्हटले तरी चालेल. बहुतेक गांवांमध्ये सुरक्षिततेसाठी इतर वस्ती मध्यभागांत व पाटीलगढी गांवकुसाजवळ माऱ्याच्या ठिकाणी घातलेली आढळते. गांव वसविणारा पुढारी बहुशा गांवपाटील झाला. ज्यांनी गांव वसविला त्या मिरासदारांपैकी पाटलाचे घराणे प्रमुख व म्हणून गांवांत मानाने सर्वांत वडील असावयाचे. जो गांवची बाजू सांवरून व उचलून धरणारा आणि गांवाला घेऊन चालणारा म्हणून रयतेला पटला, आणि सरकारी काम, वसूलवासलात, बंदोबस्त बिनबोभाट करणारा म्हणून सरकाराला पटला, तो गांवचा पाटील केला. वतनाची कल्पना निघून ती पूर्णपणे रुजेपर्यंत पाटलाची नेमणूक सरकार व लोक ह्यांच्या पसंतीवर अवलंबून असावी. पाटलांना गांवापुरते मुलकी, दिवाणी, फौजदारी वगैरे कुल अधिकार असत. सर्व पाटील घरंदाज व त्यांतले बहुतेक सरदार असल्यामुळे त्यांना राजाचे बहुतेक अधिकार मिळाले, व ते त्यांनी नेकीने गाजविले. भोंसले, दाभाडे, पवार, गायकवाड, शिंदे, होळकर, ह्यांनी राज्ये कमावली तरी ते पाटिलकीला कवटाळून राहिले, आणि त्यांनी नवीन पाटीलवतनें संपादन केली. महाप्रतापशाली महादजी शिंद्यांना पाटील म्हणवून घेण्यांत भूषण वाटें हें इतिहासप्रसिद्ध आहे. 'उतरंडीला नसेना दाणा । पण दादल्या असावा पाटील राणा ॥' ही म्हण पाटलाचा मानमरातब व्यक्त करते. असो. पाटलाची मुख्य काम खाली लिहिल्याप्रमाणे होती. एका पाटलाच्या जुनाट कैफियतीत पुढील वाक्य आढळले. 'गावची चाकरी, लावणी, उगवणी वगैरे जें सरकाराचें काम पडतें तें करीत असतों ' आतां ह्या सूत्राचा विस्तार थोडक्यांत पाहूं. नवीन कर्दीकुळे उभीं करणें, रयतेच्या विचारानें काळीचा आकार ठरविणें, गांवचें सरकारदेणें सुकर करणें, तें वसूल करून तहसिलींत पाठविणें, सरकाराच्या हुकुमांची रयतेला समज देणें व त्यांची अंमलबजावणी करणें, गांवातर्फे सरकारनें दिलेला कौल घेणें व कतबा लिहून देणें, मामलेदाराकडुन रयतेला तगाई मंजूर करवून आणविणें व फेडीचा जिम्मा आपण घेणें, रयतेचे हक, तक्रारी, सूट, तहकुबी वगैरेंबद्दल सरकारांत दाद लावणें, गांवाच्या संरक्षणासाठी जरूर ती तजवीज करणे, जागल्यामार्फत आल्यागेल्याची, नवख्या व वहिमी लोकांची खबर घेणें, गुन्ह्यांचा तलास करणें, ज्यावर गुन्ह्याचा आळ बसत असेल त्याला पकडणे, गुन्हेगारांना कैद करणें, फटके मारणें व त्यांजकडून गुन्हेगारी घेणें, जातप्रकरणी अगर सावकारी तंटे स्वतः अथवा पंच बोलावून मिटविणें, पंचनिवाड्याप्रमाणें चालण्याबद्दल जामीनकतबा घेणें व तो अमलांत आणणें, गांवची शिवतक्रार असेल तर दोन्ही गांवांच्या शिवारांतील ढेंकळे डोक्यावर घेऊन तंट्याच्या शिवेवर चालत जाऊन प्रमाण करणें, गांवावर बंड, दरोडा आल्यास शिबंदी जमवून त्याचा मोड करणें इत्यादि कामें पाटील करीत. एकंदरींत पाटील हा जितका सरकारचा अधिकारी तितकाच तो रयतेचा कैवारी होता. रयतेला मदत मिळून तिजकडून काळीची मशागत उत्तम होईल, तिजवर सरकारदेण्याचा जास्ती भार पडणार नाहीं, व तिला चोराचिलटांचा उपद्रव लागणार नाहीं, ह्यांस्तव सर्व तजविजी व खटपटी पाटील करी. गांवांत ज्या जातीचे कुणबी किंवा ज्या जातीचा भरणा असतो त्या जातीचा पाटील राहतो. ब्राह्मण पाटील क्वचित असतो. बहुतेक पाटील मराठे व त्यांच्यानजीकच्या जातीचे असतात. मुसलमान पाटीलही कित्येक ठिकाणीं नजरेस पडतात; त्यांचे पूर्वज बहुधा वतनासाठीं मुसलमान झाले असावेत. बोलणें, चालणें, कुळांची माहिती, पीक पाण्याचा अंदाज, गुन्ह्याचा तलास, गांवासंबंधी सरकारी खासगी व्यवहार वगैरे गोष्टींत ते चांगले वाकबगार असत. परंतु त्यांना लिहिण्याचे अंग अगदी जुजबीं, बहुतेक नव्हते म्हटले तरी चालेल.
पाटील स्मरणाचा कितीही धड झाला तरी वर नमूद केलेली त्याची गांवकीची कामें लिहिण्यावांचून चोख होणे कठीण. सबब त्याला लेखक मदतनीस अवश्य झाला. ह्या मदतनिसाला स्थलपरत्वें पटवारी, कुलकर्णी किंवा पांड्या म्हणतात. ' नांव लिहिणे' हा एक पूर्वी जमेदारी हक्क होता. पट म्हणजे इजारपट ( गांवचा मुख्य हिशेबी कागद) करणारा तो पटवारी, किंवा कुळे करणारा म्हणजे कुळवार गांवचा हिशेब लिहिणारा तो कुलकर्णी. हा शब्द बहुधा दक्षिण हिंदुस्थानांतून उत्तरेकडे आला असावा, कारण द्राविडी भाषेत शेतकऱ्याला “कुल" व कुळकर्ण्याला "करणं" म्हणतात. पांड्या हा पंडित शब्दाचा अपभ्रंश आहे. कुळकर्णी हा पाटलाचा हिशेबनीस होय. कुळकरणवतन समारें हजार वर्षांचे जुनें आहे असें सांगतात. बहुतेक कुळकर्णी ब्राह्मण, कांहीं प्रभु व क्वचित् मराठे, लिंगायत, व मुसलमान आहेत. पाटिलकीच्या खालोखाल कुळकरणाला महत्व असे, आणि पेशव्यांपासून तो खालपर्यंत सर्व ब्राह्मण सरदार त्याला बिलगले. सोनपतपानपत खेटलेल्या अंताजी माणकेश्वरानें राशीनच्या देवीच्या देवळाभोंवतीं ओवऱ्या बांधल्या; त्यांच्या शिलालेखांत सरदारी, जहागिरदारी वगैरेंचा उल्लेख न करतां "कुळकर्णी कामरगाव" इतकेंच उपपद त्याने आपल्या नांवापुढें लाविले आहे. ही गोष्ट कुळकर्ण्यांचा सामाजिक दर्जा उत्कृष्ट रीतीने दाखविते. कुळकर्णी गाव दप्तरचे सर्व काम करी. शिवाराचें कमाल क्षेत्र, आकार व वर्णन ह्यांचा आकारबंद, शेतवारपत्रक, लावणीपत्रक, पडपत्रक, सरकारी देण्याचे असामीवार वसूलबाकीपत्रक व त्याची बाबवार फाळणी आणि जमाखर्च, गुरांची व माणसांची गणति वगैरे मुलकी कागदपत्र; दिवाणी कामांतील पंचायतीचे सारांश व फैसलनामे, फौजदारी कामाचे कागद वगैरे लेखी कामें कुळकर्णी करी. ह्यांखेरीज गांवकऱ्यांची पत्रे, देण्याघेण्याचे दस्तैवज, पावत्या व त्यांचे सावकारी सरकारी देण्याचे जमाखर्च ,हेही लिहिणे तो लिही.
गांवकीच्या कसबी कामाची जातवार वाटणी झाल्यावर बेगार काम उरलें. ते कोणतीही हुन्नरी जात पत्करीना. असे हे पडून राहिलेलें काम महारांच्या गळ्यांत पडले; म्हणूनच महार म्हणत असतात की, आम्ही काय पडल्या कामाचे चाकर. जें काम करण्याला अभ्यास, कला किंवा विशेषसें ध्यान नको त्याला बेगार (बे-कार ) म्हणतात. रोख मेहनतान्यावांचून करावे लागते त्या कामाला तेलंगणांत 'वेट्टी' म्हणतात; तेव्हां ह्या शब्दापासून 'वेठ' शब्द निघाला असावा. गांवगाड्याचा खराखुरा वेठ-बेगारी किंवा हरकाम्या फरास महार होय. जागल्याचे पर्यायशब्द 'रामोशी ' व 'भिल्ल' हे आहेत. 'अमुक वर्षी मांग अगर मुसलमान रामोसकीवर होता, भिलाबरोबर आरोपी पाठविला', असें लोक बोलतात. ' रान-वासी ' ह्या शब्दापासून रामोशी शब्द निघाला असावा. वेसकर व रामोशी ह्या व्यवसायवाचक शब्दांवरून महाराचा जाबता वेशीच्या आंत असावा असे वाटते. तरी पण तुफानी रानटी जाती निवळून गांवांत येईपर्यंत पांढरीप्रमाणे काळीचा चौकीपहाराही महाराकडे होता; आणि रामोसकी उर्फ जागलकी हे महारकी वतनाचा एक पोटविभाग आहे,हे अनुमान जास्त सबळ व सप्रमाण दिसते. ग्रामसीमांच्या वादांत सीमारक्षक ह्या नात्याने गांवमाहाराने दिव्य केल्याबद्दल ऐतिहासिक लेखही प्रसिद्ध झाला आहे. असो. महारांच्या कामाची पाळी आली व संपली म्हणजे 'काठी' आली व पडली असे म्हणतात,कारण कामगार महाराचे हातांत भली मोठी काठी असते. पाळीप्रमाणे सर्व वतनदार महारांच्या हातीं वेसकरकीची काठी चढते. वेसकर हे तेवढ्यापुरते समस्त महारांचे नाईक समजले जातात; आणि ते वेशीवर किंवा चावडीवर हजर राहून कामगार महारांच्या बाऱ्या वगैरे लावतात, व जरूर तितके महार कामावर आणून गुदरतात. मुलकी, फौजदारीसंबंधाने महारांची मुख्य कामें येणेप्रमाणे होतः-पट्टीसाठी असाम्यांना; बोलावणे व तगादा करणे; गांवचा वसूल तहसिलींत घेऊन जाणे कागदपत्र परगांवीं पोंचविणे; पाटीलकुलकर्ण्यांबरोबर गांवांत व शिवारांत हिंडणे आणि परगांवी जाणे; गांवांत मुक्कामाला मोठे लोक, अधिकारी आले म्हणजे त्यांच्यासाठी सरपण चारा आणणे, त्यांच्या जनावरांची मालीस करणे, त्यांना दाणापाणी दाखविणे, शेणलीद काढणे, व त्यांच्या तळावर 'बशा' ( बसलेला ) बसून राहणे; गांवची व कामगारांची वेठबेगार वाहणे, त्यांना वाट दाखविणे; वाटसरांना जंगलांतून नेऊन पोंचविणे; ज्या गोष्टी लोकांना जाहीर करावयाच्या असतात त्यांची दौंडी देणे; गांवची शीव व शेताच्या बांध उरुळ्या ध्यानांत धरणे, त्या न मोडल्या जातील अशी खबरदारी घेणे व त्यांबद्दलच्या भांडणांत पुरावा देणे; दरोबस्त पिकें व खळी राखणे; रात्री काळीपांढरीत गस्त घालणे व गांव, जंगल व झाडे जतन करणे; जंगली जनावरें मारणे; रात्रंदिवस घाटांत पहारा करणे, चोरवाटा व माऱ्याच्या जागा ह्यांची माहिती मिळवणे व त्या रोखणे; गांवांत आल्यागेल्याची खबर काढणे, न देखल्या माणसावर नजर ठेवणे, वहिमी लोकांची पाटलाला वर्दी देणे; गांवांतल्या माणसानमाणसांची चालचलणूक लक्षात ठेवणे; चोरांचा तपास लावणे व माग काढणे, चावडीपुढें, वेशीपुढे व गांवचे रस्ते झाडणे, गांव साफ ठेवणे, मेलें जनावर ओढणे वगैरे होत. ह्यांशिवाय घरकी कामें महार करीत. गांवकीवर नेमून दिलेल्या महारांना 'पाडेवार' म्हणत. घरकीं कामे करणाऱ्या महाराला 'राबता' महार किंवा 'घरमहार' म्हणत. वतनदार महारांची घरकी कामें येणेप्रमाणे आहेत:-कुणब्याचें बी, औत, काठी वगैरे ओझ्यांची शेतांत नेआण करणे, दारापुढे झाडणे व गुरांचे गोठे साफ ठेवणे, सर्पण आणणे व फोडणे; मुऱ्हाळी जाणे, मिरासदार परगांवीं जाण्यास निघाला असता त्याचेबरोबर गड्याप्रमाणे जाणे, चिठ्याचपाट्या परगांवी नेणे, मौतीची खबर परगांवीं पोंचविणे, सरण वाहणे इत्यादि. ही कामें अशी आहेत की, महाराचे प्रत्येकाच्या घरीं व शेतांत येणजाणे घडे. त्यामुळे गांवचा खडानखडा त्याला ठाऊक असे. शेत, बांध किवा गांवची शीव ह्याबद्दल भानगडं उपस्थित झाली की महाराच्या साक्षीवर सगळी भिस्त असे. रयतेच्या दृष्टीने हा महाराचा फारच मोठा उपयोग होता, कारण वांटपांच्या कामांत भाऊवांटण्या व वहिवाट ह्यांची खात्रीशीर माहिती महार सांगत. सर्व वतनांत महारकी वतन अत्यंत समायिक असल्यामुळे महार आपापसांत वेसकरकी, गांवकी व घरकीच्या कामांवर जरूर तितके इसम नेमून देत. फौजदारी व मुलकी कामें एकट्या महाराकडे राहिली अशी गांवें थोडी आहेत. पुष्कळ ठिकाणी त्यांची फारकत होऊन फक्त गांवकी घरकीची मुलकी कामें व जातहक्क-जसें पडे ओढणे, सरण वाहणें-हीं महारांनी आपणांकडे ठेविली; आणि फौजदारी स्वरूपाची कामें जागले, नायकवाडी (जासूद ), कोतवाल, हवालदार, ( खळे-राखण), शेतसनदी ( गांवलष्कर ), ह्यांच्या गळ्यांत घातली. नायकवाडी, कोतवाल, हवालदार, कांहीं कांहीं गांवांत आढळतात, परंतु जागले मात्र सर्वत्र आढळतात. अगदीच लहान गांव असला तर तेथे महारकी व जागलकी एकाच इसमाकडे असतात, व तो जातीने बहुधा महार किंवा मांग असतो. हवालदार, नाईकवाडी इ. बहुधा मुसलमान, मराठे, सोनार, कोळी वगैरे जातींचे लोक असतात. भील, कोळी, रामोशी, मांग, मुसलमान, महार व क्वचित् कुणबी, हे जागले असतात. जागल्या म्हणजे गांवचा पोलीस शिपाई. त्याजकडे बहुधा पोलिसचे काम असते. तो जातीचा मांग असल्यास येणेप्रमाणे घरकी कामें करतो. केरसुण्या, कुंचे, शिंकी, सोल, नाडे, कासरे, लहान मोठे दोरखंड, घोड्यांच्या आघाड्या, पिछाड्या, वेल्हें, वेठण, प्रेताची सुतळी वगैरे पुरविणे. दौंडी, कुस्त्या, यात्रा, लग्नकार्य इत्यादि प्रसंगी महार संबळ सनई व मांग डफ वाजवितात. फांशी देण्याचे काम मांगांखेरीज दुसरे कोणी करीत नाही. जागल्या मांगाव्यतिरिक्त जातीचा असल्यास तोही आपल्या जातीची गांवकी घरकीची कामें करतो.
गांवगाड्याचा हरकाम्या महार खरा; पण जातिभेदामुळे त्याला चावडी चढतां येत नसे. त्यामुळे शिवाशिवीच्या कामांत चौगुला हा पाटीलकुळाचा तैनाती झाला. तो बहुधा पाटलाच्या जातीचा असे. त्याची कामें-चावडींची झाडलोट, गांवच्या दप्तरची ठेवरेव, दिवाणी मुली फौजदारी वगैरे कामांसंबंधाने लोक चावडीवर बोलावणे, आणि तेथे पाटील-कुळकर्णी सांगतील तें खिजमतीचे काम करणे इत्यादि. पाटीलकुळकर्ण्यांना चौगुल्याच्या चाकरीची गरज फक्त सरकारी कामासंबंधानेंच लागे असे नाही. पूर्वीची राज्यव्यवस्था व समाजव्यवस्था आणि पाटीलकुळकर्ण्यांच्या अधिकारांचे व कामांचे क्षेत्र मनांत आणलें, म्हणजे हे उघड होते की, त्यांना गांवकीच्या सार्वजनिक बाबतींमध्ये चावडी भरविण्याचे अनेक प्रसंग येत; आणि त्या वेळी चौगुल्याला काम पडे. नगर जिल्ह्यांतील अकोले तालुक्यांत असे सांगतात की, कोणी मोठा माणूस गांवीं आला म्हणजे स्वयंपाकाची भांडीकुंडी जमविणे व ती उटणे ही चौगुल्याची कामें होत. वतनदार चौगुले व त्यांचे इनाम फार थोड्या ठिकाणी नजरेस पडतात. स्वराज्यांत हरएक कारणानें जो पैसा जमेला येई त्याला 'तहसील' ' इरसाल' 'पोता' असें म्हणत. पूर्वी टंकसाळी नव्हत्या, सबब खरें खोटें नाणे ओळखणे कठीण जाई. खाजगी देण्याघेण्यांत नाणे पारखण्याची अडचण येईच, पण विशेषतः गांवचा पोता तहसिलींत ( तालुकाकचेरी) पटविण्याची फार जिकीर पडे. खोटे म्हणून जर तहसिलींतून कांहीं नाणे परत आले तर ते कोणाच्या माथीं मारावे याचा पाटलाला मोठा बुचकळा पडे. ह्या सर्व गोष्टी ध्यानांत आणून गांवाने सरकारी आणि खासगी देण्यांतलें नाणे पारखण्याला व त्याच्या खरेपणाबद्दल जिम्मा घेण्याला सोनार उभा केला; आणि त्याच्या हुद्दयाचें नांव 'पोतदार' ठेविलें. सोनारांमध्ये पोतदार ही बहुमानाची पदवी आहे. तालुकाकचेरींत जमेचे पैसे जो सराफ कारकून तपासून घेतो त्याला अजून पोतदार म्हणतात. गांवच्या सोनाराने एकदां कां गांवकऱ्याचे पैसे पारखून घेतले आणि त्यांमध्ये पुढे मागे खोटे किंवा बिन चलनी नाणे निघाले तर ते त्याला पुरे पाडावें लागे. त्याची तोषीस रयतेला बसत नसे. ह्या गांवगाड्याचे कामाखेरीज तो कुणब्यांचें व अलुत्या-बलुत्यांचे सोनारकाम करी. सुतार, लोहार, वगैरे कारू आपापली जातकामें करीत व अजूनही करतात. त्यांची प्रस्तुत कामें बलुतें-अलुतें ह्या प्रकरणांत विस्ताराने सांगितली आहेत.
मुसलमानी अमलांत तहसिलीचा वसूल करणे हे देशमुख, देशपांड्ये ह्यांचे मुख्य काम होते. त्यांचेकडे फौजदारी काम असल्याचे दिसून येत नाही. तथापि गांवाची किंवा शेताची शीवतक्रार, इनाम, वतनें वगैरेंची वारसचौकशी, वांटणी इ. दिवाणी पंचायतींत ते प्रामुख्याने असत. सरकारतर्फे आपापल्या महाल परगण्यांतील पाटलांशी ते गांवच्या महसुलाचा ठराव करीत. वसुलाची सूट, तहकुबी मागण्यांत, तगाई आणविण्यांत व ह्यासारख्या इतर रयत-हिताच्या कामांत पाटीलकुळकर्ण्यांना त्यांचे चांगले पाठबळ असें. पुढे पुढें मुसलमान राजे सबंध परगण्याच्या वसुलाचा इजारा त्यांना देऊ लागले. त्यामुळे त्यांची सत्ता अनावर होऊन ते सरकारला धाब्यावर बसवून बेलाशक वसूल तोंडांत टाकू लागले. मराठेशाहीत त्यांचे बहुतेक वसुली अधिकार संपुष्टात येऊन 'खालसा' ( सरंजमाप्रीत्यर्थ दुमाला न झालेला) महाल मामलेदारांकडे किंवा कमाविसदारांकडे कमाविसीने देत. तथापि पाटील, कुळकर्णी इरसाल भरण्याचा हिशेब देशमुख देशपांड्यांकडे गुजरीत; आणि सालअखेर मामलतीचा ताळेबंद आपल्या दप्तराशी रुजू पाहून तो बरोबर आहे अशाबद्दल देशमुखदेशपांड्यांना व दिवाण, फडनवीस, पोतनवीस वगैरे दरकदारांना त्यावर व त्यासारख्या दुसऱ्या हिशेबी कागदांवर मखलसी करावी लागे. महालजमेदार पिढीजाद वतनदार असल्यामुळे सरकारांत त्यांना शिरकाव मिळे व ते मामलेदारांच्या जुलमाबद्दल व गैरवर्तनाबद्दल दरबारांत कानगी करीत. त्यामुळे पगारी कामगारांना त्यांचे एक प्रकारचे बुजगावणे असे. गांव-जागल्यांवर जशी पाटलाची देखरेख असे तशी परगण्यांतील समस्त जागल्यांवर परगणे-नायकाची होती.
गांवमुकादमांना व महालजमेदारांना नोकरीबद्दल सरकारांतून इनाम म्हणजे दुमाला जमिनी, नक्त नेमणुका व रयतेवर रोखीचे अगर ऐन-जिनसी परभारा हक्क असत. इनाम जमिनी बिन धान्याने किंवा कमी धाऱ्याने चालत; आणि नक्त नेमणुका गांवच्या ऐन जमेवर बसविल्या असून त्या सरकार वसूल करी आणि आपल्या खजिन्यांतून नेमणूकदारांना खर्ची घालून आदा करी. पूर्वी दाम-दुकाळ होता. सरकारसुद्धा आपलें येणें रयतेकडून धान्याच्या रूपाने घेई. मेहनताना किंवा हक्क चुकविणे रयतेला सोपे जावें म्हणून वतन-पद्धतींत सर्व सरकारी खासगी देणे ऐन जिनसी देण्याचा प्रघात पडला. सोयीप्रमाणे ऐन जिनसी हक्क रयत कधी कधीं रोकडीनेही आदा करी. ज्याप्रमाणे वतनदार कामदार कुणब्यांकडून काळीवर सळई, पेंढी, घुगरी किंवा बलुतें घेत त्याप्रमाणे ते पांढरीमध्ये हुन्नरदार, दुकानदार यांजकडून कसबवेरो, शेव, फसकी, वर्तळा घेत. पांढरी-हक्कांना मोहतर्फा म्हणतात. पाटीलकुळकर्ण्यांच्या मानाने देशमुख-देशपांड्याचे इनाम, हक्क व मानपान पुष्कळ अधिक असत. देशमुख-देशपांड्यांच्या हक्कांना 'रुसुम' व 'भिकणे' म्हणत. गांवमुकादमांत पाटीलकुळकर्णी अधिकाराने व मानाने सर्वात श्रेष्ठ होत. देशमुखाला परगण्याच्या एकंदर वसुलाचा व लावणीचा विसावा हिस्सा व देशपांड्याला चाळिसावा हिस्सा, आणि पाटीलकुळकर्ण्यांना गांवच्या राशीचा दहावा हिस्सा मिळे, असा अंदाज आहे. कुळकर्ण्यांच्या बाबती पाटलाच्या निमानिम होत्या; आणि दोघांना गांवापुरते देशमुख-देशपांड्यांप्रमाणे सर्व-पण कमी प्रमाणांत-बाबती, हक्क, व अम्मल मिळत. मामूलप्रमाणे महारांना गांवकी घरकीबद्दल नांगरामागें आठ पाचुंदे बलुतें मिळे; बाकीच्या पहिल्या ओळीच्या कारूंना चार, दुसरीच्यांना तीन व तिसरीच्यांना दोन पाचुंदे याप्रमाणे बलुते मिळे. स्थलपरत्वे निरनिराळ्या परगण्यांत किंवा एकाच परगण्यांतील निरनिराळ्या गांवांत बलुत्याचे निरनिराळे निरख होते हे सांगणे नकोच. देशमुख-देशपांड्ये, व पाटीलकुळकर्णी ह्यांच्या बाबती व अंमल काय होते याजबद्दलची टिपणे या प्रकरणाच्या शेवटी दिली आहेत.
गांवगाड्याचा सर्व प्रकारचा कारभार चावडींत होतो. कचेरीला सरकारवाडा किंवा वाडा म्हणतात. वाडी हे स्त्रीलिंगी रूप लघुत्व दाखविते. चौ-वाडी चारचौघेजण जमण्याचे ठिकाण तें चावडी. रा. भारदे ह्यांच्या मते हा शब्द चव्हाटी ह्या शब्दापासून निघाला. गांवकऱ्यांचे परस्पर घरकी व गांवकी व्यवहार एकमेकांत किती गुरफटले होते व आहेत हे जातवतनदार व गांववतनदार ह्यांच्या कामांचे वर जे दिग्दर्शन केले आहे त्यावरून लक्षात येईल. चावडीवर नुसते सरकारी व सार्वजनिक व्यवहारच होत नसत. खाजगी वाद, भानगडीसुद्धां चावडीवरच येत. मोठ्या वस्तीच्या गांवांत जातीजातींनी आपापल्या खास सार्वजनिक कामासाठी गांव-चावड्यांखेरीज स्वतंत्र जात-चावड्या बांधल्या आहेत. शहरांतून अनेक पेठा आणि त्यांच्या अनेक चावड्या व पाटीलकुळकर्णी पाहण्यांत येतात. महार, मांग वगैरे अस्पृश्य जातींच्या लोकांना गांव-चावडींत यऊन बसतां येत नाही; म्हणून बहुतेक खेड्यांत एक गांव-चावडी व दुसरी महार-चावडी अशा दोन चावड्या नजरेस पडतात. पाटलाची गादी गांव-चावडीत असते. तेथे पाटीलकुळकर्णी आपली कचेरी करतात, आणि आपल्या नानाविध वतनदार नोकरांच्या मदतीनें गांवचा कारभार हांकतात. सर्व प्रकारच्या पट्ट्या-विशेषतः सरकार-सारा-पटविण्याचे मुख्य ठिकाण चावडी असल्यामुळे चावडी शब्दाचा विशेष अर्थ सरकार-पट्टी असा झाला आहे. चावडी दिली म्हणजे सरकार-सारा दिला असा अर्थ होतो. लोक नेहमीं पट्टीपासोडी हा जोड शब्द वापरतात, त्यांत पासोडी ह्याचा अर्थ पाटील हक्क असा असावा; कारण पाटील इनामाला 'पासोडी' इनाम म्हटलेले जुन्या कागदपत्रांत आढळते.असो. सरकारची गांव-कचेरी म्हणून आपण चावडीकडे पाहूं आणि गांव-मुकादमानीचे थोडक्यांत सिंहावलोकन करूं.
गांवची देवस्थाने, धर्मादाय, जत्रा, उत्सव, खेळ, परगणे-अंमलदार, गांव-मुकादम इत्यादींच्या सरकारने मंजूर केलेल्या गांवावर खर्च पडणाऱ्या नेमणुका व वर्षासनें; गरिबांना भिक्षा, आणि आल्यागेल्यांची सरबराई; अधिकाऱ्यांना नजरभेटी आणि चिल्हर खर्च; वगैरे बाबती मिळून वसुली रकमेच्या शेकडा १० ते २० पर्यंत समस्त 'देहखर्च' किंवा गावकीचा खर्च होत असे. तो सगळा सरकार क्वचित् मंजूर करी. ह्यामुळे आपसांत फाळा करून गांवकरी ‘गैरसनदी' ( नामंजूर ) खर्च भागवीत असत. गांवचे हिशेब सरकारांत पटविण्यासाठी तेथील हिशेबनिसाला लांच द्यावा लागे; त्याला 'दरबार खर्च, कारकुनी' किंवा 'अंतस्थ' म्हणत. त्याचीही भरपाई गांवाला करावी लागे. पहिल्या पहिल्यानें हा खर्च गुप्त असे. पुढे तो राजरोष हिशेबी कागदांत फडकू लागला. ह्यांखेरीज गावकुसाची दुरुस्ती, गांवच्या बंदोबस्तासाठी शिबंदी (शिवार-रक्षक) ठेवणे, गोसाव्याची पलटण, गोखल्यासारख्या सरदारांचे लष्कर, खंडणी वगैरे गांवकीच्या व सरकारच्या खर्चाच्या अनेक बाबी प्रसंगोपात्त गांवावर येऊन पडत. त्यासाठी गांव कर्ज काढी, आणि पट्टी करून किंवा सावकाराला गांवनिसबत इनाम ( सावकाराचे रुपये फडशा होईपर्यंत भोगवटा ) देऊन तें चुकतें करी. वरील बाबींपैकी बऱ्याच सरकारी खजिन्यांत जात. त्या काळीच्या साऱ्यांतून म्हणजे ऐन जमेंतून भागत नसत, म्हणून काळी-पांढरीवर 'एक साल पट्टी' अगर 'ज्यास्त पट्टी' आकारीत. ज्यास्त पट्टी सालोसाल आकारावी लागली म्हणजे ती फिरत्या करांतून निघून कायमचें देणे होऊन बसे, व तिला 'सवाई-जमा' म्हणत. मिरासदार काळीशी कायमचे जखड्यामळे जास्ती पट्टीचा चट्टा उपऱ्यांपेक्षां मिरासदारांना जास्त बसे. एकंदरीत असा अंदाज आहे की, जेंव्हा दंगाधोपा अगर स्वारी वगैरेंचा खर्च नसे तेव्हां जमिनीच्या उत्पन्नाचे तीन भाग पडत: एक भाग सरकाराला पावे, एक बैल-बियाणे व हक्कदार यांमध्ये मुरे, व एक हिस्सा मिरासदारांना राही.
स्वराज्यांत हिशेबी साल फसली असे, व त्याला आरंभ मृग नक्षत्र निघाल्या दिवसापासून होतो. दरसाल वर्षारंभी हुजुरांतून मामलेदारांना खालसा महालाबद्दल “आजमास" अथवा "नेमणूक बेहेडा" देत. ह्या कागदांत एकंदर महालाचा कमाल आकार दाखल करून त्यातून दुमाले गांव व जमिनी वगैरेंचा आकार वजा घालून निव्वळ ऐन जमा आकारीत. याशिवाय बलुतें, मोहतर्फा, राबता, व जकात, वगैरे जमासुद्धां एकंदर आकार जमा धरून त्यांतून महालाचा मुशाहिरा, मामलेदार, दरकदार, कारकून, शिबंदी ह्यांचा खर्च, देवस्थान, धर्मादाय, खैरात, व रोजींदार वगैरे सरकार-मंजूर खर्च वजा करून बाकी राहिलेल्या बेरजेपैकी निवळ रसद सरकारास किती यावी व व्याज, हुंडणावळ, बट्टा वगैरे किती मुजरा द्यावयाचा याचा तपशील असे. मामलेदार ह्या आजमासाच्या धोरणानें वसूल व खर्च करीत. बरसात लागली म्हणजे मामलेदार पाटलांला बोलावून घेत, व त्यांजकडून पड-लागणीचा तपशील व वसुलाचा इकरार करून घेत. ठाण्यांतून गांवीं परत आल्यावर पाटील रयतेला लागण करण्यास उभारी देई, पड जमीन वहितीस लावी, नडलेल्या कुळांस मामलेदाराकडून तगाई व सावकारांकडून कर्ज मिळवून देई, व जुनें देणें तहकूब ठेवण्यासाठी मधस्थी करी. पिके आकाराला आली म्हणजे मामलेदार पाहणीला निघत आणि गांवगन्ना लोकांच्या तक्रारी-अर्ज यांचा इनसाफ करीत. ते शेकदारांच्या मदतीने गांवचे दप्तर तपासीत. त्यांत लिहिलेला कमाल आकार, वसुली आकार, कमजास्त लावणी, आणि पाटील-कुळकर्णी, देशमुख-देशपांड्ये, व यच्चयावत् वतनदार ह्यांचे सूट-तहकुबीबद्दलचे म्हणणे, ह्या सर्वांचा विचार करून ते जमाबंदीचा ठराव करीत. पाटलानें तो मान्य केला की त्याला कबुला-कितबा देत. कोणी किती पट्टी द्यावयाची ह्याबद्दलचा पाटलाचा व रयतेचा ठराव यापूर्वीच झालेला असे. तो मामलेदारांनी कबूल न केला तर पाटील पुन्हां रयतेचा विचार घेऊन तो मामलेदारांना कळवी. इतकेंही करून दोघांचा मेळ न बसला तर मामलेदार ‘बटाई' ठरवी, म्हणजे अर्धे उत्पन्न कुळाने ठेवावें व अर्धे सरकाराला द्यावे असा ठराव करी. कोठे क्षेत्रावर तर कोठे नांगरांच्या संख्येवर महसूल ठरवीत. पूर्वीची जमाबंदी म्हणजे एके बाजूला सरकारतर्फे मामलेदार व दुसऱ्या बाजूला रयततर्फे पाटील, मिरासदार, कारूनारू, देशमुख देशपांड्ये ह्यांमधील देवाण-घेवाणीचा सौदा होता. जमाबंदी मुक्रर होईपर्यंत गांवची पिकें हवालदारांच्या जाबत्यांत असत. पट्टीचा हप्ता चुकला म्हणजे शेकदार पाटलाच्या मदतीला शिबंदी पाठवी. ज्याकडे बाकी राही त्याला ती चुकवीपर्यंत मोहसल्ली (महसूल करणारा शिपाई) तगादा करी, चावडींत कोंडी, त्याच्या डोक्यावर धोंडा देई, त्याचे चुलात पाणी ओती, त्याचा दाणापाणी बंद करी म्हणजे त्याला नदी-विहिरीवर पाण्याला जाऊ देत नसे. इतक्यानेही तो वठणीवर न आला तर त्याला मामलेदाराकडे पाठवीत. मामलेदार त्याला कैद करी, त्याची गुरे ढोरें वगैरे जंगम मालमत्ता विकी, पण ती विकतांना त्याला खाण्यापिण्याला राखून ठेवी, व स्थावर विकीत नसे. गांवच्या सरकारदेण्याची हमी गांववार असल्यामुळे काही कुळे नादार किंवा परागंदा झाली तर त्यांजकडील येणे बाकीच्यांवर फाळून चुकवावे लागे. क्वचित् प्रसंगी संभावित गांवकऱ्यांना ओलीस धरून नेत. तेव्हां पाटील व गांवकरी एखाद्या भरदार किंवा गरजू कुळाची जमीन विकून बाकी चुकवीत व त्यांना सोडवून आणीत. सबंध गांवानें पट्टी दिली नाही तर गांवावर स्वार दवडण्यांत येई, आणि 'शिलकावणे' (ज्याच्याकडे तगाद्याला शिपाई पाठवावयाचा त्याच्याकडून त्याची पोटगी घेणे ) बसविण्यांत यई. एवढ्याने भागले नाही तर खुद्द पाटलाला तगादा लागे, व नाठाळ कुळाच्या सर्व यातना त्याला भोगाव्या लागत. सारांश, गांवाच्या मुलकीं कामांच्या सुखदुःखाचा पूर्ण अधिकारी पाटील होता. ह्या महसुली पद्धतींत मामलेदारांना व त्यांच्याआडून इतर वतनदारांना अवदानें मारण्याला पुष्कळ जागा होती. मामलतीवर जहागीरदार, इनामदार, देशमुख, देशपांड्ये वगैरे जमेदारी पेशांच्या लोकांची नेमणूक होत असे. ह्या वर्गाची जाळी-मुळे रयतेशी जखडली असल्यामुळे सर्व प्रकारच्या भल्याबुऱ्या लोकांशी त्यांचा संबंध येई, व गोरगरीबांची हलाखी त्यांना कळत असे. तेव्हां ते रयतेची दाद घेत व लावीत, आणि मागचा पुढचा विचार पाहून लोकांची मने मिळवून मामलतीचे काम करीत. लोकांत व सरकारांत त्यांचे पिढीजाद वजन असे. जोपर्यंत मामलतीवर जमेदारांच्या नेमणुका होत तोपर्यंत रावापासून तो रंकापर्यंत जणों काय एकीशी एक अशा पायऱ्या लागून राहिल्या होत्या,आणि रांगेने किंवा ओघानें कोठेंना कोठे तरी सर्वांचा पल्ला पोहचे, व दुःखपरिहार होई.
मुलकीप्रमाणे गांवचे फौजदारी अधिकारही पाटलाला होते, आणि मुलकी कामांत जे त्याचे मदतगार व वरिष्ठ तेच फौजदारी कामांत असत. ह्या कामांत त्याला मुख्य मदत जागल्याची असे, आणि त्याचा वरिष्ठ मामलेदार होता. कुळकर्णी दप्तरचे काम करी आणि जागल्या गांवचा बंदोबस्त ठेवी. बलुतें, शेव वगैरेसाठी चोहोंकडे पायपीट आणि चटपटलटपट करण्याचा महार जागल्यांना बालाभ्यास असतो; व ते माणसाचें पाणी तेव्हांच जोखतात. जागले वहिमी जातीचे असतात. 'चोराच्या हवालीं किल्ल्या' हे तत्त्व त्यांच्या नेमणुकीच्या मुळाशी असावें. गांवचे सर्व बदमाष जागल्याला माहीत असत. गांवाच्या शिवेंत झालेल्या चोरीचा पत्ता लावण्याची 'बाप दाखीव नाहीं तर श्राद्ध कर' असली जबाबदारी त्यावर असे. चोरीचा माग शिवेच्या बाहेर निघाला नाही तर जागल्याकडून चोरी भरून घेत; आणि जर ऐवज त्याच्या ऐपतीबाहेर असला तर बाकीची भरपाई गांव करून देई. त्याने मुद्देमाल काढून दाखविला किंवा दुसऱ्या गांवाच्या शिवारापर्यंत माग नेऊन भिडविला की, त्याच्या गळ्याचे पेंडें सुटे आणि तें सदर गांवाच्या जागल्याच्या गळ्यांत पडे. असें होता होतां ज्या गांवापुढे माग जात नसे त्या गांवाला चोरी भरून द्यावी लागे. जागले पाटलांची कसूर किंवा सामलात दिसून आल्यास त्यांचे इनाम काढून ते त्यांच्या बिरादरांना देण्यांत येत. गुन्ह्याच्या तपासांत आरोपी कबूल व्हावा, त्याने मुद्देमाल काढावा, व आपल्या साथीदारांची नांवें सांगावीत म्हणून त्याला मारपीट करून त्याचे फार हाल करीत; आणि मारहाणीच्या निशाण्या त्याच्या अंगावर दिसून येऊ नयेत अशी खबरदारी घेत. स्वतः किंवा पंचामार्फत फिर्यादीचा निकाल लावून अपराध्याला दंड, कैद करण्याचा अधिकार पाटलाला असे. पेंढारी, लुटारू जाती, सशस्त्र हल्ला, अगर बंड ह्यांचा प्रतिकार करण्यासाठी पाटील सबंध गांवाची मदत घेई, अगर प्रसंगविशेषीं गांवच्या महार जागल्यांच्या जोडीला शिबंदी, बारगीर, स्वार चाकरीस ठेवून पुंडावा मोडी. मुलखात शांतता राखण्यासाठी मामलेदारांच्या ताब्यांत शिबंदी व बारगीर होते, आणि ते बंडाळी मोडीत. ह्याखेरीज भील, रामोशी वगैरे तस्कर-जातींच्या नायकांकडून मामलेदार जामीन घेत. परंतु एका दोरींत राज्यव्यवस्था नसल्यामुळे गुन्हेगारांचे चांगलेच फावे. एका प्रांतांतून हुसकून लावलें तर त्यांना दुसरीकडे आसरा मिळे. पुष्कळ छोटेखानी राजे, इनामदार, पाटील वगैरे दरोडखोरांना पाठीशी घालुन गबर होत. कामदार लोकही गोरगरीबांवर आळ घालून पैसे उपटीत, व लांच खाऊन खऱ्या गुन्हेगारांना सोडून देत. श्रीसमर्थाचा अनुभव असा आहे: कोणी एके ग्रामी अथवा देशीं । राहणे आहे आपणाशी । न भेटतां तेथल्या प्रभुशी । साख्य कैंचें ॥ त्यास न भेटतां त्याचे नगरीं । राहतां धरतील बेगारी । तेथें न करतां चोरी । अंगी लागे ॥ -दासबोध.
दीवाणी कामांत पाटील, मामलेदार, सरसुभेदार व शेवटी पेशवे अशा पायऱ्या होत्या; खेरीज शहरोशहरी न्यायाधीश नावाचे अधिकारी नेमले होते. पाटलाकडे फिर्याद नेली म्हणजे तो प्रतिवादीला बोलावी,
-१ धुळ्याचे रा०रा० भट यांच्या मते समारे तेराशे वर्षांपासून दिवाणी, फौजदारी व्यवहारांचा निर्णय करणाऱ्या महाराष्ट्रीय संस्था गोत, देशक, न्यायाधीश. व राजा या होत्या. गोत म्हणजे गांवांतील निरनिराळ्या जातीच्या व धंद्यांच्या लोकांची सभा. ती सर्व जातींच्या लोकांच्या गांवकी स्वरूपाच्या वादाचा निवाडा करी, व पाटील वगैरे अधिकाऱ्यामार्फतच तिच्याकडे फियाद आली पाहीजे असा निबंध नसे. तिच्या निवाड्यास थळपत्र, गोतपत्र, किंवा गोत-महजर म्हणत. गोताने दिलेल्या निवाड्याचा पुन्हां निर्णय करण्याचा व प्रांतिक स्वरूपाच्या व्यवहाराचा निर्णय करण्याचा अधिकार देशकास असे, आणि त्याच्या निवाड्यास देशकाचा किंवा परगण्याचा महजर म्हणत. गोत व देशक ह्यांच्या वरिष्ठ न्यायाधीश व राजा हे होते.
आणि त्याने दावा कबूल केला तर दोन्ही घरी दिवा लागेल असा निकाल देई. पाटील-कुळकर्यांना सळ घालता आला नाही, तर वादीप्रतिवादींकडून पंचांकडे कज्या सोपविल्याबद्दल राजीनामा,व पंचनिवाड्याप्रमाणे चालू असा प्रतिज्ञालेख ( कबूली) लिहून घेऊन पंचनिवाडा अमलांत आणण्याबद्दल पाटील जामीन घेई; आणि पंचायतीकडे दावा सोंपवी. पंच बहुधा पक्षकारांच्या दर्जाचे आणि वाद उमजण्यासारखे-जसें जमाखर्ची कामांत पेढीवाले, स्थावर वतनाचे कामांत देशमुख, देशपांड्ये-असे असत. जात-पंचायतींत ज्या त्या जातीचे लोक असत. पंचांत नांव येणे हे मोठे भूषण समजत. पंचांना पक्षकारांकडूनही काही 'हारकी' ( हर्षाने दिलेले बक्षीस ) प्राप्त होत असे. पक्षकारांचे कतबे, जाबजाबाब, व लेखी तोंडी पुरावा घेऊन पंच सारांश लिहून काढीत; त्यांत पुराव्याचा गोषवारा आणि शेवटी निर्वाह ( निवाडा ) असे. पंचायत ज्या गांवांत भरे तेथील कुळकर्णी तिचे लेखी काम करी. जो दावा जिंकी तो सरकारांत हारकी किंवा शेरणी व जो हरी तो गुन्हेगारी देत असे. पंच कोणाचेही बांधलेले चाकर नसल्यामुळे ते वक्तशीर जमत नसत व पंचायतीचे काम रेंगाळत चाले. निर्लोभी पंच व निःपक्षपाती साक्षीदार विरळा. मूठदाबीचा प्रकार जारी असल्यामुळे पुष्कळसे दावे पायरीपायरीने थेट दरबारपर्यंत जात. ज्याच्या तर्फे निवाडा होई तो अमलात आणण्यासाठी तो प्रतिपक्षाकडे गोडीने मागणे करी; त्याने दाद दिली नाही तर तगादा लावी, तगाददाराकडून त्याचे खाणेपिणे बंद करी, त्याच्या डोक्यावर धोंडा देई व त्याला घरांत कोंडून ठेवी; इतक्याने वळले नाही तर त्याच्या घरी बहुधा ब्राह्मणाला धरणे बसवी. मागमागून थकला म्हणजे ब्राह्मण शिव्याशाप देई, आपली शेंडी खुटीला बांधी, डोक्यावर धोंडा घेई, किंवा अन्नपाणी वर्ज करी. ब्राह्मणाला याप्रमाणे यातना भोगण्याला लावून आपण मोठे पाप करतों असें वाटून ऋणको देण्याचा फडशा करून टाकीत. निवाड्याचा अंमल खासगी तगाद्याने झाला नाही तर पाटील मामलेदाराकडे दाद मागत.
शेवटच्या रावबाजीने मामलती मक्त्याने देण्याची सुरुवात करून लिलावांत जो जास्त बोलेल त्याला मामलेदार करण्याचा तडाखा लाविला; तेव्हां मामलती खानदानीच्या व कर्तबगारीच्या लोकांकडून निघाल्या, आणि मामलत कमावणे हे भूषण व ती गमावणे म्हणजे नामुष्की ही लौकिक भावना नष्ट झाली. एखाद्याजवळ एकाएकी फार पैसा म्हणजे 'कोठे मामलत गाजविली' असें त्याला विचारण्याचा प्रघात पडला. मक्तेदार मामलेदार कूस ठेवून मामलतीचे पोट-मक्ते देत, व अखेरचा मक्ता पाटील उचली. ह्यामुळे कोणी कोणाचा गुरु ना चेला अशी दुर्दशा झाली. पूर्वी जशी पाटलाची कागाळी मामलेदाराकडे व मामलदाराची दरबाराकडे करतां येई, तसें कांही उरलें नाही. उलट एकमेकांच्या एकमेकांना यथेच्छ चरावयाला मोकळे रान झाले. पाटलाने मक्ता घेतला तर रयतेची काही तरी धडगत लागे. कारण त्याला गांवची माहिती असे. पण जर का तो त्याने पत्करला नाहीं तर रयतेचे बुरे हाल होत. मग वसुलाचे काम मामलेदार करीत. ते खात्याप्रमाणे किंवा लावणीप्रमाणे वसूल न करतां जशी ज्याजवळ माया तशी त्यावर मन मानेल त्या प्रकारची पट्टी आकारीत, आणि ती न दिल्यास मक्ता संपण्यापूर्वी जमिनी खालसा करून त्या विकून आपली तुंबडी भरून काढीत. पीक पदरांत पडण्याच्या आंतच ते किस्त ( हप्ता) नेमीत, त्यामुळे पुष्कळाना सावकाराचा हवाला द्यावा लागे. आणि सावकार जबर व्याज चोपीत. ह्या अमदानींत गांववार दोन इजारपट होत. एक खरा व दुसरा खोटा. खोट्या इजारपटांत आकारणी कमी दाखवीत म्हणून तो पाटील व मामलेदार ह्या दोघांनाही सारखाच उपयोगी पडे. खोटा इजारपट दरबारांत पुढे करून मामलेदार पुढील सालचा मक्ता उतरवी; आणि मामलेदार बदलला म्हणजे नव्या मामलेदाराला तो दाखवून पाटील आपल्या ठोक्याची किंमत उतरवी. पाटील अगर गांवचा इनामदार ह्यांचे जर दरबारांत वजन किंवा संधान असले तर मात्र त्या गांवावर आकार कमी बसे, आणि चढलेल्या आका-
राच्या गांवांतले कुणबी असल्या गांवांत जाऊन लागण करीत. जसा मुलकीत तसा दिवाणी फौजदारीतही मामलेदारांनी धुडगूस घातला. ह्याप्रमाणे-देशमुख, देशपांड्ये, पाटील, कुळकर्णी, व इतर वतनदार, बलुतदार, ह्यांच्या कारस्थानांना व पंचांच्या न्यायाला आळा राहिला नाही. पक्ष धरून पाटील-कुळकर्णी व कारूनारू हे खोटींनाटी कामें पुष्कळ करीत. गांवांत कोणीही कामगार व प्रवाशी आला आणि गांवांत कसलीही पंचाईत झाली की कारूनारू चावडीवर जमतात आणि कान पसरून सर्व काही ऐकतात. असली संधि सर्वांपेक्षा महार जागल्यांना अतिशय येई व येते. त्यामुळे हे लोक मोठे तिखट, चौघास, हजरजबाबी, आंगचुकवे व गुलाम झाले आहेत. पाण्यांत राहून माशांशी वैर करूं नये; आपल्याला ज्या लोकांत जन्म काढावयाचा त्यांच्या डोळ्यांवर येऊ नये ह्या भीतीचा गांवमुकादमांवर जो दाब असे तेवढाच काय तो लोकांना थोडाफार न्याय मिळवून देई. त्या वेळच्या काय आणि आतांच्या काय कुणब्यांच्या फिर्यादी म्हटल्या म्हणजे शेतमालाची व जनावरांची चोरी, जळीत, जनावरें मारणे, बांध, उरळ्या व वांटण्या वगैरे स्थावरच्या भानगडी-ह्या असत. कुणब्यांचे आयुष्य बहुतेक रानांत जात असल्यामुळे त्यांच्या बोलण्याचालण्यांत विशेष ठेपराई नसते, त्यांना सभाधीटपणा नसतो, आणि पुराव्याच्या खुब्याखाब्या व आडाखें माहीत नसतात. हे गुण गांवांत वापरणारे जे वतनदार कारूनारू व गांवकामगार ह्यांच्यामध्ये पुष्कळ उतरले. हक्क भिकण्यासाठी त्यांना काळी पांढरी पायाखाली घालावी लागे. म्हणून त्यांच्या साक्षीवर काय ती कज्याची मदार असे, व त्यांनी कुणब्याला चांगलेच पोखरलें. पेशवाईचा लय व इंग्रजीचा उदय डोळ्याने पाहिलेला गंगथडीचा परशराम शाहीर म्हणतो:
- लोहार, सुतार, कुंभार, परीट, बारा कारू, अडकले ।
- त्यांना आडून कज्जा जिंकून बिन-संधीनें कोण आले ? ॥
::............................................... - नवशिक्याला काय पुसावे हजारो टाले टोले ? ॥
देशमुखी अमल व बाबती:-शिरपाव (जमाबंदीचे कतबे होतील तेव्हां ). हक्क रुसूम (दरसाल दरोबस्त येत आहे त्यापैकी निमे). बरो ( दरोबस्त पैकी निमे ). भेट. कारकुनी. फुरमासीची कलमें १२-बकरें, गांव निसबत दरसाल. तूप. राबता महार, महारांकडील दरसाल. जोडा चर्मी, चांभारांकडील. आघोड (जनावराचें सबंध कातडें . माल डबा, लोहारांकडील. झूल भुरकी, धनगरांकडील व साळयांकडील. शेव साबणी हरजिनसी. सायरपैकी जमेदारी. संक्रांतीचे तीळ-गूळ, ऊंस वगैरे. मोळी, महारांकडील दर सणास. मांगांकडील आघाडी पिछाडी.
देशपांडे अमल व बाबती:-देशपांडपण परगणे मजकूर देहे २९. इनाम जमीन मौजे +++ येथें चाहूर २. दरोबस्त पैकी २ हिस्से देशमुख, तिसरा हिस्सा आमचा. नगदीबाब रु. ७४७१२:- ५७६।।. हक्क दर चाहुरी , १ रुपाया प्रमाणे देहे २९ चाहूर ६५०।। पैकी वजा कसबे मजकूर ७४ बाकी चाहर ५७६।। ५६ दसरा, तूप देहे २८ दर गांवास २ प्रमाणे कसबा खेरीज. १०० शिरपाव जमाबंदीसमयी सरकार पोत्यांपैकी. १५ जकातीवर हक्क ऐन १०, डबी ५. वरोचें अनाज दर चाहुरी कैली ८८२ प्रमाणे सोळोले कैली लावणीचे आकाराप्रमाणे, चांभारांकडील चर्मी जोडे दर गांवास दरसाल २ प्रमाणे, व हयात तोबरा आणीन सालांत दर गांवास एकादे लागल्यास पाळीप्रमाणे. संक्रांतीस हुर्डा पेंढी दर गांवास १ प्रमाणे. पंडेवलाचे कवाड कणसाळे दर गांवास १ प्रमाणे. महारांकडून सरपण दर गांवास दर सणास मोळ्या २ प्रमाणे. दर सालास सण ५. लग्न मुंज वगैरे शुभकार्य जाहल्यास आहेर फरमास गांव पाहून घेण्याचे आहे, माहिज नाही. दुखोट्याचे समयीं दुखोटा घेण्याचे आहे, माहिज नाही. मळे ज्या गांवीं भारी असतील तेथें मळ्याचे पीक पाहून जोड व मिर्च्या दोन मण घेण्याचे आहे. राबता महार दर गांवास अनुक्रमें. काही पोटास आडशेरी देऊन काम घेण्याचे आहे. यात्रा व लग्न मुंज झाल्यास बैल घोडी व बिगारी माणसे गांव पाहून एक दोन आणवण्याचे आहे. गांवगन्ना हरएक कामास खासा अगर कारकून अथवा माणस गेलें त्यास भोजनखर्च दाणा वैरण गांवखर्ची गांवकरी यांनी देण्याचे आहे. कडबा थोटणा गांव पाहून दर गांवास कोठं शंभर, कोठं दोनशें गांवापासून घेऊन गांवकरी यांनीं देण्याचे आहे. कसबे मजकूरचे पेठेत आंब्यांचीं ओझीं येतील त्यांस दर ओझ्यास आंबे सुमारें ५ घेण्याचें आहे. पेठा कसचे मजकुरीं होतील त्यांस दर पेठेस, कोट्यांकडील पासोडा १ प्रमाणें कुल मागांस. सनगराचे कुल मागांस कांबळा १ प्रमाणें. कसबे मजकुरीं तांबोळी याचे दर दुकानास दररोज पान सुमारे १० प्रमाणें. लग्न, पाट, मागणी, जागरण वगैरे कार्य कोणाचे घरीं होईल त्यानें विडा आणून देऊन परवानगी न्यावी. सरकारचा विडा तसरीफ देशमुखाचे मार्गे. शिराळशेटीस खोबरें कसब्याचें गांवखर्ची वजन ४ - मळे ज्या गांवीं भारी असतील तेथें मका लाविल्यास दर फडास कणसें पन्नास पंचवीस फड पाहून. उंसाचे थळास रसाची घागर १ व उंसांची १ मोळी. वतनदारीचा वाद विल्हस लागल्यास कागदपत्र जाहल्यास शेला पागोटे काम पाहून. सरकारी कामाकरितां गांव सोडून कोठं जाणे येणे झाल्यास खर्च होईल त्याची बरगत तालुक्यावर. कापड, भूस, किंराणा, जनावरें वगैरे खरीदी अगर विक्री अथवा परगांवाहून शेत खोतीहून आणल्यास परगांवास नेल्यास जकातदारानें हाशील घेऊ नये. बलुत्ये, सुतार, लोहार वगेरे ज्याचें काम लागेल त्यानें करावे, मजुरी मागू नये.
पाटीलकी हक व बाबती-मानपान व उत्पन्न. दरोबस्त सरकारचे मान २-नांगर ; भेट दिव्यांत ठेवणें. आधींचे मान सरकाराचे ३-शिरपाव: विडा; दसऱ्याचें वाजविणें. बरोबरीचे मान ४-होळीस पोळी, पोळ्याचे बैल शिराळशेट, गौर. कित्ता मान १५ व उत्पन्नापैकी निमे सरकार व निमे पाटील याप्रमाणे बीतपशील-फळाचा वांटा; दसऱ्याचें बकरें, तेलाचे घाण्यास तेल दररोज नऊ टांक; पट्टी पासोडीचे रुपये ५ पांच, शेलपाटी दर निवड्यास गल्ला कैली तीन पायली; दर गुऱ्हाळास गुळाची ढेप एक, रसाची घागर एक, ऊंस दररोज अडीच-प्रमाणें आठ रोज वीस; साळ्याचे दर मागास पासोडी एक, धनगराचे दर मागास चवाळे एक, राबता दर एक महार महिने सहा; तांबोळ्यांकडील पानें दररोज तेरा दर दुकानास; मुहूर्ताचा शेला; शेव साबणी, कोळ्यांचें पाणी दररोज घागरी चार; चांभारांकडील जोड दोन; महारांकडील कातडीं. मागाहूनचे मान ४-नांव; टिळा; दिवाळीचें वाजविणें, तोरण व गेरू एकूण २८. घर ठिकाण सरकार निमे पाटीलकीची जागा.
कुळकर्णी हक्क व बाबती (अ)- दर चाहुरी रुपया एक. ८१ दाणे दर चाहरी बारुळे मापें मण एक. ८८५ सळई दर खंडीस दर जिनसी वजनी खंडीस पांचशेर. .||. गांवांत खोती विकली तर खोत पट्टी रुपया एक पैकी निमे पाटील जाऊन कलम. सरकारचा शिरपाव पाटलामागें. पाटलाचें सुदामत हक्क जाऊन व ज्योतिषपणाची षोडशकर्मे क्षत्रियाचे सर्व कर्म जाऊन उत्पन्न होईल ते पाटलांनी दोन हिस्से घ्यावे. एक हिस्सा कुळकर्णी याने घ्यावा. .||. धनगरांचे मागास चवाळें एक पैकी निमे पाटील व बाकी निमे कुळकर्णी. गावांत बागाईत झाले तर शिरस्तेप्रमाणे हक्क घ्यावे कलम एक. लोहारांपासून पोहरा एक दरसाल. तेली यापासून तेल दर घाण्यास सालास अर्ध्या रुपयाचें घ्यावे कलम एक. चांभारांपासून जोडा पायपोसाचा एक. किरकोळ हक्क मानपान पाटलाबरोबर घ्यावा कलम एक. महारांपासून सणाचे दिवशीं भारा सरपण. तेरा सुदामत हक्क.
कुळकर्ण कसबे xx (आ)-नगदी बाब मुशाहिरा दर चाहुरी १ प्रमाणे रुपये ७४. घुगरी रयतावा जमिनीस अनाज दर चाहुरी कैली ८२ सागवली जमिनीस. मळ्यास पाव चाहुरास-जोड कैली ८२, मकाची कणसें २५०. भाजी सणावरास असेल ती. पेठा वसतील त्यांस. कोष्ट्यांकडील दरोबस्त मागांस दर पेठेस पासोडी १ प्रमाणे, सनगरांचे दरोबस्त मागांस दर पेठेस कांबळा १ प्रमाणे, आंबे विक्रीस येतील त्यास दर ओझ्यास आहे सुमारे ५ प्रमाणे, तांबोळी याचे दुकानास दररोज पाने विड्यांची पांच प्रमाणे वाण्याचे दर दुकानास गुळ वजन ८१. शिमग्याचे सणास, तेल्याचे दर घाण्यास दरसाल तेल वजन ८. दररोजची माळव्याची शेव, बाजारचे दिवशींची शेव वगैरे उकाळा माल पाहून, पेठ बसल्यावर वीस वर्षे हक्क नाहीं. पुढ़ें सरकार मुकरार करून देईल त्याप्रमाणे, मुशाहिरा नगदी बाब घेण्याचे. कागद शाई लागेल ती गांवखर्ची घ्यावी. माहिजा नाही. फारकत वगैरे बहुत दाखल्यास राहण्यासारखा कागद करून दिल्यास व घर जागा गांवांतील अगर पेठेतील नवीन खरीदी वगरे कोणा कुळास दिल्यास पोटगी कुल काम पाहून घेण्याची आहे.