निर्माणपर्व/'मनु' शासन पर्वाकडे

‘मनु'शासन पर्वाकडे





 कुठल्याही हिंदुत्ववादी व्यक्तीने करावे असे विनोबांचे पंचवीस डिसेंबरचे पवनार येथील मौनसमाप्तीचे भाषण होते.

 या भाषणात राष्ट्रीय ऐक्यावर भर देण्यात आला होता.
 शिस्तीचे महत्त्व गायले गेले होते.
 बळकट केंद्रसतेचा पुरस्कार होता.
 वास्तविक हे सगळे हिंदुत्ववाद्यांचे आग्रह.
 पण काळाने कसा सूड उगवला पहा.

 हिंदुत्ववाद्यांना गांधीजींची नव्याने आठवण झाली आणि गांधीजींच्या मार्गाने आज ते जाऊ पहात आहेत.

 विनोबांसारख्या थोर गांधीनिष्ठाचा प्रवास मात्र उलटा सुरू आहे. इंदिरा गांधींच्या कट्टर राष्ट्रवादी धोरणांना त्यांनी आपला आशीर्वाद दिलेला आहे. ' अनुशासन पर्व ' असे नामकरण करून या धोरणांना एक सांस्कृतिक प्रतिष्ठाही त्यांनी प्राप्त करून दिलेली आहे.

 एकचालकानुवर्तित्व ...
 अनुशासनबद्ध समाज...
 आसेतुहिमाचल एकरसपरिपूर्ण भारत ...

 अजून हे श्री. गोळवलकरगुरुजी यांचे प्रत्येक बौद्धिकात, प्रत्येक व्याख्यानात, प्रत्येक बैठकीत हमखास उमटणारे शब्द अनेकांना आठवत असतील. आठवत नसतील त्यांचेसाठी, छापून प्रसिद्ध झालेली त्यांची भाषणांची-मुलाखतींची पुस्तके उपलब्ध आहेत.

 बलाढ्य भारत, युनोच्या आमसभेत वेळ पडली तर क्रुश्चेव्हसारखा जोडा काढण्याची ताकद असणारा भारत, पाकिस्तान तोडणारा भारत, अणुबाँब बाळगणारा भारत, अत्याधुनिक, शक्तिसंपन्न, विज्ञाननिष्ठ भारत'. ही सगळी सावरकरांची स्वप्ने आज कोण वास्तवात उतरवत आहे ?
  गांधीजींचा, काही प्रमाणात नेहरूंचाही वारसा मात्र विरोधकांकडे आला आहे.
 सत्याग्रह जोरात सुरू आहेत. तुरुंग अपुरे पडत आहेत.
 इकडे विनोबा मात्र सत्याग्रह अयोग्य म्हणून मोकळे होत आहेत.


 विकेंद्रित समाज, शांती व सहिष्णुता बाळगणारा समाज, अहिंसक समाज, बळाचे प्रदर्शन न करणारा समाज, शहरांकडे, आधुनिक यंत्रतंत्रांकडे पाठ फिरवून स्वयंपूर्ण व स्वयंप्रेरित खेडेगावात राहणारा समाज, शस्त्रशक्तीऐवजी जनशक्तीची पूजा करणारा समाज, प्रेमाची वाढ करणारा, प्रेम देणारा आणि घेणारा, परस्परांशी विश्वासाने सहकार्याने वागणारा समाज... ही सगळी विनोबांची स्वप्नसृष्टी. ही विनोबाप्रणीत सर्वोदयाची जीवनदृष्टी. या जीवनदृष्टीचा मागमूसही जिथे दिसत नाही त्या सत्तावादाच्या उघड्याबोडक्या आणि रणरणत्या माळरानावर विनोबा आज का उभे आहेत ?

 पवनारला परवा कोण सगळे अवतीभोवती होते ? पंचवीस-पंचवीस वर्ष ज्यांनी विनोबांबरोबर भूदानासाठी हाडाची काडे केली, उपासतापास काढले, चिखल तुडवले, काटेकुटे आनंदाने सहन केले, त्यापैकी कितीजण या संमेलनात व्यासपीठावर, विनोबांशेजारी होते ? सगळी गर्दी मंत्रीमहोदयांची–प्रांतोप्रांतीहून आलेल्या. विनोबांनी सहस्त्रमुखांनी सहस्त्रवेळा तरी गौरवलेला तो लोकसेवक, तो सर्वसामान्य भूदानकार्यकर्ता मात्र कुठे तरी अंग चोरून, थंडीत काकडत, खाली मान घालून, दबलेल्या स्थितीत उभा असावा.

भूदानाची, एका स्वयंप्रेरित लोकचळवळीची ही रजतजयंती होती.
पण स्वयंप्रेरणेचा अस्त घडवणा-या राजकारणाला ही जयंती उजळा देऊन गेली.


 आपल्याकडे शेवटी सगळे वाद, तत्त्वज्ञाने व्यक्तिनिष्ठ होतात, त्यांचा स्वरूपे, त्यातील आशय, त्यातील प्रमुख व्यक्तींच्या स्वभावाप्रमाणे बदलतात हेच खरे.
 गांधीजींच्या सर्वोदयात संघर्षाला स्थान होते. स्वराज्य आल्यावर मला पुंजीपती, बडे जमीनदार यांच्याविरुद्ध झगडावे लागेल, असे गांधीजींनी म्हटले होते.
विनोबांनी पुंजीपतींना, बड्या जमीनदारांना न दुखावता त्यांची संपत्ती,

त्यांच्या जमिनी दानमार्गाने त्यांच्याकडून काढून घेण्याचा मार्ग स्वीकारला. काही यश मिळाले. लक्षावधी एकर जमिनीचे दान झाले.
 पण यातली अनेक दाने बनावट होती हेही हळूहळू उघडकीस आले.

 अशा बनावट दानांविरुद्ध चळवळ केली पाहिजे अशा मताचे खूप जण सर्वोदयात होते.

 विशेषत: जयप्रकाश व त्यांचे बिहारमधील कार्यकर्ते या मताचे होते. संपूर्ण बिहारदानाचे संकल्प सुटले, विनोबा बिहारमध्ये यासाठी ठाण मांडून बसले. तेव्हा जयप्रकाशांनी या बनावट दानांविरुद्धही चळवळ व्हावी असा आग्रह धरला होता; पण त्याही वेळी विनोबांनी जयप्रकाशांना अशी चळवळ करू दिली नव्हती. नेहरू अडचणीत येऊ नयेत ही विनोबांची तेव्हाची भूमिका होती. आजही विनोबांची तीच भूमिका कायम आहे. इंदिरा गांधी अडचणीत येऊ नयेत असे त्यांना वाटते. म्हणून त्यांनी जयप्रकाशांच्या संपूर्ण क्रांतीला, गुजरातमधील नवनिर्माण आंदोलनाला विरोध केला. जरी ही आंदोलने गांधीप्रणीत होती, हिंसाचाराला त्यात फारसे प्रोत्साहन दिले जात नव्हते तरी. पण या वेळी जयप्रकाश बदलले होते. त्यांचा स्वभाव जागा झालेला होता. संघर्ष हा त्यांच्या प्रकृतीतला एक घटक होता. तो कार्यवाहीत आला व विनोबांपासून ते दूर झाले. कोण कमी की जास्त गांधीवादी, कोण प्रामाणिक की ढोंगी, कोणता सर्वोदय खरा, कोणता खोटा हा प्रश्न नसून, प्रकृतिधर्म निर्णायक ठरतो, तत्त्वज्ञान शेवटी प्रकृतीला शरण जाते, जसा ज्याचा पिंड अशी त्याची कृती घडते व तत्त्वज्ञान प्रकृतीनुसार निरनिराळी रूपे, आकार धारण करते हे सत्य ओळखायचे की नाही, हा खरा प्रश्न आहे. विनोबांनी आणीबाणीला पाठिंबा दिला तेव्हा त्यांच्या अनेक चाहत्यांचा म्हणे भ्रमनिरास झाला. त्यांनी विनोबांना नाना तऱ्हेची दूषणे दिली. पण जी गाय आहे तिला घोडा समजण्याची चूक या चाहत्यांनी का करावी ? क्वचित एखादा गांधीजींंसारखा अपवाद आढळतो. ज्याच्यात गायीचे कारुण्य आणि अश्वाची गतिमानता यांचा एकत्रित संगम झालेला असतो. विनोबा इदं क्षात्रम्, इदं ब्रम्ह अशा वृत्तीचे कधीही नव्हते. त्यामुळे पंचवीस डिसेंबरला १९७५ पवनारला काही नाट्यपूर्ण घडेल असा संभवही नव्हता. दोष विनोबांचा नाही. त्यांच्याकडून खोट्या अपेक्षा बाळगणाऱ्यांचा आहे. शब्दांनी आपण भुलुन जाता कामा नये. शब्दांंमागील माणूस, त्याची प्रकृती, याही गोष्टी आपण पाहायला शिकले पाहिजे.प्रकृती सर्वांचे नियंत्रण करीत असते. व्यक्तीव्यक्तीची, तशीच समाजाचीही प्रकृती विचारात घ्यावी लागते. केवळ परिस्थितीचा विचार अपूर्ण आहे.

 परिस्थितीचा विचार अपूर्ण आणि एकांगी असला, तरी तोही नेहमी करावा लागतोच आणि असा विचार करायचे म्हटले तर आज काय घडताना दिसते आहे ?

 प्रादेशिकदृष्ट्या सत्ता गावातून शहरांकडे केव्हाच सरकलेली आहे. आता दहा-पाच शहरांऐवजी हळूहळू ती दिल्ली या एकाच राजधानीत केंद्रित होण्याची प्रक्रिया जवळजवळ पूर्ण होत आलेली आहे.

 विनोबांच्या ग्रामस्वराज्यातले 'ग्राम' पूर्वीच गेले होते. आता 'स्व'चाही लोप होत आहे. फक्त 'राज्य' राहाणार आहे आणि तेही एका व्यक्तीचे कदाचित ते महाराज्यही होईल; पण खासच या महाराज्याचा तोंडावळा विनोबांना पाहवणार नाही. तो सावरकरनिष्ठांना, कट्टर राष्ट्रवाद्यांना काही प्रमाणात आवडणारा असेलही; पण यात विनोबांना, त्यांच्या सर्वोदयाला कुठेही स्थान उरणार नाही, इकडे दुर्लक्ष करून कसे चालेल ?

 वर्गदृष्ट्या किंवा वर्णदृष्ट्या पाहिले तर विनोबा ज्या दिशेने आयुष्यभर चालले त्याविरुद्ध दिशेने वाटचाल सुरू आहे. सत्ता नोकरशहांच्या, उद्योगपतींच्या हाती केंद्रित होत आहे. त्यांनी जनतेला लुबाडले नाही तरी जुन्या राजांप्रमाणे तिचा फक्त प्रतिपाळ करायचा. जनशक्तीला स्वतंत्र स्थान नाही. म्हणजे पुन्हा राजसूय यज्ञच. विनोबा म्हणाले होते, प्रजासूय यज्ञ हवा आहे ! भंग्यांच्या, मजुरांच्या, शेतकऱ्यांच्या हातात सत्ता यायला हवी आहे. कुठे आहेत पवनारला ते भंगी, ते शेतकरी, ते मजूर ?, तेथे जमले सगळे सरकारवाले. मंत्री नाही तर त्यांचे सचीवगण. अनुशासन याचा भले विनोबांना अभिप्रेत असणारा अर्थ स्वयंशिस्त असो. प्रत्यक्षात तिथे दर्शन घडले ते 'मनु'शासनाचे. मूठभरांच्या हातात सत्ता केंद्रित होणे, हे मूठभर वरिष्ठ वर्गाचे आणि वर्णाचे असणे म्हणजे 'मनु'शासन. अनुशासन हवे तर बळजबरी, धाकदपटशा, भीतीचे-संशयाचे वातावरण कमीत कमी हवे; पण याउलट स्थिती, अगदी निरुपद्रवी असणाऱ्या साहित्य-संमेलनादी प्रसंगीसुद्धा जाणवू लागलेली, विनोबांदिकांना अस्वस्थ करीत नाही का ? त्यांच्या स्वप्नांचा चुराडा होत आहे आणि ती स्वप्ने अजूनही जपू पाहणाऱ्या माणसांना, अनुयायांना, कार्यकर्त्यांना ते जवळही येऊ देत नाहीयेत. अशा विचारांचे कार्यकर्ते जवळ गेले तर ते लगेच सूक्ष्मात जातात आणि दिल्लीवाले जमले की ते पुन्हा स्थूलात उतरायला राजी होतात, हा चमत्कार कसा समजावून घ्यायचा ? परिस्थितीअंगाने केलेला हा विचार पुन्हा म्हणून मूळ प्रकृती धर्माकडे येतो. विनोबांची प्रकृती फक्त दार्शनिकाची, प्रेषिताची, ऋषीची. त्यांनी युगधर्म सांगितला; पण या धर्माची वाट त्यांनी दाखविली नाही किंवा दाखविलेली वाट भलत्याच मुक्कामाला घेऊन जाणारी ठरली.


त्यांना प्रणाम करून दुसरी वाट जयप्रकाश शोधू पाहत आहेत. त्यांचा हा प्रयत्न विनोबांनी निदान निकालात तरी काढू नये. त्यांच्या स्थानाचा जेवढा जयप्रकाशांना व त्यांच्या चळवळीला उपयोग करून देता येणे त्यांना शक्य आहे तेवढा तरी त्यांनी करून द्यावा. ‘सुसंवादा'चे नवे पर्व सुरू करून द्यावे. पुढचे पुढे पाहता येईल.

जानेवारी १९७६