तुकडे







 आज दसरा. बरोबर पन्नास वर्षांपूर्वी या शुभदिनी रा. स्व. संघाची स्थापना नागपूरला झाली. दसरा आणि संघ यांचे नाते अतूट आहे. हा संबंध अविभाज्य आहे. दसरा उजाडला की संघाची आठवण कुणालाही होत राहणार...अजून काही काळ तरी. अगदी योगायोगाने माझा मुक्काम आज एका हॉटेलमध्ये पडला आहे. एंपायर हिंदू. हे दोन शब्द आज मोठ्याने उच्चारायची देखील चोरी आहे. हिंदू असणे, कुणाचाही द्वेष न करता हिंदुत्वाचा अभिमान बाळगणे हा पुन्हा एकदा या देशात गुन्हा ठरू पहात आहे. ‘फॅसिस्ट' कुठचे ?

 खरोखरच फॅसिझम म्हणजे काय हे कुणी धडपणे नीट सांगत नाही. डावे साम्यवादी सद्यःस्थितीलाच सेमी फॅसिझम म्हणतात. उजवे कम्युनिस्ट + काँग्रेस, जयप्रकाश + जनसंघयुतीलाच फॅसिस्टयुती म्हणून झोडपत आहेत.

 फॅसिझमच्या उद्भवाची शक्यता. आपल्याकडे खरोखर आहे का, याचा कुणी शांतपणे विचार करीत नाही. दुखावलेली, पराभूत ठरलेली राष्ट्रभावना हे फॅसिझमच्या उदयाचे एक प्रमुख कारण मानले जाते. आपल्या राष्ट्रभावनेची अशी अवस्था निदान आज तरी नाही. एक नवीन सोनेरी पान आपल्या इतिहासात ७१ साली लिहिले गेलेले आहे. आपला राष्ट्रीय स्वाभिमान सुखावेल अशा किती तरी घटना गेल्या चार-पाच वर्षात घडलेल्या आहेत. अवकाशात सोडलेला उपग्रह ‘आर्यभट्ट' हे अगदी ताजे उदाहरण.

 वंशश्रेष्ठत्वाची तीव्र भावना हे फॅसिझमचे आणखी एक लक्षण. हे लक्षण तर आपल्याकडे शोधूनही सापडत नाही.

 कुणी म्हणतात, भांडवलशाही अर्थ-व्यवस्था संकटात सापडली की, ती फॅसिझमचा आश्रय करते. मग फॅसिझम प्रथम अमेरिकेत यायला हवा हे ओघानेच आले. कारण भांडवलशाही देशांचे मुख्य केंद्र-राजधानी–सध्या अमेरिका ही आहे. सगळे भांडवलशाही देश या मुख्य केंद्राभोवती, उपग्रहासारखे फिरत आहेत आणि अमेरिका तर सध्या संकटात सापडलेली बिलकुल दिसत नाही.

नवीन नवीन बाजारपेठा तिला गवसत आहेत. चीनशी तिची दोस्ती वाढली आहे. रशियाशी अंतराळयुतीपर्यंत मजल गेलेली आहे. अमेरिका जोवर मजबूत आहे तोवर भांडवलशाहीला मरण नाही. संकटे आली तरी मार्ग निघत राहणार. मग आपल्यालाच घावबरून जायचे, फॅसिझम-फॅसिझम म्हणून पांचजन्य करत बसण्याचे कारण काय ? खरे म्हणजे विरोधकांना झोडपण्यासाठी फॅसिझमच्या शिळ्या कढीला विनाकारण आपल्याकडे ऊत आणला जात आहे. फॅसिझमविरोधी मेळावे भरवत बसण्यापेक्षा, बंद पडत चाललेले कारखाने कसे सुरू होतील, मालाला मागणी कशी वाढेल, इकडे लक्ष देणे अधिक महत्त्वाचे आहे. आपली अर्थव्यवस्था मिश्र आहे. त्यामुळे फॅसिझम समजा आलाच तरी तो मिश्र स्वरूपाचा राहील. लोकशाहीची, समाजवादाची काही लक्षणेही त्यात राहतील.उगाच पन्नास वर्षांपूर्वीचे दुसऱ्या देशातील दाखले उकरून चिखलफेक करत राहण्यात काय हशील आहे ?



 दुर्गाबाई भेटल्या. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर कोल्हापूरला खांडेकरांना मुद्दाम जाऊन भेटून आल्या होत्या. 'मी खरी म्हणजे त्यांच्या साहित्याची टीकाकार; पण माणूस म्हणून भाऊसाहेब फार मोठे. आज कोण उरलं आहे आपणहून ज्याला भेटायला जावं असं ?' - दुर्गाबाई

 “माणसाला निर्भय बनवतं ते साहित्य," असं भाऊसाहेब तुमच्याशी बोलताना सहज म्हणाले, असे XXX सांगत होता. खरं आहे का हे दुर्गाबाई ?" मी.

 "हो. असंच आणखीही भाऊ खूप काही सांगत होते. झ्वाइगची आठवण त्यांनाही आली.' दुर्गाबाई.

 शेजारी एक प्रकाशक बसले होते. तुम्ही सर्व लोक Negative आहात असे तावातावाने ऐकवत होते.

 असत्याला असत्य म्हणणं, वाईटाला वाईट म्हणणं, हे Negative कसे ? आदिवासींचे प्रश्न गेली पाच वर्षे आम्ही 'माणूस' अंकांतून मांडले, त्यासाठी मेळावे भरवले, चळवळी केल्या. चार-पाच वर्षांपूर्वी बेळगाव-कारवारसारख्या प्रश्नांवरून रणे माजायची. आज आदिवासींचे-शेतमजुरांचे प्रश्न पुढे आले. भ्रष्टाचाराविरुद्ध लोकमत कुणी जागे केले ? महागाई भडकली तेव्हा दुकानांची लुटालूट वाढली. त्याऐवजी ग्राहक चळवळीचा पर्याय चांगला म्हणून उचलून धरला. बहिष्काराच्या अत्यंत सौम्य, विधायक पण परिणामकारक उपायाची त्याला जोड दिली. हा Positive approach नाही का ? लोकशाहीमध्ये स्वतंत्र वृत्तपत्रे, जबाबदार विरोधी पक्ष अधिक काय करू शकतात ?
 आता आम्हाला सेन्सॉर ऐकवतं : खेडोपाडी जा. विकासाच्या प्रश्नांना हात घाला. चालना द्या. विधायक-सृजनशील पत्रकारिता हवी म्हणे. जसं काही हे कुणी पूर्वी करीतच नव्हते; पण यांना आता सांगणार कोण ? सगळा सध्या एकतर्फी कारभार सुरू आहे. 'माणूस' च्या ज्या अंकावर बंदी घातली गेली त्याचं अंकात अगदी सुरुवातीलाच कोकणातील आदिवासींच्या विधायक चळवळींसंबंधीचा विस्तृत लेख आहे. पण वाचला–पाहिला गेला तर नं ! आता मात्र असे लेख आवर्जून गोळा करण्याचा, स्वतः लिहिण्याचा, त्यासाठी रानोमाळ भटकण्याचा उत्साह कमी होतो आहे. कुणी बळजबरीने चांगली गोष्ट जरी करायला लावली तरी ती करण्यात मौज नाही. माणसाची प्रतिष्ठा प्रथम सांभाळली गेली पाहिजे. बळजबरीमुळे तिला तडा जातो. मग उरले काय ?

दुर्गाबाईंचे कहाडचे साहित्यसंमेलन कसे काय पार पडते कुणास ठाऊक. बाई काहीशा भाबडट आहेत. फटकळ तर आहेतच. समोर फार मातब्बर मंडळी असणार. आतापासूनच बाईंंविरोधी अग्रलेखांच्या वगैरे तोफा डागायला सुरुवातही झाली आहे. म्हणून बाई ! जरा जपून रहा. तुम्ही ज्या प्रेरणेचे प्रतीक आहात तीची टवाळी होऊ नये, ती एकाकी असली तरी सन्मानित रहावी असे मनापासून वाटते. म्हणून लहान तोंडी हा मोठा घास.


 डॉ. श्रीराम लागू एक नाटक बसवताहेत.

 मूळ फ्रेंच नाटकाचे भाषांतर त्यांनी अलीकडेच एका झपाट्यात पूर्ण केले आहे असे कळले, म्हणून त्यांची मुद्दाम जाऊन गाठ घेतली.

 सुरुवातीला लागूंंनी मला ओळखलंच नाही. नाव सांगितल्यावर ओळख पटली. पूर्वी माणूस कचेरीत भेटल्याला पुष्कळ दिवस उलटून गेले होते. शिवाय लागू त्या दिवशी तरी थोडे व्यग्र होते. प्रयोगाची योजलेली तारीख अचानक उद्भवलेल्या अडचणीमुळे मागेपुढे करावी लागत होती. नाटक वाचायला नेले आणि दुसऱ्या दिवशी जरा स्वस्थतेने पुन्हा भेटलो.

 लागूंनी भाषांतर फार ताकदीने केले आहे. नाटकाचे नाव अँटिगनी. लेखक ज्याँ अनूई. लागूंनी भाषांतरासाठी, प्रयोगासाठी हे नाटक आत्ताच का निवडावे, विशिष्ट परिस्थितीत त्यांना या भाषांतर-प्रयोगाद्वारे काही सुचवायचे आहे का; असा मला प्रश्न पडला होता. या प्रश्नाच्या अनुषंगाने बोलणे सुरू होते. लागू मध्येच एकदम म्हणाले : All art is socially relevent :

 अडीच हजार वर्षांपूर्वीचे अथेन्स, दुसऱ्या महायुद्ध काळातील नाझीव्याप्त फ्रान्स, लागूंना जाणवणारी आजची स्थिती...काळात किती तफावत आहे ? 

सांस्कृतिक प्रवाहही किती वेगळे आहेत ? तरीही तारा जुळतात. संदर्भ लागतात. आशय भिडतो. श्रेष्ठ कलाकृतीचे हे एक लक्षण आहे. तिचे सतत पुनरुज्जीवन होत राहते. नवे नवे आशय तिच्यात सहज सामावले जातात. स्थळकाळाची, वास्तवाची बंधन गळून पडतात.

 आँटिगनीचे समर्पण फॅसिझमविरोधात उभ्या ठाकलेल्या फ्रान्सच्या लढाऊ जनतेला दुसऱ्या महायुद्धकाळात प्रेरणा देऊन गेले, पण त्यातील क्रिऑन हा सत्ताधारीही नाटककाराने केवळ दुष्टमूर्ती दुःशासन म्हणून रंगवलेला नाही. त्याचीही एक तर्कसंगत अशी बाजू आहे...जी आपल्याकडे आज अनेकजण घेत आहेत. दोन विरुद्ध पण प्रामाणिक भूमिकांचा संघर्ष! केवळ सुष्टांचा आणि दुष्टांचा ढोबळ संघर्ष नाही. दोन्हीकडे सुष्टदुष्ट प्रवृतींची सरमिसळ आहे. त्यामुळे गुंतागुंत वाढत आहे; पण संघर्ष तर अटळ आहे. क्लेशदायक असला तरी..
 लागू असेच संघर्ष नेहमी भूमिकांसाठी निवडतात असे दिसते ! (सामना!)

मला मात्र नाटक फार Pregnent आहे असे वाटले. ग्रीक राजघराण्यातील संघर्ष येथे एका सनातन कुरुक्षेत्रीय पातळीवर पोचलेला आहे.


 आदिवासी भागात काम करणारे काही तरुण आज भेटले. थोडी बातचीत झाली. .शेतमजुरांसाठी किमान वेतन कायदा आला. अंमलबजावणी नाही. मंत्री आले. त्यांच्यासमोर गाऱ्हाणे मांडले. जमीनदारांनी कायद्याप्रमाणे वेतन देण्याचे मान्य केले. मंत्र्यांची पाठ फिरल्यावर पुन्हा जैसे थे. तरी बरं, मंत्री आदिवासींंपैकीच आहेत .

 पूर्वी मोर्चे वगैरे काढून परिस्थिती बदलवून घेता येत होती. आता व्यक्तिगत तक्रारी नोंदवा म्हणतात. हे कसं शक्य आहे ? आणि शक्य असलं तरी त्यातून कितीसं काम साध्य होणार ?

 कर्जनिवारण कायद्याचा हाच अनुभव. सुरुवातीला सावकारांच्या घरात भांडीकुंडी परत नेण्यासाठी गर्दी लोटली. पोलीस त्या वेळी गरिबांच्या बाजूने हस्तक्षेप करीत होते; पण आता पोलिसांनी अंग काढून घेतले आहे. त्यामुळे सगळा मामला थंड पडला आहे. सावकार अधिकच सावध बनले आहेत. भांडीकुंडी,इतर वस्तू गहाण ठेवून घेत नाहीत. एकदम खरेदी घेतात. म्हणजे आगीतून निघून फुफाट्यातसुद्धा नाही. पुन्हा आगीतच.

 आदिवासींना, शेतमजुरांना किरकोळ कर्जे सारखी लागतात. भरमसाठ व्याजाने का होईना, सावकार ती त्यांना वेळेवर देत होता. वेळेवर उपयोगी पडणे हा त्याच्या असण्याचा फायदा होता. इतके कायदे, सुधारणा होऊन आदिवासी

अजून सावकारी पाशात अडकलेला का, या प्रश्नाचे हे उत्तर आहे. वेळेवर त्याला सावकारच उपयोगी पडतो. म्हणून आदिवासी त्याला सोडू इच्छित नाही. कर्ज निवारण हुकमाने हा सावकार हटणार नाही...कारण रात्री बारा वाजताही उपयोगी पडणारी दुसरी खात्रीची पर्यायी व्यवस्था अजून आदिवासींच्या-गरीब शेतमजुरांच्या दृष्टिपथात नाही. दृष्टिपथात आल्यावरही तिच्यावर विश्वास बसायला काही काळ, काही वर्षे उलटावी लागणार. तोवर त्यांच्या किरकोळ किरकोळ गरजा कोण भागवणार ?

 आणखी तीन-चार महिन्यांनी तर रोजगारही कमी होईल. त्या वेळी कोणती परिस्थिती उद्भवेल? आता आदिवासी-शेतमजूर पूर्वीसारखे उपाशीपोटी दिवस न दिवस स्वस्थपणे झोपडीत पडून राहणार नाहीत. त्यांना चळवळी कशी करायच्या, शांततापूर्ण मार्गांनी आपल्या रास्त मागण्या,कायदेशीर मागण्या कशा मान्य करून घ्यायच्या याचे शिक्षण मिळालेले आहे. कोणी दिले हे शिक्षण?

 हे शिक्षण देण्याचे काम Positive, विधायक, मूलभूत महत्त्वाचे नाही का?

 ज्यांचे अविष्कार स्वातंत्र्य सध्या हिरावले गेले आहे अशा काही 'मूठभर' सुशिक्षितांनी, काही जबाबदार राजकीय कार्यकर्त्यांनी हे काम आजवर स्वयंप्रेरणेने केले ही वस्तुस्थिती आहे. ही स्वयंप्रेरणा नष्ट करून काय साधणार आहे ?

 स्वयंप्रेरणा ही स्वतंत्र वातावरणात वाढणारी वनस्पती आहे. स्वतंत्र वातावरणाचा कदाचित कुणी दुरुपयोगही करीत असतील; पण त्यासाठी वातावरणच दूषित करून टाकायचे, कोंडी निर्माण करायची, सगळ्यांनाच गुदमरायला लावायचे, हे योग्य नाही. नोकरशाहीच्या हाती आता तुफान सत्ता केंद्रित झालेली आहे. या सत्तेचा गैरवापर होत नसेल का ? धोके सगळीकडे, सगळ्याच व्यवस्थेत असतात; पण स्वातंत्र्य असणारी व्यवस्था त्यातल्या त्यात चांगली..कारण ती बदलता येते, सुधारता येते. स्वातंत्र्य नसेल तर दडपादडपी, खोटेपणा वाढत जातो. खरे काय ते कळेनासे होते. असंतोष दबून राहतो, आतल्या आत धुमसणे-खदखदणे सुरु असते. राज्यकर्ते खोट्या समाधानात मश्गुल राहू लागतात. वातावरण मोकळंं,स्वतंत्र, स्वच्छ असले तर हा असंतोष विधायक मार्गांनी बाहेर पडतो, ताण सैल होतात. यालाच लोकशाही प्रक्रिया म्हणतात. निवडणुका हे सत्ता वाटपाचे केवळ तंत्र आहे. हुकुमशाही व्यवस्थादेखील निवडणुकांचे तंत्र वापरून, आपण लोक वादी असल्याचा दावा करू शकते. या तांत्रिक देखाव्यापेक्षा महत्त्वाचा आहे, लोकशाहीचा आतला प्राण, मोकळं, स्वतंत्र वातावरण,निर्भय वृत्ती, सत्यप्रतिपादनाचे धैर्य, कर्तव्याची जाणीव, स्वयंप्रेरित कृती ही सर्व लोकशाहीची प्राणलक्षणे. ती येथे दिसणार नसतील तर निर्जीव कुडी असली काय अन् नसली काय, सारखेच. अशी वेळ न येवो.

  अशोकचे आज पत्र आले आहे. सोल्झेनित्सिनच्या 'Documentary Record' मध्ये शेवटी शेवटी ३।४ पानांचे एक पत्र आहे. रशियन जनतेला उद्देशून लिहिलेले. देश सोडायच्या आदल्या दिवसाचे. ते पत्र भाषांतर करून 'माणूस' दिवाळी अंकात द्यावे असे अशोकने कळवले आहे.

 मला तर भाषांतराचा मनस्वी कंटाळा; पण दुकानात जाऊन पुस्तक आणले व पत्र पाहिले.

 पत्राचे शीर्षक : Live not by lies.
 सोल्झेनित्सिन लिहितो--

 The simplest and most accessible key to our self neglected liberation is this personal non-participation in lies..
 खोटं लिहू नका, खोटं बोलू नका. खोट्याचा प्रचार करू नका.
 असत्याशी असहकार करा.
 त्याने लिहिले आहे : गांधीजींच्या मार्गापेक्षाही हा मार्ग सौम्य आहे. कमी अवघड आहे; पण सद्य:स्थितीत तोच एक शक्य आहे, उपलब्ध आहे, परिणामकारकही आहे.
 पत्राचा शेवट त्याने असा केलेला आहे--
 If we are too frightened to do anything, then, we are a hopeless, worthless people and the contemptuous lines of Pushkin fit us well :
 What use to heards are gifts of freedom ?
 The scourge, and a yoke with tinkling bells.
 This is their heritage,
 bequeathed to every generation.



 रेडिओचा एक अधिकारी भेटला होता. संघविरोधी भाषणे करण्यासाठी रेडिओने अनेक नामवंत व्यक्तींना विचारून पाहिले. संघाविषयी मुळीच सहानुभूती नसणाऱ्यांनीही सद्यःस्थितीत अशी भाषणे रेडिओवरून करण्यास नकार कळविला.
 काही नामवंत साहित्यिकांनी म्हणे रेडिओ-टि. व्ही. च्या कुठल्याच कार्यक्रमांची आमंत्रणे स्वीकारायची नाहीत असे ठरविले आहे.हेही नसे थोडके.

ऑक्टोबर १९७५ । (आणीबाणी)