एक ऑगस्ट



 बहिष्काराचे तत्त्व पाच वर्षे देशाने इमानेइतबारे पाळले तर युरोपात लढाई उत्पन्न झाल्याशिवाय राहात नाही. आजचे सारे राजकारण व्यापाराच्या खुंटाभोवती घुटमळत आहे. युरोपातील प्रत्येक प्रबळ राष्ट्र जगातील बाजारपेठा काबीज करण्यासाठी रात्रंदिवस धडपडत आहे. हिंदुस्थानची बाजारपेठ इंग्रजांनी सर्वस्वी व्यापून टाकली आहे ही गोष्ट युरोपातील प्रत्येक बलाढ्य राष्ट्राच्या मनात शल्यासारखी बोचत आहे. आपल्यात इंग्रजांशी लढण्याचे सामर्थ्य नाही. तेव्हा इंग्रजांशी लढण्यास जे समर्थ आहेत त्यांना तरी आपण चिथावू या. हिंदुस्थानची बाजारपेठ इंग्रजांच्या मगरमिठीतून सोडवून जर्मनांच्या अगर अमेरिकनांच्या हातात काही काळ आपणास देता आली तर इंग्रज लोक त्यांच्याशी वर्दळीवर आल्यावाचून खात्रीने राहणार नाहीत आणि इंग्रज लोक कोठेतरी बाहेर भांडणात गुंतल्यावाचून आपणास आपले हातपाय पसरण्यास अवकाश मिळावयाचा नाही. हिंदुस्थानच्या बाजारपेठेतून इंग्लंडला हुसकावून जर्मनीला आत घेतल्यास तोही एक दिवस आपली मानगुटी धरल्यावाचून राहणार नाही हे खरे आहे. परंतु बहिष्कारास स्वदेशीची जी जोड देण्यात आली आहे, ती, हे भावी संकट टाळता यावे म्हणूनच देण्यात आली आहे. स्वदेशीच्या सहाय्याने परदेशी व्यापारांच्या दाढेतून जेवढा प्रांत आपणास सोडविता येईल तेवढा सोडविण्यात कसूर करावयाचीच नाही. परंतु आज आपणास स्वदेशी सर्वांगपरिपूर्ण करता येणे शक्य नाही. तेव्हा स्वदेशीच्या कक्षेबाहेर राहणाऱ्या मुलखातून इंग्रजांची हकालपट्टी करणे आपणाला आवश्यक आहे. बहिष्काराने शत्रूच्या शत्रूस चिथविणे व स्वदेशीने आपले घर दुरुस्त करणे असा हा दुहेरी डाव आहे. काट्याने काटा काढल्यानंतर तो काही कोणी आपल्या पायात रुतवून घेत नाही. बहिष्कार हे नैमित्तिक कर्म आहे; स्वदेशी हे नित्यकर्म आहे. शत्रूच्या घरात यादवी माजविणे अगर शत्रूच्या शत्रूस उत्तेजन देणे एवढाच आत्मोद्धाराचा मार्ग दुर्बलांना नेहमी मोकळा असतो. सुंदोपसुंदांची कथा हे या तत्त्वाचे उत्कृष्ट उदाहरण आहे. सुंदोपसुंदाचे मरण फक्त त्यांच्या परस्परांच्या हाती होते. तिसरा कोणीही त्यांस मारण्यास समर्थ नव्हता. तेव्हा त्या उभयतांमध्ये कलह उत्पन्न करणे एवढाच उपाय देवांच्या हाती उरलेला होता. सर्व जग पादाक्रांत करू पाहणाऱ्या युरोपातील बलाढ्य राष्ट्रांची आज सुंदोपसुंदांच्या सारखीच स्थिती आहे. ते आपापसात लढतील तरच मरतील. नाहीतर सर्व जग गिळून टाकतील. तेव्हा त्यांच्या आहारी पडलेल्या किंवा पडण्याच्या बेतात असलेल्या राष्ट्रांनी या दुनियेस लुबाडू पाहणाऱ्या दरोडेखोरांची आपापसात कलागत कशी लागेल ही चिंता वाहिली पाहिजे. स्वदेशी, बहिष्काराच्या शस्त्राचा शहाणपणाने उपयोग केल्यास हिंदुस्थानची बाजारपेठ तिलोत्तमेप्रमाणे हे यादवीचे कार्य हटकून घडवून आणील.

- लो. टिळक



 टिळकांनी स्वदेशी चळवळीचा उठाव केला. आजही या चळवळीची गरज आहे. पण टिळकांच्या काळाप्रमाणे आज स्वदेशी आणि परदेशी वस्तूतला फरक स्पष्टपणे लोकांसमोर मांडता येत नाही ही अडचण आहे.

 अगदी पहिली अडचण परदेशी वस्तूंची आपल्यावर पडलेली मोहिनी ही आहे.

 नक्षलवादी विचाराचा एक तरुण माझ्याकडे नेहमी येतो. त्याच्या मनगटावर एक भारी किंमतीचे घड्याळ मी पाहतो. एकदा मी त्याला सहज विचारले- घड्याळ कुठून घेतले ? किंमत किती ? तीनशे रुपयाच्या आसपास किंमत असलेले घड्याळ त्याला शे-दीडशे रुपयात पडले होते. म्हणजे ते 'स्मगल' केलेले होते. त्यालाही ते पटले.

 चांगली घड्याळे हिंदुस्थानात तयार होत असूनही आपल्याला परदेशी वस्तूंचे असे आकर्षण वाटत असते -अगदी नक्षलवादी युवकांनाही.

 दुसरा गट राष्ट्रवादी युवकांचा. जनसंघाने आपली स्वदेशी योजना जाहीर करून तीन वर्षे उलटली. पण याबाबत, प्रत्यक्ष पावले अजून उचलली गेली नाहीत. परदेशी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची एखादी चळवळ जनसंघ हाती घेईल अशी कल्पना होती. पण अजून तरी काही हालचाल नाही. अगदी परवाच्या हुबळी अधिवेशनातही स्वदेशी योजनेच्या पुनरुच्चारापलिकडे काही घडले नाही.

 पण समजा जनसंघाने किंवा अन्य कुठल्या पक्षाने परदेशी वस्तूंच्या बहिष्काराची चळवळ हाती घ्यायचे ठरवले तरी खरी अडचण पुढेच आहे.

 स्वदेशी आणि परदेशी असा भेदभाव करायचा कसा ?


 आंतरराष्ट्रीय कंपन्यांची जाळी पसरत आहेत. आपल्याकडेही अमेरिकन, जर्मन, जपानी कंपन्या येतात, आपल्याही कंपन्या अन्य देशात जातात. कोलॅबरेशन्स वाढत आहेत. भारत सरकारचे धोरण काहीही असो. अगदी गरज नसलेल्या हॉटेलच्या धंद्यातही ही कोलॅबरेशन्स आता मान्यता पावली आहेत. ओबेरॉय-शेरेटन या हॉटेलच्या उद्घाटनाला आमच्या अर्थमंत्र्यांनी यावे याचा दुसरा अर्थ काय ? एकीकडे ही कोलॅबरेशन्स घातक असतात असे बोलायचे आणि दुसरीकडे त्यांचेवर सरकारी वरदहस्तही ठेवायचा, हा दुटप्पीपणा संतापजनक आहे. तरी तोही आपण खपवून घेत आहोत. परदेशी पाहुण्यांसाठी हे करावे लागते हा फक्त वरवरचा देखावा आहे. वर्षभरातली या हॉटेलांची रजिस्टरे तपासली तर परदेशीयांपेक्षा आपलीच बड़ीबडी मंडळी तेथे, या नाही त्या कारणास्तव जाऊन आलेली, जात असलेली दिसतील. हा अगदी टिळक-गांधींच्या स्वदेशी चळवळीचा खून आहे. पण तोही आपण उघड्या डोळ्यांनी पाहण्याइतके निर्ढावलो आहोत.

 तेव्हा या कोलॅबरेशन्स बहिष्कार टाकणे हाही स्वदेशी चळवळीचा आजचा मार्ग ठरू शकत नाही. कारण सामान्य लोकांच्या आवाक्यात येणारे हे क्षेत्रच नाही. बहुतेक कोलॅबरेशन्स उंची वस्तूंच्या निर्मितीतली आहेत किंवा अगदी औद्योगिक क्षेत्रातील आवश्यक घटकांतील आहेत.

 अपवाद आहेत. उदाहरणार्थ कोका कोला हे पेय. काही टुथपेस्टस् इत्यादी.

 गेल्या आठवड्यात गोखले इन्स्टिटयुटमधील काही अभ्यासकांशी या विषयावर बोलत होतो. यापैकी सौ. कुमुद पोरे यांनी हा मार्ग सुचविला. लोकांनी या वस्तू वापरू नयेत असे त्यांचे म्हणणे. हवा कशाला कोकाकोला ? पूर्ण परदेशी किंवा कोलॅबरेशन्समधील टुथपेस्टस् यादी जाहीर करावी. लोकांनी या वापरू नयेत म्हणून प्रचार करावा.

 मी त्यांना एक अनुभव सांगितला. परवाच्या भारत-पाक युद्धाच्या वेळी अमेरिकेने आपल्याला दगा दिला, पाकिस्तानची बाजू घेतली. बंगालच्या उपसागरात सातवे आरमार आणले. यामुळे तरुण संतप्त झालेले होते. साधना (साप्ताहिक) कार्यालयात एक बैठक झाली. अमेरिकेचा कडक निषेध करणारी भाषणे झाली. एक मोर्चा काढण्याचेही ठरत होते. मी सुचविले-एखादी क्रांतिकारक कृती करा. कमीत कमी एखाद्या अमेरिकन वस्तूवर बहिष्कार पुकारा.

 पुढे तास, अर्धा तास चर्चा होऊनही अशी वस्तू-जी सर्वांना चटकन समजेल, अशी सापडेना. कोका कोलाचे नाव मी सुचविले. पण कुणी ते मनावर घेतले नाही.

 तेव्हा आज स्वदेशी-परदेशी असा स्पष्ट फरक दाखवता येत नाही. तरीही आपण परदेशांच्या आर्थिक वर्चस्वाखाली दबले, दडपले जात आहोत, अशी एक सार्वत्रिक भावना आहे. पंडितांपासून तो अगदी सामान्यजनांपर्यंत.

 नवी स्वदेशी चळवळ यासाठी हवी आहे. पण तिची नेमकी रेघ आखणे फार अवघड होऊन बसले आहे. टिळकांच्या वेळी हे काम फार सोपे होते. सगळीच साखर, सगळेच कापड परदेशातून येत होते. त्यामुळे परदेशी कापडांच्या होळया, साखर न वापरणे हा कार्यक्रम सार्वत्रिक ठरू शकला. आज हे शक्य नाही. किर्लोस्करांचे कमिन्सशी नाते आहे आणि बिर्लाही रशियात जाऊन कारखाने काढत आहेत. यामुळे स्वदेशी चळचवळीची दिशा चुकली तर बुमरँगप्रमाणे हे शस्त्र आपल्यावरच उलटण्याचीही शक्यता आहे.

 एक करता येण्यासारखे आहे. स्वदेशी म्हणजे ग्रामीण असे एक नवे समीकरण मांडून जे कारखाने, उद्योगधंदे शहरात विनाकारण गर्दी करताहेत त्यांना खेड्यात नेण्यासाठी या चळवळीचा उपयोग होऊ शकेल. परदेशी असो,स्वदेशी असो, आपले भांडवल शहरात खेळते आहे. याचे ओघ खेड्यांकडे वाहून नेणे आवश्यक आहे. याबाबत आता राज्यकर्त्यांमध्ये, तज्ज्ञांमध्ये, समाजशास्त्रज्ञांमध्ये दुमत नाही. पण हे घडत नाही. केवळ सरकारी प्रोत्साहन कमी पडते असा अनुभव आहे. लोकांनीच याबाबत आता पुढाकार घेतला तर ? उदाहरणार्थ, मुंबईतल्या कापड गिरण्या, या मुंबईत का असाव्यात याला कसलेही शास्त्रीय कारण नाही. हलवा या कोकणात किंवा विदर्भ-मराठवाड्यात. हलवल्या जाणार नसतील तर लोक या गिरण्यांचे कापड घेणार नाहीत. याबाबत काही अपवाद असतील तर अभ्यास करून ते अगोदरच ठरवले जावेत. पण अपवाद हा नियम नाही. कापडधंदा मुंबईहून हलला तर मुंबई केवढी मोकळी होईल ! आजचे अनेक प्रश्नही सुटू लागतील. ग्रामीण बेकारीवर इलाज सापडेल, खेडी आणि शहरे यांचा ढळलेला समतोल पुन्हा प्रस्थापित होईल, अतिरिक्त केंद्रीकरण थांबेल. अनेक फायदे. कापड गिरण्यांसारखी इतर कारखानदारीही वेचून वेचून शहरातून खेडेगावांकडे हलवली गेली पाहिजे. ही हलवण्यासाठी स्वदेशी-बहिष्कार चळवळीची जोडगोळी उपयुक्त ठरू शकेल. लोकमताचा असा दबाव निर्माण झाला तर शासनालाही काही तरी करणे भाग पडेल, कारखानदार, भांडवलदारही या चळवळीकडे दुर्लक्ष करू शकणार नाहीत. कारण त्यांच्या खिशालाच धक्का बसलेला असेल.
 अर्थात हे सोपे नाही. याला केवळ प्रस्थापित कारखानदारच विरोध करतील असं नाही. मजूर संघटनाही या चळवळीला पाठिंबा देणार नाहीत. एका समाजवादी पुढाऱ्याशी मी यासंबंधी बोललो. त्याने चक्क सांगितले- 'विचार ठीक. पण आम्ही काही करू शकणार नाही. कारण कामगार संघटनांची आमची सगळी बैठकच यामुळे विस्कटणार आहे.' या बैठकीत अनेकांचे अनेक हितसंबंध गुंतलेले. कोण या हितसंबंधावर पाणी सोडायला तयार होणार ? शिवाय कामगारांनाही हे पटणार नाही. कोकणातून आलेला कामगार परत कोकणात जायला तयार नाही. गिरण्या बंद पडल्या तरी बेकार अवस्थेत मुंबईतच तो कसेबसे दिवस काढेल पण मुम्बई सोडणार नाही. हा प्रस्थापित मजूरवर्गाचा विरोधही चळवळीला गृहीत धरावा लागेल. हा विरोध कमी कसा होईल, कामगारसंघटना यात पुढाकार कसा घेतील हे पाहावे लागेल. अशी साथ मिळाली नाही तर चळवळ फार पुढे सरकणार नाही. तिचे अर्थही वेगवेगळे लावले जातील.

 असे काही घडले, घडवले तर टिळकांचा वारसा आपण पुढे नेला असे होईल. विशेषतः ही जबाबदारी विरोधी पक्षांवर आहे. पर्यायी पक्षाचा दावा करणाऱ्यांवर तर विशेषच. कारण यामुळे आपला विरोध विधायक स्वरूपाचा आहे हे ते जनमानसावर ठसवू शकतील. आज सर्व अभिक्रम (Initiative) शासनाकडे, शासनकर्त्या पक्षाकडे; विरोधकांकडे फक्त विरोध नोंदविणे, ओरडणे एवढेच प्रतिक्रियात्मक कार्य उरले आहे. हे चित्र पालटेल, अभिक्रम शासनाकडून खेचून घेता येईल. एक स्वयंभू, स्वयंशासित व आत्मनिष्ठ चळवळ उभी राहील. जिचा जनसामान्यांच्या प्रत्यक्ष आचरणाशी, दैनंदिन जीवनाशी काहीतरी संबंध पोहोचेल. आज यासाठी काही स्वार्थत्याग करावा लागेल, प्रस्थापित हितसंबंधावर पाणी सोडावे लागेल हे खरे. पण एक कालखंड यामुळे उजळून निघेल, देशाची घडी बदलण्याचे श्रेय मिळेल. जनतेचे चैतन्य पुन्हा जागे होईल. हे केवढे मोठे यश आहे!


ऑगस्ट १९७४