बिहार परिवार



 एप्रिलचा शेवटचा आठवडा. कुमार सप्तर्षीच्या परीक्षेचा शेवटचा दिवस. प्रॅक्टिकल आटोपून रात्री ८-८। च्या बेताला ते कॉलेजमधून तडक श्री. ग. माजगावकर यांच्या घरी येतात. अनिल अवचट ठरल्याप्रमाणे आले की नाही याची चौकशी करण्यासाठी अरुण साधू यांच्या दोन-चार चकरा झालेल्या असतात. शेवटी जेवायला चौघेजण बसले तेव्हा घड्याळाचा काटा ९।। च्या पुढे सरकलेला असतो.

 रात्र चढत चालली तसे बोलणे मुख्य विषयाकडे वळलेले आहे-बिहार आणि पुण्यातील विद्यार्थीवर्ग-त्यातल्या त्यात ' यूथ ऑर्गनायझेशन.' (युक्रांदचे अगोदरचे नाव).

 पाचशे दुष्काळग्रस्तांसाठी एक अन्नछत्र कमीत कमी एक महिन्यासाठी, जास्तीत जास्त तीन महिन्यांसाठी चालविण्याची संपूर्ण जबाबदारी उचलावी. निधी गोळा करण्यापासून, बिहारात जाऊन प्रत्यक्ष अन्नछत्र चालविण्यापर्यंत. या कल्पनेवर बराच खल होतो. बिहारसाठी काहीतरी, कुठेतरी वेगवेगळे करण्यापेक्षा अशी लहानशी जबाबदारी पूर्णपणे उचलण्यात विद्यार्थ्यांना कामाचा प्रत्यय येईल, उभारणीचे समाधान लाभेल व तऱ्हेतऱ्हेचे अनुभव येतील, ही, हा कार्यक्रम सुचवण्यामागील श्री. ग. माजगावकर यांची दृष्टी होती.

 आठवडाभर यावर अधिक विचार झाला. 'माणूस' कार्यालयात दुसरी बैठक भरली. वरील चौघांव्यतिरिक्त या बैठकीला ' यूथ ऑर्गनायझेशन'चे आणखी ८।१० कार्यकर्ते होते-शिवाय मावळ सेवा मंडळाचे श्री. चिंचलीकरही ऐनवेळी उपस्थित झाले. ' माणूस प्रतिष्ठान' आणि ' यूथ ऑर्गनायझेशन' यांनी संयुक्तपणे ' बिहार दुष्काळ निवारण प्रकल्प' सुरू करावा यावर एकमत झाले.

 'दुष्काळ निवारण' हा शब्द सर्वानाच खटकत होता. कारण वापरून वापरून तो फार गुळगुळीत झालेला आहे. म्हणून ' बिहार परिवार' हे नामकरण. शिवाय निधी जमवण्याच्या कार्याला ‘ परिवार' या शब्दामुळे येणारा कौटुंबिक आपलेपणाचा वेगळाच स्पर्श.


 पावती पुस्तके, पत्रके छापून व्हायचीच होती; पण आळंदीहून तेथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचे प्रमुख श्री. कुलकर्णी 'माणूस'कडे एक आमंत्रण घेऊन आले. एकादशीला आळंदीला चांगली यात्रा भरते, ठिकठिकाणांहून लोक जमतात. या संधीचा फायदा घेऊन एक सभा घेण्याचे आळंदीच्या काही प्रमुख व्यक्तींनी ठरविले आहे; या सभेत बिहार दुष्काळाची माहिती सांगण्यासाठी 'माणूस'ने आपला प्रतिनिधी पाठवावा, म्हणजे मदत गोळा करणे सोपे जाईल.

 आळंदीचा प्रसाद म्हणून हे निमंत्रण चटकन स्वीकारले आणि अरुण साधू (माणूस) व डॉ. बिडवे (यू. ऑ.) हे एकादशीला सभेसाठी आळंदीला रवाना झाले. या सभेत जागच्या जागी एकशे एक्कावन्न रुपये व रोख मदतीची काही आश्वासने मिळाली. धान्यमदतही अनेकांनी देऊ केली.

 'माणूस' परिवारापैकी सौ. निर्मला पुरंदरे यांच्या लंडनमधील एका मैत्रिणीने पाठवलेली पाच पौंडाची पोस्टल ऑर्डरही एक दिवस अचानक कार्यालयात दाखल झाली. या मैत्रिणीने 'माणूस'मधील बिहारवार्तापत्रे वाचली आणि चटकन् जमली ती मदत लगेच पाठवूनही दिली.

 आळंदी ते लंडन, बिहार परिवाराच्या कामाला तडाखेबंद सुरुवात झाली होती. फक्त पावतीपुस्तके, पत्रके वगैरेचा अजून पत्ता नव्हता.

 मे महिना उजाडला. अगदी सुरुवातीलाच कोल्हापूरहुन डेप्युटी कलेक्टर श्री. भोसले 'माणूस' कार्यालयात बिहारसंबंधी अधिक माहिती मिळवण्यासाठी दाखल झाले. कोल्हापुरात अन्नधान्य, रोख रक्कम, कपडे व औषधे इत्यादी मदत जमा करून, पंधरा-वीस विद्यार्थ्यांची तुकडी घेऊन बिहारला जाणे, तेथे महिनाभर राहून या मदतीचे वितरण डोळ्यांदेखत करणे, ही श्री. भोसले यांची कल्पना ' बिहार परिवाराच्या कल्पनेशी मिळती जुळतीच होती, त्यामुळे दोन्ही ठिकाणच्या कार्यात अधिक संबंध व संपर्क साधण्याचे चटकन ठरले.

 १० मे रोजी ही कोल्हापुरची तुकडी पुण्यास यायची होती. ‘बिहार परिवारा'तर्फे या तुकडीचे स्वागत करावे असे ठरले व या तुकडीला व्यवस्थित वेळेवर हजर राहता यावे म्हणून पुण्याहून खास प्रतिनिधीही रवाना झाला-मानवेंद्र वर्तक.

 ‘शिवाजी मंदिर' ही स्वागत कार्यक्रमाची जागा. सायंकाळी ५।। ही वेळ. लाऊडस्पीकरपासून पाण्याच्या तांब्यापर्यंत सर्व व्यवस्था चोख होती. निमंत्रणे गेली होतीच. आणि ४ वाजता ' माणूस' कार्यालयात कोल्हापूरचा ट्रंककॉल घणघणला. तुकडीला निघायला चार तासाचा उशीर झालेला आहे. ठरल्या वेळी तुकडी पोहोचू शकत नाही.

 पण सभा ठीक ५।। ला सुरू झाली. प्रारंभी कुमार सप्तर्षी यांनी 'यूथ ऑर्गनायझेशन'ची माहिती सांगितली. भाषणाचा हा त्यांचा पहिलाच प्रसंग असल्याने त्यांनी चार-पाच मिनिटांतच आवरते घेतले. नंतर श्री. ग. माजगावकर यांनी थोडक्यात ‘बिहार परिवारा'मागील भूमिका विशद केली. पंतप्रधानांचा, महापौरांचा निधी असला तरी कुणी कार्यकर्ते यासाठी घरोघर जाऊ शकत नाहीत. त्यामुळे वृत्तपत्रातील आवाहने हवेत राहतात, इच्छा असूनही जनता प्रवृत्त होऊ शकत नाही, म्हणून असे छोटे छोटे स्वतंत्र प्रकल्प. शिवाय मोठमोठ्या निधीचे काय होते, शेवटपर्यंत आपण दिलेली मदत पोचते की नाही, याची जनतेला नेहमी शंका वाटत राहते. यापेक्षा लहानसा निधी, आपल्या ओळखीच्या, विश्वासाच्या माणसाजवळ दिला तर लोकांना अधिक खात्री वाटण्याचा संभव' ... इत्यादी मुद्दे.

 कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांचे स्वागत करणारा ठराव संमत झाला.

 कुणी कुलकर्णी नामक एक मुलगा भाषण करायचे आहे म्हणून पुढे आला व त्याने, त्याला स्कॉलरशिप म्हणून मिळालेले ५१ रुपये तिथल्या तिथेच ‘बिहार परिवारा'च्या स्वाधीन केले.

 श्री. रावसाहेब पटवर्धन यांनी उचित समारोप केला.

 सभेला उपस्थिती चांगली होती. संख्येने नाही, गुणवत्तेने. सर्वश्री मोहन धारिया, रामभाऊ म्हाळगी, ग. प्र. प्रधान, नामदेवराव मते, 'तरुण भारत'चे संपादक चं. प. भिशीकर, वा. ब. गोगटे, अच्युतराव आपटे, डॉ. अरविंद लेले, वि. ग. कानिटकर, भाऊसाहेब नातू आणि आपल्या मुलाचे, मुलीचे, भावाचे कौतुक पाहायला जमलेली पालक मंडळी.

 रात्री दहाच्या सुमारास, धान्याच्या पोत्याने भरलेले दोन ट्रक्स 'माणूस' कार्यालयासमोर घोषणा देत येऊन थडकले. कोल्हापूरची तुकडी आली होती. ट्रक्समधल्याच सतरंज्या काढून कार्यालयाबाहेरच्या अडचणीच्या जागेत दाटीवाटीन बैठक भरली. ओळखीपाळखी झाल्या. संध्याकाळच्या सभेतील ठराव वाचून दाखवण्यात आला. ‘बिहार परिवार'चे बॅजेस या तुकडीला देण्यात आले. रसपान आटोपले आणि तुकडीने नगरच्या दिशेने आगेकूच केले.


 रविवार, दिनांक १४ मे. सुमारे ४० विद्यार्थ्यांनी ‘पूनम' व 'कॉफी हाऊस' या उपाहारगृहांत दिवसभर वेटर म्हणून कामे करून ' बिहार टिप्स ' गोळा केल्या. काहींनी बाहेर गाड्या पुसल्या, बुटपॉलिशही केले.

 शनिवार दि. २० व रविवार दिनांक २१ हे दोन दिवस लोणावळयासाठी विद्यार्थ्यांना राखून ठेवले होते. या दोन दिवसाची कथा अशी. कथा लेखकाचे नाव सुहास मेहेंदळे-

 सुहास लिहितो : आणि मग ‘यूथ ऑर्गनायझेशन'च्या मिटिंगमध्ये निर्णय घेण्यात आला. सर्वांनी लोणावळ्याला जायचं; तिथल्या हवा खायला आलेल्या लोकांकडून पैसे गोळा करायचे-बिहारच्या भुकेल्यांना अन्न पुरवण्यासाठी ! मग योजना साकार होऊ लागली. चक्रे फिरू लागली. लोणावळ्यातील प्रतिष्ठित नागरिकांच्या सह्या असलेली पत्रकं छापून घेतली गेली. मराठीत, इंग्रजीत. दोन दिवस जायचं ठरलं. राहण्याची सोय डॉ. आगाशेबाईंकडे झाली. एक वेळचं जेवण एका कारखान्याच्या अधिकाऱ्याकडे, आणखी एक वेळचं जेवण त्याच कारखान्यातील कामगारांकडे. एक वेळचा डबा न्यावयाचा. प्रवासाचं भाडं प्रत्येकाचं. आता अडचण अशी उरलीच नाही. लक्ष केंद्रित झालं होतं ते शनिवारवर !

 अन् शनिवार सकाळ उजाडली. 'यूथ ऑर्गनायझेशन'चे आम्ही चाळीस विद्यार्थी-विद्यार्थिनी पुणे स्टेशनवर जमलो. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्साह होता. पूनम-पूना कॉफी हाऊस मधील अनुभव होता. इतक्यात एकाच्या सुपीक डोक्यातून एक कल्पना निघाली. आमच्यातील चौघे डेक्कन क्वीनमध्ये चढले आणि लोणावळा येईपर्यंत लोकांकडून पैसे गोळा करू लागले. एका तासात दोनशे रुपये जमले. उत्साह वाढला. लगेचच्या लोकलने इतर मुले आली. त्यांना बातमी समजली. उत्साह द्विगुणित झाला. लगेच वेगवेगळ्या बॅचेस पाडल्या गेल्या. प्रत्येक जोडीला एकेक भाग वाटून दिला गेला. कामाला सुरुवात झाली देखील...

 लोणावळ्यात एक वेगळंच वातावरण पसरलं. बाजारात वेगवेगळ्या ठिकाणी पोस्टर्स लावली गेली. मुलं-मुली गटागटांनी हिंडत होती. लोकांना बिहारमधील परिस्थितीची माहिती देत होती. जाणारे-येणारे लोक थबकत होते.... हे दृश्य पाहत होते. कुतूहल वाटत होतं. उत्साह वाटत होता. कौतुक स्पष्ट दिसत होतं.

 मदत केली जात होती. लोणावळ्यातील रहिवाश्यांनीदेखील आपली मुलं-मुली आमच्याबरोबर पाठविली. त्यांच्या ओळखीच्या घरी आम्ही जात होतो. हक्काने पैसे घेत होतो. दहा वाजता सुरू झालेलं हे काम दीड वाजला तरी चालूच होतं. उन्हाची तमा वाटत नव्हती. श्रम वाटत नव्हते. एरवी चार पावलं चालल्या की दमणाऱ्या ह्या पोशाखी मुली प्रत्येक घरात जात काय होत्या...बिहारसाठी मदत काय मागत होत्या...पैसे मिळाले की आनंदित काय होत होत्या...सगळं वातावरण उत्साहमय होतं...जाणीव होती ती बिहारमधील गंभीर परिस्थितीची !!

 आणि लोक तरी काय तऱ्हेतऱ्हेचे भेटले ! बहुतेक सगळ्यांना दुष्काळाची जाणीव दिसली. नव्हती ती फारच थोड्यांना. पण बिहार परिवाराचे बिल्ले लावलेली मुलं-मुली दिसली की, काही दारं धाडकन लावली जात...काहीजण लहान मुलांना पाठवीत ..मग ती सांगत- “आमचे पप्पा किनई बाहेल गेलेत अन् पलत येनाल नाहीत." पुन्हा दारं लावली जात...! 

 काही बहाद्दर तर किती तरी वेळ दारच उघडत नसत...काही सवाई बहाद्दरांनी तर कुत्रीदेखील अंगावर सोडायला कमी केलं नाही ! पण हे क्वचितच. बाकी सगळीकडे दिसला तो बंधुभाव .. त्यागी वृत्ती..आपुलकी आणि कौतुक !!

 डेक्कन क्वीनमध्ये असेच गंमतीदार अनुभव आले. बिहार परिवाराचे आम्ही स्वयंसेवक जवळ आलो की, काहीजण चक्क झोपेचे सोंग घेत. तर काही शेजारच्या माणसाला माहिती सांगताना, आपण 'त्या' गावचे नाही असा आव आणत. काहीजण भांडत. विचारत, “ बिहारला मदत का ? रत्नागिरिला का नाही ?" याचं उत्तर आपली संस्कृती. स्वतःआधी इतरेजनांना मदत करणे हा आपला धर्म आहे, नव्हे काय? असा प्रश्न विचारून उत्तर दिलं की, मग पैसे निघायला वेळ लागत नसे. एक जण तर चक्क भांडलाच. आवाज काय चढविला... तुम्ही पैसे खाताय... लोकांना फसवताय... असा आरोप काय केला.. त्याला वाटलं आम्ही ‘बिहार रिलीफ फंडा' साठीच पैसे गोळा करीत आहोत. इतर प्रवासी त्याला त्याची चूक समजावून सांगू लागले. आम्हांला भरपूर मदत करू लागले आणि मग त्याचा पडलेला चेहरा पाहण्याचा मोह आवरताना मलाही फार कष्ट पडले !

 काही ठिकाणी लोक घरात बोलवत. बसायला सांगत. इतकंच नाही तर तुम्ही दमला असाल, असं म्हणून खायला-प्यायला देत. पैसा बिहारला पोहोचण्याबद्दल शंका व्यक्त करीत. पण आमच्यातले काही जण प्रत्यक्ष विहारमध्ये जाऊन धान्य वाटप करणार आहेत, हे ऐकून समाधान व्यक्त करीत. मदत करीत. अकरा रुपयांची ..सहा रुपयांची! काही जण दहाच रुपये देत. अकरा रुपयांत एक बिहारी एक महिना जगू शकेल हे कळल्यावर, खुशीनं एक रुपया वाढे. पावती फाडली जाई ती अकरा रुपयांचीच ! काही सांगत आम्ही आधीच मदत केली आहे, मग पुन्हा कशासाठी ? त्यांना समजावून सांगावं लागे, मदतीची आवश्यकता पटवली जाई। विद्यार्थ्यांविषयी विश्वास निर्माण केला जाई आणि मग मदत मिळे ती देखील अतिशय समाधानाने !

 दुपारी दीडला काम थांबलं. जेवण आणि विश्रांती झाल्यावर दुसऱ्या भागात पुनश्च काम सुरू झालं. संध्याकाळी लोक फिरायला बाहेर पडत. पुण्यातील विविध कॉलेजचे युवक अन् युवती एकत्र येऊन लोणावळ्यात हे काम करीत आहेत, हे पाहून त्यांना समाधान वाटत असे. रस्त्यावरच्या लोकांना थांबवून विनंती केली जाई. पैसे मिळत. काही लोक तर स्वत:चे पत्ते देत व अधिक पैसे घेऊन जायला सांगत. संध्याकाळी एके ठिकाणी लग्न होतं. लोणावळ्यातील बरेच प्रतिष्ठित लोक येणार आहेत असं कळलं. चार जणांची एक तुकडी रवाना झाली. बऱ्याच वेळाने ही तुकडी हात हलवीत परत आली. मात्र पानसुपारी व (वाटाण्याच्या) अक्षता त्यांना मिळाल्या !!


 शनिवारी रात्री काम थांबलं आणि आम्ही आमच्या (!) निवासस्थानी परत आलो. तर तिथं कारखान्यांतील अधिकारी आमची वाट पाहत होते. प्रत्येकाकडे एकेक जण दिला गेला. त्यांच्या घरी जेवायला गेलो. तिथं तर पंक्तीचाच थाट होता. रांगोळ्या घातल्या होत्या. दोन्ही वेळेला पहिल्या वाफेचा भात, चटण्या, कोशिंबिरी, भाज्या अन् शिवाय वर गोडाचं पक्वान्न ! ' दिवसभर हिंडून थकला असाल, आता पोटभर जेवा, संकोच करू नका,' असा प्रेमळ आग्रह. घरांतील लहान मुलंदेखील उत्साहानं प्रश्न विचारीत. बरोबर फिरण्याचा हट्ट धरीत. पोटभर जेवल्यावर चांदण्यात रमत रेंगाळत गप्पा मारीत येण्यात फार मौज आली अन् दिवसभरात एक हजार रुपये जमल्याची वार्ता कळल्यानं प्रसन्नतेची अन् उत्साहाची जी लाट पसरली, तिचं वर्णन करणं केवळ अशक्य आहे.

 रविवार सकाळ उजाडली ती वेगळ्याच वातावरणात ! दोन बॅचेस पाडल्या गेल्या. एक बॅच गेली खंडाळ्याला. अन् दुसरी चालत निघाली खंडाळ्याकडे–वाटेतले बंगले गाठीत. काही जण खूप माहिती विचारत, बराच वेळ गप्पा मारीत अन् काहीच देत नसत. काही जण म्हणत, तुमची बडबड नको. पैसे हवेत ना ? मग हे घ्या पैसे ! काही म्हणत आमचा तुमच्यावर विश्वास नाही. पण तुम्ही इतक्या लांब आलात... मोठ्या घरचे दिसता...तर हे घ्या पैसे ! एका हॉटेलमधील मालकाने पैसे देण्याचे नाकारले. पण केवळ ३३ पैश्यांनी एका बिहारी माणसाला एका दिवसाचे अन्न मिळेल हे कळल्यावर तेथील वेटर्सनी आठ-आठ आणे दिले. मग त्या मालकाला काय वाटलं कुणास ठाऊक, पण त्याच्या नावाने अकरा रुपयांची पावती फाडली गेली !!

 कोणी कसाही असला तरी आमचा प्रचार चालूच होता. वीस मुलं आणि तितक्याच मुली शांतपणे माहिती सांगत...पैसे गोळा होत...कुठेही गडबड नव्हती ..गर्दी नव्हती. सगळे पद्धतशीर चालू होतं. बोलण्याची पद्धतदेखील ठरली होती.

 "माफ करा."

 "काय ?" कपाळावरच्या सतराशे साठ आठ्यांतून प्रश्न उमटे...

 "आम्ही पुण्यातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी एक युवक संघटना स्थापन केली आहे, आणि बिहारमधील भुकेल्यांसाठी आम्ही मदत गोळा करीत आहोत. आमच्यापैकी काही इंजिनिअरिंगचे, मेडिकलचे, स. प. चे, तर काही फर्ग्युसनचे, कॉमर्सचे विद्यार्थी आहेत."

 त्या व्यक्तीच्या कॉलेजचे नाव आलं की आठ्यांची संख्या सतराशेवर येई !


 "आमचे प्रतिनिधी थेट बिहारमध्ये जाणार आहेत अन् तिथे अन्नछत्र उभारणार आहेत. म्हणजे असं पाहा की, आपण दिलेला प्रत्येक पैसा बिहारी माणसाला निश्चित मिळणार. पैसे खाल्ले जाण्याची शक्यता यामुळे अजिबात नाही !'

 ...चेहे-यावर प्रसन्नतेचं साम्राज्य असे ! आठ्यांचा मागमूस नसे ! !

 "आपल्याला 'माणूस' माहीत असेल ?"

 "कोण माणूस ? "

 "अहो, असं काय करता? 'माणूस' साप्ताहिक माहीत नाही काय ? त्याचा आम्हाला पाठिंबा आहे ! करता ना मदत ? "

 ...ओठांतून नकळत एखादं स्मित घरंगळत बाहेर पडे आणि मग फक्त पाकीट उघडल्याचा आवाज होई...नोटा बाहेर निघत. पावती फाडली जाई. पैसे देणाऱ्याच्या चेहेऱ्यावर समाधान पसरे; पावती देणाऱ्याचा चेहरा आनंदात फुलून येई. दोघांनाही एका बिहारी माणसाला एक महिना वाचवण्याचा आनंद मिळे! ...

 हे असं रविवारी दुपारपर्यंत चाललं होतं. दुपारी कामगारांनी जेवण दिलं... तितक्याच आपुलकीनं ! तीन वाजता शेवटची फेरी झाली. पाच वाजता काम थांबलं. डॉक्टरांकडे चहा झाला. भेळेवर सर्वजण तुटून पडले ! सर्वांचा प्रेमानं निरोप घेऊन, जमलेले एकवीसशे रुपये बरोबर घेऊन, आम्ही चाळीसजण उत्साहानं परतलो... पुण्याकडे ! !

 ...अखेर पुणे स्टेशन आलं. दोन दिवसांच्या सतत श्रमानं दमलो होतो. पाऊल उचलणं जड जात होतं. वीरांगना अतिशय थकल्या होत्या... तरीदेखील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास होता...लोकांबद्दल कृतज्ञता होती आणि हे सर्व पैसे बिहारी माणसाला पोहोचविण्याच्या जबाबदारीची जाणीवदेखील होती! !


 रविवार दिनांक २७ मे. या दिवशी पहिली चार विद्यार्थ्यांची तुकडी सिकंदराबाद एक्स्प्रेसने निघालीही. अनिल अवचट, रवींद्र गुर्जर, अनिल दांडेकर आणि अरुण फडके. पुणे स्थानकावर या तुकडीला निरोप देण्यासाठी या चौघांचे नातेवाईक, मित्र आणि यूथ ऑर्गनायझेशनचा तमाम जथा जमला होता. माधवराव पटवर्धन होते, इंदिराबाई मायदेव होत्या, भाऊसाहेब नातू होते आणि श्री. ग. माजगावकरही.


 या तुकडीबरोबर बिहारमध्ये खर्च करण्यासाठी एकूण ५५०० रुपयांचा निधी व दोन खोकी औषधे पाठविण्यात आली.

 या तुकडीला प्रथम कोल्हापूरच्या तुकडीशी संपर्क साधण्यासंबधी अवश्य त्या सूचना देण्यात आल्या.

 दुसऱ्या तुकडीची जमवाजमव येथे सुरू आहे.

सन १९६७