मुक्तिसंग्राम !



 तळाशी दबलेल्या, खेड्यातील अखेरच्या माणसाला, शहरातील सर्वसामान्य स्त्रीपुरुष नागरिकाला पुरेसे अन्न, वस्त्र आणि निवारा, शिक्षण आणि समान वागणूक या गोष्टी प्राप्त होत नाहीत तोवर मूठभरांना या देशात चैनबाजीत आणि विशेष समृद्धीत लोळण्याचा अधिकार नाही. हे एक ध्रुवसत्य विसरले गेल्यामुळे आपल्या नियोजनाची परवड झाली. गोरगरीब व मध्यम परिस्थितीतले लोकही अन्नान्नदशेला लागले, देशात भ्रष्टाचार, महागाई, टंचाई, बेकारी माजली, देश कर्जबाजारी झाला, परकीयांची दडपणे वाढत गेली.

 या सर्वांतून मुक्त होणे हा पुण्यात शनिवारवाड्यासमोर एक ऑगस्ट (१९७४)ला झालेल्या मोर्चा व उपोषणाचा, दिवसभराच्या चर्चेचा, सायंकाळच्या सभेचा व सभेच्या शेवटी घेतल्या गेलेल्या प्रतिज्ञेचा मुख्य आशय होता.

 आपल्या राजकीय-सामाजिक व सांकृतिक जीवनाचे शुद्धीकरण ज्यामुळे होऊ शकेल; असे स्वदेशी-बहिष्काराचे अनेक कार्यक्रम, लोकांनी स्वयंस्फूर्तीने स्वीकारावयाची व्रते-उपक्रम त्या दिवशी विविध गटचर्चेतून पुढे आले होते. यातील एक वातानुकूलित इमारती, खोल्या, यंत्रसामग्री यासंबंधी होता. खरोखर या देशात या यंत्रसामग्रीची गरज आहे का ? रुग्णालये वगैरे अगदी किरकोळ अपवाद वगळता या यंत्रसामग्रीचा, त्यामुळे काही थोड्यांना लाभणाऱ्या सुखसोयींचा, आपल्या देशाच्या सद्यःस्थितीशी काही मेळच बसत नाही. शहरीकरणाचा रोग फैलावतो आहे. हा रोग सुसह्य करण्यासाठी त्यावर हा आणखी एक श्रीमंती इलाज सुरू आहे. बहुसंख्य लोक जोवर उन्हातान्हात, चिखलामातीत काम करताहेत, कोंदटलेल्या, गलिच्छ, अंधाऱ्या जागेत राहाताहेत तोवर अगदी मोजक्या वरिष्ठ वर्गाने ही ऐषाराम वाढवणारी चैन उपभोगणे हे संपत्तीचे एक चालू स्थितीत न परवडणारे, असमर्थनीय व अश्लाघ्य प्रदर्शनच आहे. विषमता वाढवणाऱ्या आपल्या चुकीच्या नियोजनाचे हे एक डोळ्यांना खुपणारे प्रतीकही आहे. हे प्रतीकच हटवले, काढून टाकले तर?


-६

  • स्मगलिंगचा माल न वापरणे,
  • उधळपट्टी, साठेबाजीला आळा घालणे,
  • परदेशात विनाकारण ज्यामुळे पैसा जातो असा माल न घेणे, कोकाकोला, कोलगेटसारख्या अनावश्यक वस्तूंच्या कोलॅबरेशन्सची बाजारपेठ बंद करणे,
  • महागडे कापड, चैनीच्या इतर वस्तू यावर वहिष्कार टाकणे,

 -असे अनेक कार्यक्रम, उपक्रम १ ऑगस्टच्या मोर्चाने लोकांसमोर यापूर्वी ठेवलेलेच आहेत. महाराष्ट्रात ठिकठिकाणी असे मोर्चे आता निघत आहेत, नवस्वदेशीचा, बहिष्काराचा विचारही फैलावत आहे. याला जोडूनच वर दिलेला एअरकंडिशनिंगविरोधी कार्यक्रमही सर्वत्र घेता येण्यासारखा आहे-विशेषत: पुण्यामुंबईत. त्यातही टप्प्याटप्प्याने जाता येईल. प्रथम सरकारी-निमसरकारी कचेऱ्या हे लक्ष्य असावे. नंतर विलासी हॉटेलांचा नंबर लावावा. अगदी शेवटी सिनेमागृहे वगैरे. कारण चार-पाच रुपये खर्चून झोपडपट्टीतला माणूसही कधीकधी या सुखसोयीचा, ऐषारामाचा लाभ याठिकाणी घेऊ शकतो. ही त्याची चैन आत्ताच त्याच्यापासून हिरावून घेण्याचे कारण नाही. उच्चभ्रूंच्या वातानुकूलित खोल्या खाली झाल्यावर नंतर सावकाश करता येण्यासारखे हे काम आहे.

 गुजराथचा नवनिर्माण लढा केवळ भ्रष्टाचार आणि महागाईविरोधी होता शिवाय तो ग्रामीण भागातही पोचू शकला नव्हता. बिहारने एक पाऊल आणखी पुढे टाकलेले आहे. बिहारमध्ये जयप्रकाशांची चळवळ ग्रामीण भागात पोचली आहे, शिवाय चळवळीचे उद्दिष्टही अधिक व्यापक झाले आहे. शिक्षणात क्रांती, किडलेली शासनयंत्रणा बंद पाडणे, यासाठी बिहार पुढे सरसावला आहे. महाराष्ट्रानेही आता मागे राहू नये. लोकमान्यांच्या वेळी बंगाल आणि महाराष्ट्र एक झाले व त्यांनी १९०८ साली स्वदेशी-बहिष्काराचे एक उग्र आंदोलन उभे केले. आता महाराष्ट्राने बिहारशी आपले नाते जोडावे. किडलेली समाजव्यवस्थाच बदलण्यासाठी सर्व बाजूंनी उठाव करावा. सर्वंकश व चालू व्यवस्थेला मुळापासून शह देणारी चळवळ बिहारच्या मदतीने उभी करावी. स्वदेशी–बहिष्कार ही केवळ सुरुवात ठरावी. नवा मुक्तिसंग्राम हे चळवळीचे अखेरचे उद्दिष्ट राहावे. मुक्तिसंग्राम याचा अर्थ स्वच्छ आहे. अखेरच्या माणसाला हे राज्य आपले आहे, या राज्यात आपल्याला कामधाम मिळते, न्याय मिळतो, बरोबरीची समान वागणूक मिळते, विकासाची संधी मिळते असा अनुभव येणे हा मुक्तिसंग्रामाचा खरा आशय आहे. हा आशय व्यक्त होईल असे छोटे मोठे उपक्रम सुरू व्हायला हवेत, जनतेने स्वयंस्फूर्तीने या उपक्रमांना साथ द्यायला हवी. तर हा संग्राम व्यापक होईल, लोकमान्यांच्या आणि गांधीजींच्या परंपरेत नवी भर पडेल. ही नवी भर टाकण्याची वेळ आता आलेली आहे. महाराष्ट्राने मागे राहू नये. मतभेद, पक्षभेद तात्पुरते बाजूस सारावेत.

समान कार्यक्रम ठरवावेत. अधिकात अधिक लोकांना सहभागी करून घ्यावे. यश मिळते, प्रतिसाद लाभतो असा १ ऑगस्ट (१९७४) मोर्चाचा अनुभव आहे. ठिकठिकाणी आता हे लोण पोचायला हरकत नाही. कुणीही कुणाची वाट न पाहता, आदेशांसाठी खोळंबून न बसता उठावे. वेळ सोनेरी आहे, काळ कठिण असला तरी !

ऑगस्ट १९७४