निर्माणपर्व/जसलोक-जत्रा
पंतप्रधान मोरारजी देसाई जयप्रकाशांच्या भेटीसाठी ‘जसलोक'मध्ये आले असता चंद्रशेखर, मधू लिमये, एस्. एम्. जोशी ही मंडळी अनुपस्थित राहिली, ही घटना थोडी तपशिलात जाऊन पाहाण्यासारखी आहे. या अनुपस्थितीचे कारण काय असावे ? जयप्रकाशांच्या निधनाचे चुकीचे वृत्त लोकसभेला देऊन मोरारजीभाईंनी जी लाजिरवाणी चूक केली, तिचा निषेध करावा, याबद्दलची आपली चीड व्यवत करावी, म्हणून हे तिघेजण लांब राहिले, मोरारजी असेपर्यंत जसलोककडे फिरकले नाहीत, असे एक कारण दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रांतून देण्यात आले होते. असे जर असेल तर त्यात काहीच अयोग्य व टीका करण्यासारखे नाही. मोरारजी म्हणजे अनुभवी व कसलेले प्रशासक. त्यांच्या हातून एवढी मोठी घोडचूक व्हावी हे खरोखरच आश्चर्य आहे. दोषी असतील त्यांना शासन घडले तरी या चुकीमुळे जनता-सरकारची झालेली बेअब्रू काही पुन्हा सावरता येत नाही. शिवाय जनता पक्षाला पितृस्थानी असणाऱ्या जे. पीं.बाबतच हा प्रमाद घडून येणे, हे आणखीच दुर्दैव म्हटले पाहिजे. यामुळे एस्. एम., चंद्रशेखर यांच्यासारखी जे. पींशी निकटचे भावनिक संबंध असलेली मंडळी व्यथित झाली, प्रक्षुब्ध होऊन त्यांनी मोरारजींना जाणवेल अशा पद्धतीने आपला निषेध-राग नोंदवला, यात अस्वाभाविक काहीच नाही. अशी तीव्र प्रतिक्रिया न उमटणेच खरे म्हणजे अस्वाभाविक होते. पण नंतर मुख्यमंत्री श्री. शरद पवार यांना या घटनेबाबत जो खुलासा वृत्तपत्र-प्रतिनिधींना दिला आहे, तो फारच चमत्कारिक व जनता-नेत्यांचा एकूण भोंगळपणा आणखीच उघड करणारा आहे. हा खुलासा वाचल्यावर मोरारजींच्या ठिकाणी समजा चंद्रशेखर किंवा अन्य कुणी जनता-नेते असते, तरी ही किंवा अशीच दुसरी एखादी चूक त्यांच्याकडूनही झाली नसतीच, असे खात्रीपूर्वक काही सांगता येत नाही. खुलासा विनोदी आहे. तो मुळातूनच वाचण्यासारखा आहे. मुख्यमंत्री वृत्तपत्र-प्रतिनिधींना सांगतात -
'सर्वश्री चंद्रशेखर, मधू लिमये, एस्. एम्. जोशी, रामधन, कृष्णकांत आणि बिहारचे मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांनी पंतप्रधान श्री. देसाई यांच्या भेटीवर बहिष्कार टाकला हे वृत्त खरे नाही. वस्तुस्थिती अशी आहे की, ही सर्व मंडळी इंडियन ऑइलच्या गेस्ट हाउसवर भोजनासाठी एकत्र जमली होती. पंतप्रधानांना विमानतळावरून घेऊन आम्ही हेलिकॉप्टरने जाणार आहोत आणि हे हेलिकॉप्टर या गेस्ट हाउसवरून जाणार असल्याने, त्याचा आवाज तुम्हाला ऐकू येईल. 'तो आवाज ऐकला की, तुम्ही जसलोककडे निघा' असे आपण या नेतेमंडळींना सांगून ठेवले होते. तथापि, ऐन वेळी आम्ही हेलिकॉप्टरऐवजी मोटारीने ‘जसलोक' कडे आलो. त्यामुळे हेलिकॉप्टरचा आवाज येण्याचा प्रश्नच उद्भवला नाही! ही सर्व नेतेमंडळी गेस्ट हाउसवर हेलिकॉप्टरच्या आवाजाची प्रतिक्षा करीत बसली. दरम्यान पंतप्रधान व मी (पवार) जसलोकमध्ये आलो. अर्थात तेव्हा ही नेतेमंडळी रुग्णालयात हजर नव्हती. त्यामुळे त्यांनी 'बहिष्कार टाकला, हे म्हणणे योग्य नाही.' (लोकसत्ता दि. २५ मार्च)
या नेतेमंडळींनी पंतप्रधानांच्या जसलोक भेटीवर उघडउघड ‘बहिष्कार' असता तर त्यात वावगे, आक्षेपार्ह काहीच नव्हते. पण हेलिकॉप्टरची घरघर ऐकू न आल्याने घोटाळा झाला, हा या जनता नेत्यांच्या गबाळेपणाचा एक रोकडा पुरावाच म्हटला पाहिजे. पवारांचा हा वरील खुलासा खरा मानला तर काही अगदी प्राथमिक शंका उपस्थित होतात. (१) खुलासा पवारांनी का करावा? चंद्रशेखर, एस्. एम्. यांनी करायला हरकत नव्हती. (२) चंद्रशेखरांनी अगोदर केलेला एक खुलासा वेगळाच आहे. ते मोरारजी यायच्या वेळेला म्हणे भोजन व विश्रांतीसाठी गेलेले होते. जयप्रकाशांसाठी ते मुख्यतः आलेले असल्याने पंतप्रधानांसाठी आपल्या कार्यक्रमात बदल करण्याची त्यांना आवश्यकता वाटली नाही. यात उघडउघड ‘बहिष्कार' नसला, तरी राग-निषेध जरूर डोकावतो व तो स्वाभाविक व स्वागतार्हही ठरायला हरकत नाही. पण मग जसलोकमधून राजकीय विषयावर मुलाखती-मतप्रदर्शन करण्याचेही या मुक्कामात तरी त्यांनी टाळायला हवे होते. शिवाय पवारांचा हेलिकॉप्टर-खुलासा, या चंद्रशेखरांच्या भोजनकार्यक्रमाशी जुळत नाही, ते वेगळेच. (३) विमानतळावरून हेलिकॉप्टरऐवजी मोटारीने यायचे ऐनवेळी ठरले असे पवार म्हणतात. मग हा कार्यक्रमातील बदल कुणाच्यातरी मार्फत विमानतळावरून फोन करून इंडियन ऑईल गेस्ट हाऊसमध्ये, हेलिकॉप्टरच्या घरघरीची प्रतीक्षा करीत बसलेल्या नेतेमंडळींना कळवणे पवारांना आवश्यक वाटले नाही का ? (४) पवारांनी समजा नाही कळवले तरी ही नेतेमंडळी घरघरीची वेळ टळून गेल्यावर स्वस्थ कशी काय बसून राहिली? त्यांनी विमानतळाशी फोनवरून संपर्क साधून चौकशी करायला काय हरकत होती ? त्यांना सुचलेच नाही की जायचे मनातच नव्हते? सूचलेच नसेल,पवार म्हणतात त्याप्रमाणे ही नेतेमंडळी गेस्टहाउसमध्ये हेलिकॉप्टरच्या घरघरीची केवळ 'प्रतीक्षा करीत राहिली असतील, तर गलथानपणाचा हा एक नवा पुरावाच मानायला हवा. बहिष्कार टाकण्यात निदान तेजस्वीपणाची झाक तरी आहे. सहा जनता नेते इंडियन ऑईल कंपनीच्या गेस्ट हाउसमध्ये ‘प्रतीक्षा' करीत बसलेले आहेत, यात एका प्रांताचे मुख्यमंत्री असलेले कर्पूरी ठाकूरही आहेत, हे दृश्य मात्र फारच केविलवाणे आहे. पवारांचा खुलासा म्हणूनच स्वीकारावासा वाटत नाही. मधु लिमयांनी तरी निदान' हो, आम्हाला बहिष्कारच अभिप्रेत होता' असे ठणकावून का जाहीर करू नये? ते खूप स्पष्टवक्ते नाही तरी आहेतच.
जयप्रकाशांना जसलोकमध्ये आणल्यावर नेत्यांची तिथे जी भाऊगर्दी उसळली, काहींनी तिथे 'ठिय्या' मांडून जी अडचण केली, त्याबद्दल नाराजी व टीका, महाराष्ट्र टाइम्ससारख्या प्रमुख वृत्तपत्रातून आलेली आहे. पण अशी गर्दी कमी करण्याचा उपाय या टाइम्ससारख्या वजनदार वृत्तपत्रांच्या हातीच असतो, हे कसे ध्यानात घेतले जात नाही ? पहिल्या दिवसापासून वृत्तपत्रांनी प्रचंड मथळे देऊन, छायाचित्र टाकून, या विषयाला भरपूर व सविस्तर प्रसिद्धी दिली. जसलोक हे त्यामुळे प्रसिद्धीचे ठिकाण साहजिकच बनले. मग नेतेमंडळी तेथे गर्दी करणार नाही हे शक्य तरी आहे काय ? कुठलीही गोष्ट प्रमाणाबाहेर नेऊन हास्यास्पद करून सोडण्यात भारतीयांचा हातखंडा आहे. वृत्तपत्रांनी जे. पींं. च्या जसलोक मुक्कामाला प्रमाणाबाहेर प्रसिद्धी दिली, त्यामुळे नेत्यांची आवकही वाढली. सगळ्यांनी यायची खरोखरच गरज होती का ? हा आला म्हणून तो आला आणि प्रसिध्दी मिळते,नाव फोटो येतो, म्हणून आणखीही येत राहिले. दिल्लीतले १/२ प्रमुख नेते, जवळचे एस्. एम् , चंद्रशेखरांसारखे अनुयायी, नातेवाईक एवढ्यावर काम भागू शकले असते; पण हरियानाचे मुख्यमंत्री कशाला? नको तेवढे नेते येऊन पायधूळ झाडून गेले. नेते येत राहिले, म्हणून बाहेरची गर्दीही वाढली. फरक एवढाच की गर्दी स्वखर्चाने आली. नेत्यांचा येण्याजाण्याचा, राहण्याचा मात्र सरकारी तिजोरीतून झाला ! जे. पींना सरकारी खर्चाने भेटण्याची सोय व संधी उपलब्ध नसती, तर यापैकी कितीजण पदरमोड करून आले असते हा एक न विचारता येण्यासारखाच प्रश्न आहे. हा नेत्यांचा गोंधळ कमी होता म्हणून की काय, अनुयायांनी 'प्रार्थने'चा कार्यक्रम रेटला. हे भावनाप्रदर्शन रुग्णालयातच करणे आवश्यक होते का ? अशा प्रार्थनांनी जे. पीं.ना बरे वाटेल ही समजूत तरी एक अंधश्रद्धाच नाही का ? जे धार्मिक आहेत त्याचा प्रश्नच नाही; पण जे निधार्मिक, सेक्युलर वगैरे आहेत, त्यांनीही या प्रार्थना-कार्यक्रमात सहभागी व्हायचे काय कारण होते ? परिपूर्ण धार्मिक आणि सखोल अध्यात्मिक असलेले विनोबाच मग या सगळ्यांपेक्षा वेगळे आणि श्रेष्ठ ठरले असे म्हणावे लागते. त्यांनी प्रार्थना वगैरे काही केली नाही किंवा करा म्हणूनही कुणाला सांगितले नाही. प्रार्थना म्हणजे काही तरी ‘मागणे' आलेच. 'अपेक्षा' प्रार्थनेत असतेच. विनोबांनी याउलट 'रामकृष्णहरी'चे स्मरण करा एवढेच फक्त कळविले. मरण अटळच असेल तर ते योगियाचे असावे, हा यातला भावार्थ. श्रेष्ठ भारतीयाचे याहून कुठले थोर भाग्य असू शकते? तो हे जग सोडून जातो, जसे तुकाराममहाराज गेले तसा. कार्यभाग आटोपला. निघाले ‘आपुल्या गावा, आमुचा रामराम घ्यावा' म्हणत. असेच रामदास आणि एकनाथ गेले, ज्ञानेश्वर-शंकराचार्य गेले. 'वीर पहावा रणी । महात्मा मरणी ।' असे म्हणतात ते यासाठी. जे. पी. केवळ ‘लोकनायक' असते, ‘नेते' असते तर कदाचित विनोबांनी त्यांना या श्रेष्ठ भारतीय आदर्शाची आठवण करून दिलीही नसती; पण जे. पी. नि:संशय त्याहून अधिक आहेत. म्हणून विनोबांची अपेक्षाही अधिक. मरण येणारच असेल तर त्याचे योग्याच्या महानिर्वाणात रूपांतर होऊ द्या. करायचे ते सर्व करून झाले. सांगायचे ते अनेकदा सांगून झाले. आता फक्त रामकृष्णहरी...काया सारी ईश्वराधीन. ‘औषधं जान्हवीतोयं । वैद्यो नारायणो हरिः' अशी शांत-निवांत अवस्था. खरोखर अशी अवस्था यायला भाग्यच लागते. जेव्हा केव्हा वेळ आणि काळ येईल तेव्हा जे. पीं.ना हे भाग्य लाभो !...
३१ मार्च १९७९