निर्माणपर्व/सन्मान्य अपवाद



सन्मान्य अपवाद



 जगजीवनराम यांचा घाव तर अगदी मर्मावर पडलेला दिसतो. किरकोळ मेळाव्यांसमोर पंतप्रधानांना खुलासे करीत राहण्याची पाळी आली. नभोवाणीवरून जगजीवनरामांच्या कृत्याचे चिल्लर पुढाऱ्यांकडून केले गेलेले निषेध सतत ऐकवले जावेत, इतकी पाळी एरव्ही राज्यकर्त्यांवर येती ना. निवडणुका जाहीर केल्यानंतर पंतप्रधानांना बसलेला हा दुसरा मोठा धक्का म्हणावा लागेल. सर्व विरोधी पक्ष इतक्या त्वरेने आणि मजबुतीने एक होऊन निवडणुकीचे आव्हान स्वीकारतील अशी बाईंची कल्पना नव्हती. पण तुरुंगातून सुटून आल्यावर पंधरवडा उलटायच्या जातच हा चमत्कार घडून आला. बाईंना बसलेला हा पहिला धक्का होता.

 पाठोपाठ जगजीवनरामांचा राजीनामा हा दुसरा धक्का. याचे निवडणुकीवर परिणाम होतील, किती जागा काँग्रेसला यामुळे गमवाव्या लागतील, याचे आताच बांधणे कठीण आहे. कारण सत्तेची आणि पैशाची दडपणे अगदीच दुर्लक्षून चालणार नाहीत. पण बाईंचा वचक या एका राजीनाम्यामुळे एकदम कमी, युवक काँग्रेसच्या तथाकथित नेत्यांची मस्ती जिरली; बाईंच्या एकमुखी सत्तेला तडा गेला; त्यांच्याबद्दल वाटणारी भीती कमी झाली; देशातील दहशतीचे वातावरण थोडेफार निवळले यात काही संशय नाही.

 बाईना आता पक्षातील जुन्या व निष्ठावंत सहका-यांवर अधिक अवलंबून राहावे लागणार हे उघड आहे. हे जर झाले नाही तर सत्ता हळूहळू विशिष्ट टोळक्याकडे आपोआप जात राहील आणि बाईंनाच हे टोळके, हा भस्मासुर डोईजड झाल्याशिवाय राहाणार नाही.

 बाई जर लोकशाहीवादी असतील तर पहिला पर्याय पसंत करतील. म्हणजे ओघानेच यशवंतराव चव्हाण वगैरे ज्येष्ठ व निष्ठावंत सहका-यांचे अवमूल्यन थांबेल आणि त्यांचा सल्ला अधिकाधिक घेतला जाईल, मानला जाईल. घेतलेले निर्णय त्यांना फक्त ऐकवण्याची गेल्या दीडदोन वर्षातली प्रक्रिया बंद पडेल.

 या मंडळींचे हे स्थान अधिक बळकट कसे होईल, हे नव्या जनता पक्षानेही

पाहिले पाहिजे. कारण यामुळे लोकशाहीची परंपरा खंडित न होता, सत्तांतराकडे जाता येईल व जनता पक्ष हा खरोखरच लोकशाही मूल्यांची बूज राखणारा पण आहे ही प्रतिमा जनमानसावर कोरली जाईल.

 यासाठी अशा निवडक व्यक्तींच्या जागा मोकळ्या ठेवण्याचा निर्णय जनता पक्षाने घेणे सर्वतोपरी उचित ठरेल. उदाहरणार्थ, महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण यांच्याविरुध्द उमेदवार उभा करण्याचा अट्टाहास जनता पक्षाने कशासाठी धरावा?

 महाराष्ट्राचे सर्वमान्य नेते म्हणून यशवंतरावांचे असलेले स्थान वादातीत आहे. सर्व थरात, सर्व पक्षोपपक्षात त्यांच्याविषयी आपुलकी व आदरभाव आहे, जनताही त्यांना फार मानते. त्यांच्या लोकशाही-समाजवादी प्रवृतीबद्दलही संशयाला जागा नाही. कशासाठी अशा जनतामान्य व्यक्तीला विरोध करायचा? कुठल्याही पक्षातल्या असोत, अशा निवडक व्यक्तींचा अपवाद केला जावा, विशेष सन्मानपूर्वक त्यांना निवडले जावे. यामुळे कर्तृत्वाची, सेवेची बूज राखण्याचे समाजालाही शिक्षण मिळेल आणि राजकीय जीवनाची एकूण उंची वाढण्यासही असे निवडक अपवाद कारणीभूत ठरू शकतील.

फेब्रुवारी १९७७