१७
वाटचाल

 काही लोकांनी आम्हाला आतून ढकलले
व काहींनी बाहेरून खाली खेचले व आमचे पाय
जेमतेम धरणीला टेकले. सामान बरोबर आहे ना
हे पाहून कसेबसे आम्ही स्टेशनबाहेर पडलो तो
तेथेही गर्दीच. जमिनीवर बाजार पसरला होता व
मध्ये ठेवलेल्या हातभर वाटेतून माणसे सामान
पाठीवर किंवा डोक्यावर घेऊन चालली होती.
पंचवीस-तीस पावले चालल्यावर आम्ही एका
उघड्या मैदानाशी पोहोचलो. "तो पाहा देवाचा
तंबू. दर्शनाची नुसती गर्दी उसळली आहे."
माझ्याबरोबरच्या गृहस्थांनी दाखवले. मैदानात
माणसांची दाटी झाली होती व त्यांच्या
डोक्यावरून एक एकखांबी मळकट तंबू दिसत
होता. त्यातच पालखी एका दिवसासाठी
विसावली होती. रस्त्यावरची, मैदानातली व
आगगाडीतली सर्व गर्दी ज्ञानेश्वरांच्या पादुकांवर
डोके ठेवण्यासाठी उसळली होती. आम्ही तिकडे
न वळता आमच्या बि-हाडाकडे गेलो. एक
मध्यम वयाचे गृहस्थ आम्हाला सामोरे आले.
त्यांनी माझ्याबरोबरच्या गृहस्थांना बसवून घेतले
व एका लहानशा भिंतीपलीकडे बायका बसल्या

होत्या तिकडे मला नेले. बि-हाड म्हणजे एका
१३२ / परिपूर्ती
 

नगराच्या घराची पडवी होती. पडवीपुढच्या बाजूला अंगणात सोवळ्याने स्वयंपाक चालला होता. मध्ये एक तीन फूट उंचीची भिंत होती. त्याच्यापलीकडे जरा मोठी पडवी होती. तेथे मराठे मंडळींचा स्वयंपाक त्यांच्यातल्या बायका करीत होत्या. मला दाखवल्या जागी मी गुपचूप जाऊन बसले. इतक्यात कोणीसे म्हणाले, “वाजले किती?' प्रश्न ऐकून मी चपापलेच. वारीला जाताना घड्याळाची उपाधी नको म्हणून ते मी घरी ठेवले होते. पण तेथील एका बाईजवळ घड्याळ होते, त्यांनी सांगितले, “साडेअकरा.” "मग आटपा लवकर. पालखी निघण्याच्या आत जेवण आटोपून, भांडी घासून, मोटार पुढे गेली पाहिजे." सोवळ्यातून उत्तर आले, “सर्व तयारी आहे, फक्त जेवणारांचीच खोटी आहे." एवढ्यात जेवणारे पुरुष- आमच्यातले तीन ब्राह्मण गृहस्थ- सोवळे नेसून जेवावयास आले व भिंतीपलीकडे मराठे मंडळीही जेवावयास बसली. आमचे दिंडीवाले जेवून गेल्यावर सोवळ्यातल्या बायकांनी वाढून घेतले व स्वयंपाक ओवळ्यात घेऊन आम्ही इतरजणी बसलो. जेवणे झाल्यावर ओढ्यावरून भांडी घासून आणली. ती पोत्यातून बांधली व पोती मोटारीत टाकली. मराठे मंडळाचही आटपले होते. त्यांचेही सामान मोटारीत गेले होते. मोटार पुढे गेली. आम्ही विहिरीवरून पिण्याचे पाणी भरून आणले व पालखी निघण्यास वेळ हाता म्हणून बायका जरा लवंडल्या. मी काही चालून थकलेली नव्हत, न भिंतीला टेकून बसले व माझी पुढील काही दिवसांची सोबत कोण कोण आहे ते पाहू लागले.
 आम्ही एकंदर नऊ-दहाजणी होतो. पैकी तीन वयस्क सोवळ्या बायका, इतर सहा-सातजणी मध्यम वयाच्या व एक- ताई... अगदीच पोर होती. पुढल्या मुक्कामाला आणखी दोन-तीनजणी येऊन मिळाल्या. भिंतीपलीकडे पुरुषांच्या बैठकीत एक गृहस्थ होते. त्यांना आम्हा काका म्हणत असू. हे भजनी दिंडीत होते. ते हिशेब बघत. काय वस्तू आहे-नाही बघत, पण वास्तविक बाजारहाट स्वयंपाकपाणी बायकाच करीत. काकांची मदत असे इतकेच. आणखी एक गृहस्थ होते. ते प्रसिद्ध प्रवचनकार असून दिंडीतील सर्व मंडळींना गुरुस्थानी होते. ते फक्त जेवणास व संध्याकाळच्या फराळापुरते यावयाचे. त्यांचे बसणे-उठणे इतर भजनी मंडळीत असे. त्यांच्याच कृपेने मी आज ह्या समुदायात आले होते. ताई माझ्याजवळ बसून

मला बायांची नावे त्या कोठल्या गावच्या; वगैरे सांगत होती. पलीकडे
परिपूर्ती / १३३
 

दिंडीचे व्यवस्थापक व भजनी मंडळी गुरुजींशी संभाषण करीत होती. त्यांचे शब्द कानांवर पडत होते. शेजारच्या थोरल्या पडवीत दिंडीच्या मालकीणबाई मराठे बाया मंडळींकडे जरा लवंडल्या होत्या. त्या व त्यांची बहीण आळंदीहून दिंडी काढीत व भजनी मंडळीच्या जेवण्या-राहण्याची सर्व व्यवस्था करीत असे कळले. आज ताईने मला त्या फक्त दाखवल्या, मग पुढे त्यांची-माझी चांगली ओळख झाली. थोड्या वेळाने दिंडीवाले उठून गेले व आता लवकरच पालखी येणार म्हणून बायकाही उठून तयारीला लागल्या. इतक्यात तुतारी ऐकू आली, पाठोपाठच भजनाचा गजरही कानी आला व आम्ही बि-हाड सोडून सडकेच्या कडेला जाऊन उभ्या राहिलो. निरनिराळ्या दिंड्या भजन करीत चालल्या होत्या. आमची दिंडी आली व संतांची पायधूळ मस्तकी घेऊन इतर बायांप्रमाणेच मी पण दिंडीत शिरले, भजन चालू होते, “ऐसी कळवळ्याची जाति करि लाभावीण प्रीती..." सांगणे सोपे, पण होणे शक्य आहे का? का नाही? सगळ्या आयांची प्रीती अशीच नसते का? मुलांकडून काही मिळेल म्हणून असते ती? परवा जाऊबाईंच्या अंगणात मांजराने पिल्लू मारले म्हणून ती चिमणी तडफडत होती- सारखा आक्रोश करीत होती. तिची प्रीती काय लाभावर आधारलेली होती? प्रीती काय विचार करून आणता येण्यासारखी चीज आहे? ती जन्माला येते ती काय आम्हाला विचारून, परवानगी घेऊन येते? ती न विचारता हृदयाच्या धाग्या-दोऱ्यात स्वत:ला विणून घेते आणि मनुष्य आयुष्याचा मार्ग आक्रमीत असता ह्या धाग्याची ओढाताण होत असते- कित्येक अजिबात तुटून जातात व माणसे रक्तबंबाळ हृदयाने शेवटी म्हणतात, “सोडव, देवा, आता." आयांचीच का? सगळीच प्रीती लाभावीण असते, म्हणूनच तर त्यातून दुःख निर्माण होते.
 इतक्यात माझ्या शेजारच्या बाईने मला हालवले. “ही पाहा बाई पचारती घेऊन उभी आहे. जागजागी उभ्या आहेत बाया पालखीला ओवाळायला." माझी तंद्री भंगली. मी पाह लागले. सबंध रस्ता माणसांनी फुलून गेला होता. दोन्ही बाजूनी ज्ञानबा-तुकारामाच्या नावांचा घोष चालला होता. दिंडीतल्या लोकांच्या भजनाने, टाळ-मृदंगाने जग नादमय झाले होते. आम्ही गाव ओलांडन रस्त्याला लागलो. चालण्याचा वेग जरा जास्त झाला. सूर्य अभ्राच्छादित होता. वारा धों-धों वाहत होता व उडणाऱ्या धुळीमुळे

वातावरण धुंद झाले होते. आळंदी, पुणे, सासवड, वगैरे डोंगराळ मुलूख
१३४ / परिपूर्ती
 

मागे टाकून पूर्व महाराष्ट्राच्या पठाराची चिन्हे दिसू लागली होती. तरी मधूनमधून टेकड्या व जरा मागे मोठाले डोंगर दिसत होते. यंदा इकडील भागात रोहिणीचा पाऊस खूप पडला होता, म्हणून मधेच किंचित ओलावा होता व वातावरण प्रसन्न होते. निरनिराळ्या अभंगांचे शब्द अधूनमधून कानांवर पडत होते. “वेगे आणावा तो हरि...” “लावोनिया हात कुरवाळिला माथा...” “ये ग, ये ग विठाबाई..." एवढ्यात सर्व दिंड्या थांबल्या. का बरे? शेजारची बाई म्हणाली, "उभं रंगण आहे म्हणून." तिच्या शब्दाचा अर्थ मला कळला नाही. पण बाकीचे काय करतात ते आपण करावे म्हणून मी उभी राहिले. पालखीपुढे चालणारा सर्व समाज दुभागून रस्त्याने दुतर्फा उभा राहिला. मध्ये दहा फूट जागा ठेविली होती. “जय जय विठोबा रखुमाई" तालावर सुरू झाले. टाळ जोराने वाजू लागले. मृदुंग पहिल्याने धीमे धीमे व मग भराभर नाद देऊ लागला. म्हणणारे लोक तालावर जागच्या जागी पावले टाकू लागले, म्हणण्याची लय हळूहळू वाढू लागली- दुगण झाली चौगण आता वाढणार तरी किती? नाचणाऱ्या लोकांमागे बघणारा स्त्रीसमाज होता. त्यांचीही अंगे आपसूक तालात हलू लागली. इतक्यात तांबूस रंगाच्या घोड्यावर बसलेला व रुप्याच्या काठीत बसवलेले निशाण घेतलेला एक स्वार व त्याच्यामागून मोकळा घोडा हातात धरलेला एक इसम असे दौडत पालखीपर्यंत गेले. घोड्यांनी पालखीशी डाके ठेवले, व स्वार व रिकामा घोडा आले तसे दौडत परत गेले. “पाहिलत मुक्या जनावरालासुद्धा किती भक्तिभाव असतो तो?" माझ्या शेजारच्या बाई म्हणाल्या. “पण हे घोडे कसले पालखीबरोबर?" मी विचारले. माझ्या अज्ञानाची कीव करीत त्यांनी सांगितले, "तो रिकामा पांढरा घोडा आहे ना... पुढे चालतो तो? तो देवाचा. त्यावर रेशमाचं खोगीर आहे व मागून निशाण घेऊन बसलेला स्वार येतो तो देवाचा स्वार. हे दोन्ही घोडे सरदार शितोळ्यांनी देवाला (ज्ञानेश्वरांना) दिलेल्या सरंजामापैकी आहेत," मी "ठीक" म्हटले. एवढ्यात रंगण आटोपून पालखी परत मार्गी लागली.
 रात्रीचा मुक्काम लवकरच आला. एका वाड्याच्या ओसरीवर व अंगणात आम्हाला जागा मिळाली होती. शेजारच्या मोठ्या वाड्याच्या सोप्यात बाकीची मंडळी होती. सकाळच्या बांधून आणलेल्या भाकऱ्या पोळ्या व चटणीवर संध्याकाळचा फराळ आटोपला व आम्ही बिछाने

पसरले. पुरुष मंडळींना काहीतरी फराळाचे केले होते. पण ती येण्याचे आतच
परिपूर्ती / १३५
 

मला झोप लागली. फराळ केला म्हणजे मी व आमच्या दिंडीतल्या एका मुलीने. बाकीच्या बायका मागून बसणार होत्या. पंढरपूरपर्यंत हाच कार्यक्रम असे. ताईला भूक लागायची. ती संध्याकाळचे लवकर खायची, मी पण तिच्याबरोबर माझे उरकीत असे. बाकीच्या बायांचे मागून व्हायचे. काहींचा उपवासाचा फराळ, काहींचा खरकटा फराळ, काहींचे नुसते दाणे व साबुदाणे असे पाच बायका व पंचवीस प्रकार असतात. सकाळच्या जेवणाची हीच रीत. काहींचा साधा सोमवार, काहींचा आळणी सोमवार, काहींचा कडकडीत सोमवार, काही दुपारी जेवणाऱ्या तर काहींचा सोमवार संध्याकाळी सुटणारा, आणि ह्याशिवाय पुरुष असत त्यांच्यासाठी संध्याकाळी निराळे फराळाचे व्हावयाचे. ही सर्व भानगड व त्यापासून उत्पन्न होणारे चौपट काम दिवसभर चालून त्या बायका कशा करीत ते त्यांच्या त्याच जाणत. पंढरपूर जवळ येत चालले तसतसे रोजच्या उन्हाने सर्वांची तोंडे काळवंडून सुकली, रोजच्या श्रमाने ग्लानी आली. बहुतेक सर्वांचेच पाय दुखत होते; पण रोजच्या कामाची कोणी फारशी कुरकूर केली नाही. त्यातल्या त्यात म्हाताऱ्या होत्या त्यांची जपणूक विशेष करीत. कोणी आजारी पडले तर औषध देत. त्यांचे कष्ट व आनंदी स्वभाव पाहून मला भारी आश्चर्य वाटे.
 पहाटे साडेचार वाजता उठलो. अंधारात कंदिलाच्या उजेडात सर्व प्रात:कृत्ये आटोपली. एकीने आडाचे पाणी काढावे, एकीने अंग धुवावे, एकीने लुगडे धुवावे असे पाळीपाळीने, घाईघाईने स्नान केले, आडाला हातरहाट होता एक व आंघोळी करणारे बायका-पुरुष होते शंभर! खूपच धादल आणि गर्दी झाली. मी मारे कपडे धुण्याच्या व अंगाला लावायच्या साबणाच्या वड्या आणल्या होत्या! त्या परत नेऊन ठेवल्या त्या पुण्याला परत आल्यावर काढल्या. अंधारात वेणीफणी करणे व कुंकू लावणे माझ्या अगदी लहानपणापासून अंगवळणी पडले होते; त्यामुळे गैरसोय वाटली नाही. माझे सर्वांच्या आधी आटोपले व आता आज पादुकांचे दर्शन करावे म्हणून सामान मोटारीत टाकून मी निघाले. पालखी चांगली अर्धा मैल आमच्या उताराच्या पुढे होती. गावकऱ्यांच्या झुंडीच्या झुंडी दर्शनाला चालल्या होत्या. एका मोठ्या वावरात पालखी उतरली होती. भोवती हजारो माणसांचा मुक्काम होता. बिहाड गुंडाळण्याची तयारी चालली होती.

काही बैलगाड्या व लोक मार्गी लागले होते. इतर भल्या पहाटे न्याहारीचे
१३६ / परिपूर्ती
 

उरकून बांधाबांध करीत होते. ही झाली मध्यम स्थितीतल्या गृहस्थाश्रमी शेतकऱ्यांची यातायात. दिंडीबरोबर अगदी भणंग लोक पण खूप होते. मिळेल तेथे खायचे, जागा सापडेल तेथे पथारी पसरायची, व पालखी चालू लागली की चालायचे असा त्यांचा प्रघात असे. शिवाय, भिकारी नसूनही उघड्यावर मुक्काम करणारे लांब-लांबून आलेले लोक होते. पाऊस पडला तर फार हाल होतात. सर्वांच्या मलमूत्राची घाण सर्वत्र पसरते; पण यंदा पाऊस सुदैवाने फार पडला नाही. रात्रीच्या मुक्कामाला मुळीच पडला नाही, पण मळभ असल्यामुळे उन्हाचा त्रास होत नव्हता म्हणून लोक सुखात होते.
 मी मराठीच्या आदिकवींच्या पादुकांवर डोके ठेवून बाहेर पडणार तो एका बाईने मला पजा पाहण्यासाठी तंबतच बाजला नेऊन बसवले. दर्शनोत्सुक भक्तांना बाजूला सारून तंबूची प्रवेशद्वारे बंद केली. चांदीच्या ताटात घालून चांदीच्या पादुका पुजाऱ्यांच्या स्वाधीन करण्यात आल्या. यथासांग पण जरा घाईने प्रवासाला साजेल अशी पूजा होऊन आरती झाली व देवाभोवती मानकरी उभे राहून एक पडदा उभारला गेला. शेजारच्या बाईंना मी विचारले, “हे हो काय?" त्या म्हणाल्या, “देवाला नैवेद्य झाला. देव भोजत करीत आहेत. त्यांना दृष्ट लाग नये म्हणन भोवती पडदा धरला आहे." देवाच्या सगुणत्वाची व साकारत्वाची ही परिसीमा पाहून मी आश्चर्याने स्तंभितच झाले. “पूर्वी खरोखरीच देवाच्या ताटातील लाडू फुटत असे. हल्ली श्रद्धा नाही म्हणून असले साक्षात्कार नाहीत." त्या बाई पुढे म्हणाल्या, मीही मान डोलावून तंबूच्या बाहेर पडले. दर्शनाला येणाऱ्यांची गर्दी परत आत लोटली. “बायांनो, ओवाळणी टाका. ओवाळणी टाका." पालखीजवळचे दलाल ओरडत होते. येणाऱ्यांचे मन देवाच्या पायाशी घोटाळत होते, तर पालखीजवळच्यांचे लोकांच्या खिशावर स्थिरावल ह्या कोंदट वातावरणातून मी झपाट्याने बाहेर पडले तो तुतारी वाजली. साडेसहाला देवांचा मुक्काम न चुकता हालत असे त्याचीच ही सूच मी वाटेवर चालणाऱ्या बायांत मिसळले व पढची वाट काटू लागले.
 सूर्य उगवल्यापासून मावळेपर्यंत मधले दोन-तीन तास वगळून सर्व वेळ चालण्यात जाई. सर्वांत पुढे सामानाने भरलेल्या बैलगाड्या असत.त्यांच्या नंतर शेकडो माणसे गटागटाने, गप्पा मारीत, अभंग म्हणत, भजन करीत जायची व सर्वांत मागून मुख्य मिरवणूक असायची. पहिली दिंडी

अस्पृश्यांची, मग देवाचे घोडे, त्यांच्यामागन शेकडो डोंडेवाले व मागून इतर
परिपूर्ती / १३७
 

दिंड्या आणि नंतर पालखी घातलेली गाडी व मागे मैलभर चालणारी मंडळी. बायका पुरुषांच्या बरोबरीने होत्या. त्यांची लाल, हिरवी, निळी निरनिराळ्या काठांची लुगडी, पुरुषांची मुंडाशी व पगड्या, झेंडेकऱ्यांचे उंच फडफडणारे भगवे झेंडे, दोन्ही बाजूंना मैल न मैल पसरलेली काळीभोर नांगरलेली शेते - लांब क्षितिजावरच्या टेकड्या, रस्त्यावरची हिरवळ आणि वरती पावसाळी ढगांमधून डोकावणारे निळे आकाश हा देखावा किती बघितला तरी माझ्या डोळ्यांची तृप्ती होत नसे. दुपारच्या मुक्कामात ओढ्याकाठी वावरात हजारो मंडळींचा मुक्काम होई. चालणारे रंगीत चित्र काही काळ काळ्या दगडाळ माळावर स्थिर होई. बायका-पुरुषांचा पहिला उद्योग पहाटे आंघोळ करून आणलेली ओली चिरगुटे वाळविणे हा असे. सर्व माळ रंगीबेरंगी पट्ट्यांनी भरून जाई. ठिकठिकाणी पेटलेल्या चुलीतून सदागती निळसर धूर व हलणाऱ्या ज्वाला दुपारच्या उन्हात तरळत वर जाऊन चित्रातील स्थिर पार्श्वभूमीवर उठून दिसत. सकाळपासून संध्याकाळपर्यंत टाळ-मृदुगांचा आवाज व तुकाराम, ज्ञानदेव, एकनाथ, नामदेव, ह्यांचे अभंग कधी गोड गळ्यांनी म्हटलेले. कधी तर ओरडून तारस्वरात म्हटलेले कानात भिनून जात. रात्रीच्या मुक्कामी बिहाडात, चार भिंतीत जे भजन होई तेथे आवाजाचा बेसूरपणा व टाळांचा कट ठणठणाट ऐकून मन खिन्न होई; पण दिवसा मोकळ्या रस्त्यावर टाळांचा आवाज कधीच असहनीय झाला नाही. अभगाचे शब्द ऐकून त्यांच्या अवीट गोडीत मन इतके रंगून जाई की, आवाजातील गोडीचा तेवढा आस्वाद घेऊन बेसूरपणा विसरण्याची प्रवृत्ती हाइ. रस्ताभर पहाटेचे काही तास वगळन वारा भिणभिण वाहत असायचा. नानघताना हौशीने मला सांगितलेच होते की, “बाई, छत्री नेऊन काही फायदा नाही. वारा इतका बेफाट सटतो की, ती उघडून धरताच येत नाही." अत्यतर आले. मी म्हटले. "बरे झाले छत्री आगगाडीत विसरले!" पनि हालणारे बायकांचे पदर, झाडांच्या फांद्या शेतात कुठे-कुठे पेरलेला मिळवा ह्यांनी त्या अखंड चाल चालणाऱ्या माणसाची गती जास्तच भासे, आणि वरती ढगही सारखे वाऱ्याने भिरभिरत असायचे. मी एका रंगमय, दमय, वाऱ्याने भरलेल्या गतिमान अवकाशात सारखी पुढे-पुढे चालत त. खाली पाहिले की असंख्य पाय चालताना दिसायचे, वरती पाहिले की व्य डोकी टाळ-मृदंगांच्या तालात वर-खाली होत पुढे जाताना

"यची. मला वाटे, ह्या जनप्रवाहातील मी एक बिंदू आहे. मी माझ्या
१३८ / परिपूर्ती
 

पायाने चाललेली नसून भोवतालची चलसृष्टी मला लांब-लांब नेत आहे. रात्री निजले तरी मी चालतच आहे असा भास मला होई व सकाळी उठल्यावर रात्रीच्याच ठिकाणी मी कशी ह्याचे मला आश्चर्य वाटे.
 आज आमच्या दिंडीतल्या मराठे मंडळींचा व ब्राह्मण मंडळींचा मुक्काम दुपारला शेजारी-शेजारीच होता. दिंडी त्यांचीच होती. सामानाची मोटार, लाकडफाटा वगैरेंची व्यवस्था, त्याचप्रमाणे दपारच्या मक्कामाची व रात्रीच्या बि-हाडाची जागा दिंडीचे मराठा मालकच बघून ठेवीत. रोज बराबर चालायचे, जवळजवळ मुक्काम असायचा; पण जेवण मात्र निरनिराळे, हे मला कससच वाटे; म्हणून मालकांना म्हटले. “बवा. आज मला तुमच्याकडे जेवण घाला." बुवांनी मोठ्या अगत्याने कबूल केले. मोटार आल्यावर भराभर स्वयंपाक खाली उतरला, चूल पेटवून वरण गरम केले. पत्रावळी माडल्या व एक पुरुषांची व एक बायकांची अशा पंक्ती मांडल्या. वाढप एक- दोन बाया व दोन-चार पुरुषांनी केले. बायांनी फक्त पहिली वाढ केली, शेवटपर्यंतचे वाढणे पुरुषांनीच केले. सर्व बायकांत हसत खेळत जेवण झाले. रात्रीचे बिहाड असेल तेथे बायकांनी पहाटे साडेतीन-चार वाजता उठावयाचे व दोन-तीन चुली पेटवून भात, भाजी. पोळ्या असा स्वयंपाक करून भांड्यांची तोंड गच्च बांधून तो स्वयंपाक मोटारीत सर्व सामानामाखाली भरायचा अशी मराठे मंडळींची प्रथा होती. दुपारच्या मुक्कामाला भात चांगला गरम असे व त्यावर गरम केलेले वरण घातले म्हणजे अन्न रुचकर लागे. ह्या प्रथेचा फायदा म्हणजे दुपारच्या मुक्कामाला पोहोचताच जेवणाची पाने पडत, जेवण झाल्यावर दोन तास पालखी हालेपर्यंत विश्रांती मिळे व दुपारची चाल अगदी भरल्या पोटी होत नसे. ब्राह्मणांचा स्वयंपाक मुक्कामावर होई. चूल मांडून, पाणी भरून आणून, भाजी वगैरे चिरून, भात, पोळ्या भाजी, आमटी एवढा स्वयंपाक होण्यास सहज दीड तास तरी लागे. त्यापुढे पुरुष सोवळ्याने बसत. त्यांचे झाले की सोवळ्यातल्या बाया दोन्ही वेळचे पान न बसत. नतर स्वयपाक ओवळ्यात घेऊन आम्ही बसत असू तोंडात घास पडेपर्यंत सपाटून ऊन लागायचे व नंतर जेवण झाल्यावर तहान तहान होत असे. जेवण झाल्यावर घाईघाईने ओढ्यावरून भांडी घासून आणून पोती भरून मोटारीत ठेवायची गर्दी असे. कारण मोटार रात्रीच्या मुक्कामासाठी पुढे जात असे. नंतर जेमतेम अर्धा-पाऊण तास विश्रांती

मिळेतो पालखी हालली म्हणजे निघायची वेळ व्हायची. मराठी मंडळींमध्ये
परिपूर्ती / १३९
 

स्वयंपाक बायका करीत, वाढणे, पाणी आणणे, मोठे सामान मोटारीत भरणे, वगैरे कामे पुरुष करीत. एकंदर बायका-पुरुषांचे वागणे जास्त खेळीमेळीचे होते. म्हणजे एकत्र बसणे, हासणे वगैरे नसे, पुरुषांची बैठक व बायकांची बैठक लांब लांब असे, पण वागण्या-बोलण्यात खुलेपणा असे. ब्राह्मण मंडळीत बरेचसे काम बायका करीत. पुरुष दोघेच, त्यातील एक प्रवचनकार, तेव्हा ते असले म्हणजे बायका चूपचाप असत, दुसरे थोडेबहुत काम करीत, पण एकंदर कामाचा बोजा बायकाच उचलीत. तसे मराठ्यांचे काम सुटसुटीत असे; सोवळेओवळे, निरनिराळे उपास, वगैरे नाहीत. एकदम पक्ता बसायच्या व एकदम उठायच्या. म्हणून पन्नास-साठ मंडळी असूनही भराभर उरकत असे. एका दिंडीत असून जेवण निरनिराळे ह्याचे मला रोज वैषम्य वाटे. ती मंडळी सर्व स्वच्छ, अंग धतल्याशिवाय न जेवणारी अशीच होती. मग हे अंतर? का एकत्र चालण्याने, देवाचे भजन करण्याने, संताचे काव्य बरोबर म्हणण्याने काय फक्त पारलौकिक कल्याणाचा व्यापार साधायचा होता, आणि ह्या जगातील द्वैत कायम ठेवायचे? असा प्रश्न सारा वेळ माझ्यापुढे असे. बरोबरच्या ब्राह्मण मंडळींनी प्रेमाने मला आपलेसे केले होते. तसेच मराठे बायांनीही केले होते. दोन्हींना एके ठिकाणी आणणे शक्य नव्हते; म्हणून मी आज इकडची तर उद्या तिकडची पाहुणी म्हणून माझ्यापुरते तरी दोन्ही सांधायचा प्रयत्न करीत होते. आणि खरोखरीच एकत्र जेवणाच्या दिवसापासून त्या बाया जास्त आपलकीने वागतात असे वाटले. रस्त्याने चालताना कित्येकदा माझ्याबरोबर चाल लागल्या. माझा हात हातात धरून पाशा किती मनमोकळ्या गोष्टी बोलत. शेवटी शेवटी काहीजणींनी "बर का, ताई, आम्ही पुण्याला तमच्याकडे येऊ बरं का!" असेही सांगितले. एक मुलगी म्हणाली, “पण ताई. तेव्हा आता वागता तशा वागाल . पण मला वर्मी लागला- आज हजारो वर्षे आम्ही शेजारी राहतो, पण अजून त्या आमच्या व आम्ही त्यांचे झालो नाही.
 हे असे का होते? ब्राह्मण मंडळी इतकी का दुष्ट आहेत छे! मुळीच नाहीत. त्या मराठा बायांना कोठे लागले तर पुढे होऊन औषध द्यायची. कोणाला भूक लागली तर खात्रीने पोटभर जेवू घातले असते. पण त्यांच्या हातचे खाणे व त्यांनी आणलेले पाणी पिणे हे मात्र त्यांना वर्ण्य होते. ह्यात काही वावगे करतो असे कोणाच्या मनातही येणे शक्य नव्हते. सर्वजणी एका

जुन्या रूढीच्या चक्रात सापडलेल्या होत्या. काही मनापासून रूढी पाळीत
140 / परिपूर्ती
 

होत्या. काही लोकांत बरे दिसणार नाही म्हणून पाळीत होत्या. पण शहरात निरनिराळ्या लोकांशी नित्य संबंध येणारे ख्रिस्ती, मुसलमान वगैरे लोकांच्या समाजात वावरणारे पुरुषही त्या बायांसारखेच वागत. ह्याचे शल्य मला जास्त वाटे. वारकरी संप्रदाय, बाह्योपचार व दांभिक आचारधर्म ह्यांविरुद्ध संतांचा उठाव, अद्वैताची शिकवण व ह्या सर्वांवर कडी करणारे हल्लीचे शहरी जीवन ह्याचा सोवळ्या-ओवळ्याशी मेळ कसा घालायचा? काही प्रसंग तर मला फारच उपमर्दकारक वाटले. कोठचा मुक्काम ते काही आता आठवत नाहा, पण संध्याकाळी बि-हाडी पोहोचतो तो असे आढळून आले की विहीर जवळजवळ फल्गभर लांब आहे. विहिरीवर जाऊन, हातपाय धुऊन एक लहानशी कळशी भरून आणली. मोटारीतून वळकटी वगैरे आणली व ओसरीवर बसले होते. एवढ्यात ‘सर्व व्यवस्था ठीक झाली ना?" विचारायला बुवा आले. मी म्हटले, “जागा छान आहे, पण पाणी फार दूर हो! पायाचे तर आज अगदी तुकडे पडले... आता पाणी भरायला किती लांब जायचे?' बुवांना कीव आली; त्यांनी एक घागर स्वच्छ घासवून, ताजे पाणी भरून गड्यांकडून आमचे बिहाडी आणून दिली. मी तोंडाने दुवा देत भरपूर पाणी प्याले, पण माझ्याबरोबरच्या माऊल्यांनी स्वतः आणलेले पाणी पिण्यासाठी व चहासाठी वापरले व बुवांनी आणवलेले पाणी फक्त परसाकडे जाण्यासाठी उपयोगिले! त्याच दिवशी पहाटे आम्ही अंधाराच्याच उठून ओढ्यावर स्नानास गेलो होतो. किती तरी लोक तोंड धुवीत, दात घाशीत खाकरत-खोकरत आमच्याभोवती होते. मी कशीबशी अंघोळ केली. त्या पाण्यात मला तोंड धुऊन चूळही भरवेना! ह्या सर्व बायांनी "गंगे! भागीरथी!" म्हणून तेथे आंघोळ केली... अगदी चुळाही भरून तोंडे धुतली, तेव्हा आपल्या शेजारच्या व इतर जातीच्या माणसांच्या खाकरण्याचा ह्यांना विटाळ झाला नाही आणि आता मात्र ह्या आडाच्या स्वच्छ पाण्याचा ह्यांना विटाळ होत होता!
 तीच गोष्ट बोलण्या-चालण्याची. अशाच आम्ही ओढ्यावर अंग धुवत होतो. बरोबर दोन कंदील आणले होते. मी अंग धुवून बाहेर आले तो दुसरा कंदील दिसेना म्हणून इकडेतिकडे चौकशी करू लागले. आमच्यापैकीच काहीजणी मागाहन आल्या होत्या. त्यांनी कंदील परसाकडे जाण्यासाठी नेला होता हे मला व माझ्याबरोबरच्यांना माहीत नव्हते.

इतक्यात आमच्यासमोरच एक बाई कंदील हातात घेऊन ओढ्यात शिरली,
परिपूर्ती / १४१
 

तेव्हा मी म्हटले, “हा तर नाही ना आपला कंदील विचारू का त्यांना?' पण माझ्याबरोबरच्या बाईने ओरडून कंदील नेणाऱ्या बाईला आधीच हटकले, "ए बया, कोणाचा कंदील चालवला आहे?" ती बाई झटदिशी वळून म्हणाली, “कंदील माझा आहे. आणि 'बया, बया' कोणाला ग करतेस?" चूक आमचीच, पण माझ्याबरोबरच्या बाईंना आश्चर्य वाटले. त्या माझ्याकडे वळून म्हणतात, “पाहिलंत ना कसा रागाचा झटका आला तो? 'अग बया' म्हणायचीसुद्धा चोरी झाली बरं का!" आता शब्दाने शब्द वाढू नये म्हणून मी घाईघाईने वर निघाले. पण आपल्या वागण्यातला व बोलण्यातला उद्दामपणा आपणास कसा जाणवत नाही ह्याचे आश्चर्य व उद्वेग मात्र किती वेळ वाटत हाता. पांडुरंगाच्या पायावर डोई ठेवण्यासाठी दिवसेंदिवस कष्टणाऱ्या आम्ही आमच्याबरोबरच्या जिवंत देवांची अशी अवहेलना का करावी?
 पण परिस्थितीचे हे माझे विश्लेषण व्यर्थ भावनेच्या आहारी तर जात नाही? ब्राह्मण आणि इतर ही एक सामाजिक परिस्थिती आहे. बहुसंख्य लोक ही परिस्थिती मान्य करतात- त्यात काही वैषम्य मानीत नाहीत- मी मात्र व्यर्थ त्याचा बाऊ करीत आहे असे तर नाही? तसे खास नाही. ब्राह्मण व इतर हा उपमर्दकारक फरक अनेक रूपकांनी, अनेक अभंगांनी वारकरी सप्रदायातील संतांनीच नाही का दाखवला? ब्राह्मणांच्या अन्यायाची दाद त्यानी पांडुरंगाजवळ नाही का मागितली? "चोखा जरी डोंगा भाव नव्हे डागा... का भुललासी वरल्या सोंगा?" हा अभंग आमच्या दिंडीतील भजनी मडळी कालच आळवन म्हणत होती ती काय त्याचा अर्थ न समजून! सामाजिक विषमतेविरुद्ध हे बंड फक्त अभंगात न राहता हळूहळू कृतीत उतरणार हे स्पष्ट दिसत असता आम्ही आंधळेच राहणार का? सोवळे- ओवळे, एकाचे पाणी चालते, एकाचे वर्ण्य, ही वरली सोंगे आम्ही अजून बाळगून राहणार का? आचारशद्धतेच्या नावाखाली माणुसकी व शजार गमावून बसणार का? "भाव नव्हे डोंगा"... त्या भावाचा मधुर आस्वाद घेण्याची लायकी आमच्यात कधीच का नाही येणार?
  पण सुसुदैवाने हे निष्फळ म्हणन कड विचार डोक्यात फार वेळ चा परिस्थिती नव्हती. सगळे वातावरण आनंदमय होते- भांडण, शिव्यागाळी होत नव्हते असे नाही, पण इतर प्रसंगांच्या मानाने फारच कमी. कोणी भांडायला लागले तरी "काय पंढरीच्या वाटेवर भांडता हो?" असे

इतरांनी म्हणावे व भांडणारांनी शरमून बाजूस व्हावे असाच प्रकार अनेकदा
१४२ / परिपूर्ती
 

मला दिसला. पालखीपुढं अर्धा मैल, मैल जाऊन एखाद्या झाडाखाली बसायचे असा बऱ्याच जणांचा प्रघात होता. झाडाखाली निरनिराळ्या ठिकाणची बायामंडळी जमत, मग एकमेकींना गाणी म्हणायचा आग्रह चाले. गाण्यांच्या कथावस्तूवरून, ते म्हणण्याच्या व बोलण्याच्या लकबीवरून, कोठची बाई कोण्या प्रदेशातील असावी ह्याचा कयास बांधण्याचा माझा प्रयत्न चाले व मागून विचारून माझा तर्क बरोबर आहे असे कळले म्हणजे मी फार खुशीत असे. एकदा अशीच बसले होते, तो “मले, तुले' शब्द कानावर आले म्हणून झटदिशी उठून त्या माणसांत गेले. “तुम्ही खानदेशच्या का हो?" "नाही, आम्ही घाटावरल्या." "असं होय?" म्हणून मी तेथेच बैठक मारली. माझ्याबरोबर पुण्याकडच्या बाई होत्या त्या म्हणाल्या, “ह्या तर मावळातल्यासारखं बोलत नाहीत, मग घाटावरच्या कुठल्या?" मी म्हटले, “घाटावरल्या म्हणजे औरंगाबादच्या बाजूच्या, नाही तर बुलढाण्याकडच्या." माझे बोलणे ऐकून त्या बाया खुलल्या. त्यांच्या मुलखाची मला माहिती आहे असे वाटून त्या पुढे म्हणाल्या की "आम्ही वेरूळच्या बाजूच्या." मी विचारले, "तुम्ही कोण्या जातीच्या?" "आम्ही वारीक." मी म्हटले, “आम्ही वारीक, वारीक, करू हजामत बारीक." खुदकन हसून बाईंनी मान हालवली व म्हटले. "वा! घरची खूण समजली की!" त्या मेळाव्यात बाया, पुरुष, लहान मुले मिळून जवळजवळ पन्नास माणूस न्हाव्याचे होते व सगळी माणसे गाडीने पुण्यास येऊन आळंदीपासून पालखीबरोबर चालत होती.
 अशीच एकदा झाडाखाली बसले होते. दोघी-तिघी बाया मिळून गाणे म्हणत होत्या. “श्रीशैल्या पर्वता जाऊ, चला गडे मळकार्जुन पाहू. हे गाणे पुणे-सातारच्या बाजूला फारसे ऐकायला येत नाही. "का हो, तुम्ही कानडी मुलखातल्या का?" "छे! नाही! आम्ही मोगलाईतल्या, मराठी मुलखातल्या, पण कानडी मुलखाला जवळच." असे त्यांनी सागितले.
 काही बाया-पुरुष बीड, बिदर, परभणी, जालना-थेट नांदेडपासून आले होते. “आम्ही गंगथडीचे" म्हणून ते सांगत. एक दिवस सकाळी रस्त्याने जात होतो. आमच्या पुढेच एक बैलगाडी सामानाने भरली होती व सामानाच्या वरच तीन-चार चिल्यापिल्यांना बसवले होते. त्यातला एक मलगा आकान्त करीत होता. त्याला गाडीत बसावयाचे नव्हते व त्याच्या

आईने त्याला तसेच आत कोंबले होते. तो हात-पाय झाडून मोठा गळा
परिपूर्ती / १४३
 

काढून मोकळेपणाने रडत होता व त्याची आई हातात एक जोंधळ्याचे ताट घेऊन हसत हसत त्याच्यावर उगारीत होती. एवढ्यात त्या पोराने दोन्ही हातांनी शंखध्वनी करावयास सुरुवात केली व सगळ्या बायांत एकच हशा पिकला. “पहाटंच देवाचं दर्शन केलं, म्या म्हटलं, पोर लई चाललं म्हून गाडीत बसवला तर आता बोंबा मारतंय! थांब, तुजं टाळकंच सडकते..." म्हणून ती गाडीमागे धावली. तिच्या बरोबरच्या बाया पण "व्हंजी नग, नग... करीत तिच्यामागे लागल्या. हे लटांबर पुढे जाते तो मागून एक तरणी पोरगेलेशी बाई एका लहान पोराला बखोटीला धरून लळत लोंबत घेऊन चालली होती. मी विचारले, "का हो बाई, काय झालं पोराला रुसायला?" तशी ती म्हणाली, "अंवो, त्याला मुळीच चालायला नको- सारा वेळ म्हंतो, 'मावशे, वर उचल.' आता सकाळची वेळ, म्हटलं कोसभर चाल; मग घेते. तर रस्त्यात लोळण घेतो म्हणून असा चालवलाय. आत्याबाई म्हणाल्या, “पाहा कशी गंमत आहे; त्या पोराला चालायला हव म्हणून, ते रडतंय अन ह्याला चालायला नको म्हणून हे रडतंय. ह्याला बसव त्या गाडीत अन त्या पोराला म्हणावं “चल बाबा पायी.” एवढ्यात एका पुरुषाने येऊन पोराला पाठीशी बांधले व ती बाई आमचेबरोबर चालू लागली. ती मराठ्याची होती: आडनाव पवार; राहणारी जोगाईच्या आब्याची. ते मूल तिच्या बहिणीचे. बहीण मेली होती आणि ही जशी पढरपूरला निघाली तशी बहिणीच्या नवऱ्याने गावाबाहेर पोराला आणून हिच्या स्वाधीन केले. अंगावर एक कुडते- पांघरूणसुद्धा नाही आणि ती बिचारी पंधरा दिवस पोराला घेऊन यात्रा करीत होती. ती आमच्यापुढे गेली; पण अधूनमधून आम्हाला भेटायची. एक दिवस दुपारी रस्त्याच्या कडेला राला घेऊन दोन-तीन बाया-पुरुषांबरोबर बसली होती. आम्ही पण विश्रातीसाठी टेकलो. ती आपले दोन्ही दंड चेपीत बसली होती. “आज फार दमला वाटतं!" मी म्हटले. "काय करू हो? सारा दीस पोराला पाठीशी घेऊन चालायचं. जीव नको झालाय. मोठेपणी पांग फेडील हो मावशीचे." मी आश्वासन दिले. "तो कसला पांग फेडतो? काल फार त्रास " म्हणून मी मुक्कामाला गेल्यावर त्याला चांगला सपाटला, तशी मला सता, मावशे, मुझं नरडं दाब का ग?" आमच्या हशात तीही सामील झाली, आणि ते बेरकी पोर पण तोंड फिरवून हसत होते.

 अशी रोज महाराष्ट्राची नव्याने ओळख होत होती. पुण्याहून पालखी
१४४ / परिपूर्ती
 

निघाली तेव्हा पुणे, जुन्नर, मोगलाई, सातारा, वगैरेकडचे लोक होते; दर मुक्कामाला नवे नवे लोक येऊन मिळत होते. खानदेश, सोलापूर, नाशिक, व-हाड- सगळीकडून प्रवाह घेऊन जसजशी पंढरी जवळ येत चालली तसतशी यात्रा वाढत चालली. सगळी माणसे मराठी होती- निरनिराळ्या जातींची होती, पण एकाच वारकरी पंथाचे अभंग म्हणत होती, एकमेकांशी बोलत होती, एकमेकांना मदत करीत होती, एकमेकींना गाणे म्हणून दाखवीत होती. फक्त मंडळी दिसत नव्हती कोकणची. मी चौकशी केली तर मला कळले, आषाढीला यात्रा देशावरची, तर कार्तिकीला पंढरीला सबंध कोकण लोटते; आता त्यांची भाताची वेळ, ते शेत सोडून कसचे येतात? देशावर शेते नांगरून पडली होती, पण पेरे होण्यास अवकाश होता. त्याचा भक्ती पूर्ण होती, आत्मघातकी खासच नव्हती. मी जवळजवळ सगळ्या महाराष्ट्रभर फिरले आहे, पण सर्व देशाचे एका वेळी, एका ठायी होणारे दशन मला अदभुत वाटले. “ज्या देशातील लोक पंढरीला येतात तो महाराष्ट्र अशी महाराष्ट्राची एक नवी व्याख्या मला कळून आली.
 त्याचप्रमाणे निरक्षर लोकांत सांस्कृतिक परंपरा कशी पसरते व दृढमूल होते ह्याचा एक धडा नऊ-दहा दिवस रोज मला मिळत होता. ज्ञानेश्वरांचा हरिपाठ, नाथांच्या ओव्या, नामदेवाचे व तकारामाचे अभंग, जनाई मुक्ताईचे कारुण्यपूर्ण गोड काव्य, अशी मराठ्यांची उत्तमोत्तम काव्य म्हणत लोक आपली वाणी गोड व शुद्ध करीत होते व मने सुसंस्कृत करीत होते. ते आपला मार्ग हसत-खेळत आक्रमीत होते. लोकांनी यावे म्हणून त्यांचा आग्रह नव्हता. पालखी जाणार म्हणून जाहिराती लागल्या नव्हत्या, त्यांना बाहेरच्या जगाची पर्वा नव्हती. ते आपल्यातच धंद होते. मस्त होत. ज्याला अंतकरण असेल, ज्याला सौंदर्यसृष्टी असेल त्याला हा आनंद लुटायची मोकळीक होती. सुसंस्कृत व साक्षरता यातील फरक एके दिवशी मला विशेष जाणवला. आमच्या दुपारच्या मुक्कामी बसलो असता सहज रस्त्याकडे दृष्टी गेली तो एक पाद्याचे जोडपे दिसले. त्यांच्या हातात लहान लहान पुस्तके होती. प्रभू येशूच्या धर्माचा प्रचार व प्रसार करण्यासाठी ती आली होती. दोन-तीन दिवसांनी कंटाळून ती निघन गेली असावी, कारण ती पुढे दिसली नाहीत. मला त्यांची चीड आली होती, पण आमच्या मंडळींनी सर्व हसून घालवले. ते जोडपे साक्षर खात्रीने होते. पण संस्कृतीचा

लवलेशही त्यांच्याजवळ नव्हता. निरनिराळे मानवसमाज आपल्या
परिपूर्ती / १४५
 

अंत:करणातील काव्य, मांगल्य, सदभाव निरनिराळ्या त-हेने प्रकट करतात व ह्या बहुरूपात त्याची ओळख करून घेणे- आपले तेच खरे हा आग्रह धरण्याआधी लोकांचे काय हे अगदी मनापासून समजून घेऊन त्यांच्याशी समरस होणे- हेच नव्हे का संस्कृतीचे लक्षण? “ऐशा कळवळ्याची जाति करी लाभावीण प्रीती'- अंतिम लाभाची आशा न धरता सर्व मानवतेविषयी जिव्हाळा वाटणे हीच नव्हे का संस्कृती? पण एकेश्वरी पंथाच्या- मग तो राजकीय, सामाजिक वा नैतिक असो- अनुयायांना हे पटणार कसे? सबंध दान-तीन शतके सर्व जगातील लहान-मोठ्या समाजावर स्वामित्व. त्यांची मूल्ये पायदळी तुडविणाऱ्या ख्रिस्त सेवकांना तर हे पटण्याचा सुतराम संभव नाही.
 ह्या निरक्षर बायांना किती गाणी, अभंग, भारुडे पाठ होती त्याचा तर मला पत्ताच लागला नाही. सबंध प्रवासात तेच गाणे काही मी परत ऐकले नाही. गाणी उतरवून घेण्याचा सारखा मोह होत होता. पण कागद, पेन्सिल वा पुस्तक ह्यांना हातात धरायचे नाही असा निश्चय करून निघाले होते ना! तशी बायकी गाणी काही सोडली तर सर्व गाणी वारकरी पंथाचीच होती. त्यांचे प्रकार तरी किती? गोंधळ, खेळिये, गौळणी सगळे काही त्यात होते. एक बाई मला म्हणाल्या, “अहो, ही युनिव्हर्सिटी आहे. तुमच्या विद्यार्थ्यांना तरी हे शिक्षण व ही शिस्त आहे का?" त्यांचे बोलणे मला कबूल नव्हते. पण युनिव्हर्सिटी नाही तरी पारंपारिक ज्ञानाची जोपासना, सवर्धन व पुढच्या पिढीत संक्रांती ही शिक्षणाची तीन अंगे प्रकर्षाने त्यात होती, ह्यात संशयच नाही. हे शिक्षणसद्धा अनेकविध होते. धर्म व तत्त्वज्ञान खाखराज, गायन, नर्तन व नाट्य ह्या तिन्ही कलांचा समावेश त्यात होता; शिवाय सर्व समाजाचे एकत्र जीवनही त्यात होते. गायन विशेष उच्च दर्जाचे होते असे नाही, पण पारंपरिक भजनी चालीखेरीज मृदंगाच्या तालात किती तरी निरनिराळ्या रागांत अभंग म्हणत असत. भैरवी, काफी, भूप, सारग, जयजयवंती दुर्गा, मालकंस असे किती राग कानावरून गेले! फलटणहून निघालो.त्या दिवशी पहाटे पाऊस पडत होता. फलटणचे एक गायक आमच्या दिंडीबरोबर मैल-दोन मैल आले होते. सकाळचे अभंग विशेषच गोड असतात व त्यांनी आळवलेले व भजनी मंडळींनी त्यांच्या पाठोपाठ म्हंटलेले सूर व अभंगाचे जयजयवंतीचे शब्द अजून माझ्या कानात घुमत

आहेत. वरून येणारा पाऊस, खालचा चिखल, इकडे मुळी लक्षच गेले नाही.
१४६ / परिपूर्ती
 

ते गाणारे निघून गेल्यावर समजले की, इतका वेळ आपण पावसात चाललो होतो म्हणून! पालखीच्या वाटेवर पाच वेळा रंगण व बहधा रोज भारुडे होतात. गोल रंगण पाहण्यासाठी व भारुडे ऐकण्यासाठी आजूबाजूच्या खेड्यातून विशेष गर्दी लोटते. पालखी ठरलेल्या एका मोठ्या वावराच्या मध्यभागी नेतात. पालखीभोवती रंगण पाहणारे स्त्री-पुरुष हजारोंनी बसतात. त्यांच्यावाटली १०-१५ फूट जागा मोकळी सोडतात व त्याच्याभोवती समस्त भजनी वारकरी मंडळी आपापल्या दिंडीत टाळ वाजवीत “ज्ञानबा तुकाराम” वा “जय जय विठोबा रखुमाई'चा गजर करीत उभी असतात. मोकळ्या वर्तुळातून दोन्ही घोडे तीन किंवा पाच खेपा भरधाव घालून देवाच्या पालखीसमोर येऊन देवापुढे मान वाकवून निघून जातात. मग खेडेगावातील आलेले लोक ज्ञानेश्वरांच्या पादुकांचे दर्शन करतात व दिंडीतील मंडळी मनमुराद खेळ खेळतात. कुणी तालावर भजन करात नाचतात, कोणी झिम्मा खेळतात, कोणी फुगड्या खेळतात, कोणी खा- खो, बेडूक उडी वगैरे खेळतात. बायका आपापसात फेर धरतात. क्वचित बायका-पुरुष मिळून फुगडी व झिम्मा चालू असतो. पुरुषांच्या खेळात बायकांना फारसा वाव नसतो, कारण त्यांचे खेळ खूप झपाट्यान व आडदांडपणे चाललेले असतात. खो-खोच्या खेळात व पटापट ओणव्या गड्यावरून उड्या मारीत जाताना किती पडतात, पण नांगरलेल्या वावरात विशेष लागत नाही. शेवटी सर्व दिंडीवाले नाचत, फेर धरीत, उड्या मारीत पालखीभोवती प्रदक्षिणा करतात व पालखी हलते. भारूडही मोकळ्या वावरातच होते. भारूड हा एक लोकनाट्याचाच प्रकार आहे. भारूडात वेदान्त, पण तो निरनिराळ्या भूमिकांनी सांगितलेला असतो. भारूड करणारेही बहुधा ठरलेले असतात. “अहो, मी राजाचा जोशी" अशी सुरुवात करून, चाळिशी घालून, दोन फूट परिघाचे पागोटे चढवून, जोशाचे सोंग संपले की तोच माणूस "हमामा पोरा हमामा" म्हणून पागोटे फेकून क्षणात वेश बदलून दुसऱ्या भारूडास सुरुवात करतो. प्रत्यक्ष एकनाथांच्या शब्दाखेरीज इतर शब्द व हावभाव खूपच असतात व पुष्कळदा अश्लालतेच्या कळस होतो. शब्दापेक्षाही हावभाव अतिशय अश्लील असतात. हे नाट्य अर्ध्या तासापेक्षा जास्त चालत नाही. बायका-पुरुष सर्व ऐकतात, पोटभर हसतात, रस्त्याला लागली की सर्व विसरतात. धार्मिक उत्सवात कामुक

प्रतीके व लोकनाट्य अतिप्राचीन काळापासून चालत आली आहेत.
परिपूर्ती / १४७
 

पूर्वीच्या काळी दिवस न दिवस, महिनेच्या महिने जी सत्रे चालत त्यांतही असे काही निव्वळ गमतीचे, काही शृंगारिक, वगैरे करमणुकीचे प्रकार असत. किंबहुना, सर्व नाट्याचा उगम धार्मिक उत्सवात, जादूटोण्यात आहे असाही काहींचा दावा आहे. हा करमणुकीचा प्रकार अश्लील असावा का? नसला तरी चालेल. मोठमोठे संभावीत व विद्वान कीर्तनकार, प्रवचनकार काही भारुडात काम करीत नाहीत. ते बरेचसे अर्धवट शिक्षित लोकच करतात. लोकांना हसवायला सर्वात सोपे साधन म्हणजे निर्लज्ज हावभाव व द्वर्थी वाक्ये, ही फार सनातन कालापासून चालू आहेत. सबंध पंधरवडा होणाऱ्या अखंड भजनात थोडासा हा प्रकार झाला- व तोही खरोखरच थोडासा झाला- तर हरकत नसावी. सर्वांच्या मनात वसणाऱ्या अश्लीलतेला वा बीभत्सपणाला इतक्या थोड्या सामग्रीवर वाट करून देऊन जर ती इतर वळा, इतर जीवनात दृढनिद्रा घेईल तर ही दिलेली किंमत थोडीच वाटते.
 वैराग्यपर कवितेत बीभत्सपणाला वाव पुष्कळच असतो. वासनामय ससाराचा त्याग करायला सांगताना त्या संसाराचे जितके किळसवाणे वर्णन करता येईल तितके करायचे हा प्रघात फार जुना आहे. वारकरी सांप्रदायही त्याला अपवाद नाही. अशाच कित्येक कवनांपैकी मदालसा या नावाने ओळखले जाणारे एक बरेच लांबलचक काव्य आहे. कोणीएक मदालसा नावाची राजस्री आपल्या पत्रांना पाळण्यातच वैराग्याचा उपदेश करते व ते पुत्र पूर्ण विरागी होतात अशी एक कथा आहे. त्यातले मदालसेने आपल्या मुलाना केलेले उपदेश ह्या काव्यात गोवलेले आहेत. "उपदेशे मदालसा । सोऽह जो जो रे पुत्रा।।" हे त्याचे ध्रपद. हे गाणे मी दोन-चारदा तरी ऐकले. वारकऱ्यांच्या मनात वैराग्यपर भावना त्यामळे कदाचित उसळत असतील, पण माझे मन त्या काव्याला विटले हे बरीक खास. “मनुष्याच्या सुदर त्वचेच्या आत रक्त, मांस. वगैरे कशी द्रव्ये आहेत, मलमूत्र कसे त्याच्या शरीरात आहेत, त्याच्या नाकात शेंबड किती आहे - त्याचप्रमाणे व्याधी व जरेने हे सुंदर शरीर कसे करूप होऊन जाते म्हणून, हे प्राण्या, ह्या शरीराचे व्याप सोड, ब्रह्मचर्याचा स्वीकार कर व संसारापासून निवृत्त हो.हा उपदेश पुरुषांना केलेला असतो. आणि ते ठीकच आहे. बाया ना रंग, ना रूप अशा मांसाच्या गोळ्याला जन्म देतात. त्या खादाड जिवाची दर तीन-चार तासांनी भूक भागवितात. दर तीन-चार तासांनी त्यांचे मुताचे कपडे बदलतात.

त्याचे गुवाने भरलेले ढंगण व अंग धुऊन काढतात व ह्या सगळ्या खस्ता
१४८ / परिपूर्ती
 

खाता खाता त्या गोळ्याला हळूहळू रंगरूप येऊ लागले व त्याने हसून पाहिले म्हणजे आपल्याला धन्य धन्य मानतात. अशा ह्या आयांना मानवी शरीर कसले केले आहे त्याची पूर्ण जाणीव असते. त्याचे वर्णन करून का त्यांचे मन संसारातून उडून जाणार आहे? पुरुष ब्रह्मचारी असले तरी एका स्त्रीसंगाखेरीज शरीराचे इतर सर्व व्यवहार अगदी नीट आस्थेने चाललेले असतातच. खाण्यापिण्याची चोख व्यवस्था बायको नसली तरी होत असतेच. अशांची नीट व्यवस्था करण्याचा भार गृहस्थाश्रमी लोकावरच असतो. त्यांची जेवणा-खाण्याची सोय कुणी तरी रक्ताची नाही तर धर्माचा आई-बहीण करीत असते. ब्रह्मचाऱ्याची सेवा करण्यास निष्ठेने व भक्ताने स्त्रियाच पुढे सरसावतात. जिवंतपणी तर त्यांची सेवा होतेच, पण मेल्यावर ही भक्ती स्त्रिया पुढे चालवितात. ह्याचे एक मजेदार उदाहरण वाटेनच पाहिले. पंढरपूर जसजसे जवळ-जवळ येऊ लागले तसतशा सर्व महाराष्ट्रातून पालख्या येऊन ज्ञानदेवांच्या पालखीला भेटू लागल्या. पंढरपूरच्या अलीकडील मुक्कामाला तर पालख्या व दिंड्या ह्यांचे एक नगरच वसते. तेथे सर्व महाराष्ट्राची हजेरी लागते. देहहन तुकाराम महाराज, सासवडहून सोपानकाका, खानदेशातून मुक्ताबाई, उमरावतीहन खुद्द रखुमाई अशा कितीतरी पालख्या येतात. पैकी काही वाटेतच भेटतात. त्यापैका यंदा सज्जनगडाहून रामदासांची पालखी आली. तिची गाठ वाटेत पडली; पालखी वाहणारे पुरुष होते, पण जवळपास चालणाऱ्या, चवरी ढाळणाऱ्या बायाच होत्या. 'सावधान' म्हणताक्षणीच जिवंतपणी पळून जाणारे साधु रामदासबुवा मेल्यावर स्त्रियांच्या गराड्यात सापडलेले पाहन मला हसू आले. स्त्रियाच अशा साधु-पुरुषांची सेवा करण्यासाठी अहमहमिकेने पुढे येतात. ही भक्ति पुष्कळदा सर्वस्वी निष्काम अशी असते. जिला ना पोर ना बाळ, जिचा संसार लहानपणीच उधळला गेला अशी कोणी बाई. बवांना नीट खायला मिळावे; ते अन्न सुग्रास असावे, ते खाणाऱ्याच्या ताटात ऊन-ऊन पडावे म्हणून धडपड करताना पाहिली म्हणजे बुवांच्या वत्सल हृदयाचीच किंमत मला भारी वाटायची. ऐशी कळवळ्याची जाति । करी लाभावीण प्रीता।।
 मदालसा एकदा पूर्ण ऐकल्यावर माझे मन त्यात रमेनासे झाले. हिंदूच्या समाजजीवनात गृहस्थाश्रमाचे महत्त्व कमी होऊन ब्रह्मचर्याचा व

संन्यासधर्माचा बडेजाव कसकसा वाढत गेला ह्याबद्दल माझे विचार भरकटत जायचे. निर्गुण-निराकार ब्रह्माचे आकलन होणे कठीण म्हणून देवाला
परिपूर्ती / १४९
 

सगुणत्व देणारा, इतकेच काय तर ती सगुण, गोजिरी मूर्तीच श्रेष्ठ असा अट्टाहास बाळगणारा वारकरी पंथ- अनेक स्त्रियांचा उपभोक्ता श्रीकृष्ण त्यांचा देव-- 'जर विठोबा-रखुमाई' असा दांपत्यनामाचा घोष- अर्जुनाला प्रवृत्तिपर बनविण्यास कारणीभूत झालेली गीता त्यांचा आधारभूत ग्रंथ, आणि शिकवण काय; तर ब्रह्मचर्याची- निवृत्तिमार्गाची- हा मेळ कसा घालायचा? “प्रजाभिः प्रजायस्व" ("प्रजेच्या रूपाने परत जन्म घे. प्रजेच्या रूपाने अमर हो.') ही वेदाची शिकवण होती. पुत्रकामेष्टी करणारे असंख्य यजमान धुराने कुरु-पांचालांची पवित्र भूमी अंधारीत होते. औरस संतती नसली तर निरनिराळे चांगलेवाईट मार्ग पुत्रप्राप्तीसाठी मनूने सांगितले; एवढेच काय तर “उपनयनविधीपासून बारा वर्षे ब्रह्मचर्याने राहून गुरुगृही विद्या शिकावी. एखाद्या शाखेत विशेष पारंगत व्हायचे असेल तर आणखी काही वर्षे व्रतस्थ राहून वेदाभ्यास करावा. पण ह्यापुढे ब्रह्मचर्याचा उपदेश करणारे लोक नपुंसकच असावे." असे अगदी स्पष्ट मत शबरस्वामींनी दिले आहे. पण गृहस्थाश्रमाची थोरवी वर्णन केली जात असता एकीकडे अरण्यवास व उपनिषदातील तत्त्वज्ञान परिणत होत होते. बुद्ध व जैन संप्रदाय ह्या तत्त्वज्ञानाच्या आधारे कर्ममार्गाचा हीनपणा दाखवून संन्यासमार्गाचा प्रसार करीत होते. पण संन्यास मार्गाची भरभराट एका सामाजिक विरोधावर अवलंबून असते. भिक्षावृत्तीने संन्यस्त अवस्थेत राहणाऱ्या सांप्रदायिक स्त्री- पुरुषांची (मग ते जोगी, संन्यासी, भिक्षू, श्रमण, कोणीही असोत) उपजीविका संपन्न राजकुळे किंवा वैशाली, श्रावस्ती व चम्पा अशा समृद्ध शहरात राहणाऱ्या श्रीमान व्यापाऱ्यांकडूनच होते! समृद्ध व सुखी गृहस्थाश्रमावरच संन्यासधर्माची उभारणी शक्य होते! हिंदूंच्या सामाजिक जीवनात ही जी मूल्यविषयक क्रांती झाली त्याचा इतिहास जितका महत्त्वाचा तितकाच मनोरंजक आहे; पण मदालसेसारखी गाणी मनोरंजकही नाहीत आणि उदात्तही नाहीत.
 मदालसा संपून काही वेळ लोटला होता. एकंदर वातावरणात मला फरक वाटला. क्षणभरात ठेक्यावर नाचत, खुल्या गळ्याने म्हटलेले शब्द ऐकू आले, “बोल रे काऊ, तुझे सोन्याने मढवीन पाऊ" कारण काय तर “पाहणा पंढरीराऊ" आणीत आहेस. ज्ञानेश्वरांची ओवी चालली होती. मदालसेचे जड वातावरण जाऊन हवा निवळली. मन परत प्रसन्न झाले.

आमचे दिंडीतले मुख्य नेहमीच हा विवेक दाखवीत. एकदा मदालसेनंतर
१५० / परिपूर्ती
 

त्यांनी मुक्ताबाईंचे ताटीचे अभंग सुरू केले - "ताटी उघडा ज्ञानेश्वरा” ह्या पालुपदाने अशीच मी माझ्या उदासीनतेतून जागी झाले होते. एकदा संध्याकाळचा टप्पा बराच लांब होता. सूर्य कलला तेव्हा भर उन्हात चालून चालून माणसे थकली होती. हरिपाठ होऊन इतर किरकोळ अभंग झाले होते, पण श्रमाने म्हणा, उन्हाने म्हणा नेहमीचा आनंद वाटत नव्हता, तोच बुवांनी "आम्ही लटके ना बोलू वर्तमान खोटे' सुरू केले. सगळ्यांची तोंडे खुलली आणि लहापणापासून ऐकलेले, असंभाव्य घटनांनी भरलेले ते पद म्हणता म्हणता, हसता हसता वाट कधी सरली ते कळले नाही.
 रंगणे चालली म्हणजे सर्कशीचा भास होई. खेळ सुरू झाले म्हणजे उत्साहाने वाटचालीचे दु:ख नाहीसे होई. भारूडांचे नाट्य मधून मधून चाले व कधी वैराग्यपर कविता, तर कधी देवाचा धावा, तर कधी “लटके ना बोलू' सारखी नितांत असंभाव्य पदे व अखंड हरिनामाचा गजर ह्यांमुळे सारखी वाटचाल करूनही मन प्रसन्न होते.
 म्हणजे काय सर्व वाटसरू आनंदात होते? मुळीच नाही. ही भागीदारी, हे सहजीवन आनंदाचेच नव्हे तर दु:खाचेही होते. किती दुःखीकष्टी माणस पंढरीच्या वाटेवर चालत होती! ह्या वाटेवर नेहमी हृदयात बाळगलेली दुःख ती दुसऱ्यांजवळ सांगत होती, भरलेले अंत:करण हलके करीत होती, आणि वेदना सहन करण्याचे सामर्थ्य आणीत होती. दु:ख तरी किती- प्रत्येकाच दुःख निराळे आणि प्रत्येकाचे दुसऱ्यासारखे.
 किती सुरेख होती ती बाई! किती गोड बोलणे! एक दिवस आम्ही झाडाखाली सुख-दुःखाच्या गोष्टी बोलत बसलो होतो. बायांच्या गोष्टी काय असणार? तुमचे मालक काय करतात? तुम्हाला मुले किती? असल्याच प्रश्नांची उत्तरे दिल्यावर मी पण तेच प्रश्न विचारले. भरल्या डोळ्यांनी तिने सांगितले, “नाही हो. माझ्या घरी मलं नाहीत हो खळत. एवढा मोठा वाडा.. एकीकडे मालक, एकीकडे मी. भांडण नाही, काही नाही; पण बोलणार तरी काय एकमेकांशी? जाते झालं पांडुरंगाच्या पायाशी." मी हळूच विचारले, “देवाच्या पायांशी गा-हाणं घालायला जाता का?" "छे:! छे:! त्याला काय ठाऊक नाही? त्याच्या मनात असल ते करील. त्यानं ठेवलं तसं राह्यला पाहिजे."
 एकदा दुपारच्या जरा विसावलो होतो. शेजारीच दोन-चार बाया- पुरुष

व एक तान्हे मूल अशी होती. एका बाईने मुलाला प्यायला घेतले होते
परिपूर्ती / १५१
 

सारखी रडत होती. "बाई, काय झालं? काही दुखतं का?" "मले नव्हे हो, पोराले!" ती म्हणाली. ती बाई बीडची. महिनाभर प्रवास चालला होता. दोन दिवस झाले, ते वर्षाचे मल तापाने फणफणले होते. उन्हापावसात, वाऱ्यात चालायचे- मूल सारखे पाठीशी. त्याला बाधले तर नवल काय? "एवढ्या लहान मुलाला घेऊन कशा निघाला?" "अहो काय सागू? शेजारच्या चार-पाच गावची माणसं निघाली. शेजारणी म्हणाल्या, 'तुझा सारा जीव संसारात. नाही तरी घरी राहन पोरं काय मरायची थांबली आहेत? चल, पांडुरंगाच्या पायाशी चल, चालवतं आहे तोवर.' म्हणून आले. पण आज दोन दिवस पोर डोळा उघडीत नाही हो!" बारीबरोबर सरकारी डॉक्टर व दवाखान्याची मोटार होती ती दाखवून तिला म्हटले, “जा तिकडे, तुला फुकट औषध मिळेल." ती रोज दूध घेऊन मुलाला द्यायची. ते उकळून घे म्हणून काय सांगणार? मी म्हटले, "मुलाला दुधाचा 'चा' ऊन ऊन दे; घाम यऊन ताप जाईल. विठ्ठल तुला नाही अंतर देणार." ती बरोबरच्या माणसांना घेऊन दवाखान्याकडे गेली. पलीकडे एक म्हातारा पागोटे उशाशी पऊन पडला होता. तो उठून बसला व मला म्हणाला, "ही कसली वारी करते? पोराला ताप आला की, लागली रडायला. देव ठेवील तस राह्यला पाहिजे." मला ह्या शिष्टपणाचा राग आला. मी जरा रागानेच उत्तरले, "तुम्हाला काय जातं बोलायला? ज्याचं दु:ख त्याला ठाऊक." म्हातारा म्हणतो, “अहो, तो विठ्ठल मोठा कठीण देव हाये बरं! तुमचं मन दुसरीकडे गुतलं तर तो सोडवून टाकतो. मीच पाहा ना! बायको होती, मुलं होती, घर हात. एका साथीत चार दिवसात सगळी खलास. घर टाकलं विकून. पैसे टाकले संपवून. आता म्हणतो, देवा तुझ्याशिवाय कोणी नाही!" त्याच्या हातावर चहासाठी पैसे टाकून दिंडी जवळ आली म्हणून मी उठले. “देवा, उषा मनात मला 'चा' द्यावा असं आलं रे! पांडुरंगा नारायणा! हे शब्द ऐकू आले.
 अशीच एक म्हातारी आजीबाई अधनमधून दिसायची. एकदा तिला कोणी विचारले, “आजीबाई. तुमची मुलं, नातवंडं काय करतात, कुठ असतात?" म्हातारीने प्रश्न ऐकला मात्र, तिचे डोळे मिटले. तोड भेसूर दिसू लागले व ती आपादमस्तक थरथर कापू लागला. तिचे डोके लटलट हालू लागले व ती शरीर घुसळ लागली. आम्ही घाबरलो व झटदिशी तिच्याजवळ

जाऊन तिला बिलगन तिच्या अंगाभोवती हात टाकले. “आजीबाई, सावध
१५२ / परिपूर्ती
 

व्हा, पाणी देऊ का?' अशी विचारणा झाली. माझ्या बाहंत म्हातारीचा देह थरथरत होता. मला आठवण झाली. माझी एक कुत्री होती, तिचे पिल्लू जनावर चावून मेले. तेव्हा ती थरथरत उभी होती. अशीच तिला जवळ घेतली होती व असाच तिच्या शरीराचा कंप मला जाणवत होता. मनात आले, “आपण माणसं जनावरांच्या किती जवळ!" म्हातारी थोड्या वेळाने कापायची थांबली, वेदनेची जाणीव व आविष्कार पाशवी पायरीवर आला. तिच्या मिटल्या डोळ्यांतून धारा वाहू लागल्या. मुक्या दु:खाला वाचा फुटली. तिने आपली हकीकत सांगितली. दु:ख काय? जे इतरांचे तेच तिचे. तिचा एकुलता एक मुलगा भर पंचविशीत गेला होता. ही दु:खे सामाजिक विषमतेमुळे उत्पन्न झाली नव्हती; राजकीय दंगली व युद्ध त्यांच्या बुडाशी नव्हती. ती मानवाबरोबर आलेली व मानवाबरोबर नष्ट होणारी अशी होती, ती रावाला होती, रंकाला होती. तरण्याला होती, वृद्धाला होती. सर्व मनुष्यसमाजाला व्यापून राहिलेली होती. म्हातारी आपली हकीकत सांगून क्षणभर थांबली व एक खोल सुस्कारा टाकून म्हणाली, “पांडुरंगा, तू ठेवशील तसं राह्यचं..." दात-ओठ खाऊन मी पण मनात म्हटले, "तेन त्यक्तेन भुञ्जीथाः।” ह्या लोभी सर्वग्राही मालकाच्या हातून जे सुटेल ते आमचे... “पांडुरंग मोठा कठीण देव आहे बरं! तुमचं मन कुठं गुंतलं तर तो सोडवून टाकतो." पण देवा, ते मन ठायी-ठायी गुंतवतोस का? ते पुर गुरफटून टाकतोस आणि मग क्रूरपणे ओरबाडून त्याच्या चिंध्या-चिंध्या करतोस ह्यात काय मोठेपणा? ह्या असल्या श्रमलेल्या, फाटलेल्या, रक्ताश्रू गाळणाऱ्या हृदयाला फरफटत तुझ्या पायांशी आणण्यात तुला काय धन्यता वाटते? त्यापेक्षा आयुष्याच्या प्रभातकाळी सुखाच्या कोवळ्या उन्हात फुललेले आमचे जीवनपुष्प तुझ्या पूजेसाठी का खुडून नेत नाहीस?
 आता मात्र मला पुरे वेड लागले! त्या म्हातारीच्या तळतळाटाने क्षणभर मला वस्तुस्थितीचा विसर पडला. कोण कोणाला ओढून पायाशा आणणार? सगळा मनुष्याच्या मनाचा खेळ आहे झाले! निराकार, निर्गुण व सर्वस्वी उदासीन तत्त्वातून सगुण परमेश्वर निर्माण करावयाचा, सर्वे कतृत्व त्याच्या माथी मारायचे, त्याला जगाचा मालक बनवायचे आणि मग म्हणायचे, “तेन त्यक्तेन भुञ्जीथ:"
 आम्ही सर्व आपापल्या दु:खदायक विचारात गुरफटलो होतो,

इतक्यात एकीने अभंग म्हणावयास सुरुवात केली, “देह जावो अथवा राहो,
परिपूर्ती / १५३
 

पांडुरंगी माझ्या भावो.' तिच्या भजनात सगळ्यांनी आपला सूर मिसळला. म्हातारीही बघताबघता आमच्यात सामील झाली. तिच्या कापऱ्या आवाजाने साथ दिली, “आण तुझी पंढरीरावो." थोड्या वेळाने दुःखाच्या सावल्या जाऊन परत प्रसन्नता आली. अशी सर्वांना दु:खे होती, पण सारीजणे एकमेकांच्या साहाय्याने आनंदमय वातावरण कसे निर्माण करीत कोण जाणे!
 धर्म ही एक अफू आहे! मानवी संस्कृतीने अशी कित्येक तऱ्हेची अफू व दारू निर्माण केली आहे. अफू खाऊन मनुष्य गुंगून पडतो- दारू पिऊन मस्त होतो. वास्तवता विसरण्याचाच सर्व प्रयत्न. कोणी देव निर्माण करते, कोणी शास्त्र निर्माण करते, तर कोणी राजकीय पंथ निर्माण करतात. शास्त्राच्या अभ्यासात सर्वस्व विसरणारे सहस्रावधी शास्त्रज्ञ अफू प्यायलेलेच नाहीत का? अर्वाचीन शास्त्रामुळे मानवांचे आयुष्य आनंदमय झाले ही घोषणा करणारे ज्ञानमदिरेने धुंद झालेलेच ना? समाजाची पुनर्रचना करून समाजाची दु:खे नाहीशी करणारे महान तत्त्ववेत्ते बुद्धापासून मार्क्सपर्यंत होऊन गेले, पण जुनी दु:खे तर नाहीशी होत नाहीतच, नव्याची मात्र भर पडत जाते व मनुष्य अफूने का दारूने ती विसरून म्हणतो, "आमची प्रगती झाली. आनंदमय संसाराची पहाट उगवली...."
 तो वाटचालीचा शेवटचा दिवस. संध्याकाळी इतक्या दिवसांची सोबत सुटणार- जे ते गावात आपापल्या मुक्कामाला जाणार. मला हुरहूर लागली होती.... माझे डोळे परत परत भरून येत होते. हौशी मला म्हणाली हाता, बाई, शेवटच्या माळाला 'रडवा माळ' म्हणतात." "का ग?" त्यावर चालायला लागलं की आपलं रडूच येतं बघा." सगळीकडे निरोप घेणे चालले होते. माझ्या तोंडाने शब्द फुटत नव्हता. मी मानेनेच दिंडीतल्या मंडळीचा निरोप घेऊन पढे निघाले. गावाची शीव आली. मला चुकल्याचुकल्यासारखे वाटत होते. इतके दिवस दिंडीत कधी पुढे, कधी मागे, तर कधी झाडाखाली. तर कधी ओढ्यावर सर्वांबरोबर असणारा तो जवळ दिसेना. मी वळन पाहिले तो तो पाठ फिरवून मागे निघाला होता, मी म्हटले, "काळ्या, बाबा, तू पण सोडून चाललास का रे? पंढरपुरात नाही का येणार?" त्याने हसून मान हलवली. “मग चाललास कुठे?" काही न बोलता त्याने सभोवार हात फिरवला व तो झपाट्याने चालू लागला!

खालची नांगरलेली शेते, वर ढगांनी भरलेले आकाश. खांद्यावर घोंगडी
१५४ / परिपूर्ती
 

घेतलेली ती गोजिरी, सावळी मूर्ती त्यात कधीच दिसेनाशी झाली. मी श्रमल्या पायांनी, भरल्या अंत:करणाने व वाहत्या डोळ्यांनी पंढरपूरच्या वेशीत पाय टाकला.