पायवाट/नाट्यछटेच्या निमित्ताने

नाट्यछटेच्या निमित्ताने


नाट्यछटाकार दिवाकर (शं. का. गर्गे, १८८८-१९३१) हे मराठी वाङ्मयातील एक देदीप्यमान रत्न मानले पाहिजे. एखाद्या लेखकाबरोबर वाङ्मयप्रकार जन्माला यावा, लोकप्रिय व्हावा, त्यामुळे त्या लेखकाच्या अनुकरणाची लाट उसळावी, पण तो वाङ्मयप्रकार हाताळणे मात्र कोणास जमू नये असा प्रकार वाङ्मयाच्या जगात क्वचितच घडत असतो. दिवाकरांच्याबाबत हा प्रकार घडलेला आहे. त्यांच्यापूर्वी मराठीत नाट्यछटा नव्हतीच, आणि त्यांच्यानंतर या क्षेत्रात विचारात घेण्याजोगे दुसरे नावही दिसत नाही. दिवाकरांची नाट्यछटा प्रथम प्रकाशित झाली, या घटनेला आता सुमारे साठ वर्षे होत आहेत. साठ वर्षांपूर्वीच्या मराठी लेखकांचे इतर वाङ्मयप्रकारांतील लिखाण पुष्कळदा शिळे वाटते. पण दिवाकरांची नाट्यछटा अजून शिळी वाटत नाही. तिचा ताजेपणा आणि सौंदर्य अजूनही अबाधित उरलेले आहे.
 तसे पाहिले तर दिवाकरांच्या नाट्यछटांची संख्या फारच थोडी आहे. आणि या लेखनाच्या बहराचा काळही थोडासाच आहे. ऐंशीपेक्षा कमी पृष्ठांच्या मर्यादेत हा सगळा एकावन्न नाट्यछटांचा संसार आवरला गेलेला आहे. हे सारे लिखाण दिवाकरांच्या तारुण्याच्या ऐन उदयकाळातील आहे. त्यांची पहिली नाट्यछटा इ. स. १९११ च्या सुमारास लिहिल्याची नोंद सापडते. त्यावेळी दिवाकर बावीस वर्षांचे होते. यानंतरच्या दोनतीन वर्षांत त्यांनी वेचाळीस नाट्यछटा लिहिल्या. इ. स. १९१३ पासून या नाट्यछटा प्रकाशित होऊ लागल्या. पुष्कळ नाट्यछटांचे प्रकाशन तेव्हा कीर्तीच्या शिखरावर असलेल्या 'केसरी'मधून झाले होते. इ. स. १९१३ नंतर पुढे अकरा वर्षे नाट्यछटाकार स्तब्धच होते. शेवटच्या सहा वर्षांत त्यांनी पुन्हा नऊ नाट्यछटा लिहिल्या. आरंभीच्या नाट्यछटा आणि नंतरच्या नाट्यछटा असे वर्गीकरण दिवाकरांच्याबाबत केवळ काळाच्या आधारे करावयाचे आहे. नाट्यछटांचे अंतरंग पाहून व्यक्तित्वाच्या विकासाच्या वाङ्मयात आढळणाऱ्या खाणाखुणा पाहून असे वर्गीकरण करता येत नाही. लेखकाच्या वयाच्या वाढीबरोबर त्याचे व्यक्तिमत्त्व अधिक परिपक्व व्हावे आणि वाङ्मयात प्रतिबिंबित व्हावे ही अपेक्षा दिवाकरांचे लिखाण पूर्ण करीत नाही.
 या नाट्यछटा आकाराने फारशा मोठ्या नाहीत. त्यांतील सर्वात मोठी नाट्यछटा सत्तावन्न ओळींची आहे. इतर बहुतेक तीस-पस्तीत ओळींच्या आहेत. पाने आणि ओळी हे बहिरंग सोडून आपण अंतरंगाकडे वळलो, म्हणजे आपणास अतिशय विविध आणि जिवंत अनुभवांच्या नाट्यजगात प्रवेश केल्याचे आढळून येते. या नाट्यछटांमधील नाट्य तसे स्थूलच आहे. बहुतेकवेळी बोलणे आणि वागणे यांतील विरोधच निरनिराळ्या व्यक्तींच्या रूपाने आपल्यासमोर येतो, हेही खरे आहे. काही वेळेला माणसे बोलल्याप्रमाणे वागण्याचे ठरवितात आणि या त्यांच्या स्वतःशी प्रामाणिक राहण्याच्या जिद्दीतूनच फार मोठे संघर्ष उभे राहतात. वागण्याबोलण्यात विरोध असणे, हा सामान्यांच्या जीवनाचा परिपाठ आहे. वागण्या-बोलण्यात संगती ठेवण्याच्या धडपडीतून असामान्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार येत असतो. दिवाकरांच्या नाट्यछटेत या प्रकारचे नाट्य टिपलेले नाही. परस्परविरोधी अशा प्रेरणांच्या ताणांत माणसाची इच्छाशक्ती कधी बधिर होऊन जाते. त्या अवस्थेतच तो स्वतःशी काही बोलू लागतो, काही स्पष्टीकरण करू लागतो. ही किंकर्तव्यमूढताही नाट्यरूप घेते. नाट्यछटेत असे घडताना दिसत नाही. फार खोल असे चिंतन, जीवनदर्शन अगर जीवनाच्या गूढ रहस्याला स्पर्श असे काहीही दिवाकरांच्या नाट्यछटेतून दिसत नाही. तरीही पण या वस्तुस्थितीमुळे जे आहे ते फारसे खोल नसले तरी अतिशय नीटस, रेखीव, मोहक आणि जिवंत आहे, हे सत्यही नाकारता येत नाही. आपल्या या अतिशय मोजक्या लिखाणामुळे मराठी सारस्वतात दिवाकर आपला ठसा अमर करून गेले आहेत, यात शंकाच नाही.
 या नाट्यछटा लिहिताना दिवाकरांनी स्वतःवर काही मर्यादा घालून घेतलेल्या आहेत. या मर्यादांचा नाट्यछटेच्या केवळ बहिरंगावर परिणाम झालेला नसून अंतरंगावरही तो झालेला आहे. या नाट्यछटा लिहिताना त्यांच्या प्रयोगाची जाणीव दिवाकरांच्यासमोर जवळजवळ नाहीच. प्रयोगाच्या दृष्टीने जर त्यांनी विचार केला असता, तर इतर अनेक बाबींचा विचार दिवाकरांना करावा लागला असता. त्याचा परिणाम नाट्यछटेच्या स्वरूपावर झालाच असता. माध्यमिक शाळांच्या स्नेहसंमेलनांतून या नाट्यछटांचे प्रयोग अधूनमधून होतात, पण कोणताही प्रयोग कधी फारसा यशस्वी होत नाही. नाट्यछटांचे प्रयोग पाहताना सतत हे जाणवते, की प्रेक्षकांना प्रयोगाशी समरस होण्याची वेळ येण्यापूर्वीच नाट्यछटेचा प्रयोग संपून जातो. नाट्यप्रयोगाची बांधणी काही प्रमाणात स्वतंत्रच असते. नाट्यप्रयोगाचा आस्वाद वैयक्तिक नसून तो सामूहिक असतो. या जनसमूहास प्रयोगाशी समरस होण्यासाठी काही अवधी असावा लागतो. प्रत्येक वाक्यातील खोचदारपणा प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यास संधी मिळावी लागते. प्रसंग आणि रचनांची विविधता, संवादांचे स्वरूप यांचाही विचार प्रयोगाच्या संदर्भात करावा लागतो. दिवाकरांच्यासमोर वैभवाने मिरवत असलेल्या रंगभूमीचे रूप ध्यानात घेतले, तर त्या रंग भूमीवर अनेक नट, अनेक प्रवेश, विविध देखावे, गायनाची समृद्धी- असा फार मोठा पसारा दिसतो. ख्याल गायन रंगभूमीवर आकर्षक स्वरूपात उभे करण्याची धडपड एकीकडे, आणि देखावे अधिक हुबेहूब करण्याची धडपड दुसरीकडे. या दोन प्रवृत्तींनी भारलेला असा तो रंगभूमीचा वैभवकाळ होता. प्रयोगाचा विचार जर दिवाकरांनी केला असता तर त्यांच्या नाट्यछटेचे स्वरूप मुळातच बदलून गेले असते. त्यांच्यासमोर नाट्यछटा होती ती फक्त वाचण्यासाठी होती.
 आणि हा वाचकवर्ग दिवाकरांनी नेहमीच विशिष्ट वयाचा गृहीत धरलेला आहे. त्यांच्यासमोर वाचक, श्रोता आणि प्रेक्षक म्हणून माध्यमिक शाळेतील विद्यार्थी वावरतो आहे. विद्यार्थ्यांच्यासमोर जीवनाचा कोणता भाग यावा, याविषयी शिक्षकाच्या मनात काही संकेत ठरलेले असतात. सगळ्याच ललित वाङ्मयाला आस्वादक म्हणून जो रसिक आपण आपल्या मनासमोर ठेवतो, तो जर दिवाकरांच्या समोर असता तरीही नाट्यछटा बदलली असती. प्रयोगाच्या कल्पनेचा अभाव आणि समोरचा श्रोता या दोन बंधनांमुळे केवळ नाट्यछटेतील विषयाच्याच मर्यादा निर्माण झालेल्या नाहीत, तर तो विषय कोणत्या पातळीवरून, किती खोलात जाऊन पाहायचा, याच्याही मर्यादा निर्माण झालेल्या आहेत. आपण हाताळीत असलेल्या वाङ्मयप्रकारातील शक्यता आणि नाट्यछटेचे प्रायोगिक रूप जर दिवाकरांच्यासमोर किंवा त्यानंतर येणाऱ्या इतर लेखकांच्यासमोर असते, तर ही घटना मराठी वाङ्मयाच्या समृद्धीला हातभार लावणारी ठरली असती, असे मला वाटते.
 नाट्यछटा हा एकपात्री प्रयोग आहे. तो एकपात्री या अर्थाने की रंगभूमीवर एकच नट आपली भूमिका घेऊन वटविण्यासाठी उभा आहे. हा प्रकार सादर करताना दिवाकरांच्या डोळ्यांसमोर प्रसिद्ध इंग्रज कवी रॉबर्ट ब्राउनिंगचे 'मोनोलॉग' होते. ब्राउनिंग हा चिंतनशील, गंभीर आणि प्रौढ मनोवृत्तीचा कवी आहे. भाषाशैलीच्या दृष्टीनेही ब्राउनिंगची भाषाशैली अर्थगौरवाच्या बाजूने संपन्न असली, तरी ती पुष्कळच बोजड असणारी शैली आहे. दिवाकरांनी ब्राउनिंगची चिंतनशीलता, त्याची मनोवृत्ती आणि भाषाशैली यांपैकी कशाचाच स्वीकार केलेला दिसत नाही. त्यांनी फक्त 'घाट' उचललेला दिसतो. हा घाटसुद्धा संस्कारित करून घेतलेला आहे. अलिकडे पु. ल. देशपांडे आणि सौ. सुहासिनी मुळगावकर यांनी काही एकपात्री प्रयोग सादर केले आहेत. त्यांचे अनुकरण इतर अनेकांनी केलेले आहे. या नव्या एकपात्री प्रयोगांत नट एकच असतो, पण तो नाट्यान्तर्गत असणाऱ्या अनेक व्यक्तींच्या भूमिका क्रमाने वटवीत असतो. सर्वांचेच संवाद त्या त्या भूमिकेत अनुप्रवेश करुन नट बोलत असतो. परंपरागत रसर्चच्या परिभाषेत सांगायचे, तर या नव्या एकपात्री प्रयोगात एकाच नटाला क्रमाक्रमाने वेगवेगळ्या अनुकार्याशी एकरूप व्हावे लागते. अर्जुन आणि सुभद्रा, कृष्ण आणि रुक्मिणी असा सारखा भूमिकांचा बदल आणि भूमिकांची पुनरावृत्ती या प्रयोगात होत असते. यामुळे नाट्यप्रयोगातील आभासमय वास्तवाला सतत छेद मिळत असतो. असे अजूनही हे एकपात्री प्रयोग मोठ्या प्रमाणात प्रायोगिक यश मिळविणारे ठरले. कोणत्याही प्रयोगातील नाटय हे प्रेक्षकांच्या मनात साकार होत असल्यामुळे प्रत्यक्ष रंगभूमीवर वास्तवाभासाला छेद मिळाला तरी त्यामुळे आस्वादाला बाधा आली असे काही सर्वसामान्य प्रेक्षकाला वाटले नाही.
 नाट्यछटेच्या निमित्ताने जो एकपात्री प्रयोग उभा राहतो, त्यात नट एकच असतो आणि तो एकच भूमिका वठवीत असतो. प्रयोगाच्या आरंभापासून शेवटापर्यंत भूमिकेत बदल होत नसल्यामुळे प्रयोगातील अंतर्गत वास्तवाभासाला छेद जाण्याची शक्यता अशा प्रयोगात अतिशय कमी असते. इतर पात्रे गृहीत धरायची असतात. ती प्रत्यक्ष रंगभूमीवर नटांच्याद्वारे साकार होत नसतात. पण ती पात्रे नाट्यानुभवाचा मात्र भाग असतात. या रंगभूमीवर अमूर्त असणाऱ्या पात्रांनाही नाट्यानुभवात स्वतःचे व्यक्तित्व असते. नाट्यप्रयोगात हा गृहीत धरण्याचा भाग फार मोठा आहे. ज्याप्रमाणे नट हा राम आहे, हे नाटयान्तर्गत वास्तव आपण गृहीतच धरले पाहिजे कारण त्याशिवाय प्रयोगाच्या आस्वादाला आरंभ होतच नाही त्याप्रमाणे नाट्यप्रयोग सादर करणाऱ्यांना समोरचा प्रेक्षक तिथे अस्तित्वात नाही हे गृहीत धरलेच पाहिजे. नाट्यप्रयोगात जशा अनेक गोष्टी आपण गृहीत धरतो, त्याप्रमाणे इथे एकाखेरीज असणारी उरलेली सर्व पात्रे गृहीत धरायची असतात. हा सर्वसामान्य संकेत एकदा आपण मान्य केला की मग आपल्या सर्व छटांच्यानिशी सगळे नाटय नाट्यछटा या प्रकारात अबाधित राहते. नाट्यछटा हेही काही मान्य संकेतांवर आधारलेले नाटकच असते. या नाटकांचे प्रयोगसुद्धा यशस्वी होणे अशक्य नाही. एकेकाळी हे प्रयोग यशस्वी झालेले आहेत.
 नाट्यछटाकार दिवाकरांच्या नाट्यछटा आज आहेत त्या अवस्थेतही जिवंत नाट्याचा प्रत्यय देणाऱ्या आहेत. अनेक नाटकांतील नाटकीपणापेक्षा नाट्यछटा अधिक जिवंत आहे. पण जर या वाङ्मयप्रकाराचा मागोवा व्यवस्थितपणे घेता आला असता, तर हा प्रकार याहून गुंतागुंतीचा आणि समृद्ध झाला असता. अशाप्रकारच्या एकपात्री प्रयोगाची प्रदीर्घ परंपरा भारतीय नाट्यात आहे, याची जाणीव स्वतः दिवाकरांना अगर त्यांचे अनुकरण करून नाट्यछटा लिहिणाऱ्या इतर कुणाला दिसत नाही. नाट्यछटेवर विवेचनात्मक मजकूर लिहिणाऱ्या समीक्षकांनाही हा मुद्दा जाणवलेला दिसत नाही. निदान यापूर्वी इतर कुणी या प्रश्नाचा उल्लेख केलेला माझ्या पाहण्यात नाही.
 प्राचीन भारतीय रंगभूमीवर रूपकप्रकार म्हणून एकपात्री नाट्यप्रयोगांची परंपरा प्रदीर्घ आहे. या एकपात्री प्रमुख रूपकप्रकाराखेरीज उपरूपकांमध्ये विविध रसांतील एकपात्री उपरूपकांच्या परंपरा त्याकाळी पुष्कळच विकसित झालेल्या दिसतात. उपरूपकप्रकार सोडले तरी मुख्य रूपकप्रकारात 'भाण' हा एकपात्री प्रयोग आहे. संवाद, स्वगत, आकाशभापिते, परिक्रमा यांनी मिळून भाण या रूपक प्रकाराचे शरीर सिद्ध होते. हा अतिशय प्राचीन नाटकप्रकार आहे. भरतनाट्यशास्त्राच्या काळीच हा रूपकप्रकार प्रतिष्ठित झालेला होता. भरतांनीच दशरूपकांत त्याचा उल्लेख केलेला आहे.  नाट्यशास्त्राचा काळ विचारात घेतला तर भाण या नावाने अस्तित्वात आलेल्या प्राचीन संस्कृत नाट्यछटेचा आरंभ आपण सुमारे दोन हजार वर्षांइतका जुना गृहीत धरू शकतो. प्रयोगाच्या दृष्टीने लिहिल्या गेलेल्या, प्रयोग म्हणून यशस्वी होणाऱ्या नाट्यछटांची एवढी प्रदीर्घ परंपरा दिवाकरांच्या मागे उभी होती. या परंपरेची जर दिवाकरांना जाणीव झाली असती, तर मग नाट्यछटेसाठी ब्राउनिंगपर्यंत जाण्याची गरजही त्यांना वाटली नसती. नाट्यशास्त्रात असे म्हटले आहे की, भाण हा नाट्यप्रकार एकपात्री आणि एकअंकी असतो. संस्कृत नाटकांत अनेक प्रवेश असणारे अंक नसतात. म्हणून अंकाचे स्वरूप एकप्रवेशीच असते. भाणही एकपात्री, एकप्रवेशी, एकांकिका असते. भाणात पाच संधीपैकी मुख आणि निर्वहण असे दोनच संधी असतात. भाणामध्ये नाट्यान्तर्गत एकच व्यक्ती रंगभूमीवर असते. ही व्यक्ती विट असते. विट हे पुरुषपात्र आहे म्हणून भाणात गीत-नृत्याला प्राधान्य नसते. सगळे महत्त्व संवादांनाच असते. भाणाची प्रधानवृत्ती भारती असते. नाट्यशास्त्रात भाणाचा प्रधानरस कोणता ? याचा उल्लेख नाही.
 परंपरेप्रमाणे भाणाचे स्थळ गणिकांची वस्ती म्हणजे वेश हे असते. विट हा गणिका आणि गि-हाइके यांचा मध्यस्थ असतो. वृत्तीने रंगेल, धन गमावलेला, वृद्धपणाच्या सीमेवर असणारा आणि सर्वांच्या ओळखी असणारा असा हा विट असतो. तो चतुर, केसांना कल्प लावणारा, आकर्षक कपडे घालणारा, उत्तान-शृंगारिक संभाषण करणारा व जोड्या जुळविण्यावर जगणारा असतो. त्याला आणखी एक नाव धूर्ताचार्य असे आहे. हा विट भाणामधील एकमेव पात्र असल्यामुळे भाणाचा रस शृंगार असणार हे उघड आहे. फक्त नाट्यशास्त्रात तसा स्पष्ट उल्लेख नाही. भाणाच्या या स्वरूपात पुढेही फारसा बदल झालेला दिसत नाही. मात्र नाट्यशास्त्रानुसार भाणाचे कथानक दोन प्रकारचे असते. विट स्वतःच्या जीवनाची हकिकत सांगतो अशाप्रकारचे, किंवा तो नायकाच्या जीवनाची हकिकत सांगतो अशाप्रकारचे.
 नाट्यशास्त्रानंतर दीर्घकाळपर्यंत नाट्यविचारांचे ग्रंथ सापडत नाहीत. ते आज लुप्त आहेत. दहाव्या शतकातील धनंजयाने भाणाची प्रधानवृत्ती भारती असते, तो एकपात्री प्रयोग असतो इत्यादी उल्लेखांसह भाणामध्ये शंगार आणि वीर हे प्रधान रस असतात असाही उल्लेख केलेला आहे. संस्कृत नाटकांमधून विटांचे जे उल्लेख आढळतात, त्यांत विट मारामारी आणि गुंडगिरीसाठी प्रसिद्ध असल्याचा उल्लेखसुद्धा आहे. भासाच्या 'चारुदत्ता'त शकाराबरोबर असणारा विट वसंतसेनेला भर रस्त्यावरून पळविण्याच्याच प्रयत्नात आहे. पुढे शूद्रकाने 'मृच्छकटिका'त या प्रसंगाला वेगळी डूब दिलेली आहे. विटाचा गुंडगिरीतील सहभाग लक्षात घेता त्याच्या कथानकात वीररसालाही अवकाश आहे, असे मान्य करावे लागते. पण हा वीररस शंगाराच्या सोबतीला म्हणून असतो. यानंतर अकराव्या शतकात अभिनवगुप्तांनी भाणामध्ये करण व अद्भुत हेही रस असतात, असे म्हटले आहे. संस्कृतातील अद्भुताची कल्पना पुष्कळच शिथिल अशी आहे. अनपेक्षितरीत्या सुखी शेवट झाला तरीही संस्कृत काव्यशास्त्रानुसार विस्मय आला की तिथे अद्भुत रस येऊ शकतो. याबरोबरच नायक अगर नायिकेचे विरहवर्णन म्हटले की करुण रसाला त्यात अवकाश मिळतोच. यानंतरच्या काळात विश्वनाथाने भाणात कैशिकी वृत्ती असू शकते असे म्हटलेले आहे.
 यावरून आपण जर असा अंदाज करू लागलो की, भाणाची रूपे त्या त्या कालखंडात क्रमाने बदलत होती, तर ते अनुमान चुकीचे ठरणार आहे. भाणाचे स्वरूप तेच होते. विट हेच मुख्य पात्र होते. त्याचा व्यवसायही तोच होता. स्थळही तेच होते. पण वेगवेगळ्या विचारवंतांमध्ये विचार करण्याच्या पद्धतीत बदल होता. विट हे पुरुषशपात्र समोर आहे, म्हणून कैशिकी नाही ही विचार करण्याची एक पद्धत. कथानकाच्या वर्णनात स्त्री-शृंगार, गीत-नृत्य, सर्वांचेच वर्णन असते; म्हणून तिथे कैशिकी मानावी, ही विचार करण्याची दुसरी पद्धत. प्रत्यक्ष रंगभूमीवर एकच पात्र असल्यामुळे ते कुणाशी लढू शकत नाही म्हणून भाणात वीररस नसतो, ही विचारांची एक पद्धत, तर विटाच्या बोलण्यात त्याने केलेल्या मारामारीचे वर्णन असते, म्हणून तिथे वीररस मानावा अशी दुसरी पद्धत. एकाच वस्तूबाबत किंवा समोर असणाऱ्या एकाच वाङ्मयप्रकाराबाबत विचार करण्याच्या या भिन्न भिन्न पद्धती आहेत. डे यांच्यासारखे प्रसिद्ध समीक्षकसुद्धा उपलब्ध भाण आणि काव्यशास्त्रातील वर्णने यांचा ताळमेळ जमत नाही अशी शंका व्यक्त करतात. म्हणून हा तपशील करावा लागला. वेगवेगळ्या ग्रंथकारांच्या विवेचनांत जो मतभेद दिसतो, त्याचे कारण भाणाच्या स्वरूपात नाही. भाण तो व तसाच आहे; फक्त विचार करण्याची पद्धत निराळी आहे.
 भाणामध्ये एकच पात्र-विट-असते. पण उपरूपक-प्रकारात याहून निरनिराळे असे उपरूपक-प्रकार उल्लेखिले गेलेले आहेत. या उपरूपक-प्रकारात चोरटे प्रेम उघडकीला आणण्याची धमकी देणाऱ्या दासींचे उल्लेख आहेत. नायकाविषयी आपला अनुराग व्यक्त करणाऱ्या किंवा विप्रलंभ व्यक्त करणाऱ्या अशा नायिकांचे उल्लेख आहेत. या रूपकप्रकारांची वेगळीवेगळी नावेही आहेत. संस्कृत रंगभूमीच्या परंपरेत शेकडो वर्षे विविध प्रकारचे एकपात्री प्रयोग चालत आले. भाण हा त्यातील सर्वात प्रतिष्ठित असा एकपात्री प्रकार, इतकाच याचा अर्थ आहे. उरलेल्या एकपात्री उपरूपक-प्रकारांना भाणाची प्रतिष्ठा कधी मिळाली नाही; पण तेही लोकप्रिय होते.
 भाणाची चर्चा जरी प्राचीन काळापासून चालत असली, तरी फारसे प्राचीन भाण मात्र उपलब्ध नव्हते. उपलब्ध असणारे भाण तेराव्या शतकानंतरचे होते. असे हे उत्तरकालीन एकूण अकरा भाण उपलब्ध आहेत. या उत्तरकालीन भाणांमध्ये विट नेहमी स्वतःच्या जीवनाची कथा सांगत असतो. आपण गेल्या रात्री कोणते सुखविलास कुणाबरोबर भोगले याचे तो तपशिलाने वर्णन करीत असतो. म्हणजे या भाणांची कथा विटाची स्वतःची कथा असते. प्राचीन भाण दीर्घकालपर्यंत उपलब्ध नव्हते, आणि उत्तरकालीन भाण सांकेतिक व कंटाळवाणे होते. त्यामुळे आधुनिक विद्वानांचे लक्ष दीर्घकाळपर्यंत या वाङ्मयप्रकाराकडे जाऊ शकलेच नाही. इ. स. १९२२ साली एम. रामकृष्ण कवी यांनी गायकवाड प्राच्यमालेत 'चतुर्भाणी' या नावाने चार भाण प्रकाशित केले. हे भाण गुप्त-संस्कृतीच्या काळातील म्हणजे पाचव्या-सहाव्या शतकांतील आहेत, असा निर्णय संशोधकांनी दिलेला आहे. हे कै. कवींना उपलब्ध झालेले जे चार भाण, ते प्राचीन भाण म्हणून ओळखले जातात. संस्कृत वाङ्मयाच्या क्षेत्रात या भाणांची उपलब्धी हा एक सुखद असा प्रकाश मानला जातो.
 या चारही भाणांत विट हे एकच पात्र असले, तरी ते स्वतःची कहाणी न सांगता नायक-नायिकांची कहाणी सांगत असते. या भाणांचे स्थळ पाटलीपुत्र किंवा उज्जैनमधील गणिकांची वस्ती हे आहे. उपहास, उपरोध, अतिशय जिवंत अशी संस्कृत भाषा, विनोद आणि शृंगार हे या प्राचीन भाणांचे वैशिष्टय आहे. भाण समजून घ्यायचा असेल तर तो ज्या वातावरणात निर्माण होतो, त्याची काही प्रमाणात कल्पना असावी लागते.
 गणिकांची वस्ती हे भाणाचे स्थळ असते. भाणामध्ये जी नायिका असते ती गणिका असते, आणि नायक असतो तो व्यापारी अगर सरदारपुत्र असतो. त्याला ही गणिका भोगविलासासाठी हवी असते. ही घटनाच या वेशवस्तीत प्रेम, विरह अशा पद्धतीने सांगितलेली असते. वेश हा सर्व खोटेपणांचा व बदमापीचा अड्डा असतो. येथील प्रेम, कलह, एकनिष्ठा साऱ्याच बाबी खोट्या असतात. कारण सधन गिऱ्हाइकावर रुसणे गणिकांना परवडणारे नसते. रुसावयाचे ते मनधरणी व्हावी म्हणून, आणि तो योग जमला नाही तर आपणहोऊन नायकाकडे जायचे. त्याला अभिसार असे म्हणतात. प्रेमरंजन आणि भोग ही बाजू गणिकेने सांभाळायची. ती प्रेमात पडल्याचा, विरहाचा अभिनय करीत असते. नायकही विरहाच्या बाबी बोलत असतोच. या दर्शनी व्यवहारामागे असणारा धंदा, पैसा, व्यवहार ही बाजू गणिकांच्या माता पाहतात. त्याखेरीज विटांची त्यांना साथ असते. व्यवहारात विट गणिकांना गिऱ्हाइके आणि गिऱ्हाइकांना गणिका गाठून देऊन त्या उद्योगावर चरितार्थ चालवीत असतो, पण बोलताना मात्र तो आपण मित्रकार्य करतो आहोत असे बोलतो. सर्वांनाच व्यावहारिक सत्य माहीत असते. सर्वानीच एक अभिनय चालू ठेवलेला असतो. भाणामधून शब्दांतून दिसत असेल तर तो संकेतमान्य अभिनय आहे. शब्दांमागे जाऊन व्यवहारातील सत्य अनुमानाने जाणायचे असते.
 गणिका-वस्तीची एक स्वतंत्र परिभाषा आहे. या परिभाषेचा विट अवलंब करणार हे उघडच आहे. मराठीत ही परिभाषा फारशी समृद्ध नाही. या परिभाषेत अनेक शब्दांना स्वतंत्र ध्वन्यर्थ आहेत. विटांच्या बोलण्याला जरी भोगविलासाचा गंध असला, तरी त्यांचा रंगेलपणा शब्दापुरता आहे. त्याचा खवचटपणा, मिस्किलपणा आणि विनोद हा मात्र खरा आहे. विटामध्ये उपहासाची शक्तीही खूप मोठी आहे. भाणात काव्यही भरपूर आहे. काही ठिकाणी अतिशय चांगला कल्पनाविलास आहे. पण कल्पकता आणि काव्य भाणात मध्यवर्ती नसून शृंगार आणि उपहास यांचे स्थान या ठिकाणी मध्यवर्ती आहे.
 रतिकलहात रुसलेल्या प्रेयसीची समजूत घालण्याचे काम विट पार पाडतो. कारण प्रेमही त्यानेच जुळविलेले असते. नायक पैसेवाला व उदार असला म्हणजे विट त्याला दानशूर म्हणतो. हा दानशूर नायक तरुण आणि देखणा असला, गणिकेच्या इच्छेनुसार वागणारा असला, तर ही घटना सुखाची आहे. एरव्ही दुःख समजावयाचे. गणिका नेहमी मत्सरी प्रेयसी असते. नायक-प्रियकराकडे चार दिवस, पुन्हा घरी धंदा, पुन्हा प्रियकराचे घर असा गणिकेचा नित्य प्रवास चालू असतो.आणि विट सर्वांनाच लोचटपणे बोलतो. सर्वांनाच सोयिस्कर उपदेश करतो. तो नपुंसकेलासुद्धा बहुपुत्रा होण्याचा मिस्किलपणे आशीर्वाद देतो.
 जे गणिकांच्या वस्तीत येऊन सर्वस्व गमावतात, त्या मूर्ख लोकांविषयी विटाला सहानुभूती नसते, फक्त जिज्ञासा असते. जे संन्यास घेऊन चोरटा विलास करतात, त्यांच्याविषयी विटाला तिरस्कार असतो. कारण धंदा म्हणून ही परिस्थिती त्याला परवडणारी नसते. विट सर्वांना आश्वासने देतो. ती आश्वासनेही विटाच्या चतुर भाषणाइतकीच खोटी असतात. गणिकाही त्याला आपल्या गरजेनुसार मित्र मानतात. जिला त्याचा उपयोग असतो, ती त्याचे आभार मानते. जिला त्याचा उपयोग नसतो, ती तोंड फिरवते. विट प्रत्येक गणिकेला 'तू कुणाकडून आलीस' हा कायम प्रश्न विचारतो. गणिकांच्या वस्तीत हा प्रश्न अपेक्षित असतो. त्याचे उत्तर अभिमानाने दिले जाते. कारण त्या समाजात या व्यवहारात गुप्त असे काहीच नसते.
 आपल्या अलीकडील नाटकांत स्थळ बदलत नाही. संस्कृत नाटकात नांदीनंतर नाटक सुरू होते, भरतवाक्याने संपते, परिक्रमेने स्थळ बदलते. या बाबी लक्षात घेतल्यास यापुढील भाण आस्वादणे सोपे जाईल. हा सर्वात छोटा भाण वररुची याच्या नावाने उपलब्ध आहे. हा वररुची म्हणजे व्याकरणकार वररुची नव्हे.

वररुचिकृत

उ भ या भि सा रि का
(नांदी संपल्यावर सूत्रधार येतो.)

 कोण तू माझा, मी तरी तुझी कोण ? हे शठा, माझा पदर सोड. तोंडाकडे काय पाहतोस ? मी का तुझ्यासाठी व्यग्र आहे ? सुभग, हे खरे नाही. हे चंचला, दूर हो. तुझ्या प्रियेच्या दंतक्षतांनी अंकित असे तुझे ओठ मी ओळखते. त्या रुसलेलींचा रुसवा काढ, मी ती नव्हे. त्या मनबाधेची मनधरणी कर. ती तुझी. अशा प्रकारची वचने कामपीडित स्त्रिया तुम्हांला प्रणय-कलहात ऐकवोत.
हे तुमच्यासाठी आहे महाराजा! अरे मी बोलू इच्छीत असताना मध्येच हे काय ऐकू येत आहे ? (कान देऊन व कक्षेकडे पाहात ) पहा तर काय देखावा आहे !
 वसंताच्या आगमनामुळे हिरमसलेला लोधवक्ष 'मित्रकार्या 'मुळे ४ गडबडून गेलेल्या विटासारखा दिसत आहे.  (जातो. विट प्रवेश करतो.)
 विट : वा! काय थाट आहे ! मोहरलेले आंबे आणि कोकिळा, झोके, उंची आसवे, अशोक आणि चंद्र ! मदनाचेही मन विचलित करणारी ही वसंताची चिरपरिचित शोभा.
 कामीजन परस्परांच्या चुकांना क्षमा करीत आहेत. सम्राटाच्या आज्ञेप्रमाणे दूतीचे संदेश अनिवार्य झाले आहेत. मणी, मोती आणि प्रवाळांनी गुंफलेल्या मेखलांची, रेशमी तलम वस्त्रांची, हार व हरिचंदनाची चव वाढविणारा वसंत वैभवाच्या शिखरावर आहे.
 सर्वप्रिय, सर्वांना कामजनक असा हा ऋतू आणि ह्याचवेळी शेठ सागरदत्त यांचा पुत्र कुवेरदत्त व त्याची प्रिया नारायणदत्ता ह्यांचे बिनसले. कारण काय तर भगवान नारायण विष्णूच्या मंदिरात मदनारावन या संगीतकाचा रसानुकूल अभिनय चालू होता आणि कुवेरदत्ताने मदनसेनेची प्रशंसा केली.
 झाले. नारायणदत्ता जी रुसली ती “ तुझे प्रेमच तिच्यावर आहे” असा बोल लावून, पायधरणी, समजावणीचा अव्हेर करून आपल्या घरी निघून गेली.
 कुबरेदत्ताने आपला सेवक सहकारक माझ्याकडे पाठवून विनविले की, " महाराज वैशिकाचल, आपण ह्या नगरीचे अचल वसंत आहा. माझी दररात्र हजार रात्रींसारखी दीर्घ व कंटाळवाणी झाली आहे. माझ्यावर दया करा आणि आमची जोडी पुन्हा जुळवा.” आता कुबेरदत्त म्हणजे माझा मित्र आणि मी म्हणजे मदनाचे दुःख किती दुःसह आहे ह्याचा अनुभवी जाणता. करणार काय ? सायंकाळ असूनही घराबाहेर पडलो.
 घरवाली मोठी शंकेखोर. आता माझे वय झाले इतके तर तिला कळावे, पण तिच्या माथ्यात तिच्या तरुणपणीच्या आठवणीच तेवढ्या रुतलेल्या आहेत. त्या उगाळून मला अडवू लागली. पण नारायणदत्तेचा राग दूर करण्याची माझी प्रतिज्ञा. त्यामुळे बाहेर पडलोच. आणि प्रतिज्ञेची तरी गरज काय ?
 आम्रमंजिरीचा मादक गंध आणि सुस्वर कोकिलकूजन रुष्ट सुंदरीचा रुसवा घालवीलच. आणि दानी १० सुंदर, अनुकूल व यौवनाच्या विभ्रमांनी युक्त असणाऱ्या प्रियकराकडून समजूत पटण्यास उशीरच काय ? (परिक्रमा) अहो, ह्या पाटलीपुत्राची शोभा किती अपूर्व ! स्वच्छ झाडलेले, सुगंधी जलसिंचित, फुलांनी सजलेले हे रस्ते. ही जणू घरासमोरची दुसरी घरेच. तऱ्हेतऱ्हेच्या द्रव्यांनी आणि गिऱ्हाइकांनी गजबजलेली ही दुकाने. रावणाच्या दहा तोंडांनी आपापसांत बोलावे तसे वेदाध्ययन, संगीत आणि धनुष्यांचे टंकार ह्यांनी गुणगुणणारे हे भव्य प्रासाद. मेघांच्या गवाक्षांतून कैलासातील अप्सरांनी डोकावून पाहावे, त्याप्रमाणे ह्या प्रासादातन कुतूहलाने पाहणाऱ्या विजेप्रमाणे क्षणभर दिसणाऱ्या प्रमदा.
 भव्य गज, देखणे अश्व, आणि सुंदर रथ ह्यांवर आरूढ होऊन इकडून तिकडे फिरणारे उमराव व शेठ.
 अप्सरांच्या चास्तेची टवाळी करणाऱ्या, हसत जाणाऱ्या-येणाऱ्या, तरुणांची नजर चोरणाऱ्या या नखरेल दासी. पाहणाऱ्या सर्वांचे नेत्रभ्रमर दंग होऊन ज्या कमलांच मधुपान करीत आहेत अशा फुलवा ११ केवळ रस्त्यावर दया म्हणून मंथर पाउले टाकीत विहरत आहेत. फार काय-
 निर्भय, प्रसन्न आणि नित्य उत्सवप्रिय असे गुणविख्यात नागरिक मूल्यवान रत्ने, भूषणे यांनी सजून, गंध व माला धारण करून क्रीडामग्न झाले आहेत. म्हणून पाटलीपुत्र हाच स्वर्ग झाला आहे.
 (परिक्रमा) १२ अरे, ही पाहा चरणदासीची पुत्री अनंगदत्ता. रतीचा थकवा आणि आळस कायेत भिनलेली, सर्वनेत्रसंजीवनी, मोजून मापून पावले टाकीत टुमकत येत आहे. हिच्या प्रियकराने मोठ्या निष्टुरपणे आनंद चाखलेला दिसतो.
 नीज-भरलेले वावरे डोळे, क्षतयुक्त ओठ, रतीत विस्कटलेली मेखला, हिचे दर्शनसुद्धा कार्यसिद्धीइतके तृप्त करणारे आहे.
 अरे, ही तर मला टाळून चाटली. मग हटकलेच पाहिजे. पण नाही. परतली.
 प्रणाम विसरलीस पोरी ? काय म्हणतेस, ओळख पटण्यास उशीर झाला; प्रणामाचा स्वीकार करावा ? हरकत नाही. माझा आशीर्वाद घे. “भद्रे, तुला रतिपरायण, रतिचतुर, दानी, आणि स्वतंत्र १३ प्रियकर मिळो." बरे, एक सांग.
 तुझ्यासारख्या वेशलक्ष्मीसह १४ ज्याने एक रात्र काढली, त्याचे जीवन सफल झाले. धन्य तो भाग्यशाली ! मदन तर केवळ त्याचा चाकर झाला.
 काय म्हणतेस, महामात्रपुत्र नागदत्ताच्या घरून येत आहेस ? भद्रे, त्याचे वैभव तर आता आख्यायिका झाले. उघडच तू काकूच्या १५ मनाविरुद्ध वागलीस. मान खाली घालून मुरकतेस काय ? हसतेस काय ?
 आईच्या लोभीपणाचा अव्हेर करून वेशाचे नियम तोडून तू फक्त रतिसुखाचा विचार करावास, हे बरे नाही. आणि सरळ याराच्या घरी जाऊन रंगेल कामोत्सवात हरखून जावे हे तर फारच वाईट.
 अग, लाजू नकोस. आणा काय घेतेस ? गणिकांच्या विपरीत असे वागून तू सर्व झुल्यांना १६ पायतळी घालतेस. आता तू जा. काकूची समजूत मी काढीन. काय, पुन्हा प्रणाम करतेस ? पुन्हा आशीर्वाद घे.
 " जे तुझ्या आश्रयाने सद्गुण झाले, त्या गुणांचे कौतुक कशाला ? सर्वांचे डोळे दिपवणारे यौवन मात्र स्थिर असो." चला, ती गेली. आपणही जावे. (परिक्रमा)
 मागेमागे येणाऱ्या सेविकांची पर्वा न करता वाघापासून दूर पळणाऱ्या हरिणीप्रमाणे चंचल झालेली ही कोण ? अरे, ही तर विष्णुदत्तेची मुलगी माधवसेना. मातेच्या द्रव्यलोभामुळे नावडत्याशी पहूड स्वीकारावा लागतो, ते दुःख दिसतेच आहे.
 मुख म्लान आहे पण क्लान्त नाही. वेणीही विस्कटलेली नाही. केसात माळलेली फुले गळलेली नाहीत. स्तनचंदन तसेच आहे, ओठांवर चावे नाहीत. मखला सुरत्रित आहे. असंगाचा संग झाल्यामुळे गेलेली त्रस्त रात्र दिसतेच आहे. ही मला न पाहताच जाणार काय ?
पण नाही. परतली. काय म्हणतेस ? तू मला पाहिले नाहीस ? तुझा दोष नाही बाळ. माणूस दुःखाने घाबरला की बुद्धीही बावचळून जाते. माझा आशीर्वाद घे.
 " तुझे इष्टजन १७ धनवान असोत. नावडते दरिद्री असोत. मातेच्या लोभीपणामुळे नावडत्याचा सहवास तुला भाग न पडो."
कुठून येत आहेस पोरी ? काय म्हणतेस, सार्थवाह धनदत्तपुत्र समुद्रदत्ताकडून ? वा!! आनंद आहे. तो तर आजचा कुवेर आहे. दीर्घ उसासे काय सोडतेस, ओठ काय चावतेस, तोंड काय वेळावतेस ? तर मग माझा अंदाजच खरा ठरला.
 कसा म्हणतेस ? पोरी, सारी रात्र तू दुःखाच्या शेजेवर, नाटकी रतीत संपविलीस ? रात्रभर उजाडण्याची वाट पाहिलीस ? भावहीन क्रीडेची रात्र. बोलण्याची मिठास नाही. ओठांना उत्सुक आमंत्रण नाही. विनोद १८ नाही. उसासे व जांभयांखेरीज खरे काहीच नाही. मिठीही कातर निसटती आणि अनुराग तर पुसटही नाही. हे सारे उघडच दिसत नाही का?
 वाईट नको वाटू देऊस. रूपाचे काय घेऊन बसलीस ? आपण दिसलेल्या रूपाचे कौतुक करावे हेच शास्त्र आहे. काय म्हणतेस ? माझेही विचार काकूसारखेच आहेत ? अग, तसे नाही. हे सांगण्याचे कारण आहे. आता तू जा. मी तुझ्या घरी येईन, तेव्हा शास्त्र नीट समजावून देईन. अरे, प्रणाम न करता गेली. उद्विग्न. विचारी अजून कच्ची आहे. चला, आपणही चलू. (परिक्रमा)
 अरे, ही संन्यासिनी विलासकौण्डिनी. नखऱ्याने ठुमकत येत आहे. हिचे अपरूप लावण्य म्हणजे डोळ्यांना अमृतच. पागल भुंगे मोहरलेले १९ आंवे सोडून हिच्या सुवासिक पदराभोवती गुंजारव करीत आहेत. थोडे हिच्याशी बोलून कान व डोळ्यांचे पारणे फेडू.
 ' देवी भगवती, मी वैशिकाचल आपणास प्रणाम करतो. काय म्हणता ? मला वैशिकाचल नको, वैशेषिकाचलाची २° गरज आहे ? तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे.
 विशाल व चंचल डोळे भिरभिरत आहेत. रतिश्रमाने गाल ग्लान व तांबूस दिसत आहेत. चालीत आळस, ओठावर मुरका. हे सुभगे, तुझ्या प्रियकराने रति हाच नित्यपदार्थ२१ असल्याचा धडा विवरणपूर्वक शिकविलेला दिसतो.
 काय म्हणता ? " पापी कामदासा, तुला जग तुझ्यासारखे दिसत आहे ?" छे! छे! सुभगे, धन्य आहेत ते दास, ज्यांना तुझ्या चरणसेवेचे भाग्य मिळाले. वरतनू, ते भाग्य आमच्यासारख्या पाप्यांना कसे मिळणार ?
 काय म्हणता ? घट २२ पदार्थाचे ज्ञान नसणाऱ्याशी संभाषण करण्यास गुरुजींची मनाई आहे १ भगवती, आज्ञा तर योग्य आहे. पण जागा चुकली. कारण हे विशालाक्षी, मी षट पदार्थाचा जाणता आहे. तुझे शरीर हेच द्रव्य, तुझे रूपादी हेच गुण. तरणाशी चालू असणारी तुझी गती हेच कर्म. लोक तुझ्याशी समवाय चाहतात. इतरांच्यापेक्षा तुझ्या चवीत भेद आहे. आवडेल त्याचा भोग, नको असेल त्याच्यापासून मोक्ष. दोन्हीत तू चतुर आहेस.
 अरे ! हिने फक्त तुच्छ हसूनच प्रत्युत्तर दिले. काय म्हणता ? सांख्यमतानुसार पण २३ निर्गण, अलेप आणि क्षेत्रज्ञ असतो? वाहवा ! आपण तर माझे तोंडच बंद केले. बोलता बोलता आपण पुन्हा आतुर झाल्यासारख्या दिसता. आपण गमन २४ करावे. तरुणांच्या रतीत विघ्न नको. मीही चलतो. (परिक्रमा)
 अरे, ही चरणदासीची आई रामसेना, वयस्क असूनही अजून नवतरुणीसारखी लचकत येत आहे. तारुण्यात सर्व भोग भोगून, आपल्या प्रियकराचे द्रव्य हरण करून, तरुणपणी तरुणांच्या आपापसातील मारटोकीचे कारण बन्न कृतकृत्य झालेली ही, हिला पुन्हा विस्मय कशाचा वाटला ?
 हाय ! तरुण कामीजनांचे मरणच अशी ही घाटीपार २५ प्रौढा, आता मुलीच्या प्रियकरांचे द्रव्य दोहन करण्यासाठी जात आहे. या वठलेल्या नवऱ्याची थोडी चाचपणी करू या.
 कामीजनांच्या महावज्राला नमन असो. हे अल्लडे ! रामसेने! आपल्या पोरीला गलाल २६ भरून झाल्यानंतर आता कुणाचे घरटे उजाड करण्यासाठी जात आहेस ?
 काय म्हणतेस, माझेच चरित्र मला छळीत आहे १ सोड ही थापेबाजी. नेम कुणावर धरला तेवढे सांग. काय म्हणतेस ? तुझी पोरगी चरणदासी जी धनिकांच्या घरी गेली ती तेथेच राहिली आहे ? तिला संगीतकाच्या निमित्ताने परत आणावयाचे आहे ? अग, तुला खरे सांगू? ही पोरीची गफलत आहे. कामुकांची सर्वप्रकारे पिळवणूक करणाऱ्या व सार चोखून चोयटी कुशलपणे फेकणाऱ्या चतुर आईची ती लेक. आणि ती शास्त्रात इतकी अधू असावी ना ?
 एकदा जो गमनभोग्य होता, त्याचा साठा उपसून घ्यावा व सुट्टी २७ सांगावी, हे सोडून रुतून बसली; त्याच्या रितेपणात फसली. अशा पोरीला शास्त्र तरी काय शिकवावे ?
 काय म्हणतेस? मी चरणदासीला उपदेश करू ? ठीक आहे. पण थोडा मित्रकार्यात गुंतलो आहे. ते आटोपून येतो. आता तू जा. (परिक्रमा)
 खरोखर वेश्या कधी भरवशाच्या नसतात. ह्या निर्दय आणि लोभी वारांगना, आत्मा जसा शरीर सोडतो, त्याप्रमाणे सार संपल्यावर जुना यार सोडतात. आणि काकु, या संकटावर औषध नाही; गणिकारूपी शस्त्र वापरण्यात कुशल असणाऱ्या ह्या घाटीपार मातांचा ईश्वर सत्यानाश करो.
 अरे, आले. न टळणारे संकट अकल्पित आले. ही राजमार्गातील २८ कलहिनी नावाची सुकुमारिका, नपुंसका इकडे कोठे येत आहे ? चला, तोंडावर उपरणे घेऊन झटका. पण हाय ! ही माझ्याकडे येत आहे. काय होणार माझे ? बापा यमराजा, तुला डुलकी आली काय ?
 काय म्हणतेस, सुकुमारिके ? प्रणाम करतेस ? पोरी अविधवा व बहुपुत्रा हो.
 भुवयांचा नाच, डोळ्यांचे फडफडणे, ओठांचे मुरडणे, हातवारे आणि लचकणे. अरे ! स्त्रिया तर तुझ्या फार मागे पडल्या. अग, ही तुझी विखुरलेली मेखला दोन्ही मांड्यांवर सारखी झुलते आहे. सांग अशी अर्धपोटी तू कोणत्या ताटावरून ठलास ?
 काय म्हणतेस ? राजशालक रामसेनाच्या घरून येते आहेस ? भाग्यवान आहेस वेटा. पण सुभगे, चक्रवाकांची जोडी कशी फुटली ? काय म्हणतेस ? गणिकादासी राजलतिका हिच्या नटव्या हसण्यात आणि ललित कटाक्षांत रामसेन सापडला, त्याचे शरीर शहारले व त्याने हसून त्या लोचटीला अनुमती दाखविली ? मूर्ख वेडा  ! मग तुझा राग अगदी वाजवी आहे. काय म्हणतेस ? पाया पडला तरी तू त्याला क्षमा केली नाहीस ? त्याने सक्तीने उचलून तुला पलंगावर ठेवले तरी तू रुसवा सोडला नाहीस १ आणि मग तापलेला तो तुला तशीच होरपळत ठेवून जो त्या दासीकडे गेला, तो बरेच दिवस झाले तरी अजून परतला नाही ? अरेरे ! वाईट झाले.
 आलिंगनात जेथे स्तनांची बाधा नाही, प्रेमाला अडथळा आणणारा ऋतुकाल नाही, यौवनघात करणारा गर्भ नाही, अशी तुझ्यासारखी गुणवती रामसेनाने सोडली ? हर हर ! हे तर रतीच्या उत्सवातून निवृत्त होण्यासारखे झाले. असो. मानिनी, तू आता घरी जा. मी मित्रकार्य आटोपून येतो व तुझे मीलन घडवितो. बहिणीच्या वैभवाने माजलेल्या रामसेनाला मी पुन्हा तुझ्या पायांवर डोके ठेवण्यास आणीन. (परिक्रमा)
 चला, मोठ्या कष्टाने ह्या नमुनेदार स्त्रीच्या हातून सुटका तर झाली. अरे, हा कोण ? तू सार्थवाह पथिकाचा पुत्र धनमित्रच ना ? फार दिवसांनी भेटलास बाबा. सेवकयाचकांचा दरिद्रतारूपी अंधार दूर करणारा, युवतीचे हृदय फुलविणारा, पाटलीपुत्राच्या आकाशातील तू चंद्र. कोणत्या संकटात सापडलास ? तुला देशान्तरीच्या चोरांनी लुटले तर नाही ? राजाचा कोप तर तुझ्यावर झाला नाही ? एका डोळेझापीत कुबेराचे सर्वस्व हरण करणारा तू , जुव्यात तर फसला नाहीस ? अरे काय हे ? वाढलेले केस व नखे, मळलेले शरीर आणि कपडे, उतरलेला चेहरा, कोण्या दिव्य ऋषीमुनीच्या शापात दग्ध झाल्यासारखा का दिसतोस ? काय म्हणतोस, रामसेनेची पुत्री रतिसेना हिच्याविषयी तुझ्या मनात गाढ प्रेम निर्माण झाले आणि तिचेही तसेच गाढ प्रेम तुझ्या ठिकाणी आहे ? बरे, मग अडचण कोणती ? आपल्या लोभी आईचा लोभ अव्हेरूनही रतिसेना आपणास चिटकून राहील ही तुझी खात्री होती, म्हणून मित्र निवारण करीत असताही तुझे सर्व तू रतिसेनेकडे नेऊन ठेवलेस, आणि तिने स्नानाचे निमित्त करून साडी नेसवून तुला अशोकवनातील पुष्करणीवर नेऊन सोडले ?
 बरे मग ? तेथील रक्षकांनी चोरवाटेने तुझी सुटका केली ? ज्या नगरीत आपण वैभवाने मिरवलो, तिथे दीर्घ दारिद्रय कसे घालवावे या चिंतेत आहेस, व म्हणूनच का जातोस ? फार वाईट बाबा. अति वाईट. अतिलोभ हा वेश्यांचा स्वभाव असतो.सर्पविष उतरविणे महाऔषधींना शक्य असते. जंगली हत्तींच्या विळख्यातून, फार काय मगरीच्या दाढेतूनही कधीकधी माणूस सुटतो, पण ह्या वेश्यारूपी वडवानलातून जिवंत सुटणेच कठीण. मित्रा, मला कडकडून भेट. तू जिवंत सुटलास हेच फार झाले.
 बरे! मला हे सांग, तुझ्या दुःखाचे मूळ कोण ? आई की लेक ? काय म्हणतोस, तो थेरडीच कुटिल आहे, आणि रतिसेनेचे तुझ्यावर प्रेम आहे ? ठीक, ठीक. रतिसेनेची व तुझी भेट करून देऊ ? तिच्याशिवाय जगणे कठीण ? ठीक, ठीक. अरे, रडू नकोस. पूस ते डोळे. आता तू जा. मी नंतर तुझा प्रश्न सोडवतो.
 काय लबाड आणि धूर्त पहा ह्या वेश्या ! दुष्ट राजे ज्याप्रमाणे सारे काही मंत्र्याच्या अंगावर ढकलून मोकळे होतात, तशा या आईवर दोष लादून मोकळ्या. आणि हा लुच्च्यांचा गुरू. तपस्वी २९ झाला तरी " प्रेम आहे " म्हणून रडतो.
(परिक्रमा ) वसंतवनातील कोकिळेप्रमाणे कोण मला बोलवीत आहे ? अरे, ही प्रियंगुसेना ! थांब, थांब आलोच. काय, प्रणाम करतेस ? पोरी, माझा आशीर्वाद घे.
 " आपल्या प्रियकराला मृदु लत्ताप्रहाराने रतिशय्येवर दूर ढकलणारी तू. त्याच्या अनावर आसक्तीत तुला घडी पडो. आपल्या पुष्ट जवनाने सुखी हो."
 पोरी, तुझ्या या थकलेल्या मांड्यांना सुगंधी तेलाची मालिश कुणी केली ? हे भद्रमुखी, अनलंकृत राजहत्तिणीसारखी शोभिवंत तू. हे तुझे स्वाभाविक रूप ज्याने पाहिले नाही, तो ठकला असेच म्हटले पाहिजे.
 मोत्यांनी भूषविलेली, नखक्षतांनी मढविलेली, अंगरागाची उटी चर्चिलेली, बावऱ्या डोळ्यांची तु. तलम वस्त्राखाली यौवनाच्या उवेने पुष्ट झालेले स्तन धारण करणारी तू. तुला पाहून तर मदनाचे मन बिथरून जाईल.
 काय म्हणतेस ? माझे बोलणे कानाला गोड वाटले ? अरे, ही खुषामत सोड आणि न लाजता मला हाक का दिलीस हे तर सांग.
 काय म्हणतेस ? भगवान अप्रतिहशासन पाटलीपुत्र सम्राटांच्या प्रासादात, पुरंदरविजय संगीतकाचा रसाभिनयासह प्रयोग होणार आहे व त्यात भूमिका करण्यासाठी देवदत्तेसह तुलाही निमंत्रण व इसार 3 • मिळाला आहे ? आणि तुझ्या या प्रगतीचे मी कारण आहे ? असे म्हणू नकोस. शरीराच्या रोमारोमातून जिथे चांदणे ओसंडते आहे, त्या पौर्णिमेच्या शोधासाठी दिवा लागत नसतो.
 बलवंतांना इतर कुणाच्या आधाराची गरजच काय ? तुझ्या प्रगतीचे कारण तूच आहेस. म्हणून तर लुब्ध रामसेन माझ्या पुढे-पुढे करतो.
 भुवया वेळावीत प्रसन्न प्रियंगुसेना लाजलेले गाल लपवण्यासाठी तोंड फिरवून हसते आहे. चला, रामसेनेला सेवेचे फळ मिळाले. काय मूर्ख आहे पहा देवदत्ता ! हिच्याशी स्पर्धा करू पाहते. रूपयौवनाची संपत्ती, चार ३१ प्रकारच्या अभिनयाच्या अभिनयाची सिद्धी. बत्तीस हस्तप्रकार, अठावीस प्रकारची दृष्टी, सहा स्थाने, तीन गीते, आठ रस, आणि नृत्तांग व लय, सारेच हिच्या आश्रयाने शोभिवंत झाले आहे. ह्या वेशात तर ही देव, असुर आणि ऋषी कुणाचेही मन चोरील. हे सुभगे, तुला नृत्याची गरजच काय ? कोणत्याही सामन्यात जय मिळविण्यासाठी तुझे केवळ लीलालास्य पुरे आहे.
 (परिक्रमा) अरे, ही कोण ? नारायणदत्तेची दासी कनकलता. आपल्या पुष्ट स्तनांना गंधचूर्ग लावून, बुचड्यावर फुले माळून, हसत, टुमकत इकडे येत आहे. काय म्हणतेस ? प्रणाम करतेस ? बाळे, सजणाची जिवलग हो. तुझ्या पदन्यासाची कृपा रस्त्यावर काय म्हणून ?
 काय म्हणतेस ? असाच लोभ असावा ? सोड या फालतू अवान्तर बावी. मला सांग, चक्रवाकाची जोडी फुटली कशी?
 काय म्हणतेस ? विरहतप्त नारायणदत्ता स्नान, भोजन, अलंकाराचा त्याग करून अशोकवनात अशोकवृक्षाखाली एका शिलातलावर बसली होती ? नवचंद्रमंडळ, भ्रमर गुंजारव आणि वसंतपुष्पांच्या मादक गंधाने कठोर झालेला दक्षिण वायू ह्यांनी संतप्त अशा त्या आज्जुकेला सखीजन सान्त्वना देत होत्या ?
 तेव्हा समोरून कुणी तरी व्यक्ती कामपीडित काकली ३२ स्वरात वक्तृ आणि अपवक्तृ छंदात गीत गात बाजूने गेली. ते गीत असे- 'जो प्रियेसह वसंतात क्रीडा करीत नाही त्याचे रूपयौवन व वैभव फोल आहे.'
 'स्वच्छ चंद्र पाहून आणि कोकिळकूजन ऐकूनही जी प्रियकराची मनधरणी करीत नाही तिचे जीवन व्यर्थ आहे.'
 त्या गीताने मन शिथिल झालेल्या तुझ्या स्वामिनीने प्रियकराला संदेश पाठविला आणि त्याच्या आगमनाची वाट न पाहता स्वतःच भेटीसाठी निघाली, आणि वसंताच्या फुसलावणीने अधीर होऊन स्वामीही तिकडून निघाले तो त्यांची भेट वीणाचार्य विश्वावसुदत्त ह्यांच्या दारासमोर झाली ?
 त्या बिनसलेल्या जोडप्याला वीणाचार्यांनी घरात बोलावले १ सकाळी आज्जुका 33 म्हणाली, "सखे जा, महाराज वैशिकाचलाला बोलावून आण." तेव्हा चलावे महाराज.
 छान ! छान ! कनकलते, तु मोठी शुभवार्ता दिलीस. तुझे यौवन स्थिर असो. प्रियकराची प्रियतमा हो. तुला सतत इच्छित भोग प्राप्त होवोत. तू पुढे हो. (परिक्रमा) चला घरात घुसू.
 अरे, घाबरू नका. जोडी पक्की व स्थिर असो. वसंतऋतूने तुमचा पुन्हा संयोग केला. तसा हा ऋतू सर्वाचा संयोग करो. अहो, या वसंताने मलाही ठकविले. आता मला काय काम उरले १ माझ्या साह्याविनाच तुम्ही एकत्र आलात.
 आणि ह्यात वसंताचा तरी काय दोष ? सुंदर उद्याने, चांदण्या रात्री, सुस्वर वीणा, दूती, गोष्टी, कुतूहलाने भरलेले संवाद हे सारे असले तरी बिनसलेल्यांचे जुळतेच असे नाही. परस्परांचे खरेखुरे गुण, त्यांची ओळख पटली म्हणजे निर्माण होणारे उत्कट प्रेम हेच मीलनाचे खरे कारण.
  काय म्हणतेस ? नारायणदत्ते, तुमची प्रीतीच मी प्रयत्नपूर्वक निर्माण केलेली आहे ? म्हणून मीच या संयोगाला कारण आहे ?
 असो. रतीच्या तान्हेल्या जोडप्याशी फार वेळ गप्पा मारणे बरे नाही. सारे पाटलीपुत्र यावेळी ज्या सौख्याचा अनुभव घेत आहे, त्याचे वर्णन कामीजनांचेही केवळ शब्द कसे करू शकतील ?
 फुललेल्या कमळांनी फुललेला, मधुर मादक बोल बोलणारा आणि पाझरत्या चारुतेने भरलेला प्रियेचा चेहरा पाहून जसा तू उल्हसित आहेस त्याचप्रमाणे-
 धान्यांनी फुललेली, मेरू आणि विंध्य हे पुष्ट स्तन धारण करणारी, समुद्र हीच मेखला मिरवणारी गुणवती पृथ्वी, ह्या सहवासात नरेन्द्रही सुखी होवो.
 (विट जातो.)
 टीपा:
 १. हा वररुची गुप्तकालीन आहे. प्रियकर-प्रेयसी दोघेही एकमेकांस भेटण्यास निघाले, हा भाणाच्या नावाचा अर्थ.
 २. प्रेयसीने ईर्ष्यावश कलह करावा हे भाग्याचे लक्षण असा संकेत आहे. भाणात नेहमी गणिका ही प्रेयसी असते.
 ३. लोध्रवृक्ष हेमंतात बहरतो.
 ४. हे मित्रकार्य म्हणजे गणिका गाठून देणे.
 ५. गणिका दूतीकडून निरोप पाठवून मीलनाचे संकेत ठरवीत.
 ६. गणिकांची नावे नेहमी दत्ता, सेना अशी असतात. आपण व्यापाऱ्यांच्या, सरदारांच्या कन्या आहो असा भाव नावामुळे सुचविला जातो.
 ७. गणिकांच्या वस्तीत अचलपणे राहिलेला, तेथे स्थिर झालेला असा नावाचा अर्थ आहे.
 ८. विट हे विलासी जीवनात मुरलेले असतात.
 ९. विटाच्या बाहेरख्यालीपणाच्या.
 १०. गणिकांना खूप पैसे देणारा.
 ११. वयात आलेल्या पण अजून धंद्याला न लागलेल्यांना दारिका म्हणतात.लोकभाषेत त्यांना फुलवा व व्यवसाय सुरू झाला की झुलवा म्हणतात.
 १२. संस्कृत नाटकाला स्थलैक्याचे बंधन नसते. परिक्रमा म्हणजे स्थळ बदलले हा नाट्य-संकेत.
 १३. इतर गणिकांशी संबंध नसलेला. पत्नी गणतीत नसते; कारण ती प्रासादात अडकलेली.
 १४. गणिकावस्तीचे वैभव.
 १५. व्यवहार ठरविणाऱ्या कुट्टिनी. ह्या गणिकेची आई, मावशी अगर पालक असत. आपण प्रमाच्या भुकेल्या पण आई मोठी लोभी. तिची आज्ञा तर पाळणे भाग असा अभिनय गणिका करीत. मराठी लोकभाषेत काकू.
 १६. झुलवा-व्यवसायातील गणिका.
 १७. आवडते हेच धनवान असले की व्यवहाराचा रस्ता मोकळा झाला.
 १८. म्हणजे मनोरंजन नाही. हसणे म्हणजे विनोद नव्हे.
 १९. गणिका हा ध्वनी.
 २०. मला गणिकावस्तीत स्थिर असणारा नको; कणादमुनीच्या वैशेषिक शास्त्राचा ज्ञाता हवा. कारण मी कणादानुयायी आहे असा अर्थ.
 २१. कणाद नित्यपदार्थवादी तत्त्वज्ञ आहे.
 २२. द्रव्य, गुण, कर्म, समवाय, भेद, विशेष हे पदार्थ कणाद मानतात. ते मोक्षवादी व योगशास्त्राचे उपासक आहेत.
 २३. बाईला रजोगुण (विटाळ ) असतो. तिला लेप होतो. पुरुषाला काय ? फक्त शेत जाणणारा तो असतो असा फटकारा.
 २४. गमन शब्द द्वयर्थी आहे.
 २५. विटाळ गेलेली. लोकभाषेतील शब्द.
 २६. गुलाल भरणे-धंद्याला लावणे. लोकभाषा.
 २७. त्याग करणे-लोकभाषेतील शब्द.
 २८. पत्नी ही गल्लीबोळ, गणिका हा राजमार्ग. त्या रस्त्यावर जाणाऱ्यांशी भांडणारी.
 २९. लुबाडला गेल्यामुळे भिकारी झाला.
 ३०. मूळ शब्द 'पणित' असा आहे. अगाऊ रक्कम हा अर्थ.
 ३१. ह्या साऱ्यांचा तपशील भरतनाट्यशास्त्रात आहे.
 ३२. निषाद आणि षड्ज ह्यांमधील स्वर.
 ३३. चाकर गणिकेला आज्जुका म्हणत.

प्रतिष्ठान, ऑगस्ट १९७१

धरती, दिवाळी अंक १९७१