पायवाट/नारायण सुर्वे यांची कविता
गेल्या पाचसहा वर्षांत ज्या कवींनी आपल्या काव्यगत सामर्थ्यामुळे मराठी कवितेच्या आस्थेवाईक वाचकांचे मन स्वतःकडे ओढून घेतले आहे, त्यांत नारायण सुर्वे यांचे नाव अग्रभागी घेतले पाहिजे. कवींच्याखेरीज उरलेला रसिकवर्ग कवितेच्या बाबतीत दिवसेंदिवस अधिक उदासीन होत असताना, सुर्व्याच्या कवितासंग्रहावर अनुकूल-प्रतिकूल टीका होऊ शकतात, त्या कराव्याशा वाटतात, अनेकांना परीक्षणे लिहावीशी वाटतात या गोष्टीला एक स्वतंत्र महत्त्व आहे. सुर्वे यांची कविता कुणाला आवडेल, कदाचित कुणाला आवडणारही नाही. पण ती कविता आपल्याला समजत नाही असे कुणी म्हणणार नाही, आणि या कवितेचे अंगभूत सामर्थ्य खासच इतके निश्चित आहे की तिच्याकडे उपेक्षेच्या नजरेने पाहणे कवींना, समीक्षकांना शक्य होत नाही.
विनोबांनी एके ठिकाणी एक अत्यंत मार्मिक प्रश्न विचारला आहे. त्यांचे म्हणणे असे की समजा, दोरीवर सापाचा भास झाला, आणि असा भास जीवनात प्रत्यही होतच असतो- की दोरी सापच वाटू लागते. मग काही भित्रे, साप-साप म्हणून पळू लागतात आणि काही शूर, धैर्याने काठ्या व दगड घेऊन हा साप ठेचू लागतात. या दोन गटांपैकी कुणाचे कृत्य उचित समजावे? समर्थन कुणाचे करावे? जोपर्यंत दोरीवर सापाचा आभास होतो आहे हे माहीत नसेल, तोपर्यंत कोणतीतरी एक बाजू घेता येते. ज्या क्षणी हा भास उघडकीला येतो, त्या क्षणी दोन्हीही गट काही प्रमाणात हास्यास्पद होऊन जातात. आचार्य विनोबा भावे यांना कुणी वाङ्मयसमीक्षक म्हणून ओळखत नाहीत, याचे मला भान आहे. पण प्रश्न वाङ्मयसमीक्षचा नसून प्रश्न त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्दयाचा आहे. नारायण सुर्वे यांच्या कवितेबाबत हा मुद्दा सारखा तीव्रतेने आठवत राहतो. कारण सुर्वे कम्युनिस्ट आहेत. हा माणूस कम्युनिस्ट आहे, यावर दुमत होण्याचे कारण नाही. आणि आपले जरी दुमत झाले तरी त्याला अर्थ नाही. कारण स्वतः नारायण सुर्वेच मोठमोठ्याने घोषणा करून आपण कम्युनिस्ट असल्याची खात्री पटवून देतात. हा कवी कम्युनिस्ट असल्यामुळे काहीजणांना त्याच्या कवितेचे समर्थन करणे अत्यंत आवश्यक वाटते. असे समर्थन करीत असताना सुर्वे एक कम्युनिस्ट कवी आहेत हा मुद्दा डोळ्यांसमोर ठेवून सगळी चर्चा चालवणे स्वाभाविक आहे. लगेच दुसऱ्या बाजूने ज्याअर्थी सुर्वे कम्युनिस्ट आहेत, त्याअर्थी त्यांची कविता प्रचारकी, साचेबंद व सांकेतिक असणारच असे गृहीत धरले जाते आणि मग आरोप-प्रत्यारोप, उत्तरे-प्रत्युत्तरे सुरू होऊ लागतात.
एखादा माणूस कम्युनिस्ट असल्यामुळे चांगला कवी ठरत नाही, तसा तो वाईटही कवी ठरत नाही. कम्युनिस्ट असणे आणि नसणे ही गोष्टच कवितेच्या संदर्भात अप्रस्तुत आणि गैरलागू आहे. सुर्वे कम्युनिस्ट असतील. पण त्यांची कविता पक्षाला बांधलेली कविता आहे काय ? पक्षीय विचारसरणीची किंवा पक्षीय तत्त्वज्ञानाची बंधने या कवितेला पडलेली आहेत काय ?- हा प्रश्नच खरा महत्त्वाचा ठरतो. या प्रश्नाचे उत्तर देणे वाटते तितके सोपे नाही. कुण्याही कवीची प्रकृती आपण त्याची कविता पाहूनच ठरवीत असतो. अशा ठिकाणी कविता हा शब्दच सर्व घोटाळ्याचे कारण होऊन बसतो. असल्या प्रकारचा गोंधळ मराठी काव्यसमीक्षेत सुर्वे यांच्या निमित्ताने पहिल्यांदाच होत आहे असे नसून केशवसुतांच्या कवितेपासून या मुद्दयाबाबतचा गोंधळ चालू आहे. कवी कविता लिहिण्याचा प्रयत्न करतो. या कविता काव्यसंग्रहात समाविष्ट करण्याचा प्रयत्न करतो. हे जे संग्रहात समविष्ट झालेले रचनांचे साचे, त्या सर्वांचीच कविता म्हणून गणना करायची काय, हा प्रश्न मतभेदाचा असतो. कारण कवी म्हटला तरी तोही या वास्तविक जगातला माणूस असतो. वास्तविक जगातला माणूस म्हणूनच त्याच्याही स्वतःच्या काही आवडीनिवडी असतात, ग्रह-आग्रह असतात. इतरांची बंधने जुमानली नाहीत तरी या माणसाने स्वतःच्या गळ्यात निष्कारण काही बंधने अडकवून घेतलेली असतात. पु. शि. रेगे यांच्यासारखा कवी जर आपण घेतला तर खरोखर या कवीचा सामाजिक जाणिवेशी निगडित असणाऱ्या प्रश्नांशी काही संबंध आहे काय ? पण याही कवीला गांधीजींच्या हत्येवर एखादी कविता पाडावी वाटते, आणि ती संग्रहात समाविष्ट करावी वाटते. टिळक-जन्मशताब्दी आली की सर्व कवींना टिळकांच्यावर एकेक कविता लिहिण्याचा उत्साह येतो. या बाबी कवी हा वास्तविक जगातला एक माणूस असल्यामुळे घडत असतात. सर्वच कवींच्या कवितासंग्रहांत या पद्धतीच्या काही कविता असतात.
नारायण सुर्वे यांची कविता या नियमाला अपवाद नाही. भारतीय फौजांनी गोवा ताब्यात घेतला की त्यांना एक कविता लिहावीशी वाटते. कांगोच्या लुमुंबाचा खून झाला की त्यावर एक कविता लिहिणे आपले कर्तव्य आहे असे त्यांना वाटते. आणि मग ते 'लुमुंबास सलाम'सारखी कविता लिहितात. या बाबी म्हणजे वास्तविक जीवनात कवीच्या जीवनात जो एक माणूस उभा असतो त्याचे कवितेवर खरोखरी आक्रमण असते. ही आक्रमणे कवितेवर होऊ नयेत, असे अवश्य म्हणता येईल. पण काव्याचे मूल्यमापन करताना असल्या प्रकारची कविता सरळ बाजूला टाकून कवीच्या प्रकृतीचा विचार करावा लागतो, हे विसरून चालता येणार नाही.
संग्रहातील कवितेत एवढा एकच प्रकार नसतो. त्याखेरीज वाङ्मयीन अनुकरणाचे इतरही भाग असतात. केशवसुतांसारखा युगप्रवर्तक कवीसुद्धा उगीचच आपल्या आयुष्याच्या शेवटच्या भागात मोरोपंतांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करून पाहतो. आरंभीच्या काळात तर असे अनुकरण करण्याचा प्रयत्न न करणारा कवी विरळाच असतो. मान्यवर कवींच्या कविता डोळ्यांसमोर असतात. त्यांसारख्या कविता आपल्यालाही कराव्याशा वाटतात. सुर्व्याची 'मेघ बरसे'सारखी कविता या जातीच्या कवितेत समाविष्ट करावी लागेल. ह्या आणि अशा प्रकारच्या किती कविता एखाद्या कवीचे मूल्यमापन करताना बाजूला साराव्या लागतील याचा नेम नसतो.
मतभेदाचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. एखाद्या कवीने जे जे लिहिण्याचा प्रयत्न केला आहे, ते सारे गृहीत धरून त्या आधाराने त्याच्या कवितेची प्रकृती हुडकावी हे अधिक योग्य, की जे लिहिताना लेखकाचा कविप्रकृतीशी सहकंप मिळाल्यामुळे कवितेच्या पातळीवर आपला आविष्कार नेण्यात कवीला यश लाभले आहे, त्या आधारे त्या प्रकृतीचा शोध घ्यावा, याचे उत्तर देता येणे कठीण आहे. जर आपण याबाबत काव्याच्या पातळीवर जाणारा आविष्कार ही मर्यादा मान्य केली नाही, तर मग कुण्याही कवीच्या काव्यगत प्रकृतीचा शोध घेणेच कठीण होऊन जाईल. जे संग्रहात समाविष्ट झालेले आहे, तितकेच तरी काय म्हणून गृहीत धरावयाचे १ जे कवीलाही संग्रहित करण्याच्या लायकीचे वाटले नाही, तेही त्याच्या लेखणीतून बाहेर पडलेलेच असते. सारस्वत आणि विनसारस्वत यांतील सगळी सीमारेपाच या ठिकाणावर येऊन पुसली जाण्याचा धोका असतो. म्हणून सुर्व्याची कविप्रकृती ठरविण्याचा मार्ग त्यांच्या दोन संग्रहांतील एकूण कविता हा नसतो, तर त्यांच्या ज्या रचनांना आपण कविता म्हणून मान्यता देऊ शकतो, तेवढ्याच रचना अशा वेळी विचारात घेता येतात. सुर्वे यांच्या ज्या रचना कविता म्हणून आपण मान्य करु, त्या रचनांचे स्वरूप कम्युनिस्ट कवितेचे नाही.
सुर्वे हा माणूस कम्युनिस्ट असेल पण त्याची कविता ही फक्त त्याच्या व्यथेचा हुंकार आहे. 'जाहिरनामा' या कवितेत सुर्व्यानी असे म्हटले आहे की, त्यांचा जाहिरनामा
आजच्या नावाने आणि आजच्या दुःखाच्या नावाने आहे. हा जाहिरनामा आपली व्यथा घोषित करणारा आहे. या व्यथेवर हुकमी उपाययोजना सुचविण्याचा उद्योग या कवितेत केलेला नाही.
सुर्वे कम्युनिस्ट आहेत म्हणून त्यांची कविता कम्युनिस्ट आहे, म्हणून त्यांची मते निश्चित झालेली आहेत, ही पूर्वसिद्ध मते घेऊन जर कुणी जीवनाकडे जाणार असेल, तर मग त्या ठिकाणी जीवनाचा शोध घेण्याची सारी धडपड संपून जाते. अशा वेळी कविता साचेबंद आणि एकपदरी होते. तिच्यात काव्यात्म अनेकार्थता, काव्यात्म अनेकसंदर्भसूचकता हे गुण शिल्लक राहू शकत नाहीत. कारण सर्व प्रश्नांची उत्तरे सापडल्यानंतर मनाला कुंटित करणारे काही शिल्लक राहत नाही, सगळेच सोपे व सवंग होऊन जाते, असा एक आक्षेप या कवितेवर आहे. खरे म्हणजे हा आक्षेप 'जर 'पासून सुरुवात होणारा आहे. जर कवींची मते पूर्वसिद्ध असतील, तर कविता एकपदरी होते. पण ह्या 'जर-तर 'ला आधार कुठे शोधणार? तो आधार सुर्वे यांच्या कवितेत शोधावा लागतो. असा आधार एखाद्या कवितेतल्या एखाद्या ओळीच्या आधारे शोधणे धोक्याचे असते. कोणताही कवी त्याच्या कवितेत मधूनमधून ठाम विधाने करीत असतो. मर्ढेकरांसारखा कवीसुद्धा 'आहे वुद्धीशी इमान । जाणे विज्ञानाची ज्ञान' असे खात्रीलायक विधान करतो. बुद्धिप्रामाण्यवाद आणि विज्ञानाने उपलब्ध करून दिलेले ज्ञान या दोन्हीला या कवीने बांधून घेतले आहे, असे समजण्यात अर्थ नसतो. कारण ही ठाम विधाने खरोखरी ठाम नसतातच. ती ठाम भाषेत मांडलेली असतात. मर्ढेकरच त्या पुढच्या ओळीत 'परी कोठे तरी आण । ताण पडे ॥' असे नांदवून ठेवतात. 'जाणे विज्ञानाची ज्ञान' ही खात्री पटल्याच्या नंतरसुद्धा शोध संपतच नसतो. म्हणून एखाद्या कवीला ठाम मते असणे निराळे आणि त्याचा शोध संपणे निराळे असते.
माणूस सुर्वे हे कम्युनिस्ट असतील, पण कवितेत जो कवी दिसतो त्याचा त्या तत्त्वज्ञानाशी काही अपरिहार्य संबंध नाही. दोन दिवस वाट पाहण्यात गेले, दोन दुःखात गेले, यापलीकडे काहीच घडले नाही. ही आपली व्यथा घेऊन कवी पुढे आलेला आहे. जगाचाही शोध संपलेला नाही, आपल्या स्वतःचाही शोध संपलेला नाही असे त्याला सारखे जाणवत असते. त्यामुळे या कवितेत जर खरोखरी काही ठाम असेल, तर ते तत्त्वज्ञान नाही. पक्षीय तत्त्वज्ञान तर सोडाच, पण कोणतेही ठाम तत्त्वज्ञान या कवितेत नाही. निश्चित जर काही असेल तर दुःखाची वास्तवता आणि ती भोगूनही अजून हताश न झालेले मन-या दोनच बाबी निश्चित आहेत.
सुर्व्याची कविता व्यथेच्या चित्रणाने भरलेली असूनही आशावादी आहे. ती आशावादी आहे हेच काहीजणांना आवडत नाही. 'तरी का कोण जाणे माणसाइतका सृजनात्मा मला भेटलाच नाही' असे या कवीला वाटते. आजचे दुःख मान्य केल्यानंतरचासुद्धा एक सुखाचा दिवस येऊ घातलेला आहे, तो नक्की येणार आहे, यावर सुर्व्याचा विश्वास आहे. कोणतीही कविता व्यथेच्या चित्रणामुळे निराशवादी होत नसते. खरा निराशावाद हा या व्यथा कधी संपणारच नाहीत, चांगले कधी होणारच नाही, या जाणिवेतून निर्माण होत असतो. सुर्व्याच्या डोळ्यांसमोर एका नव्या सुंदर जगाचे स्वप्न आहे. आजच्या कवि-मंडळीची मानसिक अडचण या ठिकाणी आहे. मानवी जीवनाचा व्यर्थपणा आणि तो ध्यानात आल्यामुळे वाटणारे गडद नैराश्य हे एकच परम सत्य आहे असे त्यांना वाटते. अशा परिस्थितीत हा कवी खात्रीलायकपणे आशावाद कसा काय सांगतो ? ज्या अर्थी तो आशावाद सांगतो, त्या अर्थी त्याची कविता खोटी असली पाहिजे. दिवे लागले 'तरी काळरात्र संपत नाही । संपणार नाही।।' हेच एक परमसत्य
आहे. ज्याला आपण आत्मा-आत्मा म्हणतो, तो आत्मा एक कमालीचा निष्ठावंत मूर्ख आहे. तो निष्ठावंत असल्यामुळे मूर्खपणा सोडीत नाही, आणि मूर्ख असल्यामुळे त्या निष्टाना तडा जात नाही. हा इमानी आत्मा बहिऱ्या प्रेतांच्या कानांशी बसून आहे. त्यामुळे काही ऐकले जाण्याची शक्यताच नाही. ज्याला आपण नव्या माणसाचा नवा जन्म म्हणतो, तो नव्या माणसाचा जन्म नाही, तर तो नव्या प्रेताचाच मृत जीवन जगण्यासाठी, पुन्हा मरण्यासाठी जन्म आहे. रेताच्या प्रत्येक थेंबात एका नव्या प्रेताचा जन्म असतो. हा सगळा निराशावाद आहे. नव्या मराठी लेखकांचा या नैराश्यावर, निदान कवितेच्या जगात, प्रामाणिक विश्वास आहे.
निराशेवर प्रामाणिक विश्वास असणाऱ्यांना आशावाद उथळ व खोटा वाटावा, यात आश्चर्य काहीच नाही. पण आशावादावर तेवढाच भर असणाऱ्यांना हा निखालस निराशावाद तितकाच खोटा वाटला तर त्याबद्दल कोणी तक्रार करण्याचे कारण नाही. खरोखरच हे मानवी जीवन निरर्थक आणि व्यर्थ आहे का ? याचे उत्तर कवितेने द्यायचे नाही. कारण ते काव्याचे काम नव्हे. त्याचप्रमाणे जीवनात आशेला जागा आहे की नाही याचेही उत्तर कविता देणार नाही. ज्यांना निराशाच खरी वाटते त्यांचे, ज्यांना आशाच खरी वाटते त्यांचे, ज्यांना दोन्हीही अधूनमधून खऱ्या वाटतात, आणि ज्यांना दोन्हीही कायम खोट्या वाटतात, त्या सर्वांचे अनुभव शब्दाच्या माध्यमाद्वारे एकात्म, उत्कट पातळीवर कविता फक्त अभिव्यक्त करीत असते. ही पातळी गाठली जाते की नाही, हा खरा प्रश्न असतो. कवी आशावादी आहे की नाही हा खोटा प्रश्न असतो.
अडचण ही आहे की आशावादी माणसाला जीवनाचे आव्हान पुरेशा गांभीर्याने जाणवत असते, हेच आपण मनाशी कबूल करावयास तयार नाही. प्रसूतिवेदनांनी तडफडत असणाऱ्या स्त्रीला वेदना खोट्या वाटत नसतात. या वेदनांमुळे सर्व अंगाला घाम फुटलेला असतो. सगळा कंट कण्हण्याखेरीज दुसरा आवाज करीत नसतो. व्यथेची ही तीव्रता आणि सत्यता मान्य करणारे आणि भोगणारे आशावादीही असू शकतात. पुष्कळदा तर असे आढळते की ज्यांनी या व्यथा भोगलेल्या असतात, जे या व्यथा भोगीत असतात, तेच आशावादी असतात. ज्यांची दुःखे भोगण्याची हिम्मत नसते, ते निराशावादी असतात. माझा कवितेतील निराशावादावर कोणताही आक्षेप नाही. कारण तोही एक जीवनाचा भाग आहे. पण ज्यावेळी आशावाद असणे हाच गुन्हा ठरू लागतो, त्यावेळी निराशावादाची एकदा तपासणी करावी लागते.
ज्यांना जीवन व्यर्थ वाटते, त्यांना खरोखरी व्यर्थ काय वाटते, हेही समजून घतले पाहिजे. कारण जन्म या सर्व वाटण्याच्या पूर्वीच मिळालेला असतो. तो मिळणे अगर न मिळणे या वाटण्यावर अवलंबून नसते. याच्याउलट वाटणे न वाटणे हे मात्र जन्म मिळण्यावर अवलंबून असते. ज्याला जन्मच मिळाला नाही, किंवा जो जीवन संपवून मरणाचा उंबरठा ओलांडून पलीकडे गेला आहे, त्याला काही वाटण्या-न-वाटण्याचा प्रश्नच नसतो. हे जे अपरिहार्यपणे प्राप्त झालेले अस्तित्व, ते कुठल्याही विचाराच्या पूर्वीचे आणि विचारप्रक्रियेलाही पूर्वीचे असे असते. जीवन सार्थ आहे म्हणणारेही जगत असतात, जीवन व्यर्थ म्हणणारेही जगत असतात. जगण्याचा कंटाळा येऊन आत्महत्या करणारेही आत्महत्येच्या त्या क्षणापर्यंत जगतच असतात. मरण येईपर्यंत जगणे हे भागच असते. त्यामुळे जिवंत असण्याचा आशे-निराशेशी संबंध नसतो. या जगण्याचे मूल्य काय ? या जगण्याला अर्थ काय ? त्याचे महत्त्व काय ? याची उत्तरे सापडत नसली, ही उत्तरे कधीच कुणाला सापडू शकत नाहीत असे वाटत असले, म्हणजे जीवन व्यर्थ वाटू लागते. जीवन सार्थ अगर व्यर्थ वाटणे, हा वाटण्याचा भाग आहे, असण्याचा भाग नाही. कारण असणे निसर्गक्रमात प्रतिसृष्टीपासून माणसापर्यंत वारसाहक्काने चालत आले आहे. यातील आश्चर्यकारक घटना ही आहे की जे जगण्यासाठी झुंजत असतात, त्यांना जीवन व्यर्थ वाटण्याचा संभव फार कमी असतो. जिवंत राहण्यासाठी जो झगडा त्यांना द्यावा लागतो, ती झुंजच त्यांना जिवंत असण्याचे महत्त्व पटवून देते. ज्यांना अशी झुंज द्यावी लागत नाही, त्यांच्याबाबतीतच हे जीवन सार्थ की व्यर्थ असे प्रश्न संभवतात.
मानवी जीवनच या पद्धतीचे आहे. जनावरांना आशाही नसते, निराशाही नसते. कारण त्यांना संस्कृती नसते. आशानिराशेला संस्कृतीत जागा असते, म्हणून एखाद्या मूल्यासाठी हसत प्राण देणे संस्कृतीला शक्य असते. आणि कोणतेच मूल्य सापडत नाही म्हणून प्राण देणेही फक्त संस्कृतीलाच शक्य असते. माणूस जन्माला येतो, जगतो आणि मरतो, हा व्यवहार जनावरांपेक्षा निदान अजून तरी फारसा निराळा नाही. या निसर्गक्रमाखेरीज जे माणूस निर्माण करतो, त्याला मूल्य असते. इथून आशानिराशेचा प्रांत सुरू होतो. यांपैकी निराशाच गंभीर असते आणि आशा मात्र उथळ असते, असे समजण्याचे काही कारण नाही. निराशा अनेकपदरी असते, तिला अनेक संदर्भ असतात, आणि आशा मात्र फक्त साचेबंद, एकपदरी असते, तिला नाना संदर्भ नसतात, हा पाहण्याच्या दृष्टीतला दोष आहे. पण मराठी वाङ्मयाचा प्रांत निराशेने असा काही व्यापलेला आहे की आशा नावाचेही काही प्रकरण मानवी जीवनात असते, हेच गंभीर चेहरा करून सांगण्याची आता पाळी आली आहे.
वाङ्मयाचा एक टप्या सामाजिक जाणिवेचा पाठलाग करताना वाङ्मयाला उथळ प्रचाराच्या पातळीवर खेचणारा निघाला की नंतर त्याची प्रतिक्रिया सुरू होते. ही प्रतिक्रिया इतक्या टोकाला जाते की सामाजिक जाणिवांनाच कवितेतून हद्दपार करण्याची शर्यत सुरू होते. सामाजिक जाणिवांची जणू लेखक-समीक्षकांनी धास्तीच घेतलेली आहे. उपासमारीने माणसे मरतात, या ठिकाणी येऊनच लेखकाने थांबले पाहिजे. उपासमारीने माणसे चिडून बंड करून उठतात, हे सांगणे हाच वाङ्मयीन गुन्हा होऊ लागलेला आहे. सुर्व्यानी माणसाइतका समर्थ सृजनात्मा मला भेटलाच नाही असे म्हटले की भल्याभल्यांना त्यात पोथीनिष्ठा आढळू लागली आहे. शेवटी सृजन हा माणसाचा धर्म आहे. ही भूमी काही एका पक्षाच्या मालकीची व्हावी काय ? माणूसच माणसाला जगण्यासाठी अन्न निर्माण करतो, माणूसच माणसाला मारण्यासाठी हत्यारही निर्माण करतो, तोच गुलामगिरी निर्माण करतो, तोच गुलामगिरीविरुद्ध बंड करून उठतो. ही निर्मिती हे माणसाचे माणूसपण आहे. या माणसाच्या माणूसपणावर श्रद्धा असणाऱ्यांना उद्याचे एक सुंदर जग निर्माण होईल हे स्वप्न पाहण्याचाही अधिकार असू नये ? उद्याच्या सुंदर जगाचे स्वप्न वेदकाळापासून हिंदू संस्कृती पाहत आली. साऱ्याच संस्कृतींच्या निर्मात्यांनी हे स्वप्न अधूनमधून पाहिलेले आहे. एक जग असे येईल,—जिथे सर्व सुखी असतील, भयापासून मुक्त असतील, थोडेसुद्धा दुःख असणार नाही, सर्वांचे कल्याण होईल-हे सर्व स्वप्न कुणाला विश्वसनीय वाटेल, कुणाला विश्वसनीय वाटणार नाही. पण एखादी गोष्ट विश्वसनीय वाटणार नाही म्हणून तीवर प्रामाणिक श्रद्धा असू नये की काय ?
देव आहे की नाही कोण जाणे, पण देव दयाळू आहे या श्रद्धेने भारलेल्या कवींनी अमर कलाकृती निर्माण केलेल्या आहेत. महाकाव्य आशा आणि श्रद्धेतून निर्माण होते, असा याचा अर्थ नाही. निराशेलाही तितकेच भव्य सूर व गीत असू शकेल. उद्याच्या सुंदर जगाचे स्वप्न पाहण्याचा एखाद्याचा हक्क कुणी नाकारू शकणार नाही.
सुर्व्याच्या कवितेवरची सर्व समीक्षा 'कम्युनिस्ट' या एका सूर्याभोवती फिरत असते. जणू मॅक्झिम गॉर्की आणि मायकोव्हस्की श्रेष्ठ कलावंत नव्हतेच ! याबाबत कुणी कशावर आक्षेप घ्यावा याचा तरी काही धरबंद पाळला पाहिजे. 'माझे विद्यापीठ 'च्या प्रास्ताविक कवितेत यंत्राचा उल्लेख आला आहे. 'यंत्राच्या काळजातील आर्त स्वर तुझ्या कंठात आकार घेऊ दे !!' हे म्हणताना कवीने गुन्हा कोणता केला ? कवितेने प्रचाराला बाधून घेऊ नये हे मान्य करून टाकले म्हणून काय कवितेने मजुरांची दुःखेही पाहू नयेत ? सुर्व्याची कविता सांगते आहे ते क्रांतिगीत नव्हे, ते फक्त व्यथेचे गीत आहे. यंत्रावर काम करणारा माणूस हाही यंत्र होतो, हे पूर्ण सत्य नाही. ते अर्धसत्य आहे. या माणसालाही आर्तता असते, काळीज असते, दुःख असते. त्याचीही नाडी रडत असते. ही धडपड मी व्यक्त करीन, हे दुःखच फक्त व्यक्त करीन, दुसरे काही मी पाहणार नाही, असे कवी म्हणत नाही. तर तो म्हणतो आहे, अजून माइया कंठात माझे दुःख आकार घेत आहे. हे दुःख अधिक व्यापक होऊन यंत्रसंस्कृतीच्या सर्व आर्ततेला व्यापण्याइतके झाले नाही, ते तितके मोठे होवो, माझ्या अंतरात अजून माझ्याच हर्षखेदांचा घंटारव होतो आहे, उडणाऱ्या सगळ्याच नाड्यांचे ठोके माझ्या अंतःकरणात घुम् लागोत, आपले मन व्यापक होवो, त्यात सगळ्यांचे दुःख समाविष्ट होवो, अशी ही साधी मागणी आहे. या मागणीवर बिचकून जाण्याचे काय कारण होते ?
मर्ढेकरांनी हीच मागणी केलेली नाही का ? अहंतेचे काठीण्य भंगून जावो, मीपणाचे कार्पण्य जावो, आणि आपली कविताही मीपणातून मुक्त होवो. या कवितेला असणारा जो अहंकेन्द्री स्वर आहे, तो स्वर मारला जावो. त्याच्या गळ्याला नख देऊन तो स्वर संपला पाहिजे आणि तुझ्या सामर्थ्याचा स्वर माझ्या व्यंजनाला लाभला पाहिजे ही अपेक्षा मर्ढेकरांनीही व्यक्त केली होती. सगळेच कवी आपले अनुभव व्यापक असावेत ही मागणी करीत असतात. यंत्र म्हणजे मजूर, यंत्र म्हणजे कामगार. या कामगारांचीच दुःखे सांगावयाची, मग इतरांच्या दुःखांचे काय ? हा एकांगीपणा आहे. या खोट्या भीतीतून सगळी आरडाओरड सुरू होते. सुर्व्याची कविता जी दुःखे सांगते, ती मजुरांची दुःखे नाहीत: सुर्व्याच्या कवितेतील व्यथेची पातळी भूक, भाकर, काम, विश्रांती, सुरक्षितता ही नाही; दारिद्रयाच्या आगीत होरपळणारी या कवितेतील सृष्टी आहे. पण तिची व्यथा माणसाची आहे, सांस्कृतिक आहे. सुर्व्याच्या कवितेतील व्यथेचे हे सांस्कृतिक रूपच कणी फारसे लक्षात घेत नाही. कारण या कवितेत तलवारीचा उल्लेख असतो, कधी मुठी वळलेल्या असतात, तर कधी चंद्र भरल्या पोटाने पाहता आला नाही याचा कडवट उल्लेख असतो.
ज्या पद्धतीने सुर्वे आपली कथा सांगतात, किंवा अधिक नेमकेपणे बोलायचे तर, त्यांच्यातील कवी आपली कथा सांगतो, ती पद्धत पाहण्याजोगी आहे. एका अर्थी स्वतःविषयीच्या या कविता म्हणजे कवीचे आत्मनिवेदनच आहे. खाजगी जीवनात सुर्वे कधी मजूर राहिले असतील, कधी एखाद्या ठिकाणी चपराशी म्हणून राहिले असतील. उपासमारीचे दिवसही त्यांच्यावर येऊन गेले असतील. हा जो नारायण सुर्वे नावाचा माणूस, त्याच्या जीवनाची कहाणी आणि कवितेतून व्यक्त होणारा कवी याच्या जीवनाची कहाणी समांतर असली तरी ती एक नाही. दोन्ही ठिकाणी काही घटना व प्रसंग सारखे असले, तरी त्यांची पातळी भिन्न आहे. कारण या अब्रूदारांच्या जगात आपली बेअब्रू खूपच झाली ही ती व्यथा आहे. ही व्यथा संवेदनाक्षम मनाला जिव्हारी झोंबलेल्या उपेक्षेची व अवहेलनेची व्यथा आहे. ते उपासमारीचे दुःख नाही. लौकिकाच्या बाजारात अब्रूदारही जगतात आणि आम्हीही जगतो. अब्रूदाराच्या पतपेढ्या आहेत. तिथे आमची चर्चा निघते. पण त्या पेढीवर आमची पत मात्र नाही. दुपारच्या अंधारात आम्ही तारेच मोजीत बसलो, पण दुपार उजेड झाली नाही. आम्ही उरात एक वेदना घेऊन वावरतो आहोत, पण त्या जखमेला औषध मिळत नाही. एखादा चंद्र परप्रकाशित असावा, त्याला स्वतःचे प्रयोजन नसावे, तशा वेकार चंद्राप्रमाणे आम्ही हिंडतो. कधी आम्हालाही स्वतःचा प्रकाश मिळेल, या आशेवर आम्ही वावरतो आहोत. कवीची ही व्यथा केवळ 'माझे विद्यापीठ' या संग्रहातीलच नाही. या व्यथेचे धागेदोरे 'ऐसा गा मी ब्रह्म' या पहिल्या संग्रहातही आहेत. शेकडो वेळा आकाशात पौर्णिमेचा चंद्र आला, तारे फुलले, रात्री धुंद झाल्या, पण त्याचा आम्हाला काहीच उपयोग नव्हता. आमच्यासाठी भाकर हाच चंद्र होता. 'भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली.' हे माझे हात इतकेच माझे भांडवल होते. ते नेहमी दारिद्रयाकडे गहाणच राहिले. स्वाभिमानाने कधी हे हात मान ताठ करून चालत होते, कधी हे हात कलम झाले, आणि हे पाहण्यापलीकडे आम्ही काही करू शकलो नाही. या जगाच्या शाळेत जगावे कसे आणि दुःख पचवावे कसे, हे शिकण्यातच आयुष्य संपले. दोन दिवस सुखाची वाट पाहण्यात गेले. दोन दिवस दुःख भोगण्यात गेले. या असल्या आयुष्यावर कुणाला समाधान वाटावे असे त्यात काहीच नव्हते. पण हा प्रश्न काही वाटण्याचा नव्हता. ही परिस्थिती बदलणे आपल्या हातातच नव्हते. या जीवनाचा कितीही धिक्कार केला, तरी ते एक बेतून दिलेले आयुष्य होते. या बेतलेपणाच्याबाहेर पुन्हापुन्हा जावेसे वाटले, पण जाता आले नाही. जन्मलो त्यावेळी प्रकाशही मोजकाच होता. ज्या खोलीत जीवन जगलो, ती खोली आणि जगण्याचे रस्ते बेतलेपणाचेच होते. बेतलेल्या जीवनावर जर समाधानी राहता आले असते तर चार खांबांच्या चौकटीतला स्वर्ग मिळाला असता. पण या चाकोरीचा पहिल्यापासूनच कंटाळा होता. ही चाकोरी मोडण्याची इच्छा होती. पुनःपुन्हा या चौकटीचा मनाशीच धिक्कार केला. पण ही चौकट मोडणे जमले नाहीच. 'वेतून दिलेले आयुष्य ' या कवितंचा शेवट एका 'थू' या शब्दाच्या तिरस्कारवाचकावर झालेला आहे. हा धिक्कार म्हणजे जगाचा धिक्कार नाही. आपण वेतलेपणावर कधीच समाधानी नव्हतो. पण चौकटी आपल्याला मोडता आल्या नाहीत, या स्वतःच्या दुबळेपणाचा धिक्कार आहे. याही निषेधाचे धागेदोरे मागे 'ऐसा गा मी ब्रह्म 'पासून पाहता येतात.
ज्यावेळी आपली शक्तीच कमी पडते आहे असे वाटते, त्यावेळी माणूस नुसता जगाच्या नजरेतून उतरत नाही, तो स्वतःच्या नजरेतूनही उतरू लागतो. ऋतु-वाऱ्यांच्या दृष्टीने तर तो तुच्छ ठरतोच, पण प्रेयसीच्याही नजरेतून तो उतरू लागतो. अशा वेळी आकाश आणि माती दोन्हीही आपला तिरस्कार करीत आहेत की काय असे वाटू लागते. व मग स्वतःला स्वतःचीच करुणा येऊ लागते. आपलीच आपल्याला कीव करावीशी वाटते. अशा वेळी स्वतःला धीर देत जगणे कठीण वाटू लागते. कारण आपलाच आपल्यावर विश्वास उरलेला नसतो. आपणच आपल्याला धीर द्यावा, आपणच आपल्याला आवरावे, मनाचा आकान्त चाललेला असतो; हा स्वतःचा आक्रोश स्वतःच थांबवावा, तडजोडी करीत जगावे हे जसजसे कठीण होत जाते, तसतसा भडका उडण्याचा क्षण जवळ येतो. हा भडका उडणार नाही याची हमी देणे कठीण होऊन जाते.
अशा ठिकाणी भडका उडणे म्हणजे काय ? हेच समजून घेण्याची गरज निर्माण होते. कारण कधीकधी कवी तलवारीच्याही भाषेत बोलत असतो. जीवनापासून पळून जावे, तर कुठे जावे कळत नाही. भोवताली असणारे गज कापावेत, तर ते कापता येत नाहीत. या जगाशी असणारे सगळे संबंधच तोडून टाकावेत, नाळ कापून ज्याप्रमाणे मूल गर्भापासून वेगळे करून टाकतात तसे स्वतःला जगापासून वेगळे करावे, म्हणताना कैक ऋतू उडून जातात. पण हे वेगळे होणे जमतच नाही. अशा अवस्थेत जे अस्तित्व आहे ते स्वीकारणेही कठीण होते, आणि अस्तित्व नाकारणेही कठीण होते. आणि मग तेवढी कोपऱ्यातली तलवार डोळ्यांसमोर दिसू लागते. त्या तलवारीचा उल्लेख 'माझे विद्यापीठ'मध्ये पुन्हा एकदा आला आहे. काय म्हणून आपण म्यानावरचा हात आवरला ? ज्याप्रमाणे फायरमन इंजिनाच्या आगीत फावडे झोकतो, त्याप्रमाणे आपण स्वतःला झोकून का नाही घेतले ? या सगळ्या ठिकाणी वेगळ्या भाषेत तोच भडका खदखदत असताना दिसतो. कवीने तलवार म्यानात ठेवली. समजा रक्ताला हुकूम करून ती म्यानातून बाहेर काढली असती, तर काय झाले असते ? इंजिनात फावडे झोकावे त्याप्रमाणे आगीत झोकून टाकून कवीने स्वतःला नष्ट करून घेतले असते. जेव्हा धीर देत जगणे कठीण होते, त्या वेळेला भडका उडाला तर काय होते ? हा भडकाही आत्मघाताचाच असतो. जेव्हा गज तोडून उडावे एवढे बळ नसते, त्यावेळी कोपऱ्यातली तलवार फक्त आत्मघातासाठीच उपयोगी पडत असते.
ज्या कविता आपण कविता म्हणून मान्य करू. त्या कवितेतील तलवार ही सामाजिक क्रांतीची तलवार नाही. अशा जीवनापेक्षा त्याविरुद्ध बंड करून आपलाच शेवट करून घेण्याची तीव्र बळ-ऊर्मी आहे! सगळी बंडखोरी अशीच निर्माण होत असते. अनेक अन्याय सहन करताना एकाक्षणी माणूस चिडून उठतो आणि येथवर सहन केले, आता सहन करणार नाही हे सांगू लागतो. माझ्याही जीवनाला मूल्य आहे. ते मूल्य टिकवीत जर जीवन टिकणार असेल तर टिको; एरव्ही जीवन समाप्त होणेच इष्ट आहे. या जाणिवेतून बंड निर्माण होत असते. आणि असे व्यक्तीचे बंड आत्मघात करू शकते. सामाजिक क्रांती आणि व्यक्तीचे बंड या दोन बाबी एक नसतात. व्यक्तीचे बंड परिस्थितीची वाट पाहत नाही. ते बलिदान करून मोकळे होते. जीवनाहून अधिक प्रिय असलेल्या मूल्यांच्या पायावर आत्मविसर्जन करून मोकळे होते. असे मोकळे होण्याची प्रबळ ऊर्मी आलेली असूनही मोठ्या कष्टाने ती आवरली आहे.
जगणे कठीण होत आहे, हा वैताग आहे. जगणे कठीण होत असले तरी जगले पाहिजे. कारण अजून सर्वच प्रकारची दुःखे भोगून झालेली नाहीत. पुष्कळ सहन केलेले आहे, पण अजून सहन करायचे पुष्कळ राहिलेले आहे. वाटा मुक्या होतात. दिवस सुने जातात. तरीही अजून चालणे सोडलेले नाही. एक उद्याचे जग माझ्यासमोर आहे. त्यावरची श्रद्धा संपलेली नाही. म्हणून जगणे कठीण असले तरी जगलेच पाहिजे. अशावेळी सारी हत्यारे मी खाली ठेवावीत आणि काळोखाचे कैदी व्हावे, ही अपेक्षा करू नका. कारण अजून मी निराश झालेलो नाही. याही वातावरणात स्वतःची रचना करीत बसणे आवश्यक आहे. भविष्याचा नुसता आशावाद मी स्वीकारला नाही, भवितव्याच्या लहरीवर मी स्वतःला सोडले नाही. समोर येईल त्याला लाचार नमस्कार करून मी तडजोड केली नाही. अनेक प्रेपित भेटले, पण त्यांच्याहीसमोर निष्कारण हात जोडले नाहीत. कारण माझे मीपणही शेवटी मलाच रचावे लागणार आहे. ही रचना चालू असताना कुठेच स्थिरावणे शक्य नव्हते म्हणून स्थिरावलो नाही. प्रवास चालू राहिला. दर वळणावर नवा मुक्काम करावा लागला. त्यावेळी चालून चालून थकलो. त्या गल्लीत झांजरवेळी आम्हीही हताश होऊन बसकण घेतलीच. पण उटताच चालण्याचा प्रयत्न करण्याआधी बसलो नाही. आणि बसलो तरी कायम बसलोच नाही. स्वतःला शोधण्यात अर्ध आयुष्य गेले. काही मुक्कामांवर आम्हालाही जिव्हाळा मिळाला. तिथेच थांबावेसे वाटले. त्या जागा सोडताना दुःख झाले. हळहळलो. पण स्वतःच्या शोधाशी वेइमान झालो नाही. प्रत्येक अंधारी रात्र स्वतःशी चर्चा करण्यातच आम्ही घालविली. अशी चर्चा करण्यासाठी प्रत्येकाजवळ स्वतःचा आत्माच असतो. त्याचा शोध घेत बसणे भाग होते.
प्रत्येकाने आपला आत्मा तळघरात कोंडलेला असतो. माझाही आत्मा असाच कोंडलेला होता. पलिकडच्या आखीव रस्त्यावर बुटके उजेड होते. अंधारापेक्षाही तुच्छ व क्षुद्र असे उजेड,- या उजेडांचा पहारा होता. आपल्या आत्म्याशी आम्ही बोलू नये म्हणून हे पहारे उभे होते. केव्हा हा उजेड विझला म्हणजे आम्ही त्या अंधारात आत्म्याबरोबर फिरत असू. कधी बुटक्या उजेडाची नजर चुकवून आत्म्याशी चर्चा करीत असू . हा फुटपाथवर उभा असणारा पहारेकरी बुटका उजेड फक्त दोनच गोष्टी सांगणार : पहिली गोष्ट म्हणजे आहे त्याच्याशी जुळते घे. दुसरी गोष्ट म्हणजे बेतलेल्या रस्त्याने जाऊन बेतलेला स्वर्ग मिळव. जो उजेड अंधाराचा विध्वंस करीत येत नाही, तो उजेड जो प्रकाश दाखवितो तो प्रकाश अंधाराबाहेर पडण्याचा नसतो; अंधारातच स्वतःला एक सुरक्षित जागा मिळविण्याचा असतो. ही जागा मिळवायची असेल तर स्वतःचा शोध थांबवणे, आत्म्याशी वेइमान होणे, कुणाच्यातरी आश्रयाखाली जाऊन स्थिरावणे आवश्यक होते; तशी संधीही आली होती. जीवनात स्वतःशी अप्रामाणिक होण्याची आमंत्रणे नेहमीच येतात. इमान विकत घेणारीदुकाने चव्हाट्या-चव्हाट्यावर असतात. ह्या दुकानांकडे जी वाट घेऊन जाते, ती बुटक्या प्रकाशाची वाट असून तो वेइमान उजेड आहे. एक छोटीशी दिवलाणी असेल, तिच्यात लहान वात असेल, ती झंझावातात विझण्याच्या वेतात आली असेल, पण ह्याही ठिकाणी आम्ही स्वतःला सावरले. ही वातही सावरली. सुर्व्यांच्या कवितेतील कवीची कहाणी ही अशी व्यथेची कहाणी आहे. या संदर्भात त्यांच्या टीकाकारांना न आवडलेल्या, पक्षीय वाटलेल्या कविता समजून घ्याव्या लागतील.
वर ज्या पद्धतीने या कवितांच्याकडे पाहिले आहे, तो त्या कवितांचा अर्थ काही मी सुर्व्यांना विचारून ठरवलेला नाही. कविता करण्याचा हक्कदार कवी असला तरी कवितेचा अर्थ सांगण्याचा हक्कदार कवी नसतो. तो अधिकार रसिकांचा आहे. आस्थेवाईक वाचकांचा असतो. जो अर्थ वाचकांना त्या कवितेच्या रसग्रहणात जाणवतो तोच त्या कवितेचा अर्थ म्हटला पाहिजे. म्हणून हा अर्थ शोधण्यासाठी रसिकांच्याजवळ पूर्वग्रह नसलेल्या दृष्टीची गरज असते. एकदा कवी कम्युनिस्ट आहे असे म्हटले की त्या जाणिवेतून प्रत्येक कवितेचा तिच्या रचनेत न मावणारा अर्थ वाचकांना जाणवू लागतो. जे तलवारीचे आहे तसेच मुटी वळण्याचे आहे. सुर्वे यांच्यामधील माणूस कामगार-पुढाऱ्याप्रमाणे मी कामगार आहे, मी तळपती तलवार आहे, आणि म्हणून सारस्वताच्या क्षेत्रात शिरण्याचा थोडासा गुन्हा करणार आहे असे किंचाळत असतो. आपण या क्षेत्रातील नव्हत. इथे येण्याचा आपल्याला हक्क नाही. तरी नाइलाज म्हणून तो या क्षेत्रात उभा असतो. हा पार्टीचा सदस्य ज्या अर्थाने तलवार हा शब्द वापरतो, त्या अर्थाने सुर्वे यांच्यामधील कवी तलवार शब्द वापरीत नाही. जसा घोटाळा तलवारीबद्दल झाला आहे, तसाच घोटाळा मुठी वळण्याबद्दल झाला आहे. मूठ वळलेला हात ही पक्षाची अभिवादनाची पद्धत आहे. म्हणून सुर्व्यांच्या कवितेत कुटे मूट वळलेला हात दिसला की लगेच वाचकांना पार्टी दिसू लागते. त्यामुळे या कवीला आपल्या प्रेयसीसमोर मूठ वळवलेला हात धरून यात मी काय आणले आहे ते ओळख , असे म्हणण्याचीसुद्धा चोरी झाली आहे. अतिरेकी कावीळ झाली म्हणजे मग कवितेच्या रसग्रहणातील तोलसुद्धा सुटू लागतो; त्यातील हा प्रकार आहे.
हे मुठी वळलेले हात 'माझे शब्द' या कवितेत आहेत. या कवितेची सगळी रचनाच थोड्या निराळ्या धर्तीची आहे. उद्याच्या सुरवी जगाचे स्वप्न कवीच्या डोळ्यांसमोर आहे. एक दिवस सामान्य माणसाचा विजय होईल आणि तो विजय मिरवीत त्याची पालखी खांद्यांवर घेऊन सामान्य माणसाचे प्रतिनिधी महाद्वारातून येतील. कीने जे आश्वासन दिले आहे, ते यासाठी द्याव्या लागणाऱ्या लढाईचे नाही. हा क्षण ज्यावेळी येईल त्या क्षणाचे स्वागत करण्यासाठी आपण आपल्या गळ्याखाली घोष लपवून ठेवले आहेत, इतकेच हे आश्वासन आहे. आपल्या व्यथेची कहाणी मुखरित करताकरता वाचेची सगळी शक्ती संपू नये. एक दिवस ही व्यथा संपेल आणि नवे जग अस्तित्वात येईल. त्या जगाच्या स्वागतासाठी काही सूर शिल्लक ठेवले पाहिजेत. त्यावेळी मी असेन, कदाचित नसेन, पण माझे शब्द असतील. ते माझी कथा सांगतील. तो वेळपर्यंत अणूंची शक्ती शिल्लक ठेवली पाहिजे. आज दुःख भोगताना डोळ्यांत अश्रू येतातच, ते कधीकधी पुसतो. कधी गालांवरच वाळू देतो. कधी अश्रूच मित्र होतात. पण सगळे अश्रू इथेच संपणे योग्य नाही. त्या विजयाच्या सोहोळ्याच्या वेळी मन भरून येईल, तेव्हा उपयोगी पडावेत म्हणून दोन अश्रू शिल्लक ठेवले आहेत. या कवितेचीही सगळी भूमिका जेव्हा उद्याचे स्वप्न साकार होईल, तेव्हा मी त्याचे स्वागत करीन इतकेच सांगणारी आहे. सामाजिक क्रांतीच्या गाड्याला माझी कविता जुंपली आहे असे सांगणारी नाही. कम्युनिस्टांविषयी विचार करीत असताना आपण कम्युनिस्ट पक्षाचा राजकीय कार्यकर्ता आणि कवी यांना एकच समजून विचार करतो. हेच गफलतीचे ठिकाण आहे. जगभर कम्युनिस्टांनी काय केले, हा एक स्वतंत्र भाग आहे. काय करण्याची त्यांची इच्छा होती व आहे, हा एक स्वतंत्र भाग आहे. मार्क्सवाद्यांनी आणि कम्युनिस्टांनी संस्कृतीचे महत्त्व कधीही अमान्य केले नाही. मारुती बनविण्याच्या प्रयत्नात त्यांच्या हातून माकड बनले असेल. पण त्यांची इच्छा माकड बनविण्याची नव्हती. स्टॅलिनने जी हुकूमशाही निर्माण केली, ती मॅक्झिम गॉर्कीला अभिप्रेत होती, हे मानणे कृतघ्नपणाचे तर आहेच पण भोळसटपणाचेही आहे.
फ्रेंच राज्यक्रांतीने जी आश्वासने दिली पण जी पूर्ण झाली नाहीत, ती पूर्ण करण्यासाठी कम्युनिस्ट क्रांती होती. कम्युनिस्टांना हे करता आले काय ? याचे माझे उत्तर नाही असे आहे. पण त्यांची इच्छा काय होती ? समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या कल्पना घोषणेत राहतात; त्या जीवनात साकारच होत नाहीत. कारण माणूस आर्थिक गुलामगिरीने बनलेला असतो. हा माणूस मोकळा करणे, समता-स्वातंत्र्य आणि बंधुता प्रत्यक्ष जीवनात साकार करणे हे मार्क्सवाद्यांचे ध्येय होते. भूक, भीती या चक्रातच नव्वद टक्के मानवजातीचे जीवन दळले-पिसले जात असते. ही माणसाची नव्वद टक्के जात जनावरांची दुःखेच भोगीत असते. त्यांना भूक आणि भीती यांपासून मुक्त केले, तर प्रत्येक माणूस संस्कृतीत सहभागी होऊ शकेल, आणि मग संस्कृतीचा खरा विकास होईल. या स्वप्नांनी कम्युनिस्ट भारावलेले होते. आजही कम्युनिस्ट कलावंत याच स्वप्नांनी भारावलेला असतो. हे स्वप्न साकार करण्यासाठी आपली कविता शस्त्राप्रमाणे वापरण्याची त्याची प्रतिज्ञा असते.मार्क्सवादी वाङ्मयाला वर्गसंघर्षांच्या लढ्यातील हत्यारच मानतात. पण सुर्व्यांमधील कवी मी ते स्वप्न साकार करण्यासाठी कविता राबवीन असे म्हणत नाही. तो म्हणतो, जेव्हा हे स्वप्न साकार होईल त्यावेळी मी त्याचे स्वागत करीन. हा विजय जीवनाच्या महाद्वारातून मिरवत येत असताना खरेखुरे स्वातंत्र्य आले हे कळल्यानंतर जीवनाला नवा अर्थ मिळेल. माझी कविता वेडी होऊन नाचू लागेल. हा विजय घेऊन येणारे विचारतील, जेव्हा अंधार होता तेव्हा त्या अंधारात जो पहाट शोधीत होता, तो पहाट शोधणारा आहे तरी कुठे ? म्हणून त्यांच्या ओळखीचे सूर जपून ठेवले पाहिजेत. हा विजय अमुकच मार्गानी यावा असा कवीचा आग्रह नाही.
विविध राजकीय तत्त्वज्ञाने या भयमुक्त स्वतंत्र जगाचे स्वप्न पाहत आहेत. ते अमेरिकेतील लोकशाहीवाद्यांनी पाहिले आहे, रशियातील मार्क्सवाद्यांनी पाहिले आहे. लोकशाही समाजवाद्यांनी आणि भारतातील गांधीवाद्यांनीही हे स्वप्न पाहिले आहे. हे स्वप्न कोण साकार करील, कसे साकार करील, हा कवीचा प्रश्न नाही. हे स्वप्न साकार व्हावे इतकीच त्याची इच्छा आहे. हे स्वप्न साकार करण्यासाठी कवी प्रयत्न करणार नाही. माणसे प्रयत्न करतील. हे स्वप्न साकार होईपर्यंत अश्रू जपण्याचे काम कवीचे आहे. जेव्हा हे स्वप्न साकार होईल, तेव्हा स्वागताचे काम कवीचे आहे. म्हणून सुर्व्यांमधील कवी म्हणतो- 'खळ्यातून, मळ्यातून, ताऱ्यातून, वाऱ्यातून याने कुठुनही यावे । रस्ते मोकळेच ठेवलेत !' या अशा कवितेच्या शेवटी जेव्हा मुठी वळलेल्या हातांचा उल्लेख असतो, तेव्हा तो क्रांतीचा उल्लेख नसतो. क्रांती यापूर्वीच झालेली आहे. विजयही झालेला आहे. हा विजय खांद्यांवरून मिरवीत आणणे चालले आहे. तेव्हा आता क्रांती व्हावयाची उरली नाही. या विजेत्यांना कवी ज्याप्रमाणे सर्व वाटा मोकळ्या आहेत म्हणून सांगतो, कुठूनही यावे असे आमंत्रण देतो, त्याचप्रमाणे घराघरात मुठी वळलेले हात आहेत म्हणून सांगतो. मुठी वळलेले हात कवीच्या मते कारखान्यांत नाहीत. ते केवळ शहरांत नाहीत. माझ्या देशात गावोगावी, शहरोशहरी, धराघरांत मुठी वळलेले हात आहेत असे कवी म्हणतो. उघडच हे हात कम्युनिस्ट पार्टीच्या कामगारमोर्चाचे असणार नाहीत. ज्यांचे भविष्य अजून उमलावयाचे आहे त्या सर्व नव्या पिढीचे, बालकांचे हे मुठी वळलेले हात आहेत. कवी हा विजय होण्यापूर्वीचा आहे. त्याचा जन्म भाकरीचा चंद्र शोधण्यात निघून जातो. पण या मुठी वळलेल्या हातांच्या भविष्यरेखा विजयानंतर उजेडात येतील. तिथून माणसाचा माणूस म्हणून विकास सुरू होतो. नारायण सुर्वे हा माणूस कम्युनिस्ट आहे, ह्या एका जाणिवने या कवितेवर किती अन्याय झालेला आहे, याची काही कल्पना आता येईल. खरे म्हणजे ही कवितासुद्धा साधी आशावादी कविता आहे.
यापेक्षा 'गाणे' या कवितेचे स्वरूप निराळे नाही. 'भरल्या पोटाने अगा पाहतो जर चंद्र ! आम्हीही कुणाची याद केली असती' असा या कवितेचा शेवट आहे. मराठी कवितेतील एका कवीने पोटाचा उल्लेख करावा हीच एक गोष्ट मान्यवर विद्यापीठांना अमान्य होते. पोट म्हणजे काय ? कवितेला वासना असू शकते. वासनेची विकृती असू शकते. पण कवितेत पोटाला स्थान काय ? या सर्व नवकवींनी आणि टीकाकारांनी सहजप्रेरणा म्हणून कामाचा स्वीकार केलेला आहे. काम स्वतःसिद्ध प्रकृत किंवा विकृत असतो. तो टाळू म्हटले तर टळत नाही. इतकी जाणीव या नव्या वाङ्मयाला आहे. कामाइतकीच बलवत्तर किंबहुना जीवनात कामाचा उदय होण्याच्याही पूर्वी अतिशय बळकट असणारी भूक ही दुसरी सहजप्रेरणा आहे. त्याला शास्त्रज्ञांची मान्यता मिळाली तरी अजून मराठी साहित्यिकांची मान्यता मिळालेली दिसत नाही. विशेषतः सुळेंच्या 'गाणे' या कवितेची रचना अत्यंत साधी असल्यामुळे ती चकरा देणारी आहे. वरवर पाहताना या कवितेचा एक-पदरी अर्थ दिसतो आणि तो अर्थ सर्वावरच अन्याय करणारा आहे. आम्ही उपाशी आहोत, उपाशीपोटी आम्हाला चंद्र पाहावा लागतो, जर आम्ही भरल्यापोटी चंद्र पाहिला असला तर आम्हालाही कुणाची आठवण झाली असती. असा या कवितेचा अर्थ दिसतो. आणि मग नवे क्रोध उसळून येतात. कविता ही पोट भरल्यानंतर करण्याची वस्तू आहे, असे सुर्वे यांना वाटते काय ? जे समृद्ध आहेत, जे श्रीमंत आहेत, ज्यांना खाण्यापिण्याची ददात नाही, त्यांना कवी होणे सोपे आहे असे सुसुर्व्यांना वांटते काय ? एखादे छानसे घरकुल असावे, त्यात बायको असावी, तिच्याशी प्रेमकजन करीत बसावे, ही जीवनाची परिपूर्णता आहे ? आणि पोट भरले की मग हे क्षुद्र स्वप्न पुरे होताच जीवन पूर्ण होते, असे सुर्व्यांना वाटते काय ? असे नानाविध प्रश्न डोळ्यांसमोर येऊ लागतात. एका कवीनेच सगळ्या कलात्मक व्यवहाराचा पोरकट उपहास केला. याची अनेकांना खंत वाटू लागते. पण हा या कवितेचा अर्थच नाही. या कवितेच्या अर्थापर्यंत जायचे असेल तर जरा वेगळ्या दिशेने प्रवास केला पाहिजे.
या कवितेला आपण असे विचारले पाहिजे की जर भरल्या पोटाने चंद्र पाहिला, तर कुणाची तरी याद केली असती असे ही कविता सांगते. उपाशीपोटी ही कविता चंद्र पाहायला तयार नाही काय ? सुर्व्यांची सगळी कविता उपाशीपोटी चंद्र पाहणारी कविता आहे. किंबहुना उपाशीपोटी, पोट भरण्यापेक्षा चंद्र पाहण्याची जिद्द अधिक आहे. म्हणन मुर्वे कवी होऊ शकले. प्रश्न चंद्र पाहण्याचा नाही. चंद्र पाहणे भरल्यापोटी होणार आहे. चंद्र पाहणे उपाशीपोटीही चालू राहणार आहे. फक्त उपाशीपोटी पाहिला म्हणजे वेगळा दिसू लागतो. प्राचीन परंपरेपासून आपण हे मानीत आलो की पाहणाऱ्यांना के वेगळा दिसतो. विरहातील नायकाला चंद्र नायिकेसारखा दिसतो. नायिकेला विरहात शत्रू वाटतो, मीलनात मित्र वाटतो. आणि तपस्यांना चंद्र हा क्रोध गेलेल्या शुद्ध योग्यासारखा शान्त वाटतो. जेव्हा चंद्र भरल्यापोटी पाहिला जातो, तेव्हा चंद्राचे दर्शन नसले असते. उपाशीपोटी पाहिला असता चंद्र निराळा असतो. तो भाकरीसारखा दिसू लागतो या कवितेत गुलमोहराखाली छानसे घरकुल नांदले असते, असाही उल्लेख आहे. पण उपाशीपोटी संसारच नसतो असे नाही. त्याला धुंदी नसते असे नाही. वेतल्या जीवनातील अंधाऱ्या कोठडीतसुद्धा ओठ खडीसाखर होत जातात हा सुर्व्यांचाच अनुभव आहे. माझे गाणे तुमच्या गाण्यापेक्षा निराळे आहे, कारण माझे जीवन तुमच्या जीवनापेक्षा निराळे आहे. माझा अनुभव तुमच्या अनुभवापेक्षा निराळा आहे; कारण आम्ही चंद्र उपाशीपोटी पाहिला आहे असे कवीला म्हणायचे आहे.
जे जीवनात खूपच दुःख भोगतात, त्यांच्यासमोर दुःख हेच एक शाश्वत सत्य म्हणून उभे राहते. ते दुःख भोगतात म्हणून कवी होत नाहीत, तर कवीही असतात आणि दुःखही भोगतात; म्हणून ही व्यथा ते कवितेच्या पातळीवर नेतात. सगळेच कवी उपाशी नसतात. सगळेच उपाशी कवी नसतात. पण जो कवीही असतो आणि उपाशीही असतो, त्याची कविता निराळी होते. अगा माझे गाणे निराळे आहे. कारण चंद्र पाहण्याची शक्ती ही जरी माझ्यात असली तरी चंद्र पाहतानाची अवस्था निराळी आहे, असे कवीला म्हणायचे आहे. सुर्व्यांची कविता भुकेच्या शमनार्थ भीक मागणारी कविता नाही. तर भुकेचे गाठोडे खांद्यावर वाहून नेताना तिथेही आत्म्याशी बेइमान न होता माणुसकीची कळ जपणारी कविता आहे. व्यथा हे त्या कवितेचे मुख्य स्वरूप आहे. आणि व्यथेच्या भट्टीत शेकन घेऊनही शिल्लक राहिलेला माणूस हा या कवितेचा विषय आहे. प्रकृतीच्या विरोधात संस्कृती टिकत नाही, हे कम्युनिस्टांचे तत्त्वज्ञान आहे. प्रकृतीच्या विरोधातून संस्कृती टिकते असे कोण्याही आधुनिकाने म्हटले नाही. सगळे मानसशास्त्र प्रकृतीची सोय लावीतच संस्कृतीला आधार शोधीत असते. सगळे समाजशास्त्रही हाच मुद्दा सांगत असते. कुठे चिंतनाचा विषय काम असेल, कुठे चिंतनाचा विषय क्षुधा असेल. या दोन सहजप्रेरणांची प्रकृतीही बलवान आहे. त्यांची विकृतीही तितकीच बलवान आहे. कारण या प्राकृतिक सहजप्रेरणा आहेत. सामाजिक दृष्टीने पाहिले तर माणूस अन्नाशिवाय जगू शकणार नाही. अन्न मिळण्यासाठी माणूस वाटेल ते पाप करील, हे एक सत्य आहे. आणि वैयक्तिक दृष्टीने पाहिले तर समोर आलेल्या अन्नाचा अव्हेर करून मरणाच्या दारात जिद्दीने जाण्याची ताकद फक्त माणसातच असते, हे दुसरे सत्य आहे. ते दुसरे सत्य व्यक्तिगत जीवनात प्रकृतीवर मात करणाऱ्या संस्कृतीचा विजय दाखवीत असते. सुर्व्यांची कविता ही या संकृतीची कविता आहे. म्हणून हा कवी भाकरीचा चंद्र शोधण्यात अर्धे आयुष्य बरबाद झाले तरी स्वतःचा शोध घेण्याचे थांबवीत नाही, त्याची आत्म्याशी चाललेली चर्चा कधीच संपू शकत नाही. हा कवी ज्या वेळेला आम्ही भरल्यापोटाने चंद्र पाहिला नाही म्हणून सांगू लागतो, त्यावेळी तो कवित्व हा फुरसतीचा व्यापार मानीत नसतो. कारण त्यानेच सर्व वादळांत ही ज्योत जपून ठेवलेली असते. तो फक्त अशा वेळी माझे गाणे तुमच्यापेक्षा निराळे आहे इतकेच सांगत असतो. हे कळण्यासाठी नुसते चिकित्सक असून चालत नाही, तर रसिक हृदयही असावे लागते.
कोणाही कवीचे कवितेतील आत्मनिवेदन म्हणजे वास्तवातल्या माणसाचे आत्मचरित्र नव्हे ही पहिली बाब. आगि अशा आत्मनिवेदनातून एखादे सुसंगत तत्त्वज्ञान निघालेच पाहिजे हा आग्रह धरणेही बरोबर नव्हे. ही दुसरी बाब लक्षात घेऊन या कवितांकडे पाहावे लागते. या कवितांचे महत्त्व सलगपणे प्रत्येकीचे एक जिवंत अनुभव या दृष्टीने मूल्य आणि सर्वांचे मिळून कविप्रकृतीचा अनुभव घेण्याच्या पातळीचा विशेष असे दुहेरी असते. कोणाही कवींच्या कवितेत त्याचे आत्मनिवेदन किती प्रमाणात असते याचा पुरावा कधी कवितेतून सापडणारा नसतो. कवितेत शब्द असतात. हे शब्द एक एकात्म अनुभव वाचकांसाठी साकार करतात. त्याच्यामागे जाऊन या अनुभवाचा कवीच्या खाजगी जीवनाशी संबंध काय, हे विचारण्यात अर्थ नसतो. कारण माणसाच्या ठिकाणी सहकंपाची एक विलक्षण शक्ती असते. कोण कशाशी समरस होईल हे सांगता येणे कठीण असते. कवीचा स्वतःचा सामाजिक वर्ग हा नेहमीच कवितेचा सामाजिक वर्ग असेल, अशी खात्री देता येत नाही. पण कवितेतून जे दिसते आहे ते असे की, कवी कथा सांगतो आहे. एका प्रदीर्घ कथेचा एकएक पदर, एकएक घटक त्याची प्रत्येक कविता उलगडून दाखवीत असते. आपल्या कवितेतून स्वतःचे अनुभव आणि प्रतिक्रिया सांगतानाच कवी स्वतःचीही कथा सांगत असतो. त्याच्या मनाला जाणवलेल्या भोवतालच्या जीवनाचीही कथा सांगत असतो. ही कविता पुष्कळदा एका सार्थ योगायोगाची बनलेली असते.
या ठिकाणी सार्थ आणि योगायोग दोन्ही शब्दप्रयोग महत्त्वाचे आहेत. असा सार्थ योगायोग 'नेहरू गेले त्याची गोष्ट ' या कवितेत पाहायला सापडेल. नेहरूंच्या मृत्यूची बातमी आली आणि कारखाने बंद झाले. जे आतापर्यंत स्तब्ध आणि सुस्त असे जग दिसत होते, ते एकदम व्याकूळ होऊन उठले आणि सगळीकडे हरताळ पडला. सुर्वे यांच्या कवितेचे सूचकतेचे प्रमाण किती मोठे आहे हे पाहण्याच्या दृष्टीने, आणि अनेक संदर्भ त्यांची कविता कसे लीलया स्पर्शून जाते ते पाहण्याच्या दृष्टीने एकदा ही कविता तपासली पाहिजे. आरंभालाच कवी पाठी शेकवीत बसलेली घरे कलकल्ली म्हणून सांगतो. यांतील कलकलली या शब्दात असणारा गोंधळ, आक्रोश, आर्तता आणि व्यथा यांचा समुच्चय पाहण्याजोगा आहे. ही घरे पाटी शेकवीत बसली होती. सुस्तपणे ऊन खात रवंथ करणारी, सुस्त, सुरक्षित मने, आणि पाटी शेकवीत बसलेली घरे हा संकरही पाहण्याजोगा आहे. एका बाजूला सुरक्षिततेच्या विश्वासाने चालू असलेली विश्रांती आणि दुसरीकडे अनपेक्षित आघातानंतर झालेला बोलका विपाद, यांच्या विसंवादाचेही चित्र आहे. हा नियतीचा निर्णय मान्य करणे सर्वांनाच भाग होते. हा आघात एकीकडे सुन्न करणारा होता, दुसरीकडे प्रतिकाराची सोयच नव्हती. पराभूत मनाने आले दुःख मान्य करण्याशिवाय गत्यंतर नव्हते. पुढच्या ओळी हा कलकलाट शांततेत कसा क्रमाने बुडून गेला हे सांगतात. पाहता पाहता सारे शहर करडे होऊन गेले. यातील 'करडे' या शब्दात असणारा फिकटपणाचा, कोरडेपणाचा समुच्चय पुन्हा विचारात घेतला पाहिजे. नंतर सगळे शहर अंजिरी झाले. आणि पुढे काळोखाने माणिक गिळून टाकले. या साऱ्या अवस्था एकाच वेळी शहराच्याही आहेत आणि देशाच्याही आहेत, कविमित्राच्याही आहेत. सर्वांच्याच समोर एकाएकी अंधार पसरल्यासारखा झाला. यानंतर सुतकीपणाचा प्रारंभ होतो. दगडी गाऊन घातलेले कारखाने विचारांत बुडाले. येथील कारखान्यांना असणारे हृदयशून्य गाऊन आणि या हृदयशून्यांनाही विचारांत बुडविण्याएवढा आघात पाहण्याजोगा आहे. यानंतर सगळेच ओले खमीस खांद्यावर टाकून खुराड्याकडे वळले. हे खुराड्याकडे वळणारे दगडी कारखानेही आहेत, मजूरही आहेत. इथे प्रेतयात्रेतन ओलेत्याने शेवटचा निरोप घेऊन दहनानंतर परतणारे अंतेवासीही आहेत. बंद कारखान्यांतून घरी परतणारे मजूर आणि प्रेतयात्रेतून ओलेत्याने परत येणारी माणसे या दोन्हींचाही संकर 'ओले खमीस' या प्रतिमेने झाला आहे. जे पाटी शेकवीत बसले होते, ते प्रथम करडे झाले. आता ओले खमीस खांद्यावर टाकून ते परतत आहेत. जणू प्रत्येकाच्या घरातील एक माणूस गत झालेला आहे. या भव्य दुःखाला अधिक गडद करणारी एक क्षुद्र पातळी आहे. ही क्षुद्र पातळी आज सुट्टी मिळाली या आनंदात बुडालेली आहे. एवढा मोठा आघात झाल्यानंतरसुद्धा माणसे या क्षुद्र पातळीवर का जातात ? कवीच्या मनात ह्याचा तिरस्कार नाही. यांनाही समजून घेण्याइतकी व्यापक सहानुभूती कवीजवळ आहे. कारण हे जग न संपणारा थकवा खांद्यावर घेऊन कायमचे उभे असणारे, शीण पेलणारे जग आहे. पाठी शेकवीत बसलेल्या घरांच्या शेजारीच आपला थकवा घेऊन तसेच रखडत उभे राहिलेले हे थकलेले जीवित आहे. या जीविताला खाटेवर कलण्याची या आघातामुळे संधी मिळाली. या सर्वांच्या मधोमध कवी उभा आहे. ज्यांना काळोखाने माणिक गिळल्याचा प्रत्यय आला, त्यांचाही कवी भागीदार आहे. जे खांद्यावर ओले खमीस टाकून परतले त्यांचाही, आणि जे खाटेवर कलले त्यांचाही. हा 'कलण्या'चा भाग एकदा वरच्या 'कलकलण्या'शी जोडून पाहिला म्हणजे पाटी शेकणारे आणि शीण पेलणारे यांच्यातील काही संबंध दिसू लागतात. या वातावरणात कवीला कागदी खोळीत उजेड घेऊन चाललेला हातगाडीवाला योगायोगाने भेटतो. हा योगायोगच म्हटला पाहिजे. कारण या वातावरणात जसा कागदी खोळीत उजेड घेऊन जाणारा भेटेल, तसा कागदी खोळीत अंधार घेऊन जाणाराही भेटेल. उजेड घेऊन जाणारा भेटला हा योगायोग, आणि 'वा! राव पुढे काळोख दात विचकीत असेल' असे तो म्हणाला, हाही योगायोग. पण या दोन्ही योगायोगांनी त्या काळोखाला नवा अर्थ दिला आहे. हातगाडीला नवा अर्थ दिला आहे. सगळ्या घटनेलाच एक नवे परिमाण दिले आहे. सुर्व्यांच्या कवितेतील अनेकार्थता संपेल की काय, याबद्दल हळहळणाऱ्या मंडळींनी या कवितेतील एकएका शब्दामधून निर्माण होणारी अर्थाची वलये पाहून घेतली पाहिजेत.
ही कथा फक्त 'नेहरू गेले त्या वेळची गोष्ट ' इतकीच नाही. जाणाऱ्याचा क्रम अखंड चालू आहे. प्रत्येकाच्या जाण्याची कथा पुन्हा निराळी आहे. असे अजून एक जीवनातून निघून जाणे 'घंटा' या कवितेत दिसेल. तिचे अखेरचे शब्द 'जातेरे ' असे उमटले आणि ती निघून गेली. मरण हा जाणाऱ्यांचा शेवट असतो. पण या ठिकाणी जाणाऱ्यांचाही हा शेवट राहिलेला नाही. कारण जाणारी नुसती गेलेली नाही तर जातानाही आपली जगण्याची इच्छा मागे ठेवून गेली आहे. तिचा एक उघडा डोळा मागे राहणाऱ्यावर रोखला आहे. आणि हा रोखलेला एक उघडा डोळा जाणाऱ्या जीवाची जाण्याची अनिच्छा दाखवणारा आहे. म्हणून 'जातेरे' हे शब्द आता निरोप घेण्याचे राहत नाहीत, तर त्यांचा अर्थ माझी जाण्याची मुळीच इच्छा नाही असा होऊ लागतो. याला जाणाऱ्याचाही इलाज नाही, राहणाऱ्याचाही इलाज नाही- या दोघांच्याही पराभवाचा एक मिटलेला डोळा आहे.
यापेक्षा अगदी निराळ्या पातळीवर वावरणारी कविता 'पोस्टर' ही आहे. ही कविता एकाचवेळी थकवा, दारिद्रय, स्वप्नरंजन, उत्साह, उल्हास आणि वैफल्य यांचे परस्परविरोधी धागेदोरे एकमेकांत गुरफटून टाकते. जेव्हा चार घरांतील चौघेजण पोस्टर -चिकटवण्यासाठी घराबाहेर निघत असतात, त्यावेळी म्हातारा काळोख खुरडत येत असतो. ज्यावेळी जग विश्रांतीकडे वळत असते, त्यावेळी हे चौघेजण नवे काम घेऊन बाहेर पडतात. एका बाजूने पाहिले तर ही कधीही न संपणाऱ्या दारिद्रयाची कहाणी आहे. दुसऱ्या बाजूने पाहिले तर तितक्याच अखंड असलेल्या उल्हासाची कहाणी आहे. कारण ही चार मुले आपल्या दारिद्रयावर कुंथत बाहेर पडलेली नाहीत. काम मिळाल्याच्या उल्हासाने ती बाहेर पडलेली आहेत. त्यात कुणी शिंदे आहे. त्याच्या बायकोचा सद्गुण ती 'खळ चांगली करते' हा आहे. एक इसल्या आहे. त्याची आई मोठी 'कडक बाई' आहे. आपल्या मुलाने उडाणटप्पूपणा करावा असे तिला वाटत नाही. तिची नजर चुकवृन तिच्या मुलाला बोलवावे लागते. दाराशी एक कुत्रेही आहे. या कुत्र्याच्या अंगावर पाय न पडता आलो हीच हुशारी. ज्या जगात खळ चांगली करता येणं हा स्त्रीत्वाचा विलोभनीय सदगुण आहे, त्या जगात डोळा चुकवून पळालो हीच कर्तबगारीची कथा राहणार. हा सगळाच पोस्टर चिकटवीत हिंडणाऱ्या दरिद्री जीवनाचा भाग आहे. पण त्यालाही विविध परिमाणे आहेत. प्रत्येकाची मैना त्याची त्याला प्यारी असते. तिच्याकडे इतरांचे लक्ष जाऊ नये, याची या मुलांना काळजी आहे. पोलीस हा त्यांच्या कायम शत्रुत्वाचा भाग आहे. त्याच्या डगल्यावर एखादे पोस्टर चिकटवावे काय हा विचार मनात येणे हा खोडकरपणाचा भाग. रात्र अशी जाते आणि जेव्हा जग जागे होत असते, झाडाची पाने सळसळत असतात, तेव्हा हे थकून घरी परत येतात. जेव्हा काळोख म्हातारा होऊन खुरडत असतो, तेव्हा हे उत्साहाने उतू जात असतात. जेव्हा पाने सळसळत असतात, तेव्हा हे थकून झोपण्याच्या अवस्थेत आलेले असतात. या जगाला राजकारणाविषयी आस्था किती आहे ? मुळीच नाही. तिकडे मीटिंग चालेल या सूचनेला उत्तर 'मला झोप येत आहे, मरो ती मीटिंग' इतकेच आहे. सुर्व्यांची कविता प्रचाराला बांधलेली आहे हे म्हणणाऱ्यांच्या नजरेतून अशी ठिकाणे सुटावीत हे स्वाभाविक आहे ! या जीवनात मरणे ही गंभीर गोष्टच नाही, मरायचे असेल त्यांनी चटकन मरावे, ताबडतोब स्मशानात पोहोचवून उरलेले परततील आणि झोपी जातील. पण ह्याही जगाला एक विरंगुळा आहे. एक स्वप्नरंजन आहे. त्यांनाही चंद्र पाहावासा वाटतो. गझला गाव्याशा वाटतात. वर्गणी जमवून का होईना पण इसल्याचे लग्न करावेसे वाटते. इसल्याचे लग्न करण्यास सर्वोचा पाठिंबा आहे. कारण आज वर्गणी जमा करून इसल्याचे लग्न केले, तर उद्या आपलेही लग्न होईल अशी अंधुक आशा आहे. आपल्याही दारात सनई वाजेल ही आशा असल्यामुळेच दुसऱ्याची मैना जिथे राहते, तिथे पोस्टर चिटकवण्याची इच्छा नाही. घरच्या मंडळींच्याविषयी काही रोखठोक सद्भावना आहेत. बुढ्यासाठी चष्मा घ्यावा यावर एकमत होण्याइतकी कृतज्ञता अजून शिल्लक आहे. आणि हे जग किती पुढे गेले याची जिज्ञासाही अजून जागी आहे. एका बाजूने पाहिले तर पोस्टर डकवीत जाणारे आणि पोस्टर चिकटवण्यात मरणारे असे हे एक क्षुद्र जग आहे. दुसऱ्या बाजूने पाहिले तर चंद्राविषयी आस्था, बुढ्याविषयी कृतज्ञता, आणि संसाराविषयी आशा शिल्लक ठेवणारे हे एक चिवट आणि जिद्दीचे जग आहे. ज्या क्षणी एखादा रोगच सगळे शरीर सुजून आल्यामुळे बाळसे दाखवू लागतो, त्यावेळी ते दर्शन जसे चमत्कारिक वाटते, तसा या कवितेचा प्रकार आहे. या कवितेत हसणे, खिदळणे, उल्हास, स्वप्नरंजन या सगळ्याच बावी कायम व्यथेच्या गटारात पुन्हा पुन्हा उगवणाऱ्या बुडबुड्यांसारख्या एका बाजूने दिसतात. दुसऱ्या बाजूने काही बुडबुड्यांवर इंद्रधनुष्याचे काही रंग उमटलेले दिसतात. अशा कथा सुर्त्यांच्या कवितेत सारख्या पसरलेल्या आहेत. या कथांमध्ये 'माझे विद्यापीठ' हीच एक प्रदीर्घ कथा आहे. सुर्व्यांच्या कवितेतील सगळे सामर्थ्य अशा वेळी उचंबळून येते आणि त्यांचा साधासुधा शब्द एकाच वेळी अर्थघन होऊ लागतो, उत्कट होऊ लागतो.
शेवटी शब्द हाच प्रत्येक कवीचे हत्यार असतो. ज्याची मनात कल्पना नसेल असे अर्थ व्यक्त करणाराही शब्द असतो, आणि अनंत व्यथा बोथट करून टाकणाराही शब्द असतो. या शब्दांची जपणूक करणे, त्या शब्दांचा विचार करणे प्रत्येक कवीला भागच असते. कालिदासासारखा महाकवीसुद्धा पार्वती-परमेश्वराला आणि शब्दार्थांच्या कायमच्या जोडप्याला एकत्रित नमन करून टाकतो. नवकाव्याचे जनक मर्डेकर यांना शब्दाची फार चिंता होती. शब्दाच्या तुमानीत आशयाचे शरीर मावेलच, याची कुणीच खात्री देऊ शकत नाही. कित्येकदा ही तुमान दाटून जाते. आशयाला रखडत चालावे लागते. कित्येकदा ही तुमान फाटून जाते. ही शब्दाची तुमान फाटून जावी आणि त्यातील उघडानागडा आशय बाहेर पडावा असेही कधी वाटते. तर द्रोपदीची लाज जशी राखली गेली, तशी आपल्या भाषाशरीरात म्हणजे शब्दांची लाज राखली गेली, तरच आशय शिल्लक राहू शकेल असेही वाटू लागते. शब्दांविषयी असणारी ही जाणीव कमीजास्त प्रमाणात प्रत्येक कवीमध्ये आढळते. सुर्व्यांना या शब्दांचा मोहही आहे, त्यांचा तिरस्कारही आहे. कारण शब्द जसे मित्र आहेत, तसे शब्दच शत्रूही आहेत. हे शब्द परिचारिकांप्रमाणे आशयाची सेवा करणारे असावेत, कामगारांच्याप्रमाणे आशयाची निर्मिती करणारे असावेत, ही अपेक्षा करणे ठीक आहे. पण नेहमीच शब्द असे असतील याचा नेम नाही. काही शब्द खाटकाने ओळीने मांडलेली, सोलून ठेवलेली मृत शरीरे असावीत त्याप्रमाणे विक्रीसाठी मांडलेले, वापरापूर्वीच मृत झालेले असतात. काही शब्द माणसांप्रमाणे घाटगे झालेले असतात. समर्थ शब्दसुद्धा तापून, शेकून निघाल्याशिवाय समर्थ होत नाहीत. शहर तापले म्हणजे शब्द तापतात. जीवनाचा अग्नी जेव्हा शब्दांत साठला जातो, तेव्हा तो धगधगीत शब्द ओठांओठांवर ओक्ला जातो. तो पिढ्यापिढ्यांचे मनोगत सांगू लागतो. पण याही शब्दांना चकवा देणारे हुजरे असतात. ते साय पांघरून बसतात. प्रेमळपणे येणाऱ्या-जाणाऱ्यांना आश्वासन देतात आणि चुकीच्या रस्त्याने वाटभूल करून टाकतात. ही वाटभूल झाल्यानंतर शोधणाऱ्यांची आणि शब्दांची गाठभेटच पडत नाही. कारण शब्द हा जिवंत करावा लागतो. आणि जे स्वतः जीवन जगतात, त्यांना शब्द जिवंत करतात. काही शब्द गिरवणारे असतात. काही भाषेची मोडतोड करणारे असतात. त्यांना जगणेही जमत नाही, शब्द जिवंत करणेही जमत नाही. असे हुन्नरी लोक, काही बाटगे शब्द, काही साय पांघरलेले शब्द भोवताली असल्यामुळे आपल्या शब्दांना सतत सावध ठेवावे लागते. भोवताली असणाऱ्या हुन्नरी, बाटग्या, साय पांघरलेल्या आणि मृत अशा शब्दांच्या पाहन्यातून आपले शब्द वाचवावे लागतात. शब्दच शब्दांना बांधून टाकणारे साखळदंड तयार करतात. या साखळ्यांपासून दूर राहावे लागते.
' खरे म्हटले तर शब्दांची इतकी गरज नसतेच. कारण जगण्यासाठी फारच थोडे शब्द लागतात. मरण्यासाठी तर तितकेही लागत नाहीत. जिवंत राहणे आणि जगणे याहून पलीकडे ज्यांना काही काम असते, ते युगायुगाचे भणंग असले तरी त्यांना मधुघट जोपासायचे असतात. त्यांना नवे चंद्र शोधायचे असतात. त्यांना आपल्या शब्दांतून अश्रू जतन करायचे असतात. विजयाच्या क्षणापर्यंत आपली कथा टिकवायची असते. त्यांना फक्त शब्दांची चिंता करावी लागते. म्हणून शब्दांची गरज माणूस जगण्यासाठी नसते. माणुसकी जगविण्यासाठी असते. असे हे शब्द पाहुणे म्हणून येतात आणि जिवाला चटका लावून निघून जातात. ज्यांना नेहमी चालतच राहावे लागते, त्यांची केवळ माणसांचीच ताटातूट होत नाही तर मुक्कामाचीही होते. कधी शब्दांचीच ताटातूट होते. शब्दांची ताटातूट झाली म्हणजे उदास वाटू लागते. या शब्दांच्याबरोबरच वाहवत जावे असे वाटू लागते. पण मन घट्ट करावे लागते, आणि शब्दांना पोहोचवून यावे लागते. हे पाहुणे शब्द पुनः पुन्हा यावेत, त्यांना आपल्या मनातील कढ समजावेत, यासाठी शब्द जिवंत ठेवणे भाग आहे.
ज्याला आपण शब्द जपणे म्हणतो, त्या रूढ अर्थाने सुर्व्यांची कविता ही शब्द जपणारी कविता नाही. कारण, तिला शब्दांच्या नादाचा मोह नाही. वेचक नवेनवे शब्द हुडकून काढावेत, शब्दांच्या व त्यांच्या मांडणीचे प्रयोग करावे, असा जाणीवपूर्वक प्रयत्न सुर्व्यांच्या कवितेत नाही. या दृष्टीने सुर्व्यांची कविता नवकवितेतील अभिव्यक्तीच्या सर्व तिरकसपणाच्या प्रयोगांना तुच्छ करून टाकणारी कविता आहे. मराठी नवकवितेला अभिव्यक्तीच्या तिरकसपणाचे एक स्वतंत्र महत्त्व वाटते. जणू तिरकसपणा हेही वाङ्मयीन मूल्य आहे, असे या कवितेत गृहीत धरले आहे. जे सरळ सांगताच येणे शक्य नाही ते सांगण्यासाठी भाषा वाकडीतिकडी करावी लागली, तर ते आपण क्षम्य मानू , किंवा अशावेळी भाषेचे शरीर मुद्दाम पिरगाळून वाकडीतिकडी करणेही आपण अपरिहार्य मानू . कारण अशा ठिकाणी मांडणीची पद्धती सरळ ठेवण्याच्या नादी लागून आशयाची मान मुडपून टाकण्यापेक्षा, आशयाचे जिवंत स्पदंन शिल्लक ठेवण्यासाठी भाषेची बोटे तिरपी करणे भाग असते. पण ज्यावेळी आपला तिरकसपणा आणि तिरकस राहण्याचा स्वभाव हा भाषेला हक्क वाटू लागतो, त्यावेळी पुन्हा एकदा या प्रश्नाचा नव्याने विचार करावा लागतो. उदाहरण म्हणून आपण खालच्या ओळी पाहू शकतो. मर्ढेकरांनी ज्यावेळी " पिपात मेले ओल्या उंदिर" अशी रचना केली, त्यावेळी आपण " ओल्या पिपात उंदीर मेले" असे मर्ढेकरांनी का म्हटले नाही याचा विचार करू शकतो. त्यांना पीप आणि मरून पडलेले उंदीर ही प्रतीके ज्या अर्थाने वापरायची आहेत, तो अर्थ नेमका करण्यासाठी अशी रचना करावी लागते, हे मान्य करता येते. पण सर्वच ठिकाणी हा प्रकार नसतो. काही ओळी अशाही असतात-
याठिकाणी असा प्रयोग आवश्यक होतो किंवा नाही, यावर दुमत संभवते. पण असे तिरकसपणाचे प्रयोग का करावेसे वाटू लागतात, याचे उत्तर दिले पाहिजे. खऱ्या कवितेत शेवटी आशय आणि अभिव्यक्तीचे अद्वैत असते. ज्या कवितेत अभिव्यक्तिपद्धतीची आशयातून भिन्न अशी निराळी जाणीव होऊ लागते, तिथे कवितेवर तंत्रवादाने मात केली आहे असे म्हटले पाहिजे. तंत्रवाद ही एक वृत्ती आहे. तो सांकेतिक कल्पना विलासाच्या रूढ राजरस्त्यानेच येईल असे नाही. आरंभ-शेवटाची चिरेबंदी इमारत इतकेच तंत्रवादाचे रूप नसते. आशयापेक्षा निराळी अशी स्वतःकडे लक्ष वेधून घेणारी प्रत्येक क्लुती हा तंत्रवादाचा एक भाग असतो. म्हणून ज्या कवितेत आशयच प्रधान असतो, आणि त्याला योग्य वाहन इतकेच अभिव्यक्तीचे स्थान असते, त्या कवितेत शब्द हा शरीराशी अवयव एकजीव व्हावा तसा कवितेशी एकजीव झालेला असतो. आधुनिक मराठी कवितेत रचनेच्या दृष्टीने सुर्व्यांच्याइतकी साधी कविता इतर कोण्याही कवीची नाही. सुर्वयोच्या या साधेपणाची तुलना जर आधुनिक काळात कुणाशी करता आली, तर ती फक्त बहिणाबाई चौधरींच्याबरोबर करता येईल. मर्ढेकरांच्या कवितेतील अशा साधेपणाचे स्वरूप निराळे आहे. “टिऱ्या-अर्धपोट । जोवरी आहेत । ओंगळ समस्त | आम्ही नंगे ॥” असे मर्ढेकरांनी म्हटले आहे. “ नाही कुणी जर कुणाचा | बापलेक मामा भाचा । मग अर्थ काय बेंबीचा । विश्वचक्री ।। " असेही मर्ढेकरांनी म्हटले आहे. पण ज्या ठिकाणी मर्ढेकरांची कविता इतकी रोखठोक होते, त्यावेळी ती आपली बहुतेक सर्व काव्यमूल्ये गमावून बसलेली असते. मर्ढेकरांच्या समर्थकांनीही " 'काही कवितां 'तील कवितांमध्ये मर्ढेकरांचा आवाज चिरका होऊन फाटला आहे" असेच म्हटले आहे. बहिणाबाईचे तसे नाही. “ बिना कपासीनं उले । त्याले बोंड म्हणू नाही । हरिनामा इना बोले। त्याले तोंड म्हणू नाही ॥” हा बहिणाबाईंचा प्रयोग नाही. त्या कवितेची ही प्रकृतीच आहे. बहिणाबाईंची कविता सर्व दुःखे पचवून त्यावर मात केलेल्या तृप्त श्रद्धाळू मनाची कविता आहे. सुर्व्यांची कविता तशी दुःख पचविलेली आहे, पण ते त्यांच्या रक्तातून जागे आहे. हा दोन कवितांच्यामधील प्रकृतिभेद मान्य केला, तरी रचनेचा साधेपणा आणि सरळपणा शिल्लकच राहतो. वरवर पाहताना त्यामुळे सुर्व्यांची कविता गद्याच्या अगदी जवळ सरकल्यासारखी दिसू लागते. ती मनातल्या मनात वाचताना तर त्या कवितेची लयही जाणवत नाही. कारण सुर्व्यांच्या कवितेला रचनेची फारशी लय नाही. त्या कवितेत जी लय आहे, ती त्या कवितेतील आशयाची आहे. आशयाशी इतकी एकजीव झालेली आणि रचनेची सर्व प्रावरणे फेकून देऊन फक्त शब्द हेच शरीर धारण करणारी अशी ही कविता आहे. तरीही या कवितेत एक आंतरिक ताल आढळतो. तो ताल आणि लय व्यथेशी सहकंप घेणे आणि कथेचे तटस्थपणे दर्शन घेणे यांतून निर्माण झालेला ताल, लय आहे.
एका समीक्षकाने या कवितेला प्रयोजक लय आहे असे म्हटले आहे. हा प्रयोजक लयीचा मुद्दा एका चुकीच्या गृहीतकृत्यावर आधारलेला आहे. ही कविता प्रयोजक आहे. या समजुतीतून हा मुद्दा उपस्थित होतो. सुर्व्यांच्या कवितेला असे कोणते प्रयोजन आहे काय ? ती आपल्या वाचकांकडून कवीसाठी कीव, अनुकंपा, दया मागणारी कविता आहे काय ? एखाद्या लढाईच्या रथाला कवितेने स्वतःला जुंपून घ्यावे आणि इतरांना साह्यासाठी आवाहन करावे, असे या कवितेचे रूप नाही. 'माझे विद्यापीठ 'सारख्या कवितेतसुद्धा कवी याकब नालबंदवाला दंग्यात मेला म्हणून सांगतो. दंगे का होतात ? आणि ते टाळाण्यासाठी कोणती उपाययोजना करावी हे सांगत नाही. फक्त कवीच्या डोळ्याला पाणी येते. चंद्रा नायकिणीच्या पुढ्यातला पोर युद्धाचे गिधाड अलगद उचलून नेते, त्यामुळे त्या नायकिणीने किंवा कवीने कायमच्या शांततेसाठी एखादी प्रचारआघाडी उघडलेली नाही. कवीलाच पोटाशी धरून ती नायकीण आपल्या वात्सल्याला एक अधिष्ठान शोधते. आफ्रिकी चाचा काम करणे नाकारतो. कवी त्याचा संपाचा हक्क सांगत नाही, संपाचे औचित्य सांगत नाही. तो फक्त काम केले नाही तर पोट कसे भरेल इतकेच विचारतो. कवीला आठवतो आहे तो चाचाचा पाठीवरून फिरविलेला हात, सद्गदित झालेला गळा, एक गळून पडलेला अगतिक अश्रू. या सगळ्यांचे प्रयोजन काय आहे ? या उघड्यानागड्या नागव्या जगात वावरताना कवीने टिपलेल्या अनुभवांना कोणतेही बाहेरचे प्रयोजन नाही. त्या अनुभवाचे मोठेपण त्या अनुभवातच आहे. दोन देत, दोन घेत जगायचे आहे; हे जगताना 'पापणी ठेवीन जागी' इतकेच कवीचे आश्वासन आहे. ही कविता प्रयोजनवती आहे हा मुद्दा गृहीत धरायचा आणि मग तिची लय प्रयोजक लय आहे असे म्हणायचे, यात काहीच अर्थ नाही.
याच मुद्दयातून निर्माण होणारा दुसरा एक उपसिद्धान्त आहे. जी कविता प्रयोजनवती असते, तिचा उद्देशच डिवचून जागे करणे हा असतो. या कवितेचे स्वरूप व्याख्यानासारखे असते. आणि त्या व्याख्यानाला एक शैली असते. ही शैली जितकी प्रक्षोभक असते, तितकी परिणामकारक असते. पण तितकीच ती अर्थघनतेच्या दृष्टीने, अनुभवाचे व्यक्तिवैशिष्टय टिकविण्याच्या दृष्टीने पोकळ आणि निर्जीव असते. सुर्वे यांची कविता अशी पोखरलेली कविता आहे, हा तो उपसिद्धान्त आहे. या उपसिद्धान्ताचा मूळ पायाही कविता प्रयोजनवती आहे हा असतो. त्यामुळेच या कवितेला अनेकपदरी अनेकार्थसूचकता आहे की नाही हा प्रश्न निर्माण होतो. सुर्व्यांची कविता वरवर दिसताना तरी गद्याच्या अगदी जवळ गेलेली असते आणि त्यांच्या कवितेतील प्रतिमा न जाणवण्याइतक्या आशयाशी एकजीव झालेल्या दिसतात. म्हणून या कवितेत प्रतिमांचे वैभवच नाही असे समजणे चुकीचे होईल. एक गोष्ट खरी आहे की, आशयाकडे डोळेझाक करण्यास भाग पाडणाऱ्या, स्वतःकडे स्वतंत्र लक्ष वेधून घेणाऱ्या प्रतिमा या कवितेत नाहीत. पण याही कवितांना स्वतःचे असे एक प्रतिमांचे सामर्थ्य आहे. उगवत्या रोपाची दोन्ही पाने जुळलेली असतात. हे पाहताच बहिणाबाईना उगवणाऱ्या सूर्यनारायणांना ही पाने नमस्कार करीत आहेत असे वाटू लागते. बहिणाबाईच्या श्रद्धाळू मनाशी आणि जीवनाशी एकजीव झालेली ही प्रतिमा आहे. अशा प्रतिमा जागजागी सुर्व्यांच्या कवितेत आहेत. त्यांना भाकरीचा चंद्र दिसतो. कारखान्यांनी दगडी गाऊन घातलेले आहेत. मेलेले शब्द खाटकाच्या दुकानात हारीने मांडलेल्या धडांसारखे आहेत. जन्म पोक असलेल्या म्हाताऱ्या घरात होतो. भोवतालचे जग पाठ शेकवीत बसलेले आहे. स्मृतीच्या दगडांवर त्यांचे मन ऊन खात बसते. तिसऱ्या पाळीच्या कामगाराप्रमाणे विचार मनात येतानाच थकलेले असतात. काही शब्द कुदळ घेऊन रस्ता खोदणारे असतात. काळोख कोरीत कुठे जीव जगतो तर वाघुट आटवून चाललेल्या भोयांप्रमाणे मन दबकत जाते. एका बाजूला अंधार उसवणे आणि उजेड शिवणे चालू असते. दुसऱ्या बाजूला प्रकाश माळून उत्सव करणाऱ्या वाटा असतात. कुठे बुटका उजेड पहारा करतो, शब्द साय पांघरलेले असतात. म्हातारा काळोख खुरडत येतो. काळोखाच्या गार वेटोळ्यात जीवन झोपलेले असते. कलंडणाऱ्या दौतीतील शाईसारखा समुद्र निळा असतो. वेश्यांच्याप्रमाणे शब्द डोळे उचलतात, आणि डोळा घालून जवळ येण्यास खुणावतात. आत्मा चुलाण्यात फडफडणाऱ्या लाकडाप्रमाणे फडफडतो. कवीला ब्रह्मांडात हंबरत हिंडता येत नाही. स्वतःच स्वतःच्याजवळ दया मागणारे त्याचे केविलवाणे हात याला कधी दिसतात.-अशा प्रतिमा ओळीओळींतून विखुरलेल्या आहेत.
पण तारे, वारे आणि लाटा, फुले, पाने आणि चंद्र यांच्याशीच कवितेतील प्रतिमासृष्टी निगडित असते असे ज्यांना वाटते, त्यांना ' किनाऱ्यावर ओझे उतरतात तसा शीण उतरून ठेव' ही प्रतिमा वाटणे कठीण आहे. या मंडळींनी 'दगड' ही कविता मुद्दाम वाचली पाहिजे. कारण या कवितेत अजून पाय मुडपून न निजलेली लाट आहे. न कललेला चंद्र आहे. प्रियेचे फूल पण तिला विसरलेले नाही. आणि दूरवर उजेड नांगरून पडला आहे. आणि ही कविता तारा पिळून सुरांत जुळलेल्या सतारीसारख्या सूरगर्भ प्रेयसीशी बातचीत करणारी आहे. क्रांती वगैरेची तिच्यात काही भानगड नाही. सुर्व्याच्या कवितेतील या प्रतिमांना जिवंत अनुभव साकार करण्याच्या संदर्भात महत्त्व आहे, म्हणून त्या जाणवत नाहीत. पण या प्रतिमा सांकेतिक नाहीत. त्या अनुभवाचे शरीर झालेल्या आहेत, हे नाकारता येत नाही.
म्हणून सुर्व्यांची कविता गद्याच्या अगदी जवळ गेलेली पण कविता आहे. उलट एखाद्या सुंदर तरुणीने विभ्रमाचे आणि कपड्याचे शिष्ट अडथळे झुगारून देऊन सरळ वेभान आलिंगन द्यावे, असे पाहतापाहता वाचकांच्या मिठीत हरवून जाणारे असे या कवितेचे रूप आहे. अनुभवाचा ताजा जिवंतपणा हेच तिचे सामर्थ्य आहे. जिवंतपणाच्या खात्रीवर उरलेली रचनाप्रयोगाची पांघरुणे तिने आधीच झुगारून दिलेली आहेत.
सुर्व्यांच्या कवितेकडे एका कम्युनिस्टाची प्रचारकी कविता म्हणून पाहण्यात सारेचजण इतके गढलेले आहेत की या कवीच्या जीवनात एका मार्दवाचा जिवंत पन्हाळ आहे, ज्या पन्हाळाने काळोख पांरुणाप्रमाणे आश्वासक केला आहे, आणि दुःख मिठाप्रमाणे रुचकर व मधुर केले आहे हे त्यांना जाणवतच नाही. कवितेचा हा भागच सहसा त्यांच्या कधी लक्षात येत नाही. ही कहाणी केवळ 'मी'ची कहाणी नाही. ती 'मी'च्या सहचारिणीचीसुद्धा कहाणी आहे. किंबहुना या विद्यापीठात हा विद्यार्थी शिकत राहिला तो या प्राध्यापकाच्या आधाराने. हा आधार जर नसता तर विद्यापीठातून विद्यार्थी केव्हाच पळून गेला असता. सुर्व्यांच्या कवितला प्रेमभावनेचे, वासनेचे रंग आहेत. संसाराचा गंध आहे. फक्त त्याचे रूप आमच्या साच्यात बसत नाही. पण म्हणून ते नाकारायचे की काय ? याचे उत्तर या कवितेच्या चाहत्यांनी दिले पाहिजे. सामान्यत्वे कवितेत वासनेला आणि भावनेला एक स्वयंभू महत्त्व आलेले असते. हे त्या त्या क्षणी त्या अनुभवाचे स्वयंभू व स्वयंपूर्ण असणे हा जीवन-वास्तवाचा एक भाग आहे. प्रेममीलनाच्या क्षणी त्या मीलनाचाच एक उन्माद आणि उल्हास असतो. तिथे बाकीचे सगळे संदर्भ निदान त्याक्षणी रद्द होऊन जातात. पण जीवनाच्या या वास्तवाला अजून एक दुसरी बाजू आहे. आणि ही बाजू वास्तवाचाच एक भाग आहे. ज्याचा जगण्यासाठी लढा चालू आहे, त्यांचे मन या लढ्यातून कधी मोकळे होऊच शकत नाही. मग भावनांना आणि वासनांनाही कुठेकुठे वास्तवाचे पदर प्राप्त झाले आहेत, कुठे वास्तवाच्या चौकटी पडल्या आहेत, असे जाणवत राहते. सुर्व्यांच्या कवितेतील प्रेयसीचे चित्र हे नुसते प्रेयसीचे चित्र नाही, तर ते भक्कम सहकारिणीचे, आधार देणारीचेही चित्र आहे. आणि प्रेरकाचे, मार्गदर्शकाचेही चित्र आहे. येथे प्रिया प्रेयसी म्हणून, सहकारी म्हणून, आणि नियंत्रक म्हणून एकाच वेळी उभी राहते. पण त्यातून जन्मणारी कहाणी एकमेकांची नाही. ती एक सांसारिक कहाणी होऊन जाते.
एक दिवस ही प्रेयसी कवीच्या जीवनात त्याची पत्नी म्हणून प्रवेश करते. या आधीचा सगळा भाग जणू या कवितेने रद्द करून टाकला आहे. म्हणून भेटी, आठवणी, हुरहूर, लज्जा, अस्वस्थता, काहूर, आश्वासने, आतुरता हा सगळा पूर्वभाग या कवितेतून पुसलाच जातो. मीलनापासूनच या कवितेला आरंभ होतो. जणू जबाबदारीने एकमेकांची जीवने संलग्न केली, इथूनच नात्याला आरंभ झाला. पण या मीलनाच्या क्षणालाही पुन्हा वास्तवाचे संदर्भ आहेत. पलीकडे खडखडणारे कारखाने आहेत. खोल्या-खोल्यातून अंथरलेले बिछाने आहेत. ईश्वराच्या नावे मुल्लाने दिलेली शेवटची हाक आहे. शेवटी या नव्या जोडप्याने एकत्र यायचे कुठे ? भावंडांना घेऊन आईने कोनाडा जवळ करावा आणि बापाने फुटपाथवर जाऊन झोपावे, तेव्हा एकान्त मोकळा होतो. म्हणूनच या एकांताला मीलनाची, समर्पणाची ओढ आहे. शब्दांची गरज नाही. तेव्हाही रात्र घुमी होती. आजही रात्र घुमी आहे. वास्तवाचा हा संदर्भ असला तरी ओठ गरम असतात. रात्री ओढाळ असतात. ओठ खडीसाखर होतात. या रतीचा शेवट रती नाही. रतीचा शेवट नव्या पिढीचा जन्म आहे. या नव्या पिढीचा जन्म जसा एक आनंद असतो, तशी एक जबाबदारीही असते. एक टप्या अधाशीपणे घुम्या रात्रीत हरवण्याचा असतो; दुसरा टप्या या काठावर विसावण्याचा असतो. पण भाकरीचे प्रश्न कधी संपत नाहीत. कोनाडा कितीही हळहळला, तरी न टळणारे एकच उत्तर असते ते म्हणजे, 'बाबा नारायणा, उद्यापासून तिलाही काम पाहा.' या चौकटीत सुर्व्यांच्या कवितेत वासनेला जागा आहे.
ही प्रेयसी नुसती रतीची सहचारिणी नाही. ती घराच्या उभारणातील एक महत्त्वाची भागीदारीण आहे. ती जेव्हा दमून घरी परत येते, तेव्हा सगळे आकाशच छानसे पाखरू होऊन खिडकीत येऊन बसते. तिच्याबरोबर श्वास बाहेर जातात, दम कोंडला जातो. ती घरी आली म्हणजे श्वास पुन्हा सापडतात. या तिच्या सहकार्यामुळे तिच्या आणि कवीच्या जीवनाचे धागे एकत्र गुंफले जातात. तिच्याही कष्टाची जाणीव होऊ लागते. त्याच्या कवितेवर तिच्या शब्दांचा पाहारा असतो. इच्छांचे घर लेखणीने टोकरले जात असते. त्यावर दोघांच्याही आकांक्षा कवितेत गुंडाळल्या जातात. शेजारी तिच्या गालांचा गारवा असतो. तीच या तप्त जीवनात हिरव्या फांदीची सावली आहे. तिच्या पापणीच्या पाहाऱ्यात सगळे चांदणे घरट्यात उतरू लागते आणि कवी आपलेच पंख पसरून मोराप्रमाणे नाचू लागतो. तिच्या पापणीच्या पाहाऱ्यात याची कविता असते, तर तिच्या झोपेवर याचा पाहारा असतो. चंद्रावळ खुराड्यात दमून निजलेली असते, कवी शब्द जुळवीत उशाशी बसलेला असतो. एकेक स्वप्न सारिका होऊन तिच्याशी बोलत असते. अशावेळी झोपेतल्या कृष्णाबरोबर सारे गोकुळ खेळत असते. अक्रुरांच्या सैनिकांनी येऊन ही झोप मोडू नये असे कवीला वाटते. सौख्याच्या इच्छा श्रीमंतांनाच असतात असे नाही. दारिद्रयातही स्वप्न रंगत असते. असे वाटते, सगळे विसरून जावे, तिला घेऊन निळ्या समुद्राकाटी जाऊन सुखदुःख विसरून शांत पडावे, रात्र संपूच नये. माझ्या बाहूत तिने स्वप्ने पाहावीत. पण या स्वप्नरंजनाला अर्थ नसतो. असे वाटणारे क्षण माघारी निघून जातात. कारण लोकल धरायची असते.
ही आपल्या प्रिय सखीची जाणीव सारखी कवीच्या मनात डाचत असते. जेव्हा ती जवळ नसते, तेव्हाही मन तिच्याचभोवती घिरट्या घालीत असते. उदास काळोखात झाडांची पाने सळसळत असतात. आता ती कूस बदलत असेल. कदाचित आता ती उठली असेल. कदाचित कापल्या ओळीवर अश्रू टपटपत असतील. पण हा एकमेकांच्या आठवणींचा धागा परिपूर्ण नाही. तिथेच अजून एक परिमाण आहे. ते संसाराचे आहे. कारण कदाचित ती बाळ-अंगाखालील चिरगुटेही बदलत असेल. तिच्याभोवती मन असे गुरफटलेले असल्यामुळे निसर्गाशी तन्मय होणे कठीण आहे. पावसाळासुद्धा केवळ पावसाळा न राहता त्याचे स्वरूप या ठीकाणी बदलून जाते. प्रत्येकाने पावसाळ्याचे वर्णन निराळे केले आहे. आकाश ढगांनी व्यापून गेले म्हणजे कुणाचा विरह अधिक तीव्र होतो. पावसाची पहिली सर आल्याबरोबर सबंध संसार जीवनमय झाल्यासारखे कुणाला वाटू लागते. धावणाऱ्या क्षणाला ओलसर गोडी येते, मेष लाल कौलारे हुंगू लागतात, असे कुणाला वाटते. पण ज्यांची जगण्याचीच लढाई चालू आहे, त्यांच्यासाठी पावसाचा आरंभ हा नव्या दुःखाचा आरंभ असतो. फुटपाथवर झोपणाऱ्यांना पावसाच्या सरी फारशा नयनरम्य वाटणे शक्य नसते. आकाश ढगांनी भरून येते. त्याचा उन्मत्त गडगडाट चालू राहतो. विजेच्या आसुडाने रस्ते आणि मेघ दुभंगल्यासारखे वाटू लागतात. या वादळात दबलेला सगळा गाळ वर येतो. पण कवी निसर्गाच्या या रौद्र रूपात हरवू शकत नाही. कारण या पाण्याने भरलेल्या वाटांवरून दोन पोरे सांभाळीत ती घरी कशी येईल, हा प्रश्न त्याला पडतो. ही जगण्याची लढाई निसर्गाकडे कवीला मुक्तपणे पाहू देण्यास तयार नाही.
अशा सर्व ठिकाणी एक प्रश्न पुनःपुन्हा निर्माण होतो की, भोवतालचे जग अशा रीतीने स्वतःच्या संदर्भात पाहणे उचित आहे काय ? जेव्हा पावसाळा येतो तेव्हा गळणाऱ्या घराची चिंता; जेव्हा हिवाळा येतो तेव्हा प्रावरणांच्या टंचाईची चिंता, आणि जेव्हा उन्हाळा येतो तेव्हा पायाचे तळवे होरपळणार याचीच चिंता! या चिंतेतच सगळा जन्म जायचा काय ? या चिंतेतून मुक्त होऊन मुलाकडे फूल म्हणून पाहता येणे, डोळ्यांकडे डोळे म्हणून पाहता येणे कधीतरी आवश्यक नाही काय ? प्रत्येक सौंदर्याला एका प्रयोजनातच गुरफटणे भाग आहे काय ? रतीकडे निर्मितीची पूर्वअवस्था म्हणूनच पाहायचे काय ? जीवनाचा कोणताही क्षण मागच्या पुढच्या संदर्भातून वेगळा न करणे हे उचित आहे काय ? यांतील औचित्याच्या प्रश्नाचे उत्तर हे प्रत्येकाने आपल्या अभिरुचीप्रमाणे निराळे दिले पाहिजे. पण हे घडणे अपरिहार्य असते. ज्यांचे अस्तित्व वाहत चाललेले असते, त्यांना काठ हवा असतो. ज्यांचे अस्तित्व गाळात रुतलेले असते, त्यांना मोकळीक हवी असते. ज्यांची लढाई सांस्कृतिक पातळीवर चाललेली असते, ते संवेदनक्षमतेचा विकास करीत प्रत्येक क्षणाचे वेगळेपण आणि अपूर्वत्व टिकविण्यासाठी धडपडत असतात. त्यांच्यासाठी केसांचे काळेपण भुंग्यांच्या काळेपणापेक्षा निराळे असते. पण ज्यांची लढाईच जगण्यासाठी चाललेली असते, ते आपले अस्तित्वच टिकविण्याच्या प्रयत्नात उभे असतात. त्यांच्यासाठी सगळे रंग सारखेच फिके असतात. भाकरीचा एकच रंग इंद्रधनुष्यापेक्षा लोभस असतो. या संघर्षात जे गुंतलेले असतात, त्यांच्या भावनेतही जिवंत असा आवेग असतो. या कवितेत प्रतिक्रियांना एक उत्कटता असते. पण सगळ मागच्या-पुढच्या संदर्भात रुतलेले असते. असल्या प्रकारचे जीवन जगणारा कवी 'बोटांची पावले केसांच्या कडेवरून घसरतात आणि बोटांचे चवडे तोल सावरताना थकून जातात' या भाषेत केस पाहत नसतो. त्याच्यासाठी सगळाच केशसंभार थकलेला शीण उतरून ठेवण्यासाठी एक खुंटी असते.
अशा कवितेत रती ही निर्मितीसाठी असते, आणि प्रीतीची कसोटी एकमेकांचा तोल सावरून चिखलातून काठापर्यंत जाण्याच्या धडपडीतून निर्माण होते. म्हणून प्रेयसा ही या कवितेत सुख उल्लसित करीत नाही. ते तिचे गौण काम असते. अश्रू वाटून घण हे प्रीतीचे मुख्य काम असते. जेव्हा कवी गलबलून जातो, तेव्हा या पवित्र कुशीचा त्याला आसरा असतो. तिचे केस विरंगुळा असतो. तिची बोटे आपल्या केसांतून फिरत आहेत, हेच आश्वासन असते. दिवसभराची थकलेली अशी ती याला सावरताना चैत्रपालवी होते. कारण तिलाही स्वतःचा थकवा असतोच. पदराने घाम टिपताना तिच प्रेम दिसू लागते. हा आधारच फक्त या नागव्या जगात वावरताना कवीला जिवंत ठेवीत असतो. म्हणून स्वतःवर असणारा तिचा विश्वास टिकवून ठेवणे हे जीवनातल एक महान कर्तव्य होऊन बसते. आपल्याविषयी वाटलीच तर तिने घृणा ठेवावी, पण सगळ आयुष्य घृणेत संपणार नाही हा विश्वास तिने गमावू नये, याची धडपड सुरू होते. वादळात तिचा पदर शीड होतो. गोठुन गेल्यावर तिचा हातच आश्वासक होतो. तिने डोळ्यांत जहर साठवीत आपल्याकडे पाहू नये, ही एकच अशावेळी आकाक्षा असते. या सखीलाही वैताग असतो. कोसळणाऱ्या विजेप्रमाणे तिलाही काही ओकून टाकायचे असते. पण ती मध्येच बोलायची थांबते. कारण मोकळेपणाने बोलणे हा तिचा स्वभावच नाही. उरावर दगड ठेवून ती बोलत असते. तारा जरी पिळल्या, सारी सतार झंकाराच्या अवस्थेत असली, तरी तिच्या छातीवर जबाबदारीचा दगड असतो म्हणून संसाराच्या या रथयात्रेत काहीही न बोलता फक्त ओझे उचलण्याची जबाबदारी तिची असते.
ही प्रेयसी या दगडी कवीला हळवी करते. तिची चिंता ही याची चिरवेदना आहे. ज्यावेळी अस्तित्वाच्या पोकळीत आपण असणार नाही, तेव्हा आपल्या आठवणी काढून तिने रडत बसू नये, निःशंक मनाने डोळे पुसून आपले हुदंके आवरावेत, निष्कारण चिरवेदनेच्या नादी लागू नये, नवे घर मांडावे, आपली आठवण विसरणेच अशक्य असेल तर आपली इच्छा म्हणून नवा संसार उभा करावा. पण शक्य असेल तर आपल्याला विसरून तिने पुन्हा हिरवा चुडा भरावा असा कवीचा सल्ला आहे. चिरवेदनेच्या नादी तिने लागू नये हे सांगणे उदारपणाचे लक्षण नाही. पण जो स्वतः पानाच्या सळसळीतून तिची आठवण काढतो, ज्याला ढगांचा गडगडाट तिच्या आठवणी देतो; ज्याला आपले सगळे अस्तित्व तिचा पदर शीड झाल्यामुळे रस्त्यावर आहे, एरव्ही वादळ सुटल्यावर गलबत भरकटले असते असे वाटते; आपली सगळी कविता तिच्या पापणीच्या पाहाऱ्यात जो लिहितो, त्याने आपल्या प्रियेला तू चिरवेदनेच्या नादी लागू नकोस असा सल्ला द्यावा, हा खुळेपणा नाही काय ? पण हा खुळेपणा मनाच्या हळवेपणातून आलेला आहे. जीवनात हाच एक आधार आहे. इथे आला की कवी हळवा होतो. बाकी सगळ्या दुःखांकडे तटस्थ प्रामाणिक साक्षीदार म्हणून पाहणारा कवी येथे मात्र अलिप्त राहू शकत नाही.
सुर्व्यांच्या कवितेचे वेगळेपण असेल तर ते हे आहे. समाजाच्या नव्या कणखर आणि दणकट जाणिवा घेऊन ही कविता आकार घेत आहे. जिथे जगण्याची लढाई चालू आहे, त्या लढाईचा हा कवी सहभागी आहे आणि साक्षीदारही आहे. ही लढाई संपवून संस्कृतीचे प्रश्न अजून निर्माण झालेले नाहीत. उलट सुर्व्यांनी हे टिकवून राहण्याचे संगरच सर्व व्यथांनिशी सांस्कृतिक पातळीवर साकार केले आहे. म्हणून ही कविता व्यथांनी शेकून अधिक टणक झालेल्या मनाची कविता आहे. पण या व्यथेच्या अग्नीत होरपळत असतानाच ही कविता अधिक जिवंत आणि उत्कट झालेली आहे. आजतागायत जे आकलन बाहेरून आणि बौद्धिक होते, ते आकलन येथे स्वतःच्या जीवनाचा भाग म्हणून अंतरंगातून साकार होत आहे. हे दुःख पाहताना रडून उपयोगी नाही. जोपर्यंत जगात टिऱ्या आणि अर्धपोट आहेत, तोपर्यंत आम्ही नंगे आहोत. हा नंगे नसणाऱ्यांच्या व्यापक जाणिवेचा भाग आहे. सुर्व्यांची कविता ही प्रत्यक्ष नंग्यांनीच गायिलेली कविता आहे. हे दुःख पाहणे शक्य नाही म्हणून करंदीकरांनी आपल्या मनाला दगड होण्याचा आणि डोळे शिवण्याचा उपदेश केला आहे. पण ज्यांना हे दुःख केवळ पाहावयाचे आहे, त्यांना डोळे शिवता येतात; ज्यांना हे दुःख देवाप्रमाणे भोगून संपवावयाचे आहे, त्यांच्या समोर डोळे उघडे ठेवण्याशिवाय दुसरा मार्ग नसतो.
सुर्व्यांच्या कवितेत दोष नाहीत असा याचा अर्थ नाही. सुर्व्यांच्या कवितेत दोष आहेत, तशा या कवितेला मर्यादाही आहेत. सुर्व्यांच्या कवितेला जे वेगळेपण लाभलेले आहे, ते निर्दोष असण्याचे नाही. ते जिवंत असण्याचे वेगळेपण आहे. जिवंत आणि उत्कट अनुभव घेऊन फक्त त्याच अनुभवावर उभ्या असलेल्या या कवितेने स्वतःची नवी भाषा निर्माण केली आहे, तशी स्वतःची नवी प्रतिमासृष्टी उभी केली आहे. जो वर्ग अजून कवितेत मुका होता, तो वर्ग सर्व कणखरपणानिशी या कवितेने साकार केला आहे. या धडपडीतूनच या कवितेच्या मर्यादा आणि दोष जन्माला येतात. अनुभवाच्या अंतर्गत लयीखेरीज रचनेच्या दुसऱ्या कोणत्या लयीला शरण जायचे नाही, असे म्हटल्यानंतर ही कविता गद्याच्या अगदी जवळ जाते, आणि अनुभवाचा एक ताण कमी पडला, कुठे थोडा तोल ढासळला, की लगेच तिचे गद्य व्याख्यान होऊन जाते. 'माझे विद्यापीट' वाचताना हे जाणवत नाही, पण ' मुंबई' वाचताना हे जाणवल्याशिवाय राहात नाही.
खरे म्हणजे दोन्ही कविता एकमेकांशी अगदी मिळत्याजुळत्या आहेत. फक्त 'माझे विद्यापीठ 'मध्ये कुठल्याही सूत्राला बांधून न घेणारा माणूस उभा आहे. 'मुंबई' या कवितेत आम्ही कामगार या मुंबईचे सौंदर्य घडवतो, या सूत्राला कवीने मधूनमधून बांधून घेतले आहे. हीही कविता अतिशय जिवंत आणि प्रभावी, तितक्याच उत्कट अशा आपल्या कहाणीपासून सुरू होते आणि हा ताण टिकवीत वाढत जाते. या समुद्रकिनाऱ्यावर माझा बाप मेला आणि साच्यावर मी कामाला लागलो, या भयानक सत्यापर्यंत कोणताही नाटकीपणा न करता ही कविता आपणाला घेऊन जाते. पण क्रमाने कवी भोवतालच्या घटनांचे आपल्या मनावर संस्कार काय झाले हे सांगणे थांबवून कामगारांचे महत्त्व काय आहे हे सांगू लागतो. त्या ठिकाणी अनुभवाचे ताण निघून जातात आणि प्रचाराचे भूस इकडेतिकडे विस्कळितपणे उडू लागते. सुर्व्यांच्या कवितेत हे घडणे टाळता येण्याजोगे नाही. कला आणि कारागिरी, कला आणि प्रचार यांच्या सीमारेषा जे लीलया सांभाळीत असतात, त्यांना ते सांभाळणे जसे जमते तसे भान विसरून लढणाऱ्यांना रेघांच्या मर्यादा सांभाळणे जमण्याचा संभव नसतो. ज्या गुणातून सुर्व्यांच्या कवितांचे सामर्थ्य निर्माण होते, तो घटकच पाहतापाहता सुर्व्यांच्या कवितेवर मात करतो. सगळी कविताच खाऊन टाकतो.
कवीवर आणि कलावंतावर त्याच व्यक्तिमत्त्वामधील माणसाची मात हा अशा कवितेचा सगळ्यात मोठा धोका असतो. कवीचा प्रांत संपतो केव्हा आणि माणसाचा प्रांत सुरू होतो केन्हा, हे सांगणे फार कठीण आहे. कारण अनुभवाचा प्रामाणिकपणा हेच ज्यांचे भांडवल असते, त्यांच्या ओव्या कुठे संपतात आणि शिव्या कुठे सुरू होतात हे त्यांचे त्यांनाही समजत नाही. सुर्व्यांच्या कवितेला हीच एक मर्यादा आहे असे नाही. त्या कवितेला अजूनही फार मोठ्या मर्यादा आहेत. इंद्रियांच्या संवेदनाक्षमतेमुळे निर्माण होणाऱ्या रंग, गंध, स्पर्शाच्या सूक्ष्म जाणिवांपासून ही कविता दूरच राहते. जे अनुभव उत्कटतेने आणि तन्मयतेने सुर्वे घेतात, त्या अनुभवांच्या पोटात भावनांचे कितीतरी सूक्ष्म पदर गुरफटलेले असतात. या अनुभवाच्या पोटात खोलवर शिरून त्याचे सगळे पदर उकलून पाहणे, निदान शक्य ते पदर उकलून पाहणे, अजून या कवितेला जमत नाही. म्हणून ही कविता घडणाऱ्या भयाण घटनांची नोंद घेत राहते, पण त्यांची एकूण मानवी जीवनात संगत लावू शकत नाही. वेश्याव्यवसाय जरी घेतला तरी त्याला अनेक पदर असतात. चंद्रा नायकिणीलाही पुत्रवात्सल्य असते, हे खरेच आहे. पण त्याखेरीज चंद्रा नायकिणीला स्वतःचा धंदा असतो. समाजामध्ये फक्त सामाजिक विकृतीच असते असे नाही, मानसिक विकृतीसुद्धा असते. या जीवनाच्या लढाईत हजार घाव ताठ मानेने सहन केले पाहिजेत, हे एक सत्य झाले. पण या घावांच्यामागे असणाऱ्या कारणांची विविधता, हे एक दुसरे सत्य असते. कुठेतरी माणसाला आपल्या लौकिक जीवनाच्या संदर्भातून मोकळे होणे जमावे लागते, अलौकिकाच्या पसाऱ्यात काही शोध घ्यावा लागतो. या सगळ्याच बाबी अजून सुळेंना जमायच्या आहेत. त्यामुळे या कवितेला बहुपिंडी समृद्धता अजून प्राप्त व्हायची आहे. या कवितेत कवीचे सूर तारषड्जापर्यंत स्वच्छ लागलेले आहेत, पण खर्जाशी त्याचा सतत संवाद साधला जायला पाहिजे. ते अजून सुळेंना जमत नाही.
सुर्व्यांना काय जमत नाही किंवा या कवितेला अजून काय जमलेले नाही, ही यादी करण्यात अर्थ नाही. कारण या यादीचा शेवटचा निष्कर्ष व्यास-वाल्मीकी होणे सुळेंना जमणे नाही इतकाच येईल. व्यास-वाल्मीकी आपण आहोत हा सुर्व्यांच्या कवितेचाही दावा असू शकत नाही. त्यांच्या कवितेच्या मोठ्यांतमोठ्या चाहत्यालासुद्धा हे माहीत असते. पण सुळेंना मराठीत काय जमले नाही, यावर या कवितेचे वाङ्मयीन मूल्यमापन करता येणार नाही. प्रचाराच्या चौकटीत अडकल्यामुळे सुर्व्यांच्या किती टक्के कविता कविता होण्याची क्षमता असून जायबंदी होतात, हा हिशेब जरूर करावा. पण ही टक्केवारी मांडल्यामुळे या कवीने अस्सल कवितेचे जे सृजन केले आहे, तिचे मोल ठरविता येत नाही. मराठी नवकविता मर्ढेकरांपासून नवनवे प्रयोग करीत आहे. ती कुठे विचार भावनेच्या पातळीवर नेत आहे, कुठे नव्या दैवतकथा घडवीत आहे. जीवनाचा अर्थ शोधण्याची तिची धडपड अखंड चालू आहे. आशयाच्या मांडणीपासून, रचनेच्या पद्धतीपासून अनुभव घेण्याच्या पद्धतीपर्यंत नवनव्या शक्यता ती हुडकून काढीत आहे. या कवितेचा एक धागा सामाजिक जाणिवांना कलेच्या पातळीवर नेत आहे, दुसरा धागा विशुद्ध भावकवितंचा आहे. कवी हा समाजप्रवाहाचा भाग असल्यामुळे आत्मनिष्ठाच जिथे सामाजिक जाणिवेचे रूप घेऊन साकार झाली आहे, तो टप्या सुर्व्यांच्या कवितेचा आहे. म्हणून सुर्व्यांची कविता ही खऱ्या अर्थाने बहिणाबाईने मराठी कवितेवर केलेले संस्कार पचवून मराठी कवितेचा सांधा पुन्हा एकदा नव्या पातळीवर नव्या पद्धतीने तुकारामाशी जोडण्याचा प्रयत्न करणारी कविता आहे.
आता जे अंतर सुर्वे आणि तुकाराम यांच्यात शिल्लक राहते, ते दोघांच्या मनाच्या समृद्धीचे अंतर आहे. ते अंतर केवळ अनुभवाच्या जिवंतपणावर कवितेचे अस्तित्व टिकविण्याच्या प्रवृत्तीतील अंतर नाही. 'ना घर होते ना गणगोत चालेन तेवढी पायाखालची जमीन होती' या ठिकाणाहून ही कविता सुरू होते आणि उद्ध्वस्त नगरात काहीसे हरवलेले शोधीत परतलेला सैनिक हिंडावा त्याप्रमाणे हिंडते. हा शोध प्रामुख्याने चेहरे वाचण्याचा शोध आहे. कधी दोन घेत, कधी दोन देत, पण मोडून न पडता जी वाटचाल चाललेली आहे त्या वाटचालीचा हा एक आलेख आहे. ही वाटचाल चालू असताना काळोख कोरीत जीव जळत राहतो हेही खरे आहे. आणि नवी स्वप्ने डोळ्यांना दिसतात हेही खरे आहे. सुळेंच्या भाषेत सांगायचे तर ही कविता खुंटीवर स्वप्ने टांगून मान मोडून काम करणाऱ्या वास्तवाच्या नावाने आणि व्यथांच्या नावाने पुकारलेला एक जाहीरनामा आहे.
प्रतिष्ठान, सेप्टेंबर १९६९