पोशिंद्याची लोकशाही/राजकीय भूमिकेचे चक्रव्यूह



राजकीय भूमिकेचे चक्रव्यूह


 मी हे जे निवेदन करतो आहे, ते स्वतंत्र भारत पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नव्हे किंवा शेतकरी संघटनेचा संस्थापक म्हणून नव्हे तर इतर सर्व पाइकांप्रमाणेच शेतकरी संघटनेचा एक प्रामाणिक पाईक म्हणून करीत आहे.
 महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २००४ च्या निवडणुकीत शेतकरी संघटनेचे राजकीय धोरण ठरवताना माझ्यासमोर काय समस्या होती ते मी स्पष्ट करण्याचा प्रयत्न करणार आहे.
 शेतकरी संघटनेची सुरुवात झाली तेव्हा गावोगावी जाऊन मी मांडणी करू लागलो की, 'शेतीमालाचा भाव हा भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय आहे; शेतीमालाला भाव नाही म्हणून शेतकरी गरीब आहे, शेतकरी कर्जबाजारी आहे आणि, शेतीमालाला भाव नाही; कारण शेतीमालाला भाव मिळू नये असे सरकारचे जाणीवपूर्वक राबवलेले धोरण आहे' या आशयाची माझी सुरुवातीच्या काळातील भाषणे ऐकलेले बरेचसे कार्यकर्ते आजही कार्यकारिणीत आहेत. लोकांमध्ये त्या वेळी अशी भावना होती, की हा मनुष्य बाहेरून येतो काय आणि हे काय जगविपरीत सांगतो आहे? त्या वेळी, ग्रामीण दारिद्र्याच्या समस्येचे गाढे अभ्यासक असलेल्या वि. म. दांडेकरांसह बहुतेक अर्थशास्त्रज्ञ माझ्या विरोधात होते. शेतकऱ्यांचे नेते म्हणून मानले जाणारे वसंतदादा पाटील, शरद पवार यांच्यासारखी राजकारणधुरंधर माणसेही माझ्या विरोधात होती. पण, माझी मांडणी चालूच होती. माझी मांडणी समजावून देण्यासाठी मी गावागणिक अधिकाधिक पुरावे लोकांसमोर ठेवत होतो, त्यामुळे कालच्यापेक्षा आजचे भाषण वेगळे ठरत होते. शेतकरी वस्तुस्थितीदर्शनाने अचंबित होत होते. मी जे म्हणतो आहे त्याचा काँग्रेसच्या लोकांना प्रचंड राग येईल असा विचारसुद्धा माझ्या मनात कधी आला नाही. माझी मांडणी कामगार चळवळीला पटणार नाही याची मला खात्री होतीच; पण ही मांडणी काँग्रेसला पटेल का, जनता पक्षाला पटेल का, असा विचारही मी केला नाही. सर्व प्रस्थापितांना नाराज करणारी, दुःखी करणारी शेतकरी चळवळ बांधताना मी कधीही घाबरलो नाही, थकलो नाही. कारण माझ्या अभ्यासाच्या आधाराने मला जे खरे दिसत होते तेच मी शेतकऱ्यांना, लोकांना सांगत होतो - ते त्यांना पटो, ना पटो. या मांडणीतील सार लोकांच्या ध्यानात यावे म्हणून दक्षिण महाराष्ट्रात बोलताना मान्यवर नेत्यांची नावे घ्यावी लागत, नगर-नाशिकमध्ये बोलताना साखर कारखानदारांची नावे घ्यावी लागत. त्यातल्या काही कारखानदारांनी 'काय बामण सांगतोय?' म्हणून कुचेष्टा केली. काहींनी तर धमक्यासुद्धा दिल्या. पण, मी माझ्या कामातून मागे हटलो नाही. त्याचे कारण असे, की ज्याचे मन शुद्ध असते, विचार शुद्ध असतात त्या माणसाला, साहजिकच, एक नैष्ठिकता प्राप्त होते.
 बरेचदा असे म्हटले जाते, की शरद जोशींना वीसपंचवीस वर्षे पुढचे दिसते. काही काही बाबतीत, अपघाताने का होईना, हे खरे ठरले आहे, हे मला मान्य आहे. पण, याचा अर्थ माझ्यात काही अतींद्रिय शक्ती आहे असा नाही. आपल्या चष्म्याच्या काचा स्वच्छ असल्या म्हणजे बरेच दूरचे आणि स्पष्ट दिसते; काचांवर जर डाग असले तर जवळचेही धूसर दिसते किंवा काचांवर जर एखादा रंग दिला तर समोरच्या परिस्थितीचे खरे चित्र समजत नाही. शेतीमालाच्या भावाच्या प्रश्नाच्या अभ्यासाने माझ्या काचा साफ केल्याने मला महाराष्ट्रातील साखर कारखानदारी कोसळणार आहे, हे १९८२ मध्येच दिसले, महिला प्रश्न महत्त्वाचा असणार आहे हे १९८६ मध्ये दिसले आणि त्याच स्वच्छ काचांतून पाहत असल्यामुळे, सगळ्या देशातील लोक जागतिक व्यापारासंबंधीच्या डंकेल प्रस्तावाविरुद्ध बोलत असतानाही त्याच्या बाजूने मी एकटा उभा राहिलो. शेतकरी संघटनेचा एकही कार्यकर्ता सुरुवातीला माझ्या बाजूने उभा नव्हता. तरीसुद्धा, सत्य आणि विचारशक्तीच्या आधाराने मी ते मांडले.
 राजकारण हा काही तर्काचा खेळ नसतो. राजकारण हा संभाव्य काय आहे आणि असंभाव्य काय याचा विचार करून, खेळावयाचा (ईस द प इर्दैत) खेळ असतो. केवळ तर्कशास्त्राने किंवा केवळ बुद्धीने चालणारा हा खेळ नाही. आणि तरीसुद्धा मला असे वाटते, की राजकारणात पडून, निवडणुका लढवून सत्तेत गेलेल्या एकाही माणसाने, एकाही पक्षाने शेतकऱ्यांचे भले केलेले नाही. त्यामुळे, राजकारण हा सिंहाच्या किंवा वाघाच्या गुहेत जाणारा रस्ता आहे - गुहेत जाणारी पावले फक्त दिसतात, बाहेर येणारी पावले दिसत नाहीत. तेव्हा सत्तेवर कोणताही पक्ष गेला, तरी तो शेतकऱ्याला बुडवतोच. तेव्हा, त्यातल्या त्यात जो छोटा चोर असेल, त्याला पाठिंबा द्यावा ही भूमिका मी शेतकरी संघटनेच्या सटाणा येथे झालेल्या पहिल्या अधिवेशनात (१९८२) मांडली. समाजवादाचा पाडाव होईपर्यंत, आणि समाजवादाचा पाडाव झाल्यानंतर जातीयवादी आणि मंडलवादी यांनी डोके वर काढेपर्यंत ही भूमिका सातत्याने चालू राहिली. समाजवादाचा पाडाव करण्यात शेतकरी संघटनेचा फार मोठा हात होता असे नाही, समाजवाद ही आंतरराष्ट्रीय ताकद होती, शेतकरी संघटनेची ताकद महाराष्ट्रापुरती मर्यादित. पण, महाराष्ट्राततरी 'सरकार नावाची गोष्ट ही हितकारी नसते, सरकार हे नेहमी अपायकारकच असते' अशी भावना लोकांच्या मनात निर्माण करण्यात शेतकरी संघटनेचा मोठा हात आहे आणि त्यामागे 'शरद जोशींचा विचार आहे, हे लोक मानतात. शेतकरी संघटनेचे कार्यकर्तेच नव्हे तर इतरही अनेकजण शेतकरी संघटनेबद्दल बोलताना 'शरद जोशींचा विचार' हा शब्द हटकून वापरतात.
 गेल्या विधानसभा निवडणुकीत स्वतंत्र भारत पक्षाने महाराष्ट्रातील शिवसेना- भाजप युतीबरोबर जाण्याचा - रालोआचा एक घटकपक्ष म्हणून - निर्णय कायम ठेवला; पण त्यांच्याशी चर्चा चालू असताना ते नेहमी म्हणायचे, की स्वतंत्र भारत पक्ष बाजूला राहू द्या, आम्हाला शेतकरी संघटना आणि त्यातल्या त्यात शरद जोशी हवे आहेत. म्हणजे युतीचे लोक इतक्या टोकाला जाऊन स्वतंत्र भारत पक्षाला नगण्य मानीत होते. हे आपल्या सर्वांसाठी दुःखदायक आहे, यात काही शंका नाही.
 पण प्रत्येक निवडणुकीच्या वेळी मी अभ्यास करून राजकीय परिस्थितीचे विश्लेषण करतो, त्यावर चर्चा करतो आणि शेतकरी संघटनेची त्या निवडणुकीतील भूमिका निश्चित करतो. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळीही जेव्हा मी अशा तऱ्हेने अभ्यास केला तेव्हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे नेतृत्व करताना अटलबिहारी वाजपेयींनी दाखवलेली सर्वसमावेशकता व सहिष्णुता आणि आघाडी एकसंध ठेवण्याच्या दृष्टीने आणि खुल्या व्यवस्थेला पुढे चालू ठेवण्याच्या दृष्टीने स्वपक्षाच्या स्वदेशी, समान नागरी कायदा, ३७० वे कलम असे मुद्दे बाजूला ठेवण्याची निर्धारी कठोरता या बाबी ठळकपणे लक्षात आल्या. रालोआच्या नेतृत्वाच्या या वैशिष्ट्यामुळेच स्वतंत्रतेच्या संकल्पनेला या नेतृत्वाखालीच काही आशा असू शकते, या विचारानेच लोकसभा निवडणुकीच्या वेळी स्वतंत्र भारत पक्षाने रालोआचा घटक पक्ष होण्याचा निर्णय घेतला. वाजपेयींच्या नेतृत्वगुणाचे हे विश्लेषण मी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभांमध्ये मांडले तेव्हा खुद्द भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनीसुद्धा आश्चर्यचकित होऊन मोठ्या प्रांजळपणे कबूल केले, की आपल्या नेत्याची ही थोरवी माझ्या भाषणांमुळे प्रथमच लक्षात आली.
 महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत हीच भूमिका कायम ठेवताना गाठ पडली महाराष्ट्रातील शिवसेना-भाजपा युतीशी. ही भूमिका निभावून नेताना माझी मोठी कुचंबणा होते आहे, ती मी प्रामाणिकपणे पुढे ठेवू इच्छितो. महाराष्ट्रातील शिवसेना-भाजप युतीने या विधानसभा निवडणुकीच्या काळात स्वतंत्र भारत पक्षाला आणि शेतकरी संघटनेला जी वागणूक दिली, ती पाहता यापुढे रालोआच्या सदस्यत्वामुळे स्वीकारावी लागलेली ही युती चालू ठेवावी का, या प्रश्नावर चर्चा करताना काही कार्यकर्त्यांनी म्हटले, 'आता लगेच काही निवडणुका नाहीत, मग युती ठेवली काय किंवा तोडली काय, काय फरक पडणार? भाजपचे धोरण काय आहे त्याच्याशी आपल्याला काय करायचे आहे, शिवसेनेची धोरणे काय आहेत आणि त्यांच्या रीती काय आहेत, याच्याशी आपल्याला काय करायचे आहे? आपण आपल्याला काय करायचे आहे त्यावर चर्चा करावी, त्यानुसार कार्यक्रम करावे; पण युतीतील इतरांबद्दल काही बोलू नये.' अशा तऱ्हेने भूमिका घ्यायची म्हणजे माझी मोठी अडचण होते. कारण, अशा तऱ्हेने मी कधी जगलो नाही, अशा तऱ्हेने मी कधी बोललो नाही आणि अशा तऱ्हेने मी कधी काम केले नाही. कोणाला मान्य नसले तरी चालेल; पण मला जे योग्य वाटते ते सांगणे हे माझे काम आहे.
 मला असे वाटते, की शेतकरी संघटनेचे आणि स्वतंत्र भारत पक्षाचे बुद्धिवैभव ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. डंकेल प्रस्तावाच्या वेळी त्याच्या बाजूने मी उभा राहिलो आणि म्हटले, की आम्हा शेतकऱ्यांना स्वातंत्र्य हवे आहे, आम्ही बरबाद झालो तरी चालेल, आम्हाला मरण यायचेच असेल तर ते स्वातंत्र्यात येऊ द्या. त्या वेळी ही भूमिका जर मी मांडली नसती तर, माझी खात्री आहे, की शेतकरी संघटनासुद्धा स्वदेशी जागरण मंच, कम्युनिस्ट आणि जागतिकीकरणाला विरोध करणाऱ्यांच्या पंक्तीत सामील झाली असती.
 आजही माझ्यापुढे तसाच प्रश्न उभा आहे. अलीकडेच अमेरिकेच्या निवडणुका झाल्या, राष्ट्राध्यक्ष म्हणून बुश पुन्हा निवडून आले. बुश यांचा निवडणूक जाहीरनामा पाहिला तर जागतिक व्यापार संघटनेच्या पुढील वर्षी होणाऱ्या वाटाघाटींवर त्याचे परिणाम काय होणार आहेत व त्याबद्दल आपल्या देशाने काय भूमिका घेतली पाहिजे, याबद्दल शेतकरी संघटना आणि स्वतंत्र भारत पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या विचारांत स्पष्टता असणे आवश्यक आहे आणि तसे सरकारला सांगायला पाहिजे. तसे न करता केवळ प्रचलित पठडीतल्या वर्तमानपत्रांतील व नियतकालिकांतील संपादकीयांवरून फटकळ मते बनवून जर काही घोषणा आपण करू लागलो तर आपले आजपर्यंत कमावलेले अर्थशास्त्रातले प्रथम स्थान टिकून राहणार नाही. ही धोक्याची सूचना मी शेतकरी संघटना आणि स्वतंत्र भारत पक्षाच्या कार्यकर्त्यांना देऊ इच्छितो.
 गेल्या विधानसभा निवडणुकीत आपद्धर्म म्हणून स्वीकारलेल्या युतीच्या उमेदवारांच्या प्रचारसभांमध्ये मी भाषणे केली; पण, ही भाषणे करताना मला गुदमरल्यासारखे होत होते. त्याचे कारण शिवसेना वाईट आहे किंवा नाही, भाजप वाईट आहे किंवा नाही हा मुद्दा नाही; पण आपल्याला जर एखाद्या माणसाबद्दल प्रेम वाटले, तर आपण त्याच्यासाठी जीव टाकायला तयार होतो. कसलाच तर्कसंगत विचार नसलेल्या लोकांबरोबर, आपद्धर्म म्हणूनसुद्धा, काम करताना मला घृणा वाटते; त्यांच्याबरोबर राहू नये असे वाटते. खरे तर मी, अपघाताने का होईना, हिंदू घरात आणि त्यातल्या त्यात ब्राह्मण घरात जन्मलो आहे; पण मला स्वतःला, कपाळावर हेऽ एवढे गंध लावलेले आणि दाढ्या वाढवलेले लोक समोर आले, की ही आपल्यातली माणसे नाहीत, ही कोणीतरी नरमांसभक्षक टोळीतील माणसे आहेत अशी भावना होते.
 माझ्या या स्वभावामुळे काही लोक आपल्यापासून दूर राहतात का? लोकसभा निवडणुकीतील आपली भूमिका अमान्य झाल्याने शेतकरी संघटनेपासून दूर गेलेले राजू शेट्टी गेल्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून उभे राहून निवडून आले. या विजयाचे विश्लेषण करताना काहीजण म्हणाले, की तिथे शरद जोशी नव्हते हे एक कारण या विजयामागे आहे. खरेही असेल ते. कारण, शरद जोशींना शिव्या देणे हा राजकारण्यांचा खेळ आहे आणि तो खेळून निवडून येताही येत असेल, कदाचित. तेव्हा मी संघटनेला आवश्यक आहे असा आग्रह धरत नाही. माझी चिंता एकच आहे, की अशा विजयासाठी मला वजा करण्याचा विचार करताना, कोणत्याही पुढच्या निवडणुकांच्या वेळी म्हणा, प्रशिक्षण शिबिरात म्हणा किंवा सभांत म्हणा आतापर्यंतची 'शरद जोशी' या विचाराची जी परंपरा महाराष्ट्रासह देशातील विद्वत्जनांना मान्य आ, ती डागाळली जाऊ नये, तिला काळिमा लागू नये, ती टिकून राहावी याचीही काळजी घेतली जाईल का? शरद जोशी या व्यक्तीवाचून तुमचे जर चालत असेल तर आनंदच आहे. पण, शरद जोशींचा चष्मा डागाळू नये असे वाटत असेल, आपण 'संघटनेचा विचार' म्हणून जे आतापर्यंत म्हणत आलो त्या विचाराची ताकद जर टिकवायची असेल तर चष्म्याचे भिंग स्वच्छच ठेवायला हवे आणि भिंग स्वच्छ ठेवायला हवे असेल तर 'कोणी म्हटले, आम्हाला मशीद पाडायची आहे, मंदिर बांधायचे आहे तरी आपले काय बिघडले?' अशा तऱ्हेने विचार करून चालायचे नाही. तुम्हाला इतपत तरी ताठ राहता आले पाहिजे आणि म्हणता आले पाहिजे, 'अमुक अमुक एक गोष्ट आम्हाला मान्य नाही; पण राजकारणातील आपद्धर्म म्हणून तात्पुरते आम्ही या बाबतीत काही बोलणार नाही.'
 तसाच, एक प्रश्न आहे राखीव जागांचा. मला राखीव जागा मान्य नाहीत - कोणाकरिताही मान्य नाहीत - दलितांकरिता मान्य नाहीत, आदिवासींकरिता मान्य नाहीत, महिलांकरिताही मान्य नाहीत. या विषयावर माझा माझ्या कार्यकर्त्यांशी मोठा वाद होण्याची शक्यता आहे. माझ्या खुल्या स्वतंत्रतावादी विचाराच्या तत्त्वामध्ये राखीव जागा ही संकल्पना बसतच नाही. याही बाबतीत ठरवता येईल, की तात्पुरती तडजोड म्हणून या प्रश्नावर सध्या काही बोलायचे नाही; पण कुणी जर असे म्हणू लागले, की जातिधर्माचा वापर करून,राखीव जागांचा वापर करून राजकारणामध्ये पुढे येणारे लोक हे शेतकरी संघटनेच्या स्वतंत्रतावादी विचाराची मांडणी करणाऱ्या संस्थापकांपेक्षा जास्त बुद्धिमान, जास्त चतुर आणि जास्त राजकारणकुशल आहेत तर त्यामुळे मला दुःख झाल्याशिवाय राहणार नाही, हे उघड आहे.
 निवडणुकीच्या प्रचारासाठी तुम्ही मला प्रेमाने बोलावता. पण, ज्यांनी माझी पूर्वीची शेतकरी संघटनेच्या व्यासपीठावरील भाषणे ऐकली आहेत, त्यांच्या लक्षात आले असेल, की माझी ती भाषणे आणि या निवडणूक प्रचारातील भाषणे यांत जमीनअस्मानाचे अंतर होते. मी पूर्वी काय भाषणे करत होतो आणि आता निवडणुकीत मला काय भाषणे करावी लागत आहेत, याची मला त्याक्षणी लाज वाटत असे. हा सरळसरळ वैचारिक वेठबिगाराचा किंवा वैचारिक व्यभिचाराचाच प्रकार झाला. ही वेठबिगारी अशीच राहणार असेल, तर शेतकरी चळवळीला माझा जो उपयोग आहे तोच संपून जाईल. माझ्या चष्म्याची काच तडकून जाईल. त्यामुळे, 'सध्या चालवून घ्यावे' या विचारामागे राजकीय संधिसाधूपणा आहे. ज्यांच्या महत्त्वाकांक्षा राजकीय आहेत, ते आपल्याला फरफटत नेतात अशी माझी भावना होत आहे.
 विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वर्ध्याला झालेल्या कार्यकारिणीचा स्पष्ट निर्णय असा होता, की लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुभवाने सन्माननीय तडजोड होत असेल, तर महाराष्ट्रातील युतीच्या बरोबर जावे, अन्यथा स्वतंत्रपणे जास्तीत जास्त जागी स्वतंत्र भारत पक्षाने उमेदवार उभे करावे; भले मग साधनांचा, निधीचा तुटवडा असो. आपण स्वतंत्र भारत पक्षाला सातच जागा सोडवून घेऊन, युती टिकवण्याची तडतोड केली ही तडजोड सन्माननीय होती का? सन्माननीय नसेल तर विकल्प शोधण्याकरिता आपण काय प्रयत्न केला? आंबेठाणला या सर्व धुमश्चक्रीत कार्यकर्त्यांची एक तातडीची बैठक विकल्प शोधण्यासाठी बोलावली. तेव्हा पन्नासेक कार्यकर्त्यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याच्या विकल्पाखाली उमेदवारी करण्याची तयारी दाखवली. शेतकरी संघटनेच्या बाहेरील विसेक उमेदवारांची स्वतंत्र भारत पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढविण्याची तयारी होती. थोडाफार निधी जमवण्याच्याही हालचाली सुरू होत्या. कारण, आपल्या पन्नास उमेदवार कार्यकर्त्यांपैकी बहुतेकांची आर्थिक परिस्थिती अशी आहे, की अर्ज भरताना करावा लागणारा सुरुवातीच्या खर्चाच्या किमान दहा हजार रुपयांची जमवाजमव करणेसुद्धा अवघड. इतके करूनही 'निवडून किती येणार?' हा प्रश्न निघाला आणि स्वतंत्र भारत पक्षाने स्वतंत्रपणे निवडणुका लढविण्याचा विचार बाजूला पडला. सात जागा घेऊन युतीबरोबर जाण्याचा जो निर्णय झाला त्यावर माझा सहीशिक्का आहे, हे मी स्पष्ट करू इच्छितो; त्याची जबाबदारी मी दुसऱ्या कोणावर टाकणार नाही. याच्यापेक्षा जास्त चांगला निर्णय घेता आला असता असेही मला वाटत नाही. पण, जे घडले ते इच्छेविरुद्ध झाले यात काही शंका नाही. मी लोकांना विचारले, की काही आपले, काही बाहेरचे असे ऐंशीनव्वद उमेदवार आपण उभे केले तर चारपाच तरी उमेदवार निवडून येतील का? मला निवडणुकीची गणिते जमत नाहीत, ज्यांना जमतात त्यांनी सांगितले, की आपण ऐंशीनव्वद जागी उमेदवार उभे केले तर त्यातील एकसुद्धा निवडून येण्याची शक्यता नाही. मागे बघून मते बदलणे चुकीचे आहे. पण, शिरोळमध्ये राजू शेट्टी निवडून येतात, मोर्शीत दिलीप भोयरना चांगली मते पडतात, हे पाहिले तर आपल्या पायावर उभे राहून स्वतंत्र भारत पक्षाची फार वाईट अवस्था झाली असती असे काही मला वाटत नाही. वामनराव चटप तर निवडून येणारच होते. त्यांच्या यशाचा संबंध भाजपशी नाही आणि स्वतंत्र भारत पक्षाशीही नाही; निवडून येतात ते वामनराव चटप निवडून येतात. मागील निवडणुकीत हरल्यापासून त्यांनी पुन्हा एकदा जिल्हा परिषदेपासून गावपातळीपर्यंत राजकीय बांधणी करण्यासाठी सातत्याने प्रचंड परिश्रम घेतले, म्हणून ते निवडून आले. ते आपल्यात आहेत हे आपले भाग्य आहे, आपल्यामुळे त्यांचे भाग्य उजळले असे नाही.
 जर का आपण आपले मतदारसंघ अशा तऱ्हेने उभे केले असते, तर ही वेळ आपल्यावर आली नसती. तीन वर्षांपूर्वी आपण पक्षबांधणीचा कार्यक्रम हाती घेतला होता. तेव्हा मी सांगितले होते, की ज्या मतदारसंघामध्ये स्वतंत्र भारत पक्षाचे किमान दहा हजार सदस्य तयार होतील त्या मतदारसंघात मी स्वतः येऊन तेथील कार्यकर्त्यांचे कौतुक करीन. सगळे मिळून फक्त तीन मतदारसंघ - राजुरा, शिरोळ आणि बदनापूर - की ज्यांनी दहा हजार सदस्य तयार केले. या तीन जागांपैकी आपल्याला फक्त एक जागा मिळाली तिथे वामनराव चटप निवडून आले; शिरोळला आपल्यापासून दूर झालेले राजू शेट्टी निवडून आले आणि माझी खात्री आहे, की आपल्याला युतीत न सुटलेल्या बदनापूरमधून डॉ. अप्पासाहेब कदमांनी बंडखोरी केली असती तर तेही निवडून आले असते. आपण मुळामध्ये जे काम करायला पाहिजे ते काम पुरेसे नाही. ते केले असते तर त्याचा उपयोग निवडणुकीसंबंधी युतीची बोलणी करताना झाला असता. ते काम न झाल्यामुळे जागावाटपाच्या वाटाघाटींच्या प्रक्रियेत, जसजशी निवडणुकीची तारीख जवळ येऊ लागली तसतशी माझीसुद्धा फरफट होऊ लागली. १९८० मध्ये माझे जे वय होते, माझी जी प्रकृती होती तशीच जर आज असती तर मी निर्णय घेतला असता, की आपल्याला स्वतःच्या ताकदीवर लढता येत नाही ना, मग बाळासाहेब ठाकऱ्यांबरोबर युती करण्यापेक्षा आपण ही निवडणूक जाऊ देऊ; एकही उमेदवार उभा करता आला नाही तरी चालेल; पण हा डाग नको. मी म्हणून पाहिले; पण काही जणांनी म्हटले, की युतीत ज्या काही आठदहा जागा मिळतील त्या लढवून, त्यापैकी चारपाच आमदार जरी आपले झाले, तरी तेवढ्या पायावर आपल्याला भविष्यात आपले बळ वाढवता येईल. आता माझे वय जसजसे वाढत चालले आहे तसतसे कमी वयाच्या, जास्त उमेदीच्या माणसांचा सल्ला ऐकणे, त्यांच्या मताने चालणे आणि त्यांना मदत करणे दिवसेंदिवस अधिक आवश्यक होत चाले आहे. त्यामुळे या वेळी, या क्षेत्रातले जाणकार आणि प्रचंड उत्साही, प्रचंड कष्ट करणारे असे जे माझ्याभोवती कार्यकर्ते होते, त्यांचा सल्ला मी ऐकला.
 इतके सगळे घडल्यानंतर विधानसभेत कोण कोण जातील, ते पुढे पाच वर्षे काय काम करतील, त्याच्यापुढे शेतकरी संघटना किती मजबूत होईल हा माझ्या आयुष्यात घडणारा इतिहास कदाचित नसेल, तेव्हा आपल्यानंतर जी माणसे शेतकरी संघटनेची धुरा घेणार असतील त्यांचे ऐकणे योग्यच आहे. तेव्हा आजपर्यंत शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाची जी जबाबदारी मी सांभाळली ती हळूहळू अशा माणसांच्या हाती सोपवणे आवश्यक आहे, या हेतूने मला न पटणाऱ्या गोष्टी मी मान्य करीत आलो. त्याही वेळी मी सांगितले, की तुमच्या या प्रचारामध्ये मला गोवू नका, बोलताना मला ओकारी येते. ते म्हणाले, 'मग तुम्ही प्रचाराला येऊ नका, चालेल. तशी मला सुटी दिली, तर माझी काही तक्रार नव्हती. आतासुद्धा आधी जो निर्णय झाला, त्यावर बोलतो आहे असे नाही. याच्यापेक्षा जास्त चांगला निर्णय झाला असता, असेही मी म्हणत नाही; पण तो निर्णय करायला लागल्यानंतर ज्यांनी निर्णय घेतला, त्यांनी प्रामुख्याने प्रचाराची धुरा सांभाळली पाहिजे; आता निर्णय झालाच आहे तर पुन्हा शरद जोशींनीच फिरायला पाहिजे असे म्हणता कामा नये.
 मला असे वाटते, की शेतकरी संघटनेच्या गेल्या पंचवीस वर्षांच्या इतिहासामध्ये आपल्याला सगळ्यांत मोठी उपयोगी अशी जी गोष्ट ठरली ती म्हणजे ज्याला 'शरद जोशींचा विचार,' असे सर्वसाधारणपणे म्हटले जाते ती होय. राजकीय तडजोड म्हणून आज या पक्षाशी युती, उद्या त्या पक्षाशी युती आपल्याला करावी लागते याचे मलाही दुःख होते. मागे आपण विश्वनाथ प्रताप सिंहांबरोबर गेलो. त्या वेळी त्यांनी पंतप्रधानपद स्वीकारल्यानंतर जेव्हा ते कोल्हापूरला आपल्या मेळाव्याकरिता आले, तेव्हा त्यांना मी स्पष्टपणे सांगितले होते, की तुम्ही मंडल आयोगाचा कार्यक्रम घेता हे चूक आहे, याच्यापुढे आम्ही तुमच्याबरोबर राहू शकणार नाही. युती केली म्हणजे काही आपण आपली तत्त्वे सोडून दिली असे नाही. आता जर का मंदिरवाद पुढे येत असेल, तर त्याही बाबतीत आपल्याला तसेच सडेतोडपणे वागावे लागेल. पत्रकार मला विचारतात, की तुम्ही तर स्वतःला विचारवादी आणि तर्कशुद्ध मांडणी करणारे म्हणवता, मग बाळासाहेब ठाकरे जे बोलतात ते तुम्हाला पटते का? यावरून मला असे वाटते, की अशा प्रकारच्या युतीत आपलेही भले नाही आणि त्या जातीयवाद्यांचेही नुकसान आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांत अशी बीजे रोवली गेली आहेत, की युतीच्या निमित्ताने आपण त्यांच्याबरोबर गेल्याने त्यांचा गावागावातील कार्यकर्ता असा विचार करू लागला आहे, की शेतकरी संघटनेच्या विचारातील स्वातंत्र्याचे बी पेरले गेल्यानंतर शिवसेनेला त्याचे अस्तित्व टिकवून ठेवणे कठीण होईल. मला भेटायला कोणीही कार्यकर्ता सहज येऊ शकतो हे पाहिल्यानंतर विदर्भातले शिवसेनेचे कार्यकर्ते मला म्हणाले, की आम्हाला बाळासाहेबांचे नखसुद्धा पाहायला मिळत नाही, त्यांच्याकडे जायचे म्हटले तरी त्यांच्याभोवती सुरक्षा सैनिकांचा गराडा असतो. तेव्हा स्वतंत्रता ही एक अशी आस आहे, अशी भूक आहे, की तिची एकदा एखाद्याला जाणीव झाली, की तो पारतंत्र्याला कधी टिकू देत नाही. आपण पार परतंत्र आहोत याची एकदा जाणीव झाली, की स्वातंत्र्य मिळायला फारसा वेळ लागत नाही. 'स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे,' असे टिळकांनी म्हटल्यानंतर देश स्वतंत्र व्हायला काही फार वेळ लागला नाही. तसाच परिणाम गावागावातल्या शिवसेनेच्या अनुयायांवरही होणार आहे. त्यामुळे आपण अशा युतीमध्ये राहणे आता शिवसेनेलाही अवघड वाटत असावे.
 भाजपच्याही काही लोकांची इच्छा असावी, असा माझा अंदाज आहे, की अटलबिहारी वाजपेयींच्या काळामध्ये अर्थकारणाचा विचार मांडण्यासाठी शरद जोशी, जॉर्ज फर्नांडिस यांच्यासारखे जे ओझे त्यांनी घेतले होते, ते आपल्या खांद्यावरून उतरले तर बरे होईल; म्हणजे आपण आपल्या पद्धतीने तोगडियांसारख्यांचे तत्त्वज्ञान बिनबोभाट पुढे मांडत जाऊ शकू. त्यामुळे त्यांचीही बरोबर राहण्याची काही फारशी इच्छा नसावी. फारकतीचा विचार आपणच करतो आहोत असे नाही, दुसऱ्या बाजूलाही एकत्र राहण्याची फारशी इच्छा राहिली आहे, असे दिसत नाही.
 भाजप हा एक ठोकळा आहे, शिवसेना हा एक ठोकळा आहे, स्वतंत्र भारत पक्ष हा एक ठोकळा आहे असे समजा. या ठोकळ्यांना सुतळीने एकत्र बांधले तर खरी एकी होत नाही. सुतळी जरा सैल झाली, की खटाखटी सुरू होते. खरी एकी व्हायची असेल तर ती काही तत्त्वे, काही सिद्धांत यांच्या आधाराने झाली पाहिजे. सर्व ठोकळ्यांचा भुसा केला आणि सरस मिसळून, त्याचा दाबून एक ठोकळा केला तरच खरी एकी होऊन निवडणूक जिंकता येऊ शकेल आणि हा प्रचंड यज्ञ करताना जे नवे नेतृत्व पुढे येईल ते नेतृत्व जर प्रतिभावान असेल, धाडसी असेल, कर्तबगार असेल, तरच देशाला वाचवण्याची भाषा करणे उचित होईल.
 पण एखाद्या निर्णयाच्या वेळी नेतृत्वामध्ये जरा कुठे कमकुवत धागा सापडला, की त्याला जर आपण व्यावहारिकतेचे धडे देऊन, त्याच्यावर शेण आणि धोंडे मारायला लागत असू, तर स्वतंत्रताविरोधी आणि विकासविरोधी ताकदींच्या हातून देशाची सुटका होणे शक्य नाही. निर्णयामध्ये जरी काही त्रुटी आहेत, असे वाटले तरी तो घेणारे नेतृत्व लोकांपुढे जाते, आपली भूमिका मांडते आणि त्यावरच आजपर्यंत संघटना चालली आहे, हे लक्षात घेऊन, ऐन लढाईच्या काळात विसंवाद तयार करून नेतृत्वाचा आणि पर्यायाने संघटनेचा घात करणे कोणाच्याच फायद्याचे असत नाही.
 निवडणुका वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे आणि नेतृत्वाच्या आधाराने होत असतात. आपल्या देशात विरोधी पक्षांत जयप्रकाश नारायणांनंतर असे समर्थ नेतृत्व पुढे आले नाही. जे पुढे आले ते लालुप्रसादांसारखे. ते कितीही निवडून येवोत; पण त्यांच्याबद्दल आदर वाटण्याचे काहीच कारण नाही. अशा परिस्थितीमध्ये चारित्र्यसंपन्न, प्रतिभावान, बुद्धिमान, कर्तृत्ववान अशा तऱ्हेचे नेतृत्व आपल्याला हवे असेल, तर अशा रूपात पुढे येणाऱ्या व्यक्तीला नाउमेद करणारी आणि सगळेच उत्तरदायित्व त्याच्या एकट्याच्या माथी मारणारी प्रवृत्ती टाकून द्यायला हवी. स्वतंत्र भारत पक्षाचा एक आमदार असो की दहा, ते जोपर्यंत शेतकरी संघटनेच्या विचाराने चालणार असतील, तोपर्यंत त्यांना महत्त्व राहील. भाजपप्रमाणे दोनाचे दिडशे काय अगदी दोनशे तीन आमदार जरी स्वतंत्र भारत पक्षाचे झाले आणि ते जर चुकीच्या - शेतकरी संघटनाविपरीत विचाराच्या-आधाराने जाणारे असतील तर इतिहासात शेतकरी संघटनेची नोंद 'अशीही एक संघटना होऊन गेली, काही काळ तिचा प्रभाव होता,' इतपतच होईल.
 शेतकरी संघटनेचे नाव इतिहासात ठळकपणे नोंदले गेले पाहिजे अशी अपेक्षा बाळगण्याइतकी आपली ताकद आहे काय? निश्चितच आहे. शेतकरी संघटनेच्या आंबेठाण येथील शिबिरात मी वारंवार सांगितले आहे, की समाजवादी राजवटीने गुलामगिरीच्या खाईत लोटलेल्या समाजमनात शेतकरी संघटनेने स्वातंत्र्याच्या बीजाचे पुनरारोपण केले. 'सगळ्या इतिहासाची दिशा आणि गती स्वातंत्र्य आहे. प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक संघटना स्वातंत्र्याच्या कक्षा वाढवत जाते; जो जो स्वातंत्र्याला बंधन घालू पाहतो त्याला त्याला समाज व इतिहास सोडून देतो' हा मूलभूत विचार शेतकरी संघटनेने समाजात पुनर्प्रस्थापित केला. शेतकरी संघटनेच्या पाइकांना लाभलेला हा स्वातंत्र्याचा वसा टाकन जर आपण 'गुजराथ्यांना हटवा, बिहाऱ्यांना हटवा' अशासारख्या गर्जना करणाऱ्यांच्या झुंडगिरीपुढे नमलो, तर आपण कमावलेले सर्व काही क्षणार्धात निसटून जाईल. निवडणुकीसाठी एकत्र आलो म्हणजे काही आपण आपला स्वातंत्र्याचा विचार सोडून दिला असे नाही. लग्नानंतर मुले झाली, की नवराबायको मुलांच्या जबाबदारीच्या नावाने, एकमेकांचे आचारविचार जुळत नसताना संसार रेटतच राहतात. तसे काही आपल्याला करण्याची गरज नाही. आपण भाजप-शिवसेनेबरोबर युती केल्यानंतर प्रश्नांना उत्तरे देताना पंचाईत होते असे कितीतरी प्रसंग गेल्या चार वर्षांत आपल्यावर आले, इतकी त्यांच्या आणि आपल्या विचारांत तफावत आहे. गेली पंचवीस वर्षे आपण आपला विचार किती मस्तीत मांडत होतो आणि या युतीमुळे आपल्याला किती नरमाईने वागावे लागते, याच्या असह्य वेदना होतात. तेव्हा ही 'कुसंगत' चालूच ठेवायची का सोडायची याचा निर्णय घ्यायला हवा. शेतकरी संघटनेचे 'संन्याशाचे वैभव' दोनपाच आमदारांच्या लालसेमुळे नष्ट होणार असेल तर फेरविचार करणे आवश्यक आहे. हे वैभव जर टिकवून ठेवता आले नाही, तर शेतकरी संघटनेला भविष्य नाही हे निश्चित.
 निवडणुकीच्या राजकारणात जात आणि पैसा यांची समीकरणे सर्वच पक्ष वापरतात आणि कमीअधिक प्रमाणात यशस्वी झाल्याचे दिसतात. ही समीकरणे वापरून एका निवडणुकीत यशस्वी झालेले उमेदवार आणि पक्ष, तीच समीकरणे वापरणारे विरोधी उमेदवार आणि पक्ष यांच्याकडून पुढील निवडणुकीत पराभूत होताना दिसतात. जात आणि पैसा यांच्या समीकरणाच्या आधाराने मिळणारे यश चिरस्थायी नसते. तेव्हा अशा परिस्थितीतही जात आणि पैसा यांची समीकरणे वापरण्याऐवजी केवळ आपला विचार मांडून, कर्जमुक्तीच्या आधाराने निवडणुका जिंकणे आपल्याला शक्य होईल का? मला असे वाटते, की हे अशक्य नाही. तुम्हाला उमेद द्यावी किंवा स्फूर्ती यावी यासाठी केवळ मी हे बोलत नाही. आपण शेतकरी संघटनेच्या वैभवाच्या काळाबद्दल बोलतो. त्या काळात शेतकरी संघटनेने जो विचार मांडला, त्याची एक प्रतिष्ठा होती, त्याने समाजात संघटनेची एक प्रतिमा तयार झाली. भूतकाळात कमावलेली ही प्रतिष्ठा जर आपण गमावली तर निवडणुकीत कितीही यश मिळाले, तरी ते चिरस्थायी असणार नाही. तेव्हा 'सध्या आहे ते तसेच चालू द्या, काय भूमिका घ्यायची ते पुढे ठरवू,' असा काही टांगता निर्णय घेऊ नका की ज्यामुळे मला आणि तुम्हालाही पत्रकारांच्या आणि ज्या समाजाला आपल्यामध्ये काही वेगळ्या आणि सकारात्मक भूमिकेची प्रतिमा दिसली, त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना पंचाईत झाल्यासारखे वाटेल.
 याबाबतीत ठोस निर्णय या कार्यकारिणीत आणि इतक्या कमी वेळात होणे शक्य नाही आणि उचितही होणार नाही. त्यासाठी शेतकरी संघटना कुटुंबाचे अधिवेशन बोलावूया. या अधिवेशनात दोनचार दिवस व्यापक विचारविनिमय करूनच निर्णय घेऊया, अशी विनंती करून शेतकरी संघटनेचा पाईक म्हणून केलेले माझे हे निवेदन थांबवतो.

(६-२१ डिसेंबर २००४)

◆◆