बळीचे राज्य येणार आहे!/बळिराजा आता तुझा तेवढा आधार


बळिराजा आता तुझा तेवढा आधार



 विदर्भात शेतकऱ्यांमध्ये आत्महत्येची साथ पसरली आहे. त्या साथीला आवर कोणीच घालू शकलेले नाही. मुख्यमंत्र्यांनी १० डिसेंबर २००५ रोजी विदर्भातील ६ जिल्ह्यांसाठी हजारेक कोटी रुपयांचे गाठोडे दिले तरी शेतकऱ्यांच्या आत्महत्या चालूच राहिल्या, एवढेच नव्हे तर वाढल्या. माननीय कृषिमंत्री श्री. शरद पवार यांनी हैदराबाद येथे आत्महत्याप्रवण राज्यांचे मुख्यमंत्री व अधिकारी यांची एक बैठक घेऊन शेतकऱ्यांच्या आत्महत्यांविषयी करावयाच्या उपाययोजनात्मक कार्यवाहीबद्दल चर्चा केली त्यातूनही काही निष्पन्न झाले नाही. अलीकडे दस्तूरखुद्द पंतप्रधान विदर्भात येऊन गेले आणि त्यांनीही ३७५० कोटी रुपयांचे गाठोडे विदर्भातील आत्महत्याप्रवण जिल्ह्यांना देऊ केले तरीही शेतकऱ्यांच्या आत्महत्या काही थांबल्या नाहीत.
 या आत्महत्या का होतात ? कर्जबाजारी झालेला शेतकरी वर्षानुवर्षे निसर्गाशी आणि शासनाशी झगडा देत हरल्यानंतर हताश होतो. वर्षानुवर्षे साठलेले कर्ज आणि त्यावरील व्याज यांच्या वसुलीकरता सावकारी पद्धतीने सहकारी बँकांचे अधिकारी आले म्हणजे सर्वदूर अप्रतिष्ठा होते, हे पाहण्यापेक्षा डोळे मिटलेले बरे या भावनेने शेतकरी शेवटी जवळच्या विषाच्या कुपीकडे वळतो. हे पुष्कळसे सत्य आहे.
 पण, आत्महत्यांचे आणखीही सखोल विश्लेषण होण्याची गरज आहे. आत्महत्या अपमानापोटी, गरिबीपोटी होत असतील तर त्यांचे प्रमाण सर्वांत जास्त बिहार, उत्तर प्रदेश, ओरिसा यांसारख्या मागासलेल्या राज्यांत असायला हवे; पण तशी परिस्थिती नाही. याउलट, आत्महत्यांचे सर्वांत जास्त प्रमाण आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ आणि महाराष्ट्र यांसारख्या शेतीक्षेत्रात प्रगत असलेल्या राज्यांतच दिसून येते.
 या परिस्थितीचा फायदा काही मागास मनोवृत्तीचे लोक घेऊ पाहतात आणि "ज्या शेतकऱ्यांनी सुधारित शेती केली त्यांच्यामध्येच आत्महत्यांचे प्रमाण अधिक आहे. याउलट, जेथे मागास, पारंपरिक शेती चालू आहे तेथील शेतकरी संपन्न झाले नसले तरी आत्महत्येकडे ढकलले गेले नाहीत" असा युक्तिवाद करू पाहतात. नवीन तंत्रज्ञानामुळेच आत्महत्या आल्या आणि नवीन तंत्रज्ञानाला लागणाऱ्या खते व औषधे यांतील भेसळीमुळे त्यात भर पडली असाही या मागास मनोवृत्तीच्या लोकांचा युक्तिवाद आहे.
 आत्महत्यांच्या प्रमाणात भलीमोठी वाढ होण्याचे सांगितले जाणारे एक कारण मोठे विचित्र आहे. कर्जापोटी आत्महत्या केल्याचे सिद्ध झाले तर सरकार आत्महत्या करणाऱ्याच्या परिवारास लाखभर रुपये देते आणि त्यामुळे आपण मेलो तरी मिळालेल्या लाखभर रुपयांच्या नुकसानभरपाईमध्ये निदान कुटुंबतरी कर्जमुक्त होईल या भावनेने काही शेतकरी आत्महत्येला प्रवृत्त होतात असे म्हटले जाते. काही किरकोळ प्रकरणी तर परिवारातील नातेवाईकांनी अगदी म्हातारे होऊन कोपऱ्यात बसलेल्या परिवारातील एखाद्या माणसास बळेच विष पाजून ती आत्महत्या झाल्याचा गवगवा केला असेही सांगण्यात येते. खरेखोटे परमेश्वर जाणे.
 आत्महत्या करण्यास लोक प्रवृत्त का होतात? खरे म्हटले तर प्रत्येक माणसाची जगण्याची इच्छा तीव्र असते; जगण्यासाठीच सारी धडपड चालू असते. मग अचानक अशी काय परिस्थिती तयार होते की ज्यामुळे माणसाला जगण्याची धडपड सोडून देऊन आपली ही जीवनयात्रा संपवून टाकावी असे वाटू लागते?
 अमेरिकेसारख्या श्रीमंत देशांत आत्महत्यांचे प्रमाण जास्त आहे. त्याबरोबरच, तेथील कुटुंबव्यवस्था मोडकळीस आल्यामुळे घटस्फोटांचेही प्रमाण अधिक आहे. आई-बाप मुलगा कर्तासवरता झाला म्हणजे आपण त्याचे काही देणे लागतो असे मानित नाहीत; लग्न झाल्यानंतर मुलेही आईबापांस वृद्धाश्रमात ठेवून आपण आपले कर्तव्य केले असे समजतात. श्रीमंतीच्या या उन्मादात अनेकजण मादक द्रव्यांच्या सेवनाचेही व्यसनी बळी बनतात. त्याबरोबरच संपन्न देशांत आत्महत्यांचे प्रमाण अधिक आहे.
 हे असे का व्हावे? जर का माणसाची सगळी धडपड अधिकाधिक चांगले जगण्यासाठी आहे तर अधिक चांगले जगण्याची शक्यता निर्माण झाल्यानंतर माणसाला मरण्याची इच्छा अधिक प्रमाणात का व्हावी ? मागास मनोवृत्तीची माणसे याला उपभोगवादी समाजाची अनैतिकता हेच कारण असल्याचे सांगतात.
 भारतातही, अलीकडे कृषिमंत्र्यांनी संसदेत सादर केलेल्या आकडेवारीनुसार, ६० टक्के शेतकऱ्यात १६ टक्के आत्महत्या होतात तर ४० टक्के बिगरशेतकऱ्यात ८४ टक्के आत्महत्या होतात. आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बिगरशेतकरी समाजात आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण सर्वांत जास्त नोकरदारांत आहे. बेरोजगारही आत्महत्या करतात आणि ज्यांना चांगली नोकरी मिळाली आहे अशी माणसेही आत्महत्या करतात.
 संपन्न समाजात आत्महत्या अधिक व्हाव्यात आणि कौटुंबिक व सामाजिक प्रश्न अधिक बिकट व्हावे यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. संपन्न समाजातील प्रत्येक व्यक्तीस अधिकाधिक संधी प्राप्त होतात आणि स्वातंत्र्याच्या कक्षा रुंदावत असताना प्रत्येक वेळी निवड आणि निर्णय करण्याच्या जबाबदारीने त्याच्यावर मानसिक ताण पडतो. जुन्या काळच्या साध्यासुध्या जीवनात निवड आणि निर्णय करण्याची शक्यता माणसांना फार थोडी मिळत असे. या निर्णय करण्याच्या प्रक्रियेत मानसिक ताण आहे. आपण केलेला निर्णय बरोबर आहे किंवा नाही याबद्दलची थोडी चिंता आहे. नंतर चुकीच्या शाबीत झालेल्या निर्णयांबद्दल खंत आहे. यामुळे, मानसिक तणाव अधिक वाढत जातात आणि त्यातूनच अमेरिकासदृश परिस्थिती तयार होऊ शकते.
 बिहार, उत्तर प्रदेश, ओरिसा यांसारख्या राज्यांत आत्महत्या होत नाहीत याचा अर्थ तेथील शेतकरी फार काही सुखी आहे असा नाही. खाण्याची भ्रांत असलेला बिहारमधील शेतकरी आत्महत्या करीत नाही याचा अर्थ तो मनाने मोठा खंबीर आहे असेही नाही. अगदी पराकोटीच्या अडचणीत सापडलेला बिहारमधील शेतकरी गुन्हेगारीकडे वळेल, मारायला तयार होईल, चोरी करायला तयार होईल, दरोडे घालायला तयार होईल; पण आत्महत्या करण्याकडे त्याची प्रवृत्ती होणार नाही. विदर्भातील संस्कृती प्राचीन काळापासून संयत संस्कृती म्हणून प्रसिद्ध आहे. विदर्भातील माणसे सौम्य आणि सज्जन असल्याबद्दल त्यांची प्रख्याती आहे. ही माणसे हिंसाचाराकडे वळून स्वत:ची तुंबडी भरण्याचा विचारही करणे शक्य नाही. त्यांच्यापुढे पर्याय राहतो तो केवळ स्वत:ची जीवनयात्रा संपविण्याचाच.
 आत्महत्यांची एक साथही असते. मंडल आयोगाच्या वेळी दिल्लीतील पाचदहा विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. एकाने आत्महत्या केल्याबरोबर दुसऱ्याने केली, तिसऱ्याने केली ह्न अशी दहा विद्यार्थ्यांनी एका पाठोपाठ आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सासुसासऱ्याचा जाच होणाऱ्या सुनांच्या बाबतीतही असाच प्रकार आढळतो. एकदा एखाद्या वस्तीमध्ये, कॉलनीमध्ये एका सुनेने छळाला कंटाळून आत्महत्या केली की त्याच भागामध्ये असे प्रकार घडत राहतात. ही एक प्रकारची लागणच होते.
 असे का व्हावे? अडचणीत सापडलेला मनुष्य त्या अडचणीतून बाहेर कसे पडता येईल याचा विचार करतो. विचार करताना अधिक कष्ट करावे, मिळकत वाढवावी, अडचणी सोडवाव्या या दृष्टीने सारा विचार होतो. त्याच्या मनात मरणाला कवटाळावे अशी बुद्धी नैसर्गिकरीत्या होत नाही. असा विचार त्याच्या विषयपत्रिकेतही नसतो; परंतु आसपासच्या प्रदेशात समांतर परिस्थितीत सापडलेल्या कोणीतरी आपली जीवनयात्रा संपविण्याचा निर्णय केला असे उदाहरण घडले की मग त्यानंतर तशा परिस्थितीत सापडलेल्या सर्वांच्या मनात, निराशेच्या टोकाला गेल्यानंतर, आत्महत्या हा एक व्यावहारिक विकल्प म्हणून विषयपत्रिकेवर येतो. साहजिकच, आत्महत्या एकट्यादुकट्या होत नाहीत; आत्महत्यांची एक साथ असते.
 विदर्भातील शेतकऱ्यांमध्येही अशीच आत्महत्येची साथ पसरली आहे. गरिबीमध्ये आत्महत्यांचे प्रमाण कमी आणि संपन्न समाजात जास्त याचे आणखी एक महत्त्वाचे कारण आहे. गरीब कुटुंबात प्रत्येक जण गरजू असतो. तेथे आपल्याला कोणाची गरज नाही म्हणून उर्मटपणे वागण्याची प्रवृत्ती होत नाही. म्हाताऱ्या आई-बापांना का होईना, सांभाळून असावे अशी विचारसरणी तयार होते आणि त्यामुळे आपण, बायको, मुलेबाळे, आईबाप एवढेच नव्हे तर, काका-मामांनासुद्धा सांभाळून एकत्र राहण्याची प्रवृत्ती तयार होते. याउलट, संपन्न समाजात आपल्याला कोणाची गरज नाही, आपण कमावतो त्यात वाटेकरी जितके कमी होतील तितके जास्त चांगले अशा भावनेने संबंध तोडून आपले चौकोनी कुटुंब चालण्याची प्रवृत्ती जास्त दिसते.
 ही प्रवृत्ती प्रामुख्याने आत्महत्यांचे प्रमाण वाढविण्यास जबाबदार आहे. मानसशास्त्रज्ञांनी या विषयावर अनेक अभ्यास केले आहेत आणि त्यांनी निष्कर्ष काढला आहे की आत्महत्या करण्याची ऊर्मी ही क्षणिक असते. माणसाला एक क्षणभर आलेल्या विफलतेच्या भरात तो काय वाटेल ते करून जातो. तो क्षण जर का कोणत्याही कारणाने आणि कोणत्याही पद्धतीने टाळता आला तर आत्महत्या टळू शकते.
  एकत्रित कुटुंबात आत्मकेंद्री विचार करणे कठीणच होऊन जाते. त्याशिवाय, वैफल्यात सापडलेल्या माणसाला मदत करणारे, धीर देणारे, सांत्वना करणारे कुटुंबातील अनेक सदस्य आजूबाजूला असतात.
 याउलट. चौकोनी कुटुंबात कोणाच्या मनाची घालमेल होऊ लागली. वैफल्यग्रस्तता येऊ लागली की सावरण्यासाठी, धीर देण्यासाठी, याकरिता स्थापन झालेल्या काही स्वयंसेवी संघटना सोडल्यास, कोणीच मिळत नाही. आत्महत्यांचे सर्वांत महत्त्वाचे जवळचे कारण कुटुंबाचा आधार मोडकळीस आलेला असणे हे आहे.
 याचा अर्थ, कर्जबाजारीपणापोटी शेतकरी आत्महत्या करीत नाहीत असे नाही; पण कर्जबाजारीपणामुळे लक्ष्मी घरातून गेल्यामुळे साहजिकच घरामध्ये गृहकलह होऊ लागतात, घरामध्ये फाटाफूट होऊ लागते. शेतकरी समाजात तर जमिनीच्या वाटणीवरून भावाभावांची डोकेफोडीपर्यंत भांडणे होतात.
 कुटुंबसंस्था मोडकळीस येणे हे ना श्रीमंतीचे लक्षण आहे, ना गरिबीचे लक्षण आहे. गडगंज श्रीमती असलेल्या घरात प्रचंड एकोपा आढळतो आणि अत्यंत गरिबी असलेल्या कुटुंबातही हा एकोपा आढळतो. गडगंज श्रीमंती असलेल्या घरात लोकांना सगळे सांभाळून नेण्याकरिता एकत्र राहण्याची प्रवृत्ती असते, काही काळतरी ती टिकते आणि गरीब घरात एकमेकांच्या गरजांपोटी एकोपा टिकवून ठेवण्याची इच्छा राहते.
 आत्महत्यांचे प्रमाण सर्वांत जास्त आढळते ते ना धड संपन्न, ना धड गरीब अशा मध्यम परिस्थितीतील शेतकऱ्यांमध्ये. त्यातही ज्या शेतकऱ्यांनी संपन्नता पाहिली आहे, संपन्नतेचा अनुभव घेतला आहे त्यांना कठीण दिवस आल्यानंतर परिस्थितीला तोंड देणे जास्त अवघड होते.
 शेतीमालाला भाव मिळाला नाही, आपण कर्जबाजारी झालो, समाजात आपली प्रतिष्ठा राहिली नाही, सन्मान राहिला नाही हे दु:ख ऊर जाळत असताना, 'पण, कुटुंब माझे आहे' ही भावना नष्ट होणे हे खरे दुर्दैव आहे. "मी कर्जबाजारी झालो ही काही माझी चूक नाही. जे संकट आले आहे ते बाहेरचे आहे. चोरांनी हल्ला केला म्हणून मी आत्महत्या करणे योग्य होणार नाही. सर्व कुटुंबाने मिळून या संकटाला तोंड दिले पाहिजे." अशी मनोवृत्ती जर बाळगली गेली, आपल्या कुटुंबाविषयी आपलेपण आणि अनुकंपा बाळगली गेली तर आत्महत्यांचे प्रमाण शेतीचे शोषण असतानाही कमी होऊ शकते.
 ज्या कुटुंबांना दारिद्र्यामुळे, कर्जबाजारीपणामुळे आपल्या घरातही आत्महत्येसारखा प्रकार होण्याची भीती वाटते आहे त्यांच्याकरिता सरकार कधीकाळी काय करेल तो मुद्दा बाजूला ठेवू; पण ज्या सरकारने आजपर्यंत आपल्याला लुटले त्याच सरकारच्या मेहेरबानीची वाट पाहत जगण्यापेक्षा आपण आपले कुटुंब, आपला शेतकरी समाज हा संघटित करण्याची आवश्यकता आहे असे जर मानले तर शेतकऱ्यांची मने खंबीर होतील आणि आत्महत्येसारखा क्षणिक दुर्बलतेचा प्रसंग ते टाळू शकतील.
 पूर्वीच्या काळी संध्याकाळच्या वेळी घरामधील सगळी माणसे एकत्र जमून काही प्रार्थना म्हणत. आजही अनेक गांधीपरिवारातील कुटुंबांत ही परंपरा चालू आहे. शेतकऱ्यांनी कोणत्या एका धर्मातील किंवा कोणत्या एक देवाची प्रार्थना करावी असे मी कधीही म्हणणार नाही. शेतकरी काही फक्त हिंदू नाहीत, ते कोणत्याही एका धर्माचे नाहीत; पण सगळ्या शेतकऱ्यांनी मिळून जर अशी प्रतिज्ञा केली की, "आम्ही बुडालो ते आमच्या चुकीमुळे नव्हे आणि या आक्रमणाला आम्ही सर्व मिळून एकत्र तोंड देऊ, खचून जाणार नाही" तर, मला असे वाटते की, शेतकऱ्यांना याही प्रसंगातून तगून जाण्याकरिता जे सामर्थ्य हवे ते मिळू शकेल.

(शेतकरी संघटक, २१ जुलै २००६)