बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र/दौलतराव शिंदे ह्यांची कारकीर्द
भाग ३ रा.
सवाई माधवराव पेशवे हे इ. स. १७९५ सालीं मृत्यु पावल्यानंतर पुणें येथील पेशव्यांच्या गादीविषयीं तंटा उत्पन्न झाला. नाना फडनवीस, तुकोजी होळकर, बाळोबा तात्या, परशुराम भाऊ पटवर्धन वगैरे मंडळीनें राघोबादादांचे पुत्र बाजीराव ह्यांस गादी मिळूं न देण्याचा निश्चय करून, सातारच्या छत्रपतीकडून असे १[१]आज्ञापत्र आणविलें कीं, कै. सवाई माधवराव ह्यांच्या पत्नी यशोदाबाई ह्यांचे मांडीवर दत्तक पुत्र देऊन त्यास पेशवाईचा अधिकार द्यावा. त्याप्रमाणे त्यांनी चिमाजीआप्पास यशोदाबाईंचे मांडीवर दत्तक देऊन त्यास गादीवर बसविलें. इकडे बाजीराव ह्यांनीं, दौलतराव शिंदे हे सामर्थ्यवान् व प्रबल असल्यामुळें, त्यांस चार लक्ष रुपयांचा प्रांत व सैन्याचा खर्च देण्याचें मान्य करून, त्यांचे मार्फत स्वतःस गादी मिळविण्याचा प्रयत्न चालविला. ही बातमी नाना फडनविसांस समजतांच, त्यांनीं, शिंद्यांच्या लष्करी सामर्थ्यामुळें बाजीरावांस गादी मिळेल व आपलें वर्चस्व कमी होईल, अशी भीति बाळगून, बाजीरावाकडे सूत्र लाविलें; व आपण होऊन त्यास प्रतिबंधांतून मुक्त करून गादीवर बसविण्याचा निश्चय केला. इकडे शिंद्यांचे दिवाण बाळोबा तात्या ह्यांस हा नानांचा आपमतलबाचा विचार न आवडून त्यांनी त्यांचा निषेध केला; व तो सिद्धीस जाऊं न देण्याचा प्रयत्न चालविला. बाजीराव ह्यांचा स्वभाव निश्चल व एकमार्गी नसल्यामुळें त्यांनीं, ज्यांच्या हातून आपलें कार्य सिद्धीस जाईल असें वाटे, त्यांचें आर्जव करण्याचा व त्यांस अनुकूल करून घेण्याचा क्रम आरंभिला. नाना फडनविसांनी आपली सरशी ज्या बाजूनें होईल तो मार्ग स्वीकारला. त्यामुळें उभयतांस स्वतःच्या कार्यसिद्धीकरितां दौलतराव शिंद्यांच्या मदतीची अपेक्षा करणें भाग पडलें. त्याप्रमाणें उभयतांनीं दौलतराव शिंद्यांस अनुकूल करून घेण्याचा प्रयत्न सुरू केला. ह्या कामीं त्यांस साहाय्य कारण्यास जी व्यक्ति पुढें आली, ती सर्जेराव घाटगे ही होय. नाना व बाजीराव ह्यांनीं सर्जेरावाचा उपयोग करून आपले इष्ट कार्य तडीस नेलें.
नाना फडनविसांनीं सर्जेराव घाटगे ह्यांचे मार्फत दौलतराव शिंदे ह्यांचे प्रियकर मुत्सद्दी रायाजी पाटील ह्यांजकडे गुप्तरीतीनें अशी रदबदली चालविली होती कीं, बाळोबा तात्यांस कैद करून बाजीरावांस पेशवाईची गादी द्यावी; ह्मणजे बाजीरावांकडून तुह्मांस अहमदनगरचा किल्ला व परशुरामभाऊ पटवर्धनांची जहागीर मिळून १० लक्षांचा प्रांत बक्षीस मिळेल. परंतु ह्यांत त्यांस यश आलें नाहीं. बाजीराव व नाना ह्यांच्या गुप्त मसलती बाळोबा तात्यांस समजून, त्यांनीं बाजीरावांस कैद करून हिंदुस्थानांत पाठविण्याची तजवीज केली; व तें काम सर्जेराव घाटगे ह्यांस सांगितले. त्याप्रमाणें त्यांनी बाजीरावांस कैद करून उत्तर हिंदुस्थानांत स्वसैन्यानिशीं कूच केलें. ह्या प्रवासामध्यें बाजीरावांस एक युक्ति सुचली; व अखेर तीच त्यांस फलदायक झाली.
बाजीराव ह्यांस सर्जेराव घाटगे ह्यांच्या सुस्वरूप कन्येची माहिती असून, तिजवर दौलतराव शिंदे ह्यांचे मन आसक्त झाले आहे ही गोष्ट ठाऊक होती. तेव्हां दौलतराव शिंदे ह्यांस अनुकूल करून घेण्यास, हें आमिष उत्तम आहे असें मनांत आणून, त्यांनी सर्जेराव घाटगे ह्यांजपाशीं संधान लाविले. बाजीराव बोलण्यांत फार चतुर व गोड असल्यामुळें त्यांनी सर्जेराव घाटगे ह्यांजवर आपली छाप बसवून त्यांना अनुकूल करून घेतले. सर्जेराव ह्यांस, आपली घाटग्यांच्या उच्च कुलांतील मुलगी कण्हेरखेडच्या पाटलाचे वंशांत द्यावी, हे प्रथम बरें न वाटून, त्यांनी पुष्कळ आढेवेढे घेतले. परंतु बाजीराव हे महाराष्ट्रप्रभु झाल्यानंतर आपले अनेक मनोरथ व महत्त्वाकांक्षा सिद्धीस जातील असें वाटून, पुढें सर्जेराव घाटगे हे ह्या गोष्टीस राजी झाले; व त्यांनीं बाजीरावांकडून तीन अटी लिहून घेतल्या. त्या येणेप्रमाणे:-(१) बाजीरावांस पेशवाईचा अधिकार मिळाल्यानंतर त्यांनी दोन कोट रुपये दौलतरावांस द्यावे; २) घाटग्यांची कागल येथील पुरातन जहागीर सर्जेरावांस द्यावी; आणि (३) आपण राज्यारूढ झाल्यानंतर दौलतराव शिंदे ह्यांची दिवाणागिरी सर्जेरावांस देववावी.
बाजीराव गरजू असल्यामुळें त्यांनीं ह्या सर्व अटी मान्य केल्या. नंतर सर्जेराव घाटगे ह्यांनीं बाजीरावांची प्रकृति नादुरस्त असल्याचें ढोंग करून, हिंदुस्थानांत जाण्याचा बेत रहित केला; व प्रवरा नदीचे कांठीं, केशवं गोविंदाचे पिंपळगांवीं, मुक्काम केला. नंतर सर्जेराव घाटगे ह्यांनी दौलतराव शिंदे ह्यांस सर्व गोष्टी कळवून, त्यांस सर्वस्वीं अनुकूल करून घेतले. दौलतराव शिंदे ह्यांस हे सौंदर्यरत्न प्राप्त होण्याचा सुयोग आला हे पाहून परमानंद झाला; व त्यांनी सर्जेरावाचें ह्मणणे अक्षरशः मान्य करून, बाजीरावांस गादीवर बसविण्याचें अभिवचन दिले. ह्याप्रमाणे शेवटीं बाजीरावांस पेशवाईचें पद प्राप्त करून घेण्यास सर्जेराव घाटगे ह्यांच्या लावण्यवती कन्येचा उपयोग करणे भाग पडलें. स्त्रीसौंदर्यानें राजलक्ष्मीवर आपला पगडा बसविल्याची उदाहरणें इतिहासांत विपुल आहेत; तेव्हां ह्याबद्दल विशेष आश्चर्य मानण्याचे प्रयोजन नाहीं.
दौलतराव शिंदे बाजीरावांस अनुकूल झाल्यानंतर त्यांनीं बाळोबा तात्यांस कैद केलें; व बाजीरावांस परत बोलाविलें. नाना फडनवीस ह्यांची मसलत ह्या राजकारणांत होतीच. त्यामुळें त्यांनीं बाजीरावांस गादीवर बसविण्याची संधि साधून, त्यांच्याकडून दिवाणगिरीचीं वस्त्रें मिळविण्याचा यत्न चालविला होता. त्याप्रमाणें त्यांनी बाजीरावाशीं करार मदार करून, त्यांस सातारचे छत्रपतींकडून पेशवाईचीं वस्त्रें ता. ४ दिसेंबर इ. स. १७९६ रोजी आणून दिलीं. ह्याप्रमाणें पेशव्यांच्या गादीवर बाजीरावांची संस्थापना झाली.
बाजीरावांस गादी मिळाल्यानंतर ते नाना फडनवीस व दौलतराव शिंदे ह्यांच्या ओंजळीने पाणी पिऊं लागले. परंतु ते चंचलवृत्ति व कपटबुद्धि असल्यामुळें त्यांचे व नानांचें लवकरच वांकडे आलें, व त्यांनी नाना व दौलतराव ह्यांच्या त्रासांतून मुक्त होण्याचा प्रयत्न चालविला. बाजीराव ह्यांस आपले मनोरथ सिद्धीस नेण्यास सर्जेराव घाटगे हें उत्तम साधन मिळाले होतें. त्यांचा त्यांनी बहुमान करून व त्यांस नानाप्रकारच्या लालची दाखवून, त्यांस पूर्णपणे अंकित केलें होतें. त्यामुळें ते त्यांच्या अनुषंगाते वागून त्यांची मनीषा तृप्त करण्यास तत्पर झाले होते. अनावर स्वार्थेच्छा व प्रबल महत्त्वाकांक्षा तृप्त करण्यास, सहज संधि प्राप्त झाल्यावर, तिचा फायदा सर्जेराव घाटग्यांसारख्या पुरुषाने घेतल्यास त्यांत आश्चर्य तें काय ? बाजीरावांनीं सर्जेरावास अशी मसलत दिली कीं, नानांस कैद केलें असतां तुह्मांस दौलतरावाची दिवाणगिरी मिळण्यास उशीर लागणार नाही. त्याप्रमाणें सर्जेराव घाटगे ह्यांनी ता. ३१ दिसेंबर १७९७ रोजीं नानांस कैद केलें. अर्थात् नाना कैदेंत गेल्यावर पेशव्यांच्या राज्याची सर्व कैद विसकटली जाऊन "बळी तो कान पिळी" असा प्रकार झाला. सर्जेराव घाटगे ह्यांनी द्रव्यलोभानें नानांच्या आप्त व इष्ट मंडळींचा छल केला; व बहुत अनन्वित कृत्यें केली. त्या सर्वांचें वर्णन करण्याचे हें स्थल नाहीं.
नाना प्रधानगिरीवरून दूर झाल्यानंतर बाजीराव पेशवे ह्यांनी अमृतरावास आपले दिवाण नेमिलें, व दौलतराव शिंदे ह्यांच्याजवळ सर्जेराव ह्यांस आपला दिवाण नेमण्याबद्दल शिफारस केली. त्याप्रमाणें शिंदे ह्यांच्या दिवाणगिरीवर ह्या कारस्थानी गृहस्थाची योजना झाली. ह्या समयास दौलतराव ह्यांच्या इच्छेप्रमाणें बायजाबाईचा व त्यांचा विवाहसमारंभ घडून आला. हे लग्न पुणें मुक्कामीं इ. स. १७९८ चे मार्च महिन्यांत मोठ्या थाटाने झालें. ह्या वेळीं उत्सवप्रिय व तरुण शिंद्यांनीं जो समारंभ केला, तो फार हौसेचा व डौलाचा होता. त्यांनी ब्राह्मणभोजनें, नाचरंग, आतषबाजी वगैरेमध्यें अतिशय द्रव्य खर्च केलें. येणेंप्रमाणें 'दक्षिणची सौंदर्यलतिका' दौलतरावांस प्राप्त होऊन जिकडे तिकडे आनंदीआनंद झाला. ह्याप्रमाणें बायजाबाईसाहेब ह्या घाटग्यांच्या कुलांतून शिंद्यांच्या कुलांत गेल्या; व इतिहासांत ‘बायजाबाईसाहेब शिंदे' ह्या नावाने प्रसिद्ध झाल्या.
बायजाबाईसाहेबांचे लग्न झाल्यानंतर पुण्याच्या दरबारांत जीं राजकारणें व जे घोंटाळे झाले, त्यांचा संबंध ह्या चरित्राशीं नसल्यामुळें त्यांचे विवरण येथे करितां येत नाहीं. तथापि, ह्या लग्नामुळे दौलतराव शिंद्यांस मनस्वी कर्ज होऊन, त्यांना पुढें, बाजीरावांनीं देऊ केलेले दोन कोटी रुपये मागावे लागले; व ते वसूल करण्याकरितां सर्जेराव घाटग्यांस पुण्याची लूट करावी लागली. त्या लुटीमध्ये लोकांचा फार भयंकर रीतीने छल झाला, हें येथे नमूद करणे अवश्य आहे. ह्या छलानें त्रस्त होऊन, अमृतराव पेशवे ह्यांनी दौलतराव शिंदे ह्यांस कैद करण्याचा यत्न चालविला. बाजीराव पेशवे ह्यांनी एका भेटीमध्ये दौलतरावांस असे विचारिलें कीं, “तुह्मी माझे धनी आहांत कां नौकर आहात ? माझी प्रतिष्ठा ठेवायची असेल, तर तुह्मीं हिंदुस्थानांत निघून जावें. सर्जेरावाचा छल आता माझ्याने पाहवत नाहीं !”
पुण्यास बेबंदशाही झाल्यामुळे दौलतरावांचे तेथें वजन पडेनासें झालें. ह्याच सुमारास महादजी शिंद्यांच्या बायका दौलतरावांच्या विरुद्ध होऊन, त्यांनी शिंद्यांच्या प्रांतांत दंगा चालविला; व तिकडे उत्तर हिंदुस्थानांतही बरीच गडबड उडाली. तेव्हां दौलतराव ह्यांस
आपल्या प्रांताचा बंदोबस्त करण्याकरितां तिकडे जाणे भाग पडलें.
दौलतराव शिंदे उत्तर हिंदुस्थानांत गेले, त्या वेळी त्यांच्या सैन्याची पूर्वींची शिस्त सर्व बिघडली होती; व सर्व लष्करी सरदारांमध्ये परस्परांचा मत्सर व द्वेष हे दुष्ट ग्रह उत्पन्न झाले होते. ज्या वेळीं डी बॉयन ह्या फ्रेंच सरदारानें शिंद्यांच्या नौकरीचा राजीनामा दिला, त्या वेळीं फक्त त्याच्या एकट्याच्या हाताखाली २४००० पायदळ, ३००० घोडेस्वार व १२० तोफा इतकें जय्यद सैन्य होतें. डी बॉयन ह्याच्या मागून पेरन हा त्या सैन्याचा अधिपति झाला. त्याच्या ताब्यांत चंबळा नदीपासून पतियाळापर्यंत सर्व शिंद्यांचा प्रांत होता. परंतु त्याचें व लखबादादाचे वैर उत्पन्न होऊन शिंद्यांच्या सैन्यामध्यें फूट झाली. व हीच फूट शेवटी शिंद्यांची उत्तर हिंदुस्थानांतील सत्ता व स्वातंत्र्य हीं संपुष्टात आणायास कारणीभूत झाली.
दौलतराव शिंदे ह्यांस बालपणापासून लष्करी शिक्षण नसल्यामुळें व त्यांनीं स्वतः कधीं सेनापतीचें काम केले नसल्यामुळें, त्यांना सैन्याची व्यवस्था कशी करावी ह्याचे विशेष ज्ञान नव्हतें. त्यामुळे त्यांना निरनिराळ्या अधिकाऱ्यांवर अवलंबून राहून, त्यांच्या तंत्रानें चालण्या वांचून गत्यंतर नव्हतें. परंतु त्यांस तारुण्याची उमेद व अभिमान विशेष असल्यामुळें, जुन्या लोकांचे अनुभवही केव्हां केव्हां त्यांना अप्रिय वाटत असत. त्यांची विशेष प्रवृत्ति डामडौल व बाह्य देखावा ह्यांकडे फार असे. हीच प्रवृत्ति त्यांच्या नाशास कारण झाली. ह्या संबंधाने अशी एक गोष्ट प्रसिद्ध आहे कीं, दौलतराव शिंदे ह्यांनी उत्तर हिंदुस्थानांत जातांच, प्रथम उज्जनी एथे आपली टोलेजंग छावणी बांधण्याचा निश्चय केला. त्या वेळीं गोपाळरावभाऊ नामक एका जुन्या सरदारानें भर दरबारामध्यें त्यांची कानउघाडणी केली. त्यांनी सांगितलें कीं, "ज्या आमच्या वाडवडिलांनीं मराठी राज्य स्थापन केलें, त्यांनीं घोड्याच्या पाठीवर आपली घरें केली होती. ह्मणजे ते रात्रंदिवस घोड्यावर स्वार होऊन कालक्रमणा करीत असत. परंतु हळूहळू पुढें घोड्याच्या पाठीवरील घरें जाऊन, त्याऐवजीं कापडाचीं घरे ह्मणजे तंबू डेरे वगैरे अस्तित्वांत आली; आणि आतां तुह्मी मातीची घरें बांधून लष्कराची छावणी उभारीत आहां. परंतु हे लक्ष्यांत ठेवा कीं, ही छावणी अल्पकाळांत मातीमोल किंमतीची होईल." दौलतराव शिंदे ह्यांनीं हे भाषण ऐकून किंचित् स्मित केले, व त्यांस उत्तर केलें कीं, "माझ्याजवळ एवढी प्रचंड पायदळ फौज व भरभक्कम तोफखाना असतांना, माझ्याशीं कोण टक्कर देणार आहे?" त्या वेळी ह्या वयोवृद्ध सरदारानें उत्तर दिलें कीं, "हीच पायदळ फौज व ह्याच तोफा तुमच्या नाशास कारण होतील१!"[२] तीच गोष्ट पुढे अक्षरशः अनुभवास आली. असो.
दौलतराव शिंदे ह्यांनीं माळव्यांत गेल्यानंतर उज्जनी वगैरे प्रांत होळकराच्या ताब्यांतून परत घेऊन, उज्जनी येथे आपली राजधानी केली. उज्जनी येथे यशवंतराव होळकरांनीं लूटमार करून शिंद्यांच्या प्रजेस फार त्रास दिला होता. त्याबद्दल त्यांचा सूड घेण्याकरितां दौलतराव शिंदे ह्यांचे कारभारी सर्जेराव घाटगे ह्यांनी इंदुरावर चाल केली; व इंदूर गांव लुटून उध्वस्त केला. अशा रीतीनें आपसाआपसामध्यें कलह चालले. इकडे पुणें दरबारची स्थिति अत्यंत शोचनीय होत चालली. बाजीराव पेशवे ह्यांनी यशवंतराव होळकरांचा बंधु विठोजी ह्यास हत्तीच्या पायीं देऊन ठार मारल्यामुळे ते संतप्त होऊन पुण्यावर चालून गेले. त्यामुळें बाजीराव पेशवे हे भयभीत होऊन इंग्रजांकडे पळून गेले, व त्यांनी वसई मुक्कामीं ता. ३१ दिसेंबर इ. स. १८०२ रोजी इंग्रजांशी तह करून त्यांचे सख्य संपादन केलें. वसईचा तह हा इतिहासांत प्रसिद्ध आहे. हाच तह परकीय सत्तेचा मराठ्यांच्या दरबारांत पूर्ण प्रवेश होण्यास कारण झाला.
वसईचा तह हा मराठ्यांचे स्वातंत्र्य नष्ट करणारा असल्यामुळें तो दौलतराव शिंदे, रघुजी भोंसले व यशवंतराव होळकर ह्यांस रुचला नाहीं. त्यामुळें ते त्या तहाप्रमाणें बाजीरावांस सामील होऊन इंग्रजांशीं सख्य करण्यास मान्य होईनात. तेव्हां त्यांची सत्ता कमी करावी ह्या उद्देशाने त्यांचे व इंग्रजांचे युद्ध सुरू झाले. ह्या युद्धामध्यें मराठ्यांचें सैन्य ५०००० घोडेस्वार व ३०००० पायदळ व गोलंदाज मिळून एकंदर एक लक्ष होते. इंग्रजांचे सैन्य एकंदर ५०००० असून त्यावर त्यांचे प्रसिद्ध सेनापति जनरल वेलस्ली व लॉर्ड लेक हे होते. त्यांच्या व मराठ्यांच्या चकमकी सुरू झाल्या. त्यांत लासवारी, दिल्ली, आसई, अल्लीगड, वगैरे ठिकाणी फार तुमुल युद्धें झाली; व उभयपक्षांचें अद्वितीय शौर्य व्यक्त झालें. ता. २ दिसेंबर इ. स. १८०३ रोजीं, लासवारी येथील लढाईचा वृत्तांत लिहितांना, लॉर्ड लेक ह्यांनीं शिंद्यांच्या पक्षाकडील सैन्याची व तोफखान्याची फार फार प्रशंसा केली आहे. त्यांत त्यांनी शेवटीं असेंही ह्मटलें आहे कीं, “प्रतिपक्षाचे सैनिक लोक केवळ राक्षसाप्रमाणें ह्मणा, किंवा योध्याप्रमाणे ह्मणा, पण फार निकरानें लढले; व त्यांच्याशी आह्मीं अतिशय प्रबल व अजिंक्य शत्रू समजून लढाई केली; ह्मणूनच आह्मांस यश आलें. तशा रीतीनें आह्मी लढलों नसतो, तर खचित आमचा पराजय झाला असता!" ह्याप्रमाणें मराठी सैन्यानें आपलें शौर्य गाजविलें. परंतु प्रतिपक्षाच्या गनिमी काव्यानें त्यांस यश येऊं दिले नाहीं. जनरल वेलस्ली ह्यांच्या आसई येथील
युद्धामध्यें देखील मराठ्यांनी आपला असाच पराक्रम दाखविला. परंतु त्याचा उपयोग झाला नाही. तेव्हां अखेर, ता. ३० दिसेंबर इ. स. १८०३ रोजी, सुर्जीअंजनगांव येथे, दौलतराव शिंदे ह्यांचे वकील विठ्ठल महादेव, मुनशी कवलनयन, यशवंतराव घोरपडे आणि नारो हरी ह्यांनीं जनरल आर्थर वेलस्ली ह्यांच्याशी तह ठरविला. ह्या तहानें शिंद्यांच्या ताब्यांतील बराच प्रांत इंग्रजांकडे गेला; व त्यांचें पुष्कळ स्वातंत्र्य नष्ट झालें. इंग्रजांचा रेसिडंट शिंद्यांच्या दरबारीं प्रविष्ट झाला; व इंग्रजांची कांहीं फौज शिंद्यांच्या मदतीकरितां त्यांच्या सरहद्दीवर येऊन दाखल झाली.
सुर्जीअंजनगांवचा तह झाल्यानंतर पुनः इंग्रजांचा व शिंद्यांचा कांहीं दिवस बिघाड झाला. दौलतरावांनीं यशवंतराव होळकर व रघुजी भोंसले ह्यांस सामील होऊन पुनः इंग्रजांविरुद्ध लढण्याचा प्रयत्न केला. परंतु तो निष्फल होऊन अखेर त्यांस मेजर मालकम ह्यांच्या बरोबर ता. २२ नोव्हेंबर इ. स. १८०५ रोजी तह करणें प्राप्त झाले. ह्या तहामध्यें विशेषेंकरून पूर्वींच्या तहांतील अटी मान्य करून क्वचित् फेरफार केले होते. पूर्वींच्या तहांत ग्वाल्हेर व गोहद प्रांत दौलतराव शिंद्यांस न देता, त्याबद्दल १५ लक्ष रुपयांची नेमणूक देण्याचा ठराव होता; परंतु ह्या तहनाम्याने ते प्रांत शिंद्यांच्या आग्रहास्तव त्यांस परत दिले. ह्या प्रांताबद्दल इंग्रज मुत्सद्दयांचा पुष्कळ वादविवाद होऊन, अखेर इंग्रजांचा नावलौकिक रक्षण करण्याकरिता ते त्यांस परत द्यावे असें १[३]ठरले.
ह्या तहामध्यें मालकम साहेबांनी आणखी एक महत्त्वाचें कलम घातलें होतें. ते बायजाबाई संबंधाचे होय. बायजाबाई ह्यांचें दौलतराव शिंद्यांशीं लग्न झाल्यानंतर, त्या नेहमीं त्यांच्या लष्कराबरोबर त्यांचे सन्निध असत; व त्यांच्या सर्व राजकारणामध्यें त्यांचा प्रवेश असे. त्या त्यांच्या स्वारीशिकारीबरोबर स्वतः जात असत. घोड्यावर बसणें, बंदूक मारणें, भाला फेकणें वगैरे शिपाईगिरीच्या गोष्टींमध्यें त्या तरबेज असत. त्यामुळें त्यांचे नांव इंग्रज सेनापति जनरल वेलस्ली व मेजर मालकम ह्यांस पूर्ण माहित झालें होतें. दौलतराव शिंदे ह्यांचा व इंग्रजांचा जो रणसंग्राम झाला; त्यामध्यें बायजाबाई साहेबांनी प्रत्यक्ष रणभूमीवर किती कामगिरी बजाविली, हें समजण्यास मार्ग नाहीं. तथापि वेलस्ली साहेबांच्या सैन्याबरोबर टक्कर देऊन, त्यांनी आपले शौर्य व्यक्त केले असावें असें मानण्यास जागा आहे. ह्या त्यांच्या तेजस्वितेचा परिणाम ह्मणून ह्मणा, किंवा दौलतराव शिंद्यांच्या प्रिय पत्नी ह्मणून ह्मणा, इंग्रज मुत्सद्यांनी वर निर्दिष्ट केलेल्या तहामध्यें पुढील कलम दाखल केले होतेः-
"कलम ९:- उभयतां सरकारांनीं चंबल नदीची हद्द ठरविली; तेणेंकरून कंपनी सरकारास फायदा झाला; व महाराज अलिज्याबहादर
दौलतराव यांची कंपनी सरकाराशीं दोस्ती झाली. हे सर्व प्रकार मनांत आणून, कंपनीसरकार सालीना च्यार लक्ष रुपये खुद्द अलिज्याबहादर दौलतराव ह्यांस पेनशन देण्याचें कबूल करीत आहेत. ही रक्कम रेसिडेंट मार्फत तिमाही हप्तेबंदीनें महाराज अलिज्याबहादरांस आदा होत जाईल. ह्याशिवाय, महाराज अलिज्याबहादर दौलतराव ह्यांच्या राणी बायजाबाईसाहेब ह्यांस, बाळाबाईप्रमाणें कंपनीसरकार आपले हिंदुस्थानांतील राज्यांत दोन लक्ष रुपयांची जहागीर व महाराजांची कन्या चिमणाबाई हिजला एक लक्षाची जहागीर एकूण तीन लक्षांची जहागीर देण्याचे कबूल करीत आहेत.”
ह्या कलमाप्रमाणें बायजाबाईसाहेब व त्यांची कन्या चिमाबाईसाहेब ह्यांस कंपनीसरकारांतून स्वतंत्र जहागीर देण्यात आली. त्यावरून बायजाबाईसाहेब ह्यांचे माहात्म्य इंग्रज मुत्सद्दयांस पूर्ण विदित झालें असावें असें स्पष्ट दिसून येतें. हा तह झाल्यानंतर दौलतराव शिंदे ह्यांनी उघडपणानें इंग्रजांच्या विरुद्ध कधींही शस्त्र उचलले नाही. त्यांनी १८०५ नंतर उत्तर हिंदुस्थानांत ग्वाल्हेर येथें आपल्या सैन्याचा तळ दिला होता. तेथेंच इ. स. १८१० सालीं "लष्कर" गांव वसलें. हीच पुढें शिंद्यांची राजधानी झाली. दौलतराव शिंदे ह्यांचे पदरीं सैन्य पुष्कळ असून जानबत्तीस, सवाई शिकंदर, पेरन वगैरे फ्रेंच सेनापति होते. त्याचप्रमाणे बापू शिंदे, देवबा काळे, जगु बापू, अंबाजी इंगळे वगैरे नामांकित मराठे सरदार होते. सर्जेराव घाटगे हे इंग्रजांच्या विरुद्ध असल्यामुळें १८०५ सालच्या तहाप्रमाणें त्यांस दरबारांतील मंत्रिमंडळांतून कमी केलें होतें. परंतु पुनः त्यांनी दौलतरावांची मर्जी संपादन करून शिंद्यांच्या दरबारांत वर्चस्व प्राप्त करून घेतलें होतें. त्यांच्या अंगीं धारिष्ट व शिपाईगिरी हे दोन चांगले गुण होते. परंतु त्यांच्या इतर दुर्गुणांमुळे ते सर्वांस अप्रिय झाले होते. त्यांनी दौलतरावांच्या दरबारांत अरेरावीपणाचें वर्तन केल्यामुळें त्यांचा आनंदराव नामक सरदारानें व मानाजी फाकडे ह्यांच्या मुलाने ता. २७ जुलै इ. स. १८०९ सालीं वध केला.
शिंद्यांचें सैन्य अतिशय असून प्रांताचें उत्पन्न व्यवस्थित रीतीनें येत नसल्यामुळे त्याचा खर्च निभेनासा झाला. त्यामुळे दौलतरावांस आपला पुष्कळ प्रांत सैन्याच्या खर्चाकरितां कर्जदारांकडे गहाण ठेवावा लागला. एवढेंच नव्हे, तर इंग्रजसरकाराकडून मिळणारें पेनशन व जहागिरीचें उत्पन्न सावकारांस लावून द्यावे लागलें. त्यामुळें लष्करी अंमलदार शिरजोर झाले, व त्यांनी मन मानेल त्याप्रमाणे मनस्वी वर्तणूक केली. त्यामुळें राज्यांतील शिस्त व बंदोबस्त कमी झाला. पुढें इ. स. १८१७ सालीं पेंढारी लोकांची व इंग्रजांची लढाई झाली. त्या वेळीं मेजर मालकम ह्यांनीं, पुनः दौलतरावांबरोबर ता. ५ नोवेंबर १८१७ रोजीं नवा तह करून, शिंद्यांचे सैन्य इंग्रज अधिका-यांच्या देखरेखीखाली ठेविलें; व रजपूत संस्थानिकांवरचें शिंद्यांचे स्वामित्व काढून घेतलें. हा तह झाल्यानंतर होळकरांचा दंगा व बाजीराव पेशव्यांची धामधूम झाली. त्या प्रसंगी शिंद्यांच्या दरबारांतल्या कांहीं लोकांनी थोडी गडबड केली; परंतु खुद्द दौलतराव ह्यांनी इंग्रजसरकाराशीं बिघाड केला नाही. त्यामुळें बाजीराव पेशवे ह्यांचा त्यांजवर रोष झाला, व त्यांनी त्यांस रागाने असे पत्र पाठविले, कीं, "तुमचे तीर्थरूपांनीं स्वामिसेवा एकनिष्ठपणें करून, दिल्लीची वजिरी संपादन केली व ते जगविख्यात होऊन गेले. त्यांचे चिरंजीव तुह्मी असून, कंपनीसरकाराशीं स्नेह करून, आह्मांशीं कृतघ्न झालां. हें करणें तुह्मांस उचित नाहीं. ह्यापेक्षां तुह्मीं बांगड्या भरल्या असत्या, तर बरें झालें असतें. आह्मांवर तूर्त प्रसंग गुदरला आहेच. आतां तुमचे ऐश्वर्य कायम राहणे कठीण दिसते!" बाजीरावांचे हें पत्र वाचून दौलतराव शिंदे ह्यांनीं विस्मय प्रदर्शित केला. परंतु त्यांनी त्या पत्रानें प्रोत्साहित होऊन इंग्रजांविरुद्ध शस्त्र उचललें नाहीं. एकंदरीत त्यांनी ह्या वेळीं जें वर्तन केले, तेंच त्यांचें राज्य सुरक्षित राहण्यास कारण झालें. पेंढारी लोकांचे बंड मोडल्यापासून मध्य हिंदुस्थानांत बरीच शांतता झाली. तेणेंकरून शिंद्यांचे उत्पन्न २० लक्ष रुपये अधिक वाढलें व इतर रीतीनेंही पुष्कळ फायदे झाले. इ. स. १८१८ पासून दौलतराव शिंदे हे इंग्रजसरकाराशीं अत्यंत स्नेहभावाने वागून त्यांचे विश्वासू दोस्त बनले. त्यामुळे इंग्रजसरकारही त्यांचा उत्तम प्रकारचा मानमरातब ठेवीत असे. तात्पर्य, इ. स. १८१८ सालीं सर जॉन मालकम ह्यांनीं मध्यहिंदुस्थानामध्यें कंपनी सरकारची सार्वभौम सत्ता संस्थापित केल्यापासून इ. स. १८२७ सालापर्यंंत, ह्मणजे दौलतराव शिंदे ह्यांच्या मृत्यूपर्यंत, ग्वाल्हेर दरबारामध्ये ह्मणण्यासारख्या विशेष गोष्टी किंवा राजकीय चळवळी कांहीं घडून आल्या नाहींत.
- ↑ हें अस्सल आज्ञापत्र येणेंप्रमाणें आहे:-"स्वस्तिश्री राज्याभिषेक शके १२१ राक्षसनाम संवत्सरे क्षत्रियकुलावतंस श्री राजा शाहू छत्रपति स्वामी यांणीं राजमान्य राजश्री बाळाजी जनार्दन यांस आज्ञा केली ऐसीजेः- माधवराव पंडित प्रधान यांस अकालीं कैलासवास प्राप्त झाला; पोटीं पुत्र नाहीं; पेशवाईचे पदाचा कारभार चालोन बंदोबस्त जाहला पाहिजे. त्यास त्यांचे वंशांतील रघुनाथ बाजीराव यांचे पुत्र आहेत, त्यांतील पंतप्रधान यांची स्त्री यशोदाबाई यांस पुत्र देऊन पदाधिकारी करावें; तर पेशजी रघुनाथराव यांजपासोन अनन्वित गोष्ट घडली. त्या वेळचे मुत्सद्दी व सरदार यांचा पूर्ण द्वेष स्मरोन राज्यांत बखेडा पडेल व शास्त्रविरुध पडतें. व पेशजी कै. बाळाजी बाजीराव यांणीं स्वामिसेवा एकनिष्ठपणें केली. एतदर्थीं त्यांचे वंशाचे नांव पुढें चालावें याकरितां पंतप्रधान यांचे स्त्रीस दत्त पुत्र देऊन, पदास अधिकारी करून, कारभाराचा बंदोबस्त जाहला पाहिजे. हें जाणून हें आज्ञापत्र तुह्मांस सादर केले असे. तरी त्यांचे गोत्रजांतील दत्तपुत्र यशोदाबाई यांस देऊन, कारभारचा बंदोबस्त तुह्मीं करून, हुजूर विनंति करणे, जाणिजे. छ. २९. जमादिलोवल सु॥ तिसैन मया व आलफ " (मोर्तब).
- ↑ १ मराठ्यांनी आपली पूर्वीची युद्धपद्धति सोडून पाश्चिमात्य पद्धति स्वीकारली ३ ह्मणूनच त्यांचा नाश झाला, असे उद्गार मोठमोठ्या युरोपियन मुत्सद्यांनींही काढिले आहेत. सर फिलिफ फ्रान्सिस ह्यांनी पार्लमेंटमध्यें बोलतांना एकदा असे उद्गार काढिले कीं:-
"Sir, the danger you allude to, in the progress the Marathas are making in the art of casting cannon, in the use and practice of artillery, and in the discipline of their armies is imaginary. The Marathas can never be formidable to us in the field on the principles of an European army. They are pursuing a scheme in which they can never succeed, and by doing so they detach themselves from their own plan of warfare, on which alone, if they acted wisely, they would place dependence."
प्रसिद्ध सेनानी डयूक ऑफ वेलिंग्टन ह्यांचेही असेच मत होते - ↑ ह्या वेळचे सर जॉन मालकम, जनरल वेलस्ली वगैरे मुत्सद्दी इंग्रजांच्या नांवाबद्दल कशी काळजी बाळगीत असत, हें ह्यावरून शिकण्यासारखें आहे. ग्वाल्हेर व गोहद प्रांत शिंद्यांस देण्याबद्दल ज्या वेळीं भवति न भवति झाली, त्या वेळी जनरल वेलस्ली ह्यांनी पुढीलप्रमाणें आपलें मत मेजर माल कम ह्यांस कळविलें होतें:-
"I would sacrifice Gwalior or every frontier of India ten times over, in order to preserve our credit for scrupulous good faith, and the advantages and honour we gained by the late War and the peace; and we must not fritter them away in arguments drawn from overstrained principles of the laws of nations, which are not understood in this country. What brought me through many difficulties in the war, and the negotiations of peace? The British good faith, and nothing else.”Malcolm's life by Kaye Vol. I Page 269.