बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र/बायजाबाई शिंदे ह्यांचा कुलवृत्तांत

भाग २ रा.
__________

बायजाबाई शिंदे ह्यांचा कुलवृत्तांत.

 बायजाबाई शिंदे ह्यांच्या वडिलांचे नांव सखारामराव घाटगे सर्जेराव हें होतें. महाराष्ट्राच्या इतिहासांत ह्या पुरुषाचे नांव फार प्रसिद्ध आहे. सखारामराव घाटगे हे कोल्हापूर प्रांतांतील कागल गांवचे देशमुख होत. कागलची देशमुखी फार जुनी असून, ती प्रथम, विजापुरचा पहिला बादशाह युसफ आदिलशाह ह्याचे कारकीर्दींत घाटग्यांच्या घराण्यास बक्षीस मिळाली; व औरंगजेब बादशाहाने विजापूर प्रांत काबीज केल्यानंतर, पुनः ती घाटग्यांस वंशपरंपरेनें इनाम करून दिली, अशी माहिती मिळते. घाटग्यांचे घराणें फार प्राचीन असून, त्यांचा मूळ पुरुष कामराज घाटगे हा ब्राह्मणी राज्यामध्ये उदय पावला. त्याच्या वंशजांची एक शाखा मलवडीस राहिली. ती 'झुंजारराव' घाटगे ह्या किताबाने प्रसिद्ध आहे. दुसरी कागल येथे राहिली. ती कागलकर 'सर्जेराव' घाटगे ह्या नांवाने प्रसिद्ध आहे. कागलकरांस ‘सर्जेराव' हा किताब विजापुरच्या बादशाहाकडून मिळाला, अशी माहिती उपलब्ध []आहे. मि. ग्राहाम ह्यांनीं, घाटग्यांचे मूळपुरुष व कागलचे देशमुख [] भानजी घाटगे ह्यांस, शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोंसले ह्यांनी 'सर्जेराव' हा किताब दिला, असा उल्लेख केला आहे. भानजी घाटगे हे फार पराक्रमी व रणशूर पुरुष होते. ह्यांनीं, शहाजीराजे भोंसले ह्यांच्या नौकरींत असतांना, निजामशाही सरदार दुधा सर्जेराव रजपूत ह्याच्या सैन्याशीं मोठ्या मर्दुमकीनें युद्ध करून, त्याचा पराभव केला; व त्याचा खासा घोडा व सर्जा पाडाव करून आणिला. त्यावरून शहाजीराजे ह्यांनीं सुप्रसन्न होऊन त्यांस 'सर्जेराव' असें बहुमानाचें पद अर्पण केलें. ही माहिती जरी ग्राह्य मानिली, तरी शहाजीराजे ज्या अर्थीं विजापुरच्या बादशाहाच्या पदरीं नौकरीस होते, त्या अर्थीं विजापुरच्या बादशाहाकडूनच हे पद प्राप्त झालें असावें असें मानणें अधिक सयुक्तिक दिसतें. असो.
 भानजी घाटगे ह्यांचे संबंधाची विश्वसनीय माहिती उपलब्ध नाहीं. भानजीचे वंशज पिराजीराव घाटगे ह्यांच्यापासून ह्या घराण्याची संगतवार वंशावळी मिळते. पिराजीराव ह्यांस विजापुरचा बादशाह दुसरा इब्राहिम आदिलशाह (इ. स. १५८०-१६२६) ह्याच्या सुलतान महमद नामक वजिराकडून कागल परगणा व त्यांतील ६७॥ गांव इनाम मिळाल्याचा उल्लेख सांपडतो. त्यावरून पिराजीराव हे विजापुरच्या बादशाहीमध्ये प्रख्यात पुरुष होते असें मानण्यास हरकत नाही. त्यांच्या पश्चात् आबाजीराव, विठोजीराव, महादाजीराव, विठोजीराव आणि दुसरे पिराजीराव ह्या पुरुषांनीं कागल जहागिरीचा उपभोग घेतला. दुसरे पिराजीराव ह्यांस राणोजीराव, विठोजीराव, आबाजीराव, तुळजाजीराव व यशवंतराव असे पांच पुत्र होते. त्यांपैकी तुळजाजीराव ह्यांस जयसिंगराव व रामचंद्रराव असे दोन मुलगे होते. त्यांपैकीं जयसिंगराव ह्यांचे पुत्र सखारामराव हे पेशवाईच्या अखेरीस उदयास आले. मराठी राज्यामध्यें कागलकर घाटग्यांनी काय काय पराक्रम गाजविले, ह्याबद्दलची माहिती अद्यापि उपलब्ध झाली नाहीं. तथापि हें जुने व थोर घराणें कोल्हापूर प्रांतीं बरेंच प्रसिद्ध असावें असें दिसतें. इ. स. १७९२ सालीं ह्या घराण्यांतील यशवंतराव नामक एका पुरुषास कोल्हापुरचे छत्रपति शिवाजी महाराज ह्यांची कन्या आऊबाईसाहेब ही दिली होती. त्या वेळी ह्या घराण्याकडे कागलची जहागीर चालत नसून, ती कोल्हापुरच्या छत्रपतींच्या ताब्यात होती; व त्यांनी फक्त सहा गांव यशवंतराव ह्यांस लग्नाप्रीत्यर्थ इनाम दिले होते. तथापि तेवढ्या उत्पन्नावर घाटग्यांच्या घराण्याचा चांगला परामर्ष होईनासा झाला. त्यामुळे यशवंतराव व त्यांचे चुलत बंधु सखारामराव ह्यांच्यामध्ये तंटा उत्पन्न झाला. त्या वेळीं सखारामराव हे ईर्षेस पेटून, कागलाहून निघून परशुरामभाऊ पटवर्धन ह्यांचे पदरीं नौकरीस जाऊन राहिले.
 परशुरामभाऊ पटवर्धन हे त्या वेळीं दक्षिण महाराष्ट्रामध्यें पेशव्यांचे बलाढ्य सरदार ह्मणून प्रसिद्ध होते; व त्यांच्या पदरीं सैन्याचा जमावही पोक्त होता. त्यामुळें सखारामराव घाटग्यासारख्या मर्द शिपायास त्यांच्या पथकामध्ये शिलेदारीचें काम स्वीकारून आपली कर्तृत्वशक्ति दाखविण्यास चांगली संधि मिळाली. परशुरामभाऊ पटवर्धन हे स्वतः युद्धकलानिपुण व पराक्रमपटु असल्यामुळे 'गुणी गुणं वेत्ति' ह्या न्यायानें सखारामराव घाटगे ह्यांच्या शिपाईगिरीची त्यांनी तेव्हांच परीक्षा पाहिली; व त्यांच्या अंगी हिंमत, धाडस, शौर्य इत्यादि वीरपुरुषाचे गुण चांगले वसत आहेत, असें त्यांच्या लक्ष्यांत आले. तेव्हांपासून त्यांची सखारामरावावर हळू हळू मेहेरबानी जडत चालली. परशुरामभाऊंसारख्या प्रबल व वजनदार सरदाराचा चांगला आश्रय मिळाल्यामुळें सखारामराव घाटगे ह्यांस आपला भाग्योदय करून घेण्याचा अनायासें योग प्राप्त झाला.
 सखारामराव ह्यांचे परशुरामभाऊ पटवर्धनांबरोबर पुण्यास वारंवार जाणें येणें होऊं लागलें. त्या योगानें पुणें दरबारचे प्रख्यात मुत्सद्दी नाना फडनवीस ह्यांचा व त्यांचा चांगला परिचय झाला. सखारामराव घाटगे हे हुशार, धीट व कारस्थानी गृहस्थ असल्यामुळें नाना फडनविसांची त्यांच्यावर मर्जी बसली; व त्यांनी परशुरामभाऊंकडून त्यांना मागून घेऊन, खुद्द पेशव्यांचे लष्करांत त्यांस खास पथकाची शिलेदारी दिली. अशा रीतीनें सखारामराव ह्यांचा पुणें दरबारात प्रवेश झाला.
 सखारामराव घाटगे पुण्यास आल्यानंतर लवकरच सवाई माधवराव पेशवे हे मृत्यु पावले; व पुणें दरबारांत गोंधळ होऊन, पेशवाईच्या गादीविषयीं तंटेबखेडे सुरू झाले. त्या प्रसंगी महादजी शिंदे ह्यांचे दत्तक पुत्र दौलतराव शिंदे, नाना फडनवीस आणि परशुरामभाऊ पटवर्धन ह्यांची अनेक कारस्थानें होऊन, अखेर बाजीराव पेशवे ह्यांस पेशवाईची गादी मिळाली. ह्या सर्व राजकारणांत सखारामराव घाटगे हे अंशतः सूत्रचालक होते, असे ह्मणण्यास हरकत नाहीं. 
 सवाई माधवराव ह्यांच्या मृत्यूनंतर, पेशव्यांच्या गादीवर कोणास बसवावें ह्याबद्दल वादविवाद चालू असतां, दौलतराव शिंदे ह्यांचे दिवाण बाळोबातात्या व परशुराम भाऊ पटवर्धन ह्या दोघांचे व नाना फडनविसांचे वैमनस्य येऊन, नानांस पुण्यांतून पळून जाण्याचा प्रसंग आला. त्या वेळीं सखारामराव घाटगे हे आपल्या पथकानिशीं दौलतराव शिंदे ह्यांच्या नौकरीस जाऊन राहिले. तेथें रायाजी पाटलांचा व त्यांचा चांगला स्नेहसंबंध जडल्यामुळें त्यांची दौलतराव शिंदे ह्यांच्या दरबारांत चांगली चाहा झाली. अशा रीतीनें शिंद्यांच्या दरबारात प्रवेश होतांच, सखारामराव ह्यांनीं, आपल्या गोड व मोहक वाणीनें, आपल्या उत्सवप्रिय व तरुण यजमानांचे मन तेव्हांच वेधून टाकिलें. अर्थात्, दौलतराव शिंदे ह्यांची सखारामराव घाटग्यांवर पूर्ण मेहेरबानी जडल्यामुळें, त्यांस पुणेंदरबारांत आपलें वर्चस्व स्थापन करण्यास विलंब लागला नाहीं. सखारामराव हे इतिहासांत 'सर्जेराव घाटगे' ह्या नावाने प्रसिद्ध आहेत. हे सर्जेराव घाटगे आमच्या चरित्रनायिका बायजाबाई ह्यांचे जनक होत. 
 बायजाबाईंच्या मातुल घराण्याची थोडीशी हकीकत येथें सादर केली पाहिजे. बायजाबाईंचे वडील ज्याप्रमाणे पुरातन, घरंदाज, पराक्रमी व अस्सल मराठे घराण्यांतील होते; त्याप्रमाणें त्यांच्या मातुश्री ह्याही जुन्या व इतिहासप्रसिद्ध घराण्यांतील होत्या. हे घराणें अस्सल मराठ्यांपैकी असून, ह्यांतील पुरुषांनी महाराष्ट्रराज्यरक्षणाचे कामीं पराकाष्ठेचें साहाय्य करून, आपली स्वामिनिष्ठा व स्वदेशभक्ति व्यक्त केली आहे. औरंगजेब बादशाहानें दक्षिणेंत येऊन सर्व महाराष्ट्रप्रांत काबीज केला; व छत्रपति शिवाजी महाराजांनी संस्थापित केलेलें मराठी राज्य व महाराष्ट्रधर्म ह्यांचा समूळ विध्वंस होण्याचा बिकट प्रसंग प्राप्त झाला; त्या वेळीं, कर्नाटकप्रांतीं, राजाराम महाराजांस अप्रतिम साहाय्य करून, ज्यांनी आपल्या अलौकिक शौर्याची, अचाट साहसाची, अतर्क्य देशभक्तीची, आणि अपूर्व स्वार्थत्यागाची सीमा करून दाखविली; आणि यवनांचा पराभव करून महाराष्ट्रराज्य व महाराष्ट्रधर्म ह्यांचे रक्षण केलें; त्या वंदनीय वीरश्रेष्ठांपैकीं ह्या घराण्यांतील मूळ पुरुष एक होत एवढें सांगितलें, ह्मणजे ह्या घराण्याच्या थोरपणाबद्दल किंवा कुलीनतेबद्दल अधिक प्रशंसा करण्याचें प्रयोजन नाहीं. हणमंतराव पाटणकर हे नांव महाराष्ट्राच्या इतिहासांत प्रसिद्ध आहे. ह्यांनी राजाराम महाराजांच्या चंदीच्या राजकारणांत उत्कृष्ट स्वामिसेवा केल्यामुळे त्यांस 'समशेरबहादुर' हा किताब व पाटणखोऱ्यातींल ४० गांवांची पाटण कसब्यासुद्धां जहागीर इनाम मिळाली होती. त्यांच्या पूर्वजांचे पूर्वींचें उपनांव साळुंखे हे असून, हे पूर्वापार पाटणचे देशमुख होते. पुढे हे पाटणास राहूं लागल्यापासून ह्यांस पाटणकर हे नांव प्राप्त झाले. ह्यांचे राहण्याचे ठिकाण पाटण हें असून, तें साता-याचे नैर्ऋत्येस १५ कोसांवर कोयना नदीचे कांठीं आहे. येथे त्यांचा पूर्वींचा जुना वाडा वगैरे असून तेथील इनामदार ह्या नात्यानें त्यांच्या वंशजांची योग्यता अद्यापि फार आहे; व दक्षिणेंतील सरदारांच्या पटामध्यें ते उच्च प्रतीचे सरदार आहेत.
 हणमंतराव पाटणकर ह्यांस दारकोजीराव, हिरोजीराव, आणि धारराव असे तीन पुत्र होते. ते आपल्या वडिलांप्रमाणेच कर्तृत्ववान् व पराक्रमशाली होते. ह्यांपैकी पहिले दारकोजीराव ह्यांस सात पुत्र होते. त्यांपैकीं रामराव व लक्ष्मणराव ह्यांचा वंश नष्ट झाला; व बाकीचे आपापल्या योग्यतेप्रमाणें नावारूपास आले. ह्या पांच जणांची नांवे येणेंप्रमाणें:–बाबूराव, बाळोजीराव, राघोजीराव, बाजीराव व जयरामराव. ह्यांपैकीं चौथे-बाजीराव हे बायजाबाई साहेबांचे मातामह होत. हे मोठे रणशूर पुरुष होते. पेशव्यांनी अखेरच्या अमदानींत जुन्या मराठे घराण्यांतील शूर पुरुषांचा परामर्ष न घेतल्यामुळें अनेक तेजस्वी व बाणेदार पुरुष निराश झाले, व जिकडे अवकाश मिळेल तिकडे आपली शिपाईगिरी दाखविण्याकरितां निघून गेले. त्यामुळें मराठ्यांचे ऐक्य व तेजस्विता लोपली जाऊन महाराष्ट्रमंडळाचा नाश झाला. अशा पुरुषांपैकीं बाजीराव पाटणकर हे एक होत. पुणेदरबारांत ह्यांच्या शौर्यगुणांचें योग्य अभिनंदन व चीज न झाल्यामुळें हे मुधोजी भोंसले नागपूरकर ह्यांच्याकडे गेले. तेथें त्यांनी अनेक पराक्रमाची कृत्यें केलीं, व भोसल्यांच्या दरबारांत फार लौकिक मिळविला. पुढें बाजीराव पेशवे ह्यांनी त्यांस पाचारण करून पुण्यास आणविलें; आणि त्यांस आपल्या दरबारांत ठेवून घेतले. बाजीरावसाहेबांनी त्यांचे शौर्य पाहून त्यांस मौजे तांबवे हा गांव इनाम दिला. तो त्यांजकडे व त्यांचे बंधु जयरामराव ह्यांजकडे इ. स. १८१८ पर्यंत चालत होता. पुढे इ. स. १८१८ सालीं महाराष्ट्रामध्यें राज्यक्रांति घडून आली; व पेशव्यांची सत्ता नष्ट होऊन, इंग्रजसरकार महाराष्ट्राचे सार्वभौमप्रभु बनलें. त्या वेळी मि. एल्फिस्टन ह्यांनीं, बाजीराव पाटणकर ह्यांची योग्यता व खानदान हीं लक्ष्यांत घेऊन, त्यांस तीन हजार रुपये सालीना पेनशन करून दिलें. परंतु बाजीराव पाटणकर लवकरच मृत्यु पावले. नंतर त्यांच्या स्त्रीस १२०० रुपये तैनात झाली. ती सातारचे छत्रपति प्रतापसिंह ऊर्फ थोरले महाराज ह्यांच्या कारकीर्दीपर्यंत चालत होती.
 बाजीराव पाटणकर ह्यांस सुंदराबाई ऊर्फ नानीसाहेब नामक एक कन्या होती. ती कागलचे जहागीरदार सखारामराव घाटगे सर्जेराव ह्यांस दिली होती. ही बाई फार साध्वी व सुशील असे. हिच्या पोटीं सर्जेराव ह्यांस जयसिंगराव व बायजाबाई अशी दोन अपत्यें झाली. जयसिंगराव ह्यांचा जन्म इ. स. १७७९ ह्या []साली झाला; व बायजाबाई ह्यांचा जन्म इ. स. १७८४ साली झाला. बायजाबाईच्या बाळपणाची माहिती उपलब्ध नसल्यामुळें ती देतां येत नाहीं. तथापि ती लहानपणीं फार बाळसेदार व दखणी असून, तिजवर सुंदराबाईचें फार प्रेम होतें, एवढें सांगण्यास हरकत नाहीं. सखारामराव घाटगे ह्यांच्या स्थित्यंतराचें व त्या वेळच्या देशस्थितीचे चित्र लक्ष्यात घेतले, तर बायजाबाईचें बाळपण राजवाड्यांतील राजलक्ष्मीचे बहुविध विलास उपभोगण्यांत गेलें असावें, असे मानितां येत नाही. अनेक वेळां प्राप्त झालेलीं राजकीय संकटे, सदासर्वदां अनुभवलेले घोड्यावरील प्रवासाचे कष्ट, आणि प्रसंगविशेषीं प्राप्त होणारें शिलेदारी पेशाचें सुखपर्यवसायी दुःख, अशा प्रकारच्या परिस्थितीमुळें मराठे सरदारांच्या मुलांवर जे संस्कार होणें साहजिक आहेत, ते बायजाबाई व त्यांचे बंधु ह्यांच्यावर झाले होते, असे ह्मणण्यास कोणताच प्रत्यवाय नाहीं. हीं मुलें अशा प्रकारच्या परिस्थितींत वाढल्यामुळे सुदृढ, सशक्त, धाडशी, व घोड्यावर बसण्यांत पटाईत अशीं निपजलीं होतीं. बायजाबाई ही अगोदरच रूपसंपन्न असून, तिच्यामध्ये हे वरील गुण वास करीत असल्यामुळें तिची कीर्ति महाराष्ट्रांतील थोर थोर सरदारांमध्ये पसरली; व दौलतराव शिंद्यांसारखे तरुण व रंगेल सरदार तिच्या सौंदर्यावर लोलुप होऊन तिला वरण्यास उत्सुक झाले. बायजाबाई शिंदे ह्यांस कित्येक इतिहासकारांनीं 'दक्षिणची सौंदर्यलतिका' ( Beauty of the Deccan ) अशी संज्ञा दिली आहे. ती अगदी यथार्थ आहे. राजस्थानांतील कृष्णाकुमारी इत्यादि लोकप्रसिद्ध लावण्यवतींच्या लग्नाचे प्रसंग ज्याप्रमाणे मोठमोठीं राजकारस्थानें घडविण्यास कारणीभूत झाले, त्याप्रमाणें बायजाबाई ह्यांचे लग्न हे देखील महाराष्ट्रांतील एक राजकारस्थान घडवून आणण्यास कारणीभूत झालें.

______________
  1.  "Representative men of the Bombay Presidency" ह्या पुस्तकामध्यें कागलचे वरिष्ठ शाखेचे जहागीरदार श्रीमंत पिराजीराव बापूसाहेब ह्यांच्या घराण्याचा अल्पसा सचित्र वृत्तांत दिला आहे. त्यांत "सर्जेराव" हे पद विजापुरच्या बादशाहाकडून मिळाले असा स्पष्ट उल्लेख आहेः-
     "The title of Sarjerao was conferred by an Emperor of Bija
    pur on one of the chief's ancestors who in fair fight defeated and slew Dudha Sarjerao, a Rajput leader sent by Aurangzib to over-throw the Bijapur dynasty. Bhanji, the Chief of Kagal's ancester as before stated, slew this adversary and wrested the Sarja, head-ornament or crest, from his turban and carried it to the King, who was so pleased with the exploit that he presented the crest to Bhanji, and gave him the title of darjerao."-Page 52.
  2.  मेजर ग्राहाम ह्यांच्या "Statistical Report on the Principality of Kolhapur" नामक उत्कृष्ट माहितीनें भरलेल्या ग्रंथामध्यें जो उल्लेख आहे, तो येणेंप्रमाणेः-
     "Bhanjee Ghatgay, Deshmuk of Kagal, who was in to service of Shahajee, the father of Shivajee, the founder of Maratha empire, having encountered the forces of the Nizam Shahee Government, defeated Doodha Surjérao Rajput, and seized his horse and Surja ( the crest of the horse ), Shahajee accordingly conferred on him the title of Surjérao."-Page 302
  3.  मेजर जी. मालकम कोल्हापुरचे अक्टिग पोलिटिकल सुपरिंटेंडंट ह्यांनी ता. ३ जुलै इ. स. १८५४ सालीं सरकारास कोल्हापूर प्रांतांतील जहागिरीबद्दल जो रिपोर्ट केला आहे, त्यांत जयसिंगराव बाबासाहेब ह्यांचे वय ७५ वर्षांचे दिले आहे. त्यावरून हा सन सिद्ध होतो.