बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र/शिंदे घराण्याचा अल्प वृत्तांत

महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे
ह्यांचे चरित्र
❖❖❖
भाग १ ला.
---------------

शिंदे घराण्याचा अल्प वृत्तांत.


शिंदे ह्यांचे घराणे महाराष्ट्राच्या इतिहासांत फार प्रसिद्ध आहे. हें घराणे फार पुरातन असून, ह्यांतील कित्येक पुरुष, भोंसले, शिर्के, घोरपडे, जाधव, घाटगे वगैरे जुन्या मराठे सरदारांप्रमाणे मुसलमानी अमदानींत स्वपराक्रमानें उदय पावले असावेत, असे मानण्यास जागा सांपडते. 'रविराव' हें, 'रुस्तुमराव’ ‘झुंझारराव' ह्यांसारखे बहुमानदर्शक पद शिंद्यांच्या एका घराण्याकडे होते, असा उल्लेख ग्रांटडफ साहेबांच्या इतिहासांत दृष्टीस पडतो. ब्राह्मणी राज्यामध्ये शिंदे नांवाचे पुरुष मोठमोठे लष्करी अधिकार उपभोगीत होते, अशीही माहिती मिळते. मुसलमानी अमदानींतील मराठे सरदारांचा इतिहास अगदीं अंधकारांत असल्यामुळे त्याविषयीं अधिक खुलासा करितां येत नाहीं. तथापि महाराष्ट्रराज्यसंस्थापक छत्रपति शिवाजी महाराज ह्यांच्या कारकीर्दीपासून शिंदे घराण्यांतील पुरुषांचा नामनिर्देश जुन्या बखरी व जुने कागदपत्र ह्यांत यथास्थित सांपडतो; व त्यावरून हें घराणे मराठेशाहीच्या अगदी प्रारंभापासून अस्तित्वांत आहे, असे निःसंशय ह्मणतां येतें. शिवाजी महाराजांचे पदरीं नेमाजी शिंदे ह्या नांवाचे एक प्रबल व पराक्रमी सुभेदार होते; व त्यांनी महाराष्ट्रराज्यस्थापनेचे कामीं चांगली मदत केली होती[]. नेमाजी शिंदे ह्या पुरुषांचे नांव थोरले शाहू महाराजांचे कारकीर्दींतील अव्वल राजकारणप्रसंगांत वेळोवेळी दृष्टीस पडते. त्यावरून हा महाराष्ट्रवीर समरभूमीवर बरीच वर्षे चमकत असावा असे वाटतें. थोरले राजाराम महाराज ह्यांचे कारकीर्दींत जे लोकोत्तर स्वदेशभक्त निर्माण झाले, व ज्यांनी जीवादारभ्य श्रमसाहस करून स्वराज्य रक्षण केलें, त्या परम वंदनीय वीरमंडलामध्ये नरसोजी व जिवाजी पाटील शिंदे तोरगलकर पागनीस ह्या दोघांची नावें अंतर्भूत आहेत. ह्यावरून शिंदे घराणे हे पूर्वीपासून विख्यात आहे, असें ह्मणण्यास हरकत नाहीं.

 शिंदे घराण्याच्या थोरपणाबद्दल आणखी एक दाखला सांपडतो. औरंगजेब बादशाहाने, आपल्या पदरचे सरदार कण्हेरखेडेकर शिंदे ह्यांच्या कन्येशीं शाहू महाराजांचे लग्न इ. स. १७०६ साली लावून दिलें, ही गोष्ट इतिहासांत प्रसिद्धच आहे. ह्या मुलीचे नांव सावित्रीबाई असे होते. ही इ. स. १७१० मध्ये वारली. अर्थात् छत्रपति शाहू महाराज ह्यांच्या क्षत्रियकुलावतंस व सर्वश्रेष्ठ महाराष्ट्रकुलाशीं ज्या घराण्याचा शरीरसंबंध जडला होता, तें घराणे हीन ज्ञातीचें असेल हें संभवनीय दिसत नाहीं. क्याप्टन क्ल्यून्स ह्यांचेही असेच मत आहे.

  प्रकृत चरित्रनायिका श्रीमती महाराणी बायजाबाईसाहेब ज्या शिंदे घराण्यांत प्रसिद्ध झाल्या, त्या घराण्याचा मूळ पुरुष राणोजी शिंदे हा होय. ह्याची माहिती देतांना, मध्य हिंदुस्थानचे इतिहासकार सर जॉन मालकम ह्यांनी असें लिहिलें आहे कीं, शिंदे ह्यांचे घराणें मूळचें शूद्र जातीचें असून त्यांचा मूळ पुरुष राणोजी हा होय. हा मूळचा कण्हेरखेडचा पाटील होता. तो प्रथमतः बाळाजी विश्वनाथ पेशवे ह्यांच्या पदरीं नौकरीस राहिला. त्या वेळी त्याजकडे खिजमतगाराचें ह्मणजे हुजऱ्याचे काम होतें. पुढें तो बाजीराव बल्लाळ पेशवे ह्यांचे कारकीर्दीत हुजऱ्याच्या जागेवरून पागेचा शिलेदार बनला. ह्या संबंधाने अशी आख्यायिका प्रसिद्ध आहे कीं, बाजीराव साहेब एके वेळीं शाहू महाराजांस भेटण्याकरितां राजवाड्यांत गेले. त्या वेळी त्यांचा हुजऱ्या राणोजी हा, नेहमीप्रमाणे त्यांच्या चर्मपादुका हातीं घेऊन, दाराशीं बसला. तितक्यांत त्यांस आकस्मिक निद्रा लागली. बाजीराव साहेब छत्रपतींची भेट घेऊन दाराबाहेर आले; तों, त्यांचा स्वामिनिष्ठ सेवक त्यांच्या चर्मपादुका उराशीं घट्ट धरून बसलेला त्यांच्या नजरेस पडला. अर्थात् हुजऱ्याची स्वामिभक्ति पाहून त्यांस आश्चर्य वाटलें व फार संतोष झाला. नंतर त्यांनी लवकरच त्यास आपल्या पागेमध्यें शिलेदाराची जागा दिली. येणेप्रमाणे राणोजीचा भाग्योदय झाला. ही मालकम साहेबांनी दिलेली आख्यायिका खरी आहे. ह्यावद्दल ग्वाल्हेरचे रेसिडेंट क्याप्टन स्टुअर्ट यांनी चौकशी-अंती खात्री करून घेतलेली आहे. ह्या आख्यायिकेच्या पुष्टिकरणार्थ त्यांनी आणखी असे लिहिले आहे कीं, "राणोजीनें ह्या पेशव्यांच्या जुन्या चर्मपादुका आपल्या भाग्योदयाचें मूळकारण आहेत असें समजून, त्या नीट जतन करून ठेवल्या होत्या; व त्याविषयीं तो फार पूज्यभाव बाळगीत असे." राणोजीची ही स्वामिनिष्ठा पाहून कोणाचे हृदय आनंदानें उचंबळणार नाहीं बरं ? असो. राणोजीच्या उदयासंबंधानें सर जॉन मालकम ह्यांनी जी दंतकथा दिली आहे, तिच्यावरून राणोजी प्रथमतः हलक्या दर्जाचा नोकर होता असें दिसून येते. तथापि त्यामुळें शिंद्यांचे घराणे कमी योग्यतेचें होतें, असें मात्र मानितां येत नाहीं.

 राणोजीचा चरित्रवृत्तांत फार मनोरंजक व वीररसपरिप्लुत असा आहे. तो समग्र दाखल करण्याचे हें स्थळ नाहीं. तथापि त्याच्या व त्याच्या वंशजांच्या कारकीर्दीचें अत्यल्प सिंहावलोकन ह्या भागांत सादर करणें अवश्य आहे. अठराव्या शतकाच्या प्रारंभीं, मराठी राज्याच्या अभ्युदयार्थ जे पराक्रमपटु व शौर्यशाली वीरपुरुष अवतीर्ण झाले, त्यांमध्ये राणोजी शिंदे व मल्हारजी होळकर हे दोघे प्रमुख होत. इ. स. १७२५ सालापासून ह्या उभय वीरांच्या मर्दुमकीस प्रारंभ झाला, व छत्रपति शाहू महाराज व पेशवे ह्यांच्याकडून त्यांच्या रणशौर्याचे अभिनंदन होऊन, त्यांस जहागिरी व सरंजाम बक्षीस मिळूं लागले. राणोजी शिंदे ह्यास छ ५ मोहरम सीत अशरीन ह्या तारखेस सरदारी व पालखीचा सरंजाम मिळाला, व तेव्हांपासून त्याचा उत्कर्ष होत चालला. ह्यानें बाजीराव पेशवे ह्यांच्या निरनिराळ्या मोहिमांमध्यें पराक्रमाचीं अलौकिक कामें करून मराठी राज्यास उत्कृष्ट मदत केली; व दिल्लीपर्यंत मराठ्यांचा झेंडा फडकवून, पुष्कळ प्रांत व चौथ सरदेशमुखींचे हक्क मराठ्यांस प्राप्त करून दिले. दिल्लीकडील इ. स. १७३६ सालच्या स्वारीमध्यें राणोजीनें ८००० मुसलमान स्वारांशीं टक्कर देऊन व त्यांची वाताहत करून जो विजय मिळविला, तो फार प्रशंसनीय होता. ह्याने निजामावरील मोहिमांमध्यें व वसईच्या स्वारीच्या वेळीं आपलें शौर्यतेज चांगलें प्रकाशित केलें. हा रणशूर सरदार इ. स. १७४७ चे सुमारास सुजालपूर येथें मृत्यु पावला. मरणसमयीं ह्याजकडे एकंदर ६५ लक्षांचा प्रांत होता. जो पुरुष प्रारंभीं एक लहानसा हुजऱ्या होता, तो पुढे स्वतःच्या कर्तृत्वानें व मर्दुमकीनें इतका ऐश्वर्यसंपन्न बनला; हें लक्ष्यांत घेतलें, ह्मणजे स्वतःच्या कर्तृत्वानें मनुष्यास आपला कसा अभ्युदय करून घेतां येतो, हें चांगले शिकण्यासारखें आहे. असो. राणोजीची छत्री उत्तर हिंदुस्थानांत सुजालपूर ह्या गांवीं असून तेथें राणेगंज ह्या नांवाची पेठ वसली आहे. सुजालपूर हा गांव पेशव्यांकडून छ १ रजब समान आर्बैन []ह्या तारखेस राणोजीच्या छत्री करितां इनाम देण्यात आला असून, अद्यापि तो छत्रीच्या उत्सवाकडे चालत आहे. राणोजीस मैनाबाई नामक लग्नाच्या बायकोपासून जयाजी ऊर्फ जयाप्पा, दत्ताजी, व जोतिबा ऊर्फ जोत्याजी असे तीन पुत्र, व चिमाबाई नामक राखेपासून महादजी व तुकोजी असे दोन पुत्र, मिळून एकंदर पांच पुत्र होते. हे एकापेक्षां एक पराक्रमी व कर्तृत्ववान् निपजून, त्यांनी आपल्या देशभूमीची अप्रतिम सेवा बजाविली; व इतिहासांत आपली कीर्ति अजरामर करून ठेविली.

 राणोजी मृत्यु पावल्यानंतर त्याची जहागीर व सरदारीची वस्त्रें जयाजीस मिळालीं. हा जयाजी मराठ्यांच्या इतिहासांत जयाप्पा ह्या नांवानें फार प्रसिद्ध आहे. ह्यानें आपल्या वडिलांप्रमाणे शौर्याचीं अनेक कामें करून, मराठ्यांची सत्ता उत्तरेकडे वृद्धिंगत केली. ह्या पुरुषाच्या पराक्रमकथा फार आल्हाददायक असून, त्यांत मराठ्यांचें शौर्य, मराठ्यांचा अभिमान, मराठ्यांची कर्तृत्वशक्ति आणि मराठ्यांचें ओज इत्यादि प्रशंसनीय गुण ओतप्रोत भरले आहेत. ह्यानें ज्या वेळीं रोहिल्यांचा पराभव करून अयोध्येचा नबाब सफदरजंग ह्यास वजिरी प्राप्त करून दिली, व मराठ्यांच्या यशोवैभवाचा झेंडा रोहिलखंडांत नेऊन उभारला; त्या वेळीं बाळाजी बाजीराव पेशवे ह्यांनी त्याचा जो गौरव केला आहे, तो केवळ अपूर्व आहे. "शाबास तुमच्या हिंमतीची व दिलेरी रुस्तुमीची; व शाबास लोकांची ! आमच्या दक्षिणच्या फौजांनीं गंगायमुनापार होऊन, रोहिले पठाणांशीं युद्ध करून, आपण फत्ते पावावें, हें कर्म लहान सामान्य न झालें. तुह्मीं एकनिष्ठ, कृतकर्मे सेवक, या दौलतीचे स्तंभ आहां !! जें चित्तावर धरितां, ते घडून येते !!" इत्यादि पेशव्यांचीं गौरववचनें वाचून, कोणा सहृदय वीराच्या नेत्रांतून आनंदाश्रू येणार नाहींत बरें ? जयाप्पा शिंदे ह्यांनी लढवय्या रोहिले लोकांशीं घनघोर युद्धें केलीं, व महापराक्रमी रणझुंजार रजपूत वीरांना देखील ‘दे माय धरणी ठाय' करून सोडिलें. मारवाडावरील मराठ्यांच्या स्वारीवर, राजस्थानांतील भाटांनी जीं कवित्तें रचलीं आहेत, त्यांत, जयाप्पा शिंद्याच्या रणपटुत्वाचे विस्मरण रजपूत लोकांस कधींही होणार नाहीं, असें ध्वनित केले []आहे. असो.

 जयाप्पा शिंदे ह्यांचा नागोरच्या वेढ्यामध्यें जोधपुरचा राजा बिजेसिंग ह्यानें अत्यंत कपटानें मारेक-यांकडून वध करविला. मृत्युसमयीं जयाप्पाचे बंधु दत्ताजी शिंदे हे जवळ होते. ते प्रियबंधूचा शस्त्रविदीर्ण व अचेतन देह अवलोकन करून शोक करूं लागले. त्या वेळी हा लोकोत्तर वीरपुरुष आपल्या बंधूस हिंमत देऊन बोलता झाला कीं, "वैरी युद्धास आला आणि तू रांडेसारखा रडतोस ! हें क्षात्रधर्मास उचित नाहीं. आतां मजला कांहीं होत नाहीं. तुह्मीं शत्रुपराभव करावा." अहाहा! इतकें अलौकिक क्षात्रतेज ज्याच्या अंगीं चमकत होते, तो योद्धा मृत्यूची काय पर्वा करणार []आहे ? मोरोपंतांनी झटलेच आहेः-

मरण रुचे वीराला, न रुचे परि कधी अपयशे मळणें ।
 जयाप्पा शिंदे आपला पुरुषार्थ गाजवून इहलोक सोडून गेल्यानंतर त्यांचे बंधु दत्ताजी शिंदे व पुत्र जनकोजी शिंदे ह्यांनीं अनेक युद्धांमध्ये आपल्या पराक्रमाची सीमा करून दाखविली. गिलचे व दुराणी ह्यांचा व मराठ्यांचा जो घनघोर रणसंग्राम झाला, त्यांत तर ह्या वीरपुरुषांनीं भारतीय योद्ध्यांप्रमाणे आपलें रणवीर्य व्यक्त केलें. दत्ताजी शिंदे व जनकोजी शिंदे ह्यांच्या सोनपतपानपतच्या मोहिमेमधील शौर्यकथा

केवळ अपूर्व आहेत. त्या वेळी प्रत्यक्ष वीररसाने त्यांच्या अंगीं मूर्तिमंत संचार केला होता की काय, असा भास होतो. दत्ताजी शिंदे रणांत घायाळ होऊन पडले, त्या वेळीं रोहिल्यांचा सरदार कुतुबशाह ह्यानें दुष्टबुद्धीने त्यांस विचारिलें कीं, “पटेल, हमारे साथ तुम् और लढेंगे ?" त्या वेळीं ह्या मर्द पुरुषाने उत्तर दिलें कीं "निशा अकताल्ला ! बचेंगे तो और बी लढेंगे." अर्थात् अशा महारथी योद्ध्याचा रणोत्साह पाहून प्रत्यक्ष रणदेवतेस देखील कौतुक वाटेल, मग इतरांची ती गोष्ट काय ? दत्ताजी शिंदे यांचा कुतुबशाहानें शिरच्छेद करून त्यांचे शीर अहमदशाह आबदाल्लीकडे नजर पाठविलें. तें शीर परत मिळविण्यास मराठ्यांस, अयोध्येचा नबाब सुजाउद्दौला ह्यास मध्यस्ती घालावे लागलें; व त्याकरितां तीन लक्ष रुपये बादशाहास खंडणी द्यावी लागली!! नुसत्या गतासु कलेवराच्या शिरास जर तीन लक्ष रुपये किंमत द्यावी लागली, तर प्रत्यक्ष त्या वीराची किंमत काय असेल ? अर्थात् असा अमूल्य मोहरा हरपल्यामुळें महाराष्ट्राचें अत्यंत नुकसान झालें ह्यांत शंका नाहीं.

 दत्ताजी शिंदे ह्यांचा अंत झाल्यानंतर मराठ्यांचे व गिलच्यांचे शेवटचे तुमुल युद्ध झालें. त्यांत जनकोजी शिंदे ह्यांनी भारतीय युद्धांतील धृष्टद्युम्नाप्रमाणे पराक्रम गाजविला. त्यांस तोफेचा गोळा व भाल्याची जखम लागून ते रणांगणीं पडले; व शत्रूंनी त्यांचा विद्ध देह पाडाव केला. त्यांस जिवंत सोडविण्याकरितां सुजाउद्दौल्याचा वकील पंडित काशीराज ह्याने फार खटपट केली. परंतु ती निष्फल होऊन अखेर त्यांचा पाषाणहृदयी व कपटपटु नजीबखान रोहिल्यानें निर्दयपणाने वध केला.

 ह्याप्रमाणें राणोजी शिंद्याचे वीरपुत्र एकामागून एक धारातीर्थीं पतन पावले. राणोजीस जयाजी व दत्ताजी ह्यांशिवाय जोतिबा ह्या नांवाचा तिसरा पुत्र होता. तोही बुंदेलखंडांतील वोढसेप्रांतीं बरवासागर []गांवीं स्वामिकार्यावर लढत असतां मृत्यु पावला. ह्याप्रमाणें राणोजीच्या औरस संततीपैकीं तिन्हीं पुत्रांचा निकाल लागला. त्याशिवाय त्यास तुकोजी व महादजी असे दोन राखेच्या पोटचे पुत्र होते. ते दोन्ही पानिपतच्या युद्धामध्ये हजर होते. त्यांपैकीं तुकोजी त्याच युद्धांत मृत्यु पावला. बाकी फक्त महादजी राहिला. तो मोठ्या शर्थीनें जीव बचावून परत आला. त्यानें पुढें आपल्या तरवारबहादुरीनें पानिपतच्या युद्धांत गत झालेली मराठ्यांची अब्रू परत मिळविली; व आपल्या शौर्याचा कीर्तिध्वज सर्व हिंदुस्थानभर फडकत ठेविला.

 महादजी ऊर्फ पाटीलबावा ह्यांचें चरित्र फार महत्त्वाचें आहे. पानिपतच्या मोहिमेनंतर मराठ्यांची जेवढीं ह्मणून महत्त्वाचीं राजकारणें झाली, त्या सर्वांमधे पाटीलबावा ह्यांचे नांव प्रमुखत्वेंकरून चमकत आहे. किंबहुना, अठराव्या शतकाच्या उत्तरार्धांत मराठ्यांचा तेजोरवि जो पुनःप्रकाशित झाला, तो केवळ ह्या लोकोत्तर पुरुषाच्या परिश्रमाचेंच फल होय असे ह्मटल्यास फारशी हरकत येणार नाहीं. पुणेंदरबारचीं कारस्थानें ज्याप्रमाणें नाना फडणविसांनीं चालविलीं, त्याप्रमाणें पाटीलबाबांनी उत्तर हिंदुस्थानांतील सर्व मनसबे युक्तिप्रयुक्तीने सिद्धीस नेले. त्यांचें लष्करी धोरण शिवाजी महाराजांच्या तोडीचे असून, पाश्चिमात्य राष्ट्रांची सुधारलेली सैन्यरचना व युद्धपद्धति ह्यांचे महत्त्व त्यांच्या लक्ष्यांत चांगले आल्यामुळें, त्यांनीं, डी बॉयन, पेरन वगैरे युद्धकलाकुशल फ्रेंच लोक आपल्या पदरीं ठेवून, मराठी सैन्याची सुधा रणा उत्तम प्रकारची केली होती. त्यामुळें त्यांचे सैन्य व तोफखाना पाश्चिमात्य पद्धतीवर ताण करण्यासारखा होऊन, त्यांच्याशी टक्कर देणें परराष्ट्रीयांस देखील अशक्य झाले होतें. मग एतद्देशीय प्रतिपक्षी संस्थानिकांस त्यांच्यावर नक्ष करणें दुष्कर व्हावें ह्यांत नवल नाहीं. त्यांनी लढवय्ये रजपूत पादाक्रांत केले; प्रमत्त रोहिले नेस्तनाबूत केले; दिल्लीचा शाहआलम बादशाह आपल्या मुठींत ठेविला; हैदर व टिपू ह्यांच्यावर पगडा बसविला; इंग्रजांस आपली कर्तबगारी दाखविली; व अखेर सर्वांवर छाप बसवून, दिल्लीच्या सार्वभौम बादशाहापासून आपल्या धन्याकरितां वकिल-[] मुतालकीचीं बहुमानाचीं वस्त्रे पटकावून आपला शौर्यवैभवाचा कळस करून सोडला. थोरले माधवराव पेशवे ह्यांनीं, जयाप्पाचे पुत्र जनकोजी शिंदे ह्यांजकडे जी सरदारी व जो सरंजाम होता, तो त्यांच्या पश्चात् पाटीलबावांस छ० २९ जमादिलावल सुहुर सन आर्बा सितैन[] ह्या सालीं दिला. त्या दिवसापासून छ० ३० रजब आर्बा तिसैने[] पर्यंत, महादजी शिंदे ह्यांनी शुक्लेंदूप्रमाणे आपल्या भाग्यचंद्राची वृद्धि केली;[] व त्याच्या प्रकाशानें मराठ्यांचा शौर्यमहिमा अखंड प्रज्वलित केला. ह्यांच्या कारकीर्दीचा वृत्तांत हा स्वतंत्र इतिहासाचा भाग असल्यामुळे तो येथें दाखल करणे अप्रासंगिक आहे. तथापि, एवढें सांगणें जरूर आहे कीं, सांप्रत पाटीलबावांच्या चरित्राची जी माहिती उपलब्ध झाली आहे, त्यापेक्षाही अधिक कागदपत्र जेव्हां प्रसिद्ध होतील, तेव्हां ह्या थोर पुरुषाचें चरित्र फारच विचारार्ह व गंभीर आहे असें दृष्टीस पडेल. "नाना व महादजी" ह्या उभय मुत्सद्यांच्या गुणावगुणांचें सामान्य परीक्षण होऊन महादजीविषयीं जो लोकग्रह बनला आहे, तो बराच एकतर्फी व असत्य आहे, असेही मानण्याचा प्रसंग येईल. मराठी राज्य रक्षण करण्याचें काम नानांनी केले; परंतु महादजी शिंद्यांच्या स्वार्थपरायणतेने व महत्त्वाकांक्षेने ते सिद्धीस गेलें नाहीं; असा जो सर्व साधारण आक्षेप आहे, तो पुष्कळ चुकीचा आहे, असें अस्सल कागदपत्र सिद्ध करतील असें अनुमान आहे. खरोखर, महादजी शिंद्यांच्या अकालिक मृत्यूनें मराठी साम्राज्याचा मोठाच घात झाला, व परकीय सत्तेस प्रवेश करण्यास अनायासें संधि मिळाली ह्यांत शंका नाहीं. पाटीलबावा आणखी काही दिवस जगले असते व पुणेंदरबारांतील मत्सर थोडासा नाहींसा झाला असता, तर सर्व हिंदुस्थान संयुक्त होऊन मराठ्यांचें अवाढव्य व अजिंक्य साम्राज्य पुष्कळ काल टिकलें असते ह्यांत संशय नाहीं. परंतु ईश्वरी इच्छा निराळीच असल्यामुळे पाटीलबावांच्या मृत्यूनें मराठी राज्याचा नाश लवकर घडवून आणला, असेंच ह्मटलें [१०] पाहिजे.

 महादजी शिंदे ह्यांस औरस पुत्र एकही नसून एक बाळाबाई नामक कन्या होती. त्यांचा सख्खा भाऊ तुकोजी हा पानिपतचे लढाईंत मृत्यु पावला. त्याचे केदारजी, रवळोजी व आनंदराव असे तीन पुत्र होते. त्यांपैकीं आनंदरावावर पाटीलबावांची फार प्रीति होती. तेव्हां नाना फडनवीस व तुकोजी होळकर ह्यांनीं, पाटीलबाबांच्या वडील बायकोच्या मांडीवर त्यास दत्तक दिलें; व त्याचें दौलतराव असें नामाभिधान ठेवून, त्यास पेशव्यांकडून सरदारीची वस्त्रें देवविली. त्यामुळें दौलतराव हे महादजी शिंद्यांच्या सर्व संपत्तीचे व जहागिरीचे अधिपति बनले. श्रीमंत सवाई माधवराव पेशव्यांनी ह्यांस, छ. १० सव्वाल आर्बा आब तिसैन रोजीं, वकिलमुतालकीची व अमिरुल-उमराईची नायबगिरी सांगून नवीन शिक्के करून दिले. ह्यांच्या मराठी शिक्क्यामध्यें

"ज्योतिस्वरुप चरणीं तत्पर ।
महादजीसुत दौलतराव शिंदे निरंतर ॥

अशीं अक्षरें होतीं.

 हेच महाराज दौलतराव शिंदे हे आमच्या चरित्रनायिका श्रीमती महाराणी बायजाबाईसाहेब ह्यांचे भ्रतार होत. ह्यांचे वय दत्तविधानसमयीं अवघे १४ वर्षांचें होते. ह्यांची कारकीर्द व विवाहवृत्तांत निराळ्या भागांत सादर करणे अवश्य आहे.


  1.   १ नेमाजी शिंदे ह्यांच्या नांवाचा उल्लेख, कृष्णाजी अनंत सभासदविरचित "शिवछत्रपतीचे चरित्र"-पृष्ठ ८१ ह्यामध्यें, शिलेदार व मुलुखाचे सुभेदार ह्यांच्या यादीमध्ये आलेला आहे, व इतर ग्रंथांतरींही आहे. तथापि ह्या पुरुषाची माहिती फारशी उपलब्ध नसल्यामुळे शिंद्यांचे घराणे मराठी राज्याच्या प्रारंभापासून अस्तित्वात आहे, असे पुष्कळ लोकांस माहीत नाही. परंतु त्याबद्दल आह्मांस मुळींच संशय नाहीं. थोरले बाजीराव ह्यांनी जिवाऊ शिंदे ह्यांस लिहिलेले एक फार जुनें पत्र उपलब्ध झाले आहे. त्यामध्ये नेमाजी शिंदे ह्यांच्या मराठी राज्यांतील पुरातन सेवेचा यथास्थित उल्लेख असून, महिपतराव शिंदे ह्यांनीं तशीच सेवा करावी व नक्ष करावा ह्मणून लिहिले आहे. हे पत्र फार वाचनीय व महत्त्वाचे असल्यामुळे येथे दिल्यावांचून राहवत नाहीं.
    "गंगाजलनिर्मल जिवाऊ शिंदी यांसी--

     प्रीतिपूर्वक बाजीराव बल्लाळ प्रधान आशीर्वाद उपरी येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहीत जाणे. विशेष. तुह्मांकडून राजश्री त्रिंबक गोपाळ आले. त्यांनी कितेक अर्थ निवेदन केला. त्याजवरून सविस्तर कळों आलें. व राजश्री महिपतराव शिंदे यांचेविसीं कितेक विदित केलें. ऐशास मशारनिल्हे पुरातन राज्यांतील सेवक; व पूर्वी राजश्री नेमाजी शिंदे यांणी या राज्यांत कोणे रीतीनें सेवा केली आहे व कितेक कामकाजे केली, त्यांचे जागां मशारनिल्हे आहेत. त्यांणीं सर्वप्रकारे जातीने अंगेजणी करून, तोलदार फौज धरून, दुष्टास नतीजा देऊन, आपला नक्ष करावा. हा समय हाच आहे. येविसींचा कितेक अर्थ राजश्री त्रिंबक गोपाळ यांस सांगितला आहे. हे तुह्मांस सांगतील. ती वचनें आमचींच जाणून, तुह्मीं मशारनिल्हेस उत्तेजन देऊन, सांगितल्याप्रमाणे कार्यभाग केलियानें हे घर तुमचेंच आहे. आह्मी सर्वस्वें तुमचे असों. यास संदेह नाहीं. जाणिजे. छ० ६ जिल्हेज."
     ह्या पत्रावरून जिवाऊ शिंदे ही बाई फार वजनदार व राजकारस्थानी असावी असे दिसतें.

  2. १ ता० २९ जून इ. स. १७४७ रोज सोमवार.
  3.  टॉड साहेबांच्या राजस्थानच्या इतिहासांत पुढील पद्य दिले आहे:-

    याद घणा दीन आवेशी, हाप्पा वाला हेल।
    भागा तीनो भूपति, माल खजाना मेल ॥ १ ॥

     ह्याचा तात्पर्यार्थ असा कीं, "आप्पाच्या रणप्रसंगाची आठवण लोकांस पुष्कळ दिवस राहील. रणांत पाठ न दाखविणारे मारवाड, बिकानीर, व रूपनगर येथील तीन भूपति देखील रणांगणांमध्यें आपले सर्व सामानसुमान व जडजवाहीर टाकून पळून गेले !"

  4.  जयाप्पा शिंदे नागोरच्या वेढ्यामध्ये मारले गेले, त्या वेळीं श्री० रघुनाथराव पेशवे ह्यांनीं जयाप्पाचे चिरंजीव जनकोजी शिंदे ह्यांस जें समाधानपत्र पाठविलें, त्याचें उत्तर आह्मांस उपलब्ध झाले आहे. तें फार हृदयद्रावक असून त्यांतही जनकोजीचे क्षात्रतेज चमकत आहे. ह्मणून तें येथें सादर करितों:-
    श्रीमंत राजश्री दादासाहेब स्वामींचे सेवेसी:-

     विनंति सेवक जनकोजी शिंदे कृतानेक दंडवत विज्ञापना. सेवकाचें वर्तमान तागायत छ २ मोहरम मु।। नागोर स्वामींचे आशीर्वादें यथास्थित असे. विशेष:-आज्ञापत्र पाठविलें तें पावले. तेथें आज्ञा, "जयाजी शिंदे...... निधन पावले, हें वृत्त ऐकून अंत:करण परम विक्षेपातें पावलें. दुःखाचा कल्पांत झाला. विवेकेंकरून झाल्या श्रमाचें परिमार्जन करणें. ईश्वरतंत्रास उपाय नाहीं. या गोष्टीचा खेद करीन म्हटल्यास साध्य नाहीं. तरी तुह्मीं सर्वांचे समाधान करून, बहुत सावधपणें राहून, राजश्री दत्तबाचे आज्ञेंत राहत जाणें. तुह्मी आह्मांस लेकाप्रमाणे आहांत. सर्वही कुशल ईश्वर करील” ह्मणोन आज्ञा. ऐसियास तीर्थरूप कैलासवासी जाले, या दुःखास पारच नाहीं. परंतु शत्रु संनिध असतां दुःखार्णवीं पडलिया परिणाम नाहीं. स्वामीसेवेसी अंतर पडतें. याजकरितां आज्ञेप्रमाणे दुःखपरिहार करून स्वामीसेवेसी तत्पर असों. आमचे छत्र तरी स्वामीच आहेत. स्वामींची आज्ञा व तीर्थरूप राजश्री पाटीलबावांची आज्ञा वितरिक्त वावगी वर्तणूक होणेच नाहीं. तीर्थरूप कैलासवासींचे हातून सेवा वेतली, त्याप्रमाणे अभिमानपुरस्सर आह्मां लेकरांपासून सेवा घेऊन अधिकोत्तर ऊर्जित करणार स्वामी समर्थ आहेत. आह्मी स्वामींचे आज्ञाधारक सेवक आहोत. आज्ञेप्रमाणे सेवा करावी हेंच उचित आहे. कैलासवासी तीर्थरूपांचा संकल्प सिद्धीस पाववणार व शत्रूचें यथास्थित पारपत्य करणार स्वामी थणी समर्थ आहेत. येथील वृत्त आलाहिदा पुरवणीपत्रीं लिहिले आहे. त्यावरून विदित होईल. सेवेसी श्रुत होय हे विज्ञप्ति.

  5.  बरवासागर हा गांव पेशव्यांनी जोतिबाच्या शौर्याबद्दल शिंद्यांस छ २६ मोहरम सलास खमसैन ( ता. ३ दिसेंबर इ. स. १७५२) रोजी इनाम दिला होता. त्यावरून जोतिबाचा मुत्यु त्याच्या अगोदर थोडे दिवस झाला असावा हे उघड आहे.
  6.  महादजी शिंदे ह्यांनी दिल्लीच्या बादशाहाकडून वकिलमुतालकीचीं वस्त्रें पुण्यास आणली. त्या वेळीं जो समारंभ झाला त्याचे वर्णन आणि त्या संबंधानें तत्कालीन मुत्सद्यांचे अभिनंदनपर उद्गार वाचण्यासारखे आहेत. ते एकत्र नमूद असलेलें परशरामभाऊ पटवर्धन ह्यांचे एक पत्र उपलब्ध झालें आहे, तेंच येथे सादर करितों. हे पत्र इतिहासदृष्ट्या मनोरंजक व वाचनीय असून, ह्यावरून पाटीलबावाविषयींचें समकालीन मुत्सद्यांचें मतही व्यक्त होण्यासारखे आहे.
    "राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री नाना स्वामींचे सेवेसी:-

     पोा परशराम रामचंद्र कृतानेक साष्टांग नमस्कार विनंति उपरी येथील कुशल ताा छ जिल्काद जाणोन स्वकीय कुशल लिहीत असलें पाहिजे विशेष. आपण पत्र पाठविलें तें पावलें. राजश्री महादजी शिंदे पाटीलबावा यांच्या भेटी जाहल्या. नंतर दुसरे दिवशीं सरकार वाड्यांत येऊन त्यांणीं, पादशाहाकडून वकिलमुतलक व अमीरल-उमराव व बक्षीगिरीचा बहुमान घेऊन आलो आहे; श्रीमंतांनी घ्यावा; याप्रमाणे विनंति केली. त्याजवरून सातारियास महाराजांस विनंति लेहून, तेथील आज्ञापत्र आणवून, सदर्हू बहुमान घ्यावयाचा निश्चय करून आषाढ शुद्ध त्रितीयेस फर्मान बाडी केली. श्रीमंतांनी वकिलमुतलक व अमीरल-उमरावची खिलत च्यारकुबचा व जिगा व सरपेंच व परीदा कलगीमय लटक, व माळा मरवारी व कलमदान व ढालतरवार व मोरचेल व नालकी व झालदार पालखी व शिक्केकटार व माहीमरातीब व तमनतोग हत्ती व घोडा आदिकरून पादशाहाकडून आलें होतें, तें बहुत आदरेंकरून घेतलें. श्रीमंतांनीं नजर एकशेंएक मोहरा पादशाहास ठेविली. पाटीलबावांनी एकावन्न मोहरा डेऱ्यांतच श्रीमंतांस नजर करून आदब बजाविली. तेथें तोफा वगैरेंच्या सलाम्या होऊन, श्रीमंत वाड्यांत आल्यावर सर्वत्रांनीं नजरा करून आदब बजाविली. समारंभ चांगला जाहला. ह्मणोन विस्तारें लिहिलें. ह्याजवरून बहुत संतोष जाहला. श्रीमंतांचा प्रताप थोर. ताळे शिकंदर. पाटीलबावा यांणीं गुलामकादर याचें पारिपत्य करून पादशाहाची मर्जी खुश केली. त्यांणीं श्रीमंतास बहुमान पाठविला. समारंभ बहुत चांगला जाहला. ह्या मोठ्याच गोष्टी आहेत. मुख्य गोष्ट श्रीमंतांचा प्रभाव. त्या योगेंकरून पाटीलबावांनी त्या प्रांतीं नक्ष केला. त्याप्रमाणेंच हुजूरही पादशाहाची मर्यादा रक्षून बहुमान घेतले. त्याचप्रमाणें समारंभ जाले. व श्रीमंत वाडियांत आल्यावर दोहों पदांचीं पादशाहाकडील मुतालकीचीं वस्त्रें श्रीमंतांनी पाटीलबावांस खासगीचा पोशाख व जेगा, सरपेच कंठी व ढालतरवार, व नालकी व हत्ती घोडा याप्रमाणे दिल्हें. त्याची नजर पाटीलबावांनी श्रीमंतांस पन्नास मोहरा करून आदब बजाविली. हे पाटीलवावांची सरफराजी चांगली जाहली. उत्तम आहे. हीं पदें भलत्यास प्राप्त व्हावयाचीं नाहींत. रा. पाटीलबावा यांणीं त्या देशांत बहुत कष्ट मेहेनत करून शत्रू पादाक्रांत केले. पादशाहीचा बंदोबस्त करून पादशाहांस बहुत खुश केलें. त्याचे येथें कोणी सरदार राहिला नाहीं. बाहेरील सरदार येऊन बंदोबस्त केला. तेव्हां सहजच देणे प्राप्त जाहलें. आपण दुरंदेशी चित्तांत आणून, महाराजांची आज्ञा आणवून, बहुत (बहुमान ?) घेतले ही मोठी थोर गोष्ट केली. आजपावेतों कोठेही व्यंग पडलें नाहीं. पुढें दिवसेंदिवस श्रीमंतही थोर जाहले; आणि आपली निष्ठा श्रीमंतांचे ठायीं. तेथे विस्तार काय ल्याहावा ? तसेच पाटीलवावांनी तिकडे मेहेनत करून पदें वगैरे मिळविली, ती सर्व एकनिष्ठपणे श्रीमंतांस प्रविष्ट केली; हे त्यांचे निष्ठेस योग्य. दुस-याकडून व्हावयाचें नाहीं. पाटिलांप्रमाणे निष्ठा कोणाचीही पाहिली नाहीं. कोठवर वर्णना ल्याहावी ? श्रीमंतांचा प्रताप थोर. मोठी कामें सहजांत घडतात. बहुत काय लिहिणे, कृपा करावी हे विनंति."

  7.  ता० ५ दिसेंबर इ. स. १७६३ रोज सोमवार.
  8.  २ ता० ३ मार्च इ. स. १७९४ रोज सोमवार.
  9.  महादजी शिंदे ह्यांनी उत्तर हिंदुस्थानांतल्या स्वाऱ्यांमध्ये क्रोडो रुपयांचा प्रांत जिंकून घेतला; त्याचप्रमाणे संपत्तिहि पुष्कळ मिळविली. ह्या संपत्तीची एक यादी पुढे लिहिल्याप्रमाणें आहे. ती पाहिली असतां शिंद्यांचे वैभव केवळ पराक्रमाच्या जोरावर कसे वाढलें ह्याची कल्पना करितां येईल:-
    याद पाटील यांणीं हिंदुस्थानांतून घेतले बितपशील:-
    नगदजिन्नस व जवाहीर वगैरे.  तोफा.
    राणा गोहदकर याची जप्ती ३२०००००  
    मामलत मिर्जा शफीखां ३३०००००  
    जप्ती अफरासियाबखां ४००००००  ५७०
    शुजाऊतदीलखां व वजीर अफरासियाब खानाचे सासरे व जहांगीरखां त्याचा भाऊ ४०००००  
    राजे नारायणदास अफरासियाब खानाचा दिवान ३०००००  
    महमदबेगखां हमदानी याची जप्ती ६०००००  ८०
    रणजीतसिंग जाट याची मामलत १२०००००  
    मामलत राजे जयनगरकर दोन वेळ ८५०००००  
    मामलत पिटाला ( पतियाला ) ६०००००  

    नगदजिन्नस व जवाहीर वगैरे. तोफा.
    मामलत दतिया व बधावर वगैरे ८०००००
    मामलत रामरतन मोदी पादशाही व लालजीमल ३०००००
    मामलत रावराजे प्रतापसिंग माचाडीवाले ४०००००
    गुलाम कादरखां याची जप्ती ६०००००० ८०
    दरोवस्त पातशाही वस्तभाव माल नगद व जिन्नस व जवाहीर वगैरे नेलें तें पाटीलबावाकडे आलें.
    पाटणच्या लढाईत इस्माईलबेगखां व राठोर यांणीं शिकस्त खाल्ली. ८०
    ____________ ________
    २९६००००० ८१५

     पातशाह व नजफखां व गोहदवाले वगैरे यांचा मुलूक तसरुफांत आहे:-

    मुलुक पातशाही व नजफखां व गुलाम कादर वगैरे २२५०००००
    गोहदकर राणा याचा मुलूक ४२०००००
    मुलूक वधावर व कछवा व भांडेर वगैरे १८०००००
    __________
    २८५०००००

      दोन करोड पंच्याऐशी लक्ष रुपये साल तमाम. यांत कमज्यादा तहकिकातीच्या अन्वये शिबंदी खर्च वगैरे.

  10.  कर्नल म्यालेसन ह्यांनी महादजी शिंदे ह्यांच्या मृत्यूबद्दल लिहितांना जे उद्गार काढिले आहेत, ते वाचण्यासारखे आहेत. ते लिहितातः-
      "By the death of Madhaji Sindhia the Mahrattas lost their ablest warrior and their most farseeing statesman. In his life he had had two main objects: the one to found a kingdom, the other to prepare for the contest for empire with the English. In both, it may be said, he succeeded. The kingdom he founded still lives, and if the army which he formed on the European model was annihilated eight years after his demise by Lake and Wellesley, it had in the interval felt the loss of his guiding hand, as on the field it missed his inspiring presence. Had he lived, Sindhia would not have had to meet Lake and Wellesley alone; Madhaji would have brought under one standard—though in different parts of India-the horsemen and French contingent of Tippu, the powerful artillery of the Nizam, the whole force of the Rajputs, and every
    spear which Mahratta influence could have collected from Poona, from Indur, from Baroda, and from Nagpur. The final result might not have been altered, but it would still have hung longer in the balance, and at least the great problem of a contest between an united India and the English would have been fairly fought out. As it was his death settled it. Thenceforth a sinister result became a question only of time."

    -The Native States of India 145.

    .१ ता० १० मे इ. स. १७९४ रोज शनिवार.