भाऊ वाचे पोथी येऊं दे रे

भाऊ वाचे पोथी
येऊं दे रे कानांवर
नको भूकू रे कुतर्‍या
तुले काय आलं जरं !

कधीं बाप जल्मामधीं
घडूं नहीं ते घडलं
जसं कंगूल्याचं लेंकरू
बंगल्यावरती चढलं !

गेला वांकडा तिकडा
दूर सगर दिसला
जसा शेताच्या मधून
साप सर्पटत गेला !

कडू बोलतां बोलतां
पुढें कशी नरमली
कडू निंबोयी शेंवटी
पिकीसनी गोड झाली !

'फाट आतां टराटर,
नहीं दया तुफानाले
हाले बाभयीचं पान
बोले केयीच्या पानाले !

उच्च्या खुज्या जोडप्याची
कशी जमली रे जोड
उगे ताडाखाली जसं
भुईरिंगनीचं झाड !

हिरवे हिरवे पानं
लाल फय जशी चोंच
आलं वडाच्या झाडाले
जसं पीक पोपटाचं !

पयसाचे लाल फुलं
हिर्वे पानं गेले झडी
इसरले लाल चोंची
मिठ्ठू गेले कुठें उडी ?

सोमवती आमावस
कशी आंधारली रात
देल्ही रातांध्याच्या हाती
पेटयेल काडवात !

कशी दाखईन रस्ता
आली आंधार्‍याची रात
कसा देईन रे दान
सांग बुझार्‍याचा हात ?

तुझी म्हईस ठांगय
नको रुसू लतखोर्‍या
माझी म्हईस दुभती
नको हुसूं रे शेजार्‍या

हिच्या तोंडात साकर
आन पोटांत निंबोनी
मोठी आली पट्टवनी
सार्‍या मुल्खाची लभानी !

अरे आरदटाकेला
तुले कशाचं हिरीत
तशी निझूर शेताले
काय सांगे बरसात?

नागरलं शेत
खूप केली मशागत
पेरल्या मुकन्या
मारे गानं गात गात !

फाटी गेलं पांघरून
नको बोचकूं रे चिंध्या
झालं गेलं पार पडी
नको काढूं आतां गिंध्या !

तुले परनलं पोरी
झाल्या जल्माच्याज भेटी
दिल्लीचं बिलूबांदर
आनी देलं तुझ्यासाठीं !

घरांमधी सर्वे गोरे
तूंच कशी कायीघूस
उज्या जवारींत आलं
जसं कान्हीचं कनूस !

माझं उघडे नशीब
पीकं शेतांत दाटलें
तुझे जवून शेजार्‍या
कसे डोये रे फूटले?

रुशी बसे वर माय
तिचा रुसवा रे केवढा?
"म्हने पापड वाढला
कसा वांकडा तिकडा?"

हाया समोरची शाया
पोरं शायेतून आले
हुंदडत हायाकडे
ढोरं पान्यावर गेले

पिको आराटी बोराटी
नको शेतामधी बांद
बरी बिरान्याची मया
होऊं नहीं भाऊबंद

शेतकर्‍या तुझे हाडं
शेतामधीं रे मुडले
मुडीसनी झाली राख
तापीमाईंत पडले

माझी कपीला तान्हेली
कशी पान्यावर गेली
तिले गार्‍यानें गियली
आन् पान्यानेज पेल्ही

रस्त्यानं चालली
मायबहीन आपली
मांघे फीरी पाह्यं
पाप्या, धरत्री कापली

घाम गायतां शेतांत
शेतकरी तरसला
तव्हां कुठें आभायांत
मेघूराया बरसला !

मेहेरूनचा तलाव
नहीं लहान सहान
आज त्यानं भागवली
जयगांवाची तहान

अरे, वाहत वाहत
आली नदी 'मेहेरूनी'
तिले म्हनूं नका लेंडी
भागवते धोनं पानी !

वटवट्या नारी
तुले वटक्याची सव
तुले देल्हा जल्म
कोन नितातेल देव?

वाटेचं वावर
काटीकुपाटीनं बंद
निस्सवली नार
काय करती भाऊबंद ?

सावकारा, तुझं मन
मन मोहरी एवढं
तुझं राकेसाचं डाच
तुझं पोट केव्हढं ?

देवा, घेनं जलमनं
खुटेनाज तुझ्या दारीं
तसं देनं न मरनं
सुटेनाज सवसारीं

अरे पांडुरंगा, तुझी
कशी भक्ती करूं सांग ?
तुझ्या रूपापुढे येतं
आड सावकाराचं सोंग

डोये लागले आभायीं
मेघा नको रे बरसूं,
केली नजर खालती
माझे शीपडले आंसू

भरली येहेर
मोट चाले भराभर
कशाले करतं
कनाचाक कुरकुरं

वसांडली मोट
करे धो धो थायन्यांत
हुंदडत पानी
जसं तान्हं पायन्यांत !


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.