मनतरंग/अग्निघटिका आणि अग्निसाक्षी



 स्त्री ही निसर्गाचं रूप आहे. निर्मितीसाठी लागणारा काळ, वेदना, भावबंध यांचा ती प्रत्यक्ष अनुभव घेत असते. म्हणूनच ती आई असते. निरपेक्षपणे भवतालच्या परिसराला चैतन्य देत जाणारी लोकमाता नदी असते. जगभर मायेचा... ममतेचा सुगंध पसरवीत जाणारी वाऱ्याची शीतल लहर असते. सुखदुःख, चांगले वाईट, अग्निज्वालांचा... घनघोर पावसाचा वर्षाव... उरात सामावून घेत जीवनातले चैतन्य हिरव्या अंकुरातून जन्माला घालणारी भूमाता असते. दशदिशांतून येणाऱ्या अनुभवांना पचवून जमिनीवर ठामपणे उभी राहणारी साक्षात् ज्ञानदा असते... वृक्षासारखी. अशा पंचरूपांतून निसर्ग आणि माणूस यांच्यातील नाते सतत जागते ठेवणारी स्त्री गेल्या काही हजार वर्षांपासून स्वत:चे अस्तित्व हरवून बसली. निसर्गातील झाडांची कटाई झाली, नद्यांचे पाणी रासायनिक द्रव्ये आणि माणसांची घाण मिसळल्यामुळे दूषित झाले. यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडला. पावसाळ्याने आपले वेळापत्रक बदलले. उन्हाच्या झळांनी तपमानाची उंची पार केली. थंडीच्या दिवसात उकाड्याने हैराण केले.
 शेकडो वर्षांपासून तऱ्हेतऱ्हेचे अत्याचार, अन्याय निस्पंदपणे सोसणारी, आतल्याआत घुसमटणारी, दगडी जात्याजवळ नाहीतर लाकडी मुसळाजवळ उरातली सल मोकळी करणारी स्त्री फक्त शिव्यांची धनीण होते. त्यामुळे सामाजिक पर्यावरणही बेताल झाले. या पर्यावरणाने समतोल साधावा यासाठी प्रत्यक्ष अन्यायग्रस्त स्त्रियांना बोलके करून, 'अग्निघटिका' या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. टाकलेल्या विवाहिता, चेटकिणी ठरवून ज्यांना मारण्याचा प्रयत्न झाला अशा स्त्रिया, देवदासी प्रथेतून वेश्याव्यवसायाकडे ढकलल्या गेलेल्या तरुण मुली, मुलगी जन्मली की तिला मारून टाकायचे, फक्त एक मुलगी जिवंत ठेवायची, या प्रथेची बळी एक 'आई'; पर्यटन व्यवसायातून वेश्याव्यवसायात ढकललेल्या मुली सगळ्याजणी प्रश्नांना स्वत: तोंड देणाऱ्या. त्या व्यासपीठावर येऊन लोकांच्या न्यायालयात साक्ष देत होत्या. अग्निघटिका... अग्नि झेलताना झालेल्या तडफडीतून उमटलेले उद्गार !!
 झारखंडातील हल्ल्यांनी घायाळ झालेली ही स्त्री. चेटकीण नव्हती. दोन मुलांची आई, पतीची लाडकी. भरपूर कष्ट करी. आवाज गोड. खूप गाणी येत. गाणी गुणगुणताना हातही वेगाने चालत. दारूच्या नशेत शेजाऱ्याने छेडले. हिने प्रतिकार केला. नवरा साधासुधा. दिवसभरच्या कष्टांनी थकणारा. शेजाऱ्याशी भांडण्याचे बळ नव्हते.
 कामात हुशार असूनही, नवऱ्याचा तिच्यावर विश्वास असूनही शेजाऱ्याने स्वतःच्या प्रतिष्ठेच्या आणि पैशाच्या बळावर तिला चेटकीण ठरवले. ओझा... त्यांचा धर्मगुरु. त्याला हाताशी धरून तिला मारण्याचा प्रयत्न केला. महिला सामाख्याच्या कार्यकर्तीच्या मदतीने ती वाचली...
 तामिळनाडूतील उसलामपट्टी जिल्ह्यातील काही जमातीत एकच मुलगी जिवंत ठेवतात. ही आई त्यातलीच. तिच्या पहिल्या दोन मुली जन्मतःच मातीत पुरून टाकल्या. तिसरीच्या वेळी हिने लढा दिला. नवऱ्याचे म्हणणे की मुलगा झाल्यानंतरची एक मुलगी जिवंत ठेवू. नुकतंच जन्मलेलं लेकरू ठार मारण्यासाठी हातून ओढून नेतानाची जिवाची काहिली सांगताना तिला अश्रू आवरेनात. समोर बसलेले असंख्य साक्षीदारही अश्रू पुसत होते. पण कडेवरची ती वर्षा-दीड वर्षांची गोंडस मुलगी मात्र गालभरून हसत होती...
 बेकारीची कुऱ्हाड प्रथम स्त्रियांवरच कोसळत असते. अशियाई देशांतील वाढते दारिद्र्य, वाढती लोकसंख्या, कुटुंबात वा समाजात स्त्रियांना नसलेले स्थान, या बाबींचा फायदा घेतला जातो. थोडेफार शिकलेल्या तरुणी 'मदतनीस' म्हणून अरब देशात पाठविल्या जातात. नेपाळ, थायलंड हे देश आघाडीवर. ती जे सांगेल त्याचे इंग्रजी-हिंदी भाषांतर करून संध्या श्रेष्ठ सांगत होती. भरपूर पगार, परदेशगमनाचे आकर्षण या जाळ्यात अडकलेली ती सुशिक्षित मुलगी, त्या भयानक अनुभवाने मुळासकट हादरून गेली. ना तिथली भाषा अवगत, ना जनसंपर्क. लैंगिक शोषणाचा बळी ठरलेल्या मुलीला अक्षरांनी आधार दिला. चोरून पत्र टाकले. मग तिच्या देशातील स्वयंसेवी संघटनेनं पुढाकार घेऊन तिला सोडवले.
 आणि सांगली परिसरातील दुर्गा आमच्यासमोर प्रश्न फेकणारी.
 "ताई, तुमच्यापाशी बुद्धी हाये; डोक हाये; तुमच्या मायबापानी शिकिवलं ते डोकं इकून तुमी चार पैशे मिळिवता. मला शिक्षण मिळालं न्हाही. माज्यापाशी डौलदार शरीर हाय... पुरसांना हवा तसा बांधा हाये. ते इकून मी चार पैशे मिळिवते. जे जवळ हाये ते इकायचं नि चार पैशे कमवायचे. मग तुमच्यात नि माज्यात फरक तो काय ?"
 दुर्गाचा प्रश्न ऐकणाऱ्यांना अस्वस्थ करणारा, ती अग्निघटिकाच अंगावरचे संस्कृती, जागृती, संस्कार, शक्ती, मुक्ती वगैरे रेशमी आणि बांधीव कपडे फेडणारी, ऐकणाऱ्याला होरपळवणारी.
 तेव्हा उन्हाचा ताप वाढू लागला की ती अग्निघटिका थेट मनासमोर उभी राहते.

■ ■ ■