मनतरंग/बोलणाऱ्या झाडांना मिटावे लागते तेव्हा



 आशियाई स्त्रियांच्या मानवी हक्कांबाबत जागरूकपणे कार्य करणारी एशियन वुमेन्स ह्युमन राईट कौन्सिल (AWHRC) ही संघटना आणि स्त्रियांच्या प्रश्नांवर आग्रही भूमिका घेऊन काम करणारी 'विमोचना' संघटना, या दोहोंनी मिळून बंगलोरला चार दिवसांची परिषद घेतली होती. परिषदेचा विषय होता, 'बोलणारी झाडे... जेव्हा स्त्रियाही बोलू लागतात.' इंडोनेशिया, फिलिपाईन्स, ट्युनिशिया, नेपाळ, चीन आदी देशांतून आणि अवघ्या भारतातून शेकडो स्त्रिया आणि संघटना आपापल्या भागातले प्रश्न आणि त्या प्रश्नांनी झुंजणाऱ्या स्त्रियांना घेऊन आल्या होत्या.
 पहिल्या सायंकाळी बांबूनी वेढलेलेल्या वनात माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळावा यासाठी लढताना मृत्यूला सामोरे गेलेल्या स्त्रियांना श्रद्धांजली वाहिली, गोलाकार बसलेले कार्यकर्ते, मध्यात रांगोळीची सुरेख वर्तुळाकार नक्षी. प्रत्येक गट आपापले प्रश्न आणि कामाची ओळख सांगण्यासाठी त्या वर्तुळात येई. प्रत्येकाच्या हातात कागदाच्या नक्षीदार चौकोनात पेटलेला दिवा. तो दिवा त्या वर्तुळात ठेवत आणि थोडक्या शब्दांत प्रश्न मांडत. कुणी मूकनाट्याच्या साह्याने, तर कोणी संगीताच्या साह्याने किंवा नृत्याच्या तालात. झारखंडातील आदिवासी स्त्रियांचे प्रश्न मांडले होते रामदयाल मुंडा यांनी. बोलण्याला साथ होती बासरीच्या आदिम स्वरांची त्यांनी सांगितलेली मिथककथा आजही अंगावर काटा आणते...
 ...या आदिवासींचा डोंगर देव मारंगबुरू. तो ठरावीक रात्री पुरुषांना ज्ञान देई आणि स्त्रियांना कसे ताब्यात ठेवायचे याची विद्या शिकवी. त्यामुळे स्त्रियांना खूप त्रास होई. स्त्रियांनी एकत्र येऊन गुफ्तंगू केले आणि एक युक्ती केली. पुरुषांना दारूची आवड. ज्या रात्री देव ज्ञान आणि विद्या देतो त्या दिवशी स्त्रियांनी पुरुषांना भरपूर दारू पाजली. पुरुष दारू पिऊन धुंद झाल्यावर, सर्व स्त्रियांनी पुरुषांचा पोषाख केला आणि त्या डोंगरदेवाकडे गेल्या. बिचारा डोंगर देव, शंकरासारखा साधा भोळा. त्याने पुरुष समजून स्त्रियांना ज्ञान दिले. त्या हुशार आणि तल्लख झाल्या. स्त्रिया बुद्धिमती झाल्या की पुरुषांना वैताग येतोच. अगदी आजही. पुरुषार्थाला धक्का वगैरे. कारण बायकांची अक्कल चुलीपर्यंत चालावी ही रीत. अगदी उच्चशिक्षित समाजातही अनेकांची ही प्रवृत्ती. ते तर आदिवासी होते. मग सगळे पुरुष डोंगरदेवाकडे... मारंग बुरूकडे गेले. डोंगरदेव म्हणाला, मूर्खानो, दारू कुठे एवढी पितात? तुम्हीच तुमचे नुकसान केले. आता मी तुम्हाला हुशार स्त्रियांना 'चेटकीण' कसे ठरवायचे त्याची कला शिकवतो, युक्ती सांगतो. तेव्हापासून हुशार आणि शहाण्या स्त्रीला समाज चेटकीण ठरवून मारीत असे. अशा विच हंटर्सनी... चेटकिणी मारणाऱ्यांनी, शेकडो हुशार... अनुभवाचे शहाणपण समाजाला देणाऱ्या स्त्रिया नष्ट केल्या. या स्त्रियांचे दुःख जाणून त्यांचा बचाव करण्याचा व समाजातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठीचा प्रयत्न केला बिरसामुंडा यांनी. अवघा झारखंड पालथा घालून या युवकाने आदिवासींच्या उन्नतीसाठी जीवाचे रान केले. पण बिरसामुंडा सरकारला खपला नाही. माणसातला माणूस जागा होणे म्हणजे इंग्रजांच्या हुकूमशाहीला आव्हान. हे आव्हानच इंग्रज सरकारने गाडून टाकले. पण आजही झारखंडातील आदिवासी बिरसामुंडा या जगात नाही हे मानायला तयार नाहीत. त्यांना वाटते की बिरसामुंडा दिल्लीला गेलाय नि सरकारशी आदिवासींच्या विकासासाठी बातचीत करतोय... भांडतोय...
 ते ऐकत असताना मला जर्मनीतले अनुभव... गप्पा आठवल्या. जर्मनीतही अनेक हुशार, वेगळ्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या स्त्रियांना चेटकीण ठरवून मारले गेले होते. आमच्या लोककथांतही चेटकीण असतेच की. तिचे डोळे चकचकीत असतात, ती म्हातारी किंवा तरुण आणि अतिसुंदर असते. जर्मनीतील चेटकिणींच्या कथा तेथील दगडी किल्ल्यातून फिरताना ऐकल्या होत्या.
 अशावेळी ऱ्हेनफेल यांचे मत आठवते. जेथे जेथे कृषिप्रधान जीवनपद्धती होती, तेथे मातृसत्ताक जीवनपद्धती विकसित झाली. दृढ झाली, अत्यंत जोमात वाढली. त्यामुळेच ती नष्ट करून पितृसत्ताक जीवनव्यवस्था स्थापित करताना, तिची मुळे निर्घृणपणे खणून काढावी लागली.
 ही मुळे खणून काढण्यासाठी तीन हत्यारे वापरली. एक म्हणजे बालविवाह, दुसरे पुरुषाला अनेक विवाह करण्याची मुभा आणि तिसरे विधवा स्त्रीने पतीबरोबर सहगमन करावे वा स्वत:वरचे निर्बंध स्वीकारून कुरूप करून घ्यावे. कारण परंपरेने मानले की विधवा अर्धमृत असते.
 पंधरा दिवसांपूर्वीच कळले की नवऱ्याच्या माराचे वळ सोशीत, नेहमी हसतमुख असणाऱ्या, लहानग्यांसाठी सतत कष्ट करणाऱ्या उर्मिलाने स्वत:ला जाळून घेतले. गेली दहा वर्षे अत्यंत उत्साहाने पडलोणची करणारी, कवडी कवडीची काटकसर करून घर घेणारी, लेकीला शिकवून, तिला पायावर उभे करून तिचे लग्न करणारी उर्मिला. तिला झाले तरी काय होते ? एक दिवस तिच्या शेजारचे गृहस्थ भेटले. त्यांना विचारले नि मन बधिर झाले. आता बापाबरोबर मुलगाही सामील झाला होता दारूच्या नशेत. "दारू नव्हेत मूत पिताहात' असे ओरडून सांगणाऱ्या उर्मिलाचा आवाज, "या बाया लई शान्या होऊन बोलाया लागल्यात, हिचा आवाज कायमचा बंद करून टाका", असे म्हणत त्या दोघांनी दारूच्या धुंदीत तिचा आवाज कायमचा मिटवून टाकला होता. असं पाहिलं... ऐकलं की वाटतं किती शतकं हा लढा खेळत राहायचा ?

■ ■ ■