मनतरंग/ईश्वर, सत्य... आणि शिक्षण
< मनतरंग
मैत्रिणी नारळ, फुलं घेण्याच्या गडबडीत. मी खाली उतरून धबधब्यातून पडणाऱ्या पाण्यात पाय बुडवून उभी राहिले. यंदा पाऊस मन भरून झालाय. त्यामुळे भवतालचे डोंगर गर्द हिरवे झाले आहेत, तरालेल्या चिंचा...कवठांवर वाकड्या चिंचा नि कवठे लटकू लागली आहेत. या डोंगरात माकडेही गर्दी करून राहतात. आपल्या हातातली वस्तू झडप घालून पळवणे हा त्यांचा लाडका उद्योग. मग नारळ असो वा पर्स. त्याचा हिसका मैत्रिणींनाही बसला. एकीच्या खांद्यावर बसून त्याने पर्स पळवली. देवळाच्या भिंतीवर बसून ती उघडली. त्यात खायचा पदार्थ नाही हे पाहून फेकून दिली. पण आतल्या कागदांना... नोटांना हात लावला नाही. माकडांच्या माणूसपणाचे कौतुक करीत असतानाच माझी नजर दोन मुलींकडे गेली. त्यांचे वय तेरा ते पंधराच्या दरम्यानचे असावे. डोळ्यात बालपण होते पण शरीरावर तरुणाईची झळाळी चढू लागलेली. कपाळ मळवटाने भरलेले. अंगावर कोऱ्या हिरव्या साड्या. हातभरून लाल-हिरव्या बांगड्या आणि केस?...ते मात्र जटा झालेले .चिप्प चिकटलेले केस. त्या नक्कीच देवदासी होत्या. रामलिंगाचा डोंगर आहे.डोंगरावर देवीचा निवास असतो. त्या दोघींनी येडेश्वरीचे दर्शन घडवून रामलिंगाचे दर्शनासाठी आणले असावे. त्या दोघींना पाहून मन थरारून...वैतागून गेले. स्वातंत्र्य मिळून पन्नास वर्षे झाली तरी अंधश्रद्धेतून निर्माण झालेल्या या प्रथा समाजात जिवंत आहेत. मी त्यांना भेटून काही विचारणार तोच सारेजण जीपमध्ये बसले नि निघून गेले. कहर म्हणजे बरोबर एक पोलीस होता.
नेपाळमधून फार मोठ्या प्रमाणावर लहान मुलींची निर्यात वेश्या व्यवसायासाठी होते. हे दुःख एकूण सर्वच आशियाई देशांचे आहे. गेली अनेक वर्षे देवदासी प्रथेविरुद्ध परिवर्तनवादी कार्यकर्ते जीव झोकून काम करीत आहेत. परंतु अजूनही सौंदत्तीच्या डोंगरावर...आसपास ही प्रथा आहेच ! आणि मुली देवाला वाहण्यामागचे प्रमुख कारण मुलासाठी बोललेला नवस हेच असते. आज विज्ञानाने सिद्ध केले आहे की मुलगा वा मुलगी होणं स्त्रीवर अवलंबून नसतेच. पण हे विज्ञान...त्याने सिद्ध केलेले सत्य ग्रामीण भागात राहणाऱ्या सत्तर टक्के समाजापर्यंत नेणार कोण ? शिक्षणाने मनाची...तर्कबुद्धीची कवाडे उघडतात, माणूस कार्यकारणभाव जाणू लागतो असे मानले जाते. परंतु शिकली सवरलेली माणसे अधिकाधिक 'सकामश्रद्ध' 'अंध' होत चालली आहेत. गणेश दूध पितो, तेही शासकीय कार्यालयात मांडलेला बाप्पा. सत्यसाईबाबांवरील श्रद्धेने त्यांना प्रथम अर्पण केलेली 'कला' दूरदर्शनवरून दाखविली जाते. श्रद्धा 'निष्काम' राहिलेली नाही. तशी ती नव्हतीही. सकाम श्रद्धेतून नवससायास आले. सकाम श्रद्धेचा प्रवास अंधश्रद्धेकडे जातो. प्रतिष्ठित, उच्चशिक्षितांनी तरी आपल्या श्रद्धेचे प्रदर्शन मांडू नये. परंतु आज कोणत्या ना कोणत्या 'महाराजा' ना आपण गुरुस्थानी मानले आहे हे सांगण्यात प्रतिष्ठा आली आहे.
ईश्वराची निष्काम... निरंग... निर्विकार श्रद्धा कधीही निराकार असते. ती स्वयंभू असते. आमच्या पूर्वजांनी अशा श्रद्धेची बीजे आमच्या जीवनात पेरली. खळखळ वाहणाऱ्या नदीच्या जळात पाय रोवून उभे राहायचे व पहाटे उगवणाऱ्या सूर्याला त्या निर्मळ पाण्याचा अर्घ्य ओंजळीत घेऊन वाहायचा. त्याला वंदन करायचे. जगण्याला आधार देणारे वृक्ष, नद्या, भूमी, डोंगर यांनाच आम्ही देवत्व दिले होते. मानवी विकासाच्या प्रवासात कधीतरी निसर्गात मुक्तपणे लहरणारे ईश्वराचे रूप आम्ही भिंतीत कोंडून टाकले. दगडात कोरले. अर्थात ईश्वराबद्दलची श्रद्धा भक्ताने कलेच्या माध्यमातून व्यक्त केली. त्या कलेचे अप्रतिम रूप मंदिराच्या उभारणीतून आजही जाणवणारे. सत्य आणि सौंदर्यातील शिवत्व पाहायला शिकवले नाही ते धर्मधुरीणांनी. 'ईश्वर' या संकल्पनेचा व्यवसाय सर्व स्तरांवर आणि सर्व स्तरांतील 'शहाण्यांनी' केला. ज्या राष्ट्रातील बत्तीस टक्के स्त्रिया 'सही' येणाऱ्या साक्षर असतात, ज्या देशातील पुरुष 'नोकरी'चे साधन म्हणून शिक्षणाकडे पाहतात तेथे अंधश्रद्धांची बजबजपुरी न माजली तरच नवल ! मग आमच्या देवदेवतांना बकऱ्याचा अजाबळी लागणार, देवाला आजन्म सेवा करण्यासाठी मुली लागणार, मुलं लागणार. देवाच्या नावाने सामान्यांना लुबाडणारे असंख्य 'बुवा' निर्माण होतच राहणार !
जीवन जगताना माणसासमोर असंख्य अडचणी येतात... जणू ती एक अडथळ्यांची शर्यतच असते. अशा वेळी सामान्य माणसाची मती गुंग होते. आपण किती अपूर्ण, असहाय आहोत याचे भान येते. अशावेळी आठवतो ईश्वर. ईश्वराच्या साह्याने संकटाशी सामना करण्याची ताकद, संकटाच्या पल्याड जाण्याची जिद्द मिळवण्याची भूमिका ठेवली तर ईश्वर या संकल्पनेतील 'सत्य' आपल्याला नक्की सापडेल. हे सत्य सामान्य माणसापर्यंत नेण्याची बांधीलकी खरे तर 'शिक्षणा'ने स्वीकारायला हवी. सुजाणांनी...शिक्षितांनी ठेवायला हवी. पण...
■ ■ ■