मनतरंग/यशस्वी होण्यासाठी
< मनतरंग
परवा दिवसभर चांगले उत्फुल्ल उन्ह पडले होते. झळझळीत रंगाचे. जणू सूर्यफुलांचे शेत झुलतेय. पाहता पाहता उन्हं कधी आणि कुठे हरवली ? ते कळलेच नाही. मग फक्त गडगडाट, उरात धडकी भरवणारा. घनगंभीर लयीतला आणि लगेच हत्तीच्या सोंडेतून वेगाने उडणाऱ्या धरणीला आकंठ भिजवणाऱ्या धारा, उन्मुक्त पावसाच्या. बेभान वाऱ्यासंगे वाकड्या तिकड्या नशेत धावणाऱ्या. हे दृष्य पाहाताना मला लहानपणीच्या नाचाच्या ओळी आठवल्या.
"आसुसली माती
पिकवाया मोती
आभाळाच्या हत्ती आता,
पाऊस पाड गा, पाऊस पाऽड..."
हस्ताचा पाऊस आणि निरभ्र होत जाणारे नवरात्राचे चांदणी आभाळ यांचे जवळचे नाते आहे. लहानपणी हस्तनक्षत्र लागले की पुणेकर मैत्रिणींकडे हादगा मांडायची धांदल उडे. आम्हा खानदेशवासींची लाडकी माहेरवाशीण भुलाबाई मात्र अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी भाद्रपद पुनवेला पतिराज भुलोबा आणि गणेशबाळासह महिनाभर मुक्कामाला येई. आमच्या वर्गात सांगलीची एक मुलगी होती. नवरात्राच्या पहिल्या माळेच्या दिवशी तिच्या घरी भोंडला मांडला जाई.
भाद्रपद आश्विनातले ते दिवस आम्हा मुलींच्या स्वप्नात ज्येष्ठ आषाढापासून येत.
"ऐलमा पैलमा गणेश देवा
माझा खेळ मांडून दे,करीन तुझी सेवा...
यादवराया राणी रुसून बैसली कैशी ?
भाद्रपदाचा महिना आला
आम्हा मुलींना आनंद झाला"
भोंडला, हादगा, भराडी गौर, भुलाबाई हे उत्सव कुमारिकांचे. विदर्भ, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण या महाराष्ट्रातील विविध प्रदेशांत खेळले जाणारे उत्सव नावाने वेगळे असले तरी त्यांचा मूलबंध एकच आहे. कुमारिकांच्यातील सुफलन ऊर्जेचा सन्मान करणारे हे उत्सव आहेत. त्यांची गाणीही एकाच प्रकारची आहेत. मला लहानपणी नेहमीच प्रश्न पडे. भुलाबाई वऱ्हाडखानदेशातली तर हादगा-भोंडला, पुणे-सांगली-कोकणातला; तरीही या गाण्यात एवढा सारखेपणा कसा?
असे म्हणतात की, स्त्रिया संस्कृतीच्या रक्षक आणि वाहक असतात. मुली... लेकीबाळी आपल्यासोबत ही गाणी, विधी जिथे जातील तिथे घेऊन जात असतात.
"तुळशीचं बाळ रोप
दुजा अंगणी रोवलं
मूळ...माती विसरुनि
मंजुळांनी डंवरल..."
आणि असे हे उत्सव कोणाचे ? तर कुमारिकांचे. कुमारिका, ज्या पाऊस, बीज झेलून नवनिर्मिती करण्यास योग्य झाल्या आहेत अशा मुली. नवनिर्मिती करण्याच्या ऊर्जेने रसरसलेल्या मुली. भारतीय संस्कृतीने या खेळोत्सवांच्या माध्यमातून कुमारिकांच्या सर्जनशक्तीचा केलेला हा सन्मान, आज जाणवलं की मन कृतार्थ होते. भारतातील विविध पारंपरिक सण, उत्सव या मागच्या घनगंभीर, मधुर भावसौंदर्याचा शोध कोणी घ्यायचा ? आम्हीच ना ? तेही आपल्या पायाखालची जमीन उकरून पाहू ना; त्यात अनमोल रत्नांचा खजिना भरला आहे.
■ ■ ■