काटेरी उन्हाच्या बाभळी आता चांगल्याच पेटायला लागल्या आहेत. आणि त्या ज्वालांच्या आगीत परीक्षांच्या काहिलीची भर, हातात अभ्यासाच्या विषयाचे पुस्तक... म्हणजे दोन तासात पासिंगची गॅरंटी'. 'वाचा, लिहा नि पास व्हा' वगैरे दोस्त, हातात घेतले की डोळे पेंगुळतात. झोप अक्षरशः डोळ्यातून वाहू लागते. मग आई नाहीतर बाबा येतात. हलवून जागं आणतात. अशा वेळी आपण अगदी सहजपणे डोळे उघडतो नि सांगतो,
 "छे छे, जागीच आहे मी. किंवा जागाच आहे मी. जरा मनन करीत होतो. सर म्हणाले, एकदोन पानं वाचत जा. नि त्यावर चिंतन करत जा, म्हणून चिंतन करीत होतो..."
 बहुतेक मध्यमवर्गीय घरातली ही कथा. जिथे आई-बाबांची पाखर आहे. दोन वेळेला कौतुकाने, मनाजोगे जेवायला मिळते तिथली. जरा आणखीन पुढे जाऊया. एखाद्या महाविद्यालयाचे गरीब विद्यार्थ्याचे वसतिगृह. नाहीतर अगदी गल्लीबोळातले पत्र्याचे घर. जिथे ग्रामीण भागातील चारसहा मुलं एक चूल मांडून राहतात. गावाकडून पीठमीठ घेऊन यायचे. हातानेच भाकऱ्या थापायच्या. चटणी, कांदा आणि पाण्याबरोबर पोटात ढकलायच्या. यांच्या त्यांच्या नोटस् मागून आणायच्या, पुस्तकं आणायची, थकलेले डोळे फाडफाडून अक्षरे वाचत राहायची. मेंदूत ठसवीत राहायची. एखाद्या क्षणी अशी डुलकी लागणार की जणू काही काळ जग बुडून गेलंय...
 "ए पोरी ते परिक्साफिरिक्सा ऱ्हाऊंदे बाजूला. हितं जल्माची परक्साहाय. म्होरल्या साली द्ये पेपर. समोरच्यान् ला त्याच दिसी येळ हाय. पोरगं दोन दिस सुटीवर आलंय. त्यात बक्कळ पोरी पाहिच्यात, आन् पसंत क्येली तर परिक्सेआंदीच पोरगी पास आमची ! काय ?"
 शिकण्यासाठी तालुक्याच्या गावी वसतिगृहात राहणाऱ्या मुलीला घरी घेऊन जायला आलेल्या वडलांचे फर्मान.
 काही घरांच्या खिडक्यांतून रात्रभर जागणाऱ्या दिव्यांचा झगमगाट, मधूनच फास्ट फटफटीचे आवाज. मग हलक्या पावलांनी येणारी जाणारी माणसे. हलक्या आवाजातली खुसरफुस... खुसरफुस. दुसऱ्या दिवशी पेपर फुटल्याच्या, मुख्य प्रत मुख्य ठिकाणातून दहा हजाराला गावातून पोचल्याच्या आणि त्याच्या हजारो झेरॉक्स प्रती दोनशेला एक या भावात विकल्याच्या, हवेतून उडणाऱ्या वावड्या.
 "त्या अमक्या मास्तरानं तमक्या गल्लीतल्या पोराच्या अंगाला बांधलेल्या कॉप्या त्याला उघडा करून काढल्या,' "त्या मास्तराला संध्याकाळी धरलं ना खडकावरच्या पोरांनी. चोळामोळा करून रस्त्यात फेकून निघून गेले."
 "अरे पण कशाला डोळे उघडे ठेवून वर्गातून फेऱ्या मारायच्या? आपणच डोळे उघडले नाही तर कशा सापडणार कॉप्या ? नि मग पकडणार तरी कोणाला? डोळे मिटून दूध प्यायचे बस् !"
 "चिनू ,आज्जी गावाला जातेय. तुझी परीक्षा आहे ना परवा ? तिला जय करून टाक बेटा' चार वर्षांच्या गोंडस पिल्लाची आई त्याला बजावतेय.
 "कैसी चल रही है स्टडी ? मै तो तंग आ गयी बाबा. दिनभर खाना पकाना, घरका काम और रातमे स्टडी. ये बारवी का साल..." एका 'अभ्यासू' आईचे फोनवरून दुसऱ्या 'अभ्यासू' आईशी बोलणे.
 परीक्षांचा मौसम सुरू झाला की विद्यार्थी, त्यांच्या आया यांचे हालच ! हो आयांचेच!
 पूर्वी बाजार करणे, मुलांना दवाखान्यात नेणे, मुलांचा अभ्यास घेणे वगैरे कामं घरातले पुरुष करीत. पण आता असे म्हणतात, जगातील एकूण श्रमापैकी ६७ टक्के श्रम स्त्रियांच्या नावावर आहे. ही बातही उन्हाची तलखी वाढवणारी !
 वयाच्या चौथ्या वर्षापासून परीक्षा द्यायला जे सुरुवात करायची ती थेट पंचविशी ओलांडेपर्यंत. किंवा मग कितीही वर्षे; आम्ही इंटरला होतो तेव्हा एक पन्नाशीच्या 'विद्यार्थिनी' नऊवार साडी भव्य कपाळावर चंद्रकोर, हातात घड्याळ अशा थाटात सायकलवरून कॉलेजला येत.आमच्याच वर्गात होत्या. लॉजिकची समीकरणं पाठ करता करता डोकं थकून जायचं. पण मावशींच्या जिभेवर समीकरणं अगदी गोंदलेली. शेवटी आम्ही रहस्य विचारलं. त्यांचं उत्तर असं,
 "अग सोपं आहे फार. मी समीकरणांचे कागद भिंतीला चिटकावून ठेवलेत. पोळ्या करताना, भाजीला फोडणी देताना अगदी देवाला फुलं वाहताना सुद्धा तेच डोळ्यासमोर असते. मग न कळत मनाट फिट्ट बसते. पोरींनो, मी काही नोकरीच्या हिशेबाने शिकत नाहीये. मला खूपखूप हौस आहे शिकायची. बस!"
 परीक्षांचा ताण दिवसेंदिवस वाढत चाललाय. शिकणे, अभ्यास, परीक्षा या बाबी जगाबद्दलच्या उत्सुकतेशी, ज्ञानाशी बांधलेल्या राहिलेल्या नाहीत. त्या व्यवसाय, उपजीविका यांच्याशीच केवळ जोडल्या गेल्या आहेत. मग या परीक्षा केव्हाही आणि कुठेही घेतल्या तरी हवा 'गरम' करणारच !!

■ ■ ■