मनतरंग/तर आम्ही काय भाकऱ्या भाजायच्या?



 'ताई, मत कोणाला देणार ? कोणकोणते उमेदवार आहेत ? बायांपैकी आहेत का कोणी ?" एक राज्यशास्त्राची विद्यर्थिनी निवडणूकपूर्व परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बाजाराला आलेल्या भाजीवालीला प्रश्न विचारीत होती.
 "कसलं मत हो ताई ? पुन्ना मताची वारी आली का? मागल्या सालीच टाकलं होतं की ! आन् ह्ये बगा, आमी ल्योकाला न्हाईतर मालकाला इचारतो की कच्च्या चित्रावर शिक्का हाणायचा. पयलं दोगंबी एकच चित्र सांगायचे. आता ल्योक म्हणतो घड्याळ तर बाप म्हणतो फूल आन् सासरा म्हणतो 'हात'च बरा, बघा ही नवी रीत. तुमीच सांगा वो कोनचं चित्र बरं होय?" ती तरुण कार्यकर्ती गोंधळून गेली आणि पुढे सरकली.
 रिक्षा चालवणाऱ्या दादांना सहज विचारलं "कुणाचा जोर आहे यंदाच्या निवडणुकीत?" तो रिक्षावाला मनापासून हसला आणि टोमणा देत मला म्हणाला, "आत्ता, तुमी मला इचारता ? आवं तुमीच म्हंता की बायांना निवडून दिलं तर भ्रष्टाचार कमी व्हईल. पन आपल्याला न्हाय पटत बुवा ! आपल्या बाया राज चालवाया लागल्या तर, पोळ्या भाकऱ्या कुनी भाजायच्या ? समदेच उपाशी ऱ्हात्याल की ! एकांदुसरी पाटवली तर निभतंय की!" रिक्षावाल्याचे उत्तर.
 लोकसभेत काही काळ खासदार असलेली मैत्रीण सांगत होती. विधानसभेत आणि लोकसभेत महिलांसाठी ३३ टक्के जागा राखीव ठेवाव्यात हे विधेयक मांडले गेले तेव्हा राजकारणात मोठ्या पदावर असलेली व्यक्ती सहज बोलून गेली,
 "अरे भई, महिलाएं अगर राज करने लगी, तो हम पुरुष क्या रोटियाँ बेलेंगे?"
 गेल्या हजारो वर्षांपासून चालत आलेली ही श्रमविभागणी समाजमनात घट्ट रुजून बसली आहे. ही श्रमविभागणी पाचपन्नास वर्षांत बदलणारी नाही; याची कल्पना स्त्रीवादी स्त्रीपुरुषांना आहे. महत्त्वाचा मुद्दा हा आहे की स्त्रीच्या घराशी निगडित असलेल्या श्रमाची दखल समाज कधी घेणार आहे ? ते श्रम आर्थिक मूल्य निर्माण करणाऱ्या श्रमांइतकेच महत्त्वाचे आहेत हे आपण मान्य करणार आहे का ? सडा-सारवण, केरवारे, पाणी भरणे, लाकूड-फाटा गोळा करणे, शेणगोठा-सफाई आणि गोवऱ्या थापणे, अन्न शिजवणे, जेवणात लागणारे टिकाऊ पदार्थ तयार करणे, पापड, लोणची, कुरडया, पापड्या डाळी-साळी करणे आदी उन्हाळी कामे त्यात आली, मुलांना जन्म देऊन त्यांचे संगोपन करणे, या कामांसाठी तिला दिवसाचे किमान ८ ते १२ तास द्यावे लागतात. या व्यतिरिक्त कुटुंबाच्या सुखासाठी...भाकरीसाठी दुसऱ्याच्या शेतात मजुरी करावी लागते वा स्वत:च्या शेतात राबावे लागते वा जनावरांमागे राखणीला हिंडावे लागते. त्यासाठी तिला ६ ते ८ तास द्यावे लागतात.
 मजुरीला जाणाऱ्या स्त्रीच्या हातात वीस-पंचवीस रुपये दिवसाकाठी आले तरी ते स्वत:च्या सोयीसाठी वा इच्छेनुसार ती खर्च करू शकते का ? आणि घरच्या शेतात काम करणाऱ्या वा घरातल्या गुरांमागे राखणीसाठी जाणाऱ्या बाईला रोजगार कोण देणार ?
 उजाडल्यापासून ते पाठ टेकेपर्यंत, या सतत भिरभिरणाऱ्या ग्रामीण भागातील बाईच्या श्रमांबद्दल कुटुंबाला वा समाजाला कृतज्ञता असते का ? उत्तर नकारार्थी. हजारात एखादा अपवाद असेलही.
 ऑफिसमध्ये जाणारा चाकरमानी, विद्यालयात शिकवणारा शिक्षक- प्राध्यापक, अधीक्षक वगैरे वगैरे सर्व नोकरदार, सुमारे पंच्चाण्णव टक्केंच्या पत्नी, गृहिणी असतात. पतीला त्याच्या पेशात वा कामात प्रत्यक्ष मदत नसली तरी घराचे व्यवस्थापन करून त्यांना कामासाठी लागणारी शांती, सुविधा त्या निर्माण करतात. मग वेळेवर चहा, नाश्ता, जेवण करणे, घर नीटनेटके ठेवून, मुलांचे संगोपन करणे असेल. त्या गृहव्यवस्थापनासाठी त्यांना सन्मान मिळतो ? किमान त्याबद्दल कृतज्ञतेची जाणीव कुटुंबात, समाजात असते का ? जे श्रम 'अर्थ' निर्माण करतात त्यांनाच मूल्यवान मानले जाते. त्यांनाच समाजात 'अर्थ' प्राप्त होतो. जे श्रम 'अर्थ' निर्माण करीत नाहीत ते 'अर्थहीन' ठरतात. ते 'काबाड' ठरतात.
 निवडणुकीतल्या जाहीरनाम्यात सर्व पक्षांनी विधानसभेत, लोकसभेत महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्यास मान्यता दिली आहे. पण प्रत्यक्षात किती टक्के महिलांना तिकिटे दिली आहेत ? हे आरक्षण आम्हांला २१ व्या शतकात नक्कीच मिळेल. पण त्यासाठी शेतात, घरात, कारखान्यात 'काबाड' करणाऱ्या महिलांच्या श्रमांचे, आर्थिकदृष्टिकोनातून मूल्यमापन करण्याचा आग्रह आम्हां महिलांची 'महत्त्वाची मागणी' म्हणून जाहीरनाम्यात कधी घालायला लावणार ?
 भाकऱ्या आणि गोवऱ्या कुशलपणे थापणारी स्त्री, राजकारणही कुशलतेने करू शकते याची साक्ष ग्रामपंचायतीत निवडून येण्याची संधी मिळालेल्या स्त्रिया देऊ लागल्या आहेत. खरे तर महिलांच्या सर्वांगीण सबलीकरणासाठी, त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचारांचे निवारण करण्यासाठी धडपडणाऱ्या स्त्री-पुरुष संघटनांनी, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून आलेल्या महिलांच्या कार्यशाळा पक्षाच्या पलीकडे जाऊन आयोजित केल्या पाहिजेत. महिलांच्या सर्वांगीण सबलीकरणासाठीच्या योजना राबवण्यासाठी त्यांना सक्षम करणे, त्यांच्या चौकसपणाची व माहितीची क्षेत्रे विस्तारित करणे हे काम अधिक महत्त्वाचे मानले पाहिजे... म्हणजे भारतीय स्वातंत्र्याची शताब्दी साजरी करताना तरी असे उद्गार कोणी काढू नयेत की "बायका राज्य करू लागल्या तर आम्ही काय भाकरी भाजायच्या ?"

■ ■ ■