मनतरंग/पुरस्कारांची कहाणी



 आजकाल पुरस्कारांची चलती आहे. पूर्वी शासन, समाजसेवी संस्था, विविध प्रतिष्ठाने यांच्याद्वारे विविध क्षेत्रांत अतुलनीय कामगिरी करणाऱ्या समाजसेवेसाठी तसेच समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या व्यक्तींना, संशोधन क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार दिले जात. परंतु अलीकडे गणेशोत्सव, नवरात्र आदी उत्सवांच्या निमित्ताने गल्ली - गावातही पुरस्कार वाटले जातात आणि त्यासाठी जात-पात-धर्म आपलेतुपले, नाती-गोती या अनुसार निकष लावले जातात. त्यामुळे पुरस्कार या शब्दाला गुळमुळीतपणा येऊ लागला आहे.
 हे तर खरेच की, पुरस्कारामुळे त्या व्यक्तीचा आत्मविश्वास वाढून काम करण्याची प्रेरणा मिळते, उत्साह वाढतो. पण अलीकडे पुरस्कारांचे आगळेपण, त्यातील तेज लोपू लागलेय.
 पूर्वी हे पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्या व्यक्तीला ही बातमी कळत असे. पुरस्कारासाठी व्यक्ती निवडताना विशेष काळजी घेतली जाई. त्या व्यक्तीबद्दलची माहिती त्या परिसरातील सन्माननीय व्यक्तींकडून प्रत्यक्ष भेटीतून गोळा केली जात असे. त्या व्यक्तीचे काम पाहिले जात असे. पण आज एक नवीनच पद्धत रूढ होऊ पाहात आहे. त्या व्यक्तीने प्रश्नावली भरून द्यायची. त्या व्यक्तीनेच सिद्ध करायचे की मी कशी वा कसा एकमेव 'योग्य' आहे. एक दिवस एक महिला कार्यकर्त्या दुसऱ्या जिल्ह्यातील तालुक्याच्या गावाहून खास मला भेटायला आल्या. पुरस्कारासाठी माझी शिफारस हवी होती.
 "ताई तुमची शिफारस कामाला येईल असं अनेकांनी सांगितलं मला. तुम्हाला पण चार-दोन बक्षिसं मिळालीत म्हणे. मग ही प्रोसेस तुम्हाला माहीतच असेल. तुम्ही ओळखलंत ना मला ? तुम्ही महिला मेळाव्यासाठी आला होता ना. तेव्हा अध्यक्षांची ओळख मीच करून दिली होती. पुरस्कार मिळाला तर तुम्हाला बोलवीन सत्काराला. मग देता शिफारस ? ताई शिफारस अगदी पक्की करून द्या बरका !" माझ्याजवळ काय उत्तर होते?
 दहा-बारा वर्षांपूर्वीची गोष्ट. मी आईला भेटायला गेले होते. एक दिवस सकाळी एक गृहस्थ आईची चौकशी करत आले. त्यांना काम विचारले. ते जिल्हा परिषदेतील कर्मचारी होते. या परिषदेला शासकीय पुरस्कारासाठी आईच्या नावाची शिफारस करावयाची होती. इतके फोटो, तितके फॉर्मस् ,एवढी शिफारसपत्रे वगैरे वगैरे...आणि मग सूचना, की ते पुण्याचे ढमके शासनात त्यांचे भक्कम वजन आहे. त्यांचे पत्र जोडले तर काम फत्तेच!
 आमचे संभाषण सुरू असतानाच आई आमच्यात घुसली नि आम्हाला सुनावले.
 "भाऊ कितव्यांदा येताहात ? यापूर्वी माझ्याकडे हे सारे मागितलेत. किती वेळा सांगू की पुरस्कारासाठी शिफारस मागायला जाणं माझ्या शिस्तीत बसत नाही. तुमच्या पुरस्कारासाठी का गेली पंचवीस वर्षे मी काम करते ? किती वेळा सांगायचे की माझ्या समाधानासाठी खुशीसाठी करते. शासनाच्या गौरवाने मी खुश होऊ ? आम्ही याला लबाडी म्हणतो. कृपा करून यासाठी पुन्हा येऊ नका." मी योग्य वाटले तर मला न विचारता पुरस्कार द्या ना ! 'देणेघेणे' सारखा हा काय व्यवसाय आहे ?"
 आई घरात गेल्यावर त्या गृहस्थांनी आपले मन मोकळे केले,
 "ताई, तुमच्या आईच या पुरस्कारासाठी योग्य आहेत असे आम्हांला मनापासून वाटते. शासनाचा कारभार म्हणजे नुसता कागदी घोड्यांचा व्यवहार आहे. ही कागदपत्रे आणा, ती प्रशस्तीपत्रे जोडा आणि खोटी कागदपत्रे सादर करणाऱ्या सर्वस्वी अपात्र व्यक्ती हे पुरस्कार ओढून नेतात. ते पाहवत नाही. म्हणून मी दरवर्षी आईंना त्रास देतो आहे, उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारासाठी विद्यार्थ्यांची प्रशस्तीपत्रे जोडावी लागतात आणि मुख्याध्यापकांची शिफारस. मग जो शिक्षक त्यांना खुश करील तो 'उत्कृष्ट.' आई पुरस्कारापेक्षा ही योग्य आहेत. पुन्हा नाही मी या कामासाठी येणार..."
 पूर्वी पुरस्कारांचे समाजाला कौतुक होते. आजकाल पुरस्काराच्या बातम्या इतक्या जागोजाग असतात की वाचणाराही ती बातमी टाळून पलीकडे जातो. माझ्या ओळखीचे गृहस्थ सांगत होते की, 'हूज हूँ' सारख्या संग्रहात तीनशे डॉलर्स रजिस्ट्रेशन फी देऊन 'नाव' येऊ शकते. तर पुरस्काराची ही कहाणी. अवमूल्यन कशाकशाचे करणार आम्ही ?

■ ■ ■