मनतरंग/नव्या दिशेची चाहूल होती ती
< मनतरंग
स्त्रियांचे प्रश्न सोडवायचे असतील, त्यांच्यावर होणारे अत्याचार कमी करायचे असतील तर स्त्रीमुक्तीची दिशा, तिचे संदर्भ तरुणांपर्यंत, पुरुषांपर्यंत पोचवायला हवेत. स्त्रियांच्या प्रश्नांवर बोलायचे आणि तेही स्त्रियांसमोर ? मला हे पटत नसे. किंबहुना माझा हा हट्ट असे, की मी व्याख्यानाला येईन. पण श्रोत्यांत स्त्री पुरुष दोघेही हवेत. ग्रामीण भागात राष्ट्र सेवा दलाच्या वतीने युवासंकल्प शिबिरे घ्यायची होती. खेड्यातील तरुणांना माझी ही भूमिका फारशी भावली नाही."भाबी, बायांच्या समस्या बायांनाच कळाया हाव्यात. आम्ही बाप्ये कशाला मध्ये हवे ? अन् बायांना तरास देणाऱ्या सासवा नि नणंदा बायाचा की!" एका तिशीतल्या तरुणाने मला हटकले.
"दादा म्हंतत त्ये खरचं हाय. बायांच्या समस्या बायांपुढेच मांडा. 'ग्रामीण' इकासाची दिशा, या विषयावर दुपारी भाषण आणि चर्चा हाये तवा आमी येतो" दुसऱ्याने पुस्ती जोडली. त्यांची भाबीपण हट्टी. मी विनंती केली,
"हे बघा, माझ्यासाठी - तुमच्या भाबीसाठी घंटाभर येऊन ऐका. पटलं नाही तर चर्चेत नका भाग घेऊ" आणि माझे भाषण सुरू झाले. अर्धा पाऊणतास झाला तरी कोणी उठून गेले नाही. माझी मांडणी संपली आणि मी सांगितले की, आता चर्चा होईल, पुरुषांनी जायला हरकत नाही.
"असं कसं ? आमच्या मनात पण शंका हायेत. आमी पण चर्चेत भाग घेणार" मला हटकणारा तरुण म्हणता होता. "तुमी म्हणता बाई नि पुरुषांचा जलम सारखाच. दोगं पण मायच्या पोटात नऊ महिने काढणार. रोगपण सारखे. मरण पण सारखं. आतापर्यंत आमाला पण वाटायचं की बाईची अक्कल चुली पसवर. मी कॉलेजात गेलो तवा खोली करून ऱ्हायलो. होस्टेलात राहण्याइतका पैसा न्हवता, चार मित्रांनी खोली केली. माय घरून चटणी, लोणचं द्यायची. पण भाकर करायला तवाच शिकलो, नि कळलं की भाकर थापणं नि ती तव्यावर फिरवणं लई अवघड हाय...मग मायच्या हातची टम्म फुगलेली भाकर आठवायची." "तुम्ही म्हणता ते खरंच आहे. अवं खाण्यासाठी यंत्रावर शेंगा फोडून सोले काढणं जमतय. पण शेतात भुईमूग पेरायचा तर घरातल्या बायांनाच शेंगा सोलाव्या लागतात. तरच दाण्याचं नाक शाबूत ऱ्हातं त्यातूनच अंकुर फुटतो" दुसऱ्याने पुस्ती जोडली.
"आमचे आजोबा सांगायचे, त्यांची माय पहाटे उठून दळण दळायची. तवा कुठे भाकर खाया मिळायची. डाळीसाळी करणं, केरवारे, सारवणं...सारं बायाच करीत" तिसरा बोलला. तरुण मुलं बोलत होती. तेवढ्यात एका प्रौढेनं त्यांना सवाल केला "पण या कामाला किंमत दिली का तुम्ही ? भाबीसारख्या बाया, ज्या हपिसात जातात, महिन्याला नोटा मिळवतात त्यांच्या कामाला किंमत. आम्ही घरात राबतो, शेतात राबतो. पण कोनी म्हंत का ? की बाई दमलीस. खिनभर इसावा घे..."
"खरंय भाबी तुमचं. आमच्या कामाला बी किंमत मिळाया हवी. पैसा द्या म्हणत नाय आमी, पण निदान दोन गोड शब्द तरी मिळावेत की. लगीन झाल्यावर दोन लेकरं होइस्तो लाड. मग हायेच वाकड्या बोलाचा नि बुक्क्याचा मार..."
'भाबी, मी बी सुनेबरुबर आल्ये हितं. मला वाटलं काय पोरींच्या मनात भलतंसलतं भरवून देता तुम्ही, पन मला समदं पटलं. आमच्या मालकाला आमची किंमत नाय कळली. पन पोरावांना तरी समजावी. त्यांनी तरी मायला-बायकुला इसावा द्यावा." तिच्या बोलण्याला दुसरीने साथ दिली. "मॅडम, टी.व्ही.वरच्या मालिका पाहिल्या का तुम्ही ? सगळ्यात एकच विषय. पोरा-पोरींच्या चहाटळ नि भडक प्रेमाचा. आता पोरगी देखणी असेल तर एकाच का गावातल्या अनेक मुलांना वाटतं की हिचं प्रेम आपल्यावरच बसावं आणि ती बिचारी असते अभ्यासात नाही तर मैत्रिणीत दंग. तिने अशा प्रेमाला साथ दिली नाही की झाली रिंकू पाटील, नाही तर अमृता देशपांडेची गत" एका डी.एड. च्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या मुलीने मन मोकळे केले.
"भाबी, आम्हाला वाटायचं की स्त्रीमुक्ती म्हणजे बाया-पुरुषापेक्षा वरचढ आहेत. त्यांनी संसार मांडू नये, घरात लक्ष देऊ नये. त्यांनी कसंपण वागावं...असे विचार. पण आज जरासं डोक्यात बसलंय की जग ना पुरुषाचं, ना बायांचं. दोघे एकत्र आले तर जगाचा गाडा पुढे चालणार. दोघांनी एकमेकांना सहकार्य करावं, एकमकांना मान द्यावा...पन तरीही येवढ्या चर्चेने काही डोक्यात फिट्ट बसणार नाही हा विचार ! दोन-तीन वेळा तरी चर्चा हवीच' एका प्रौढ तरुणाने सूचना केली. तेवढ्यात गावातली एक तरुण सून उठून बोलू लागली.
"ताई, आता बायांना ग्रामपंचायतीत तीस टक्के जागा आहेत. मला उभं रहायचं होतं. छोटीच्या बाबांची पण परवानगी होती. मी राज्यशास्त्र घेऊन एम.ए. झालेय. पण सगळ्यांनीच वेड्यात काढलं मला. बाया कुठे राज्य करतात का ? इंदिरा गांधीची बात वेगळी. ती देवीमाय होती. असं गावातली, घरातली माणसं म्हणायची...तुमी बघा, सरकारनं कायदा केला तरी सगळ्या पन्नाशीच्या आगेमागे असलेल्या बायांनाच निवडणुकीत उभे करतात."
...पाहता पाहता चर्चेत दोन तास गेले. प्रत्येकाच्या मनात उलट्यासुलट्या विचारांचे वादळ सुरू झाले होते. पण नव्या दिशेची ती चाहूल होती !!
■ ■ ■